|
"मी जर कधी मेलो तर भूत बनेन आणि तुला घाबरवेन. आणि जर तेव्हापण तू अशीच किंचाळलीस तर... बहुतेक घाबरून मीच पळून जाईल," एका काळ्याकुट्ट अमावस्येच्या रात्री तो आणि मी हाडाचे सांगाडे मोजत होतो. तेव्हा माझी भिती घालवण्यासाठी कपिल मला धीर देत होता!! कपिल. सर्व जग त्याला फ़क्त याच नावाने ओळखायचं. माझा सगळ्यात handsome मित्र. देवाने अक्षरश: रात्रंदिवस खपून त्याला बनवला असेल. फ़िल्मी दुनियेच्या खोट्या चकचकाटात सुद्धा एखाद्या हिर्यासारखा दिसायचा तो. निळे डोळे. काळे केस. गोरापान रंग आणि सरळ नाक. कर्कटक घेऊन आखल्यासारखा गोल चेहरा. पावणेसहाफ़ूटाची उंची. आणि पिळदार शरीर. माझ्या बहुतेक मैत्रीणी त्याच्यावर लाईन मारायच्या. तसा तोही फ़्लर्टच होता. स्वभाव पण एकदम गमतीशीर आणि हजरजबाबी. माझा मित्र इतका छान आहे याचा अर्थात मला अभिमान होता. रात्रंदिवस तो आणि मी काम करायचो. कधी कधी तर सतत सत्तावीस अठ्ठावीस तास. पण कधी तो एकदाही दमायचा नाही. थकायचा नाही. आणि जर सेटवर सगळेच थकले तर चहाचा कप हातात घेऊन कपिल कुठलंतरी एखादं लोकगीत म्हणायचा. काश्मिरीमधे. सेटच्या अंधारामधे त्याच्या आवाज यायला लागला तर प्रत्येकजण शांत व्हायचा. एखादी जादू बघावी तसं. मला तर काश्मेरी ओ का ठो कळायचं नाही. मग तो मला प्रत्येक ओळीचा अर्थ समजावयाचा. त्याचं हिंदी आणि मराठी चांगलं आहे हे सेटवर सर्वानाच ठाऊक होतं. पण मला एकटीला समजलेली गोष्ट म्हणजे त्याचं इंग्लिश खूप मस्त आहे. "कसं काय?" मी त्याला एके दिवशी विचारलं. "म्हणजे तुला काय वाटलं मी अख्खं आयुष्य स्पॉटबॉय म्हणून काम करतोय? मॅडम मी तिसरीपर्यन्त कॉन्व्हेंटमधे शिकलोय" हसत त्याने उत्तर दिलं. पण शिक्षण का सोडलं हा मी पुढचा प्रश्न विचारायच्या आतच त्याला कुणीतरी आवाज दिला. तसाही सेटवर तो कायम कामात असायचा. एक तर आम्ही काम करत असलेली टीव्ही सीरियल भूताखेताची. त्यामुळे चित्रविचित्र मेक अप. कॉस्चुम्स असलं सर्व असायचं. त्यातच बर्याचदा स्मशान वगैरे चा सेट असायचा. सुरुवातीला मी खूप घाबरायचे. एक तर प्रॉडक्शनमधे मी एकटीच मुलगी होते. त्यात बरीचशी नवखीपण होते. पण कपिल मी आणि अभिषेक असा आमचा ग्रूप जमला होता. जेवायला चहा प्यायला आम्ही कायम एकत्र. अभिषेक पण तसा नवीनच होता. त्यामुळे कपिल आमचा सीनीयर होता. तसा तो पण असिस्टंट डायरेक्टर होता. पण का कुणास ठाऊक स्वत्:ला स्पॉटबॉय म्हणवून घ्यायला त्याला अवडायचं. " आज मी अख्खी सीरियल पण करू शकतो. पण म्हणून मी हे मधीच विसरणार नाही की मी पंधरा वर्षाचा होतो तेव्हा स्पॉटबॉय म्हणून कामाला लागलो. One should never forget roots " कपिल खरंतर माझा बेस्ट फ़्रेंड होता. अर्थात सेटवर भलतीच चर्चा केव्हाच चालू झाली होती. सेटवरचे कामगार हव्या त्या अश्लील भाषेत आमच्याविषयी चर्चा करायचे. सुरुवातीला मी खूप चिडायचे. कुणी काही बोललं की मी भडकून परत काहीतरी बोलायचे. पण कधीतरी माझ्या लक्षात आलं की कपिल कधीच चिडत नाही. उलट गालातल्या गालात हसतो. जणू काही या सर्व बोलण्याला