|
Pramoddeo
| |
| Thursday, October 04, 2007 - 1:59 pm: |
|
|
काय झालंय ह्या लोकांना? एव्हढ्या तेव्हढ्यावरून का चिडतात? का मारामार्या करतात?उठसुठ बाबा-बुवांच्या भजनी का लागतात? का स्वतःची आणि दुसर्याची अशी फसवणुक करतात? का पैसा,मानमरातबाच्या मागे लागतात? शांत ,स्वस्थ आयुष्य जगण्या ऐवजी एकमेकांशी सतत स्पर्धा का करतात. हार झाली तर रडत बसतात. जिंकले की प्रतिस्पर्ध्याला चिडवतात. हे सगळे असे का होते? एकमेकांवरचा विश्वास का उडालाय लोकांचा? का,का आणि का? हे असले जीवघेणे प्रश्न सारखे सतावत असतात. पण मी कशाला ह्या सगळ्याचा विचार करतोय? जो तो समर्थ आहे की त्यांचा त्यांचा विचार करायला. मग मी कशाला उगीच काथ्याकुट करतोय? सगळ्या जगाचे ओझे माझ्याच एकट्याच्या शिरावर कुणी दिलेय? नाही ना! मग गप बसायला काय घेशील? तू कधी पासून असा विचार प्रवण झालास? तुला आठवतेय! त्या कदमकाकांनी काय सांगितले होते? कोण कदमकाका? मला तर काहीच आठवत नाहीये. अरे ते नाही का तुमच्याच वाडीत राहायचे एका छोट्याश्या झोपडीत? त्यांचा मुलगा 'उपा' तुझा मित्र नव्हता का? आणि त्याचा मोठा भाऊ 'दादा'! तो मिलिटरीवाला! विसरलास सगळे? लहानपणी तू त्यांच्या घरी गेला होतास तेव्हा नाही का तुझा हात पाहून ते म्हणाले होते की तू तुझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात संन्यस्त वृत्तीचा होशील म्हणून? हॅ! असल्या भाकड गोष्टींवर माझा विश्वास नाही. ते आपले गमतीने म्हणाले. तसे तर काय माझ्या पत्रिकेत 'राजयोग' होता; पण मी राजा सोड साधा प्रधानही बनलो नाही कधी नाटकातला. सांगणारे काय काहीही सांगतात. अजून एक गंमत सांगतो. माझ्या जन्म पत्रिकेप्रमाणे मी माझ्या वयाच्या २२ ते २५ ह्या वर्षात बाप बनणार होतो.अरे पण माझे लग्नच मुळी ३५व्या वर्षी झाले तर मी कसा बनणार होतो बाप त्याआधी? हे कसे सांगता आले नाही त्या ज्योतिषांना? काही तरी आकडेमोड करतात आणि फेकतात तुमच्या थोबाडावर! माझा तर ह्या असल्या गोष्टीवर काडीचाही विश्वास नाही बरं का! असं? मग रोज वर्तमानपत्रातले राशी भविष्य कशाला रे पाहतोस? हॅ! त्यात काय! जरा गंमत म्हणून बघतो झाले. अरे त्यातली गंमत तुला सांगतो. ऐक! हल्लीच एकदा काय लिहिले होते तर 'आज बायकोपासून सुख मिळेल'! आहे की नाही गंमत! आता बायकोच नाही हयात तर तिच्यापासून सुख कसे मिळणार?पण हे बेटे मनाला येईल ते लिहितात. कधी कधी हे लोक काय लिहितात ते त्यांना तरी कळत असेल की नाही ह्याची मला शंका येते. काय ते नीट बोल! उगीच फेकाफेक करु नकोस! रोज सगळ्या राशींचे भविष्य न चुकता वाचतोस ते कशाला रे आणि तुझी रास कुठली बरं? तशी पत्रिकेप्रमाणे म्हणजे चांद्र रास म्हटलीस तर कुंभ आहे आणि सुर्यरास(इंग्रजी जन्म तारखेप्रमाणे) पण कुंभच आहे. मला हे कळत नाही की एक सकाळी उगवतो(म्हणजे तो उगवला की सकाळ होते असे म्हणू या)आणि एक रात्री. मग तरीही माझ्या दोन्ही राशी कुंभ कशा? हे असले प्रश्न मला विचारू नकोस(हवे तर घाटपांडे साहेबांना विचार)!