कृपया नोंद घ्यावी- इतरत्र प्रकाशित...
प्रकाश आणि दिव्याला हिंदूप्रमाणेच अन्य संस्कृतींमध्येही अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. मुंबईत राहणाऱ्या बेने इस्रयली (ज्यू), पारशी आणि चिनी समाजालाही दिव्यांचं, प्रकाशाचं तितकंच महत्त्व वाटतं.. कधी काळी परदेशातून इथे आलेल्या आणि मग इथल्या संस्कृतीचा भाग बनलेल्या या समूहांना आपापल्या प्रकाश-सणांसोबत दिवाळीचंही अप्रूप वाटतंच!
दीपोत्सवाऐवजी कंदिलोत्सव!
चिनी संस्कृतीत वसंत ऋतूला खूप महत्त्व आहे. शिवाय चिनी कॅलेंडर लूनार म्हणजे चंद्रमहिन्यांवर आधारित आहे. चिनी वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी कंदिलोत्सव साजरा केला जातो तो याचसाठी. या पहिल्या महिन्याला युआन तर पूर्वीच्या काळी रात्रीला झिओ असं म्हटलं जायचं. त्यामुळे या महोत्सवाला ‘युआन झिओ’ असं म्हटलं जातं. नवीन वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेचा चंद्र आकाशात असताना चिनी समाजानं त्याचं स्वागत म्हणून लाखो कंदील आपल्या घरांसमोर लावावेत, असा संकेत आहे. आमच्याकडे या वसंतोत्सवाला दिवाळीइतकंच महत्त्व असतं. या महोत्सवात निरनिराळ्या आकारांचे, रंगांचे कंदील लावले जातात. या कंदिलांवर कोडीही असतात, तीसुद्धा सोडवली जातात. खूप आतषबाजी केली जाते. फटाके फोडले जातात. हा महोत्सव अक्षरश: डोळे दिपवणारा असतो. प्रत्येक चिनी वर्ष हे एका विशिष्ट प्राण्याचं आहे, असं मानलं जातं. या दिवशी आम्ही ‘गॉन्ग सी फा काय’ (हॅप्पी न्यू इयर) असं म्हणून शुभेच्छा देतो.
आमचा चिनी समाज हा काही अग्नीपूजक नाही. चीनच्या काही भागातला समाज आगीला ऊर्जेचं प्रतीक मानतो. त्यामुळे हा समाज अग्निपूजक आहे हे खरं. पण एरवी आमच्याकडे अग्नीचं फारसं महत्त्व नाही. प्रकाशाला आणि दिव्याला तसंच आतषबाजीला मात्र खूप महत्त्व आहे. आमच्या दिवसाची सुरुवात मेणबत्ती लावल्याशिवाय होत नाही. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवळात जाऊन आम्ही मेणबत्ती आणि अगरबत्ती लावतो. शिवाय तिथे लाल, पांढरे, पिवळे कागद जाळले जातात. या कागदांना विशेष महत्त्व आहे. तुम्ही जितके कागद जाळाल तितकी तुमची र्वष सुखात जातात असं मानलं जातं. या वेळी उत्तम आर्थिक परिस्थिती, शांततापूर्ण आयुष्य आणि सुखासाठी प्रार्थना केली जाते. शिवाय या दिवशी देवळात जाऊन देवाला काही वस्तू भेटस्वरूपात देण्याचीही प्रथा आहे.
एरवी चीनमध्ये दिव्याची पूजा केली जात नाही. भारतात आल्यानंतर मात्र दिवाळीला आम्ही खूप धमाल करतो. या दिवसांत आमच्या भारतीय मित्रांकडे आवर्जून जातो. भेटवस्तू देतो, रांगोळीने आमचीही दारं सुशोभित होतात आणि फटाकेही फुटतात.
