ठोकळ्यांचा कारखाना...

Submitted by Anuja Mulay on 29 March, 2018 - 02:16

    वर्षानुवर्षे चालू असलेल्या एका कारखान्यात आज नवीन माल येणार होता. अर्थात काही जुने,अर्धवट आकार देऊन झालेले ठोकळे तिथे होतेच. तिथे काम करणाऱ्या कामगारांना तसं नवीन येणाऱ्या मालाचं कौतुक नव्हतंच म्हणा. त्यांच्यासाठी काय दरवर्षी एका ठराविक काळात नवीन लाकडं यायची.त्या सगळ्या लाकडांना एकसारखा आकार देऊन, काही वर्षं त्यांच्यावर काम करून सगळे ठोकळे एकसारखे बनले, की मग पुढच्या विक्रीसाठी त्यांना पाठवलं जायचं. हा कारखानासुद्धा अगदी इतर कारखान्यांसारखाच होता. अनेक ठिकाणांहून माल यायचा, मग काही ठराविक जुने कुशल कारागीर त्या आकार देण्याच्या कामाला लावून मालक कसा निवांत व्हायचा. माल पाठवणारेही या कारखान्यात माल पाठवला की निश्चिन्त असायचे. आपल्या लाकडाचा चांगलाच ठोकळा बनेल आणि तो उत्तम किंमतीलाच विकला जाईल असा विश्वास त्यांना होता.
     ही एकसारखी दिसणारी पण काही चांगल्या प्रतीची तर काही कमी प्रतीची लाकडं मात्र स्वतःचं असं काहीतरी घेऊन या कारखान्यात यायची. रोज एकमेकांशी गप्पा मारत एकसारख्या आकारात अगदी इतरांसारखंच स्वतःला कापून घ्यायची. जर आपण इतरांसारखं कापून घेतलं नाही, तर आपल्याला बाजारात भाव मिळणार नाही, हे त्यांना कापता कापताच शिकवलं जायचं. त्यामुळे गप-गुमान जसा आकार आपल्याला दिला जाईल तो बिनविरोध स्विकारण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. तसं त्यांना फारसं कळतही नव्हतं म्हणा. शेवटी लाकडंच ती. भोळी बिचारी. आपण आपल्याला आकार देणाऱ्यांच्या विरुद्ध बोललं, तर आपलंच नुकसान हे जाणून ते गप्प बसायचे. आपल्याला कितीही वेगळा ठोकळा बनायचं असलं, तरी ते पहिल्याच वर्षी बंद केलेल्या आपल्याच एका कोपऱ्यात त्यांना लपवून ठेवायला लागायचं.
      कापून घेता-घेता काही लाकडांना आपल्याला चौकोनी ठोकळा बनायचं नाहीये, त्यापेक्षा गोल किंवा षटकोनी ठोकळा बनून आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावं, असं वाटायचं. काहींना छोटा ठोकळा बनायचं असायचं, तर काहींना मोठा. तर काहींना फक्त आपण जास्तीत जास्त किंमतीत विकलं जावं इतकंच वाटायचं.यासाठी ते खूप प्रयत्न करायचे, पण त्यांना जास्त काही समजू नये आणि त्यांनी एकसारखं दिसावं यासाठी कामगार लोक या ठोकळ्यांचा सगळ्यात वरचा एक कोपरा सर्वांत आधी बंद करून टाकायचे. एक फळी वर ठोकली ,की मग ठोकळ्यांनी काही प्रयत्न करायचा प्रश्नच उरायचा नाही. मग एका ठराविक काळानंतर ठोकळेही आपलं मत बाजूला ठेऊन एकसारखे चौकोनी व्हायचा प्रयत्न करायचे. हे सगळं करताना ठोकळ्यांचा आतला आवाज शांत बसू शकायचा नाही, त्यामुळे एखादा कोपरा त्यांच्या हट्टीपणामुळे तसाच वाकडा राहून जायचा तर एखादा अगदी सुंदर, वर्षानुवर्षे काहीही होणार नाही, इतका पक्का व्हायचा.
