|
Dineshvs
| |
| Sunday, October 28, 2007 - 3:22 pm: |
| 
|
बट बॉस मला रविवारी कुठल्याही परिस्थितीत घरी असायला हवे. यु नो ईट, मी शेवटचे सांगून बघितले. येस, माय बॉय, मला माहित आहे. पण हा आपला क्लायंट पण इम्पॉर्टंट आहे. बॉसने मला समजावायचा प्रयत्न केला. तो नेहमीचा प्रॉब्लेम असणार, मी फोनवरुनही सॉल्व्ह करु शकेन, मी सांगुन बघितले. व्हाय यु, ईव्हन आय कॅन डु दॅट. पण त्यानी रिक्वेस्ट केलीय. शिवाय त्या ग्रुपची मोठी ऑर्डर मिळणार आहे. दे आर गोईंग तो सेट अप अ स्टार प्रॉपर्टी, देअर, सो माय बॉय, यु हॅव नो चॉईस, बॉस मानणारा नव्हताच. पण माझी गाडी, आताच सर्व्हीसींगला देऊन आलोय. सेकंड सर्व्हीस ड्यु होती. आणि मी कधी चिपळुण बघितलेही नाही. मी निर्वाणीचे सांगुन बघितले. टेक माय स्विफ़्ट. ड्रॉप मी होम देन यु कॅन टेक इट. अगदी अर्ली मॉर्निंगला निघालास तरी बाय नून पोचशील तिथे. आय नो, ईट वोंट टेक मच टाईम. देन यु कॅन पार्टी आणि सन्डेला परत सकाळी निघालास तर, फ़ंक्शनला आरामात पोचशील. जस्ट टेक एन एच १७, फ़्रॉम कळंबोलि, व्हेन यु रीच थेअर, कॉल दॅट मिस्टर ढेरे, हि विल गाईड यु. आय हॅव स्पोकन टु हिम ऑलरेडी. बॉसने असे सगळे परस्पर ठरवुन टाकल्यावर, मी काय करु शकणार होतो ? आईबाबाना समजावणे जरा अवघड होते. वेळेवर येतो सांगुन अगदी पहाटेच निघालो. कळंबोलीपासुन हायवेला लागलो. खरे तर बॉसचा खुप राग आला होता. हि नोज, तरीपण मलाच पिटाळला त्याने. ईतर दिवशी मी कम्प्लेन केली नसती, पण आज. जाऊ दे. आय होप तो नेहमीचाच प्रॉब्लेम असणार. हा रोड मला नविन होता, पण हायवे होता. त्यामुळे चुकण्याचा प्रश्न नव्हता. पुढेपुढे ट्राफ़िकपण अजिबात नव्हते. द होल रोड वॉज जस्ट फ़ॉर मी. दोनचार दिवसात पाऊस सुरु होणार बहुतेक. ढग होते, रस्ता ओला होता, पण आता पाऊस नव्हता. वाटेत कॉफ़ीसाठी थांबलो. आई म्हणत होती, डबा करुन देते. मीच म्हणालो, फक्त सॅंडविच करुन घेतो. पुण्याला जाताना कसा हक्काचा फ़ुड मॉल आहे, या रोडवरचे काहि माहित नव्हते. वाटेतली गावे पण मजेशीर होती. स्पेलिंगवरुन पेन वाटले ते पेण होते. माझे डेस्टिनेशन चिपलूण. काय असेल त्याचा अर्थ ? चिप्स तयार करत असावेत तिथे बहुतेक पुर्वी. एका गाव तर चक्क, दिवानखवटी नावाचे. कसले हॉरिबल नाव !! . पण रोड मस्त होता. चार वाजताच पोहोचलो. ढेर्या वाटला तेवढा म्हातारा नव्हता. खरे तर त्याला म्हणालो कि, मॅन्युअल नीट वाचले असते तर अगदी मायनर फ़ॉल्ट होता. तर म्हणाला, कि या निमित्ताने तूम्ही आलात तरी. तरीपण परत सेटप करायला बराच वेळ गेला. सहा वाजले. त्या लोकानी डिनर अरेंज करुन ठेवले होते. नको म्हणत होतो, तरी थांबावेच लागले. बॉसला मुद्दाम फ़ोन करुन सांगितले, कि नेहमीचा फ़ॉल्ट होता. आणि म्हणालो कि मी आताच परत निघतोय. तो म्हणाला, कि आता निघु नकोस, टेक रेस्ट आणि उद्या सकाळी निघ, मी म्हणालो, सगळी तयारी करायची आहे, मला आता निघायलाच पाहिजे. बॅटरी लो आहे सांगत, मोबाईल ऑफ़ करुन टाकला. ढेरे पण म्हणत होता. रात्री निघु नका, अगदी पहाटे निघालात तर दुपारच्या आतच पोहोचाल. मी म्हणालो हळुहळु जातो, पण निघालेच पाहिजे. त्याने काजु वैगरेची पॅकेट्स दिली. मग म्हणाला जरा वर घाटात जाऊन देऊळ बघुन