कबीरचाचा

Submitted by shriramb on 20 July, 2019 - 09:06

एक होता कबीरचाचा
फुलं विकायचा धंदा त्याचा

झब्बा पायजमा, वीतभर दाढी
हसरा चेहरा, बोलण्यात गोडी

देवळालगत छोटा गाळा
करीत बसायचा झेंडूच्या माळा

कुठून आला कोण जाणे!
गुणगुणत असे कसलेसे गाणे

चैत्रात यायची रामनवमी
फुलांची आरास करायचा नामी

लोक चेष्टेत म्हणायचे त्याला
रामाने तुझाच का विणला शेला?

*****

एका संध्याकाळी मात्र
सुरु झालं भयाण सत्र

माणसांचा जमाव, जमावाची झुंड
शिगेला पोहोचलं दहशतकांड

लाठ्या, भाले, बाहेर पडले
आग लागली, दगड उडाले

जो तो सैरावैरा धावला
माणुसकीचा अश्रू ढळला

*****

कबीरचाचा सुन्न झाला
हताशपणे बघत राहिला

कुठूनसे आले धावत लोंढे
फुलांवर उडले रक्ताचे शिंतोडे

तरीही जागचा हलला नाही
"राम!" म्हणूनही वाचला नाही

- श्रीराम

Group content visibility: 
Use group defaults

सत्य घटना आहे का? की उगाच भावनांना हात घालत आहात? फार जूना आयडी आहे तुमचा श्रीराम जी.

कविता ह्रद्याला भिडली.

आपण ज्या दिवशी समोरच्या माणसाला जातीच्या चश्म्याऐवजी माणुसकीच्या नजरेतुन बघु तेव्हाच अशा जातींवरुन होणार्या दंगली थांबतील.