शीर्षक न सुचलेली कविता

Submitted by क्षास on 10 February, 2019 - 06:28

सर्वत्र पसरलेली ती माणसं
तीक्ष्ण काट्यासारखी खुपणारी
माझ्या चुकांना पिंजून काढून गुन्हे ठरवणारी,
शब्दांचे चिमटे काढणारी
मी पश्चात्तापाची किंकाळी फोडेपर्यंत...

घरचा-दारचा, जवळचा-लांबचा,
ओळखी-अनोळखी प्रत्त्येक जण करत होता भेसळ खऱ्या-खोट्याची
वास्तवाच्या इवल्याशा थेंबात सराईतपणे
नीति-अनीतिच्या ठोकळेबाज आकृत्यांमागे लपून...

त्या इतक्या गदारोळात तू आलास
पाऊल न वाजवता,
विझत होते निखारे हळूहळू पण
आत्ता न आठवणाऱ्या आठवणींचे
ते काळजावर पडलेले चट्टे तसेच होते

तू आलास
डोळ्यांत सिम्पथीचं नामोनिशाण नाही, कीव नाही,
किंचितशी कणवही नाही, उत्सुकताही नाही
प्रश्न नाहीत, शंकाही नाहीत ...
तेव्हा कुठे ठाऊक होतं रिकाम्या हाती येणारा तू
पूर्ण आयुष्य व्यापून उरेल एवढं सगळं देणार आहेस!
आपण बोलत राहिलो,
अखंड बोलत राहिलो
ठाण मांडून
त्याच भूतकाळाच्या पोत्यांवर बसून

मला आठवतंय
एकत्र लोळत सिनेमे बघणं,
पुस्तकं वाचणं,
गाण्यांवर नाचणं ,
भरपेट खाणं,
आणि बाईकवरून फिरणं
मला आठवतंय
बाईकचं गोल गोल फिरणारं चाक
कित्येक किस्से,प्रसंगाच्या गल्ल्या
धुंडाळत आठवणींची शहरं मागे टाकणारं,
तुझ्या खांद्यावर विसावलेला माझा उजवा हात
आणि डाव्या खांद्यावरची हनुवटी........
मला आठवतंय
ट्रेनमधल्या गर्दीत
डोळ्यांमधून होणारा तुझा-माझा संवाद,
हाताच्या उबेतून प्रकर्षाने जाणवणारं
तुझं माझ्यासोबतचं "असणं"....
मला आठवतंय
महिनाभर दूर राहिल्यावर
आर्ततेने कळलेलं एकत्र असण्याचं महत्व,
दुराव्याने जवळ आणलेली आपली दोन व्याकूळ मनं
भेटल्यावर गलबलून गेलेले डोळे,
आसुसलेले शब्द
आणि सगळी उदासीनता शोषून घेणारा तो स्पर्श.....
मला आठवतंय
ते उत्कटतेने एकमेकांत मिसळणं,
विरघळून जाणं स्थळ-काळाचं भान विसरून...
मला आठवतंय
भविष्यकाळात रमून स्वप्नांचे इमले बांधणं,
ती सगळं स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणं
मला सगळं आठवतंय ...

आठवत नाही तो फक्त पूर्वीचा कोलाहल
तू असाच राहा मला घट्ट मिठी मारून
मला बाहेरचा कल्लोळ ऐकायचा नाहीये
फक्त ऐकायची आहे तुझ्या हृदयाची धडधड
माझ्या मौनाशी गप्पागोष्टी करणारी..
तू असाच राहा
मला घट्ट मिठी मारून.
कुठेही जाऊ नकोस

Group content visibility: 
Use group defaults

वाह

वाह! सुरेखच!!
गेय कवितेंपेक्षा कधी कधी मुक्तछंद जास्त भिडतो.
मस्त!!

वेग आहे. आवेग आहे. मांडणीची एक शिस्तबध्द लय आहे.
भावनांचे तरल रंग उतरलेत ओळी ओळी गणिक शब्दांच्या कुंचल्यातून.
प्रत्येक कडव्या गणिक चित्र उभारते डोळ्यासमोर अगदी जसेच्या तसे.

लिहित रहा!