येथे खोळंबला मृत्यू !

Submitted by SureshShinde on 16 August, 2014 - 06:41

yamrajc.jpg

"माधुरी, ही फळांची पेटी कोणी आणली बरे ?"
घरामध्ये प्रवेश करताच समोरच असलेली मोठी पेटी पाहून मी आश्चर्याने विचारले. अनेक पेशंट अश्या काही वैशिष्ठ्यपूर्ण भेटवस्तू घरी आणून देत असत की त्यावरून कोण पेशंट घरी येऊन गेले ते पटकन लक्ष्यात येत असते. भाजी म्हणजे बोडकेदादा, कांदे म्हणजे रामकरबाई, लसूण म्हणजे रायकर तसेच फळांची पेटी म्हणजे एकतर पेशवेसाहेब नाहीतर अमित!
"होय,अमित आला होता.म्हणाला नवीन आंबे आले आहेत मार्केटमध्ये. या निमित्ताने व आपली भेट घ्यायला आला होता. पण आज तुम्ही नेमकेच लवकर बाहेर पडल्यामुळे तुमची चुकामुक झाली."
"म्हणजे आज अमितच्या सौजन्याने आंबेरस खायला मिळणार तर!" मी म्हणालो.

अमितच्या कुटुंबाचा माझा गेल्या चाळीस वर्षांचा आणि चार पिढ्यांचा संबंध !
माझ्या प्रक्टिसच्या सुरवातीचा काळ होता तो. शंकरराव म्हणजेएक प्रतिष्ठित व्यक्ती! माझ्या शाळेच्या संस्थापकांपैकी ते एक होते. माझ्यासारख्या ज्युनियर डॉक्टरकडे ते जेंव्हा एक पेशंट म्हणून आले तेंव्हा मला खरोखरच खूप आनंद झाला होता.

"या,बसा."
श्री व सौ शंकरराव माझ्यासमोरील खुर्च्यांवर बसले. शंकरराव सुमारे साठ वर्षांचे जाडजूड पण व्यवस्थित वेशभूषा केलेले आकर्षक व्यक्तिमत्व! त्यांना कॉलेजमध्ये 'अमेरिकन जंटलमन' म्हणत असे त्यांनी स्वतःच नंतरच्या भेटीत सांगितले होते. सौ शंकररावदेखील अतिशय रेखीव व अस्सल देशमुखी सौंदर्याचा जणू नमुना शोभावा अश्याच होत्या. त्यांनी स्वतःबरोबर मेडिकल रिपोर्टांची एक जाडजूड फाईल आणली होती.
"डॉक्टर, दादांना बरेच दिवसांपासून पोटदुखीचा त्रास आहे. अनेक डॉक्टरांना दाखविले पण गुण नाही." सौ म्हणाल्या.
त्या काळामध्ये माझ्या प्रक्टिसची नुकतीच सुरुवात असल्यामुळे पेशंट कमी असत व मोकळा वेळ भरपूर असे. मी त्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या व त्यांचे सर्व रिपोर्ट सविस्तरपणे पहिले. बहुतेक पित्ताशयामध्ये खडे झाल्यामुळे पोटात दुखत असावे अशा प्राथमिक निष्कर्षापर्यंत मी पोहोंचलो होतो.
"आपले सर्व रिपोर्ट मी पहिले आहेत. आता तुम्हाला तपासून पाहतो." असे म्हणून मी शंकरावांना कोचवर झोपविले. आमच्या वैद्यकीय संकेत-प्रणालीनुसार त्यांची कसून शारीरिक तपासणी केली.
"आपले तोंड उघडून जीभ दाखवा." मी हातातील टॉर्चने त्यांची जीभ, दात व घसा पाहू लागलो. सर्व काही नॉर्मल होते.
"जरा जीभ उचलून जीभेखालचा भाग दाखवा."
तेथे काहीतरी वेगळे दिसत होते. नीट पाहिल्यानंतर मी म्हणालो,"येथे जिभेखाली मला वाटाण्या एव्हढी जागा सुजलेली आहे. तुमच्या हे लक्ष्यात आले का?"
"नाही बुवा !" आपली जीभ तोंडात वळवून ते म्हणाले,"आता तुम्ही सांगितल्यानंतर तेथे तसे काहीतरी असल्यासारखे वाटतेय खरे. पण त्याचा मला काहीच त्रास नाही."
"त्रास होत नाही म्हणूनच त्याकडे जास्त लक्ष्य देणे आवश्यक आहे." मी म्हणालो.