घ्या. तिथे थोडा वेळ गेलो, पण लगेच परत फ़िरलो, तरी निघेपर्यंत दहा वाजले. ढेरेला थोडी काळजी वाटत होती, पण त्याला खोटेच सांगितले कि मला नाईट ड्राईव्हची सवय आहे म्हणून. जेवण जरा जडच झाले होते. थोडा वेळ झोप मिळाली असती तर बरे झाले असते, पण झोपलो असतो तर सकाळी लवकर उठणे कठिण झाले असते. तसाच निघालो. समोरुन येणारे ट्राफ़िक खुप होते, पण माझ्या साईडला फार नव्हते. दहावीस किलोमीटर्स गेलो नसेन, तेवढ्यात जोरात पाऊस सुरु झाला. खुप जपुन चालवु लागलो. रोड सगळा स्लिपरी झाला होता. मधेमधे खोदुन ठेवले होते, त्यातली माती तशीच होती रस्त्यावर. आणि तीच आता पाण्याने वाहुन येत होती. या लोकाना पावसाचा अंदाज नसतो ? याना परवानगी कशी मिळते कुणास ठाऊक. ? पावसामूळे नीट दिसतही नव्हते. वाटेत एक छोटीशी टपरी दिसली, कॉफ़ी प्यावी म्हणुन तिथे थांबलो. गरमागरम कॉफ़ी दे म्हणालो. त्याची स्टोव्ह पेटवण्यापासुन तयारी होती. दहा मिनिटानी ग्लासात कॉफ़ी आली, तर बासुंदीपेक्षा गोड. ती प्यायलो तर झोपलोच असतो. मी म्हणालो ब्लॅक कॉफ़ी दे, तर त्याला समजलेच नाही. शेवटी ब्लॅक कॉफ़ी म्हणजे काय ते एक्स्प्लेन करावे लागले. त्याने आणुन दिली खरी, मग दाढी खाजवत, अंगठा ओठाशी नेत म्हणाला, जास्त झालीय का ? , खरे तर रागच आला त्याच्या भोचकपणाचा, पण राग आवरत म्हणालो, जरा झोप येतेय म्हणुन अशी कॉफ़ी घेतोय, तर म्हणाला सोडा घ्या. त्याच्या सूचनेचापण राग आला, तर तोच म्हणाला, कि झोप उडावी म्हणून ट्रक ड्रायव्हर असेच करतात. तर मग दे म्हणालो तर म्हणाला, त्याच्याकडचा स्टॉक संपलाय. गावात मिळेल म्हणाला, बरं म्हणत मी निघालो. कॉफ़ी प्यायल्यावर थोडे बरे वाटत होते. पण तो म्हणाला तसा सोडा मारुन बघायला पाहिजे. गावात कुठे दुकान उघडेच दिसत नव्हते. अकरालाच सगळे गाव गुडुप झोपले होते, तसाच पुढे निघालो. पाऊस होताच, पण आता जोर जरा कमी झाला होता. समोरच्या काचेवर अनेक पंखवाले किडे आपटुन मरत होते. बाजुने जाणार्या गाड्या, मजेत चिखल उडवत होत्या. उडवु देत, बॉसची गाडी आहे ना, बसेल धुवत. सगळ्या सीडीज बघितल्या तर सगळ्या भयानक होत्या. बॉसचा चॉईस भयानकच आहे. इथे एफ़ेमची रेंज पण मिळत नव्हती. ज्याम बोअर व्हायला लागले होते. तरीपण तसाच ड्राईव्ह करत होतो. आता समोरुन येणारे ट्राफ़िक सुरु झाले होते. ट्रेलर्स, एस्टी, व्होल्वो सुरु झाल्या होत्या. फ़ुल हेडलाईट्स ठेवुन, अजिबात स्पीड कमी न करता, जात होते. आधी ग्रीट करुन बघितले, पण कुणालाच ते कळत नव्हते. आपल्या साईझचा गर्व झाल्यासारखे पास होत होते. माझी गाडीपण मोठी होती म्हणुन, एरवी टु थ्री व्हीलर्सवाल्याना तर ते बाहेरच फ़ेकुन देत असतील. वाटेतल्या पाट्या वाचत होतो. इंग्लिशमधली नावं वाचुन उच्चार कळत नव्हते. एक पाटी वाचली तिचा उच्चार. मनगाव, मॅनगाव असा काहिसा वाटत होता. अजुन १८ किलोमीटर्स्वर होते ते गाव. येताना ते नाव वाचल्याचे आठवत नव्हते. थोड्यावेळाने मराठी पाटी लागली. ओ, ते गाव होते माणगाव. अलिकडे बातम्यात ऐकल्याचे आठवले या गावाचे नाव. अजुन १३ किलोमीटर्सवर होते ते. मनगाव तेरा ओह आय मीन माणगाव तेरा. आता थोडा घाट रस्ता सुरु झाला होता. एक राईट टर्न लागला. झाडे पण खुप होती. टर्न घ्यायच्या