Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गप्पाष्टक!१

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आश्विन » विनोदी लेखन » गप्पाष्टक!१ « Previous Next »

Pramoddeo
Sunday, October 28, 2007 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक नवा प्रकार आहे. इथल्या रसिक मंडळींना आवडल्यास पुढील भाग प्रकाशित केले जातील.
दोन मित्रांमधील हा सुखसंवाद आहे. एक(गणपतराव) आखातात नोकरीनिमित आहे आणि दुसरा(गोपाळराव)भारतात आहे.दोघेही नेहमी गप्पा मारण्यासाठी मसणात(एमएसएन ला गणपतराव मसण म्हणतात)आणि गुगलटॉकवर एकत्र भेटतात. गणपतराव हा बोलण्यात चतुर,हजरजबाबी(पुलं जिंदाबाद), संगीतकार, शौकीन/जाणकार आहे तर गोपाळराव हा "एक ना धड" अशा वर्गातला आहे. पण दोघांचा समान आवडीचा विषय म्हणजे संगीत,पुलं आणि शेयरबाजार.बघूया काय बोलताहेत ते.

गोपाळराव: सुप्रभात!
गणपतराव: सुप्रभात
गोरा: कामात आहात?
गरा: विशेष नाही. आताच आलो.
गोरा: आज उशीरा आलात?
गरा: नाही, रोजचीच वेळ.
गोरा: मला वाटले ७ वाजता येता म्हणून.
गरा: नाही, शक्य होत नाही ते :-)७ ला यायला मला ६.३० ला निघावं लागेल.
गोरा: मग आजपासून एकान्तवास आठवडाभर?
गरा: कालपासूनच चालू झाला एकान्तवास.कुटुंब परतलंय ना भारतात.
गोरा: सकाळी किती वाजता उठता?
गरा: ६ वाजता.
गोरा: म्हणजे घाईच होत असेल ना!
गरा: नाही, १ तासात आरामात आटोपतं माझं.
गोरा: :-) आता जेवणाची काय सोय आहे?
गरा: दुपारी कार्यालयातल्या हॉटेलमध्ये खाणार, आणि संध्याकाळी कुठेतरी बाहेर, नाहीतर घरीच आमटी भात करू शकतो.
गोरा: घरीच खाल्लेलं बरं. त्यातून तुमची पथ्यं असतीलच ना!
गरा: हो ना.पण आठवडाभरासाठी मोडली तरी हरकत नाही आणि अरेबिक खाणं सात्विक असतं,विशेषत: शाकाहारी.
गोरा: नको हो. नाहीतर इथे येण्याच्या आधी तब्ब्येत बिघडायची.
गरा: तेही खरं आहे.
गोरा: आणि मग सौं चे लेक्चर ऐकून घ्यायला लागेल.
गरा: जाताना ती २ प्रकारच्या आमट्या करून गेली होती. इथे अन्न ७-८ दिवस टिकू शकतं. त्यामुळे बरं पडतं.
गोरा: अहो तरी देखिल शेवटी ताजं ते ताजं!
गरा: हो, मगर नाविलाज को क्या विलाज ?
गोरा: विलाज है ना! स्वत: बल्लवाचारी बनायचं!
गरा: त्यात बराच वेळ जातो. मला जाण्याआधी बरीच कामं उरकायची आहेत आणि मी कुठेही खाल्लं तरी तब्येतीला जपून खातो.
गोरा: नाही, सकाळचं एक ठीक आहे पण संध्याकाळी तर करता येईल ना.
गरा: संध्याकाळीच वेळ नाहिये आता. मोठी लिस्ट आहे कामाची.
गोरा: काय? सौ. बरेच काही सोपवून गेलेल्या दिसतात!
गरा: काही तिची कामं, बरीचशी माझी.
गोरा: इथे येण्याआधी पुरी नाही झाली तर शिक्षा वगैरे करणार आहेत की काय? :-)
गरा: शिक्षा ? :-)))))))))))))) छे हो.
गोरा: मग आता संगीतसाधना करायलाही वेळ नसणार तर.
गरा: जमलं तर ते ही करणार आहे.एक 'अर्धवट दाढी' झाली आहे, ती पूर्ण करायची आहे.