आपले शरीर म्हणजे जणू एखाद्या अभेद्य किल्ल्याप्रमाणे आहे. एखादा आजार जेंव्हा शरीरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा शरीर कडाडून प्रतिकार करते. ज्या भागामध्ये आजार प्रवेश करू इच्छितो तेथे पांढऱ्या पेशी गोळा होतात,सूज निर्माण करतात अणि सहाजिकच तो भाग दुखू लागतो. पण जेंव्हा एखाद्या अवयवामधिल पेशींमध्ये अनैसर्गिक वाढ होवू लागते म्हणजेच तेथे कॅन्सर तयार होण्यास सुरुवात होते तेंव्हा ही शारीरिक प्रतिक्रिया तयार होत नाही. त्यामुळे तेथे दुखत नाही. सहाजिकच कॅन्सर हा जीवघेणा आजार विकोपास जाई पर्यंत लक्ष्यात येत नाही. म्हणूनच जर कॅन्सरचा आजार जर लवकर लक्ष्यात आला तर त्याचा इलाज लवकर करता येतो व परिणामतः कॅन्सर पूर्ण व कायमचा बरा होऊ शकतो. शंकररावांना जिभेखाली कॅन्सरची सुरुवात झाली असावी असा दाट संशय मला आला.तोंडाचा अथवा जिभेचा कॅन्सर आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. तम्बाखू खाण्याची सवय हे त्याचे मुख्य कारण! शंकररावांच्या जिभेखाली असलेली ही सूज जर कॅन्सरची निघाली तर ती खूपच प्राथमिक अवस्थेमध्ये होती अणि छोट्याश्या सर्जरीने तो कॅन्सर पूर्ण बरा होण्याची शक्यता होती.
पेशंटशी बोलताना आम्हां डॉक्टरांची अवस्था मोठी विचित्र असते. पेशंटला स्पष्ट शब्दांमध्ये सांगावे तर तो घाबरून जाण्याची शक्यता अणि न सांगावे तर हलगर्जीपणाचा गुन्हा! 'इकडे आड़ अणि तिकडे विहीर!' पेशंटशी कसे बोलावे हे काही मेडिकल कॉलेजमध्ये शिकवले जात नाही. पेशंट हा जणू आपला कोणी जवळचा नातेवाईक आहे असे समजून बोला असे माझे प्रोफ़ेसर नेहेमी सांगत असत. त्यामुले शब्दांची जुळवाजुळव करून मी म्हणालो, "हे पहा, तुमच्या जिभेखाली एक छोटीशी गाठ दिसते आहे. ती एखाद्या सर्जनला दाखाविणे आवश्यक आहे. कोणी सर्जन आपल्या परिचयाचे आहेत काय?"
दोघांनीही प्रश्नचिन्हांकित नजरेने एकमेकांकडे पाहिले.
"डॉक्टर, रास्ता पेठेतील सर्जन डॉ. पत्की आमच्या ओळखीचे आहेत. त्यांना दाखविले तर चालेल का?"
मी सर्जन डॉ. पत्कीना ओळखत होतो. मी त्यांच्यासाठी रेफ़रन्स लेटर लिहून दिले.
दुसऱ्याच दिवशी डॉ. पत्कींचा फोन आला.
"डॉ.शिंदे, नमस्कार! शंकरराव माझ्या समोरच बसले आहेत. त्यांच्या लालोत्पादक ग्रंथीमध्ये खड़ा झालेला दिसतो आहे. बायॉप्सी करून काढून टाकावा लागेल. ते सर्जरी साठी फिट आहेत ना?"
डॉ. पत्की हे सीनियर सर्जन असल्यामुळे त्यांनी कॅन्सरची गाठ पाहता क्षणीच ओलखली होती. पण बायॉप्सीचा रिपोर्ट येईपर्यंत उगीचच पेशंटला घाबरवून देणे त्यांना योग्य वाटले नव्हते.
"होय , ते ओपरेशन साठी फिट आहेत."
"ठीक आहे तर मग उद्याच बायॉप्सी करून घेतो." डॉ.पत्की म्हणाले.

पुढील आठवड्यामध्ये शंकरराव बायॉप्सीचा रिपोर्ट घेवून पुन्हा आले. रिपोर्टमध्ये कॅन्सर असल्याचे म्हटले असून व केवळ स्थानिक स्वरूपाचा असल्याचा म्हटले होते. डॉ. पत्किंच्या पत्रानुसार ह्या बायॉप्सीनंतर इतर कोठल्याही ट्रीटमेंटची गरज नव्हती.
आत्तापर्यंत शंकररावांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी ह्या आजाराविषयी बरीच माहिती गोळा केली होती. "डॉक्टरसाहेब, आपण ही गांठ आत्ता जरी पूर्णपणे काढून टाकली तरी ती पुन्हा उद्भवणार नाही ना? " सौ शंकरराव काळजीयुक्त आवाजात उद्गारल्या.
"असे होण्याची शक्यता खूपच कमी आहे पण अगदीच नाकारता येणार नाही." मी सावधगिरीने उत्तर दिले.
"तसे होऊ नये म्हणून काय करता येईल?" सौ.
"हा आजार पुन्हा उद्भवू नये म्हणून केमोथेरपी किंवा रेडीएशनचा उपाय करता येतो. पण ही गांठ इतक्या प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्या लक्ष्यात आली आहे कि या उपाचारांचा विचार करावा असे मला वाटत नाही."
सौ. शंकरराव थोडा वेळ विचारमग्न झाल्या.
"डॉक्टर, यांच्या बाबतीमध्ये आम्हाला मुळीच रिस्क घ्यायची नाही."
"आपण त्यांना मुंबईला टाटा हॉस्पिटल मध्ये दाखवून 'सेकंड ओपिनियन' घेवू शकतो. माझे वर्गमित्र डॉ.शशांक शिंदे यांना मी लेटर देवू शकेन."
शशांक टाटा हॉस्पिटलमध्ये मोठ्या पोस्टवर असून पेशंटांची उत्तम काळजी घेण्याबद्दल प्रसिद्ध होते. त्यांची आई आमच्याच शाळेमध्ये शिक्षिका होत्या तर आजोबा सोलापूरमध्ये स्वतंत्रतेच्या लढ्यामध्ये शहीद झालेले होते. शशांक अतिशय हुशार, संशोधन प्रेमी आणि रुग्णांची उत्तम काळजी घेणारा असल्याने आम्हा सर्व वर्गमित्रांना त्याचा अभिमान वाटत असे.

