ये दिन क्या आये लगे फूल हँसने ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 August, 2018 - 02:44

त्या दिवशी जेवण झाले आणि मी हात धुवुन येईपर्यन्त मित्राने हॉटेलच्या काउंटरवरुन त्याची सिगरेट विकत घेतली आणि बाहेर जावून सिगरेट ओढ़त उभा राहीला.

"सम्या, यार एक गोष्ट सांग मला. तुला दर तासा-अर्ध्यातासाला सिगरेट लागते, मग पिक्चरला थिएटरमध्ये गेल्यावर कसा बसून राहतोस इंटरव्हलपर्यन्त. Movie is also your passion." मी मुद्दाम खोड काढली.

"अबे सिगरेट सॉंग्स असतात ना प्रत्येक चित्रपटात. "

माझ्या कपाळावर हे मोठ्ठालं प्रश्नचिन्ह उमटलं असावं बहुदा. तो पुढे समजवायला लागला. अरे आजकाल पिक्चरमध्ये बरीच गाणी अशी असतात की ज्यांचा कथानकाशी फारसा संबंध नसतो. अश्या वेळी मी बाहेर येवून बासरी वाजवून घेतो. हाय काय आन नाय काय?
तुला हे कधी जाणवले नसणार. तू कायम ते सत्तरच्या दशकातले सिनेमे पाहात असतोस. त्यात अगदी बॅकग्राउंड सॉंग्ससुद्धा कथानकाशी निगडित असायची.

माझ्या डोक्यात लागलीच चक्र सुरु झाले. प्यासाच्या एका गाण्याबद्दल मागे एकदा वहिदाने सांगितले होते एका मुलाखतीत. प्यासा या चित्रपटातील गीता दत्तने ग़ायलेले वहिदावर चित्रित झालेले एक गाणे गुरुदत्तने नंतर काढून टाकले होते. "रुत फिरे पर दिन हमारे फिरे ना फिरे... "
यावर गुरुदत्तने दिलेले स्पष्टीकरण असे होते की तो या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेलेला असताना त्याच्या लक्षात आले की हे गाणे सुरु झाले की लोक सिगरेट ओढायला म्हणून थिएटरबाहेर पडतात. गुरुदत्तसारख्या परफेक्शनिस्टला हे खटकले आणि त्याने हे गाणेच काढून टाकले. म्हणजे सिगरेट सॉंग्स तेव्हाही होतीच की हो.

मग अशी अनेक गाणी डोळ्यासमोरून सरकायला लागली. बासूदांच्या प्रत्येक चित्रपटात असे एक तरी गाणे असेच की जे निव्वळ पार्श्वभूमीवर वाजत असे. पण गंमत म्हणजे त्यात मला एकही गाणे असे सापडेना की ज्याला सिगरेट सॉंग म्हणता येईल. बासूदांचे प्रत्येक गाणे मग ते कलावंतावर चित्रित झालेले असो वा पार्श्वगीत असो, त्याचा कथानकाशी दाट आणि जवळचा संबंध असे. हि गाणी फारशी लक्षात राहात नसत पण तरीही ती तितकीच सुंदर असत. हे सगळे आठवत असताना बासूदांच्या "छोटी सी बात" ची आठवण होणे साहजिकच होते. यात मुकेशजीच्या आवाजातले एक नितान्तसुन्दर पार्श्वगीत आहे. आज हे गाणे किती जणांना आठवत असेल याबद्दल थोड़ी शंकाच आहे. पण मी हे गाणे नक्कीच कधीही विसरणार नाही. कारण बासूदांच्या चित्रपटात अशी गाणी म्हणजे सिग्नेचरट्यून असे. पाच-सहा मिनिटाच्या त्या गाण्यातून बासुदा आपल्या चित्रपटाची वनलाईन मांडत असत. (पटकथालेखकांच्या भाषेत वनलाइन म्हणजे मोजक्या शब्दात कथेचा सारांश मांडणे)
मंझीलमधले लताबाईंचे 'रिमझिम गिरे सावन' पण याच श्रेणीतले गाणे होते.

mqdefault

तर आपण बोलत होतो छोटी सी बात बद्दल. गाण्याच्या ओळी आहेत...

