सेल्फी (भाग १)

Submitted by सेन्साय on 16 November, 2018 - 19:06

सेल्फ़ी ― १
~~~~~~~~

".. इथून राइट घ्या जरा आतमध्ये. बस्स बस्स थांबवा.
हम्म ! किती झाले ?"

"५३"

अनुश्री पर्स मधून ५००ची नोट काढ़ते.

"सॉरी ओ ताई, आता सुट्टे नाही द्यायला. सकाळपासून तुम्हीच पहिल्या गिऱ्हाईक होता."

"बरं, थांबा २ मिनटें. द्या ती नोट परत. मी पटकन घरातून सुट्टे आणून देते." असे म्हणत अनुश्री लगबगीने पर्स मधून लैच की काढत दाराकडे वळली....

अनुश्री - वय २७, आकर्षक गोरा रंग आणि समोरच्याला क्षणभर नक्कीच अडकवून ठेवतील अश्या सुंदर निळ्या डोळ्यांची ही तरुणी. आईबाबा लहानपणी वारल्याने मामाकडेच मोठी झाली. आयुष्य एकलकोंडे जगायची सवय लागल्याने मी बरी अन् माझा अभ्यास बरा असा सरळमार्गी विचार करत कॉलेजपर्यन्त कायम टॉपर राहिल्याने ग्रॅज्युएशन नंतर लगेचच एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागली. आता आपण स्वावलंबी बनून मामा मामीचे ऋण फेडूया ह्याउद्देशाने कामावरही ती आणि तिचं विश्व ह्यापलिकडे कधी तिची नजर गेलीच नाही. ह्यासर्वामुळे प्रेम, आकर्षण, क्रश ह्यांचा तिच्या आयुष्यात मागमुसही नव्हता. रूप, शिक्षण, पैसा ह्यात नाव ठेवण्या सारखे काहीच नव्हते तरीही अजून लग्न न जमल्याने एकटीच होती.

ड्रॉवरमधून सुट्टे पैसे घेता घेताही तिने आरश्यातुन स्वत:कडे पाहिले आणि खुदकन हसत एक छानसी गिरकी घेत मागे वळली. रिक्षाचे पैसे देवून आत
आल्याआल्या तिने पटकन मोबाईल बाहेर काढत बाल्कनीची बॅकराउंड पकड़त एक सेल्फ़ी काढला. आपल्या रूपाचा यथोचित गर्व बाळगत कायम स्वत:च्याच विश्वात रमणाऱ्या अनुश्रीला दिवसातून ५० वेळा तरी सेल्फ़ी काढायचा मोह आवरत नसे. आणि त्यातून ४९ वेळा तिचा कॅमेरा मोबाईलच्या गैलरीमध्ये अजून एका नव्या फोटोची भर हमखास टाकत राही. आजचे फोटो पाहुन मात्र मॅडम काही फारश्या खुश नाही दिसल्या, कारण सकाळीच वर्तमानपत्रात नवीन मोबाईलच्या जाहिराती पाहताना आपल्या फोनची पिक्सेल कमी आहे हे तिला लक्षात आले. आणि गेल्याच दिवाळीत लेटेस्ट मॉडेल म्हणून घेतलेला हां फोन आता तिला अचानक फार जूना, बिनकामाचा वाटू लागला. त्यामुळेच आजचे फोटो नेहमी सारखेच सुंदर येवूनही अनुश्रीला मात्र ते सर्व बेकार वाटल्याने एकेक फ़ोटो परत मोबाईलच्या गॅलरीमधून डिलीट करू लागली. आजच संध्याकाळी ते नवीन मोडेल विकत घेवू हां निश्चय मनाशी करत ती पुढील कामास लागली.

"या मॅडम, आजच लेटेस्ट मोबाइल आलेत आपल्याकडे. फेस्टिवल धमाका सुरु झालाय त्यावर अनेक स्कीम्स सुद्धा मिळतील. काय रेंज मध्ये दाखवू ?"