माझे पत्र घेऊन शंकरराव मुंबईस गेले. शशांकने त्यांना रेडीएशनचे अठ्ठावीस शेक घेण्यास सांगितले. ही उपाययोजना संपवून महिन्याभराने शंकरराव पुण्यात परतले. दात काढल्यामुळे त्यांचा चेहेरा थोडा बदलला होता. माझ्या या प्रतिक्रियेवर ते मोठ्याने हसले आणि उत्तरले होते,"डॉक्टरसाहेब, अहो चेहेरयाचे काय घेवून बसला आहात, जीवावर बेतले होते पण दातावर निभावले."

त्यानंतर पंधरा वर्षेतरी शंकररावांची तब्बेत ठणठणीत राहिली होती. त्यानंतर दर वर्षी त्यांच्याकडून आंब्याच्या पेटीची भेट कधी चुकली नाही.

काळाच्या ओघामध्ये मी शंकररावांना विसरून गेलो. एके दिवशी सौ. शंकरराव पुन्हा ऑफिस मध्ये आल्या.
"डॉक्टर, नमस्कार! हा माझा मुलगा, दिलीप!"
"नमस्कार,दिलीपराव !"
दिलीप हा सुमारे पस्तिशीचा उंचापुरा,धड धाकट व हसतमुख तरुण होता.
"बोला काय काम काढले आज ?" मी थोडा अंदाज घेण्यासाठी जुजुबी प्रश्न केला. ह्या दोघांपैकी कोण आजारी असावे कि घरी कोणी आजारी असावे काय.
दिलीपच्या आईंनीच बोलण्याला सुरुवात केली.
"डॉक्टर, हा माझा थोरला मुलगा. आमचा फळांचा व्यवसाय देखील हाच पाहतो. पण आजकाल मला त्याची तब्बेत चांगली वाटत नाही. रोज संध्याकाळी घरी आल्यावर खूप थकलेला असतो. एकदम निरुत्साही वाटतो. बहुतेक बारीक तापही असावा. खूप चिडचिड करतो. म्हणून मीच आग्रह करून त्याला तुमच्याकडे घेवून आले आहे. तुम्ही त्याला तपासून 'काही नाही' असे सांगितले कि माझे समाधान होईल."
एखाद्या पेशंटचा आपल्यावरील इतका विश्वास पाहून आपल्याला क्षणभर बरे वाटते पण दुसऱ्याच क्षणी त्यातील अपेक्षित निदानक्षमतेला आपण अपुरे तर पडणार नाही ना अशी शंकाही येत असते.
"आम्ही रक्त आणि लघवीचे रिपोर्ट्स देखील घेवून आलो आहोत. हेमोग्लोबिनचे प्रमाण नऊ ग्रॅम आहे पण बाकी सर्व ठीक दिसते आहे."
मी रिपोर्ट्स नजरेखालून घातले.
"चला दिलीपराव, तपासून पाहू या"
तपासणीमध्ये काही विशेष आढळले नाही. थोडेसे रक्त कमी असल्याप्रमाणे दिसत होते. शरीरामध्ये कोठेही अवधान आलेले नव्हते. यकृत व प्लिहेला सूज आलेली नव्हती.
"ताईसाहेब, तपासणीमध्ये काहीच दोष दिसत नाही. पण अशा तरुण आणि हेल्दी माणसाचे हेमोग्लोबिन फक्त नऊ हे मला पटत नाही. एकतर रक्त तयार होत नाही अथवा तयार झालेले रक्त वाया जात असावे. रक्त तयार होण्यासाठी लागणारे घटक म्हणजे लोह आणि ब गटाची जीवनसत्वे यांची कमतरता असू शकते. मुळव्याधीच्या आजारामध्ये शौचावाटे रक्तस्त्राव होवून हेमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता असते. पण दिलीपला मुळव्याधीचाही त्रास नव्हता. पोटात अल्सर म्हणजे जखम असेल किंवा रक्त शोषणारे जंत पोटात असतील तरी अॅनिमिया होतो. दिलीपला अशी कोणतीही लक्षणे नाहती. पण मग हेमोग्लोबिन कमी का या प्रश्नाचे उत्तर काही केल्या सापडत नव्हते.
"ताईसाहेब, मला ह्यांच्या रक्त कमी असण्याचे काहीच कारण सापडत नाही. पण कारण शोधणे आवश्यक आहे. दिलीपरावांना दोन-तीन दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल करून पुढील तपासण्या करणे आवश्यक आहे."
"डॉक्टर, दाखल न करता या तपासण्या नाही का करता येणार? इतर सर्वजण उगीचच काळजीत पडतील म्हणून म्हणते."
"हे पहा, आपल्याला एंडोस्कोपी करावी लागेल. तसेच रक्त जेथे तयार होते त्या अस्थीमज्जेचा नमुना म्हणजे बोन-म्यारोची तपासणी करावी लागेल. यासाठी दाखल होणे आवश्यकच आहे."

