एक डाव भुताचा.....(?)

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 March, 2009 - 05:33

काल संध्याकाळी एकदाची वेड्यांच्या इस्पितळाची गाडी वाड्याच्या दारापर्यंत येवुन पोचली. पांढर्‍या गणवेशातील चार सेवकांनी कुशाक्कांना पकडुन गाडीत घातले आणि भर्रकन गाडी निघुनही गेली.

सगळं कसं अगदी अचानकच घडलं,... नाही ?

म्हणजे बघा, साधारण दोन - अडीच महिन्यापुर्वी त्यांच्या सुनेचा, रंगुचा अपघाती मृत्यु झाला. तिचा नवरा, लंगडा राम्या त्यानंतर महिन्याभरातच कुठेतरी बेपत्ता झाला, मग महिन्याभराने त्याचं प्रेतच सापडलं. त्या धक्क्याने कुशाक्काला वेड लागलं. शेवटी आम्हीच इथल्या वेड्याच्या इस्पितळात तिच्याबद्दल माहिती दिली आणि काल तर ते लोक येवुन घेवुनही गेले कुशाक्काला. गेल्या दोन दिवसात थोडं जास्तच झालं होतं तिला. दोन दिवस नुसतं ओरडतच होती.

मी एकदा विचारलं सुद्धा जवळ जावुन तर म्हणाली,

"गजाननराव मला वाचवा, नाहीतर ती रंगी घेवुन जाईल मला. सारखी तिथं त्या मागच्या खिडकीपाशी येवुन उभी राहते आणि मला बोलावते आणि म्हणते, चला की सासुबाई, मी फार एकटी आहे हो इथं. खुप भीती वाटते मला."

तेव्हाच लक्षात आलं की केस हाताबाहेर गेलीय आणि शेवटी वाड्यातल्या लहान पोरांचा विचार करुन आम्ही इस्पितळात कळवलं आणि ते लोक येवुन तिला घेवुन गेले.

मनात एक संमिश्र अशी भावना होती. म्हणजे दु:ख नाही म्हणता येणार, उलटपक्षी कसलंतरी समाधानच वाटत होतं, कदाचित गेलेल्या रंगुबद्दल दु:ख वाटत असावं. जेमतेम आठ महिन्याचा संसार झालेला आणि देवाने तिला उचलुन नेलं. कुशाक्काने तेवढ्या रात्री तीला पाणी भरायला पाठवलं नसतं तर कदाचित वाचलीही असती ती. म्हणुन आपला कुशाक्कावर राग. कुशाक्काकडुनच कळलेली हकीकत म्हणजे त्या रात्री १०.३० च्या दरम्यान कुशाक्काच्या लक्षात आलं की घरातलं पाणी संपलय आणि तिने रंगुला पाणी आणायला पाठवलं. आमच्या गावात अजुन नळ आलेले नाहीत, वेशीपाशी असलेली पाण्याची विहीर हाच एकमेव पाणवठा. त्यातुन त्या रात्री बहुदा अमावस्या असावी. अंधारात रंगुचा पाय घसरला आणि ती विहीरीत पडली. बराच वेळ झाल्यावरही परत आली नाही म्हणुन राम्या गेला बघायला तर त्याला काही रंगु दिसली नाही. नंतर तीन दिवसांनी फुगुनच वर आली.

खुपच विस्कळीत आणि संदर्भहिन वाटतय का हे सगळं. काय आहे की मी काही कुणी लेखक नाही, आपल्याला ते तसं छानपैकी लिहीणं किंवा कथन करणंही जमत नाही. पण ठिक आहे, एक करता येइल. मी तुम्हाला पहिल्यापासुन काय काय घडलं ते नीट सांगतो म्हणजे तुमच्या सगळं एकदम व्यवस्थीत लक्षात येइल.

मी गजानन, गजानन विश्वंभर बापट. तसा मुळचा मुळशीचा. पेशाने प्राथमिक शिक्षक. बदलीची नोकरी, कधी या गावी तर कधी त्या गावी. बघा सहा वर्षे झाली असतील या गावात वरकुट्यात येवुन. इथुन सुद्धा दोन वेळा बदली झाली होती पण गावच्या लोकांनी प्रयत्न करुन ती थांबवली. खुप मानतात लोक मला. नाही मी काही कुणी नेता वगैरे नाही. पण माझं काम मी प्रामाणिकपणे करतो. सुदैवाने मी आल्यापासुन शाळेची उपस्थिती वाढली त्यामुळे गावकरी खुष आहेत. इनमिन पाचवी पर्यंतची शाळा गावात. पाच वर्गांना मिळुन तीन शिक्षक. त्यातुनही एक शिक्षक नोकरी सोडुन निघुन गेले. (सरपंच म्हणतात पळुन गेले)
नवीन कुणी इथे यायला तयार नसायचा, त्यामुळे आम्ही दोघेच..मी आणि देशपांडे गुरुजी. हंबीरराव रावतांच्या वाड्यात शेजारी शेजारीच राहतो आम्ही. सरपंच हो आमच्या वरकुट्याचे.

देशपांडे गुरुजींना दोन मुले होती. दहा वर्षाची नमु...नर्मदा आणि चौदा वर्षाचा विनु...विनायक. मला एकच मुलगा अनिकेत, तोही चौदा वर्षाचाच . त्यामुळे या दोघांशी त्याचे छान जमायचे. तिघेही कायम एकत्रच असत. आमचा हा वाडा तसा गावाबाहेरच होता, पण शाळेपासुन जवळच असल्याने आम्हाला सोयीचा होता. वाड्यात एकुण तीन बिर्‍हाडं मी, माझी पत्नी वसुमती आणि अनिकेत, देशपांडे गुरुजी आणि त्यांचे कुटुंब आणि तिसरा काशिदांचा हुसैन. सुरुवातीला थोडं अडचणीचं वाटलं होतं मला हुसैनचं अस्तित्व, पण नंतर लक्षात आलं की तो असला काय अन नसला काय दोन्ही सारखंच. कासार होता तो, गावोगाव बांगड्या विकत फिरायचा, आठवड्यातुन एखादा दिवस फारतर घरी असायचा बापडा. त्यामुळे वाड्यावर आमच्या दोन कुटुंबांचेच राज्य होते. छान चालले होते दिवस. म्हणजे निदान कुशाक्का तिथे राहायला येइपर्यंत तरी. एकदा सकाळी सकाळी सरपंच हंबीरराव राउत घरी आले ते परवानगी घ्यायला म्हणुनच,

"मास्तर, एकलीच हाय म्हातारी, तसा एक लेक हाय तिच्या बरुबर पण तो बी लंगडा. हितं वाड्यात तुमच्याबरबरच्या चवथ्या खोलीत राहतील मायलेक, तुमास्नीपण सोबत हुईल, चालंल का तुमास्नी?"

