|
Zulelal
| |
| Friday, August 24, 2007 - 2:39 am: |
| 
|
परवा बऱ्याच वर्षांनी अचानक वासू रस्त्यात दिसला. मी खूप लांब होतो, म्हणून हाक नाही मारली. पण एकदा गप्पा मारायला त्याच्या घरी जायचंच, असं ठरवून परवा रविवारी मी मुद्दाम वासूच्या बिल्डींगमध्ये गेलो, आणि खालूनच नेमप्लेटवरून वासूचा फ्लॅट शोधून लिप्टमध्ये घुसलो. दरवाजा बंद करणार तेवढ्यात आणखी दोनचार जण घाबऱ्याघाबऱ्या लिफ्टमध्ये शिरले. मला न विचारताच एकानं लिफ्टचं मजल्यांच बटन दाबलं, आणि लिफ्ट सुरू झाली. मला राग आला होता, पण तिसऱ्याच मजल्यावर लिफ्ट थांबली. मलापण तिथंच यायचं होतं. पुन्हा घाईनं लिफ्टचा दरवाजा उघडून ते बाहेर पडले, आणि पॅसेजमधून एका फ्लॅटकडे धावत सुटले. बाहेर येऊन मी शांतपणे लिफ्टचा दरवाजा बंद केला. पॅसेजमधून एकेका फ्लॅटचा नंबर बघत पुढे सरकू लागलो. बऱ्याच वर्षांनी मी वासूच्या घरी येत होतो. एका फ्लॅटच्या बंद दरवाज्याबाहेर बरीच गर्दी जमली होती. सगळेजण आपापसात काही कुजबुजत होते. चेहऱ्यावर काळजी दिसत होती. मी पुढं येऊन दरवाज्यावरचा फ्लॅटचा नंबर बघितला. वासूचाच फ्टॅट होता तो. मी घाबरलो. वासूच्या घरात काही बरंवाईट तर... बाहेरची गर्दी पाहून मनात आलेल्या शंकेनं मी ओशाळलो आणि गर्दीतलाच एक होऊन गेलो. कुणीतरी पुढं होऊन दरवाज्यावरची बेल दाबली, आणि मिनिटभर शांतशांत झालं. सगळ्यांचेच चेहरे आणखी चिंताग्रस्त झाले होते. मीही घाबरलो. बऱ्याच वेळानंतर आतून दरवाजा उघडला. हातात स्क्रू ड्रायव्हर घेतलेला वासू गर्दीकडे पाहात आत उभा होता. काहीही न बोलता सगळे आत घुसले, आणि सगळ्यांच्या नजरा वासूच्या हॉलमधून आतमध्ये काहीतरी शोधू लागल्या. बेडरूमचा दरवाजा बंद दिसत होता. बेडरूमबाहेरच्या पॅसेजमध्ये वासूची बायको थकल्या, खिन्न चेहऱ्यानं उभी होती. कुणीतरी पुढं झाला, आणि बेडरूमच्या लॅचचं हॅंडल बाहेरून वाकडंतिकडं करत फिरवायचा प्रयत्न सुरू केला. ‘चावीवाल्याला बोलवा’... कुणीतरी सुचवलं, आणि माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. वासूच्या बेडरूमचा दरवाजा आतून लॉक झाला होता. ‘अरे, आतून कडी लावलीये त्यानं... लॅचचा सवालच नाय...' कुणीतरी काळडजीनं म्हणालं, आणि मी दचकलो. मामला गंभीर आहे, याची मला खात्री पटली. मी बाजूच्या अनोळखी माणसाला खुणेनंच ‘कोण' म्हणून विचारलं. ‘वासूचा मुलगा'... तो माझ्या कानाशी पुटपुटला. वासूच्या मुलानं बेडरूमची कडी लावून आत कोंडून घेतलं होतं. वस्तुस्थितीची जाणीव झाल्यानं माझा जीव थरकापून गेला. आजकाल पेपरातल्या बातम्या वाचतो ना,... ‘तशा' सगळ्या बातम्या मला आठवल्या... ...‘फायर ब्रिगेडच्या लोकांनी नंतर दरवाजा उघडला, तेव्हा पंख्याला लटकणारा, गळ्याभोवतीची ओढणी’... असं कायकाय माझ्या नजरेसमोर यायला लागलं, आणि रुमाल काढून मी कपाळावरचा घाम पुसला. वासूच्या बायकोचा चेहेरा रडूनरडून सुजल्यासारखा दिसत होता. वासूही सुन्न होता. मी उगीचच इकडेतिकडे पाहात होतो. वासूशी मस्त गप्पा मारायच्या म्हणून मी आलो, आणि हे काय झाले, या विचारानं मी बेचैन होतो. सहज माझी नजर बाहेरच्या हॉलमध्ये भिरभिरली. एका खुंटीवर ती जुनाट, मळकट पिशवी पंख्याच्या वाऱ्याबरोबर झुलत होती. अचानक शेजारचे शिरसाट घरात घुसले. हे माझ्याही ओळखीचे होते. ते काहीतरी शक्कल लढवणार, अशी माझी खात्री झाली. ‘फायर ब्रिगेडला फोन करा'... आत येतायेताच शिरसाट गरजले. आणि खिशातली डायरी काढत वासूच्या हॉलमधला फोन उचलून त्यांनी नंबर फिरवलादेखील. "हॅलो, मी शिरसाट बोलतोय. आमच्या बिल्डिंगमध्ये एक लहान मुलगा बेडरूममध्ये अडकलाय. आतून दरवाजा बंद झालाय... हाक मारूनही आतून कोणीच प्रतिसाद देत नाहीये... कुणालातरी लवकर पाठवा...' शिरसाटांनी घाईघाईनं सांगितलं आणि फोन