झुबी

Submitted by sarojini on 21 August, 2008 - 12:10

आज इतक्या वर्षांनंतर झुबीची आठवण मला प्रकर्षाने येते आहे.
झुबी.. म्हणजे झुबेदा. माझी बालमैत्रीण. लहानपणच्या वेळी मनात कोरल्या गेल्या अनेक शिल्पांमधलं एक शिल्प!

झुबी नावाच्या जाणीवेनं मी माहेर सोडल्यानंतर हळूहळू नेणीवेचा एक कोपरा व्यापला तो कायमच्यासाठी. दरवेळी महेरी गेले, तिच्या रिकाम्या, एकाकी घराकडे पाहिल्यावर हटकून मन ढवळून टाकणारी झुबी तिथं नाही, हे मनाला पटवणे फार अवघड जायचं.

झुबेदा ही आमच्या गावातल्या एकमेव पिंजार्‍याची पोर. गावातली ब्राम्हण आळी अन मराठा आळी जिथं संपत होती, त्या कोपर्‍यावर, पण थोडंसं दूर, वाळीत टाकल्यागत पिंजार्‍याचं एकाकी घर उभं होतं.

घर असं असलं, अन पिंजारी दांपत्य गरीब असलं, तरी झुबीला वाळीत टाकण्याची अख्ख्या गावात कोणाची टाप नव्हती. या पिंजारी जोडप्याची नावं कोणाला ठाऊक होती, की नाही कुणास ठाऊक; पण 'झुबीनी माय' अन 'झुबीना बाप' या नावानेच ते सार्या गावात ओळखले जात होते!

झुबी होतीच तशी- खमकी, बिनधास्त.
झुबीचा अवतार त्यावेळच्या खेड्यातल्या चार मुलींसारखाच गावंढळ होता. फटलेला फ्रॉक, झिपरे केस, त्यावर गडद रंगाच्या रिबिनी. रिबिनीने केस बांधलेत, की केसांनी रिबिन ते कळण्याच्या पलीकडे!

ब्राम्हण आळीतली मुले मराठी बोलत, बाकी सार्‍या गावात अहिराणी चाले. तर झुबीच्या घरात ऊर्दू मिश्रित हिंदी मिश्रित अहिराणी असा बोलण्याचा थाट होता. झुबेदाचा सार्‍या गावात, सार्‍या गल्ल्यांतल्या सार्‍या घरांमध्ये मुक्त प्रवेश होता. मुले असो की मुली, आळी असो की पार- खेळताना झुबी असल्यावर तिच्याकडेच नेतृत्व, असा जणू अलिखित नियम होता. ऊर्दू, हिंदी, अहिराणी, मराठी या सार्या भाषा ती इतक्या सहजतेने बोलत असे, की ती धेडगुजरी, सरमिसळ झालेली भाषाच बरोबर, असा जणू कोणाचाही समज व्हावा. या चारही भाषांतल्या शिव्यांवर तिचे दांडगे प्रभूत्व होते. शिवीशिवाय तिचे वाक्य पुरे होत नसे. आजूबाजूच्या भांडकूदळ बायका अन मुलींकडून या शिव्या तिने शिकून घेतल्या होत्या अन भांडकूदळपणाची दीक्षाही घेतली होती !! छोट्या छोट्या कारणांवरूनही ती अगदी हमरीतुमरीवर येई, कडाकडा भांडे. पण लगेच हसून खेळायलाही मोकळी. त्यामूळे ती सर्वाना प्रिय होती. ती नसली तर आम्हाला चुकल्यागत वाटे.

झुबीच्या कबीरपंथी घरातली समानतेची शिकवण तिच्या मनात रुजली होती. कोणीही तिला परके वाटत नसे. आमच्या बरोबर सार्या देवळांत ती हिंडत असे. आम्हीही मग पिराला तिच्यासोबत जात असू. तिच्या घरातल्या कबीर, महंमद, पैगंबर, विठोबा-रूक्माईच्या तसबिरींना नमस्कार करत असू.

