कोश - एक अल्पसा संघर्ष

Submitted by अन्वय on 3 July, 2016 - 12:26

एक सुरवंट होता ... त्याच्या मनात असंख्य विचारांची गर्दी जमली होती . तो पाहत होता आजूबाजूला .... प्रकाश काय असतो हे त्यास माहीत होते , परंतु हा अंधार ! ही रात्र ! ती मात्र त्याच्यासाठी नवीन होती. त्याला हा अंधःकार भासत होता एका पिंजऱ्यासारखा.... दशदिशांचा एक पिंजरा... ज्याच्या गूढगर्भात असेल कुठे भयंकर आग कुठे भयानक विजांचा कडकडाट तर कुठे अक्राळविक्राळ पक्षी जे त्याला ग्रास बनविण्यास तत्पर आहेत. त्याला हा अंधार असह्य होऊ लागला. जेंव्हा ही सृष्टी प्रथम त्याने पहिली होती तेंव्हा ती होती तेजस्वी, प्रकाशमान, सगळ्यांचा रूप स्वच्छ आणि स्पष्ट दाखवणारी... पण आता... आता त्याच्यासमोर होतं त्याच सृष्टीचं एक भयाण रूप... संदिग्धता आणि भय यांनी येथील कणाकणांना असं व्यापलंय जसं काय हेच या सृष्टीचं शाश्वत रूप आहे असं कोणालाही वाटावं. त्यालाही तसंच वाटत असावं बहुधां.....

प्रकाशाचा एक विचित्र स्वभाव आहे. या उजेडाच्या प्रभावात सगळे प्रश्न जाळून जातात पण नपुंसक असा अंधार मात्र जन्माला घालतो कोट्यवधी प्रश्न.... काही प्रश्न असतात अल्पजीवी, काही दीर्घायुषी आणि काही अमर, अगदी युगानुयुगे जिवंत असलेले... या अंधारमय सृष्टीचे आता त्या सुरवंटाला भय वाटू लागले होते. त्याला वाटले, ही अथांग अनंत सृष्टी माझ्या एवढ्याश्या जीवाला कशी पेलणार?... मग त्याने ठरवलं.... त्याने ठरवलं की आपल्याला झेपेल, रुचेल असं आपलं वेगळं विश्व निर्माण करावं.... मग त्याने ओढून घेतला स्वतःभोवती एक कोश .... त्या कोशाने वेगळं केलं त्याला त्या अंधःकारापासून, त्या हजारो दुःखांपासून. त्याला वाटलं की हा कोश देईल त्या कधीकाळी पाहिलेल्या प्रकाशमान जगाचं सुख, सुरक्षितता, संपवून टाकेल त्या अंधाराची अनिर्बंध सत्ता, या अथांग दिशांनाही हा कोश वळून पलीकडे जाण्यास भाग पाडेल. हा कोश देईल या जीवाला शाश्वती जगण्याची, जिवंतपणाची..... पण .....

पण आताच कुठे जिवात जीव आलेल्या त्या सुरवंटाचा जीव आता गुदमरू लागला होता. ह्या कोशातल्या अंधाराने बाहेरच्या अंधाराला थोपवून धरले होते खरे! पण कोशातला अंधारही होता शेवटी अंधारच! त्याची घुसमट हळूहळू वाढायला लागली... त्यानेच निर्माण केलेलं एक सुखदायी विश्व त्याला आता असह्य होऊ लागलं. ज्या ज्या दुःखांपासून सुटका होण्याच्या हेतुने त्याने हा कोश गुरफटला होता तीच दुःख, त्याच यातना त्याला आता या विश्वात होऊ लागल्या. त्याला कळत नव्हतं की बाहेरचं जग प्रकाशमान होऊनही शेवटी झालं अंधारलेलं... ते बाहेरचं जग होतं... पण हे त्याचंच विश्व असूनही ते का त्याचा असा छळ करतंय... त्याला माहीत नव्हतं.... की या सगळ्याला कारणीभूत आहे त्याच्यातला जिवंतपणा. अशा बंदिस्त पोकळीत जगण्यासाठी नव्हता झाला त्याचा जन्म, आणि म्हणूनच त्याची होतेय घुसमट.

एव्हाना त्या सुरवंटाचा संघर्ष सुरू झाला होता त्या कोशातून बाहेर पडण्यासाठी, पण त्याच्या "सुरक्षित" भिंतींना काही केल्या तडा जात नव्हता. अथक प्रयत्न करूनही आता त्याला हा कोश बाहेर पडू देत नव्हता. एकीकडे होणारी प्रचंड घुसमट आणि दुसरीकडे निराशा हे त्याचं दुःख अजून प्रबळ करत होत्या.... पण... पण अखेरीस ह्या अंधःकाराच्याच गर्भातून तेजस्वी प्रकाश आला. त्या सुरवंटाने दुर्दम्य अशा इच्छेच्या बळावर त्या कोशाचे आवरण भेदून टाकले. ती इच्छा होती त्याच अंधाऱ्या दिशांचा मागोवा घेण्याची... अवकाशात गरुडझेप घेऊन स्वच्छंद फिरण्याची... सगळ्या प्रश्नांना ललकारण्याची... कोशातून बाहेर आलेला सुरवंट आता झालं होतं एक फुलपाखरू. त्याला वाटलं इतक्या यातनांना सामोरं जाऊन आपल्याला गरुडाचे पंख लाभले असतील, पण मात्र ते होते फुलपाखराचे पंख... पण त्याची इच्छाशक्ती मात्र होती गरुडाचीच... तो झेपावला पुन्हा त्याच त्या अवकाशाकडे...प्रकाशाच्या शोधात...

Group content visibility: 
Public - accessible to all site users