आधी मी हॉर्न दिला, मी टर्न घेणार तेवढ्यात, समोरुन एक मोठा कंटेनर ट्रेलर येताना दिसला. स्लोपवर त्याने स्पीड कमी करायला हवा होता, पण तो फ़ुल स्पीडने येत होता, नीट बघितले तर मला कंटेनर थोडा लीन झाल्यासारखा वाटला. तो थोडा ऑफ़ लेन पण होता. मला लेफ़्ट साईडला घ्यायला जागाच नव्हती. माझ्या बाजुला दरी होती. तो तसाच फ़ुल हेडलाईट्स ठेवुन येत होता. मला पण स्पीड कमी करता येत नव्हता. शिवाय जर तो कंटेनर पडला असता तर माझ्याच बाजुला पडला असता. मला शक्यतो लवकर पुढे जायचे होते. पाऊसपण सुरु झाला होता. आणि तेवढ्यात थड असा आवाज करुन, एक माणुस त्या ट्रेलरचा धक्का लागुन अल्मोस्ट चारपाच फ़ुट हवेत उडाला, आणि नेमका माझ्या समोर येऊन पडला. मला ब्रेक लावणे शक्यच नव्हते. मी तशीच गाडी पुढे काढली. मिररमधुन बघितले तर तो ट्रेलर तसाच स्पीडमधे पुढे गेला होता. बॅकलाईट पण एकच दिसत होता. रस्त्यावर अंधार होता, रस्त्यात काहि दिसत नव्हते. इतक्यात समोरुन दोन तीन बसेस दिसल्या, त्यांच्यापैकी एक ओव्हरटेक करत अगदी माझ्या समोर आली होती, तिला वॉर्न केले, आणि तसाच स्पीड कमी न करता पुढे आलो. अजुन डोळ्यासमोरुन तो माणुस जात नव्हता. काय झाले असेल त्याचे. परत जाऊन बघायचे का ? गाडी बाजुला घेऊन थांबवली. इमरजन्सी पार्किंगचे लाईट्स लावुन बसलो. बराच वेळ रस्त्यावर एकही गाडी दिसली नाही. समोरुन एक टेंपो गेला. मागुन एक टेंपो आणि एक मारुति गेली. माझ्याकडे कुणीच बघितले नाही. मागुन एक जीप येताना दिसली. ओह माय गोड, जीप ! म्हणजे पोलिस तर नसतील ? का थांबलोय विचारले तर ? बाथरुमला जायचे होते कि फोन आला म्हणून सांगू ? गाडीचे पेपर्स काढून हातात घेतले. तेवढ्यात ती जीप माझ्यापुढे येऊन थांबलीच. एक माणुस बाहेर पडुन माझ्याकडे आला. त्याने टकटक कारायच्या आधीच मी काच खाली केली. त्यानेच विचारले, कि काहि प्रॉब्लेम आहे का ? मी म्हणालो, वायपरमधे काहितरी अडकलेय बहुदा, काच साफ करायला म्हणुन थांबलो. तो म्हणाला गाडीत सर्फ़ ठेवायचा नेहमी. त्याने काच साफ़ होते, नाहीतर थोडी तंबाखु चोळायची. मी म्हणालो काहि नाही हो गाडीत. तर तो म्हणाला, कि साध्या रद्दि पेपरनेही पुसता येते, मी म्हणालो तेच करतो आता, हातात कागद होतेच. मी त्याला थॅन्क्स म्हणालो. तो निघुन गेला. कोण होता तो ? पोलिस होता का ? गाडीवर लाईट नव्हता. तो पण साध्याच ड्रेसमधे होता. तो जर स्पॉटवरुन आला असेल तर त्याला बॉडी दिसलीच असेल. पण मधे एक रोड लागला, तो जर त्या रोडने आला असेल तर त्याला तो स्पॉट दिसला नसेल. माझ्या मागुन दोन गाड्या गेल्या. पण त्या बर्याच वेळाने आल्या. त्यावेळी माझ्यामागे कुणीच नव्हतं. मी बघितलं होतं ना मिररमधे. पण त्यातरी कशाला थांबतील. मीसुद्धा नाही थांबलो. ओह शिट ! त्या ट्रेलरचा नंबर बघायला हवा होता. पण आता भेटलेल्या माणसाने, हा माझ्या गाडीचा नंबर लिहुन घेतला असेल तर ? बट धिस ईस नॉट माय कार, अडकला तर बॉस अडकेल. नो वन नोज दॅट आय वॉज ड्राईव्हींग हिज कार ! पण या माणसाने माझा चेहरा लक्षात ठेवला असेल तर ? समोर पाटी दिसत होती, माणगाव १० किलोमीटर्स. विचार करकरुन डोकं दुखायला लागलो. किती वेळ तिथे थांबलो होतो कुणास ठाऊक. तसाच हळुहळु ड्राईव्ह करत पुढे