घालमेल

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 November, 2018 - 03:30

किर्र काळोखी अवस
खोल मनामधे दाटे
गोतावळ्यात राहून
एकांताची भीती वाटे

तुझ्याविना जगायचा
आव आणते-आणते
आठवांची रेल-चेल
डाव हाणून पाडते

वरकरणी पहाता
वाटे सारे आलबेल
श्वासो-श्वास जाणतो रे
अंतरीची घालमेल

वाट चुकली सकाळ
रोज दार ठोठावते
तुझ्या नावाने चहाचं
रोज आधण टाकते

सरावलेल शरीर
सारी कामं उरकते
सांज ढळता-ढळता
तन-मन निखळते

तुझ्या स्मृतींचा सखया
उभ्या रातीला जागर
ओळ सुचवून जाते
रीती झालेली घागर

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users