भाद्रपदात गुलाबाई (भुलाबाई) बसली म्हणजे आम्हा मुलींच्या आनंदाला सीमा नसे. झुबीच्या अंगात मग गुलाबाई संचारे. कशी कोण जाणे, पण परंपरेने आलेली अनेक मराठी, अहिराणी गाणी तिला तोंडपाठ होती. आपल्या गोड आवाजातील गाण्यांनी ती सर्वांची मने मोहून टाकी. गुलाबाई बसली, घरोघरी झुबेदाला गाणी म्हणण्यासाठी आमंत्रण असे. मग तर तिला अजिबात उसंत नसे. गुलाबाईची आम्ही विसरलेली गाणीही तिला तोंडपाठ होती. अशा वेळी भांडणे वगैरे आड येत नसत. खड्या, पण गोड सुरात झुबीने गाणी चालू केली की मग मोठी माणसेही कौतूकाने आमच्यात सामील होत.....

या या गुलाबाई
आमच्या आळी, तुमच्या आळी
तुमच्या अंगात
निळी चोळी निळी चोळी
निळ्या चोळीवर
सांडले अत्तर सांडले अत्तर
घरी नाही आला
गुलोजी मास्तर गुलोजी मास्तर.........
अन मग हे गाणे म्हणताना कुणी आले, की 'ये, ये विद्ये. तुला मास्तर नवरा मिळेल गं!' असे भविष्यही वर्तवीत असे. मग आम्ही मुली खुसूखूसू हसत असू. हे हसू आम्हाला नवरा मिळेल याचे, की झुबीने केलेल्या विनोदाचे- ते एक गुलाबाईलाच ठाऊक!!

किंवा मग-
आडकीत जाऊ बाई
खिडकीत जाऊ
खिडकीत होती आरती.
गुलाबाईला मुलगी
झाली बाई
नाव ठेवा भारती........
अशी अगणित गाणी आमच्या आठवणीत आज आहेत ती फक्त झुबीमूळे.

मुलींचे खेळ अन गाणी जितकी तिला प्रिय तितकेच गोट्या, कबड्डी, विटीदांडू असे मुलांचे खेळही. बाहूल्या मात्र तिने कधी खेळल्य नसाव्यात. मुलांत खेळताना, त्यांना अरेरावी करताना तिला वेगळे काही वाटत नसे. खेळात जातीभेद, भाषांच्या भिंती, लिंगभेद अशी काहीही अडचण तिला येत नसे.

झुबी बापाची लाडकी. त्याच्या लाडामूळेच ती कदाचित अशी आडदांड झाली असावी. झिपर्या आवरीत, धुळ झटकीत, नाक ओढीत झुबीची स्वारी घरात गेली की बाप कौतूकाने विचारी, 'खेळून आला का माझा झुब्या?'

मग तिची आई तिच्यावर अन झुबीच्या बापावर डाफरत असे, 'सर पे चढाके रखा है बापने! ससूराल नही जाना क्या उसकू?' गरीब पिंजारी मग झुबीच्या अस्ताव्यस्त झिपर्या सावरीत म्हणे, 'अरे रहने दे. अपने घर मे है, तब तक उछलेगी, कुदेगी. शादी तो होनीही है. काहे को तकतक करती है?'
..

तेराव्या वर्षीच झुबेदाचं लग्न झालं, अन ती सासरीही गेली. पाहूणे मंडळी गेली. दोन्-चार दिवस सासरी राहून तिला पुन्हा माहेरी जायचे होते. तोच झुबीने पराक्रम केला. ती ओटा झाडत होती, अन नवरा मित्रांमध्ये विटी-दांडू खेळत होता. त्यांचा खेळ पाहत बराच वेळ ती रमली. तिलाही खेळावेसे वाटत होते, पण काय करणार?
तेवढ्यात नवर्‍यावर विटी मारायची पाळी आली. त्याला ती मारता येईना. मग झुबी सरसावलीच न राहवून, हातातला झाडू टाकून. 'ला इधर, मै तेरेको सिखाती' म्हणत तिने विटी जी टोलवली, सर्व पाहतच राहिले. मुलांनी एकच जल्लोष केला.

मग व्हायचे तेच झाले. नणंदेने कागाळी केली आणि सासू आरडाओरडा करीत बाहेर आली. झुबीच्या केसांना धरून तिने फरफटत आत नेले. 'बेशरम. मियाँके साथ गुल्ली-डंडा खेलती है. यही सिखाया तेरे माँ बाप ने?' म्हणत अंगावर वळ उठेपर्यंत झुबीला तिने मारले.