आलो. एका वळणावर गाव दिसायला लागले. काहि चहाच्या टपर्या दिसायला लागल्या. एका गाडीवर पेट्रोमॅक्स दिसली. कॉफ़ी मिळेल म्हणुन थांबलो. त्याला परत ब्लॅक कॉफ़ी एक्स्प्लेन करायचा मूड नव्हता. त्याला एवढेच म्हणालो, कि साखर थोडी कमी घाल. नाही घातलीस तरी चालेल. त्याने हवी तशी कॉफ़ी करुन दिली. थोडे हुशारी आली. त्याला आणखी एक कप करुन दे म्हणालो, त्याने बिस्किट, खारी वैगरे घेणार का ते विचारले. मी नको म्हणालो. कॉफ़ी होईपर्यंत त्याच्याशी गप्पा मारत बसलो. पहाटेचे दोन वाजले होते. त्याला विचारले इतक्या पहाटे, कुणी गिर्हाईक येतात का ? तर तो म्हणाला, आता गोवा ट्राफ़िक सुरु होईल. खुप बसेस इथे थांबतात. टॉयलेट्साठी वैगरे. आमच्या रोजच्या पार्ट्या असतात, त्या थांबतात. आता काहि महिन्यानी गणपतिच्या गाड्या सुरु होतील, त्यावेळी तर आम्ही रात्रभर इथेच असतो. दुसरी कॉफ़ी त्याने मस्तच बनवली होती. पैसे देऊन मी निघालो. पण मी तिथे असेपर्यंत एकही गाडी आली नव्हती. त्याला तसे बोलुन दाखवल्यावर तो म्हणाला रस्त्यावर कुठे काहि प्रॉब्लेम असेल तर अशी गॅप पडते. पाणी झाले असेल किंवा एखादा अपघात वैगरे. या रोडला बायपास रोड पण नाही. मी तिथे जास्त न थांबता निघालो. अजुन डोळ्यासमोरुन तो सगळा इन्सिडेंट जात नव्हता. तो माणुस बहुतेक व्हाईट ड्रेसमधे होता. लेंगा होता का धोतर होते ते आठवत नाही. म्हणजे नीट दिसलं नाही. पण तो इतक्या रात्री त्या स्पॉटवर काय करत होता ? आजुबाजुला कुठेही घर दिसले नाही. शेती वैगरे असली तर ? पण तिथे तर व्हॅली होती. या लोकांची शेतं अशीच असतात ना ? पण या दिवसात तो शेतीत काय करत होता ? प्यायला वैगरे होता का ? नक्कीच त्याशिवाय का असा रस्त्यावर येईल ? आणि समोरुन येणारी गाडी दिसत नाही ? पण तो बिचारा रोड कन्स्ट्रक्शनवाला असला तर ? पण तिथे कुठे काम चालु असलेले पण नाही दिसले. ओह माय गोड, आय जस्ट कांट फ़र्गेट ईट ऑल. हातपाय गारठुन गेले होते. डोळ्यावरची झोप पुर्णपणे उडाली होती. कितीही प्रयत्न केला तरी, स्पीड वाढवता येत नव्हता. आता मागुन थोडे ट्राफ़िक दिसायला लागले होते. मी सगळ्याना पासॉन देत होतो. आता हळुहळु गावाची जाग दिसु लागली, लेफ़्टला काहि फ़ॅक्टरीज दिसु लागल्या. बहुतेक हेव्ही इंडस्ट्रीज होत्या. बंद गाडीतही केमिकल्सचा वास यायला लागला. त्यांचे लाईट्स दिसु लागले. मधेच एक टोलनाका दिसला. त्याने पावती तयारच ठेवली होती. हे लोक नंबर्स वैगरे रेकॉर्ड करतात का ? काहि दिसले नाही तसे. माझी थोडीच आहे गाडी ? आता बाथरुमला पण जायचे होते. अशीच वाटेत कुठेतरी गाडी थांबवली. गाडीभोवती सहज फ़ेरी मारली. गाडीवर थोडासा चिखल उडला होता. टायर्सवर बुटानी टॅप करुन बघितले. टायरमधेपण चिखल घुसला होता. कार वॉश करायला हवा होता. तेवढ्यात लक्षात आले कि सपोज पोलिसानी चेक केले तर गाडीच्या टायरमधे काहितरी सापडेल, म्हणजे केस, रक्त वैगरे. तेवढ्या पुराव्यावरुनदेखील पोलिस फ़ाईंड आऊट करु शकतात म्हणे. कुठल्यातरी सिरियलमधे दाखवलं होतं तसं. पहाटेचे चार वाजले होते. आता जो पेट्रोल पंप दिसेल तिथे, कार वॉश करुन घ्यायला पाहिजे. परत निघालो. शेवटी वडखळ नाक्याला मोठा पेट्रोल अंप दिसला. तिथे जाग पण दिसत होती. त्याला