उगीच माझं डोकं खाऊ नकोस. विषय कुठे सुरु झाला आणि तू कुठे पोचलास. मी तुला कदमकाकांनी सांगितलेले भविष्य सांगत होतो. मी आता विचारीन त्या प्रश्नाची सरळ उत्तरे निमूटपणे दे. जास्त पकपक करू नकोस! काय? हां,आता तुझे उत्तरायुष्य सुरु झालेय! बरोबर? बरोबर आहे बाबा! बोल पुढे! तर हल्ली तुझ्या मनात कसले कसले विचार येतात ते तू मगाशीच बोललास. ते विचार सामान्य माणसाला कधी सुचतात काय मला सांग? माझ्या मते असले विचार नेहमी तत्वज्ञानी आणि संन्यस्त माणसांनाच पडतात. अरे पण मी पण चारचौघांसारखाच आहे ना! मलाही ते तुम्ही काय म्हणता ,त्या षडरिपुंनी वेढलंय ना! मी कुठे त्या मोठ्या लोकांसारखा वागतो. हां! आता कधी कधी नाटक करतो मोठेपणाचे. कुणी फसतं ! कुणी हसतं! पण मी आपला साधा,सरळ आणि सामान्य माणुस आहे. आता रिकामा वेळ असतो म्हणून कदाचित उगीचच हाय-फाय विचार करत असेन. बाकी अजून कसलाही मोह सुटलेला नाहीये. उगीच तू सुतावरून स्वर्गाला जाऊ नकोस! ह्या जगात सगळ्यात सोपे काय आहे? तर ते म्हणजे तत्वज्ञान सांगणे,उपदेश करणे! आपण फक्त सांगायचे असते! तसे वागायचे कधीच नसते! आणि मी तरी वेगळे काय करतोय? काय समजलास बेंबट्या?? क्रमशः
|
Shyamli
| |
| Thursday, October 04, 2007 - 6:05 pm: |
|
|
मायबोलीवर स्वागत आता भराभर येउ द्या तुमच सगळ लिखाण.
|
Jayavi
| |
| Friday, October 05, 2007 - 7:09 am: |
|
|
वा.... सुरवात मस्त झालीये.... आने दो...
|
Shamli
| |
| Friday, October 05, 2007 - 7:50 am: |
|
|
ह्या जगात सगळ्यात सोपे काय आहे? तर ते म्हणजे तत्वज्ञान सांगणे,उपदेश करणे<<<<<<<<<<, अगदि खरय, हे बाबा लोक एसि कार, विमानातुन हिन्ड्तात फ़ाइव्ह स्टार होटेल मधे राहतात आणि उपाशि जनतेला उपदेश देतात. लोकहि मुर्ख आहेत.. गाव खेड्यातुन ट्रक ला लोम्बकळुन चिमणे पिल्ल घेउन येतात. खायचे हाल रहायचे हाल, तरिहि आग नागपुरातल रेशिमबाग ग्राउन्ड प्रसिद्ध आहे यासाठि. कुठे गाडगे बाबा अन कुठे हे आ....., ग़ो.........., सु............. महाराज चिड...... चिड्ड्ड्ड येते विषयान्तर झाल्या बद्दल माफ़ि
|
Pramoddeo
| |
| Friday, October 05, 2007 - 8:27 am: |
|
|
ते मलाही माहित आहे. तू सांगायची काही जरूर नाही. आपले नेते नाही का नेहमी सांगतात की "देशासाठी त्याग करा"! पण स्वतः मात्र लाभाची पदे लाटण्यात अगदी पुढे असतात. ते बाबा-बुवा लोकही तसेच स्वतः मात्र ऐश्वर्यात लोळतात आणि लोकांना सांगतात सत्ता,संपत्तीचा मोह सोडा. संपत्ती दान करा(कुणाला? तर ह्यांना)! संसार करून कुणाचे भले झालेय(ह्यांचे अंग रगडून द्यायला मात्र ह्यांना सुंदर सुंदर स्त्रिया लागतात)? त्यापेक्षा आमच्या चरणावर लीन व्हा! आम्ही तुम्हाला सन्मार्ग दाखवतो.