दुसर्‍याला रडविणारी झुबी माहेरी येऊन ते वळ दाखवत रडू लागली. पण पाठीवर हात फिरवणे दुरच, साधी सहानूभूतीही कुणी दाखवली नाही. मुलीच्या जातीने मर्यादेतच राहायला हवे. सासूचा धाक तर हवाच. लग्न झाल्यावर असे लाड, सवयी काय कामाच्या? झुबीची आई अन आजूबाजूच्या आयाबायाही म्हणू लागल्या.

विटी-दांडू अन इतर सवयी सुटल्याशिवाय पाठवू नका म्हणून सासरचा निरोपही आला. पण आई कामावर गेली की झुबीचे खेळ्णे सुरू होई. मग जवळपास रोज मिळणारा चोपही ती विसरऊन जाऊ लागली. नंतर एक दिवस विटी-दांडू चुलीत गेला. घरात दिवसभर कोंडली जाऊ लागली. नेहेमी ताठ कण्यात दिसणारी झुबी खाल्मानी आणि अंतर्मूख झाली. या दिवसांनी तिला बरेच पाठ दिले असावेत. झुबी एकलकोंडी बनली खरी, पण अधिकच भांडकूदळही !! बर्‍याच दिवसांनंतर तिची सासरी पुन्हा रवानगी करण्यात आली.

दरम्यान मी हायस्कूलात जाऊ लागले. नवीन म्हणी, वाक्प्रचार शिकू लागले. त्यातले बरेच झुबीच्या वापरात पहिल्यापासून आहेत, हे बघून मला आश्चर्य वाटायचे. अडाणी झुबीला पुस्तकातले हे सारे येत होते. कधी शिकली होती हे सारे ती?

सासरी राहणे हळूहळू तिच्या अंगवळणी पडले. झुबी अधिकच तिखट बनली. तिच्या सासरी मिर्च्यांचा व्यापार होता. आमच्याशी बोलताना सासरचे वर्णन ती अस्सल अहिराणीत, एका वाक्यात करे- 'मिर्च्यास्मा राही राही मिर्चीस् ना गुण येल शे त्यास्ले. तिर्खा जर्द शेतस सरा. आन आते मी त्यास्नामा जाई पडनू..' (मिरच्यांमध्ये राहून मिरच्यांचा गुण घेतलाय त्यांनी. भयानक तिखट आहेत ते सारे. अन आता मी त्यांच्यात जाऊन पडलेय् !)

माझ्या महाविद्यालयीन शिक्षणात नामवंत साहित्यिकांशी माझा संपर्क आला. मी झुबीला विसरले तर नाहीच. उलट त्यांना बघून मला नेहेमी वाटे, झुबी शिकली असती तर नक्की साहित्यिक झाली असती !

तू बोलतेस त्या म्हणी, वाक्प्रचार मला लिहून घ्यायचे आहेत, असे मी तिला एक दिवस म्हणाले, तेव्हा बेफिकिरीने ती म्हणाली, 'मी कजा करसू, तवळच माले येतीस त्या. मना संगे हुबी र्‍हाय, आन लिखी ले ! (मी भांडण करते, तेव्हाच मला त्या येतात. तेव्हा माझ्याशेजारी उभे राहून ते लिहून घे !)

आणि बर्‍याच वेळेला मी खरोखर तसे केले. त्यातून मला खजिना मिळाला. त्या शिव्या, म्हणी किंवा वाक्प्रचार नव्हते, तर झुबेदाला समजलेला तो व्यवहार होता ! ज्या व्यावहारिक अनुभवाचे ज्ञान तिला झाले होते, तो तिच्या शब्दाशब्दांतून म्हणीच्या रूपाने उसळ्त होता. चार शिव्या, एक म्हण- असे तिच्या बोलण्याचे गणित असे. तिच्या भांडणात काय नसे? शिव्या, राग, लोभ, प्रेम, करूणा, तुच्छता, अभिमान, समजावणी, सारे काही असे. भांडता भांडता ती भावनिक होऊन रडतही असे. मला नेहमी वाटे, तिच्या भांडणातल्या कथा आणि व्यथा- यातली सुसूत्रता जर कुणाला कळली असती, अन त्याने ती लिहून काढली असती, तर त्याचे बहूमोल साहित्यच झाले असते !

अ. रा. केळकरांनी जेव्हा शिव्यांचा कोश करायचे ठरवले, तेव्हा मला झुबेदाची तीव्रतेने आठवण झाली. असे वाटून गेले, की या कामी तिची त्यांना खुप मदत झाली असती. पण वाटते, ते होते, तर कशाला काही दु:ख या जगात असते?
..