अर्जंटली गाडी वॉश करुन हवीय म्हणून सांगितले. त्याचा माणुस झोपला होता. त्याला उठवायला लावले. गाडीतुन बॅग, मोबाईल वैगरे घेऊन बाहेर पडलो. समोर एक रेस्टॉरंट नुकतेच उघडले होते. तिथे जाऊन बसलो. अर्धा तास तरी लागणार होता. मोबाईल हातात घेतला, तर ओह माय गॉड, तो ऑफ़च होता. म्हणजे काल रात्री बॉसशी बोलल्यानंतर तो ऑफ़च होता. लगेच ऑन केला तर रेंज यायला जरा वेळ गेला. आणि लगेच आईचा फोन. म्हणजे रात्री झोपलीच नाही कि काय ? आत्ता तर साडेपाच वाजताहेत. फोनवर म्हणालो, अगं आई, काळजी करु नकोस, येतोय तासाभरात. तर समोरुन आवाज आला, अहो नवरदेव, मी मेधा बोलतेय म्हंटलं. तायडे, मी ओरडलोच. तु कधी आलीस ? ती म्हणाली, वा रे वा, आला मोठा विचारणारा. एवढा तुझा साखरपुडा आणि बहिणीला घेऊन यावे, असे काहि वाटले नाही तुला. आतापासुनच हे असे, पुढे काय होणार कुणास ठाऊक ? मेधा बोलतेय म्हणाले, तर कोण मेधा, म्हणुन विचारशील. तायडे, मी येणार होतो तूला न्यायला. पण मला अर्जंट कॉल अटेंड करावा लागला ना, पण बाबा येणार होते. मी ओशाळुन म्हणालो. अरे मी आता लहान आहे का ? बाबानी केला होता फोन. पण मीच म्हणाले कि मी निघते म्हणुन. सोबतही मिळाली. ताई म्हणाली. म्हणजे एकटीच आलीस ? माधव कुठाय ? आणि परी ? मी विचारले. अरे हो हो. माधव येतोय आत्ताच. निघाला पण. आणि तुझी परीराणी पण उठुन बसलीय. दंगा सुरु झालाय. अरे तूला सांगायचे राहिलेच. काल चक्क मम्मा म्हणाली. बोलायला लागली कि भवानी. ताईने सांगितले. अरे वा. पण मम्मा नसेल म्हणाली. नक्कीच मामा म्हणाली असेल. मी आल्यावर विचारतो. मी म्हणालो. माहीतीय माहीतीय. तरी बरं लेक आहे माझी. मुलगा असता तर आत्ताच जावई म्हणुन बुक करुन ठेवला असतास. अरे पण ते जाऊ दे, आता कुठे आहेस ? लवकर ये, मी चहाची थांबतेय. आई बाबा देवळात गेलेत. मग फ़ुले गजरे घेऊन येणाराहेत. ताई म्हणाली. अगं मी आणली असती की, त्याना उगाच फ़ेरा. मी म्हणालो. पण ते जाऊ दे. आई काय म्हणत होती ? तिने विचारले. काय म्हणत होती ? मी विचारले. तसे माधवने पण विचारले मला. ? ताई म्हणाली. अगं काय म्हणत होते ? मी विचारले. उगाच वेड पांघरु नकोस, मोठी आहे तुझ्यापेक्षा मी ? ताई म्हणाली. हो ना मोठी, फक्त १५ मिनिटानी ? मी हसायचा प्रयत्न केला. ते असु दे, पण मला सांग आरंट यु हॅपी विथ धिस गर्ल ? तसे असेल तर अजुन सांग. मला आणि माधवला खुप गिल्टी वाटतेय. त्यानेच लक्षात आणुन दिलेय माझ्या, ताईने स्पष्टच विचारले. पण तसे का वाटते तुम्हाला ? मी परत विचारले. अरे तुला जन्माच्या आधीपासुन ओळखते ना मी. मला सगळे सांग बघु. आणि आता घरी मी एकटीच आहे. मोकळेपणी बोल, ताईने सांगितले. तसे नाही गं. रश्मि ईज अ गुड गर्ल. खुपच छान आहे ती. मी एक्स्पेक्ट पण नव्ह्ती केली, खुप टॅलेंटेड आहे ती. खुप नॉलेजेबल आहे ती. कुठल्याही टॉपिकवर बोलता येते तिच्याशी. मी खुष आहे गं. मी खुलासा करायचा प्रयत्न केला. अरे पण तूझ्यात काय कमी आहे ? तिलापण तु आवडलाच आहेस कि तु ! ताईने सांगितले. पण तिला माझ्या पास्टबद्दल कळले तर ? मी शंका बोलुन दाखवली. ताई हसतच सुटली. मग म्हणाले, अरे वेड्या, ते डोक्यात घेऊन बसला आहेस का ? मला नाही वाटत शिल्पाबद्दल काहि सांगण्यासारखे आहे