खरेतर आम्ही नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. सगळा वाडाच हंबीररावांचा होता, आम्हाला न विचारता जरी त्यांनी कुशाक्काला जागा दिली असती किंवा त्यांना जागा देण्यासाठी आम्हाला बाहेर काढले असते तरी काय करु शकलो असतो आम्ही. कुशाक्का त्यांची लांबची नातेवाईक होती कुणी.....

एका संध्याकाळी कुशाक्का आणि तिचा मुलगा लंगडा राम वाड्यावर राहायला आले आणि तिथुनच या सगळ्या घटनाक्रमाला सुरुवात झाली बघा. कुशाक्का साधारण पन्नास - पंचावनची असावी अन रामा असेल ३४ - ३५ वर्षाचा. दोघेही साधारण शरीरयष्टीचे, रंग म्हणाल तर जवळजवळ काळ्यातच मोडणारा. आल्या दिवशीच पोरांचं वाकडं आलं तिच्याशी. विनुनी मारलेली विटी चुकुन तिच्या दरवाजावर आदळली आणि जे आकांडतांडव केलं तिने. त्यामुळे पहिल्या दिवसापासुनच ती मुलांच्या शत्रुपक्षात गेली ती कायमचीच.

दोघं मायलेक सदानकदा एकमेकाशी भांडत असायचे. राम्या एका पायाने अधु होता. अधु म्हणजे काय तर थोडासा आखुड होता डावा पाय. तेवढं निमीत्त धरुन बिनधास्त घरी बसुन असायचा. भयंकर आळशी माणुस, दिवसातुन चार वेळा खायचं आणि झोपायचं आणि जागेपणी मिळेल त्या कारणावरुन, नाहीतर काहितरी कारण काढुन कुशाक्काशी वाद घालत बसायचं हाच त्याचा उद्योग होता. आम्ही त्यावेळी त्यांच्याकडे थोडेसे दुर्लक्षच केले. पण हळुहळु त्यांचा , म्हणजे माय लेक दोघांचाही विघ्नसंतोषी स्वभाव लक्षात येवु लागला. म्हणजे तो अंगणात बसुन असायचा, पोरं खेळायला लागली की कुठेतरी खडे मार, कुठे त्यांची खेळणीच लपव. उगाचच त्यांना आरडाओरड कर असले उद्योग चालायचे. मी एकदोन वेळा कुशाक्काला सांगायला गेलो तर ती उलटे माझ्याच अंगावर आली.

"तुमच्या पोरांना सांगा की लांब जावुन खेळायला. माझा राम्या अपंग आहे तर तो तुमच्या डोळ्यात खुपाय लागला होय."

हे मात्र अतिच होतं. पण देशपांडे गुरुजी म्हणाले की उगाच चिखलात दगड मारुन काय फायदा. त्यापेक्षा आम्ही पोरांनाच सांगितलं थोडं दुर जावुन खेळायला. म्हातारीदेखील काही कमी नव्हती. पोरं खेळायला लागली की जवळपास जावुन उभी राहायची आणि त्यांची विटी, चेंडु अगदी जवळ जरी पडली तरी मला लागले म्हणुन कांगावा करायची. माझ्या शिक्षकी पेशात मी आतापर्यंत अनेक वांड मुलं पाहीली होती. कधी गोड बोलुन, कधी छडी वाजवुन सरळही केली होती. पण इथे मात्र माझा नाईलाज होता. हे पाणीच वेगळे होते. त्यात पुन्हा हंबीररावांचे नातेवाईक...म्हणजे समर्थाघरचे श्वान. हळु हळु आम्ही दुर्लक्ष करायला शिकलो. पण ती आमची सगळ्यात मोठी चुक होती. कुशाक्का स्वत:ला वाड्याची मालकिणच समजायला लागली. मग पाण्यावरुन आमच्या बायकांशी भांडणे, कचर्‍यावरुन वाद घालणे सुरु झाले. शेवटी वैतागुन देशपांडे गुरुजींनी जागाच बदलली. ते वेशीपाशी असलेल्या गुरवाच्या वाड्यात राहायला गेले. मला मात्र ते नाही जमलं. हंबीररावांना भाडं द्यावं लागत नव्हतं आणि नव्या जागेत जायचं म्हणजे भाडं भरणं आलं. मिळणार्‍या तुटपुंज्या पगारात माझ्याच्याने हे धाडस झालं नाही. गुरुजी शिकवण्या घ्यायचे पण तसं बघायला गेलं तर त्यांची मिळकतही माझ्याएवढीच होती. पण त्यांनी तरी घर सोडलं...

नंतर एकदा कधीतरी बोलताना म्हणाले, "बापट गुरुजी त्या राम्याची नजर काही बरोबर नाही वाटत मला. एकटक बघत राहतो सारखा..अगदी नमुकडे सुद्धा. नमुच्या आईच्या लक्षात आलं म्हणुन आम्ही जागा सोडली. "अर्थात त्यामुळे पोरांच्यात काही फरक पडला नव्हता. असेल तर एवढाच की आता अनिकेत गुरवाच्या वाड्यात जावुन नमु आणि विनुबरोबर खेळायला लागला. पुन्हा एकदा पहिल्यासारखा दिनक्रम सुरु झाला आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. पण बहुतेक ही वादळापुर्वीची शांतता होती.