त्याची संमती आहे. मी हळू हळू त्याच्याशी बोलणं बंद करून टाकलं. काम असलं तरी मी अभिषेकशीच बोलायचे. कपिलच्या हे लक्षात आलं होतंच. तो मुद्दाम मलाच काम सांगायचा. मी व्यवस्थितरीत्या दुर्लक्ष करायचे. सेटवर आता आमची दुष्मनी आहे हे मी जवळ जवळ क्लीअर करून टाकलं होतं. पण तरीही तो हे भासवू द्यायचा नाही. त्याचं ते casual असण्याचाच मला फ़ार राग यायचा. एके दिवशी एपिसोडमधे अचानक काहीतरी बदल झाला. त्यामुळे शूटिंग पण अचानक ठरलं. अभिषेक त्यादिवशी आला नव्हता. तसापण सेट त्यादिवशी सुना सुना वाटत होता. कारण बरेचसे मेंबर पोचले नव्हते. चांदिवलीच्या एका स्टुडिओमधे शूट होतं. संध्याकाळी चारला चालू झालेलं शूट रात्री दोन वाजता संपलं. पॅक अप झाल्या झाल्या ज्याना जाणं शक्य होते ते पळाले. माझं काम आटपेपर्यंत अडीच वाजुन गेले होते. सेटवर मी आणि कपिल दोघंच उरलो होतो. "मी सोडू तुला?" त्याने बाईक स्टार्ट करत विचारलं. "नको. मी जाइन माझी मी" मी चिडून उत्तर दिलं. स्टुडिओपासून स्टेशन लांब होतं. आणि लोकल अजून बंद असतील. पण तरीही मी त्याच्यासोबत जाणार नव्हते. "हे बघ, इथे तुला बोलणारं कुणीपण नाहीये. उगाच नखरे करू नकोस. चल मुकाट, मी हॉस्टेलवर सोडतो तुला." त्याने जवळ जवळ मला धमकी दिली. मी माझी बॅग उचलून चालायला लागले त्याने बाईक बंद केली. आणि तो माझ्याजवळ आला. मी चिडलेली होतेच. तो माझ्याहून जास्त चिडला होता. "इतक्या रात्री तू कुठेही जात नाहियेस, समजलं?" " मी मला हवी तिथे जाईन, तू काय तुझा बाप पण मला थांबवू शकणार नाही.." मी पण ओरडले. तो दोन पावलं पुढे आला. आणि चक्क त्याने माझ्या थोबाडीत मारली. मी जवळ जवळ किंचाळले. आतापर्यंत माझ्या आईवडेलानी माझ्यावर कधी हात उगारला नव्हता. आणी याने मला मारलं. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पण मला रडायचं नव्हतं. माझ्याच दातानी मी ओठ घट्ट दाबून धरले. तो फ़क्त माझ्याकडे पहात होता. "ओके. I am sorry. चल गाडीवर बस." जणू काही झालेलं नसल्यासारखं म्हणाला. मी नाही म्हणून मान हलवली. "सॉरी म्हटलं ना... आता चल आधीच उशीर झालाय. उद्या परत दुपारची शिफ़्ट आहे." "मी येत नाही" मी हुंदक्यामधून उत्तर दिलं. "असं करू नकोस. रात्र फ़ार झाली आहे. आणि तसा हा एरिया चांगल नाही. प्लीज.. ऐक माझं." त्याने खिशातून रुमाल काढून माझे डोळॅ पुसले. "तू मला का मारलं?" "असंच.. मला तुझा फ़ार राग आला म्हणून. आता चल नाहीतर परत एक फ़टका देईन " तो हसत म्हणाला. मी पुतळ्यासारखी तिथेच उभी होते. "तू जा. मी सकाळी जाईन हॉस्टेलवर, इथेच मेक अप रूममधे झोपेन." "ठीक आहे. मी पण इथेच थांबतो. नाहीतरी सकाळी दहाची शिफ़्ट आहेच. " हे सोल्युशन मी विचारात घेतलं नव्हतं. उद्या सेटवार काय चर्चा रंगेल याची मला अजूनच चिंता वाटायला लागली. माझ्या चेहर्यावरचे भाव बघून तो हसत होता. आणि मला अजूनच राग येत होता. शेवटी वैतागून मी माझी पर्स खाली ठेवली आणि स्टुडिओतली एक खुर्ची आणुन तिथे बसले. जे होईल ते नंतर बघू. एक तर दिवसभराच्या धावपळीने जाम