"ये दिन क्या आए लगे फूल हँसने
देखो बसंती-बसंती होने लगे मेरे सपने"

बासूदांचे चित्रपट नेहमी सामान्य माणसाची छोटी छोटी स्वप्ने, त्याच्या आकांक्षा, समस्या यावर केंद्रीत असत. छोटी सी बात ही सुद्धा अशीच एका सामान्य प्रेमी जोडप्याची कथा आहे. एका खाजगी आस्थापनेत काम करणारा अरुण (अमोल पालेकर) दुसऱ्या एका ठिकाणी काम करणाऱ्या प्रभाच्या (विद्या सिन्हा) प्रेमात पडतो. गंमत म्हणजे बासूदांच्या चित्रपटातले खलनायक सुद्धा सामान्यजनच असत. इथे प्रेमाचा तीसरा कोन म्हणजे प्रभाच्याच ऑफिसमध्ये काम करणारा तिचा ओव्हरस्मार्ट पण तोही तिच्यावर प्रेम करणारा सहकारी नागेश (असरानी). सर्वथा सॉफिस्टिकेटेड आणि स्मार्ट असणारा नागेश प्रत्येक ठिकाणी साध्या सरळ अरुणवर सहज मात करत राहतो. क़ुरघोडी करत राहतो. अश्या परिस्थितीत निराशाग्रस्त झालेल्या, न्यूनगंडाने ग्रासलेल्या अरुणला कर्नलसाहेबांच्या (अशोककुमार) रुपात जणु काही देवदूतच भेटतो. कर्नल त्याच्यातल्या उणिवा बरोबर हेरतात आणि त्याला प्रशिक्षण देवून त्या उणिवा दूर करण्यात त्याची मदत करतात. अरुणची सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. कर्नलसाहेब त्याला त्याचा आत्मविश्वास परत मिळवून देतात आणि काही महत्वाच्या टिप्स देतात जगण्यासाठी. अमुलाग्र बदल झालेला अरुण परत येतो आणि अगदी सहज नागेशवर मात करत प्रभाला जिंकून घेतो. चित्रपट संपताना नागेशसुद्धा कर्नलसाहेबांना शरण आलेला दाखवून बासुदा सूचीत करतात की येथे कोणीच वाईट नसतो, जो तो आपल्या इप्सितप्राप्तीसाठी धडपडत असतो. त्यासाठी कधी योग्य मार्ग निवडले जातात तर कधी चुकीचे.

Chhoti Si Baat

असो. तर अरुण परत आल्यावर जे घडते तो परिवर्तनाचा प्रवास बासुदा या गाण्यात मांडतात. पुन्हा गीतकार कवि योगेशजीच आहेत. रिमझिम गिरे सावनचे गीतकार.

कर्नलसाहेबांकडून ट्रेनिंग पूर्ण करून अरुण परत येतो आणि त्यांनी दिलेल्या टिप्स वापरून प्रभाला इम्प्रेस करायच्या मागे लागतो. इथे पुन्हा नागेशचा अडथळा मध्ये आहेच. पण आता अरुण पूर्वीचा साधा सरळ तरुण राहिलेला नाहीये. कर्नलसाहेबांनी दिलेल्या टिप्स वापरून तो नागेशला प्रत्येक ठिकाणी मात द्यायला सुरुवात करतो. आणि मागे सलील चौधरींच्या सहजसुंदर संगीताने नटलेल्या योगेशजींच्या ओळी कानावर यायला लागतात.

