व्यक्तिचित्रण - "संदीप प्रभाकर जोशी"

Submitted by दक्षिणा on 25 September, 2018 - 05:44

तारीख - १९ सप्टेंबर २०१८ - सकाळी ७.५१
माझा मोबाईल वाजला, माझ्या धाकट्या काकाचा एस एम एस होता " Welcome back, need to talk to you urgent, please call me. मी त्याच पहाटे १ वाजता भूतान हून परतले होते. मेसेज पाहून झोप उडालीच होती. काकाला फोन केले पण ते दोन्ही फोन त्याच्याकडून मिस झाले. पोटात खड्डा पडायला लागला. मग माझ्या बहिणीला फोन केला "तुम्ही सगळे ठीक आहात ना? मला काकाचा असा असा मेसेज आलाय. ती म्हणाली हो.. सगळं ठीक आहे की. झालं मी ज्या गॅसवर बसले होते त्याची आच मोठी होत होती क्षणोक्षणी. काकाशी फोन वर बोलणं झालं पण त्याने प्रत्यक्ष भेटल्याशिवाय काहीही सांगायला नकार दिला. त्याच धुंदीत रिक्षातून काकाकडे निघाले आणि वाटेत ताईला मेसेज केला " काकाने मला काहिहि सान्गितले नाहिये, माझा मूड खूप गेलाय आणि मला खूप भिती वाटतेय." ती म्हणाली "जा तरी तु उगिचच पटकन डाउन होतेस." प्रत्यक्ष भेटल्यावर काकाने धक्कादायक गोष्ट सांगितली ती म्हणजे माझा धाकटा चुलत भाऊ संदिप याला मी भूतान मध्ये असताना २ हार्ट अटॅक आले आणि तो सध्या क्रिटिकल आहे. माझ्या पायाखालची वाळू सरकली आणि इतका वेळ जी मी पॅनिक झाले होते त्याचे रूपांतर रडण्यात झाले, एकूण अविर्भावावरून जे सुरू होते ते सर्व सिरियस होते याची कल्पना आली होतीच.

घरून फोन आला म्हणजे सारखं पोटात चर्र् होई, न जाणो काय सांगायला फोन केला असेल? पण सुदैवाने तो जैसे थे अवस्थेत होता. आणि व्हॅन्टिलेटर असला तरिही त्याचे बाकी बॉडी पॅरामिटर्स व्यवस्थित होते, चिंतेची बाब होती ती म्हणजे फुफ्फुसात झालेलं इन्फेक्शन. गुरुवारी सकाळी मला अचानक आतून वाटायला लागलं की पोरगं नक्की बरं होऊन घरी परतेल. शुक्रवारी सकाळी कोल्हापूरहून परत अपडेट आला की त्याला दुसर्‍या हॉस्पिटल मध्ये हलवण्याचा विचार सुरू आहे. पुन्हा माझा वैचारीक डाउन फॉल सुरू झाला. शुक्रवारी ( 21 sept) रात्री तर मी प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि झाडून सर्व जवळच्या मैत्रिणींना फोन करून सांगितले की प्लिज माझ्याकडे या मला अजिबात छान वाटत नाहिये. रात्री २ पर्यंत जागीच होते. नंतर जबरदस्तीने झोपले आणि पहाटे साडेतीन ला (22 sept) काकाचा फोन आला "संदिप गेला".

मी माझ्या अत्यन्त जवळच्या मैत्रिणी/मित्राना मेसेज करून सांगितलं "आम्ही हरलो, संदिप गेला, लढाई संपली"
पुण्याहून कोल्हापूरला जाईपर्यंत मनाला फक्त आणि फक्त त्याच्या आठवणींनी घेरलं.

माझ्या सर्व भावंडात हा भाऊ मला आणि माझ्या बहिणिला सर्वात जवळचा होता. सख्खा नाही पण सख्ख्यासारखाच. लहानपणी अतिशय हट्टी आणि रडका. गोड खाऊ तर इतका की सतत आईला दुध गुळ पोहे दे, दुध साखर पोळी दे.. नाहितर श्रीखंड तरी. श्रीखंड त्याला जीव की प्राण होतं. तो आणि मी एकाच एज्युकेशन सोसायटीत शिकलो, कधी येता जाता एकत्र यायचो तेव्हा आंबाबाई देवळाच्या जवळ एक अंबाई दुग्धालय नावाची छोटं टपरी वजा दुकान होतं. तिथे छोट्या छोट्या श्रीखंडाच्या डब्या मिळत. हा मुलगा ती रोज एक आणून खायचा. आणि आमच्या जिन्यात एका ठिकाणी त्याने त्याची चळत करून ठेवली होती. अलिकडे त्याच्या बायकोला जेव्हा सांगितलं तेव्हा तिने विश्वास नाही ठेवला की हा इतका गोड खाऊ होता, कारण अलिकडे तो गोडाला स्पर्श सोडा पण पहातही नसे.

