म्हातारपणीची प्रार्थना

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 November, 2010 - 07:04

काल ईमेलामधून इंग्रजी भाषेतील एक फार मार्मिक प्रार्थना वाचायला मिळाली. ''प्रेयर फॉर दि एजिंग''. खरे तर ती बर्‍यापैकी गंभीरपणे लिहिली गेली आहे. त्या प्रार्थनेत काही नर्म विनोदी छटा तर थोडासा उपरोधही जाणवला. असो.... ज्याचे त्याचे आकलन!! प्रार्थना असल्यामुळे ती ना धड काव्यप्रकारात मोडत आहे, ना गद्यात. पण तिचा आशय लक्षवेधक आहे. म्हातारपणीच्या किंवा वय वाढत जाईल तशा आढळत जाणार्‍या या स्वभावखुणा आणि त्यांची ह्या प्रार्थनेतून उमटलेली जाणीव मला आवडली. मूळ लेखक/ कवी माहीत नसल्यामुळे त्याचे/ तिचे नाव येथे देता येत नाहीए. त्या प्रार्थनेचा मी केलेला स्वैर भावानुवाद येथे देत आहे :

देवा तुला माहीत आहे
माझं वय वाढत आहे...

वायफळ बडबड करण्यातून
प्रत्येक विषयावर माझे मत नोंदविण्याच्या
घोर निष्फळ अट्टहासातून
वाचव रे आता मला बाबा!

प्रत्येकाचे आयुष्य सुधारण्यापासून
इतर लोकांच्या भानगडी निस्तरण्याच्या मोहातून
मला वाचव रे बाबा!

लांबलचक तपशीलवार गोष्टींचे
पाल्हाळ लावण्याच्या सवयीतून
माझं रक्षण कर रे बाबा!

फाफटपसारा न मांडता
थेट मुद्द्याचंच बोलायचं
बळ दे रे मला बाबा!

माझ्या तोंडून
माझ्या अनंत शरीर वेदना आणि दु:खांचं
अव्याहत रडगाणं सुरू झालं की...
माझे ओठ शिवून टाकायची व्यवस्था कर रे बाबा!

वर्षं उलटत आहेत तसतशी त्या वेदनांची व्याप्ती
आणि माझी त्यांच्याबद्दल बोलण्याची हौस....
दोन्हीही वाढतच चाललं आहे!
आणि माझं त्यांच्याविषयीचं प्रेमदेखील....

मलाही शिकव धडा
की कधी कधी...
माझंही चुकू शकतं!

मला विचारी बनव रे देवा, चोंबडा बनवू नकोस.
परोपकारी बनव, हुकूमशहा बनवू नकोस.

माझ्याकडील शहाणपणाची आणि अनुभवांची महाकाय पोतडी
वापरता न येणे म्हणजे कित्ती कित्ती वाईट!

पण काय करू रे देवा....

शेवटापर्यंत हवेत ना मलाही
कोणी तरी हक्काचे सखे साथी!

-- अरुंधती

मूळ प्रार्थना वाचायची असल्यास येथे वाचा.

गुलमोहर: 

आवडली कविता... आणि अनुवाद सुद्धा. Happy

चला, आजपासून मायबोलीवर लिहीणे बंद
झक्की जी.. Biggrin

झक्की Biggrin

दिनेशदा, मला वाटतं वय वाढत जाईल तशी प्रत्येकानेच ह्या प्रार्थनेला म्हणण्याची गरज आहे! Wink किमानपक्षी मी तरी अधुन मधुन ह्या प्रार्थनेला म्हणायचं ठरवलंय! Proud

प्रकाश१११, कैलास, झक्की, दिनेशदा... प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

हंसा, विकु, रेव्यु, रुणुझुणू.... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! Happy

म्हातारपणीची का म्हणता ? कायमच लक्षात ठेउन करायला पाहिजे अशी योग्य व सुंदर प्रार्थना वाटते ही.
शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

थँक्स स्मिता, रेशमसंदीप, शशांक, रैना.

शशांक, ही प्रार्थना कोणत्याही वयासाठी चांगलीच आहे. परंतु मूळ इंग्रजी प्रार्थना ही खास म्हातार्‍या लोकांसाठी किंवा वृध्दावस्थेकडे प्रवास करणार्‍यांसाठी असल्यामुळे तसे शीर्षक. Happy