गोरा: हाहाहाहा! तुम्ही स्वत: कविता वगैरे करता का हो?
गरा: नाही, पण भविष्यात चाळा करायचा आहे त्याही क्षेत्रात.
गोरा: म्हणजे मग नामवंत कवींच्या पोटावर पाय येणार आहे तर! :-)
गरा: :-))))))))))))))))))))) पोटासाठी मी काही केलं असतं आतापर्यंत तर अब्जाधीश झालो असतो :-)गोरा: वा! मग मलाही जरा सांगता आलं असतं की मी अब्जाधीशाचा मित्र आहे म्हणून!
गरा: आता तुम्ही कोट्याधीशापासून सुरुवात करू शकता.(कारण मी कोट्या चांगल्या करू शकतो ...... असं माझी मित्रमंडळी म्हणतात :-) )
गोरा: ते तर मी सांगतच असतो हो. अरबस्थानातला शेख माझा दोस्त आहे म्हणून! :-) त्या हिशेबने मी पण कोधी(कोट्याधीश)आहेच की!
गरा: चला ५० लाख माझे, ५० तुमचे.
गोरा: चालेल. सद्या इतके भांडवल पूरे आहे!
गरा: पुरे? अहो शेअर बाजारात ५० लाखाचे ५ हजार करायला वेळ लागणार नाही आपल्याला.
गोरा: नाही. म्हणजे माझे पाच हजार होतील तेव्हा तुमचे कैक कोटी होतील ना! कारण मी जे काही करेन त्याच्या उलट तुम्ही करायचे आहे!
गरा: हे हे हे!
गोरा: कसा आहे धंदा? फायद्यात चालायला काहीच हरकत नाहीये.
गरा: "तुमचा तोटा तोच माझा फायदा" असं माझ्या धंद्याचं ब्रीदवाक्य ठेवायला हरकत नाही ना ?
गोरा: ठेवा. चांगलं बोधवाक्य आहे!
गरा: यातून तुम्हीच बोध घ्या :-)
गोरा: मी आता सुधारण्या पलीकडे गेलोय! :-)
गरा: आणि मी "अली'कडे!
गोरा: दोन्ही अर्थाने!!!!!!!!!!!!!!!!!!!!
गरा: मी "अली" याच अर्थाने म्हटलं होतं :-))))))))))) या अली!
गोरा: आता तुमचा मित्र आहे म्हटल्यावर मला ते कळणारच ना!!!!!!!
गरा: मग काय तर!!
गोरा: बरं आता जरा संगीताकडे वळू या.
गरा: बायको गेल्यावर संगीताकडे वळलो असं म्हणतील लोकं.
गोरा: हाहाहा!तशी ती(संगीता) पहिलीच बायको आहे ना!
गरा: लौकिक अर्थाने.
गोरा: ह्या सवतीला त्यांनी मान्यता दिलेय आधीच?
गरा: सरस्वती(म्हणजे माझी बायको) ही सवत.संगीता नव्हे!
गोरा: तशा दोघी एकमेकींच्या सवती! पण गुण्यागोविंदाने नांदताहेत ना! मग झालं तर!
गरा: माझ्या एका नातेवाईकाचं नाव 'गोविंद गुणे' आहे, त्याना देखील आम्ही "गुण्यागोविंदाने" असंच म्हणतो :-)
गोरा: वा! क्या बात है! पुलंचा वरदहस्त आहे तुमच्यावर!!!!!!
गरा: ते कुठे आणि मी कुठे ? म्हणजेच "ते स्वर्गलोकात सुखात नांदताहेत, आणि मी खितपत पडलोय इहलोकात" :-)
गोरा: ते आता वर आणि तुम्ही इथे खाली!!!!!!!रंभा तेल थापत असेल त्यांच्या डोक्यावर आणि उर्वशी पंख्याने वारा घालत असेल.
गरा: क्या टेलीपथी है.मान गये उस्ताद!
गोरा: जमतंय तर मलाही थोडे थोडे, तुमच्या सहवासात राहून!
गरा: जमणारच हो.म्हणतात ना,"ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या,आणि वाण नाही पण गुण लागला". अगदी तसेच! हाहाहा!
चला! गोपाळराव नंतर बोलू या. साहेब तिथे कोकलतोय माझ्या नावाने. सारख्या उचक्या लागताहेत!
गोरा: हरकत नाही उद्या भेटू. तोवर रामराम!