म्हणुन. आणि त्याबाबतीत तु का गिल्टी फ़ील करतो आहेस ? आपल्या आईबाबानी तर सगळे स्वीकारलेच होते ना ? जातीचा, वयाचा ईश्यु तिच्या आईबांकडुन आला. आणि आता तर तिचे पण सगळे व्यवस्थित आहे. काकाकाकुनीही काहि मनात ठेवले नाही. आईबाबानी आजचे आमंत्रण देखील दिलेय त्याना. ताईने समजुत काढली. अगं पण नंतर कुणीतरी रश्मिला सांगितले तर. माझी इन्व्हॉल्व्हमेंट वैगरे. मी परत शंका काढली. अरे इन्व्हॉल्व्हमेंट म्हणजे काय ? लहानपणापासुन एकत्र खेळत होतो आपण. एकत्र सिनेमाला, सर्कसला जात होतो. तुम्ही सगळे एकदा ४ दिवस कॅंपला गेला होता इतकेच ना. आजकाल तरुण मुलेमुली एकत्र कुठे जात नाहीत का ? हे बघ असले विचित्र कॉम्प्लेक्स मनात ठेवुन मूड ऑफ़ करु नकोस. आणि तुला एवढेच वाटत असेल तर काहि भेटीनंतर तुच सांग रश्मिला सगळे. बट आय रियली फ़ील, ईट ईज नॉट नेसेसरी. पण ते जाऊ दे, अरे तुझा साडीचा चॉईस खुप छान आहे रे. बरं आता ठेवते फोन, आणि गोड काय करु ते सांग, आज मीच करणार आहे सगळे. ये लवकर, असे म्हणत ताईने फोन ठेवुन दिला. काय सांगायचे रश्मिला ? असे सगळेच कुणालाही सांगता येते ? ती समजुन घेईल ? पण तिने तिच्या आयुष्यातले असे काहि मला सांगितले तर ? तेवढ्यात पेट्रोल पंपावरचा माणुस मला शोधत आला. गाडी चकाचक दिसत होती. पण अजुन तो माणुस डोळ्यासमोरुन जात नव्हता. काय वय असेल त्याचे ? फ़ॅमिली वैगरे असेल त्याला ? आणि पोलिसानी हिट & रन ची केस दाखल केली तर ? पण ते मला कसे शोधुन काढणार ? आणि पहिल्यांदा त्या ट्रेलरने त्याला उडवला होता ! तो तरी कुठे थांबला तिथे ? पण मी त्या ट्रेलरचा नंबर बघायला हवा होता ? पण मी ते रिपोर्टही करायला हवे होते. पण तो खरेच माणुस होता ? नीट दिसले नाही. कदाचित एखादे लाकुड असेल. किंवा थर्मॉकोलचा मोठा तुकडा असेल, पॅकिंगला वापरतात तसा. ऑर मे बी एखादी बकरी वैगरे. किंवा ढेरे सांगत होते तसे, भुत वैगरे. माणुस असता तर माझ्या टायरखाली आल्याचे मला जाणवले असते, तसे काहि झाले होते का ? बहुतेक नाही. ऑर मे बी. आय रियली डोंट रिमेंबर. ! समाप्त.
|
Bsk
| |
| Sunday, October 28, 2007 - 4:51 pm: |
| 
|
समाप्त?? काहीच कळली नाही... काय झालं त्या माणसाचं मग? सगळंच अर्धवट सोडल्यासारखं वाटतयं..
|
Sakhi_d
| |
| Monday, October 29, 2007 - 4:09 am: |
| 
|
मलाही काही कळले नाही....
|
Manuswini
| |
| Monday, October 29, 2007 - 4:20 am: |
| 
|
दिनेशदा, खुप ऊत्साहाने वाचून काढली एका दमात पण शेवट एकदम अर्धवट वाटला? मला वाटले काहीतरी twist असेल कथेत.... anyways माणगाव तसे मला ही लक्षात राहीले आहे तिथेच घडलेल्या गोष्टीमुळे. खोटे वाटेल सांगीतले तर पण चक्क आम्हाला मध्येरात्री एक बाई पायी चालत एक लहान मुलीला खांद्यावर घेवून चालली होती अश्य्यच रस्त्यावर. पावसात नीट दिसला नाही पण आम्ही गाडीत खुप घाबरून बसलो होतो एवढे आठवते मात्र आणि तेव्हा असेच आई, आजी, पप्पांचे discussion चालले होते दुसर्या दिवशी गोव्याला गेल्यावर. माणगवच्या नंतर एक फाटा फुटतो काय बरे नाव त्याचे लक्षात नाही पण बर्याच न्हावी लोकांची वस्ती असायची तिथे.(आजीने माहीती पुरवली होती तेव्हा) not pointing caste or creed here n no offense here .