ये दिन क्या आए लगे फूल हँसने
देखो बसंती-बसंती होने लगे मेरे सपने

आता बाजी पलटलेली आहे. अरुणची समयसूचकता आणि कर्नलसाहेबांच्या टिप्स यामुळे प्रत्येक ठिकाणी नागेशला मात खावी लागते. इकडे ऑलरेडी अरुणबद्दल सॉफ्ट कॉर्नर असलेल्या प्रभाच्या मनात अरुणबद्दल प्रीतीची भावना निर्माण होवू लागलेली आहे. अरुणने पाहिलेली स्वप्ने पूर्ण होण्याची लक्षणे दिसू लागलेली आहेत.

प्रेम ही भावनाच मोठी सुंदर असते. त्यात त्या प्रेमाचं वर्णन करायला योगेशजीसारखा समर्थ कवि, सलीलदा सारखा प्रयोगशील संगीतकार, बासूदांचे अप्रतिम दिग्दर्शन आणि जोडीला मुकेशचा मधाळ आवाज. या गाण्यासाठी मुकेशला निवडणे हा सलीलदांचा अतिशय धाडसी आणि तरीही अतिशय योग्य असा निर्णय होता. तसं पाहायला गेलं तर सुरुवातीपासून मुकेश म्हणजे कुंदनलाल सैगल यांचे चाहते. त्यांच्या गाण्यावर सैगलसाहेबांचा प्रभाव बऱ्यापैकी दिसून येतो. खरेतर बॉलीवूडमधील तत्कालीन गायकांपैकी बहुतेक जण सैगलसाहेबांची नक्कल करतच इंडस्ट्रीत आलेले, मग त्यातून दुराणी, श्यामसुंदर, सी. एच. आत्मा, सुरेंद्र पासून मोहम्मद रफी ते मुकेशसुद्धा सुटलेले नाहीत. पण रफीसाहेब फार लौकर त्या प्रभावातून मुक्त झाले. मुकेशवर मात्र सैगलसाहेबांच्या गायकीचा प्रभाव बराच काळ पर्यंत जाणवत राहिला. त्यामुळे त्यांची गाणीही बऱ्यापैकी त्याच धर्तीवर थोडी मेलोड्रामाच्या अंगाने जाणारी वाटतात. तश्या परिस्थितीत मुकेशला हे हलक्या फुलक्या चालीचे, आनंदी ढंगाचे गाणे देऊन सलीलदांनी मास्टरस्ट्रोक मारलेला होता. आणि अर्थातच मुकेशजींनी या गाण्याचे सोने केले आहे.

गाणे इथे पाहता / ऐकता येईल : https://youtu.be/k1WmYZzwi1A

यात सर्वात महत्वाचा रोल प्ले केला होता तो बासूदांच्या सर्वांगसुंदर चित्रीकरणाने. या गाण्यात दिसणारी त्या काळची शांत देखणी मुंबई पाहणे हा अतिशय मनमोहक अनुभव आहे. तेव्हा मुंबईत एवढी गर्दी नव्हती. संध्याकाळच्या वेळी बसमध्ये बसून मरीन लाईन्स, कुलाबा, नरीमन पॉईंट या भागात चक्कर मारणे हा एक अतिशय सुखद अनुभव असे. ती शांत , सहज मुंबई या गाण्यातून अनुभवायला मिळते. मरीन लाईन्सवरून फिरणारी बस, जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोवार कॅफेतली कलावंताची, रसिकांची मांदियाळी आणि कुलाब्यातल्या चायनीज फ्लोरा रेस्टोरंटचा आगळा अॅम्बीयन्स गाण्याची रंगत वाढवत राहतो. कथानक आपल्या गतीने पुढे सरकत असते आणि मागे गाणे वाजत असते. !!.

सोने जैसी हो रही है हर सुबह मेरी
लगे हर साँस अब गुलाल से भरी
चलने लगी महकी हुई पवन मगर झूम के
आँचल तेरा चूम के....

प्रेमात पडले की सगळा नुरच बदलून जातो जगण्याचा. आणि त्यातही मनातला आत्मविश्वास जागृत झालेला असेल तर सगळे कसे सहज, सोपे वाटू लागते. प्रत्येक पहाट सुवर्णासारखा यशाचा तेजस्वी रंग लेवुन येते. असे वाटायला लागते की येणारी वाऱ्याची झुळूकसुद्धा जणु काही प्रियेचा स्पर्श लेवुन आलीय. सगळे जगच जणु प्रेमरंगाने रंगीबेरंगी होवून जाते.