कारण राम्याच्या कुरबुरी वाढायला लागल्या होत्या. एकदा अशीच कुशाक्का त्याला घेवुन कुठेतरी निघुन गेली. ती महिनाभर फिरकलीच नाही. आम्हाला वाटलं गेली कटकट पण नाही. यावेळी म्हातारी परत आली तेव्हा मात्र तिच्याबरोबर राम्याबरोबरच एक कोकरु होतं. कोकरुच म्हणावं लागेल त्या पोरीला.

रंगु.....

खरंच एवढी गोड पोर होती म्हणुन सांगु. १६ -१७ वर्षाची असेल फारतर. बाप कुणाच्यातरी शेतावर मोलानं कामं करायचा. एका संध्याकाळी कुशाक्का आणि राम्या त्याला भेटले आणि मग काय बोलणी झाली कुणास ठाऊक पण दोन दिवसात गावातल्याच महादेवाच्या देवळात दोघांचा पाट लागला आणि परवा परवा पर्यंत परकरात नाचणारी, बागडणारी अवखळ रंगु एकदम बदलुन गेली. मला कसंतरीच वाटलं ते कळल्यावर. पस्तीशीच्या घरातला राम्या आणि सोळा - सतरा वर्षाची गोड रंगु. खुपच विजोड जोडी होती होती. त्या पोरीला अजुन संसार या शब्दाचा नीट अर्थही माहीत नव्हता. आणि तिच्यावर हा असला नवरा लादला होता नशीबाने. भरीस भर म्हणुन ही कैदाशीण राशीला घातली होती तिच्या. मला फार दया आली तिची. मी वसुला पण सांगुन ठेवलं तिच्यावर लक्ष ठेवायला. का कुणास ठाउक पण माझं मन ग्वाही देत होतं की काहीतरी घडणार आहे.

पण रंगु रुळली , फार लवकर रुळली. म्हटलं ना, गोडच होती हो पोर! अतिषय कामसु, सकाळी साडे चार पाचला पोरीचा दिवस सुरु व्हायचा तो रात्री बारा एक वाजेपर्यंत राबत असायचं लेकरु. पण तोंडातुन कधी तक्रारीचा शब्द नाही. कायम हसतमुख. पण कुशाक्काला तेही बघवायचे नाही. ती काही ना काही कुरापत काढतच असायची. येता जाता तिला शिव्या घालणे, क्वचित मारहाणही..यात कसला आसुरी आनंद मिळायचा माय लेकांना कुणास ठाऊक? पण दोघेही तिला त्रास द्यायची एकही संधी सोडायची नाहीत एवढे मात्र खरे. पण पोर कमालीची सोशीक होती. वसु आणि मी तर तिला आमची मुलगी मानायला लागलो होतो. त्यामुळे अधुन मधुन वसु कुशाक्काची नजर चुकवुन तिला कामात मदत करु लागायची, काही खायला द्यायची. त्यामुळे आमच्याशी तिचं चांगलं जमायला लागलं. अनु सुरुवातीला थोडासा बिचकुन होता पण एकदा तिची न त्याची ओळाख झाली आणि तिनं त्याला जिंकुनच घेतलं. मग कधीतरी असंच काहीतरी वाणसामान आणायच्या निमीत्ताने बाहेर पडली असताना अनुने तिची नमु आणि विनुशी ओळख करुन दिली आणि मग त्यांची दोस्तीच झाली. पोरांना काय हो कुणीतरी जीव लावणारं हवंच असतं. त्यांना माया करणारी रंगुताई मिळाली आणि रंगुला जिवाभावाचे दोस्त मिळाले. मग अधुनमधुन त्यांच्या संदेशांची देवाणघेवाण करायचे काम माझ्यावर यायला लागले. मी ही आवडीने ते करायचो. रंगु त्या तशा अवस्थेतही त्यामुळेच खुशीत असायची. पण लवकरच तिच्या या सुखाला कुणाचीतरी दृष्ट लागली.

त्या दिवशी मला जाग आली तिच मुळी कुशाक्काचा आरडाओरडा ऐकुन. सकाळी सकाळी कुणालातरी जोरजोरात शिव्या देत होती कुशाका. मी घाई घाईत सदरा अंगावर चढवला आणि मी आणि वसु आम्ही दोघेही बाहेर आलो आणि जे समोर दिसलं ते बघुन मुळापासुन हादरलो. राम्याने रंगुला दोन्ही हाताने धरुन ठेवलं होतं आणि कुशाक्का जळत्या लाकडाने तिला मारीत होती. ते लेकरु हमसुन हमसुन रडत होतं. मला राहावलं नाही , मी मध्ये पडुन तिला सोडवलं. तशी म्हातारी माझ्यावरच ओरडली.

"तुम्हाला काय करायचय? आम्ही काय वाटेल ते करु. राम्याची बायको आहे ती. सटवी, सामान आणायला म्हणुन घराबाहेर पडते आणि गावातल्या कुणाकुणाबरोबर कुचाळक्या करत बसत असते. कोण कोण यार गाठलेत कुणास ठाऊक?"

आता मात्र माझा ताबा सुटला,

"खबरदार कुशाक्का, काहीही आरोप करु नका पोरीवर. गरिबाघरची पोर आहे म्हणुन काहीही बोलाल, कराल काय तिला? पुन्हा तिला हात लावाल तर याद राखा, माझ्याशी गाठ आहे. पोलीसातच देइन दोघांनापण."

नंतर रडत रडतच रंगुने सांगितले की ती सामान आणायला गेली होती, येताना नेमके देशपांडे गुरुजींचे नमु आणि विनु भेटले म्हणुन थोडा वेळ तिथेच त्यांच्याशी खेळत तिथेच थांबली. ते नेमके राम्याने बघीतले आणि मग पुढचे सगळे रामायण घडले.

फार भयंकर मारलं होतं कुशाक्काने तिला. सगळ्या अंगावर वळ उठले होते लेकराच्या. दोन दिवस मी तिला माझ्याकडेच ठेवुन घेतली. दोन वेळा कुशाक्का येवुन कुरकुर करुन गेली पण मी काही रंगुला तिच्या हवाली नाही केले. पण मग एक दोन दिवसानंतर काही वेगळंच घडलं. म्हणजे झालं असं की त्या दिवशी सकाळी सकाळीच गावातला नारायण वैद्य कुशाक्काकडं आला होता. जवळ जवळ तासभर होता तिच्या घरात. जाता जाता मी हटकलं त्याला तर म्हणाला रामराव आजारी आहेत खुप. कालपासुन ताप उतरतच नाहीये. नेमकं हे रंगुने ऐकलं आणि मग काही तिला राहवेना. कसाही असला तरी तिचा नवराच होता तो. लहानपणापासुन मनावर झालेले संस्कार इतक्या सहजासहजी कसे काय विसरणार होती ती. गेली बिचारी पळतच घरी. त्यानंतर मात्र तिचं दर्शनच दुर्मिळ झालं. नंतर बरेच दिवस नारायण सुद्धा मला टाळायला लागला तेव्हा मात्र मला ते खटकलं. एकदा संध्याकाळी शाळेतुन येताना मी नारायण वैद्याला गाठलंच.

"काय हो नारायणबुवा, काय झालंय त्या राम्याला? आणि तुम्ही माझ्याशी बोलणं का टाळताय?"

"काय विचारताय मास्तर? तुमच्याकडुन ही अपेक्षा नव्हती हो. तुम्हाला देवमाणुस समजतो आम्ही आणि तुम्ही दुसर्‍यांच्या लेकी सुनांना नादी लावताय. काहीही झालेलं नाहीय राम्याला. निदान तो आजारी आहे हे बघुन तरी त्याची बायको परत येइल या आशेनंच त्या बिचार्‍या कुशाक्कांनी राम्या आजारी असल्याचं खोटंच नाटक करायला सांगितलं होतं मला. आणि तसंच घडलं. पोर सुटली तुमच्या तावडीतनं."

मी अवाकच झालो. क्षणभर काय बोलावे तेच सुचेना. माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीवर, माझ्या चारित्र्यावरच डाग लावायला निघाली होती ही बाई. मी नारायणबुवांना तसाच देशपांडे गुरुजींकडे घेवुन गेलो. तिथे जेव्हा गुरुजींनी आपलं जागा बदलण्याचं कारण सांगितलं तेव्हा धक्का बसण्याची पाळी नारायणबुवांची होती.

"त्या लेकराच्या अंगावरचे माराचे वळ तुम्ही पाहीलेले नाहीत, नारायणबुवा. अहो माणसं नाहीत ती. राक्षस आहेत हो ती कुशाक्का आणि तिचा तो राम्या.! तुम्हाला माहीत नाही तुम्ही केवढी मोठी चुक करुन बसला आहात ते! आधीच ती म्हातारी त्या गरीब पोरीवर दात खातेय आणि आता तर एकटीच सापडलीय बिचारी त्या दोन भुतांच्या हातात. पण एक लक्षात ठेवा नारायणबुवा, त्या लेकराचं काही बरं वाईट झालं तर तो परमेश्वर तुम्हाला कधीच माफ करणार नाही."

मी सात्विक संतापाने बोलुन गेलो. पण खरेच सांगतो मला रंगुच्या काळजीने घाबरवुन सोडले होते हो. ती कुशाक्का खरंच चेटकिणच होती आणि तिचा तो लंगडा पोरगा ...राक्षस. आणखी काय काय नशीबात होतं त्या गरीब पोरीच्या देवच जाणे ! मला कुठे माहीत होतं की रंगु मला यापुढे हसती, खेळती कधीच दिसणार नाहीये.

झालं असं की त्या दिवशी नारायणबुवांनी भेटुन घरी आलो. थोडा चिडलेलोच होतो. स्वत:वर, स्वत:च्या असहायतेवर, लाचारीवर. मनात असुनही मी रंगुची काहीच मदत करु शकत नव्हतो. अगदी गावातल्या पोलीस पाटलाकडे पण जावुन आलो होतो. पण तो पण म्हणाला," मास्तर जोपात्तुर रंगु सोताहुन तक्रार करत न्हाय, तोपात्तुर आमाला काय बी करता याचं न्हाय. येकटा राम्या असता तर काही तरी दमदाटी करुन बगिटली असती पण ती कुशाक्का पडली बाईमाणुस. तिच्या वाटंला जायाचं म्हणजे हाय का पुना ते काय म्हनत्यात ते ’ आ बैल आन मला हाण."

सकाळी जाग आली ती कुशाक्काच्या रडारडीनंच. म्हातारी जोरजोरात ओरडत होती. रंगुच्या नावानं बोटं मोडीत होती. मला तिच्या बोलण्यातुन एवढंच कळलं की रंगु रात्रीपासुन बेपत्ता होती. रात्री एकटीच पाणी आणायला म्हणुन विहीरीवर गेली ती परत आलीच नाही. कुशाक्का तशीच ओरडत ओरडत पोलीस पाटलाकडे गेली. नंतर जी माहीती पाटलांकडुन कळाली ती अशी.

रात्री १० च्या दरम्यान कधीतरी कुशाक्काच्या लक्षात आलं की घरातलं पाणी संपलय. तशी रंगुनं घागर उचलली आणि एकटीच पाणी आणते म्हणुन विहीरीवर गेली. ती तिकडनं तशीच पळुन गेली.

पण सत्य लपुन राहत नाही. तीन दिवसांनी रंगु सापडली......!

विहीरीतच!!! अर्धवट फुगलेलं, माश्यांनी कुरतडलेलं ते शरीर फार विद्रुप झालं होतं. माझ्या हसर्‍या, खेळकर, अल्लड रंगुचं ते रुप बघवत नव्हतं. आणि रंगुचं प्रेत पाहील्यावर जो खोटारडा गोंधळ कुशाक्काने मांडला तो तर अजिबातच बघवत नव्हता. किळस आली होती त्या सर्वांची मला. रागारागाने मी मान फिरवली आणि तिथुन निघुन गेलो. पण मला आता वाटतं तीच माझी सगळ्यात मोठी चुक ठरली. मी निदान रंगुचं शव ताब्यात घेवुन त्यावर विधिवत अंत्य संस्कार करायला हवे होते, म्हणजे पुढे जे घडलं ते तरी टाळता आलं असतं कदाचित. पण म्हणतात ना त्याच्यापुढे कुणाचंच चालत नाही. ते घडायचंच होतं आणि मीच त्याला कारणीभुत होणार होतो.

रंगुला विसरणं तसं कठीणच होतं. खासकरुन अनिकेतला तर रंगुताई आता कधीही भेटणार नाहीये हे खरेच वाटत नव्हते. माई - माई करत येणारी रंगु, गालातल्या गालात नाजुक हसणारी रंगु. वेगवेगळ्या चित्रपट कलाकारांचे आवाज काढणार्‍या अनिकेतकडे डोळे विस्फारुन बघत बसणारी आणि मग त्याच्याकडुन सारखे कुठले ना कुठले आवाज काढुन घेणारी रंगु. छोट्या छोट्या आनंदाने मोहरुन जाणारी रंगु..... एक ना दोन अनेक रुपे डोळ्यासमोर उभी राहात होती रंगुची. पाच सहा महिनेच सोबत होती पोरगी पण तिचं जाणं चटका लावुन गेलं होतं. असेच दोन तीन महीने गेले आणि कुठुनतरी कळालं की कुशाक्का राम्याचं दुसरं लग्न करणार आहेत. तसा मी अजुनच कासाविस झालो. अजुन किती जणांचा बळी घेणार आहे ही बया. त्या दिवशी रात्रभर झोपच नाही आली मला.

आणि एक दिवस काहीतरी वेगळीच सकाळ घेवुन उजाडला. सकाळी सकाळी कुशाक्का दारात उभी राहीली.

"मास्तर, मास्तर ... राम्या तापलाय वो! अंगात ताप हाये त्याला. रात्रीच्यापासुन काही बाही बरळतोय, वैद्याला बोलवायला गेले तर तो मुडदा यायला तयार नाही. म्हणतो मीच मारलं रंगुला. आता मी आहे थोडी तापट डोक्याची , पण म्हणुन काय पोरीचा जीव घेइन होय? तुमी बघा ना जरा. कसंतरीच करतोय रात्रीपासुन."

मी उठलो, वसु मागुन खुणावत होती मरुद्या म्हणुन पण आपले संस्कार असे की माणुसकी सोडवत नाही. मी कुशाक्काच्या घरी गेलो.

राम्या चांगलाच तापला होता. ५ -६ तरी असावा ताप. पण तापापेक्षाही भीतीदायक होतं ते त्याचं बरळणं.

"मी नाही येणार त्या विहीरीत. मला खोल पाण्याची भीती वाटते आणि इथे पोहायला कुणाला येतय? तु एकटीच राहा तिथं !"

मधुनच ओरडत उठायचा....

"नको, नको मला पाण्याची भीती वाटते. मला नाही यायचं. आई, मला घट्ट धरुन ठेव, मी बुडतोय."

मी त्याच्या जवळ गेलो, " रामा, काय झालं. तु काही पाहीलस का? कोण बोलावतय तुला पाण्यात?"

राम्याने डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहीले आणि एकदम घाबरुन ओरडला.

"आई, ती आली बघ मला न्यायला! नको रंगु, मला नको नेवु तुझ्याबरोबर... मला भीती वाटते!"

माझा थरकाप उडाला. राम्याला रंगु दिसली होती...विहीरीपाशी ! त्याला आपल्याकडे बोलवत होती. हे भयानकच होतं. म्हणजे रंगु.

छे छे....असं काही नसतं. राम्याला भास झाला असेल. पण राम्याला तसा भास तरी का व्हावा? की रंगुला ...? राम्याने..?..आणि कुशाक्का ? तिला माहीत आहे का हे? का ती पण सामील आहे यात? म्हणजे या दोघांनी मिळुन रंगुला पाण्यात........? पण का? असं काय वाईट केलं होतं त्या लेकराने यांचं?
यांना फासावरच द्यायला हवं पण पुरावा. कायदा आंधळा, पांगळा आहे म्हणतात ते खोटं नाही. पुराव्याच्या कुबड्यांशिवाय चालताच येत नाही त्याला.

माझ्या लक्षात आलं की कुशाक्का राहायला आल्यापासुन मी प्रथमच तिच्या घरात आलो होतो. मी हळु हळु इकडे तिकदे नजर फिरवायला लागलो. आणि मला ती मुर्ती दिसली. काळ्या शिसवी लाकडाची असावी. एकदम विद्रुप, पाहताच भिती वाटावी अशी. पण सगळ्यात भयानक होते ते तिचे डोळे....हिरवेगार, एखाद्या गढुळलेल्या डोहासारखे डोळे. मला एकदम ते डोळे चमकल्याचा भास झाला. मी थरारलो आणि पटकन मान फिरवली. ते बहुदा कुशाक्काच्या लक्षात आलं आणि तिने पटदिशी ती मुर्ती उचलुन ठेवली. मीही तिकडे दुर्लक्षच असल्याचे भासवले. पण माय लेक नक्कीच काहीतरी अघोरी कृत्यात अडकलेले होते. मी नारायण वैद्याला बोलवतो असे सांगुन तिथुन बाहेर पडलो. घरी येवुन थोडावेळ बाजेवर पसरलो. ती मुर्ती काही डोळ्यासमोरुन हलत नव्हती, खासकरुन तिचे ते हिरवेगार डोळे.

का कोण जाणे पण मला ते डोळे जिवंत वाटले.

मी नारायण वैद्याला निरोप दिला. आधी तर तो ऐकायलाच तयार नव्हता, पण नंतर मी विनंती केल्यावर येवुन जाईन म्हणाला. नंतर शाळेच्या गडबडीत तो दिवस कसा निघुन गेला कळलेच नाही. आज दिपोटी आले होते शाळेत, शाळा तपासायला. त्यामुळे मला घरी यायला तसा उशीरच झाला. आल्यावर जेवण केले आणि बाजेवर पडलो. थकव्यामुळे कधी झोप लागली ते कळलेच नाही. सकाळी उठलो तोच एका गदारोळामुळे.