- झॅन मिन्ह (चिनी वाणिज्य दूतावासातील सांस्कृतिक विभाग प्रमुख)
नऊ ज्योतींचा हानुक्का
दिवाळीसारखाच ‘हानुक्का’ हा आमचा दिव्यांचा सण. सर्वसाधारणपणे डिसेंबरमध्ये येणाऱ्या या उत्सवात आम्ही एका विशिष्ट पद्धतीने ‘संमश’ आणि आठ दिवे लावतो. संमश म्हणजे एक महत्त्वाचा दिवा. हा दिवा इतर सर्व दिव्यांचं रक्षण करतो. त्यानंतर आठ दिवस रोज लिखाणाच्या हिब्रु पद्धतीनं म्हणजे उजवीकडून डावीकडे एक दिवा अशा क्रमानं लावले जातात. आठव्या दिवशी असे नऊ दिवे लावले जातात. ज्यू समाजाची ओळख पटवणारा एक तारा आणि त्याखाली विशिष्ट पद्धतीनं या नऊ दिव्यांची रचना असलेला स्टॅण्ड या दिवसांमध्ये वापरला जातो. काचेच्या ग्लासमध्ये एक भाग पाणी आणि दोन भाग खोबरेल तेल अशा पद्धतीनं ठेवून त्यात काडीला कापूस गुंडाळून त्याची वात ठेवली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यूंचा दिवस आदल्या रात्रीपासून ते दुस-या रात्रीपर्यंत असा असतो. त्यामुळे पहिल्या रात्री लावलेला दिवा दुस-या रात्रीपर्यंत तेवत ठेवला जातो. दुस-या रात्री त्या दिव्यासह तिसराही दिवा लावला जातो. इ. स. पूर्व दुस-या शतकात ज्यूंवर सेलेयुसिड साम्राज्यानं अनन्वित अत्याचार केले. आमच्या धर्मात ऑलिव्ह तेलाला खूप महत्त्व आहे. ते अत्यंत शुद्ध मानलं जातं. परंतु ग्रीक राजा एन्टिओचस यानं हे तेल अशुद्ध केलं आणि एकच दिवस पुरेल एवढं तेल शिल्लक राहिलं. नव्यानं तेल काढायला आठ दिवस लागणार होतं. तेव्हा लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना केली आणि एका दिवसाच्या तेलावर तो दिवा आठ दिवस तेवत राहिला. त्यानंतर ज्यूंनी पुन्हा एकत्र येऊन जेरुसलेमवर विजय प्राप्त केला. या घटनेचा संदर्भ या प्रथेमागे आहे.
ईश्वरानं सहा दिवसांत सृष्टीची निर्मिती केली आणि सातव्या दिवशी आराम केला, असं आम्ही मानतो. त्यामुळे सहा दिवस काम करून शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी रात्रीपर्यंत आम्ही काहीही काम करत नाही. आमच्याकडे शनिवारी तर गॅसही पेटवला जात नाही. त्या दोन दिवसांत आम्ही तीन दिवे लावतो. त्यातले दोन दिवे शुक्रवारी दिवस ढळण्यापूर्वी लावले जातात आणि तिसरा दिवा शनिवारी संध्याकाळी लावला जातो.
भारतीय सण शेतीशी संबंधित आहेत. तसंच आमचाही ‘सुक्कोथ’ नावाचा एक सण आहे. या सणादरम्यान आठ दिवस मांडव घालून त्यात निरनिराळी फळं ठेवली जातात. या फळांच्या सुगीचा सण म्हणून सुक्कोथ साजरा केला जातो. त्यातही दिवा महत्त्वाचा आहेच. आमच्या अधिक महिन्यात योमकिप्पूर (पश्चात्तापाचा दिवस), सिम्हातोरा (ज्यूंना पवित्र शास्त्र मिळालं तो दिवस), पूरिम (होळी), पेसाह, शाव्वत हे सण साजरे केले जातात. याही सणांदरम्यान दिव्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. इतक्या पिढय़ा भारतातच राहिल्यामुळे, भारतीय समाजाप्रमाणे आम्ही इथे दिवाळीसुद्धा साजरी करतो. आम्ही कंदील लावतो, फटाके फोडतो, मिठाईही आणली जाते. दिवाळी साजरी केली नाही तर आम्हाला समाधान वाटत नाही.
- इस्र मोझेस (ठाणे येथील शार हाशमेम सिनेगॉगचे विश्वस्त)
अग्निपूजकांची ‘अताश’बाजी!