परमार्थ साधा भक्तानो आणि मुक्ती मिळवा. हे बाकी तुझे पटले बरं का! मी सुद्धा विचार करतो कधी कधी "बाबा" बनण्याचा! मागे माझा मित्र दादा मला म्हणाला होता की "तू बाबा हो. मी तुझा चेला बनतो आणि तुफान प्रसिद्धी करतो"! अरे पण बाबा बनणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी काहि गोष्टींचा दांडगा अभ्यास लागतो. पहिले म्हणजे लोकांना आकर्षित करेल अशी बोलबच्चनगिरी करता आली पाहिजे. झालंच तर चमत्काराच्या नावाखाली काही हातचलाखीचे प्रकारही करता आले पाहिजेत. तुझ्याकडे काय आहे? कधी आरशात पाहिले आहेस का आपले मुखकमल(थोबाडच म्हणणार होतो; पण जाऊ दे काही झाले तरी आपला मराठी माणूस आहेस म्हणून सोडून देतो)? माझे पराक्रम ऐकायचेत? अरे एकापेक्षा एक असे चमत्कार केलेत मी. तू आपली झूकझूक गाडी कधी थांबवू शकतोस? अरे हट! तुला जमणार नाही. त्याला माझ्यासारखा पॉवरबाज माणुस पाहिजे. काय तरी फेकू नकोस. कधी आणि कशी थांबवलीस तू गाडी? काय ते स्पष्ट बोल. उगाच तोंडची वाफ फुकट घालवू नकोस. काय समजले? अस्सं! तर मग ऐक मी आणि माझा एक मित्र अंत्या(अनंत) चर्चगेटहून घरी यायला निघालो. अंत्याला पालघरला जायचे होते आणि मी मालाडला जाणार होतो. साहजिकच मी बोरिवली लोकलची वाट पाहात होतो आणि अंत्या विरार लोकलची. आधी विरार लोकल फलाटावर आली. अंत्याने चपळाईने त्यात शिरकाव करुन खिडकीजवळ्ची जागा पटकावली.त्याची गाडी गेल्यानंतर त्याच फलाटावर माझी गाडी येणार होती म्हणून मी त्याच्याशी गप्पा मारत उभा राहिलो. खरे तर अंत्याने माझ्याबरोबर बोरिवली लोकलने यावे आणि मग पुढे गाडी बदलून जावे असे वाटत होते म्हणून मी त्याला सारखे सांगत होतो की "अंत्या ! लेका ही गाडी आज रद्द होणार आहे. आता बघ ही गाडी यार्डात जाईल. तू उतर आणि माझ्या बरोबर चल". पण एक नाही आणि दोन नाही. बराच वेळ झाला. गाडीची निघण्याची वेळही टळून ५ मिनिटे झाली(लोकलच्या वेळापत्रकात पाच मिनिटे म्हणजे पाच तासांसारखी वाटतात) तरी गाडी हलायचे लक्षण दिसेना आणि मी पुन्हःपुन्हा त्याला सांगतोय की "अरे बाबा अंत्या उतर ह्या गाडीतून! ही गाडी इथून हल्याची नाय"! माझे हे बोलणे इतर लोकही ऐकत होते. त्यापैकी काही लोकांनी रेल्वेला आणि मला शिव्या द्यायला सुरुवात केली. शेवटी अंत्या कंटाळून डब्याच्या बाहेर पडला आणि उद्घोषणा झाली , "तीन नंबरकी विरार जानेवाली गाडी कुछ तकनिकी खराबीके कारण यार्डमे(भाडमे!) जायेगी!" मी आणि अंत्या तिथून दूर पळालो. लोक मला शोधायला लागले . कुठे आहे तो काळतोंड्या म्हणून. तेव्हा, समजली माझी पावर! अरे असे अजून किती तरी चिमित्कार आहेत. मी सांगता सांगता आणि तू ऐकता ऐकता आपण दोघेही थकून जाऊ. आता बोल आहे की नाही बाबा बनायची पावर? हॅ! हे तर "कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ" अशा प्रकारचे आहे. अजून काही असेल तर बोल! सांगतो . अजून एक किस्सा सांगतो पण वाईच दम खाऊ दे! क्रमश:
|
Tiu
| |
| Friday, October 05, 2007 - 9:07 pm: |
|
|
शामली...खरंय! कुठे गाडगेबाबा आणी कुठे हे आजकालचे ढोंगीबाबा. प्रमोदकाका! मस्तच एकदम. आवडलं. मी तुमचा ब्लॉग वाचतो regularly . फार छान लिहिता तुम्ही...