माझ्या सल्ल्याप्रमाणे दिलीपराव हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तपासण्या सुरु झाल्या. पोटाच्या गॅस्ट्रोस्कोपीमध्ये अल्सर दिसला नव्हता व मोठ्या आंतड्याच्या एंडोस्कोपीमध्ये अल्सर्स किंवा कन्सर दिसला नव्हता. पण रक्तामधील ग्लोबुलीन नावाच्या प्रथिनाचे प्रमाण वाढले होते. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ग्लोब्युलीन म्हणजे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती ! आपल्या शरीरामधील 'ब' प्रकारच्या पांढऱ्या पेशी हे विशिष्ठ ग्लोब्युलीन प्रथिन विशिष्ठ जंतूंना मारण्यासाठी तयार करतात. कधीकधी या 'ब' पेशींना कॅन्सर होतो व त्यांची अमर्याद वाढ होते. त्यांनी तयार केलेले ग्लोब्युलीन वाढते पण ते कुचकामाचे असते. त्यामुळे अशा रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते व त्यांना संसर्गजन्य आजार पटकन होऊ शकतात. अशा प्रकारच्या कर्करोगाला 'मल्टीपल मायलोमा' असे म्हणतात.

MutiMyeloma.png

दिलीपरावांना हाच आजार असावा असे प्राथमिक निदान होते. दोनच दिवसात बोनमॅरोचा रिपोर्ट आला. दिलीपला मायलोमा असल्याचे स्पष्ट झाले होते. दिलीपच्या बोन-मॅरोमध्ये 'प्लाझ्मा सेल' नावाच्या पेशींचे प्रमाण फारच वाढले होते.

MMbmarro.jpg

'प्रोटीन-इलेक्ट्रोफोरेसीस' या तपासणीमध्ये ग्लोब्युलीन वाढून 'मायलोमा बँड' स्पष्ट होता.

ProtMband.png

"ताईसाहेब, वाईट बातमी आहे. दिलीपरावांना एक प्रकारचा 'ब्लड-कॅन्सर' झालेला आहे." मी माझ्या आवाजात ज्यास्त गंभीरपणा जाणवणार अश्या सुरात म्हणालो.
पण ताईसाहेब मोठ्या धीराच्या! चेहेऱ्यावरील भाव बिलकुल न बदलता त्या म्हणाल्या,"ठीक आहे. त्यालाही काही इलाज असेलच ना?"
"हो तर, इलाज तर निश्चितच आहे आणि उत्तम आहे. पण सर्वात उत्तम ट्रीटमेंट मुंबईमध्ये उपलब्ध आहे." मी म्हणालो.
त्याकाळी पुण्यामध्ये उत्तम हिमॅटॉलॉजीस्ट उपलब्ध नव्हते. शिवाय या पेशंटचे नातेवाईक मुंबईमध्ये असल्याचे मला माहित होतेच. भारतातील नामवंत हिमॅटॉलॉजीस्ट डॉ. एम बी आगरवाल यांच्याबद्दल मी ऐकून होतो. माझे मित्र डॉ. शिरीष प्रयाग यांनी त्यांना पुण्यामध्ये लेक्चरसाठी बोलावले असताना त्यांच्याशी परिचय झाला होता. डॉ.शिरीषकडून सरांचा पत्ता व फोन नंबर मी मिळवला.
"दिलीपराव, काळजीचे काहीच कारण नाही. डॉ. आगरवाल हे भारतातील या आजारावरील सर्वात उत्तम डॉक्टर आहेत. शुअरली यु आर गोइंग टु बी इन द बेस्ट हँडस् !"
दिलीप मुंबईला जावून डॉ आगरवालांना भेटले. त्यांना एका उत्तम डॉक्टरांना भेटल्याचा आनंद झाला. सरांनी पुन्हा एकदा काही तपासण्या केल्या. बोन मॅरोच्या स्लाईड्सचा अभ्यास केला.

"मिस्टर दिलीप, डॉ. शिंदेनी केलेल्या मायलोमाच्या निदानाशी मी सहमत आहे. सुदैवाने या आजरा साठी फारच उत्तम उपाय उपलब्ध आहेत. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दोन दिवस राहून काही इंजेक्शनांचा कोर्स घ्यावा लागेल. हा कोर्स दर महिन्यातून एकदा असे सहा महिने औषध घ्यावे लागेल. त्यानंतर तुमचा आजार संपून जाईल. यु विल बी ए नॉर्मल पर्सन लाईक मी !"
"डॉक्टरसाहेब, हा कोर्स म्हणजेच केमोथेरपी का? मला तिची जरा भीती वाटते."
"दिलीपराव, काळजीचे काहीच कारण नाही. सध्या केमोथेरपी खूप सेफ असते. आपण या इंजेक्शनद्वारे शरीरातील कर्करोगाच्या भरभर वाढणाऱ्या पेशींना टार्गेट करून त्यांचा नाश करीत असतो. आपल्या शरीरात इतरही काही उपयुक्त व चांगल्या पेशीदेखील भरभर वाढत असतात. उदाहरणार्थ आपले केस! केमोमुळे त्यांनाही थोडीशी झळ पोहोन्चते पण ती तात्पुरतीच. गेलेले केस पुन्हा वाढतात. सो .. डोन्ट वरी! यू विल बी ऑलराईट... आय प्रॉमिस यू!"
डॉ. आगरवाल यांच्या या सहानुभूतीपूर्ण शब्दांनी दिलीपंना खूपच बरे वाटले.
हा हा म्हणता सहा महिने निघून गेले. केमोची सहा सायकल्स दिलीपरावांनी काहीही त्रास न होता संपवली. डोक्याचे केस पूर्णपणे गेले होते ते हळूहळू पूर्ण परत आले. माझ्याकडे फोलो-अप साठी आल्यानंतर ते म्हणाले होते,"सर, आता माझी तब्बेत ठणठणीत आहे. सर्व तुमची आणि त्या परमेश्वराचीच कृपा!"
"अहो, दिलीपराव, केवळ तुमचे नशीब आणि आई-वडिलांची पुण्याईच म्हणायला हवी!"