कोणतीही गोष्ट- मग ती चांगली असो वा वाईट, आगीत टाकली तर तिची राख होते आणि ती शुद्ध होते, असं आम्ही मानतो. पारसी समाज हा पर्शियातून आलेला. तिथे थंडी प्रचंड असल्यानं आगीचं आणि प्रकाशाचं महत्त्व खूप आहे. आगीमुळे प्रकाश मिळतो आणि ऊबही. शिवाय आग कधीही खालच्या दिशेला जात नाही, ती वरच जाते. त्यामुळे ते प्रगतीचं प्रतीकही आहे. प्रत्येक पारसी घरात तुम्हाला एक ना एक दिवा दिसेलच. राजा झरतुष्ट्र यानं ही आग निरनिराळ्या १८ वस्तूंच्या माध्यमातून तयार करण्यात यावी, असं सांगितलं आहे. पारसी देवळात ज्याला आपण अग्यारी किंवा ‘अताश आद्रान’ असं म्हणतो तिथं चंदनाचं लाकूड जळत ठेवणं अत्यावश्यक आहे. लग्नातही पारसी वधूनं हातात दिवा घेऊन यावं, अशी प्रथा आहे. शिवाय लग्नाच्या ठिकाणीही एक दिवा जळत ठेवला जातो. वधू लग्नस्थळी येते तेव्हा तिची आई आपल्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी चांदीचं नाणं दिव्यावर धरते. ‘आतिस्किनियाश’ या सणादरम्यान आम्हाला आठ दिवस स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावं लागतं आणि तिथे दिवा लावावा लागतो. आम्ही देवळात जातो तेव्हाही आम्हाला ‘सुख्खड’ (चंदनाची ज्योत) जाळावी लागते.
पारसी समुदायाच्या मोठय़ा देवळांना ‘अताश बेराम’ (मोठी आग) असं म्हटलं जातं तर छोटय़ा देवळांना ‘अताश आद्रान’ म्हणतात. भारतात मोठी अशी पाच अग्निमंदिरं आहेत. ही आग कधीही विझू दिली जात नाही. शिवाय एखाद्या ठिकाणी देवळाची काळजी घेणारं कुणी नसेल तर ती आग तेथून मिरवणुकीनं जिथं गरज असेल तिथं नेली जाते. ही आग रात्रीच्या वेळी झाकून आणली जाते कारण पारसी व्यक्तींशिवाय दुस-या कुणाच्याही दृष्टीस ती पडू नये, असा संकेत आहे. 2002 साली नवसारी येथून नेपीयन्सी रोड इथं ही आग आणण्यात आली होती. त्या वेळी धर्मगुरूच्या गाडीतून झाकून ती आणली गेली. त्याआधी रस्ते धुतले गेले होते, मोठी मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यापूर्वी एडन इथून लोणावळ्यात विशेष विमानाने एक आग आणली गेली. त्यासाठी रतन टाटा यांनी विमान बुक केलं होतं. विमानात पायलटपासून सर्वचजण पारसी होते. पारसी समाज गेली अनेक वर्ष भारतात राहतोय. त्यांनी इथलं सर्वकाही घेतलंय. तसंच दिवाळीही. यंदा आम्ही आमच्या इमारतीत दिवाळीची रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी माझी सून शरनाझ खूप मेहनत घेते आहे.
- नीना मिस्त्री (गृहिणी)
छान लेख कोमल. ज्यू आणि पारशी,
छान लेख कोमल. ज्यू आणि पारशी, दोन्ही समाजातले मित्र आहेत मला.
सुंदर लेख लिहीला आहेस गं,
सुंदर लेख लिहीला आहेस गं, जेवढा effort घेतलास त्या लोकांपर्यंत पोहचण्याचा तो जाणवतो आहे.
माहितीपुर्ण लेख, प्रकाशाचा उत्सव असाच असतो.
छान लेख!
छान लेख!
छान लेख,बरीच माहिती मिळाली.
छान लेख,बरीच माहिती मिळाली.
कोणतीही गोष्ट- मग ती चांगली
कोणतीही गोष्ट- मग ती चांगली असो वा वाईट, आगीत टाकली तर तिची राख होते आणि ती शुद्ध होते, असं आम्ही मानतो.
हेच ब्रोबर आहे
छान वाटला लेख
मस्त लेख कोमल
मस्त लेख कोमल
छान संकलन. चीनी, ज्यू, पारशी
छान संकलन. चीनी, ज्यू, पारशी … समान धागा.
सध्या पारशी समाजाच्या प्रथापरंपरांवर वाचतो- लिहितो आहे, म्हणून हे वाचनात आले.
.. एडन इथून लोणावळ्यात विशेष विमानाने एक आग आणली गेली….
हे मात्र नाही समजले. विमानात आग ? त्याला बंदी असते ना ?