दमले होते. त्यात परत हे कपिल नावाचं भूत पाठी लागलं होतं. झक मारली आणी इतक्या उशिरापर्यंत थांबले असं वाटायला लागलं. कपिल त्याच्या बाईकवर बसून शांतपणे सिगरेट ओढत होता. "नंदिनी...." त्याने मला आवाज दिला, मी माझ्या मोबाईलमधे वाचलेलेच मेसेज परत वाचण्यात गुंग होते.. किंवा तसं भासवत होते. "नंदिनी....." त्याने परत एकदा आवाज दिला. मी लक्ष दिलं नाही. "तुला खरंतर एकदा बुढ्या बाबाकडे न्यायला पाहिजे. आमच्या गावामधे. तोच तुझा इलाज करेल." "कोण बुढा बाबा?" मी वैतागून विचारलं. त्याला बहुतेक मला बोलतं करायचं होतं. कपिल लहानाचा मोठा मुंबईमधे झाला होता. कुठलं गाव आणि कुठला बुढा. "होता आमच्या गावात.." तो आकाशाकडे बघत म्हणाला.. "झाडपाल्याची औषध द्यायचा. ज्याचा दिमाग कामातून गेला असेल त्याच्यासाठी." मी काहीच बोलले नाही. "पण आता बुढाबाबा नाही राहिला." कुठल्या पिक्चरची स्टोरी सांगत होता कुणास ठाऊक. एकटाच बडबडल्यासारखा बोलत होता. "नंदिनी... माझं गाव कसं होतं. माहीत आहे?सुंदर. कुदरत का करिष्मा. पूर्ण वादीमधलं सर्वात मस्त गाव... पण आता काहीच नाही. चार तास.. फ़क्त चार तास आणि गावामधला प्रत्येक माणूस मेला. त्याच्या चितेला अग्नी द्यायला आणि कबरमधे दफ़न करायला मीच एकटा उरलो." "कपिल आता बास... काहीही मूर्खासारखं बोलू नको" मी चिडून म्हणाले. "नंदिनी.. मी कश्मिरचा आहे. आणि हे सर्व मी खरं सांगतोय. काश्मिरी पंडीत आम्ही. नेहरू आडनाव.. बहुतेकाना वाटतं की मी पण तो नेहरू आहे म्हणून. दहा वर्षाचा होतो.. माझ्या मित्राच्या मोठ्या बहिणीचं लग्न होतं म्हणून बाजूच्या गावात गेलो होतो. लग्न कधी झालंच नाही. बारात यायच्या ऐवजी ते लोक आले. माझ्या गावाची हालत सांगायला." बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणी आलं होत. "तसं मी कुणाला सांगत नाहे. काय सांगणार? या हातानी चिता पेटवली की शेजार् ०दयाच्या अंगावर माती लोटली? कितीतरी रात्री झोपलो नाही. डोळे मिटले की मा दिसायची. बाबा दिसायचा. चिंधड्या उडून पडलेले. तुकडे झालेले. मी गोळा केलेले. माझं कुणीच शिल्लक नव्हतं. मुंबईच्या अनाथाश्रमात आणलं.. मला शाळेत जायला एक वेगळी कार होती... इथे माझ्या दोन वेळच्या खाण्याची बोंब होती. एक दिवस ते अनाथाश्रम सोडलं. रस्त्यावर आलो. सोडून पडेल ते काम केलं. फ़क्त भीक मागणं सोडून. हळू हळू मुंबईची सवय झाली. कधीकाळी मी एका छोट्या गावात राहत होतो हे लोक विसरून गेले. मी कधीच नाही विसरलो. एक ना एक दिवस मी माझ्या गावात परत जाणार.. आता कोण सुद्धा आहत नाही तिथे. मी एखादं स्कूल चालू करेन. बेस्ट स्कूल. इथे मुंबईमधे जसं असतं ना तसं. पूर्ण गाव परत बनवेन. शूटिंगला जागा भाड्याने देईन.. "कपिल.. हे सर्व तुला मला का सांगतोयस?" "माहीत नाही. बर्याचदा बरंचसं आपल्याला माहीत नसतं तसंच हे पण समज. किंवा असं समज की तुझा राग घालवण्यासाठी म्हणून मी तुला हे सांगतोय....." मी हसले. "नंदिनी.. तू येशील माझ्या गावामधे?" "मी? कशाला?" "समजा अधून मधून कधी कुणी नको असलेले