Athak
Sunday, October 28, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा छान जमतय , येवुन द्या अजुन , गरा अन गोरातला संवाद बराच वास्तवाला धरुन आहे :-)

Kmayuresh2002
Sunday, October 28, 2007 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रमोद,चांगलं लिहिलय.. चालु देत पुढे:-)

Pramoddeo
Tuesday, October 30, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गप्पाष्टक!२

गणपतरावांच्या गुगलटॉकचा 'हिरवा दिवा' लागलेला पाहून गोपाळराव खुशीत आलेत.आज काय गप्पा मारताहेत चला ऐकू या!

गोपाळराव: सुप्रभात! श्लोनेक!
सकाळी सकाळी एकदम हिरवा दिवा? वा! क्या बात है!
गणपतराव: जरा थांबा हा, सकाळच्या चहाचा आस्वाद घेतो आणि येतो.
गोरा: चालू द्या! निवांत!

गरा: बोला साहेब, कसं काय ?
गोरा: मजेत!आपण दोन दिवस चांगलीच मजा केलेली दिसतेय!
गरा: वीकएंडला नेहेमीच मजा असते
गोरा: मग कुठे बाहेर गेला होतात फिरायला की घरच्या घरी पार्ट्या चालू होत्या?
गरा: एक दिवस माझ्या घरी डिनर होतं, एक दिवस एका मित्राने हॉटेल मधे डिनर पार्टी ठेवली होती.आणि दुसर्‍या मित्राकडे एकदा लंच :-)
गोरा: म्हणजे डीनर डीप्लोमसी चाललेय तर!

गोरा: तुम्ही जागा बदलताय असे कळले! खरे आहे काय आणि का?
गरा: तुमचं हेरखातं जोरदार काम करतंय तर :-)
गोरा: :-) कानून के हात बहूत लंबे होते है जानी!
गरा: मोठी जागा घेतोय आणि कार्यालयापासून जरा जवळ देखिल.
गोरा: मग काय चालत चालत जाणार कार्यालयात? की कारभारीण गाठोड्यात कांदा-भाकर बांधून रोज घेऊन येणार आहे?
गरा: दोन्ही शक्य आहे :-)
गोरा: चला म्हणजे त्या निमित्ताने अंगावरील काही पौंड गमावता येतील आणि पेट्रोलवरले काही पौंड वाचवता येतील. रस्तेही गुळगुळीत होतील हे अजून एक चांगले होईल! :-)
गरा: वजनी गमावून चलनी कमवायचे :-)
गोरा: आयडियाची कल्पना चांगली आहे ना!
गरा: मग काय तर!
गोरा: मग कधी जाताय नव्या जागेत?
गरा बहुतेक पुढच्या आठवड्यात शिफ्ट होईन
गोरा: तुमच्या मित्र मंडळींपासून दूर जाणार आहात की जवळ पोहोचणार आहात?
गरा: दूर,पण फार दूर नाही.
साधारण १५ किमी
गोरा: म्हणजे ह्याचा अर्थ काय समजायचा? कंटाळलात काय सगळ्यांना! रोज पीडतात काय? माझ्याचसारखे!!!!!
गरा: नाही, तसे नाही. मोठी जागा पाहिजे होती
संगीतासाठी एक "शेपरेट" खोली पाहिजे होती
गोरा: संगीताची बाकी मजा आहे बरं का!
गरा: माझी पण आहे की!
गोरा: :-) म्हणजे तिच्या बरोबरीने मग कविता,गजल,वीणा,सतार,सारंगी वगैरे पण येणार असतील ना!
गरा: प्रतिभा, कल्पना यांना विसरलात काय ?
गोरा: अरे हो!मजा आहे बुवा एका माणसाची!
गरा: :-)
गोरा: साहेब एक दहा-पंधरा मिनिटांनी येतो. एक काम आहे!
गरा: ठीक आहे.