|
दिनेशदा, तुमची कथा म्हटल्यावर पटापट वाचून काढली, पण काही कळली नाही. मुळात कथेचा आशय ध्यानी आला नाही. कदाचित तुम्हीच समजावून देउ शकाल. राग मानू नये, पण तुमच्या लिखाणात सामान्यपणे जाणवणारा दर्जेदारपणा ह्या कथेत आढळला नाही.
|
Anaghavn
| |
| Monday, October 29, 2007 - 5:22 am: |
| 
|
दिनेश, खरंच शेवट कळाला नाही.माणगाव, तो माणूस आणि रश्मी! अजुनही तू ही कथा व्यवस्थित मांडू शकतोस पुढे. आवडेल आम्हाला. विचार कर.
|
Manjud
| |
| Monday, October 29, 2007 - 6:11 am: |
| 
|
सही झालीये कथा!! दिनेशदा, गिल्ट फील, बरोबर ना? ते शीर्षकातले १७ किलोमीटर्स कथेत कुठे दिसले नाहीत म्हणून लोक गोन्धळलेत जरा....
|
Rajasee
| |
| Monday, October 29, 2007 - 8:24 am: |
| 
|
kalaee nahi, plz explain 
|
Maasture
| |
| Monday, October 29, 2007 - 9:17 am: |
| 
|
गिल्ट त्यापासून सुटका नाही वगैरे चित्रण करायचा प्रयत्न वाततोय. पण खूपच फसलाय. तरी आता वा वा करायला नेहेमीचे कंपूबाज येतील धावून.
|
Dineshvs
| |
| Monday, October 29, 2007 - 9:20 am: |
| 
|
सर्वानी वाचल्याबद्दल आभार. मंजुचे खास आभार. खरे तर हि कथा त्या घटनेची नाहीच. तिथे काय झाले असेल यात बरीच संदिग्धता आहे. ( तिथे माणुसच नसण्याची शक्यता, जास्त आहे. ) माझी कथा त्या नायकाच्या मनाच्या खेळाची आहे. खुप माणसे एखाद्या क्षुल्लकश्या गोष्टीचा गंड मनात धरुन बसतात. ( बहुतेक कन्या राशीची ) हे लोक शहानिशाही करणार नाहीत. केली तरी स्वतःचे निष्कर्श तसेच धरुन ठेवतील. त्यांचे मन आतल्या आत कुढत असते. ते कोणाशीही स्पष्ट बोलतही नाहीत. पण मनात मात्र तेच ठेवुन बसतात. याचा उद्रेक कसा व कुठे होईल ते सांगता येत नाही. असाच प्रसंग एका मुलीच्या बाबतीत घडलाय त्याच्या हातुन. त्याचे काहिही त्या मुलीने, तिच्या आईबाबानी वैगरे मनात ठेवले नाही, पण याच्या मनात मात्र गंड आहेच. त्या माणसाचे काय झाले ? याला महत्व नाहीच, कारण मूळात तिथे माणूसच होता का ते याला सांगता येत नाही. याच्या कथेला मात्र अंत नाही. असा स्वभाव सहसा बदलत नाही. मनातल्या गावाचे रस्ते याना असेच गुरफ़टुन टाकतात. " आणि मग ते सुखाने राहु लागले, " असे शेवट बहुदा वास्तवात नसतातच. हो ना ?
|
Yashwant
| |
| Monday, October 29, 2007 - 9:24 am: |
| 
|
मला वाटले की ज्याला उडवले तो रश्मी च्या किंवा त्याच्याच नात्यातला निघेल आणि पुढील सारे कार्यक्रम कॅन्सल होतील.
|
Antara
| |
| Monday, October 29, 2007 - 12:16 pm: |
| 
|
कथा लिहायचे स्किल चान्गले आहे पण एकून हा फ़सलेला प्रयोग वाटला.. वरचे एक्ष्प्लेनेशन लक्षात घेऊन पण.
|
>>खुप माणसे एखाद्या क्षुल्लकश्या गोष्टीचा गंड मनात धरुन बसतात. ( बहुतेक कन्या राशीची दिनेश, 'आपण एखाद्या माणसाला उडवले का' ही बोच साधी नाही. आयुष्य उध्वस्त होऊ शकेल एवढी आहे. त्यामूळे कथेत त्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष केंद्रीत होते वाचकाचे. म्हणून कथा वाचून कळले काय म्हणायचे आहे तरी पटले नाही आणि आवडली नाही.