दुकानात शिरल्या शिरल्या पहिल्या काउंटरवरुन कानावर पडलेल्या ह्या पोपटपंचीकड़े आणि त्या नव्याने लागलेल्या सेल्समनकड़े साफ़ दुर्लक्ष करत अनुश्री तिच्या नेहमीच्या काउंटरपाशी जावून विनीतची वाट पाहू लागली. तिला पाहताच हातातले कस्टमर आटपुन विनीत हां सर्वात जूना सेल्समन तिच्याकडे पाहुन छानशी स्माइल देत वेलकम करत समोरच्या रॅककड़े बोट दाखवत म्हणाला, "ह्यात तुम्हाला पाहिजे तसे सर्व मॉडेल मिळतील. हे तर पाहुन घ्याच, पण आजच एक इंपोर्टेड पीस आलाय बाय बॅकमध्ये, तोही नक्की पहा. मला माहितीय तुम्ही कधीच सेकण्डहैण्ड नाही घेत, पण हां मोबाईल खूप भारी फीचर्स असलेला आणि अतिशय माफक दरात मिळेल. ख़ास तुमच्यासाठी राखून ठेवला होता मी अक्च्युलि !"

विनीतवर पूर्ण विश्वास असल्याने तिने तो मोबाईल हातात घेतला आणि त्याचक्षणी एक अनामिक ओढ़ मनातून जाणवली की, येस अनुश्री ! हाच तुला हवाय, हे मॉडेल तुझ्यासाठीच आहे. मुळात तो मोबाइल खुपच सॉलिड फीचर्स असलेला होता आणि कोणा आफ्रिकन माणसाने किरकोळ अडचण आल्याने सकाळीच हां फोन देवून नवीन विकत घेतला होता. त्यामुळे तसा तिच्या बजेटमध्ये बसत होता आणि खरेच स्वस्तही पड़त होता, त्यामुळे लगेच तिने कॅश काउंटरकड़े जावून पेमेंट दिले आणि आपल्या आवडीच्या गुलाबी रंगाचे कव्हर घालून त्या मोबाइलचे विचित्र नक्षिकाम असलेले जुने कव्हर तिथेच डस्टबिनला फेकून दिले. ही एक मामूली वाटणारी सहजसुलभ क्रिया पुढे येणाऱ्या काळात किती संकटांना आमंत्रण देणार होती ह्याचीे मात्र बिचाऱ्या अनुश्रीला अजिबात कल्पना नव्हती.

______________________________________________

(आधीच्या आठवड्यातील एक दिवस ---)

आफिकेच्या जंगलातील नाइल नदीकाठचा एक दुर्गम भाग ....

जंगली श्वापदांच्या हाडांपासून बनलेल्या आणि विचित्र चमकणाऱ्या रंगीत खड्यांच्या माळांनी वरचे अर्धेअधिक अंग झाकून गेलेले दोन काळ्या कपड्यातील वयस्कर तांत्रिक आणि त्यांच्या मध्ये बसलेला एक पंचवीशीचा स्थानिक तरुण, असे मिळून काही विविक्षित उद्देशाने प्रेरित झालेले ते तिघेजण आपापल्या मंत्रविधीवर लक्ष केंद्रित करुन जाहुबुलॉनच्या उपासनेत गर्क होते. त्या तरुणाला, ह्यनामारिआला त्याच्या ध्येयप्राप्तीसाठी एक सिद्धी आवश्यक वाटत होती आणि तिच्या प्राप्तिसाठीच आजचा चंद्रकाल योग विशेष महत्वाचा होता. काळ्या विद्येच्या प्रसारासाठी अनेक कुमारीकेँसोबत रत झालेल्या ह्यनामारिआला आता त्या प्रत्येकीच्या देहाबरोबर आत्म्यांचाही कब्जा हवा होता. आणि त्यासाठी आजच्या आधुनिक जगात वावरताना कोणालाही आपल्या दुष्कृत्याचा मागमुस लागू नये ह्या उद्देशाने स्वतःचा मोबाइल हेच माध्यम म्हणून वापरण्याचे त्याने निश्चित केले.

(क्रमशः)

― अंबज्ञ

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहलंय
याचा पुढचा भाग केव्हा येणार आहे .

chhan ahe. pan bhag khupch lahan ahe. pudhcha bhag lavkar yeudya.