लोक आले तर त्याना घाबरवायला...." पहाट झाली होती... लोकल चालू झाल्या होत्या तरी कपिल मला हॉस्टेलपर्यन्त सोडून गेला. त्यानंतर चार की पाच दिवसानी मला फ़्री प्रेसच जॉब आला. मी सेटवर जेव्हा अनाऊन्स केलं तेव्हा कपिलने सर्वाना मिठाई वाटली. मग मी आणि कपिल भेटलोच नाही. अधून मधून त्याचे मेल्स यायचे. हल्ली हल्ली तर तेही बंद झाले... मी पण कधी विचार केला नाही. काल रात्री तीन वाजता अभिषेकचा फोन आला. कपिल काल रात्री गेला. खूप दूर. कश्मिरपेक्षाही खूप दूर. निमित्त झालं बाईक आणि ट्रकच्या टक्करचं... मला मात्र त्याचं ते उजाड गाव अजूनच भकास दिसतय.. कुणाचीतरी वाट बघत उभं असल्यासारखं... बाहेरून मेलेलं पण आतून जिवंत... (समाप्त) +================== पूर्णपणे सत्य घटना...
|
Itgirl
| |
| Thursday, October 25, 2007 - 12:22 pm: |
| 
|
नंदिनी शब्दांच्या पलीकडच शब्दांत पकडलयस..... शब्दांत काय प्रतिक्रिया देणार ग..
|
Ana_meera
| |
| Thursday, October 25, 2007 - 12:30 pm: |
| 
|
डोळ्यासमोर उभा राहिला ग तो कपिल अन ते सारे प्रसंगही....
|
Tiu
| |
| Thursday, October 25, 2007 - 2:59 pm: |
| 
|
नंदिनी! .. .. ..
|
Chinnu
| |
| Thursday, October 25, 2007 - 4:48 pm: |
| 
|
नंदिनी काही सुचत नाहीये लिहायला.. मन सुन्न झालं वाचून. कश्मिरी पंडितांची समस्या फार दारूण आहे. पुन्हा परमुलुखात पायावर उभे रहायचे म्हणजे फार मोठी कसोटी असते. मुंबई बरीच forgiving आहे तरी मदती पेक्षा विचकणारे दात कुठेही जरा जास्त दिसतात. माझी एक क्लास मेट होती कश्मिरी पंडित. तिला कायम सूड उगवायचा विचार यायचे मनात. भळभळत राहिलेलं तिच दु:ख फार भयंकर होतं. जीव मुठीत धरून तेथून बाहेर पडता अलं त्यांन्ना ह्याचाच आनंद जास्त होता..
|
नंदिनी, अतिशय सुरेख लिहील आहेस. पण लिहिण्याची वाखाणणी करायची की सत्य घटना आहे म्हणून दुख्: व्यक्त करायचे, तेच कळेनासे झाले. तो अपघातात गेला त्याचे नाही, त्याला जे भोगावे लागले त्याचे. माझ्यापण वर्गात एक काश्मिरी होता. त्याच्या पालकांनापण पळून यावे लागले होते. तिथले गबर पण इथे हातात काहिही नाही अशा स्थितीत. इथे येऊन व्यवसाय करून परत श्रीमंत झाले पण अती हाल काढले. त्यामूळे मोगलांचा विषय निघाला की शिव्या सुरु. त्यांच्या कथा ऐकल्या की मन सुन्न होते. कसला अहिंसावाद नि कसल काय. अजून एक सिंधी मित्र आहे ज्यांना फ़ाळणीत सगळे सोडून यावे लागले. भारतातल्या भारतातच, पण तिथे मोगलांचा जोर म्हणून. तो देखील पेटून असतो. ही सर्वधर्म समभावाची भेट
|
Dineshvs
| |
| Friday, October 26, 2007 - 3:40 am: |
| 
|
छान लिहिलय नंदिनी. तसा मुंबईत आपला मूळच्या काश्मिरी लोकांशी फारच कमी संबंध येतो. आणि ते सहसा मन मोकळं करतही नाहीत. तसा आता काश्मिर निवळलाय, पण अजुनही धास्ती असतेच. मला परदेशी भेटलेला एक काश्मिर, थोडी ओळख झाल्यावर म्हणाला होता, कि नुसता उपचार म्हणुनही मी, तूला माझ्या घरी ये असे म्हणू शकत नाही. कारण मीदेखील तिथे कधी जाईन ते सांगू शकत नाही.