गरा: या साहेब
गोरा: बोला आज काय नवी खबर देताय!
गरा: काहीच नाही, तुम्हीच हेरखात्यात आहात. तुम्ही शोधायची तर आम्हाला विचारताय? :-)
गोरा: म्हणूनच! दुसर्‍याकडून बातम्या काढून घेणे हे आमचे एक प्रमूख काम आहे ! :D
गरा: चालू द्या :-) लगे रहो गोपाळ भाई!
गोरा: बरे, संगीता कशी आहे? सद्या रुसलेय की प्रसन्न आहे?आणि त्या नव्या कळफलकाचे(सिंथेसायजर) उद्घाटान कधी करताय?
गरा: सध्या कळफलकाचे तंत्रज्ञान समजावून घेणे चालू आहे.तांत्रिक बाजूंमुळे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय.पण या आठवड्यात एका महत्वाच्या गोष्टीवर ताबा आला
तबल्याची सॅंपल्स मी आता माझ्या कळफलकावरुन वाजवू शकतो
गोरा: अजून तिथेच अडकलाय?कमाल आहे तुमची.
एकदा माझ्याबरोबर बसा! नीट समजाऊन देतो.म्हणजे संगीताकडे असे दूर्लक्ष होणार नाही. :-)
गरा: अजून म्हणजे ? अजून २ वर्ष लागतील या नव्या उपकरणाची सगळी अंगं समजावून घ्यायला
गोरा: फारच मंद बुवा तुम्ही! जरा त्या मोदबुवांची शिकवणी लावा. मग बघा कसे झरझर कळायला लागेल.
गरा: त्यांच्या वरदहस्तामुळेच २ वर्ष म्हणालो मी, नाहीतर ४ लागली असती
गोरा: हा अपमान आहे त्यांचा! तुमचा धि:क्कार असो!
अहो चुटकीसरशी शिकवतील ते तुम्हाला! दोन वर्षे म्हणजे खूपच जास्त होतात!
गरा: अहो ते लहरी आहेत फार
त्यांचा शिष्यांचा गोतावळा पण मोठा आहे
त्यातून म्या पामराला कितीसा वेळ मिळणार ?
हा, रोज त्यांचे पाय चेपले तर मात्र शक्य आहे.पण सध्या माझेच येवढे दुखतात की मीच कोणीतरी बुवा (म्हणजे बाई नाही) ठेवावा म्हणतोय पाय चेपायला.
गोरा: तुमच्यावर मेहरबान आहेत असे ऐकतोय! तुमचे तबलावादनही फार आवडले आहे ना! माझ्याकडे नेहमी बोलून दाखवतात ते तसे! तबलजी कसा असावा? तर गणपतरावासारखा असे सगळ्यांना ऐकवत .असतात!
गरा: फुकटातला तबलजी कोणाला नाही आवडणार ?
गोरा: मुलगा नाव काढेल असेही म्हणाले!
गरा: नाव काढतोच मी त्यांचं संधी मिळेल तेंव्हा (बदनामी करायची संधी काय नेहेमीच येते कां ?).
गोरा: पण तुम्ही काही म्हणा(नावं ठेवा) तरी ते तुमच्याबद्दल नेहमीच चांगले बोलतात!
गरा: हे सगळं मी पुढच्या विश्व(व्यापी) संगीत महोत्सवाची बिदागी सांगेपर्यंत.
