आठवणीतील माणसं : नारायण आलेपाकवाला

Submitted by ASHOK BHEKE on 10 November, 2018 - 23:51

परवा एका मुलाने वीस रुपये कमविले त्याने इतक्या ऐटीत सांगितले की, त्याने वीस लाखाची कमाई केली. आश्चर्य वाटले. आम्ही लहान असताना ५ पैश्यासाठी किती किती कामे केली हे मनात आले तरी डोळ्याच्या किनारी ओलसर होते. लहानपण गेले पण त्या लहानपणातल्या आठवणींची शिदोरी अनपेक्षितपणे कधी उघडली जाईल, सांगता येत नाही. १९७० ते ८० दशकात चाळीचाळीतून एक माणूस आलेपाक विकायला यायचा. सुमधुर आवाजात सातमजली साद घालायचा, तसे घराघरातून मुले बाहेर यायची अन म्हणायची नारायण आलेपाकवाला आला. खूप बोलका माणूस. मला ही खूप बोलणारी माणसं फार आवडतात. निर्मळ मनाची असतात. कुणाचं वाईट करायचं त्यांच्या मनाला शिवत नाही. हा माणूस त्यातला एक. शर्ट लेंगा घालून त्या साखरेच्या आणि गुळाच्या आलेपाक वड्या विकून पोटं भरायचा. आलेपाक म्हणजे गुळ कमी अन किसलेले आले अधिक... कडक, तिखट, झणझणीत.साखरेचे होते ते गोड लागायचे. वास्तविक डोक्यात थैमान घातलेला माणूस. आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणून धंदा करीत होता. कशासाठी, पोटासाठी....!
कोण होता नारायण... कोठून येत होता, कोठे राहत होता, हे ठाऊक नाही. पण धंद्याच्या लायक माणूस. वाचाळ माणूस आमच्या चाळ नावाच्या वाचाळ वस्तीत यायचा. तो काळ तसा चांगला नव्हता. पण नारायण पोटासाठी हातावर तो डबा खांद्यापर्यंत नेत असे. त्याकाळात त्याचे अप्रूप वाटले नाही. पण आम्ही मोठे झालो तेव्हा त्या कष्टकरी माणसाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहत असे. मुलायम आवाजाचा साधा माणूस गाणं गात गात धंदा करायचा. त्याचा आलेपाक खाल्ला तर सर्दी खोकला झटपट मोकळा होत असे. त्याचा आलेपाक खाल्याने अमिताभ बच्चन सुपरस्टार झाल्याचे तो सांगत असे तर सुनील गावस्करचे शतक झळकले की, त्याने ऐटीत सांगितलेच पाहिजे. शून्यावर आउट झालेला खेळाडूला त्याने किती वेळा सांगितले आलेपाक खा.. आलेपाक खा पण त्याने खाल्ले नाही म्हणून तो शून्यावर आऊट झाला. किती अभिमानाने सांगायचा. एखाद्या डॉक्टरांच्या हाताला गुण नसेल पण नारायणाच्या आलेपाक खाल्याने सर्दीखोकला मुक्त होतो, हा भारी समज नारायणच्या मधाळ बोलण्यामुळे झाला होता. त्याचं बोलणं जणू तुपात तळलेलं असायचे.
नारायण म्हणजे आम्हांला विदुषक वाटायचा. आनंद देणाऱ्या खूप गोष्टी आहेत या जगात.एखाद्याचे अश्रू पुसताना देखील आनंद मिळतो. चिमुकल्या बाळाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून देखील मन आनंदी होते. नारायण म्हणजे आनंदून टाकणारा, चैतन्याची कारंजी फुलविणारा सदाबहार माणूस. गंभीरपणे जीवनाकडे पाहताना मुलांना पोटं धरीसपर्यंत हसवायचा. त्यांच्याशी खेळायचा. गप्पा मारायचा. भुरळ पाडायचा.अगदी आपला.. आपल्या घरातला.. आपल्या रक्तमांसाचा माणुस. आम्ही स्विकारलेले नाते होते. ज्या संगतीत वाढतो, मोठे होतो.त्यांचे संस्कार आपल्या बालमनावर होत असतात. चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा अशी जाणकार मंडळी सांगतात. पण नारायणाबरोबर घालविलेला तो वेळ देखील आमच्या आरोग्याला लाभदायक असायचा, हि प्रांजळपणे कबुली द्यावीशी वाटते.
आज नारायण काय करतो ठाऊक नाही. पण लहानपणी एकदा शिरोडकर हायस्कूल मध्ये आपल्या आवडत्या माणसाविषयी निबंध लिहायला सांगितला होता. एका चिमुरड्या मुलीने त्याच्यावर छानसा निबंध लिहिला होता. तो निबंध सर्व शाळेतील मुलांना वाचायला मिळाला. उदंड लोकप्रियता कमावलेला एक फेरीवाला आबालवृद्धांच्या मनात घर करून राहिलेला नारायण आलेपाकवाला. सहज सुचलं अन मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली आठवणीतील शिदोरी पावसाची रीपरीप व्हावी तसे लेखणीतून झरझर उतरली.

*अशोक भेके*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

अरे मलापण माहित आहे हा आलेपाक वाला... मि स्प्रिंग मिल च्या चाळीत राहायचे तेव्हा आमच्या लहानपणी तो यायचा... तशी त्या आलेपाकची चव मला कधीच नाहि मिळाली कुठे... अन आलेपाक म्हटला कि त्याची ती ललकारी अजुन आठवते..

छान लिहलयं!
असे आलेपाकवाले गावोगावी असावेत!

मला आठवतयं नगरला असताना लहानपणी असाच एक आलेपाकवाला रोज संध्याकाळी यायचा काचेच्या चौकोनी डब्यात आल्याच्या वड्या ठेवलेल्या असत. गल्लीतून जाताना त्याची ती

"सर्दीला खोकल्याला पित्ताला पडश्याला
आल्याची वडी आलेपाक"

अशी आरोळी आली की थंडीच्या दिवसांत हमखास त्याच्याकडून ५ पैश्याचा आलेपाक घेत असू!

सुरेख ....

आमच्या गावतही होता आलेपाकवाला, एक सफेद रंगाची पिशवी खांद्यावर टाकुन आरोळी देत यायचा तो आSSSलेSSSSSSपाSSक...तिखट असायचा तेंव्हाचा, हल्ली मिळतो तो जरा गोडसर असतो मजा नाही येत

आलेपाकवाले असो वा अन्य कोणताही फेरीवाला ते जगतात इतरांसाठी.... स्वत:साठी जगतात ते पोटाची खाचखळगी भरण्यासाठी.