|
Manjud
| |
| Friday, October 26, 2007 - 5:46 am: |
| 
|
नंदिनी, तुझं ललित लिखाण थेट हृदयाला भिडतं..... तू कुठेही गेलीस तरी मायबोली लिखाण सोडू नकोस..
|
Jo_s
| |
| Friday, October 26, 2007 - 5:57 am: |
| 
|
नंदीनी छान छानच लिहीलयस सुधीर
|
Pillu
| |
| Friday, October 26, 2007 - 7:03 am: |
| 
|
नंदिनी खुप छान लिहिले आहेस. खुप भावले मनाला. मी या काश्मिरी पंडितावर झालेले अत्याचार जवळुन बघितले आहेत. अगदी २ वर्षांपुर्वी
|
Monakshi
| |
| Friday, October 26, 2007 - 7:12 am: |
| 
|
नंदू........ .. .. .. ..
|
Prajaktad
| |
| Friday, October 26, 2007 - 9:56 am: |
| 
|
extremely touching ! माचिस मधले ' छोड आये हम वो गलिया ' आठवल.. तुझ लिखाण चांगल आहेच.. अनुभवसम्रुद्ध ही आहे
|
मिशन काश्मीर मधल्या ऋतीक ची आठवन झाली; घटना तशीच फक्त तिकडे पोलीसांनी गोळीबार केल्याचे दाखवले. साला तिकडेही सेक्युलरपणा आडवा आला.
|
.. .. .. .. ..
|
Dsirute
| |
| Monday, October 29, 2007 - 2:11 pm: |
| 
|
लेखन आवडले ! कपील आवडला आणि त्याचे स्वप्नही, त्याहीपेक्षा लेखनाचे कौशल्य एकदम सही !
|
Daad
| |
| Tuesday, October 30, 2007 - 6:27 am: |
| 
|
नंदिनी, खूप सुंदर. ****"नंदिनी...." त्याने मला आवाज दिला, मी माझ्या मोबाईलमधे वाचलेलेच मेसेज परत वाचण्यात गुंग होते.. किंवा तसं भासवत होते. **** मला हे तुझं डोळ्यांसमोर माणसं, स्वभाव, घटना जिवंत करणं अतिशय अतिशय भावतं. अतिशय मोजक्या शब्दात.... ते सुद्धा! जियो!
|
Anaghavn
| |
| Tuesday, October 30, 2007 - 6:48 am: |
| 
|
नंदिनी,डोळ्यात पाणी येण्याइतकीही मनाला शुध्ध राहीली नाही.सुन्न वाटलं खुप. दसरयाच्या दिवशी,एक कश्मिरी माणूस आमच्या बिल्डिंग मध्ये आला होता.त्यांचा कंम्प चिंचवड का कुठेतरी आहे. त्यांच्या अडचणी सांगत होता.पण माझ्यासारख्या "सो कॉल्ड" सोफस्टिकेटेड मुलीकडे कुठला आलाय वेळ!!!!!आम्ही त्याची कैफियत ऐकली.पण सहज पणे विसरून गेले होते मी!!!!!!!!!!!!!! आज तुझा लेख वाचल्यावर, खरं सांगते,त्याचाच चेहरा डोळ्यासमोर आला. निराश,हताश!!! एक कपिल माझ्याकडे येउन गेला,पण स्वतःला "संवेदनशिल" म्हणवणारया मला,त्याच्या डोळ्यातली व्यथा त्यावेळेस नाही कळली. तुझ्यामुळे आज ज़ाणिव झाली. लाज वाटतेय आज. अनघा.
|
नंदिनि खरच सुंदर लिहिले आहे.
|
Mi_anu
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:10 am: |
| 
|
जबरदस्त लिहीले आहेस. ही सत्यकथा असेल तर या लिखाणाबद्दल 'आणखी येऊद्यात लिखाण' किंवा 'अभिनंदन' असे प्रतीसाद देणार नाही, पण डोळ्यात पाणी आलं इतकंच सांगते.
|
नंदिनी, मनाला भिडेल अस लिहिल आहेस तुझ्या लिखणाने कपिल ला प्रत्यक्ष भेटतेय वाटल ग
|
|
|