टेम्स तीरी , लंडन नगरी

Submitted by मनीमोहोर on 2 December, 2014 - 11:38

आजकालच्या जमान्यात लंडनला जाण्याची " अपूर्वाई " पहिल्यासारखी रहिली नसली तरी ही भारतीय मनाला अ़जूनही लंडनचे आकर्षण वाटतेच. अलीकडेच मला लंडनला जायची संधी मिळाली. लंडन वर आजपर्यंत भरपूर मान्यवरांनी लिहीले आहे, आपल्यासारख्या एका अति सामान्य बाईने त्यात आणखी कशाला भर घालावी ह्या विचारात काही दिवस गेले. पण मला लंडन खूप आवडले आणि शेवटी " असेल राजहंसाची चाल डौलदार पण म्हणून कावळ्याने चालूच नये की काय? " ह्या विचाराने गारुड केले आणि म्हणून हा लेखन प्रपंच.

विमानतळावरून मी बाहेर आले आणि एका थंड हवेच्या आणि गार वार्‍याच्या झोताने मला अलिंगन दिले. मुंबईच्या उकाड्याला आणि घामाला कंटाळलेल्या मनाने त्या गार वार्‍याला व्वा म्हणून दाद दिली खरी पण नंतर त्या थंडीचा चांगलाच हिसका दिसला.

घरी जायला आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. सकाळची वेळ, मधूनच डोकावणारा निस्तेज सूर्यप्रकाश, लांबवर दिसणार करडं आकाश, दुशीकडे दिसणारी एक मजली रोहाऊसेस, घरापुढे असणार छोटसं अंगण, फुटपाथवर पानगळीच्या तयारीत रंगांचा साज ल्यालेली मेपलची झाडं, आणि रस्त्यावर शांतता. प्रथमदर्शनीच मी लंडनच्या प्रेमात पडले आणि ते प्रेम दिवसेंदिवस वृधिंगतच होत गेलं
ही आहेत रो हाऊसेस

From london2014

आणि एक हे जवळून

From london2014

लंडनला आलेल्या प्रत्येकाला हे शहर बघण्याची ओढ असतेच. लंडन जर तुम्हाला एका झटक्यात बघायच असेल तर ह्या शतकाच्या प्रारंभी उभारलेलं लंडन आय आहे तुमच्या दिमतीला

From london2014

किंवा अलीकडेच बांधलेली ही इमारत. हिच्या वरच्या मजल्यावरुन सुध्दा लंडनचे विहंगम दर्शन घेता येते.

From london2014

दोन इमारतींच्या मध्ये जो स्तंभ दिसतो आहे ना त्यावरुन ही लंडन पाहता येते. ह्याला वर जाण्यासाठी एक गोल जिना आहे आणि साधारण तीनशे पायर्‍या आहेत. सोळाव्या शतकात एका बेकरीमध्ये अनावधानाने राहिलेल्या ठिणगीमुळे लागलेल्या महा भयंकर आगीत हे संपूर्ण शहर बेचिराख झाले होते. त्याची स्मृति म्हणून हा स्तंभ उभारला आहे आणि त्याला " मॉन्युमेंट " असचं नाव आहे.

From london2014

बिग बेन टॉवर आणि पार्लमेंट स्क्वेअर या दोन्ही शिवाय लंडन अपूर्ण आहे. आत्ता आत्ता पर्यंत कोणत्याही इमारतीची उंची ही बिग बेन पेक्षा कमीच असली पाहिजे असा नियम होता लंडन मध्ये. सेंट्रल लंडनमध्ये गगनचुंबी इमारती दिसत नाहीत ते या मुळेच.

From london2014

भर शहरात असणारी हाईड पार्क, ग्रीन पार्क सारखी मोठी मोठी पार्क्स हे लंडनचे वैभव आहे असं मला वाटतं. हे आहे हाईड पार्क . हिवाळा सुरु झाल्याने झाडानी रंग पालटायला सुरवात केली होती पण अजून हिरवळ आणि फुलं टिकुन होती.

From london2014

From london2014

From london2014

टेम्स नदी ही लंडनची जीवनदायिनी आहे. तिच्या दोन्ही किनार्‍यावर लंडन वसलं आहे म्हणून नदी पार करण्यासाठी टेम्सवर ठिकठिकाणी पूल बांधण्यात आले आहेत. त्यातले काही तर फक्त पादचार्‍यांसाठीच सुदधा आहेत. हा आहे लंडनची जणुं ओळखच बनलेला टॉवर ब्रिज. मोठी मोठी जहाजं जाण्यासाठी हा मधोमध दुभंगतो आणि जहा़जं गेली की परत एकसंध होतो.

From london2014

हा आहे सेंट जेम्स पार्क मधील सेंट जेम्स पॅलेस.
From london2014

हे एक अगदी आटोपशीर असे पार्क आहे आणि ह्या पार्क मध्ये पाणपक्ष्यांना अभय आहे. हा त्यापैकीच एक

From london2014

ह्या पार्क मधील मोठ्या मोठ्या खारींपैकी ही एक झुपकेदार शेपटी असलेली.

From london2014

ही आहे लंडनची भुयारी रेल्वे. मुंबईच्या लोकलने रोज प्रवास करणार्‍या मला ह्यात फारच रस होता. जवळ जवळ दीड शे वर्षापूर्वी जगातील पहिली भुयारी रेल्वे इथे सुरु होणं हे जगातलं आठवं आश्चर्यच वाटत मला. चिकाटी, दूरदृष्टी, तंत्रज्ञानातील प्रगती, अपार कष्ट याचेच हे प्रतीक आहे. हिला इथे ट्युब म्हणतात. ट्युबच जाळं सर्व लंडनभर पसरलं आहे आणि प्रवास खूपच सोपा आहे. ट्युबचा नकाशा प्रत्येक स्टेशनवर, स्टेशनाच्या बाहेर, ट्युब मध्ये आणि आता मोबाईल मध्ये ही आहे त्यामुळे चुकायचं म्हटल तरी चुकता यायच नाही.