|
Giriraj
| |
| Monday, October 29, 2007 - 3:56 pm: |
| 
|
मी अजून कथा वाचली नाहिये पण काहिंच्या समाधानासाठी 'वावा वावा'!!
|
दिनेश,तुम्ही जे लिहिलेल आहे त्यात 'ते' फ़ोकस होत नाही जे तुम्हाला सांगायच होत. माझ्यामते त्या फ़ोनबद्दल न लिहिता त्या माणसाबद्दल पुढे लिहायला पाहिजे होत आणि कथा पुर्ण करायला पाहिजे होती. प माणसे एखाद्या क्षुल्लकश्या गोष्टीचा गंड मनात धरुन बसतात. ( बहुतेक कन्या राशीची तुम्ही त्या रामसेतुच्या वर अंधश्रध्दा आहेत वगैरे सांगत होतात,मग या राशीचा आणि माणसाचा स्वभाव यांचा संबंध तुम्ही कसा explain करता???
|
दिनेशदानी कथा लिहिली अन ती जेव्हा कळली नाही तेव्हा कथा कोणत्या बाजूने लिहिलेली आहे हे ही समजावले. कोणाला काय पटतय हे त्या त्या व्यक्तिच्या द्रष्टिकोण प्रमाणे असेल. फ़क्त चुका दाखवण्या आधी स्वत: एक तरी व्यवस्थितपणे लिहिलेला लेख किन्वा कथा टाकावी. मास्तुरे, दिवे घेउनच हे वाचाल अशी आशा करते अन पुढच्या वेळी टीका करताना बाकी जण वा वा करतील याची व्यर्थ काळजी बाळगू नये!
|
Ajjuka
| |
| Monday, October 29, 2007 - 6:50 pm: |
| 
|
दिनेशदा, नो झेप्स बरंका.. अगदी सगळ्या explaination सकटही... नो झेप्स! बात कुछ जमी नही! तरी मी गिर्याच्या पोस्टमधल्या शेवटच्या भागाला दुजोरा देते... वावा वावा
|
Rimzim
| |
| Monday, October 29, 2007 - 8:20 pm: |
| 
|
दिनेश भाऊ कथा लहान असली तरी आवडली. पण कदाचित हे ललित मधे बसले असते. सकाळी वाचुन काढली, आणि मंजु ला अनुमोदन. मला पण असेच वाटले की कथा नायकाच्या मनातिल चलबिचल उलगडुन दाखवायचा प्रयत्न करते. सारासार विचार ( संपुर्ण विचार न करता) आपल्या कडुन चुक झाली असे समजुन नायक स्वत्:ला दोषी समजु लागतो. ...... चु भु दे घे
|
Zakki
| |
| Monday, October 29, 2007 - 9:04 pm: |
| 
|
दिनेशदांचा साहेब बहुधा पुण्यातील कोब्रा असावा. असे अस्खलित मराठीत बोलणारा दुसरा कोण? माझ्या मते, असे एखाद्या व्यक्तिच्या मृत्यूला आपण जबाबदार असावे की काय, याबद्दल भारतातील मोटर चालवणार्यांपैकी किती लोक खंत बाळगतात? बहुधा सगळे घुसा घुसा कोण पुढे घुसेल तो या प्रमाणे, वाटेत खड्डा, माणूस, लाल दिवा, आला तरी घुसतच असतात! त्याबद्दल त्यांना काहीच विचार करावासा वाटत नाही. त्यामानाने दिनेशदा वेगळे. या अर्थाने, ही कथा वेगळीच, म्हणून त्यांनी लिहीली. आता शेवटाबद्दल म्हणायचे तर काय फरक पडतो? समजा तो माणूस खरेच मेला असेल. माझ्या गाडीपुढे येतो म्हणजे काय, डोळे फुटले काय लेकाचे! नसता त्रास, असेच सगळे म्हणतात ना भारतात? (त्यालाच वर 'सारासार विचार' असे म्हंटले आहे.) त्या मानाने दिनेशदांना त्याबद्दल वाईट वाटले ही आश्चर्यजनकच गोष्ट नाही का?

|
Mankya
| |
| Tuesday, October 30, 2007 - 1:26 am: |
| 
|
दिनेशदा .. कथा म्हणता येईल का नाही ते माहीत नाही, पण प्रसंगचित्रण तेही बर्याचश्या बारकाव्यांसकट आणि विशेष म्हणजे प्रत्येक वळणावर मनाची बदलणारी अवस्था जमलीये ! गिरी, अज्जुका ला अनुमोदन शेवटच्या भागासाठी .. व्वा व्वा ! माणिक !
|
|
|