एकदा त्यांना कळलं की मी फुकटात वाजवणार नाही की पहा कसे कोकलत फिरतील माझ्या नावाने.
गोरा: बिदागी, बिदागी काय करता सारखे? अहो बुवांबरोबर तुम्हाला वाजवायला मिळाले हे तुमचे अहोभाग्य आहे. आता बघा तुमच्या घरासमोर रांगा लागतील कलाकारांच्या! सगळे तुम्हालाच त्यांच्या साथीला बोलावतील.
गरा: रांगा लागताहेत तबलजींच्या ! तुम्हाला बिदागी दिली का, हे विचारणार्‍यांचीच संख्या जास्त आहे
गोरा: अहो तुम्ही पण सांगा की त्या झाकीर सारखा आकडा!
बुवांना कुणी विचारलेच तर तेही तेच सांगतील ह्याची खात्री आहे. आपणच आपला भाव वाढवायचा असतो एवढेही कळत नाही तुम्हाला? अगदीच कच्चे आहात बुवा ह्या क्षेत्रात! खूप काळजी वाटते तुमची!
गरा: बुवांकडून शिकायला मात्र भरपूर मिळालं, व्यवहारात चोख रहाण्याचे धडे
गोरा: मग! आता कसे?
गरा: बरं आता दुसर्‍या एखाद्या कार्यक्रमाचा वृत्तांत कधी ?
गोरा: बघू या! हल्ली लोकांना ते ऑरकेस्ट्राचे सुमार कार्यक्रम जास्त आवडतात ना!
गरा: मग लिहा की त्यावर.
वार्ताहरांनी पण लोकाभिमुख असलं पाहिजे.
गोरा: हल्ली खूप प्रयत्न करूनही काहीही जमत नाहीये मनासारखे.
गरा: हं, दिसतंय खरं.
संगणकाने बराच वेळ खालेल्ला दिसतोय तुमच्या प्रतिभासाधनेतला.
झाला का तंदुरुस्त ?
गोरा: ते तर आहेच! आणि इतरही कामं बरीच रखडलेत.
दूरध्वनीने देखिल मान टाकलेय.
गरा: अरे बापरे, मग तर तुम्हाला भरपूर मोकळा वेळ मिळाला पाहिजे
गोरा: पण सद्या संगणकाच्याच मागे आहे. तो जोपर्यंत पूर्ण कार्यक्षमतेने चालत नाही तोपर्यंत जीवाला स्वस्थता मिळणार नाही!
गरा: "जिवा" बघेल हो सगळं.
तुम्ही लेखनाकडे लक्ष केंद्रित करा
गोरा: ते आहेच हो.त्याच्यावरच तर सगळी भिस्त आहे! पण तो देखिल कधी तरी घाबरतो ना!
गरा: संगणकाची प्रगती कुठवर आलीये ?
गोरा: संगणक हळू हळू मार्गावर येतोय!
बरं साहेब थोडे पोटात अन्न ढकलतो आणि येतो.
गरा: बरं, आज वेळ मिळेल यानंतर असं वाटत नाहिये मला, तरी देखील बघू.
गोरा: काहो?
गरा: मीटींग्ज आहेत जरा
गोरा: म्हणजे परत पार्टी?
गरा: नाही
गोरा: मग बौद्धिक आहे की काय?
गरा: हो
गोरा: मग येताय का जेवायला?
गरा: चालू द्या
गोरा: बरं मग भेटू या! टाटा-बिर्ला!
गरा: टाटा