पाहता पाहता सात आठ वर्षे निघून गेली. एके दिवशी दिलीपच्या मुलाचा म्हणजे अमितचा फोन आला. "काका,बाबांची तब्ब्येत थोडी बरी नाही. तुम्हाला दाखवायचे म्हणत होते. गेली दोनतीन वर्षे काहीच त्रास होत नव्हता म्हणून आपल्याकडे आलो नव्हतो."
पेशंट मंडळींचा हा अनुभव मला काही नवीन नव्हता.
"काही हरकत नाही, तू त्यांना लगेच घेवून ये. पुढचे मी पाहतो."
दिलीपरावांना मी पुन्हा तपासले. यावेळी प्रॉब्लेम थोडा जास्तच गंभीर होता. त्यांच्या पाठीमध्ये एका ठिकाणी खूपच दुखत होते. छोटेसे टेंगूळही हाताला लागत होते.त्यांच्या दोन्ही पायांमध्ये अशक्तपणा आला होता. लघवीलाही त्रास होत होता. ही सर्व लक्षणे सांगत होती कि पाठीच्या मणक्यांच्या आत असलेल्या व पायांकडे संवेदना ने-आण करणाऱ्या मज्जा-रज्जूवर दाब आला होता. बहुतेक मणक्याचा 'टीबी' झाला असल्याची दाट शंका माझ्या मनात डोकावली. पाठीच्या मणक्यांचा एक्सरे व सिटी स्कॅनवर मात्र तेथे ट्युमर असल्याचा रिपोर्ट आला. टीबी कि पुन्हा मायलोमा ? दिलीपरावांचे पाय पूर्ण पांगळे आणि कायमचेच अधू होण्याच्या आधी लवकर उपाययोजना करणे आवश्यक होते. त्या टेंगळामध्ये सुई टोचून त्यातील रस काढून तपासणे म्हणजेच एफएनएसी ही तपासणी केल्याने आतील आजाराविषयी निश्चित प्रकारची माहिती मिळणार होती. एफेनएसी झाली. दुसऱ्या दिवशीच एफएनएसीचा रिपोर्ट आला - 'प्लाझ्मासायटोमा' ! म्हणजेच सात वर्षे शांत राहिलेला 'मायलोमा' पुन्हा उद्भवला होता !

सात वर्षांनंतर पुन्हा एकदा डॉ. आगरवाल क्लिनिक,मुंबई !
डॉ.एम.बी.आगरवाल आता माझ्या चांगलेच परिचयाचे झाले होते. 'एमबी', विद्यार्थीवर्गामधील सरांचे संक्षिप्त नाव, त्यांच्या वार्षिक राष्ट्रीय परिषदांमुळे भारतभर प्रसिध्द होते. त्यांच्या एका राष्ट्रीय परिषदेच्या लेक्चर्सची मी मल्टीमिडिया सीडी तयार केल्यामुळे आमचा परिचय आणीच दाट झाला होता.
"डॉ. शिंदे, दिलीपराव माझ्या समोरच बसले आहेत. त्यांचा मायलोमा दुर्दैवाने रिकर झालेला दिसतोय. जरी ट्युमरचा आकार लहान असला तरी तो नाजूक ठिकाणी उदभवला आहे. पुन्हा नव्याने केमो द्यावी लागेल. ते उद्याच दाखल होत आहेत."
"ठीक आहे. यु आर द बेस्ट जज. प्लीज टेक केअर !"
"एस, आय विल, डेफिनेटली !"
पुन्हा एकदा केमोथेरपीच्या अग्निदिव्व्यातून दिलीपराव यशस्वीरीत्या बाहेर आले. ताज्या सिटी स्कॅनमध्ये ट्युमरचे नामोनिशाण दिसत नव्हते. आजार जणू वितळून गेला होता. पुन्हा एकदा केमोच्या सौजन्याने दिलीपराव नव्या जोमाने दैनंदिन उद्योगाला लागले होते. आत्ता ठराविक कालांतराने मुंबईला एमबींकडे जाण्याचे विसरत नव्हते.
पुन्हा चार वर्षे निघून गेली. बहुतेक मायलोमा क्युअर झाला असे आम्हा सर्वांना वाटत होते.
त्यानंतर दिलीपरावांच्या एका वार्षिक तपासणीमध्ये पुन्हा बोन- मॅरोमध्ये प्लाझ्मा पेशींचे प्रमाण वाढलेले एमबींच्या लक्ष्यात आले. दरवर्षी तपासणीनंतर रिपोर्ट्सचे जाड कुरियर येत असे पण या वर्षी मात्र सरांचा फोन आला.
"डॉ. शिंदे, दिलीपचा मायलोमा पुन्हा रिकर झाला आहे."
"सर, मग आता पुढे काय? पुन्हा केमो?"
"होय, आणि आता सेकण्ड लाईन वापरावे लागेल. हा मायलोमा आता रुटीन केमोला दाद देईल असे वाटत नाही. सेकण्ड लाईन इज अ मस्ट नाऊ!"
दिलीपरावांचे भाऊ,आई आणि सारे कुटुंबच त्यांच्या मागे खंबीरपणे उभे होते. पुन्हा दिलीपने ह्या नव्या केमोचे पहिले सायकल पूर्ण केले. हि केमो जास्त परिणामकारी पण तितकीच जास्त टॉक्सिक होती. या वेळी दिलीपरावांना जास्तच अशक्तपणा जाणवत होता. त्यांना थोडा थोडा तापहि येऊ लागला होता. चालताना दम लागू लागला होता. मी त्यांना एक आठवड्याचे अँटीबायोटीकचा कोर्स दिल्यामुळे ताप गेला पण अशक्तपणा मात्र जाईना. अशातच केमोच्या दुसऱ्या सायकलची तारीख जवळ आलेली.
"डॉक्टर, यापूर्वी मी केमोची तारीख कधीच चुकवली नाही पण यावेळी थोडे उशिरा गेलो तर नाही का चालणार ? मला खूप अशक्तपणा वाटतो आहे ."
"ठीक आहे. सायकल एक महिना पुढे ढकलू या. मी आगरवाल सरांशी बोलून घेतो. तुम्ही काळजी करू नका."

पंधरा दिवसांनंतर दिलीपरावांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. तो तापाने फणफणला होता.
"काका, गेले दहा दिवस रोज ताप येत आहे. डॉ. सायखेडकरांचे औषध घेतले पण ताप उतरत नाही."
मला एकंदरीत परिस्थिती चांगली दिसत नव्हती. हेमोग्लोबिन कमी झाल्याचे दिसत होते. त्या सकाळीच काढलेल्या छातीच्या एक्सरे मध्ये हार्टचा आकार खूपच मोठा झाल्याचे दिसत होते.
चेहेर्यावर उसने अवसान आणून मी म्हणालो,"अमित, बाबांना हॉस्पिटलमध्ये हलवू या. तेथे व्यवस्थित उपचार करता येतील."
अमितने ताबडतोब बाबांना हॉस्पिटलमध्ये हलवले.
त्यांना सीसीयूमध्ये ठेवले होते.
"सर, मी सीसीयू रजिस्ट्रार बोलतो आहे. आपल्या पेशंटचे रिपोर्ट्स आले आहेत. त्यांच्या हार्टच्या डॉपलर टेस्टचा रिपोर्ट आला आहे. इजेक्शन फ्रॅक्शन फक्त पंधरा टक्के आहे. डायलेटेड कार्डीयोमायोपथीची केस दिसते आहे."
आपल्या हृदयाची कामगिरी तपासण्यासाठी कलर डॉपलर ही टेस्ट करतात. हृदयाचा नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे 'ईएफ' ५५ ते ७० टक्के असतो. दिलीपरावांचा 'ईएफ' फक्त १५ टक्के होता म्हणजे दिलीपरावांच्या हृदयामध्ये १०० मिली रक्त आले तर हृदय आकुंचन पाऊन फक्त १५मिली रक्तच पुढे पंप करू शकत होते. म्हणजे दिलीपरावांचे हार्ट फेल झालेले होते. 'डायलेटेड कार्डीयोमायोपथी' हा हृदयाच्या स्नायूंचा आजार असतो. यामध्ये हृदयाची स्पंदन शक्ती खूप कमी होते.याप्रकारच्या असाध्य आजाराला हार्ट ट्रान्सप्लांट शिवाय इतर कोणताही उपाय उपलब्ध नाही. एकंदरीत परिस्थिती फारच गंभीर होती.
"हे पहा डॉक्टर, मी तेथेच येतो आहे. तोपर्यंत पेशंटला डायुरेटिक व अँटीबायोटिक्स सुरु करा."

हॉस्पिटलकडे जाताना माझे विचारचक्र चालूच होते. दिलीपला केमोमुळे तर त्रास झाला नसेल ना?
मी एमबींना फोन करून दिलीपरावांच्या तब्येतीविषयी सर्व कल्पना दिली.
"डॉ. शिंदे, मी एड्रीयामायसीन वापरलेले नाही त्यामुळे आपण दिलेल्या केमोथेरपीमुळे हार्टवर असा परिणाम होईल असे मला वाटत नाही. तुम्ही सध्या सपोर्टीव्ह ट्रीटमेंट चालू ठेवा. तब्येत सुधारल्यानंतर पाहू या. आणि हो, प्लीज, कीप मी पोस्टेड !"