     रोज वेळ झाली, की कारागीर कापायला आणि लाकडं कापून घ्यायला तयार व्हायची. ठरलेल्या वेळी कामगार लोक जेवायचे.लाकडांना पुढचं कापून घेण्याआधी जरा आराम मिळावा, यासाठी वेळ द्यायचे आणि स्वतःही तेच ते कंटाळवाणं काम करण्याआधी जरा मनःशांती मिळवायचा प्रयत्न करायचे. असं वर्षानुवर्षे चालूच राहिलं. तेच कामगार, त्याच पद्धतींनी, तीच हत्यारं वापरून, तितक्याच वेळात, अगदी पूर्वीसारखेच ठोकळे बनवायचे आणि लाकडाचा पुरवठा करणाऱ्यांना ते ठोकळे बाजारात चांगल्या किंमतीत विकण्यासाठी परत करायचे. या सगळ्यात लाकडाचा पुरवठा करणारे, त्यांना आकार देणारे, आणि स्वतःला आकार देऊन घेणारे, असे सगळे अगदी पूर्वीसारखेच राहिले. हे सगळं अगदी परंपरेनुसार, साग्रसंगीत चाललेलं असताना एक गोष्ट मात्र बदलत होती. अचानक नाही पण हळू-हळू ते ठोकळे विकत घेणाऱ्या लोकांमध्ये बदल घडत होते. त्यांच्या मागण्या अगदी कासवाच्या गतीने का होईना पण बदलत होत्या. आणि ही गोष्ट कारखान्याच्या मालकांच्या, कामगारांच्या आणि लाकूड पुरावणाऱ्यांच्या लक्षात आलीच नाही.
       काही वर्षांनी आपल्या सर्वोत्तम लाकडाचे असलेले ठोकळेही कोणी विकत का घेत नाहीये, याबद्दल चर्चा करण्यासाठी एक सभा बोलावली गेली. मग 'माझं लाकूड जरा चांगल्यातलं होतं, पण त्याचा ठोकळा अगदी हुबेहूब बाकीच्या ठोकळ्यांसारखाच दिसत होता, म्हणून कोणी गिऱ्हाईक मिळालंच नाही!', 'पण माझं लाकूड तर अगदी हलकं असून, त्याचा ठोकळा अगदी लगेच विकत घेतला, पण त्याचा ना एक कोपरा जरा तुटला होता, मग कमी किंमतीत का होईना मी तो विकून टाकला, विकलं जाणं महत्त्वाचं.नाही का?', 'माझ्या तर ठोकळ्याला एक फळी जास्त होती, मग काय समोर ठेवल्या ठेवल्या पहिल्या ठोकळ्याच्या दुप्पट किमतीत विकला गेला.' असे काही मुद्दे समोर आल्यावर, आपलं लाकूड कसंही असो, ठोकळा वेगळा दिसला तरच तो चांगल्या किमतीला विकला जाणार, हे सगळ्यांच्या लक्षात आलं. मग काय मोर्चा घेऊन सगळे व्यापारी गेले कारखान्यावर! त्यांनी मालकाला सगळया समस्या समजावून सांगितल्या. आणि त्याने पुढे कारागिरांना.
   वेडे-वाकडे ठोकळे बनवूनसुद्धा कमी कष्टात जास्त पैसे मिळणार म्हणल्यावर अगदी काही क्षणांत त्यांनी सगळं मान्य केलं. दुसऱ्याच दिवशीपासून त्यांनी ठोकळे बनवायची पद्धत बदलायचं ठरवलं. आणि सगळे कामगार कारखान्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये बसून ठोकळे बनवायला लागले, जेणेकरून सगळे ठोकळे पुन्हा एकसारखे वेगळे नको बनायला म्हणून. हे सगळं करताना त्यांना काय, लाकूड पुरवणाऱ्या लोकांना काय, विकत घेणाऱ्यांना काय, इतकंच नव्हे तर खुद्द लाकडांना सुद्धा एक गोष्ट लक्षात आली नाही. 
     ती म्हणजे लाकडांना आकार देऊन ठोकळे बनवणारी 'हत्यारं' मात्र तीच राहिली.
   

  नेहमीच्या साप्ताहिकामध्ये हे सगळं वाचून छोट्या रेवाला नक्की कोणत्या शाळेत टाकावं, याबद्दल तिच्या आई-बाबांचा अजूनच गोंधळ उडाला.

-
अनुजा मुळे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे कथा,
माझ्या मनात एक दोन परिस्थितीना रिलेट होतेय.

छान आहे रूपक कथा, सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात अग्रेसर राहण्यासाठी पालकांच्या मनात असलेला शाळा निवडीसाठीचा गोंधळ आणि लहान मुलांची मनस्थिती चांगल्या पद्धतीने मांडली आहे.

अतिशय सुंदर मांडले आहे.

चरप्स, नेमके काय झेपले नाही? शेवट वाचल्यावर परत एकदा वाचा, म्हणजे कळेल काय म्हणायचे ते.

झकास.