|
Itgirl
| |
| Saturday, October 06, 2007 - 4:50 am: |
|
|
काय आहे ब्लॉग च नाव? आवडल लिखाण
|
Pramoddeo
| |
| Saturday, October 06, 2007 - 5:01 am: |
|
|
Shyamli, Jayavi, Tiu आणि Itgirl आपल्या सगळ्यांच्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! Itgirl माझ्या जालनिशीचे(ब्लॉगचे) नाव आहे http://purvaanubhava.blogspot.com/
|
Pramoddeo
| |
| Saturday, October 06, 2007 - 5:16 am: |
|
|
हां! ऐक तर आता दुसरा चिमित्कार! असाच एकदा मी रस्त्याने चाललो होतो. माझ्याच नादात होतो.रस्त्यातली गर्दी चुकवीत चाललो होतो. ते गाणं आहे ना वसंतरावांचे "वाटेवर काटे वेचीत चाललो,वाटते जसा फुला-फुलात चाललो" अगदी तसाच आपल्याच नादात चालत होतो.बाकी वसंतराव म्हणजे एकदम जंक्शन माणुस बरं का! आपण तर त्याचा पंखाच आहे. त्यांचे ते अनुनासिक बोलणे आणि आणि दमदार गाणे हे दोन्हीही मला आवडते. कधी तरी त्यांच्या गाण्याची नक्कल करायची पण हुक्की येते. माझ्या नरड्यातून वसंतराव जेव्हा गातात तेव्हा मला कळते की ते गाणं किती कठीण आहे ते.पण तरी मजा येतो.त्या वेळी आपल्याला कुणी "किंचित वसंतराव" म्हटले ना तरी आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटेल. पण लोकांना पारख नाही ना असली गोष्टींची. अरे तू कुठे भरकटलास? तुझी पावर दाखवत होतास ना ? मग असा मध्येच रस्ता सोडून त्या बाबा बर्व्यांसारखा (ते कसे मध्येच वेदकालीन जंगलात घुसायचे) संगीताच्या जंगलात घुसलास! मूळ मुद्यावर ये! हां! तर तू रस्त्याने चालला होतास, आता पुढे बोल. तर काय झालं? माझ्या बाजूने एक बस धडधडत गेली. आता रस्त्यावरनं तुझ्या बाजूने एक बस धडधडत गेली ह्यात काय विशेष? बसऐवजी काय रणगाडा जायला हवा होता काय? तू असा मध्ये मध्ये हाल्ट करू नको हां(काय आरडरलीचा रुबाब होता नाय!) सांगून ठेवताय. मंग लिंक तुटतेय ना. तर ती बस जेव्हा माझ्या बाजूने गेली तेव्हाच माझ्या मनात विचार आला की "ही बस काय शेवटपर्यंत पोचणार नाही"! म्हणजे? सांगतो. तशी ती माझ्यापासून पुढे ५० पावलांवर(म्हणजे तिच्या चाकांवर म्हणू या) जाऊन थांब्यावर थांबली. त्यातनें एक-दोन प्रवासी उतरले आणि पाच-सहा चढले. बस पुन्हा सुरु झाली आणि मोजून १० पावले पुढे गेली आणि पुन्हा थांबली. एक-एक करून लोक खाली उतरत होते. तोपर्यंत मी देखिल तिथे पोचलो. कुतुहल म्हणून एकाला विचारले की हे सगळे लोक खाली का उतरताहेत? अजून तर खूप लांब जायचंय ह्या बसला. मग हा प्रकार काय आहे? काय झालं होतं? काय होणार? बस "बंद" पडली होती. डायवर साहेबांनी सांगितले की आता बस अजिबात हल्याची नाय तवा मुकाटपणे खाली उतरा समद्यांनी. आता बोल. हाय का नाही माझी पावर? विचार करावा लागेल. तरीपण हे देखिल "बोला फुलाला गाठ " असेच म्हणता येईल. अजून आहे काय एखादा किस्सा?असेल तर बोल. आहे ना. सांगतो. पण हा किस्सा माझ्या पावरचा आहे असे म्हणावेसे मला वाटत नाही. पण माझ्या तोंडून निघाले आणि दुर्दैवाने ते खरे झाले. हा किस्सा सांगताना मला मुळीच आनंद होत नाहीये.