रिटायर्ड कर्नल ज्यूलियस नगेन्द्रनाथ विल्फ्रेड सिंग उर्फ सदाबहार अशोककुमार आपल्या भूमिकेत विलक्षण रंगत आणतात. कर्नलने एक अतिशय महत्वाची टिप दिलेली असते अरुणला...

"जिंदगी की क्रिकेट मे ड्रॉ नहीं होता। या तो जीत होती है या हार। और जीत उसी की होती है जो उपर है।’ किंवा ‘यू नो अरुण, दी बॉटम इज ऑल व्हेरी क्राउडेड बट देअर इज ऑल्वेज रूम अॅट दी टॉप’...

आणि हळूहळू कर्नल त्याला प्रेमातल्या प्रतिस्पर्ध्यावर बाजी उलटवण्याशिवाय पर्याय नाही हे समजावतो आणि मुलीला जिंकायचे डावपेच शिकवतो... ते सर्व ऐकण्यासारखं आणि बघण्यासारखंच

अमोल पालेकर आणि असरानी यांचा सहजसुन्दर अभिनय, विद्या सिन्हाचे गर्ल नेक्स्ट डोअर स्टाइलचे निरागस , साधेपणातले सौंदर्य हा या कथेचा यूएसपी होता. प्रभाला इम्प्रेस करण्यासाठीची त्या दोघांची धडपड, ती जुगलबंदी, ते दावपेच आणि आपल्याला अरूण आवडतोय हे लक्षात येवूनही नागेशला सरळ-सरळ नाही म्हणू न शकणारा तिचा मध्यमवर्गीय भिडस्तपणा, तिचा निरागस साधेपणा अगदी ठळकपणे प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्यात बासुदा कमालीचे यशस्वी झाले आहेत.

VS

विद्या सिन्हा म्हणजे माझ्यासारख्या नवथर तरुणांसाठी एक गोड स्वप्न होते तेव्हा. तिची कुठलीही भूमिका बघा ती कधीही चित्रपटाची हिरोइन वगैरे वाटली नाही. आजकाल करीना, दीपिका, अनुष्काकड़े पाहताना जसे लगेच त्यांचे अप्राप्य असणे जाणवते तसे विद्या सिन्हाच्या बाबतीत कधीच होत नसे. बहुतेक वेळी कायम एखाद्या साध्या साडीत किंवा ड्रेसमध्ये वावरणारी, जणु काही आपल्या शेजारच्या घरातली एखादी गोड मुलगी वाटावी असा तिचा वावर असे. त्यातूनही महत्वाचे म्हणजे तिचे प्रसन्न हास्य. त्या हासऱ्या चेहऱ्यातुन उत्फुल्लपणे फुलणारी प्रसन्न निरागसता आणि नैसर्गिक अभिनय हा तिचा यू एस पी होता. त्यात जोडीला अमोल पालेकर आणि असरानीसारखे सहजसुंदर अभिनय आणि टायमिंगचे बादशाह बरोबर होते.

कहाँ मेरा मन बावरा उड़ चला
जहाँ पर है गगन सलोना साँवला
जा के कहीं रख दे मन रंगों में घोल के
सपने ये अनमोल से
ये दिन क्या आए …

आता अरुणला आपले प्रेम यशस्वी होणार याची खात्री पटलेली आहे. तर त्याचे बदललेले रूप, त्याचे आत्मविश्वासपूर्ण वागणे, तिच्या प्राप्तीसाठी त्याचे नागेशबरोबर स्पर्धा करणे यामुळे प्रभाही विलक्षण सुखावलेली आहे. कारण तिचेही अरुणवर प्रेम आहेच. इतके दिवस मनात जे द्वंद्व चालू होते ते संपलेले आहे. आता मनाच्या भराऱ्याना क्षितीजाचेच काय ते बंधन उरलें आहे. स्वप्ने खरी होताना दिसताहेत त्यामुळे तिच्या मनातले प्रेमांक़ुर फुलून येताहेत.