चार दिवसांतच दिलीपरावांची तब्येत बरीच सुधारली. मी पुन्हा त्यांना तपासण्यासाठी त्यांच्या घरी गेलो.
"सर, बाबांची तब्येत आता बरी आहे. पण आईची इच्छा एकदा मुंबईला जावून डॉ. आगरवाल सरांना दाखवावे अशी आहे."
"अगदी योग्य! सरांनाही ते आवडेल."
त्याच दिवशी दिलीप कुटुंबीय मुंबईस रवाना झाले.

दुसऱ्या दिवशीची सकाळच्या आठचा सुमार. डॉ. आगरवाल सरांचा फोन. सरांचा दिवस सकाळी नव्हे तर भल्या पहाटेच सुरु होतो याची मला कल्पना होतीच.
"गुड मॉर्निंग, डॉ. शिंदे !"
"व्हेरी फाईन मॉर्निंग,सर !"
"अहो तुमच्या पुण्याला सीडी हार्ट कोण करते, डॉक्टर का टेक्निशियन ?"
"सर, कार्डीऑलॉजीस्टच करतात. आपण असे का विचारताय ?" मी म्हणालो.
"आम्ही येथे त्यांची कलर डॉपलर टेस्ट पुन्हा केली. आमच्या सीडी टेस्टमध्ये असे काही निष्कर्ष दिसताहेत कि तुमच्या पुण्याच्या कार्डीऑलॉजीस्टला पुन्हा परीक्षेला बसवायला पाहिजे असे तुम्हाला वाटेल."
मला आत्ता केवढा मोठा आश्चर्याचा धक्का बसणार होता याची मला कल्पनादेखील नव्हती.
"सर, म्हणजे नेमके काय दिसते आहे ?"
"दिलीपला 'बॅक्टेरियल इंडोकार्डायटीस' झाला आहे. जंतूंनी त्याच्या हृदयामधील एओर्टिक वाल्व्ह संपूर्ण खाऊन टाकली आहे. देअर इज नो एओर्टिक वाल्व्ह ॲट ऑल ! इट इज टोटली डिस्ट्रॉइड बाय द बॅक्टेरिया ! अँड दॅट इज व्हाय हिज हार्ट ह्याज फेल्ड ! म्हणून त्याचे हार्ट फेल झाले आहे. आम्ही ट्रीटमेंट सुरु केली आहे. पण तुमच्या त्या कार्डीऑलॉजीस्टला माझा निरोप अवश्य सांगा, हिस मिस्टेक ह्याड अल्मोस्ट किल्ड धिस पेशंट !"
"सर, पुढे काय?" या धक्क्यातून कसाबसा सावरत मी विचारले.
"आता एक पूर्ण महिना अँटीबायोटिक्स व नंतर ओपन हार्ट सर्जरी करून एओर्टिक व्हाल्व्ह रिप्लेस करावीच लागेल. मायलोमा ट्रीटमेंट तोपर्यंत थांबवली तरी चालेल. पेशंटच्या खर्चाचा विचार करून सर्जरी पुण्यातच करावी असे मी सुचवले आहे."
माझ्या मनात विचार आला कि एमबींनी पुन्हा सीडी हार्टची तपासणी केलीच नसती तर..!
सरांनी केलेल्या अचूक निदानामुळे त्यांनी दिलीपला जणू मृत्युच्या दाढेतून पुन्हा बाहेर ओढून काढले होते.

पुण्याला परत येवून दिलीपरावांनी इंडोकार्डायटीसची ट्रीटमेंट पूर्ण केली. पुढील महिन्यात त्यांची वाल्व्ह रिप्लेसमेंटची सर्जरीही झाली. 'त्या' कार्डीयोलोजीस्ट(!)ने मात्र त्याची चूक कबूल केलीच नाही. पण दिलीपरावांच्या कुटुंबीयांनी मोठ्या मनाने त्याची जीवघेणी चूक पोटात घातली. सर्जरीनंतर पुन्हा केमोची आणखी दोन सायकलस् दिलीपने संपविली.

आणखी एक वर्ष चांगले गेले. पण नंतर मायालोमाने पुन्हा उचल खाल्ली.

आत्ता दोनच पर्याय शिल्लक होते. एक होता संपूर्ण बोन- मॅरो बदलणे म्हणजेच 'मज्जारोपण' किंवा 'बोन- मॅरो ट्रान्सप्लांट' ! खर्च होता कमीत कमी दहा लाख रुपये ! दुसरा उपाय म्हणजे नवीन निघालेले एक औषध - बोर्टेझोमीब ! हे ही औषध खूपच महाग, एका इंजेक्शनची किंमत होती एक लाख ! आतापर्यंत सर्व खर्च खूपच झाला होता. पैशांचे स्त्रोत संपत आलेले मला जाणवत होते पण दिलीपरावांच्या कुटुंबीयांनी चकार शब्दानेही तशी जाणीव होवू दिलेली नव्हती. पण अशा अडचणीच्या वेळी औषध घेवून अक्षरशः देवासारखी धावून आली दिलीपरावांची अमेरिकेला राहणारी सख्खी बहिण !
पण आत्ता इंजेक्शनचाही फारसा उपयोग होताना दिसत नव्हता. आजार रेझीस्टंट झाला होता. दिलीपची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली.

