मन मंदिरा

Submitted by Madhavi Sameer Joshi on 25 September, 2018 - 10:19

माधवी समीर जोशी, ठाणे

काही दिवसांपूर्वी टीव्हीवर माझे अतिशय आवडते गाणं मन मंदिरा लागले.खरंच आपले मन एखाद्या मंदिरा सारखं असते. आपण मंदिरात कशी देवांची नित्य पूजा अर्चना करतो तसेंच रोज मनात सकारात्मक विचार रुजवावें लागतात. सणासुदीला जशी मंदिराची कानाकोपऱ्यात साफसफाई होते तशीच मनातील नकारात्मक विचारांची कोळीष्टके दूर करावी लागतात.

मन थाऱ्यावर , जग जाग्यावर
मन कसकसलं,जग विस्कटले
मन उभारलं,जग विस्तारले
मन विहरलं, जग बहरलं

अनिल अवचट ह्याच्या ह्या ओळी मनाविषयी सगळे सांगून जातात.हल्ली सगळेच जण मानसिक तणावाखाली वावरताना दिसतात.

जीवनात सतत स्पर्धा, भौतिक सुखाची लालसा, ह्या मूळे जीवन तणावपूर्ण झाले आहे. आपण जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेणं पूर्ण विसरूनच गेलो आहोत.मनाचा ताण हलका करण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यान करणे आवश्यक आहे.

पूर्वी लहानपणी मुलांवर संस्कार करताना मनाचे अनेक श्लोक शिकवले जात असतं. जसे

मना सज्जना भक्ती पंथेची जावे...,

मना पापसंकल्प सोडून द्यावा ... ,

समर्थ रामदास स्वामींनी मनाविषयी येवढं लिहून ठेवले आहे की कोणी एकही शब्द नाही लिहिला तरी चालेल. विविध टप्प्यावर मनात त्या त्या वयानुरूप विचार येत असतात.

जसे अल्लड वयातील मनाचं गाणं

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते

जेव्हा दोन प्रेमीं जीवनात एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात तेंव्हा मनाचे गाणं

मन धागा धागा जोडते नवा,
मन धागा धागा रेशमी दुवा!’

जेव्हा दोघे विवाहबध्द। होऊन काही वर्षे तृप्त सहजीवन व्यतीत केल्यावर मनाचं गाणं

माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले॥

काही वर्षे गेल्यावर जबाबदाऱ्या कमी होतात आणि मन भूतकाळात भरकटत असते तेंव्हा

अचपळ मन माझें नावरे आवरीता ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ||

आयुष्याच्या संध्याकाळी मन देवभक्ती कडे वळू लागते.माणूस थोडा व्यापक विचार करू लागतो. तो जेंव्हा आध्यात्मिक वाटेवर मार्गक्रमण करू लागतो. त्याला एक अलौकीक अनुभूती येते आणि मन ज्ञानरूपी आभाळात झेपावत तेंव्हा मनाचे गाणं

मन मंदिरा... तेजाने उजळून घेई साधका
संवेदना... संवेदना संवादे सहवेदना जपताना.....
मन मंदिरा....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ,
मन सैतानाचा हास, मन देवाचे पाऊल,
दुबळ्या गळत्या झोळीत, हा सूर्य कसा झेलवा?
मन मनास उमगत नाही , आधार कसा शोधावा