एक गंमत सांगतो तुम्हाला. त्या काळी विद्या सिन्हाच्या साध्या, शालीन सौंदर्याने अनेक तरुणांचे हृदय चोरले होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे विद्याने तिचा पहिला चित्रपट रजनीगन्धा साइन केला तेव्हा ती आधीच विवाहित होती. विशेष म्हणजे लव्ह मैरेज आहे तिचे आणि महत्वाचे म्हणजे आजही टिकून आहे. लग्नानंतर ती फ़िल्म इंडस्ट्रीत आली. असे अजुन एक उदाहरण म्हणजे बासूदांनीच यश मिळवून दिलेली मौसमी चटर्जी.

काल परवा कुठल्याश्या चॅनेलवर आर जे अनमोलला मुलाखत देताना विद्याला तिचा आवडता चित्रपट विचारण्यात आला. ती सहज मिस्किलपणे हसत म्हणाली, "और कौनसी मुव्ही हो सकती है? मेरा फिल्मी करियरभी कहाँ इतना बड़ा था? "छोटी सी तो बात है!" आणि पुन्हा अगदीच तशीच प्रसन्न आणि उत्फुल्लपणे हसली. आता चेहऱ्यावर, कायेवर वयाचे परिणाम झालेत तिच्याही. पण ते देखणे, निरागस हास्य अजूनही तितकेच प्रसन्न, गोड़ आणि सहजसुन्दर आहे.

फिल्मः छोटी सी बात (१९७५)
गायक : मुकेश
संगीतकारः सलिल चौधरी
गीतकारः योगेश
कलाकारः अमोल पालेकर, विद्या सिन्हा

विशाल कुलकर्णी
०९९६७६६४९१९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या चित्रपटाचे शूटिंग (प्रभा चे घर) शिवाजी पार्क कॅडेल रोड च्या आजूबाजूच्या गल्ल्यात झाले आहे.
तसेच बिलियर्ड रूम, TT ,चेस रूम या दादर क्लब मधील आहे,
हा सगळा भाग ओळखीचा असल्याने हा पिक्चर खूप जवळचा वाटायचा.

आताच रिसेंटली मायबोलीवर या गाण्यावर अजून एक लेख आहे.
दोघांना धन्यवाद. हा पिक्चर आमच्या साठी एनी टाईम वॉच आहे. लहान मुलीला पण सवय लावलीय. हा आणि अंगूर.
चिकन आलागूज.आणि करवा दिया ना आऊट.
मागे एकदा एका इंग्लिश ब्लॉग वर हा पिक्चर स्टाकिंग बद्दल आहे आणि आवडला नाही पाहिजे असे होते.
पण माहेरच्या लोकांचे अवगुण डॉळ्यांना जाणवूच नये त्याप्रमाणे या पिक्चर चा अरुण कधीच रांझणा/डर इ. मधला इंटेन्स स्टाकर वाटला नाही. Happy

हा पिक्चर आमच्या साठी एनी टाईम वॉच आहे. >>> आम्ही सुध्दा..
गाणी आणि चित्रपट दोन्ही मस्त.. मधेच कुठुनही पहायला आवडते..
लेख मस्तच.. Happy

खुप छान लिहीलय.

लहानपणी वडील बरेचदा हा सिनेमा लावायचे. मलाही आवडायचा पहायला.

छोटीसी बात, मुकेश, सगळच अति-प्रिय. लेख सुद्धा छान लिहीलाय.