मला अजूनही आठवतो तो दिवस. दिलीपराव बेडवर झोपले होते. हातापायांच्या काड्या झालेल्या ! कोठूनतरी शक्ती आणून ते मला म्हणाले,"डॉक्टरसाहेब, खूप झाले प्रयत्न आता. खूप वेळ थांबवले आपण त्याला. मला तो दिसतोय..."
त्यांच्याच्याने पुढे बोलवेना.
दिलीपच्या वृध्द आईंचा हात हातात घेऊन मी बाहेर पडलो. अमित मला सोडायला दरवाज्यापर्यंत आला होता.

काम संपवून रात्री घरी आलो तेंव्हा सौ. माधुरी मला निरोप सांगत होती," अहो, दिलीपराव गेले बर कां ! अमितचा फोन आला होता. खूपच झुंज दिली आजाराशी पण नियतीसमोर कोणाचे ..."

¡¡¡¡¡¡

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर साहेब, दिलिपरावांबद्दल वाचुन वाईट वाटले, विविध आजारांचे निदान करण्याचे प्रगत तंत्रज्ञान आणि उपचार पध्दती जरी आज उपलब्ध असल्या तरी नियतीच्या पुढे कोणाचेच चालत नाही हे मात्र खरे.

चांगला लेख. तुमच्या लिहिण्याच्या शैलीमुळे कॅन्सर हा फ्लू सारखा किरकोळ आजार असावा असं वाटून गेलं.

छान लिहिलंय... डॉक्टर साहेब, या बाबतीत जर काही नवे उपचार आता उपलब्ध असतील तर त्याबद्दलही अवश्य लिहा.

येथे होता खोळंबला 'तो' हे मात्र खरं... एवढ्या ट्रीट्मेंट्स अन ऑपरेशन्स धीरानी घेणारे अन पचवणारे दिलीप ही धन्यच.
लेख नेहेमीप्रमाणेच ओघवत्या अन सोप्या भाषेत आहेच Happy

'त्या' कार्डीयोलोजीस्ट(!)ने मात्र त्याची चूक कबूल केलीच नाही. >>> अपेक्षितही नव्हतेच. तांदळातल्या अश्या खड्यांचे अनुभव मलाही आहेत. (एक पेशंट म्हणून)

लेखातील पेशंटबद्दल खरेच वाईट वाटले. एकदा खर्च आवाक्याबाहेर गेला, आणि उपचारांचाही त्रास होऊ लागला तर मग त्यापेक्षा ते जगणेच नकोसे होते. ज्यांना पैश्यामुळे पहिल्या स्टेजचे उपचारही परवडत नाहीत आणि त्या अभावीच जातात अश्या दुर्दैवी लोकांचा विचार पुन्हा मनात आला.

लेखातून मिळालेले वैद्यकीय ज्ञान हे नेहमीसारखेच सविस्तर आणि उपयुक्त. एवढी चांगली वैद्यकीय कथांची लेखमाला आपल्यासारखे वैद्यकिय क्षेत्रातील दिग्गज मराठी भाषेत लिहित आहेत हे अभिमानास्पद तसेच कौतुकास्पद वाटते.

एका सेकंदात मेडीकल कॉलेज हॉस्टेल ला पॅरासाईट म्हणुन राहीलो होतो ती २ वर्षे आठवली सर!!!!!, डॉक्टर्स ची क्रिडच वेगळी

#रीस्पेक्ट _/\_

मला वाटते तो फोटो एक रिप्रेझेंटेशन आहे, यमदुत जो देशमुख कुटुंबियांचे प्राण हरायला आला होता अन डॉक्टर साहेब, डॉ शशांक, डॉ अग्रवाल ह्यांनी त्याला असा अन इतका वेळ थोपवुन धरला की थकुन बेट्या तिथेच काहीकाळ आपल्या रेड्यावर आडवा झाला विसाव्या ला Happy

(वैयक्तिक आगाऊपणा करुन केलेले निरिक्षण!!!, माफ करा _/\_)

डॉक्टर साहेब, दिलिपरावांबद्दल वाचुन वाईट वाटले >>> +१०

लेखनशैली नेहेमीप्रमाणेच सुरेख.

तो पहिला फोटो अतिशय समर्पक.

किती सोसले असेल त्या दिलीप रावांनी. वाइट वाटले वाचून. पण रिसोर्स असेल तितकी झुंज देतोच माणूस. शेव्टी हात टेकायचे. Sad

तो दरवाज्यापर्यंत येत होता पण तुम्ही सगळे सर्व शक्तीनीशी त्याला पळवून लावत होता. तुमचे शर्थीचे प्रयत्न लेखात स्पष्ट झाले आहेत. एक पेशंट कित्येक गोष्टींमधून जातो वेदना, आणि आर्थिक ओढाताण मुख्य. तुमच्यासारखे धीर देणारे डॉक्टर विरळाच असतील.

बिटरस्वीट आहे ही गोष्ट. मृत्यूला इतकं थोपवता आलं याचं कौतुक आणि शेवटी काळ आला की कोणाचं काही चालत नाही ही जराशी हताशा... Uhoh
डॉक्टर लोकांना असा विन सम लूज सम हा अनुभव सतत घ्यावा लागत असणार.