सत्य

Submitted by मयुर एकबोटे on 2 March, 2016 - 10:01

रात्री नवाची वेळ होती. कमिश्नर साहेब साहेब नुकतेच मंत्रालयात मीटिंग संपवून परत आले होते आणि आता सवयीप्रमाणे एक चहा घेऊन निघायच्या बेतात होते.

तेवढ्यात दरवजा वाजला.

"या" साहेब काहीसे वैतागून म्हणाले. यावेळी अगदी स्विय सचिव सुद्धा काही काम घेऊन आले असते तरी साहेबांनी त्यांना परत पाठवले असते.

एक मध्यमवयीन गृहस्थ आत शिरले. साहेब दचकले. पण त्यांच्या लक्षात आलं की रिकाम्या हाताने आलेला हा माणूस जास्तीतजास्त निषेधाच्या घोषणा देऊ शकेल. वाढलेली दाढी, मळका सदरा आणि रुंद,
रापलेला भालप्रदेश पाहून साहेबांना " पोलिशी खाक्याला कंटाळलेल्या कार्यकर्त्याची थेट मुख्यालयात धडक!" असा मथळा डोळ्यासमोर दिसू लागला. ते वैतागून सहाय्यकाला फोन करणार इतक्यात ते गृहस्थ म्हणाले "थांबा! महत्वाचं काम आहे! मी इथे आहे हे कुणाला कळू देऊ नका!"

असे थेट कमिश्नरकडे तक्रार घेऊन येणारे कमी नसतात. पण साहेबांना वाटलं की जर एकदा या माणसाच ऐकून घेतलं तर परत पाठवायला सोपं जाईल. उगाच ही ब्याद उद्या मीडियाकडे गेली तर अजून कटकट.

"बोला" साहेब उत्तरले "काय काम होतं?"

"एक महत्वाची खबर द्यायची होती. साक्षच म्हणा ना!"

"पोलिस स्टेशन मध्ये का नाही गेलात? त्यांनी साक्ष नोंदवायला नकार दिला काय?"

"नाही साहेब. मीच नाही गेलो. मामला जर नाजूक आहे. इकडे तिकडे बातमी पसरली तर परिणाम कदाचित हाताबाहेर जातील"

"अच्छा. कसली साक्ष?" डोळे बारीक करून साहेब म्हणाले.

"खुनाची"

"कोणाचा?"

"डॉक्टर वीरेंद्र दाभोळकर"

साहेब खुर्चीतच सावरून बसले. "अंधश्रद्धा हटाव मोर्चा" प्रमुख वीरेंद्र दाभोळकरांच्या खुनामुळे आख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. कुणी त्यासाठी "अती उजव्यां"कडे बोट दाखवत होतं तर कुणी "बाबां"च्या लॉबीकडे. काहींच्या मते तर हे सरकारी षड्यंत्र असून त्याचा उद्देश हिंदूंचं खच्चीकरण एवढाच होता. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत चर्चांच्या बाजाराला काही मंदी येणार नव्हती. पण दोन आठवडे होऊन सुद्धा पोलिसांच्या हातात कसलेच धागेदोरे हातात आले नव्हते.

"तुम्ही पाहिलात खून?"

"हो"

साहेबांनी आधी चाचपणी करायचं ठरवलं. या प्रकरणाला राजकीय परिमाण आल्यामुळे कोण कधी कशासाठी बुजगावणी उभी करेल याचा नेम नाही.

"मग आधी का नाही आलात?"

"मी विचार करत होतो की यावं का नाही."

साहेबांनी प्रश्नार्थक भुवई उंचावली.

"असं काही होईल याची कल्पनाच नव्हती. काही कळायच्या आत ते गोळ्या झाडून पसार झाले.त्या धक्क्यातून बाहेर आल्यावर थोड्यावेळाने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. काय करावं याचा खूप विचार केला"

"यात विचार करण्यासारखं काय आहे? सरळ पोलिसात जाऊन सांगायचं नाही?"

"तसं नाही साहेब . बघा,आता सगळे म्हणतात की सत्य उघडकीला आलं पाहिजे. पण समाजाची सत्य स्वीकारण्याची तयारी आहे? श्रद्धा अशी गोष्ट आहे की जिच्यावर आपलं आयुष्य उभं करतात. आणि या श्रद्धेच्या डोंगरावर 'संस्था' उभ्या राहतात. उद्या सत्य बाहेर आलं तर या लोकांच्या श्रद्धा उडतील. काय करतील ही माणसं? शिवाय प्रत्येक गटाच्या जीवावर टपलेले अनेक गट असतात.या घटनेवर आपली पोळी भाजून घ्यायला लोक कमी करणार नाहीत. "

"बरोबर आहे तुमचं…. पण तरी तुम्ही आला आहात. कारण?"