एका बाबतीत मात्र आपला मतभेदः 'मुकेशवर मात्र सैगलसाहेबांच्या गायकीचा प्रभाव बराच काळ पर्यंत जाणवत राहिला. ' - हे मुकेश च्या नेझल आवाजामुळे वाटू शकतं. पण अगदी सुरूवातीच्या 'दिल, जलता है, वह जलने दो' वगैरे चा काळ सोडला तर त्या नंतर ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट च्या काळातली, धर्मेंद्र (मुझको इस रात की तनहाईमे, हमसफर मेरे हमसफर), अजित (देखो मौसम क्या बहार है, मै खुशनसीब हूं, मुझको किसी का प्यार मिला), सुधीर (मुझे रात दिन यह खयाल है), मनोजकुमार (शोर, हरियाली और रास्ता, उपकार, रोटी कपडा और मकान, ई.) शम्मी कपूर (दुनियावालों से दूर, जलनेवालोंसे दूर), प्रदिपकुमार (राजहट), सुनिल दत्त (सावन का महिना, पवन करे सोर, राम करे ऐसा हो जाये), दिलीपकुमार (दिल तडप तडप के कह रहा है, सुहाना सफर और यह मौसम हसी) आणी अर्थातच राज कपूर (कित्येक) वर चित्रीत झालेली अनेक गाणी त्याच्या स्वतंत्र शैलीत आहेत.

असो. हे सब्जेक्टीव्ह आहे. लेख वाचला, आवडला आणी मुकेश ची बरीच गाणी आठवली, म्हणून लिहून टाकलं. Happy

खूप सुरेख लेख ! बाकी चित्रपटाबद्दल काय लिहिणार ? कधीही/ कितीही वेळा पाहिला तरी तितकाच आवडतो.

छान लिहीलय.

अवांतरः

एक गंमत सांगतो तुम्हाला. त्या काळी विद्या सिन्हाच्या साध्या, शालीन सौंदर्याने अनेक तरुणांचे हृदय चोरले होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे विद्याने तिचा पहिला चित्रपट रजनीगन्धा साइन केला तेव्हा ती आधीच विवाहित होती. विशेष म्हणजे लव्ह मैरेज आहे तिचे आणि महत्वाचे म्हणजे आजही टिकून आहे.
>>>>>>>>>>

no.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/actor-vidya-sinha-wins-c...

{{{ विद्या सिन्हा म्हणजे माझ्यासारख्या नवथर तरुणांसाठी एक गोड स्वप्न होते तेव्हा. तिची कुठलीही भूमिका बघा ती कधीही चित्रपटाची हिरोइन वगैरे वाटली नाही. आजकाल करीना, दीपिका, अनुष्काकड़े पाहताना जसे लगेच त्यांचे अप्राप्य असणे जाणवते तसे विद्या सिन्हाच्या बाबतीत कधीच होत नसे. बहुतेक वेळी कायम एखाद्या साध्या साडीत किंवा ड्रेसमध्ये वावरणारी, जणु काही आपल्या शेजारच्या घरातली एखादी गोड मुलगी वाटावी असा तिचा वावर असे. त्यातूनही महत्वाचे म्हणजे तिचे प्रसन्न हास्य. त्या हासऱ्या चेहऱ्यातुन उत्फुल्लपणे फुलणारी प्रसन्न निरागसता आणि नैसर्गिक अभिनय हा तिचा यू एस पी होता. }}}

{{{ त्या काळी विद्या सिन्हाच्या साध्या, शालीन सौंदर्याने अनेक तरुणांचे हृदय चोरले होते. }}}

तुमच्या गोड स्वप्नाला एक छोटासा धक्का

https://www.youtube.com/watch?v=MYXW6NSspyo

{{{ विशेष म्हणजे लव्ह मैरेज आहे तिचे आणि महत्वाचे म्हणजे आजही टिकून आहे. लग्नानंतर ती फ़िल्म इंडस्ट्रीत आली. }}}

विकी काय म्हणतंय ते वाचा -

https://en.wikipedia.org/wiki/Vidya_Sinha

Spouse(s) Venkateshwaran Iyer (1968-1996) (his death), Netaji Bhimrao Salunkhe (2001-2009) (divorced)