तीन देवियां - भाग ३

Submitted by प्रकाशपुत्र on 16 September, 2018 - 00:15

दुसरा भाग इथे वाचा : https://www.maayboli.com/node/67260

माझ्या पहिल्या प्रेमभंगाचे दुःख अजून ताजे होते, मी त्यातून नुकतेच सावरायला लागलो होतो. त्यावेळी मी इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो. जुनमध्ये वर्ष नुकतेच चालू झाले होते आणि मला लगेचच सप्टेंबरमध्ये कॅंपस इंटरव्यू मधून Reliance मध्ये नोकरी लागली होती, त्यामुळे थोडा रिलॅक्स होतो. त्यानंतर लगेचचीच गोष्ट, एकदा आम्ही सगळे मित्र रस्त्यावर टवाळी करीत फिरत होतो . नुकतेच गणपतीचे दर्शन घेऊन झाले होते. तेवढ्यात एक मुलींचा ग्रुप जाताना दिसला, मग काय आम्ही त्यांच्या मागे चाललो, आणि मला ती दिसली. गर्र्कन मान वळवून बघावी अशी नव्हती, पण जसे जास्त वेळा बघावे तशी जास्त आवडेल अशी होती. छान स्टेप कट होता , केस मानेच्या खालीपर्यंत रुळत होते, आणि खूप सहज आणि सुंदर हास्य होते. मी जसे जास्त बघितले तशी ती मला आवडत गेली. कुठेतरी हृदयात Click झाले कि हीच माझी राणी ( तसे त्याकाळात मला बरेचदा Click व्हायचे, पण हे फीलिंग जरा जास्त तीव्र होते ). मी पुढे जाऊन नाव विचारायचे ठरवले, पण तेवढ्यात मित्रांची काहीतरी गडबड झाली आणि ती तेवढ्यात गायब झाली. मी लगेच खूप शोध घेतला, पण त्या रात्री तरी ती गायबच झाली. मग मी तिचा शोध घ्यायचे ठरवले.

जे माझ्या बरोबर होते त्या सगळ्या मित्रांना Warning दिली कि आत्ता जी दिसली ती तुमची वहिनी, आणि ती दिसली कि मला कळवायला सांगितले. मित्र तर या कामात तयारच असतात. मग मला रोज रिपोर्ट्स यायला लागले कि आज ती इथे दिसली तर उद्या तिथे. असे कळले कि ती गणपतीला बऱ्याचदा येते. मग मी एकदम भाविक झालो. रोज संध्याकाळी गणपतीला जायला लागलो. मंगळवार होता, मी अतिशय भक्तिपूर्वक गणपतीच्या देवळासमोर उभा होतो. आणि ती तिथे आली, M80 चालवत. त्यावेळी आमच्या गावात M80 चालवणारी ती बहुदा एकटीच होती. तिला आत जाऊन दिले. मला पाहिल्यावर तिला पण वाटायला पाहिजे ना कि गणपती पावला म्हणून ? थोड्या वेळाने ती बाहेर आली, मी लगेच तिला गाठले, माझी ओळख करून दिली, Engineering ची थोडी Shining झाडली. नाव विचारले. तिनेही पटकन सांगितले, माधुरी. मग जरा हसत खेळत कुठे राहता असेही विचारले, पण ते तिने उडवून लावले. गणपतीला नेहमी येती हि माहिती काढली. कॉलेजची माहिती पण काढली. मग ती जायला निघाली.

तिच्या घराचा पत्ता शोधायची सुवर्णसंधी मी गमावणार नव्हतो. तिच्या मागोमाग मी पण (सुरक्षीत अंतर ठेऊन ) निघालो, आणि लक्षात आलं की , अरेच्च्या, आपण आपल्याला मोठ्या बहिणीकडून हस्तांतरीत झालेल्या Ladies Cycle वर आहोत आणि माधुरी गाडीवर. तुम्हाला सांगतो, हे बहिणीच्या वस्तू वापरायचं त्रांगडं माझ्या लहानपणापासून. माझ्या बहिणीचे नाव मनीषा, ती माझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठी. लहानपणी आई मला खूप दिवस फ्रॉकच घालायची आणि मी मोठा झाल्यावर आईला खुप वाईट वाटत होतं की मी मुलगी नाही आणि मनीषाचे कपडे वापरू शकत नाही. ती सगळी कसर माझ्या आईने बाकीच्या गोष्टीत भरून काढली. पहिली गोष्ट म्हणजे मनीषाची अभ्यासाची पुस्तके. खरंतर मला नव्या पुस्तकांचा वास खुप आवडतो पण जुनी पुस्तके तो आनंद द्यायची नाहीत. मग गंमतच व्हायची, माझ्याकडून पुस्तकेच हरवायची आणि मग मनसोक्त (माझ्या नव्हे , आईच्या मनसोक्त ) माराबरोबर नवीन पुस्तके पण मिळायची. घरची परिस्थिती काही वाईट नव्हती, पण काटकसरीची सवय. पुस्तकांच्या बरोबर अजुन एक वस्तू माझ्याकडे यायची, ती म्हणजे सायकल. मनीषा उंच झाली कि तिला नवीन सायकल आणि मला तिची जुनी. आता मनीषा मेडिकलला गेली म्हणून तिला लुना घेऊन दिली होती आणि तिची सायकल माझ्याकडे होती. माझा त्या लुनावर खूप डोळा होता, पण नशीब बघा, मेडिकलची साडेचार वर्षे आणि मग इंटर्नशिप यामुळे तिचे मेडिकलचे शिक्षण होईपर्यंत माझे इंजिनीरिंगचे शिक्षण पण झाले आणि मी घराबाहेर पडलो, त्यामुळे ती लुना कधी कायमची माझी झालीच नाही. आयुष्यात नंतर खुप गाड्या घेतल्या आणि खुप फिरवल्या, पण त्या लुनासाठीची असणारी आस परत दुसऱ्या गाडीत कधी वाटली नाही. शाळेत आणि कॉलेजमध्ये या लेडीज सायकलवरून खूप चेष्टा व्हायची, पण तेंव्हा त्याचं एवढे काही वाटायचे नाही.