उद्योगी तर होताच लहानपणी.. पण गोड पण तितकाच होता.. सुर लावून रडत बसायचा (गोड खायला दिलं नाही की) कुणी जवळ पास आलं की रडणं जोरात व्हायचं.. पण तो हे तासन तास करू शकायचा. अखेर काकूला हार मानून त्याला गोड द्यावंच लागायचं.

त्याच्या आणि माझ्यात फक्त दिड वर्षांचं अंतर (तो लहान होता दिड वर्षाने) पण तसे बरोबरीचेच. कधी मला ताई म्हणायचा नाही. नावानेच हाक.. आमच्या चुली वेगळ्या असल्या तरिही घरं अगदी लागून होती (मध्ये फक्त एक भिंत) अजोबा हयात असताना आम्ही ४ नातवंडं त्यांच्या जवळ होतो. त्यातल्या त्यात धाकटे म्हणून मी आणि संदिप आमची चंगळ असे. अजोबा आम्हाला खाऊला रूपया वगैरे देत. तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत आमच्या घरासमोर एक पोस्टरचे दुकान होते, तिथला माणूस ती गोष्टींची पुस्तकं विके. (राक्षसाचा जीव पोपटात वगैरे) मी आणि संदिप ती पुस्तकं विकत घेत असू (त्याच्या खाऊच्या पैशातून आणि माझ्यापण) अशा पद्धतीने आमच्याकडे एका दिवशी २ पुस्तके होत. मग ती आलटून पालटून वाचत असू. खूप साठली की आजूबाजूच्या पोरांना वाचायला द्यायचो आणि त्याचे ५० पैसे घ्यायचे, त्यातून अजून पुस्तकं.

गोट्या, पतंग, सिगरेटची पाकिटं, बॅडमिंटन इ. खेळ पण एकत्र खेळलो आम्ही. तुला पतंग उडवता येत नाही तु चक्री धर फक्त. असं म्हणायचा मला. गोट्या खेळताना पण ४ गोट्या असायच्या एक माझी, एक त्याची एक माझ्या ताईची आणि त्याच्या भावाची.. पण खेळायचा हा एकटाच ते पण सर्वांच्या वतीने.

एकदा पत्ते खेळताना.. मी त्याचे खूप हात ओढले, पुढच्या डावात पान देणार की पत्ते? असं विचारलं तर म्हणाला "पत्ते" मी पानं ओढली तर त्यात तिनही एक्के आले. आधीच त्याच्यावर ८ होते. त्यातून हे सगळे एक्के गमावल्यावर तो हात काय करेल या विचाराने मला रडू फुटले. मी डाव उधळून लावला.. पण त्याने मुर्खात काढले मला... म्हणाला हा पत्त्याचा डाव आहे.. रडतीस काय बावळटासारखी?

पुढे ते आम्ही रहात होतो तिथून शिफ्ट होऊन दुसरीकडे रहायला गेले... पण त्याच्या दहावीत तो ३ महिने अभ्यासाला आमच्याकडे रहायला आला, तेव्हा सगळे झोपले की मी आणि संदिप चोरून उठायचो, खाऊचे पैसे घेऊन तो हळूच मसाला पान विकत आणायचा आणि मग तो आणि मी गॅलरीत बसून ते एक पान वाटून खायचो आणि झोपायचो.

पुढे बारावी नंतर आम्ही पुण्यात आलो आणि संपर्क कमी झाला. मग काकू गेली आणि संदिप एकदम जबाबदार झाला. बालिशपणा जाऊन एक जबाबदार प्रौढ झाला. स्वतःच्या पायावर उभा राहिला. आमचे नियमित नाही पण फोन होऊ लागले. नात्याला एक जबाबदार आकार येऊ लागला. त्याचे लग्न झाले. तसा तो आणि माझी बहिण जास्त जवळ होते (दोघांची रास एकच ना) Happy सर्व सुखात सुरू होते. त्याला मुलगी झाली. संसार सुखात सुरू होता.

मी भूतान ला असताना १४ तारखेला जेव्हा संदिपला इकडे हार्ट अटॅक आला, त्याच वेळी भूतान मध्ये मला पण छातीत आणि पाठित प्रचंड कळा येऊन ताप भरला.. मला तेव्हा प्रचंड विचित्र वाटत होते पण त्याचा अर्थ मला लावता आला नाही. माझ्या बहिणिने माझ्या सोबत आलेल्या मैत्रिणीला संदिप बद्दल कल्पना देऊन ठेवली पण तिला ती गोष्ट मला न सांगण्याची सक्त ताकिद होती. १९ ला काकाकडून परतल्यावर मी मैत्रिणीला फोन केला तर तिला त्याची कल्पना अगोदरच असल्याचं तिने सांगितलं, शिवाय मला इंट्युशन झालं हे ही तिने लक्षात आणून दिलं.