झुबेदा आता या जगात नाही.
एक छोटासा आजार, अन घरच्यांचे दुर्लक्ष यामूळे ती गेली. माझी एक मैत्रीण गेली. माझ्या आजोळच्या ओढीचे एक ठिकाणच हरवले. आता तिथे गेल्यावर, ब्राम्हण आळी अन मराठा आळी संपते, तिथल्या अंधार्‍या, पडक्या झोपडीकडे पाहून वाटते, माझे बालपण गडपलेय् तिथे. एखादे वेळेस येईलही नाक पुसत, फाटक्या फ्रॉकमध्ये, झिपर्‍या आवरत.. झोपडीच्या बाहेर.
पण ते येत नाही. किंवा आलेलं मला दिसत नाही.
डोळ्यांत तरळलेल्या पाण्यामूळेही असेल कदाचित.
..
..

--
ही कथा / व्यक्तिचित्र 'मिळून सार्‍याजणी' मध्ये 'झुबेदा' या नावाने प्रसिध्द झालं आहे.
शिवाय २००५ साली 'अक्षरमुद्रा प्रकाशन' यांनी प्रकाशित केलेल्या माझ्या 'आई' या कथासंग्रहातही 'झुबेदा' याच नावाने समाविष्ठ आहे.
आभार.
--

गुलमोहर: 

झुबी आवडली खूप.

>>>एक छोटासा आजार, अन घरच्यांचे दुर्लक्ष यामूळे ती गेली.

Sad

सरोजिनी,
छान आहे तुमची झुबी..

आडकीत जाऊ, खिडकीत जाऊ
खिडकीत होते सफरचंद
गुलाबाईला मुलगा झाला
नाव ठेवा गोपीचंद..

अजून आवाज घुमतोच आहे कानांत.. छान होते ते दिवस.

सरोजिनी, ...त्या शिव्या, म्हणी किंवा वाक्प्रचार नव्हते, तर झुबेदाला समजलेला तो व्यवहार ........
किती खरं. तो अख्खा परिच्छेद अप्रतिम!

सुर्रेख व्यक्तिचित्रण, झुबी भेटलीच.

हो... फरच छान... गहिवरुन आल एकदम...

झुबेदा उभी केलीत डोळ्यासमोर... छान व्यक्तीचित्रण..

खुप छान लिहिलंय हे ...
****************************
Happy Blush Proud Lol Biggrin Rofl

मस्त लिहिलंय...

हुरहुर लावली तुमच्या झुबेदाने...

छाने गं मावशी. तुझा 'आई' कथासंग्रह तू मला दिल्या दिल्या तेव्हाच अधाशासारखा वाचला होता. प्रत्येक कथेतली स्त्री नायिका सुरेख रंगवलीस.
आणि आता तुझ्या लेटेस्ट कथा पोस्टत राहा. मी नाशिकला येताना आधी सांगीन. नवीन लिखाणही दाखवशील मला तेव्हा.
मायबोलीवर येत राहा.
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

अप्रतीम व्यक्तीचित्रण मावशी ( साजीराच्या मावशी म्हणजे आमच्याही मावशीच की तुम्ही ) Happy

खूप मस्त! सुरेख व्यक्तिचित्रण. झुबी अगदी समोर उभी राहिली.

झुबी आवडली... हुरहुर लावुन गेली:(

-प्रिन्सेस...

जगाच्या शाळेत शिकली होती तुमची झुबी !! तिचं सगळंच वेगळंच असणार!!! खुपच सुंदर!! गहिरी कथा आहे

खुप मनाला हूरहूर लावणारी कथा. अतिशय भावनापूर्ण अन तरीही बॅलन्स्ड ! खूप छान ! तुमचा कथा संग्रह वाचलाच पाहिजे. Happy

सरोजिनी,

झुबीचं इतकं छान व्यक्तीचित्र उभं केलयं की बस्स!
इतकी सुंदर कथा आमच्यासमोर आणल्याबद्दल धन्यवाद.

शरद

सरोजिनी,

झुबीचं इतकं छान व्यक्तीचित्र उभं केलयं की बस्स!
इतकी सुंदर कथा आमच्यासमोर आणल्याबद्दल धन्यवाद.

शरद