Chyayla
Wednesday, October 31, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रमोद, गप्पाष्टक मजेशिर वाटत आहेत मला तरी नविनच प्रकार आहे हा. अस वाटतय की खरच गूगल चॅट वरुन घेतले की काय?

Pramoddeo
Sunday, November 04, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गप्पाष्टक-३

गोरा: सुप्रभात!
गरा: सुप्रभात
गोरा: तुम्ही नाही नाही म्हणता बाकी मस्तच लिहिलंत हो. वाचकांच्या उड्या पडताहेत त्यावर. त्या अभिजितवरही दडपण टाकतोय. पण दाद देत नाहीये.
गरा: मी तरी कुठे देत होतो आधी.
पण आता सुटका नाही हे जेंव्हा कळलं तेंव्हा लिहून टाकलं :-)
त्याला सांगा, तू गाणं वाजव मग आम्ही "दाद" देऊ
गोरा: प्रयत्न करतोय हो. मी असा सोडणार नाही रणांगण!
गरा: देवाला काहीही कठीण नाही
गोरा: ते आहेच. पण काही भक्त 'नामदेवा'सारखे हट्टी असतात ना!
गरा: सगळेच असतात बहुतेक, पण देवापुढे भक्तांना आपला हट्ट सोडावाच लागतो शेवटी
अहो भक्त या हट्टात जिंकले तर देवाचं देवपण काय राहिलं मग ?
देव हरता कामा नये कोणत्याही परिस्थितीत.
गोरा: अहो देव आणि भक्त हे अद्वैताचे नाते आहे. तेव्हा कुणाचीही हारजीत होत नसते. त्यातून तो 'अभिजित' आहे. :-)
गरा: कभी"जीत" दुसरे की भी होती है!
गोरा: पण अभी'जित' त्याचीच दिसतेय ना!
गरा: अभी आपको मनावर लेना गिरेगा.
गोरा: मनावर,किलोवर वगैरे घेतलेच आहे आणि कार्य सिद्धीस गेल्याबिगर (चैन) पडणार नाही.
गरा: तथास्तु! असं म्हणायची पाळी आता भक्तावर आली आहे.
गोरा: म्हणुनच म्हटलंय 'अद्वैताचे नाते'!
गरा: अद्वैत म्हणजे एकरुपता ? तेच "ना ते" ?
गोरा: होय. म्हणजेच स्वत:चा स्वत: केलेला पराभव ठरेल तो. भक्त आणि देव शरीराने वेगळे असले तरी एकाच मनात नांदतात.
नांदतो देव हा आपुल्या अंतरी!
गरा: छान
गोरा: सद्या काय नवीन हालहवाल?
गरा: नवीन काही नाही
गोरा: कळफलकाबाबतची(सिंथेसायजर) प्रगती कितपत झाली?
गरा:चालू आहे जोरदार, नवनवीन शोध लागताहेत रोज
गोरा: मग त्याचीच एक सु'रस' कहाणी लिहा की!
गरा: या कहाणी ला "सूर"स कहाणी म्हणावं लागेल खरं तर
गोरा: तसं म्हणा हवं तर! पण 'लिहा' की! हमकु वाचनेसे मतलब हाये! :-)
गरा: आता मी काही "वाचत" नाही.. तुमच्या हातून ;-)
गोरा: तुम्ही लिहा हो म्हणजे आम्ही 'वाचू'!
गरा: हो, रिक्षाच्या मागे लिहिलेलं वाचलंय मी "वाचाल तर वाचाल"
ही घोषवाक्य किती विचित्रपणे लिहिलेली असतात रिक्षांवर. कधीतरी
कोणीतरी अडाणी माणसं पेन्ट करतात बर्‍याच वेळेस.
एका रिक्षेवर लिहिलं होतं "जोशी केळं तोटी केळं"
आता याचा अर्थ काय ? ओळखा पाहू
गोरा: जो शिकेल तो टिकेल! हाहाहा!
गरा: अरे वा! हुशार आहात
गोरा: आता तुम्ही ह्या असल्या प्रासंगिक विनोदावरही लिहाच.प्रतिक्रियांचा पुर येईल त्यावर.
गरा:पण खरी प्रतिक्रिया आपल्याला न ओळखणार्‍या माणसाची. इथे सगळे गोतावळ्यातले लोकच ’वा,वा’ करतात.
गोरा: काही प्रमाणात ते खरेच असते;पण गोतावळा हळू हळू वाढतो ना!
गरा: तरी शेवटी तो गोतावळाच.
