|
Neela
| |
| Tuesday, November 27, 2007 - 12:57 pm: |
|
|
संध्याकाळची हुरहुर लावणारी वेळ.. रिकामपण असेल तर मनात अशा वेळी हमखास कातर आठवणी जाग्या होतात. शांता शेळके यांच्या कोमल हळवी उदास झाली मावळतीची किरणे आतआतूनी दाटुन आली विस्मृत काही स्मरणे.. या ओळी आठवल्या. आज तर अचानक मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्या मेसेज पाठविणा-या व्यक्तिचे नाव पाहून ती अजूनच हळवी झाली.. मन थेट दहा वर्ष मागे गेले.. डोळ्यात आनंदाची फ़ुलपाखरे घेऊन ती अल्लडपणे नाचतच घरी आली. शनिवार रविवार शाळेला सुट्टी .. थोडा गृहपाठ संपवला की टीव्ही बघायला, लायब्ररीतील पुस्तक वाचायला ती मोकळी होणार होती.. आल्या आल्या आई रागावली.. “अगं गधडे.. आता तू लहान आहेस का? नववीत गेलीस तरी नाचानाच थांबत नाही तुझी..!” ती काहीच बोलली नाही. तितक्यात टेबलाजवळ खुर्ची ओढून मटारचे दाणे सोलणारा इंद्रनील तिला दिसला. इंदरदादा आला की नेहमीच त्याच्या आत्याला म्हणजे तिच्या आईला मदत करायचा. आई त्याच्याशी माहेरचा माणूस म्हणून गप्पा मारण्यात रमून जायची. तो लहान असल्यापासून मोठ्या भावाचा मुलगा.. असे ममत्वाचे, जिव्हाळ्याचे नाते आईचे त्याच्याशी जडलेले तिला जाणवायचे. आत्तादेखील आता नेहमीप्रमाणे मटारची उसळ न करता ’सामोसे’ करायची स्पेशल फ़र्माईश इंद्राने आत्याला केलीच होती. आणि सामोसे हवे असतील तर मुकाट्याने मटार सोलायचा त्याला हुकूम मिळाला होता. झाले..आईला आता दोन दिवस तिच्याकडे लक्ष द्यायला फ़ार वेळ मिळणार नव्हता.. बाबा शनिवार रविवारी फ़क्त यायचे.. त्यांनाही या रविवारी यायला जमणार नव्हते.. तिच्या भावविश्वातील कार्यक्रमांना काहीही अडथळा नव्हता. आता पटापट अभ्यास संपवून मस्तपॆकी आवडती गाणी ऎकत.. कांदबरी घेऊन स्वत:च्या कोशात शिरणे फ़ार सोपे झाले होते.. सोपस्कार म्हणून जेवणाच्या टेबलावर ती आई व इंदरदादाबरोबर जेवायला बसली. नेहमी ती त्यांच्या ’नातेवाईकांच्या’ गप्पात नसेच. पण अचानक रेडिओवर ’चुपके चुपके’ ऎकू आली.. आणि दादा म्हणाला.. “अरे वा.. हा तर गुलाम अली”.. ती तिला नव्यानेच प्राप्त झालेले ज्ञान प्रकट करत म्हणाली ’हे तर निकाह या सिनेमातील गाणे आहे. मला फ़ार आवडते’. मग इंदरदादाने तिला गुलाम अली हा कसा एक गजल गायक आहे.. ही त्याची लोकप्रिय गजल आहे.. म्हणून सिनेमात घेतली आहे.. इ.इ. तपशील पुरवले.. तसेच त्या रेकॉर्डमधे नसलेले दोन शेर अर्थांसहित उलगडून दाखविले.. जेवणाच्या टेबलावर मग स्वत:ला नव्याने आवडायला लागलेला एक क्रिकेटवीर..त्याचे पोस्टर.. नव्याने प्रदर्शित झालेला एक ’लव्हस्टोरी’ असलेला सिनेमा. त्यातला नवोदित हिरो.. आवडत्या कविता.. पुस्तके.. मनाला अचानक आवडायला लागलेल्या आर्ट फ़िल्मस.. हे सगळे इंदरदादाशी किती बोलू अन किती नको असे तिला होऊन गेले.. त्या सगळ्यातली त्याला किती माहिती आहे हे जाणवून ती स्तिमितच झाली. दोन दिवस स्वत:च्या विश्वात घालविण्याचा निर्धार कुठल्या कुठे पळून गेला. आणि इंदर पण त्याच्या मावशीकडे जायचा होता तो न जाता त्यांच्याकडेच थांबला. रात्री पण ब-याचवेळ त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मग रात्री बारा वाजता कॉफ़ीचा एक राऊंड झाला… परत गप्पा.. पहाटे कधीतरी ती भारावलेल्या मनाने झोपी गेली. रविवारची सकाळ एकदम सुंदर उजाडली. बागेतील जुईच्या फ़ुलांचा गजरा आपल्या लांबसडक वेणीवर माळून व नव्यानेच शिवलेला एक चुडीदार घालून ती तयार झाली. दादाच्या एका हॉस्टेलवर रहाणा-या मॆत्रिणीला भेटायचे ठरले होते. मग काय .. तिला हॉस्टेलपर्यंतचा रस्ता चांदण्यांच्या पायवाटेसारखा भासला. त्याच्या मॆत्रिणीला भेटणे, हॉटेलमध्ये जाणे, दादाने स्वत:च्या मॆत्रिणीला हिची ’हुशार आहे हं अगदी’ अशी करून दिलेली ओळख.. सगळे काही तिला सुगंधी, हळव्या स्वप्नांसारखे भासत होते. दोन दिवस आलेला इंदर तिच्या आयुष्यात एक अनोखे दालन उघडून त्याच्या नोकरीच्या गावी निघून गेला. मग तिला काही दिवस एकदम सुने सुने वाटले. मॆत्रिणींना त्याच्याबद्दल सांगून झाले होते. दहा बारा दिवसात मग एक नवल घडले. आईला आलेल्या इंदरच्या पत्राच्या पाकीटात एक पत्र तिच्यासाठीही होते. त्याने इतर गोष्टींबरोबरच स्वत:ची एक कविता लिहून पाठवली होती. नोकरीला लागल्यापासून कविता करणे विसरलो होतो पण ’तिच्याशी’ गप्पा झाल्याने परत कविता स्फ़ुरल्याचा आवर्जून उल्लेख त्यात होता. पत्ररूपाने त्याच्याशी संवाद साधणे त्यानंतर सुरू झाले.. त्याच्या पत्रातल्या ’बूर्ज्वा’ या शब्दाचा अर्थ तिला कळलाच नाही. तेव्हा मग त्या एका ’शब्दावर’ त्याचे चार पानी लांबलचक उत्तर आले. शाळा, अभ्यास, परीक्षा यात दिवस आनंदाने जात होते. आणि त्या आनंदात या पत्रांच्या संवादाची भर पडत होती. त्याला पत्रात लिहीण्यासाठी कविता जमवणे (कधीतरी स्वत: लिहिणे) चालू झाले.. एखादे पुस्तक ..चित्रपट आवडला की त्याच्याबरोबर ’शेअर करायला हवे’ हे आपोआप मनात यायचे. इंदर दिवाळीत, मे महिन्याच्या सुट्टीत येत राहिला .तो असायचा तेवढे चार पाच दिवस नुसती धमाल असायची. एका सुट्टीत तो आला आणि एका सिनेमाची तिकीटे काढली आहेत असा फ़ोन आला. ती तिच्या मावसबहिणीसोबत थिएटरवर पोहोचली तोपर्यंत जरा उशीरच झाला होता.. इंदर सहज म्हणाला.. “आली नसतीस तर तिकीटे फ़ाडून टाकणार होतो”… ती पाहातच राहिली. आता अकरावीत.. कॉलेजमध्ये नुकतीच गेलेली ती.. इंदरबरोबर एक लोभस नाते तयार होत होते. कॉलेजमध्ये तिला इतरही मित्रमॆत्रिणी मिळाले होते. पण या नात्यात जास्त आनंद होता. इंदरच्या बहिणीचे लग्न झाल्यापासून त्याच्या लग्नाचाही नातेवाईकांनी धोषा लावला होता. तीही त्याच्यात सामील झाली.. त्याला त्याच्या हॉस्टेलवरच्या मॆत्रिणीवरुन चिडवून झाले. मग एकदा लग्न व लग्नसंस्था यावर त्याच्याशी बोलणे हे ओघाने आलेच. कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या दिवाळीच्या सुट्टीत इंदर आला. त्याने मुलगी पसंत केल्याची बातमी तिला मावसबहीणीकडून कळली होतीच. त्याचे मधल्या काळात पत्रही नव्हते.. त्याच्यावर ’मला का सांगितले नाहीस सर्वांच्या आधी’ असे रूसण्याचे मनात पक्के झाले होते. पण यावेळेला तिच्या एकटीशी इंदर बोललाच नाही. जो काही आला तो माणसांच्या गराड्यात.. आईला ती म्हणालीसुध्दा ’नेहमी तर पत्र पाठवतो मला.. मग ही आयुष्यातील महत्त्वाची बातमी का नाही कळवली. मी रागावले आहे त्याच्यावर’.. त्यावर शांतपणे आई म्हणाली ’अगं गडबडीत राहून गेलं असेल’.. ’मला’ सांगायला गडबडीत राहून गेलं.. डोळे नकळत पाण्याने भरले.. त्यानंतर एका नातेवाईकांकडे इंदर भेटला. बाहेर पडताना ते दोघेच बाहेर पडले. तो गप्पगप्पच होता. तो काहीतरी सांगेल अशी काही क्षण वाट बघून तिनेच न राहवून विचारले.. ’कशी आहे मुलगी… नाव काय आहे ? फ़ोटो तरी दाखव’.. मला तुझ्या लग्नाची साडीच घे बरं का” .. त्यावरही जुजबी उत्तरे देऊन त्याने विषय बदलला. तिचे कॉलेज कसे चालले आहे हे आवर्जून विचारले. खूप ठाम स्वरात म्हणाला.. नीट शिक.. तू फ़ार हुशार आहेस. मनात आणलंस तर कुठल्या कुठे जाशील. बोलता बोलताच त्याने एक रिक्षा थांबवली आणि तिला त्यात बसवून देऊन रिक्षावाल्याला पत्ता सांगितला.. तिच्या तोंडून तर शब्दच फ़ुटेना.. त्याला तिची पर्वा नाही म्हणावे तर त्याचे आत्ताचे शब्द काळजीतून आलेले होते.. मग लग्नाच्या बाबतीत का विषय टाळत होता तो ? घरी परतताना तर नुकताच घडलेला प्रसंग खरा आहे असे वाटतच नव्हते.. मग कित्येक दिवस आणि रात्री ’तो असा का वागला ?’ याच विचारात गेल्या. लग्नाचे रीतसर निमंत्रण आले. आईने किती आग्रह केला तरी परीक्षा, अभ्यास याची कारणे सांगून तिने जाणे टाळले. तिचे शिक्षण पूर्ण झाले. नोकरी मिळाली..लग्न झाले.. मनासारखा जोडीदार लाभला. हळूहळू इंदर शेवटी जाताना असे का वागला हा प्रश्न मनाआड गेला.. आणि आज त्याच्या अचानक आलेल्या मेसेजने तो सल परत बोचायला लागला.
|
नीला, जोरदार सुरुवात आहे! पुढचा भाग लवकरच टाक वाट पहातेय.
|
Gsumit
| |
| Tuesday, November 27, 2007 - 6:36 pm: |
|
|
मला तर वाटलं ह्या दोघांचच जमतय आता...
|
Akhi
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:27 am: |
|
|
नीला खुप छान!! आणि तिचे भावविश्व पण छान रेखाटल आहे.
|
Anaghavn
| |
| Wednesday, November 28, 2007 - 9:11 am: |
|
|
नीला, खुपच छन आहे. पण आता पुन्हा एकदा "पुन्हा कधी" चा धोशा सुरु करतेय. अनघा
|
नीला, खरचं ग, खुप छान आहे.पुढचा भाग लवकर पोस्ट कर
|
Anaghavn
| |
| Saturday, December 01, 2007 - 8:07 am: |
|
|
कुठे हरवलीस गं नीला? पोस्ट नं लवकर अनघा
|
Neela
| |
| Monday, December 03, 2007 - 12:31 pm: |
|
|
सल (2) आज अचानक ’त्या’ मेसेजने सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मनाच्या तळाशी काहीतरी खोलवर जाऊन दडलेले असते. इंदर त्याच्या ऑफ़िसच्या कामासाठी तिच्या शहरात येणार होता. भेटता येईल का? असा मेसेज होता. त्यांचे नाते पहाता त्याला घरी रहायलाच बोलविणे तिला आवडले असते. पण मधल्या काळात एक दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे एक दिवस संध्याकाळचे ’जेवायला ये’ असे निमंत्रण देऊन तिने त्याक्षणी मनातले विचार थांबविले. ठरल्यादिवशी, ठरलेल्या वेळेला घरातील सर्वांसाठी रीतसर भेटवस्तू घेऊन इंदर आला. . सूपपासून स्वीट डिशपर्यंत नीट जेवण झाले. सुपारी झाली. जेवताना नवीन पुस्तके, चित्रपट, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम या विषयावर चर्चा झाल्या. कोणे एके काळी इंदरला किती माहिती असते याचे तिला किती आकर्षण वाटले होते. आता तिलाही त्या सगळ्या विषयांमध्ये माहिती होतीच.. हरवला होता तो संवादातील सहजपणा. संवादात मोकळेपणा, दुस-याशी शेअर करण्याची वृत्ती असणे आणि छाप पाडण्यासाठी माहितीचे प्रदर्शन करणे वेगळे असते. .. त्यामुळे इंदर उगाचच छाप पाडण्यासाठी ते सगळे संवाद वाढवतो आहे असे वाटले. तिने मनाशी परत विचार केला. पूर्वग्रह मनात धरुन बघत होती का ती या सगळ्याकडे ? तिची हुशारी मनमोकळेपणाने कबूल करणारा इंदर आता तिच्यावर कुरघोडी करण्यासाठी बोलत होता. मूळ विषय बाजूला राहून ’मला किती माहिती आहे’ हेच सारखे त्यातून प्रकट होत होते. बोलता बोलता रात्र अंधारली. घरातल्या सगळ्यांचा ऒपचारिक निरोप घेणे झाले. त्याला सोडण्यासाठी म्हणून ती बंगल्याच्या फ़ाटकापर्यंत आली. जुईचा गंध आवडणारी तिच्यातली ’ती’ तशीच होती. आणि अचानक तिला जाणीव झाली.. की पाऊस पडतो आहे. घरात बसून ते कळलेच नव्ह्ते. नाजूकसे थेंब पडत होते. जुईच्या पाकळ्यांवर अलगद पाऊस थरथरत होता. बागेतल्या दिव्याच्या प्रकाशवलयात पावसाचा शिडकावा दिसत होता. मनाला सुगंधित करणा-या त्या वातावरणात ती अजूनच हळवी झाली. अनेक वर्षापूर्वी इंदर अचानक का सोडून गेला ते तो सांगेल.. त्याने ते सांगावे अशी अपेक्षा तिच्या मनात आली. त्या विचाराने ती विलक्षण चकित झाली. मनाच्या कप्प्यात ’तो अचानक गेला’ हा सल .. व त्याचबरोबर एकदा कधीतरी त्याने त्याचे कारण सांगावे ही अपेक्षा हातात हात घालून होती याची एखाद्या साक्षात्कारासारखी तिला जाणीव झाली. स्वत:च्या मनाला आपण पूर्ण ओळखतो असे तिला नेहमी वाटे.. आज लक्षात आले की.. नात्यातले अनेक धागे, पीळ, गुंफ़ण आपल्या मनातील अदृश्य पातळीवर असतात. हा सगळा मॆलोगणती प्रवास तिच्या मनाने काही सेकंदात केला. त्याला मात्र ते कळलेही नाही. इतकी वर्षे तिने बाळगलेली वेदना त्याच्या खिजगणतीतही नव्ह्ती. ऑफ़िसच्या ज्या कामासाठी तो आला होता त्याबद्दल तो आत्मीयतेने बोलत होता. त्यातही तिला उगाचच वाटून गेले की तो स्वत:चे काम, पंचतारांकित हॉटेलातील वास्तव्य याचे प्रदर्शन करतो आहे. परदेशात जाण्याच्या संधीचा आवर्जून उल्लेख त्यात होता. तिने व तिच्या नव-याने स्वखुषीने परदेशातील मानाच्या संधी सोडून भारतात राहणे स्वीकारले होते. तिचे १०-१२ देश बघून झाले होते.. ते इंदरला खुपते आहे म्हणून परदेशात जाण्याच्या संधीचा उल्लेख होतो आहे का? “उगीचच असाच विचार करू नकोस.. “ स्वत:च्या मनानेच तिला फ़टकारले. “परत भेटू.. “ इंदर जाताना म्हणाला. त्याच्या घरी यायचे आमंत्रण त्याने दिले नाही हा विचार तिच्या मनात अकारण चमकून गेला. इंदर ’त्यावेळी’ असा का वागला हे कधीतरी परत भेटला की सांगेल ही आशा बाळगणे जास्त सोपे होते. आपण आपल्या जवळच्या माणसाकडून केलेली अपेक्षा त्याला समजली नाही हा नवीन सल मात्र आता कायमचा सोबती होता. समाप्त..