कुशाक्का धाय मोकलुन रडत होती. तोंडाने रंगुच्या नावाने शिव्यासत्र सुरुच होते.

"अहो, तो राम्या गायब झालाय रात्रीतुन. त्याला सारखी रंगु दिसत होती म्हणे. त्याला तिच्याबरोबर चल म्हणुन मागे लागली होती. आणि काल रात्री असाच ओरडत उठला. आणि मी नाही येणार, मी नाही येणार म्हणत घराबाहेर पळाला. तो गायबच झालाय." वसु हळुच मला म्हणाली. "बरं झालं, मरावा कुठेतरी विहीरीतच बुडुन!" मला उगाचच वसुच्या चेहेयावर एक प्रकारचे समाधान दिसल्यासारखे वाटले.

"चल गं, भुत वगैरे काही नसतं. एकविसाव्या शतकात जगतोय आपण. माणुस चंद्रावर पोहोचलाय आणि तु काय या भाकडकथांवर विश्वास ठेवते आहेस. त्यांचीच पापे भिती घालताहेत झालं त्यांना. आणि राम्याचं मरण तर ठरलेलंच आहे." मी सात्विक संतापाने म्हणालो.

"काय म्हणालात, राम्याचं मरण तर ठरलेलंच आहे, म्हणजे आणि कुठे गेला असेल हो तो?’ वसुने विचारलं तसा मी चमकलो.

"अगं तसं नाही, त्याच्या अंगात ५ च्यावर ताप होता, त्यात वेड्यासारखा बरळतोय. बर गावात कुणीपण या मायलेकांची मदत करणार नाही. म्हणुन म्हटलं तो मरणारच आहे. आपल्याला काय करायचंय? कुठे का जाईना मरायला तो! तु एक काम कर अनिकेतला काही दिवसांसाठी देशपांडे गुरुजींच्या घरी पाठवुन दे राहायला. घाबरुन जाईल लेकरु या प्रकारांनी."

......
........
..........

"गुरुजी, गुरुजी...मी ..मी ... रंगुला बघीतलं काल !"

मला ४४० चा धक्का बसला. काय बोलताय कुशाक्का अहो असलं काही नसतंच मुळी. मी उडवुन लावण्याचा प्रयत्न केला. राम्याला गायब होवुन महीना होवुन गेला होता. आता सगळ्यांनीच त्याच्या परत येण्याची आशाच सोडली होती. उडालेला धुरळा आता कुठे खाली बसायला लागला होता आणि कुशाक्का माझ्यासमोर उभी होती. राम्याला दिसलेली रंगु तिला पण दिसायला लागली होती.

"नाही कुशाक्का, तुम्हाला भास झाला असेल. मेलेली माणासे परत येत नसतात कधी. आणि रंगुला जावुन तर दोन महीने होवुन गेलेत. आपण च तर तिला अग्नी दिलाय गावाबाहेर........

अग्नी दिलाय... नाही, रंगुच्या मृतदेहाचं काय झालं तेच माहीत नव्हतं मला. कारण तिचं शव मिळाल्यावर कुशाक्का आणि राम्या तिचं शव घेवुन तिच्या वडलांच्या गावीच तिचे विधी करणार असं सांगुन लगोलग तिला घेवुन गेले होते. मला कळल्यावर मी खुप हळहळलो होतो. रंगुने मागे दिलेल्या माहितीवरुन तिच्या गावी गेलो तर तिथं कळलं होतं की कुशाक्का आणि राम्या तिथे आलेच नव्हते. त्या गरीब बापाला तर आपली पोर आता या जगात नाहीय हे देखील माहीत नव्हते. मग मी पण त्यांना काहीच न सांगता परत आलो होतो.

"कुशाक्का मला एक सांगा तुम्ही रंगुच्या शवाचं काय केलंत? इथुन तिच्या गावी नेतो म्हणुन तिला घेवुन गेलात पण तिकडे गेलाच नाहीत, मघ नेलंत तरी कुठे तिचं शव? काय केलंत त्याचं? अग्नी तरी दिलात की नाही त्या अश्राप जिवाला का दिलंत टाकुन कुठल्या नदीत बिदीत."

"अरे देवा, मी का नाही त्याचवेळी जाब विचारला तुम्हा लोकांना. काय केलंत माझ्या लेकराचं? " आता मात्र मला रडु आवरेना.

"गुरुजी, अहो..आम्ही घेवुन तर निघालो होतो पण बैलगाडीवाल्याने मध्येच सोडलं आम्हाला. वास येत होता ना खुप म्हणुन. मग तिथंच अग्नी दिला तिला आम्ही." कुशाक्का खालमानेने म्हणाल्या.

माझा अजुनही विश्वास बसत नव्हता. "खरं सांगा कुशाक्का, एक लक्षात ठेवा जर खरोखरच तुम्ही म्हणता तसे रंगु परत आली असेल तर तिच्या देहावर योग्य ते सोपस्कार नाही घडले तर ती येतच राहणार. काय केलंत तुम्ही तिच्या शवाचं? खरं खरं सांगा! नाहीतर मी कसलीही मदत करणार नाही." माझा स्वत:चा विश्वास नव्हता या गोष्टीवर पण कुशाक्काकडुन सत्य काढुन घेण्याच तोच एक मार्ग होता. मी आवाज चढवला तशा कुशाक्का वरमल्या आणि हळुच म्हणाल्या.

"गावापासुन चाळीसेक मैलावर तिचं प्रेत टाकुन दिलं होतं आम्ही आणि परत फिरलो !" तसा मी उसळलो...

"अरे माणसं आहात की जनावरं तुम्ही, मृत्युनंतरदेखील त्या गरीब पोरीची अशी होलपट केलीत. मरा असेच, देव तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. कुठे टाकलेत मला ती जागा दाखवा. जे काही शिल्लक असेल त्याच्यावर आवश्यक ते संस्कार करुन घेइन मी. माझ्या लेकरासाठी एवढं तरी करायलाच हवं मला." माझा संताप ..संताप होत होता....अंगाची लाही लाही होत होती.

कुशाक्काने सांगितलेल्या जागेवर रंगुचे जे काही अवषेश मिळाले, कोल्ह्या-कुत्र्यांच्या तावडीतुन वाचलेले, ते गोळा करुन त्यावर मी अग्निसंस्कार केले . जड मनाने घरी परत आलो. असं वाटत होतं की जावं आणि कुशाक्काचा गळा दाबावा नाहीतर तिलापण त्याच विहीरीत द्यावं ढकलुन. मी कसा राग आवरला मलाच माहीत.

पण त्यानंतर कुशाक्काला रंगु सारखीच दिसायला लागली. एकदा तर पहाटेच दारावर थाप ऐकु आली म्हणुन दार उघडले तर समोर कुशाक्का.

"गुरुजी, परसाकडला गेले होते. थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं तर शेजारी कूणीतरी बाई बसलेली. डोक्यावरुन पदर पांघरलेला अगदी रंगुसारखा. मी हळुच बघीतलं तर म्हणाली...........

रंगुच होती ती गुरुजी, मला म्हणाली ..... सासुबाई लई भ्या वाटतंय आमाला हितं. हिर लै खोल हाय. तुमी बी या की सोबतीला. हे बी हायती हितंच. या की तुमीबी."

त्यानंतर हे वाढतच गेलं. कुशाक्काला रंगु कुठेही दिसायला लागली. दिवसाढवळ्या तिचा आवाज ऐकु यायला लागला.

आणि एक दिवस कुशाक्काला वेड लागलं. सगळ्या गावभर राम्या आणि रंगुला हाका मारत कुशाक्का फिरायला लागली. म्हणुन मग शेवटी आम्ही तालुक्याच्या गावातल्या वेड्याच्या इस्पितळात कळवलं, आज ते लोक येवुन तिला घेवुन गेले. रंगुने आपला सुड आपणच घेतला. तर मंडळी, या अशा घडल्या घटना. आता आलं ना लक्षात व्यवस्थित ?

यानंतर काही दिवस असेच गेले. पोरांच्या परिक्षा आटोपल्या. अनिकेतला आम्ही त्याच्या मावशीच्या गावी, सातार्‍याला शिक्षणासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. या वातावरणात तो आता राहावा असे मला वाटत नव्हते. अनिकेत सातार्‍याला त्याच्या मावशीकडे गेला आणि एक दिवस, माफ करा एके रात्री वसु माझ्याजवळ आली.

"मला काही विचारायचय तुम्हाला, विचारु ?"

"अगं विचार ना, परवानगी कसली मागतेस? विचार......

"अनिकेत जायच्या आधी एक दिवस त्याच्या दप्तरात मला एक साडी दिसली. रंगुच्या अंगावर बघीतली होती मी ती साडी."

"अगं......मला काय बोलावे तेच सुचेना........

"अगं, तुला तर माहीत आहे ना, त्याचा किती जीव होता रंगुवर. ठेवली असेल तिची आठवण म्हणुन. त्यात काय एवढे विशेष?" मी सारवासारव करायचा प्रयत्न केला.

"इतकं सोपं नाहीये ते. एकदा रात्री झोपेत काहीतरी बडबडत होता अनि, ते सुद्धा रंगुच्या आवाजात..... राम्याला, कुशाक्काला बोलवत होता. सकाळी उठल्यावर विचारलं तर गालातल्या गालात हसला आणि म्हणाला ती जमाडी जंमत आहे माझी आणि बाबांची. त्याने तुमचं नाव का घेतलं आणि कसली जमाडी जंमत?"

"अगं कसली आलीय जमाडी जंमत आणि काय, तु रागवशील म्हणुन त्याने माझे नाव घेतलं झालं. लक्ष देवु नकोस. झोप आता चल. मला झोप यायला लागलीय."

वसुच्या डोळ्यातला संशय काही कमी झाला नव्हता.

या शनिवारी सातार्‍याला चक्कर टाकायला हवी. अनिकेतला सांगायचय,

" बाबारे तुझी मिमिक्री काही दिवस बंदच ठेव, खासकरुन रंगुचा आवाज तर अजिबात काढु नकोस. तशी केस दबलीय म्हणा भुताच्या नावाखाली. पण उगाच धोका कशाला, नाही का?

काय मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मी बरोबरच बोलतोय ना? अनिकेतला सातार्‍याला पाठवुन चुक तर नाही ना केली मी. रंगु, पोरी तुझा आबा तोकडा ठरला गं? नाही वाचवु शकलो तुला. पण त्या रात्री गणोबा भगताच्या येड्या पोरानं बघितलं होतं कुशाक्काला, तुला विहीरीत ढकलताना. मला माहीतीय गाव त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही पण मला माहीत आहे तो खोटं बोलणार नाही.

पण असं नाही सोडलं मी त्यांना, त्यांनाही सुखानं नाही जगु दिलं मी. मला खात्री आहे, आता तुझा आत्मा नक्कीच सुखात असेल, आनंदात असेल.

समाप्त.

गुलमोहर: 

बापरे ! एकदम झटका (वर्‍हाडी नाही बरं का)
************
परमेश्वराचा संकल्प म्हणजेच आदिमाया, शुद्धविद्या, ललिता, राधा. तर इंद्रियशक्तींच्या सहाय्याने मानव ज्या वासना उत्पन्न करतो व वाढवतो, त्या वृत्ती म्हणजेच्'मन' म्हणजेच मानवी संकल्प म्हणजेच 'माया' - 'अविद्या'.

काय बदललंस रे? परत नाही हा वाचणार व शोधणार काय ते !
************
परमेश्वराचा संकल्प म्हणजेच आदिमाया, शुद्धविद्या, ललिता, राधा. तर इंद्रियशक्तींच्या सहाय्याने मानव ज्या वासना उत्पन्न करतो व वाढवतो, त्या वृत्ती म्हणजेच्'मन' म्हणजेच मानवी संकल्प म्हणजेच 'माया' - 'अविद्या'.

आप्पा.. झक्कास!! मजा आली वाचताना.. Happy
अश्विनी, रंगूने बदललं असेल. Proud

शेवटच्या दोन परिच्छेदामध्ये थोडा बदल केलाय गं. विशेष काही नाही.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

जबरदस्त प्रवाह आहे रे कथेचा......!

मस्त आवडली Happy

-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !

जोर क झटका....... जोरसे ही लगा Happy
शेवटपर्यंत खिळवुन ठेवलं बघ 'जमाडी जंमत' ने

वा, जबरदस्त.. कथासंग्रह काढा आता विशाल, अजून काही बहारदार कथा लिहून.. Happy

शंका येत होतीच पहिल्यापासून निवेदकानेच काहीतरी केले असणार म्हणून. पण मिमिक्री हा एकदमच फुसका बार वाटला.
आधीच्या भयकथांच्यामुळे अपेक्षा वाढवून ठेवल्यायस दुसरं काही नाही...
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नीरजा, निदान तु वाचतेयस माझ्या कथा, हे ही नसे थोडके !
आणि थोडं उन्नीस बीस राहणारच की. असो पुढच्या वेळी अशी निराशा होणार नाही याची काळजी घेईन.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

चांगली आहे कथा .. Happy

रामाच वय २३-२४ आहे का ४० ??

छान रंगलीये कथा. फ्लॅशबॅक उत्तम. गावाचे/ वाड्याचे वर्णन ७०-८० च्या दशकात घेऊन जाते.
एखाद्या छोटेखानी मालिकेचे कंटेंट नक्किच आहे.

अज्जुका म्हणतेय तसा फुसका बार नाही वाटला. नायकाने त्याच्या(मानवी) मर्यादेत राहुन केलेला उपाय कथेला न्याय देणाराच आहे.

अभिनंदन.

>>>>रामाच वय २३-२४ आहे ४० ??
श्रद्धा, खुपच चांगल observation.
तुमचा प्रश्न वाचूनच लक्षांत आलं की तुम्ही पुण्याच्या Proud

सद्दा, धन्स्...माझ्या लक्षात नाही आलं, सुधारतो चुक.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

बाप रे!!!!!!जबरदस्त हादरवुन टाकणारी कथा आहे...सहीच विशाल..खुप आवडली...

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

मस्त, आवडली. प्रांजळ पणे सांगायच तर मला भुत कथा अमानवी कथा पचत नाहीत (भिती वाटते म्हणुन नव्हे पिंड नाही म्हणुन म्हणा) ही आवडली अगदी फुसक्या (मला तो फुसका नाही वाटला कारण मला तेव्हढाही जमत नाही) बारासकट आवडली

सुंदर मस्तच ... शेवट पर्यंत पकड छान आहे.. मस्त ओघवती.. धावती कथा... !!!
पात्र जास्त रंगवली असतिस तर छान झाल असत ती डोळ्या समोर उभी रहातात कारण ही कथा पात्रावंर आधारित आहे कथानका पेक्षा...
कथेच नाव मात्र बदलायला हवं, नावात अर्धी उकल होते. तरीही रोमांचक..!!!

झकास,

विशाल काय पण कथा आहे यार!!!!!!!!!!
मजा आली वाचताना!!!!

छान रंगवली आहे, पात्र रचना देखील मस्तच!!!!

एका छोट्याशा गावातील एक छोटासा शिक्षक. आपला मुलगा, पत्नी आणि नोकरी हे त्याचं अवघं विश्व. जीला मुलगी मानलं तिच्या मृत्युचा सुड घेण्याचा मार्ग त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या वकुबानुसार तो निवडतो. आणखी खुप काही अफलातुन कल्पना वापरता आल्या असत्या मला, पण मग त्या आपल्या नायकाच्या व्यक्तिमत्वाला शोभल्या नसत्या. सुधाकरने म्हटल्याप्रमाणे त्याने त्याच्या मर्यादेत राहुन, उपलब्ध साधनांच्या साह्याने आपल्या लेकीला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला मुळात ही कथा भयकथा म्हणुन लिहायची नव्हतीच पण रहस्य जपण्यासाठी थोडी पार्श्वभुमी निर्माण करावी लागली. तेव्हा कुणाचा अपेक्षाभंग वगैरे झाला असेल तर माझा नाईलाज आहे. पण मला वाटतं मी आवश्यक तो न्याय दिलेला आहे कथेला. काही छोट्या मोठ्या चुका असतील. पण कोणी लगेच धारप किंवा सुशी नाही होवु शकत. त्यासाठी बरीच साधना करावी लागेल. असो सगळ्यांना धन्स.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

सही कथा आहे रे.

भयकथा होणार आणि रंगी अनिला पण हाका मारणार असे वाटत असतानाच ट्विस्ट आहे कथेत! एक साधा मास्तर असे काही करू शकतो आणि ते ही त्याच्या मुलाच्या मदतीने! मस्तच जमलय!

नावाचे बघा जरा जमले तर..!

तुम्हीच सुचवा यार काहीतरी नवीन नाव !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

पण कोणी लगेच धारप किंवा सुशी नाही होवु शकत. >> आम्ही म्हणतो ना तू होउ शकतोस... तर होउअ शकतोस.. पुढची कथा कधी लिहितोयस?

विशाल! खूपच छान!! पूर्ण भयकथा झाली असती तर धारपांच्या बरोबरीची झाली असती! खूप प्रवाही! आणि व्यक्त न करता येणार्‍या नात्यांची छान मांडणी केली आहे!

विशाल खुप आवडली कथा. शेवटपण सह्हीच! मस्त जमलीये.

विशाल, कथा झक्कास!!! अगदी शेवटच्या शब्दापर्यंत वाचनीय!!

विशाल,
खूप छान रंगवलेली आहे तुम्ही ही कथा. नाव बदलून "कथा कुशाक्काची......आणि रंगूचीही" असे ठेवले तर? उत्कंठा वाढत राहील असे वाटते.

मुकुंद कर्णिक

छान.:)

आवडली. मला तर आवाजाची नक्कल वापरात आणली हे तर जास्तच समर्पक वाटल. एखादा पापभिरू शिक्षक ह्यापुढे जाऊ शकत नाही हे अगदी पट्त. कथेला नाव "रंगू" कस वाटत?

Pages