गोरा: नाही. तसं नाही. आधी न ओळखणारा प्रतिसाद देतो आणि मग तोही गोतावळ्याचाच एक भाग होतो.
गरा: अच्छा
गोतावळ्याबाहेरच्या प्रतिक्रिया मिळण्यासाठी नामांकित संकेतस्थळी लेखन टाकायला पाहिजे.
जालनिशीवर सहसा गोतावळाच चक्कर टाकतो.
गरा: हे सगळं तुम्हीच करु शकाल, कारण आज आता मला कामाकडे वळावं लागेल
गोरा: चालेल. बघू या कसे जमते ते!
गरा: धन्यवाद सर!
गोरा: एकदम सर! झाडावर चढल्यासारखे आणि मागे 'प्रो. ठिगळे' अशी पदवी लावल्या सारखे वाटतेय! :-)
गरा: :-)))))))))))))))) ठिगळं ही बहुधा मागेच लागतात कारण तोच जास्त घर्षणाचा भाग असतो
गोरा: अजून एक गंमत सांगू का?
गरा: बोला!
गोरा: तुमच्या सौ. म्हणजे आमच्या वहिनी साहेबांनी मला 'काका' बनवले आहे. मला ते संबोधन चालेल असे मी म्हटले पण.....
गरा: हाहाहा! "मामा" नाही बनवलं हेच नशीब तुमचं
गोरा: कन्या म्हणाली," बाबा! तुम्ही त्यांचे काका! तर त्यांच्या मुलाचे आजोबा! आणि तो तर माझ्याच वयाचा आहे!
मग मी तुम्हाला बाबा का म्हणायचं?
गरा: छान निरिक्षण आहे :-)
गोरा: आता काय बोलणार?
गरा: म्हणजे मामा बनवलं असतं तरी तुमचा "आजोबा"च झाला असता शेवटी
गोरा: आता तुम्हीही मला काका नाहीतर सासरेबुवा म्हणा! :-)
गरा: सासरेबुवा बरं वाटतंय जरा, कारण हे संबोधन माझ्या नशिबातच नव्हतं कधी
गरा: का हो?
गरा: हिचे वडील आमचं लग्न व्हायच्या आधीच गेले
मी त्यांना पाहिलंच नाहिये
गोरा: पण चुलत,मामे,मावस वगैरे सासरे असतीलच ना! त्यात आता माझी भर!
गरा: :-) जावयाचे लाड करावे लागतील, परवडणार नाही!
गोरा: आता करतोच आहे ना! :-)
रोज उठून हालहवाल विचारतोय.
गरा: सासरेबुवा, या दिवाळीला मला एक स्कूटर पाहिजे.
गोरा: दिली! चावीची की स्प्रिंगची हवीय!
गरा: चावीची, पेट्रोल वर चालणारी,खरीखुरी.
नाहीतर सूनबाईला नांदवणार नाही नीट.
गोरा: पण एक अट आहे. ती चालवत चालवत आखातात जायचं! आणि रस्त्यात कुठेही थांबायचे नाही!
गरा: चालेल (म्हणजे चालवेन) म्हणजेच (चालवून घेईन).
टाकी फुल करुन द्यायची तुम्ही ही माझी अट.
गोरा: हो आणि पेट्रोल तिथेच भरायचे(कारण तुम्हाला ते फुकटच मिळते ना!)
गरा: मुंबईपासून काय ढकलत नेऊ का ?
गोरा: मग??? समजलात काय?
गरा: मी स्कूटर मागितली आहे, ढकलगाडी नाही.
गोरा: मग मी स्कुटरच देतोय ना!
गरा: उद्या स्कूटरची नुसती हॅंडल्स द्याल आणी म्हणाल "हीच स्कूटर".
गोरा: आता मला जे परवडणार आहे तेच देणार ना! मी काय तुम्हाला विमानही घेऊन देईन.
गरा: काय "टर" उडवताय राव माझी
गोरा: टर नाही हो. मी विमान उडवायचे म्हणतोय! :P
गरा: नको. आता मला काही नको.हौस फिटली.
गोरा: बरं ते जाऊ द्या. जेवायला येताय काय?
जेवणाचे आमंत्रण आलंय.
गरा: आज काय केलंय ते सांगा आधी.
गोरा: शाही खिचडी!!!!!!!!!!
गरा: अरे वा, मेजवानीचा बेत आहे.
घ्या जेवून.
गोरा: मग येताय?
गरा: आज नको, परत कधीतरी
गोरा: बरं मग टाटा . नंतर भेटू.
गरा: टाटा




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators