म्हातारपण

Submitted by Asu on 18 February, 2019 - 09:50

म्हातारपण

अमर्याद आकाश तुमचं
म्हणतात त्याला बालपण
आक्रसलेलं आकाश आमचं
म्हणतात त्याला म्हातारपण

म्हातारपण म्हणे बालपण !
म्हणायला ठीक आहे
खर तर नियतीची
आयुष्याला भीक आहे

बालपण उगवता सूर्य,
प्रकाश देण्या उठलेला
म्हातारपण बुडता सूर्य,
प्रकाश देऊन मिटलेला

थकलेला, भागलेला,
क्षितिजावर रेंगाळणारा
कृतघ्न जनांना आठवून,
तांबडा लाल, झुकलेला

म्हातारपणात कोण देईल,
तारुण्याचा आधार ?
कोण देईल बुडत्याला
आयुष्य उधार !

जगण्याला किंमत नाही
मरायची हिंमत नाही
ओढायचे ओझे आता,
सरणावर टेकण्या माथा

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults