शिवरायाची आरती

Submitted by Asu on 19 February, 2019 - 14:15

श्रीशैलम्, आंध्र प्रदेश येथील शिवाजी महाराज मंदिरातील प्रतिमेस वंदन करून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या परमपूज्य शिवछत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंतीनिमित्त सादर शिवरायाची आरती -

शिवरायाची आरती

जय देवा जय देवा जय जय शिवराया
आरती ओवाळीतो जनतेच्या राया ||धृ||

म्लेंच्छांच्या काळा, जिजाऊच्या बाळा
स्वराज्य संस्थापका, दुष्टांच्या धाका
ललनांचा त्राता, गोरगरिबांचा दाता
भले सकला कराया, पडतो मी पाया ||१||

जन्म शिवाचा पवित्र शिवनेरी झाला
स्वराज्याचा शुभ कोंबडा आरवला
मंगलदिन आज आम्हा आला उदया
जिजाऊ घेई तान्ह्या, त्यां निज हृदया ||२||

कलेकलेने वर्धिष्णु जैसा शुक्लेंदू
शिवस्वरूप तू तुजला आम्ही वंदू
रामायण महाभारत सांगे तनया
स्वराज्या प्राण जपे आईची माया ||३||

जमवून मावळे रणवीर, सर्व रांगडे
प्राण फुंकून केले जिवंत हे सांगाडे
स्वराज्याचा रचिला तू भक्कम पाया
ओवाळीतो तुज अर्पून मम काया ||४||

कोट किल्ले बांधून मावळ सजला
रायगड किल्ला राजधानी शोभला
राज्याभिषेक करुनि छत्रपती राया
जाणता राजा तू शिवकल्याण राया ||५||

यावत्चंद्र दिवाकरौ शिवा तुझे नाम राहो
चराचर सृष्टी तव नित्य गुणगान गावो
तव नामाविना संसारी जगणे जाई वाया
शिवशाही घेऊनि यावे सत्वर शिवराया ||६||

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults