उरे शून्य काही ( सुमंदारमाला)

Submitted by माउ on 2 February, 2019 - 19:18

मनाच्या तळाशी उरे शून्य काही , तिथे का तुझा भास होतो मला?
अबोली क्षणांच्या जुन्या पाकळ्यांनी पुन्हा का रिता श्वास गंधावला?

हसावे रडावे झुरावे कितीदा किती पावसाळे म्हणावे तुझे
उन्हाच्या झळांनी निळ्या कागदावर कसे भास सारे लिहावे तुझे
जिने ना सुगंधी हवा पाहिलेली कसा गंध द्यावा कळीने तुला?
अबोली क्षणांच्या जुन्या पाकळ्यांनी पुन्हा का रिता श्वास गंधावला?

क्षणांच्या महालात उमटून आलो कधी तू नि मी आपलेसे ठसे
तिथे शांतता आज मांडीत आहे नवी तावदाने नवे आरसे
कसे पैंजणांनी नवे गीत गावे लपेटून घेता जुनी श्रुंखला?
अबोली क्षणांच्या जुन्या पाकळ्यांनी पुन्हा का रिता श्वास गंधावला?

तुझा प्राण होता नभाच्या किनारी तुला का कळावी फुलांची व्यथा
मुक्या चार स्पर्शात संपून जाते मुक्या पाकळ्यांची मुकी आर्तता
हवेने दवाने नभाने ऋतूने कसे घाव केले पहाया फुला
अबोली क्षणांच्या जुन्या पाकळ्यांनी पुन्हा का रिता श्वास गंधावला?

उभारून यावे मनाने कशाला कुठे राहिली आपली आर्जवे?
तनाला दुभंगून हे श्वासही बघ उडू पाहती अत्तराच्यासवे
जरी देह सारा विझूनी शमावा उरे का तुझा भास श्वासातला
अबोली क्षणांच्या जुन्या पाकळ्यांनी पुन्हा का रिता श्वास गंधावला?

-रसिका
०२/०२/२०१९

Group content visibility: 
Use group defaults

कविता खूपच आवडली. वृत्तामध्ये लिहिताना शब्दांची खूपच ओढाताण करावी लागलेली अनेक ठिकाणी दिसते. पण इथे तसे झालेले नाही.
बाय द वे, हे वृत्त खरोखरच सुमंदारमाला आहे का?

बाय द वे, हे वृत्त खरोखरच सुमंदारमाला आहे का?> होय, काही चुकले असल्यास सांगावे.

सर्वांचे खूप आभार!