|
Shyamli
| |
| Monday, December 03, 2007 - 6:59 pm: |
|
|
समोरच्या माणसाला अपेक्षा बोलल्याशिवाय कश्या कळतील अग, इथेच तर सगळ मूळ असतं की, आवडली कथा
|
Daad
| |
| Monday, December 03, 2007 - 9:53 pm: |
|
|
नीला, अतिशय वेगळा विषय... नीटस, आटोपशीर मांडणी.... तुझी कथा खूप आवडली. एखाद्या नात्यात आपल्यबाजूने वीण अगदी perfect दिसत असते. दुसर्याबाजूने टाका उसवला गेला... का गेला... हा सल आयुष्यभर साथ करतो..... अगदी अगदी जवळ जवळ प्रत्येकाचा एकदा तरी हा अनुभव असतोच. ***मनाच्या कप्प्यात ’तो अचानक गेला’ हा सल .. व त्याचबरोबर एकदा कधीतरी त्याने त्याचे कारण सांगावे ही अपेक्षा हातात हात घालून होती याची एखाद्या साक्षात्कारासारखी तिला जाणीव झाली. *** नेमक्या शब्दात किती सुंदर मांडलयस... छानच. आणि शेवटचं वाक्य व्वा!
|
Manuswini
| |
| Tuesday, December 04, 2007 - 1:40 am: |
|
|
कधी कधी ती व्याक्ती जवळची असूनही, आणि समोर असूनही नीट काही भावना व्याक्तच करता येत नाही; अगदी दहा दहा वेळा शब्द मनात घोळवून मनातच रहातात नी काही वेगळेच बाहेर पडते समोर असताना. strange though..
|
नीला सुरेख गोष्ट. जुन्या बंगाली कादंबरीसारखा वाटला फ्लो. मनांची गुंतागुंत इतक्या स्पष्टपणे शब्दांत मांडता येणे हे "त्या" चे देणे. लिहीत रहा.
|
Anaghavn
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:11 am: |
|
|
छान लिहितेस.खूप आवडलं. अनघा
|
Radha_t
| |
| Tuesday, December 04, 2007 - 9:11 am: |
|
|
सुंदर, अप्रतिम, गोंडस, हळवी,..
|
Me mazya adhichya anubhawashi hya kathela "relate" karu shakalo. Sanwadat yenar badal manatalya vichara dware chaan tipla gela ahe....KAtha awadali.
|
Neela
| |
| Tuesday, December 04, 2007 - 11:58 am: |
|
|
सर्वाना धन्यवाद.. आजपर्यंत मी अनुवाद केले आहेत. ऑर्कुटवर ललित लेखन केले आहे. पण कथा लिहिली नव्ह्ती. ही कथादेखील 'आता आपण एक कथा लिहू' असे म्हणून लिहिली नाही. ती समोर उभीच राहिली. मनात ती कोणाला आवडेल का? अशी धाकधूक खूप होती. त्यामुळे तुम्हा सर्वाचे अभिप्राय वाचून फ़ार आनन्द झाला.
|
|
|