१९ तारखेला काकाकडे जाताना मला काडीमात्र कल्पना नव्हती की तो मला संदिपबद्दल असं काही सांगेल. त्याचं जाणं म्हणजे एखादं लहान मूल निव्वळ भाजी आवडली नाही म्हणून पानावरून उठून जाते तसं होतं.

तो माझ्याकडे २०१२ साली आला होता माझ्या वास्तुशांतीला, त्यानंतर आला तो कायम इतर नातेवाईकांकडे राहिला. याच वर्षी ७ मे ला माझ्या आत्तेभावाचं लग्न होतं त्या वेळी मी त्याला म्हटलं 'संदिप आता बंटीचं लग्न शेवटचं आहे
आपल्या घरातलं, त्याला आलास की तु माझ्याकडेच रहायला यायचं" तो हो म्हणाला आणि १५ ऑगस्टच्या रात्री सहकुटुंब माझ्याकडे राहून गेला. हेच समाधान.

तो गेल्यावर मनाला अनेक यातना झाल्या.. त्याला मी कधीच नाही सांगितलं की माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि आता ते सांगेन अशी वेळ पण राहिली नाही. त्याच्या निष्प्राण देहावरून चेहर्‍यावरून हात फिरवला तेव्हा एक क्षण वाटलं की हा उठून बसेल, पण ती एक भाबडी आशा होती. तो उठत नाहिये आणि इतरजण आक्रोश करतायत हे पाहून वास्तवात आले. आता तो शरिराने आपल्यात नाही या वास्तवाशी जुळवून घेणे आले. तोच प्रयत्न सुरू आहे.

संदिप जिथे कुठे तु आहेस, तिथे सुखी रहा आनंदी रहा. आमचं सर्वांचं तुझ्यावर खूप प्रेम होतं.. आहे.. आणि राहिल!

श्रद्धांजली!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे ! आत्ताचीच गोष्ट कि गं !
एवढ्या जवळची व्यक्ती.. चर्रर्र झालं ग ! Sad
श्रद्धांजली! _/\_
तुलाही या दुःखातून बाहेर पडायला देव शक्ती देवो !

श्रद्धांजली!

या दुःखातून बाहेर पडायला देव शक्ती देवो.

बापरे...वाचुन खुप दु:ख झालं गं....
श्रद्धांजली....__/\__
तुला आणि तुझ्या सगळ्या कुटूंबाला या दुखातुन बाहेर पडायची शक्ती मिळुदेत..

तुम्हाला व कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो.
हे वक्तिचित्रण शब्दात मांडताना तुम्हाला किती यातना झाल्या असतील ती कल्पना करवत नाही.

श्रद्धांजली.
दक्षिणा, तुला आणि बाकी कुटुंबीयांना हा आघात सोसण्याचे बळ मिळो, ही प्रार्थना.

...........................................................................!!

बापरे फार वाईट झालं.
केले नारायणे उफराटे
तुला, सईला व कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो.

श्रद्धांजली.
दक्षिणा, तुला आणि बाकी कुटुंबीयांना हा आघात सोसण्याचे बळ मिळो, ही प्रार्थना. .........११

दक्षिणा,

खूप वाईट वाटले वाचून. श्रद्धांजली शब्दही थिटा वाटतो अशा प्रसंगात.

तू एकदा डॉक्टरला भेटून ये. काही कारण नसताना असा त्रास का झाला याचे मेडिकल कारणही कळायला हवे.

श्रद्धांजली.
तुम्हाला व कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो.

बापरे फार वाईट झालं.

तुला, सईला व कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो. >>>>>

तुमच दु:ख समजू शकते ,कारण काही महिन्यांपूर्वी माझा सख्खा 15वर्षांनी धाकटा भाऊ वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी आम्हाला कायमच सोडून गेला
आजही क्षणोक्षणी त्याची आठवण येते , ज्याला स्वत:च्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा होताना पाहील ,अशा आपल्यापेक्षा धाकट्या भावंडाच आपल्या आधी जगातुन जाण ह्याची वेदना मी समजू शकते
तुमच्या भावाला मन:पूर्वक श्रद्धांजली...
सॉरी मी हा फोटो पोस्ट करतेय माझ्या भावाचा पण रहावलंच नाही रियली सॉरी....
खूपदा वाटल त्याच्याविषयी लिहाव पण धाडसच झाल नाही हा लेख वाचून भावनांना आवर घालण जमल नाही
IMG_20171227_111206_171.jpg
तुझी फार फार आठवण येते बाळा , माझ खूप प्रेम होत तुझ्यावर ,आणि तुझी कमतरता कधीच भरुन निघणार नाही ,

Pages