From london2014

आम्ही ऑड वेळेला प्रवास करत असल्याने हे ही बघायला मिळालं . ट्युबची मेंटेनन्स कार

From london2014

भाड्याच्या सायकलींचा स्टँड. घ्या सायकल, चालवा आणि आपलं ठिकाण आल की जवळच्या स्टँड्वर ठेऊन द्या.

From london2014

टॉवर ऑफ लंडनच्या किल्ल्याच्या ( इथेच आपला कोहिनूर विराजमान आहे) प्रांगणात पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या ब्रिटीश सैनिकांच्या संख्ये एवढी सिरॅमिकची पॉपी फुलं खोवली होती त्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून.

From london2014

आणि ते पहाण्यासाठी अशी गर्दी उसळली होती.

From london2014

हा पक्षी एवढा माणसाळलेला होता की आम्ही कॉफी पीत बसलेलो असताना अगदी आमच्या पायात पायात येत होता. कोण आहे हा ?
From london2014

आणि बाजूलाच आपली चिऊताई ही

From london2014
एका पुलावरुन घेतलेला प्रचि
From london2014
ट्रॅफल्गार स्क्वेअर
From london2014

ग्रीनिच पार्क वरुन दिसणारे लंडन

From london2014

हे ग्रीनिच पार्क

From london2014

आणि सगळ्या जगाला पूर्व आणि पश्चिम मध्ये विभागणारी काल्पनिक ग्रीनिच रेषा इथे धातुच्या पट्टीने मूर्त स्वरुपात.

From london2014

तर हे काही प्रचि मी काढलेले. लंडन मला खूप आवडलं. एवढ मोठं जागतिक कीर्तीच शहर पण ह्या शहराने अजून ही आपलं गावपण कसोशीने जपलं आहे असं मला जाणवलं. छोटी छोटी साधी तरीही टुमदार एकासारखी एक घरं, त्यापुढे छोटीशीच बाग, रस्त्यावर जुने जुने विशाल मेपल वृक्ष, रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबांवरही टांगलेल्या फुलझाडांच्या कुंड्या, सेंट्रल लंडन पासून अगदी कमी अंतरापासूनच सुरु होणारी उपनगरं, भर शहरातली आणि उपनगरातली मोठी मोठी उद्याने आणि उपवने आणि जागोजागी कशोशीने जपलेल्या इतिहासाच्या खुणा या सगळ्यांमुळे वाटलं असेल मला तसं कदाचित. पण हे शहर माझ्या अंगावर नाही आलं, उलट अगदी छोट्या कालावधी साठी का होईना पण मला त्याने आपल्यात सामावून घेतलं असं मला वाटलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.. Happy एवढे सर्व एका दिवसात फिरला आहात? असेल तर जिवाचे लंडन केलेत की. Wink

ते 'टेम्स'चे थेम्स करा फक्त. Happy

मस्त! Happy

धन्यवाद सर्वांना.

जिज्ञासा , खरं आहे

स्वाती, धन्यवाद नाव सांगितल्याबद्दल.

सेनापती, मी ही टेम्स की थेम्स बद्दल कन्फ्युज आहे. पण थोडी शोधाशोध केल्या नंतर मला असं वाटतय की स्पेलिंग प्रमाणे जरी थेम्स असला तरी त्याचा उच्चार टेम्स असा केला जातो. जाणकारानी प्रकाश टाकावा.

हे सगळ मी एका दिवसात नाही पाहिल. जवळ जवळ महिनाभर पहात होतो. रोज साधारण सकाळी अकराच्या सुमारास बाहेर पडायचे आणि ट्युबने वगैरे प्रवास करुन एकेक ठिकाण पहायचे.

एवढ मोठं जागतिक किर्तीच शहर पण ह्या शहराने अजून ही आपलं गावपण कसोशीने जपल आहे असं मला जाणवलं ---- हे खर वैशिष्ठ आहे लंडनच .

लंडन मला खूप आवडलं एवढ मोठं जागतिक किर्तीच शहर पण ह्या शहराने अजून ही आपलं गावपण कसोशीने जपल आहे असं मला जाणवलं. >>>>>>>>> अगदी अगदी!
ममो फोटो आणि लिखाण दोन्ही छान.
एका पुलावरून घेतलेल्या प्रची त मध्यभागी दिसणारे सेन्ट पॉल्स कथीड्रल आहेसं वाटतय.

आमचे लंडन भारीच आहे. सुरुवातीला जरा ग्लुमी आणि कायम मळभ असलेले वाटते. पण चांगली वाईन जशी हळु हळु चढते तसे लंडन तुमच्या मनावर जे चढते त्यानंतर दुसरी कीती श्रीमंत, मोठे रस्ते, उंच इमारतींची शहरे असलीतरी लंडन सोडवत नाही.

हे खरे तर बर्‍याच इंग्लिश शहरांना आणि गावांना लागू आहे, खास करुन उत्तरेकडच्या.

ह्या वरुन मेलबर्न चे फोटो टाकावे अशी इच्छा झाली. तिथे तर अगदी जुन्या पुण्यात राहील्यासारखे वाटते.

Pages