पण काहीतरी पूर्वसूचना मला मिळत असावी असे वाटते म्हणून हाही किस्सा ऐक. सांग. आता माझेही औत्सुक्य वाढलंय! मी नववीत असतानाची ही गोष्ट आहे(१९६६ सालची). त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते लाल बहाद्दुर शास्त्री. नुकतेच पाकिस्तान विरुद्धचे युद्ध आपण जिंकले होते. "जय जवान,जय किसान" असा नारा देत शास्त्रीजींनी जनमानसात एक नवे स्फुल्लिंग चेतवले होते.म्हणूनच शास्त्रीजींना आजवर भारताला लाभलेला सर्वात कार्यक्षम आणि लोकप्रिय पंतप्रधान असे मी मानतो. "मूर्ती लहान पण किर्ती महान" ही म्हण सार्थ करणारा हा माणूस अकाली जाण्याने भारताचे नशीबच फिरले असेही मला वाटते. असो. तर पुढे ऐक. मी नागरिक शास्त्राचा अभ्यास करत होतो. त्यात कुठे तरी असा संदर्भ आला की "कै.शास्त्रींनी अमूक अमूक ठराव मांडला(की काय. नक्की आठवत नाही ते वाक्य)". हे वाचताच मी सहजपणे आईला म्हटले, "आई! शास्त्री तर जीवंत आहेत.ते आपले पंतप्रधान आहेत आणि सद्या ताश्कंदमध्ये आहेत. मग त्यांचा उल्लेख असा "कै." म्हणून का केला? आई म्हणाली, " अरे ते दुसरे कुणी असतील. हे कसे असतील? इतके साधे तुला कळू नये म्हणजे कमाल झाली. मुर्खासारखे काही तरी बोलू नकोस". दुसर्या दिवशी सकाळी सकाळी रेडिओ लावला तेव्हा रोजच्या मंगलमय सनईचे सूर ऐकू येण्याऐवजी रडकी सारंगी वाजत होती. तिथेच लक्षात आले की काही तरी गडबड आहे. कुणी तरी मोठा माणूस "गेला" असावा. सारंगीचे रडणे संपले आणि निवेदकाने अतिशय व्यथित स्वरात जे सांगितले त ऐकून मी तर हतबुद्धच झालो. तो सांगत होता "भारताचे पंतप्रधान श्री. लाल बहाद्दुर शास्त्री ह्यांचे ताश्कंद येथे दु:खद निधन"! पुढचे मला काहीच ऐकू आले नाही. खरेच! प्रसंग मोठा मन विषण्ण करणारा होता हे मान्य आहे आणि तुझ्या तोंडून नकळत का होईना त्या अभद्राची सूचना मिळाली होती हे आता पटतंय! पण तरीही असे वाटतेय की हा देखिल निव्वळ योगायोग असावा. तू म्हणतो आहेस ते मलाही पटतेय किंबहुना तो प्रसंग अथवा आधी सांगितलेल्या घटना हा निव्वळ योगायोगच होता असेच माझेही मत आहे.फक्त एक गंमत म्हणून तुला हे सगळे सांगितले. कैक वेळेला सामान्य माणसेही अशा घटनांची पूर्वसूचना देतात(त्यातला मीही एक) हेच मी सिद्ध करायचा प्रयत्न करत होतो. मात्र काही धुर्त लोक अशा गोष्टींना चमत्काराचे लेबल लावून त्याचा जनमानसात प्रचार करतात आणि एखाद्याला बाबा बनवून स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेतात. गंमत म्हणजे लोकही चक्क फसतात. म्हणून म्हणतो "बोल! बनू का बाबा? आहे की नाही पावर?" बाबा की जय हो! समाप्त!
|
Itgirl
| |
| Saturday, October 06, 2007 - 5:32 am: |
|
|
मस्तच!! अंतर्मुख करणार पण बुवाबाजी अशीच फ़ैलावत जाते दुर्दैवाने
|
Bsk
| |
| Saturday, October 06, 2007 - 3:16 pm: |
|
|
खूप छान लिहीलंय प्रमोदकाका!! बोला-फुलाला गाठ हा प्रकार खरंच होतो कधीकधी! intuitions असतील कदाचित, पण चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव कधी कधी होते.. आणि हो, मायबोलीवर स्वागत..
|
|
|