"मी विचार केला: भूलथापांवर उभा राहिलेला समाज काहीवेळ टिकून राहील, पण फार काळ नाही. आपल्याच विसंगातींच्या दबावाखाली त्याचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. त्याऐवजी लोकांपुढे सत्य आणलं तर किमान लोकांना ठरवता येईल. म्हणून मी ठरवलं की जे होईल ते होईल, पण समाजासामोर सत्य आणणं गरजेचं आहे. पुढे त्याचं काय करायचं ते लोकांना ठरवू दे."

"हे ही बरोबर आहे." साहेब काहीसे कंटाळून म्हणाले. त्यांना या सगळ्या चर्चेपेक्षा गुन्हेगारांचा पत्ता लावण्यात जास्त रस होता. "गोळी झाडणाऱ्या इसमांना तुम्ही ओळखता?"

"हो. " मग त्या गृहस्थांनी मारेकर्यांची नावं सांगितली.

"हं…." साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या "ठीक आहे. मी तुमचा जवाब नोंदवून घेतो आणि उद्या अटकेचे आदेश काढतो. मग बाकी कोर्टात काय तो निवडा होईल" असं म्हणून त्यांनी फाईल उघडली.

"नाही साहेब." तेवढ्यात ते गृहस्थ उद्गारले. "जवाब नोंदवू नका."

आता मात्र साहेब वैतागले. "का नाही?"

"मला कोर्टकचेर्या जमणार नाहीत. मी तुमच्याकडे एवढ्यासाठीच आलो की तुम्ही सत्य लोकांसमोर आणाल."

"अहो सत्य सत्य काय घेऊ बसलात? इकडे प्रोसिजर असते." साहेब खुर्चीतून उभे राहिले आणि चढ्या आवाजात म्हणाले. "अशी नावं मला सांगितली आहेत की उद्या अटक केली तर सगळीकडे गोंधळ माजेल.
गृहमंत्र्यांनी विचारलं की कोणाच्या सांगण्यामुळे अटकेचे आदेश काढले काढले तर काय सांगू? आहात कोण आपण?"

"मी डॉक्टर वीरेंद्र दाभोळकर"

कमिश्नर साहेबांनी थोडावेळ त्या गृहस्थाकडे निरखून पाहिलं. मग शांतपणे खाली बसले. समोरचा चहा संपवला. बराच वेळ विचारात पडल्यासारखा चेहरा करून खिडकी बाहेर बघत रहिले. शेवटी समोरची फाईल बंद केली आणि मिश्किलपणे हसत पोलिशी खाक्याला साजेल अशा थाटात म्हणाले, "डॉक्टरसाहेब, गुन्हेगाराला पकडून कायद्याप्रमाणे शिक्षा देणं हे काम आमचं ; लोकांपर्यंत सत्य पोहोचवणं हे काम तुमच्यासारख्या कार्यकर्त्याचं. आम्हाला मध्ये पाडू नका."

डॉक्टरांनी उत्तरादाखल एक मंद हास्य केलं आणि निघून गेले.

**********
"काल रात्री पुणे पोलिसांनी दोन व्यक्तींना डॉक्टर वीरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली.आरोपींनी पोलिस ठाण्यात आपला गुन्हा कबूल केल्याचं आमच्या खात्रीलायक सूत्रांकडून कळतं. या प्रकरणी गृहमंत्री….…"

सचिवांनी टिव्ही बंद केला आणि वळून प्रवक्त्यांना विचारलं "झाली भेट?"
"हो. " प्रवक्त्यांनी प्लेटमधल्या भजीचा तुकडा मोडला.
"काय म्हणाले?"
"बरंच काही. म्हणाले की जनतेपुढे सत्य मांडण्याची जवाबदारी आपली आहे."
"मग पुढे काय?"
"काही नाही. आपला अंधश्रद्धेविरुद्ध लढा असाच चालू ठेवायचा. फरक एवढाच, की खरा कोण आणि भोंदू कोण हे सांगायला आता आतल्या गोटात आपला एक माणूस आहे!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users