चला परत विषयाकडे वळू , तर माझ्या सायकलवरून मी माधुरीचा पाठलाग करायचा खुप प्रयत्न केला, पण ती गायबच झाली. मंडळी, पण गणपती आपल्या बाजूने होता. दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. मी दिवसभर खिचडी, साबुदाणा वडे, केळी, पेढे वगैरे खाऊन कडक उपास केला आणि संध्याकाळी गणपतीला भेटायला गेलो. मस्त Jeans ची पॅन्ट घातला होता. ताईकडून 'चल मेरी लुना' मागून घेतली होती (त्याबदल्यात तिच्या ड्रेस ना इस्त्री करायचे कबुल केले होते ). बरीच वाट बघायला लागली, पण ती आली. ती दर्शन घेऊन बाहेर आल्यावर , मी नुकताच आत चालल्याचा बहाणा करून तिच्यासमोर आलो आणि तिला बघून खूप आश्चर्यचकित झाल्याची ऍक्टिंग केली. तिच्याशी मग बोलत बसलो. आत जाणाऱ्या काही काका-काकूंनी ' हि कार्टी गणपतीच्या नावाखाली काय करतायत ?‘ ह्या नजरेनी आमच्याकडे बघितल', पण पर्वा कोण करतय ? मी तिला म्हणले, "माधुरी, मी दिवसभर उपास करून मला भूक लागलीय, काहीतर Juice वगैरे पिऊया का ?". ती पहिल्यांदा नाहीच म्हणाली,. पण खूप आग्रहानंतर तयार झाली. मी तिला घेऊन वाडीलाल मध्ये गेलो आणि संकष्टी वगैरे विसरून Ice-cream मागितले. मी आपला साधा २ रुपयांचा ButterScotch चा कप घेतला आणि तिने १० रुपयांचा King Cone मागितला (हि खर्चाची सवय पहिल्यापासून. तेव्हाच जरा मला समजायला पाहिजे होते, पण नाही समजले). आम्ही खूप गप्पा मारल्या. मी तिला म्हणलं, "अगं माधुरी, तु माझ्याबरोबर येशील असं वाटलं नव्हतं ". त्यावर ती नुसतं हसली. जाताना खुप गोड 'बाय' म्हणाली. ती गेली आणि यावेळी माझ्याकडेही लुना होती त्यामुळे पाठलाग करून तिचे घर शोधायची नैतिक जबाबदारी माझ्यावर होती, ती जबाबदारी मी बरोब्बर पार पाडली. तिचे घर आमच्या घरापासून बरेच लांब होते.

मग काहीतरी कारण काढून मी तिला भेटत राहिलो. आमची ओळख वाढत राहिली. सगळी दुनिया परत खुप सुंदर वाटू लागली, भावगीते, प्रेमगीते एकदम आवडू लागली. कॉलेजकडे माझे परत दुर्लक्ष व्हायला लागले, पण शेवटचे वर्ष होते आणि आत्त्तापर्यंत चांगले मार्क्स पडले होते, त्यामुळे एवढी काळजी नव्हती. एकदा तर गंमतच झाली, सरांनी एक Assignment दिली होती, ती Due होती आणि मी ती अजिबात पूर्ण केली नव्हती, कुणाची कॉपी पण केली नव्हती , वर्गात सर आले आणि त्यांनी Assignment गोळा करायला चालू केले, एक एक मुलगा पुढे जाऊन त्यांच्याकडे Assignment देत होता. माझा नंबर आला, आता ऍक्टिंग करणे भाग होते. शाळेची माझी ऍक्टिंगची आवड अजुन टिकून होती आणि मी कॉलेजमध्ये पण बऱ्याच नाटकात कामे केली होती. नाना पाटेकरचे नाव मनात घेऊन मी सरांना सांगितले कि "सर, गेले दोन दिवस प्रॅक्टिकल एक्सपीरीयन्स घ्यावा म्हणून मी MIDC त जातोय आणि तिथे काम करतोय ". तुम्हीच सांगा, हि थाप किती ओरिजिनल आहे, कुणाला तरी हि सुचेल का ? सर पण मला म्हणाले कि दोन दिवसाची मुदत देतो, मग सबमिट कर. पण मी जागेवर बसता बसता सरांनी एक बॉम्ब टाकलाच. ते म्हणाले, "हा मुलगा जे काही सांगतो ते खरेच वाटते". आता बोला, आम्ही भारी का आमचे सर भारी ?

आणि काही दिवसातच Valentine’s Day आला. मी संघाच्या शाखेत जाणारा माणूस, आणि ह्या सगळ्या पाश्चिमात्य आचार-विचारांपासून दूर. तेवढ्यात एका मित्रांनी बातमी आणली कि माधुरीला तिच्या वर्गातला मुलगा Propose करणार आहे म्हणून. मला प्रश्न पडला कि काय करायचे ? माझी काय माधुरीशी एवढी ओळख नव्हती , पण आज जर माघार घेतली तर माधुरी दूर जाण्याचा खूप धोका होता. मी शेवटी ठरवले कि आपणहि Propose करायचेच. मग मी सकाळी दहा वाजल्यापासून तिच्या कॉलेजच्या गेटपाशी जाऊन उभा राहिलो, आणि शेवटी ती येताना मला दिसली.

पुढचा भाग लवकरच ...

Group content visibility: 
Use group defaults