ठेवला. ‘आता फायर ब्रिगेडवाले आख्खी मुंबई शोधणार' कुणीतरी जोरात म्हणालं, आणि शिरसाटांच्या कपाळावली शीर फुगली. ‘म्हणजे?' शिरसाट तितक्याच जोरात म्हणाले. ‘अहो, तुम्ही पत्ता कुठे सांगितलात आपल्या बिल्डिंगचा त्यांना? कसे येणार फायर ब्रिगेडवाले इथे?' तो माणूस शिरसाटांना म्हणाला, आणि शिरसाट वरमले. ‘ठीकाय... मग करा तुम्ही फोन पुन्हा' डोळे फिरवत शिरसाट म्हणाले, आणि मांडीवर दुसरा पाय घेऊन स्वतःभोवती रुमाल गरागरा फिरवत त्यांनी मान फिरवली. मला आता सगळ्याचा नेमका उलगडा झाला होता... ‘वासूचा मुलगा... म्हणजे केवढा असेल तो' मी वेगळाच विचार करत होतो. पुन्हा माझी नजर त्या पिशवीवर खिळली. ती पंख्याच्या वाऱ्याबरोबर झुलतच होती. पुन्हा दरवाज्याची बेल वाजली, आणि दहाबारा वर्षांचा एक मुलगा आत आला. ‘काय रे, सांगितलंस त्यांना?' इतक्या वेळानंतर पहिल्यांदाच वासूचा आवाज त्या घरात ऐकू आला. मानेनंच नाही म्हणत तो मुलगा हॉलमध्येच एका खुर्चीत बसला. तोही त्या पिशवीकडेच पाहात होता. वाऱ्याबरोबर झुलणाऱ्या त्या पिशवीची त्याला बहुधा गंमत वाटत होती. ‘म्हणजे, आत अडकलाय तो वासूचा दुसरा मुलगा'... एकदा त्या मुलाकडे आणि एकदा पिशवीकडे पाहात मी मनाशीच म्हणालो. पण वेळ गंभीर होती. बेडरूममध्ये अडकलेल्या वासूच्या मुलाला सोडविण्यासाठी आता वेगाने प्रयत्न सुरू झाले होते. आतली कडी कशी काढता येईल, यावर बाहेरच्या हॉलमध्ये वेगवेगळे विचार व्यक्त होत होते. वासूनं हातातला स्क्रू ड्रायव्हर ड्रॉवरमध्ये ठेवला, आणि तोही हॉलमध्ये येऊन उभा राहिला. नेमका त्याच खुंटीखाली... वासूच्या डोक्यावरची पिशवी जरा जास्तच जोरात झुलतेय, असं मला उगीचच वाटलं. आता आजूबाजूच्या काही बायकाही वासूच्या घरात आल्या होत्या. वासूच्या बायकोभोवती गराडा घालून त्यांची चर्चा सुरू झाली आणि घरात एकदम गलका वाढला... वैतागल्यासारखा चेहरा करून वासूनं एकदा चोरून आत बघितलं, आणि पहिल्यांदाच माझ्याकडे बघून तो विषण्ण हसला. ‘तू कधी आलास?' त्यानं जवळ येत विचारलं. मी वासूचा हात हातात धरून दाबला. "मघाशीच' मी म्हणालो. ‘वासू, काय झालंय काय?’ मी विचारलं आणि वासूचे डोळे पाणावले. "अरे माझा धाकटा मुलगा... सकाळी आई कशावरनं तरी ओरडली, आणि रागावून यानं आत जाऊन बेडरूमची कडी लावली.' वासू सांगू लागला... ‘बरोच वेळ ती स्वयपाकघरात कायतरी करत होती, म्हणून विसरूनच गेली. कामं आवरल्यावर बेडरूममध्ये जायला तिनं दरवाजा उघडायला हॅंडल फिरवलं, तरी दरवाजा उघडेनाच. तेव्हा ही घाबरली. पोरगा आत अडकलाय रे... आई ओरडली म्हणून... वाचतोस ना हल्ली पेपरात? ' काळजीनं माझ्याकडे पाहात वासूनं सांगितलं आणि तो पुन्हा विषण्ण झाला. ‘घाबरू नको वासू...' प्रसंगाचं गांभीर्य ओळखून मी वासूला धीर दिला आणि पुन्हा बेडरूमच्या बंद दरवाजाकडे पाहू लागलो. ‘फायर ब्रिगेडवाले अजून कसे आले नाहीत?' कुणीतरी शिरसाटांकडे पाहात विचारलं... ते अजून मान फिरवून तोंडाभोवती रुमालाचा वारा घेत होते. ‘त्यांना परत फोन करून पत्ता सांगा' ते गुरगुरले आणि त्यांनी डायरीचं पान उघडून त्याच्या हातावर ठेवली. एव्हाना मलाही बराच वेळ झाला होता. काहीतरी करून वासूच्या घरावर ओढवलेला हा गंभीर प्रसंग संपला पाहिजे, असं मला वाटत होतं. ‘म्हणजे आपल्याला घरी निघता येईल', मी त्या पिशवीकडे पाहात मनात म्हटलं. ... तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. आता उठून दरवाजा उघडायला कुणीच पुढे झाला नाही. शेवटी मी उठलो, आणि दरवाजा उघडला. कपाळभर कुंकू लावलेली, नऊवारी नेसलेली एक मराठमोळी बाई पदराला हात पुसत बाहेर उभी होती. दरवाजा उघडताच ईकडेतिकडे न बघताच ती तडक आत गेली. कुजबुजतच तिनं कुणाकडे काहीतरी चौकशी केली. वॉशिंग मशीनमधले सकाळी धुतलेले कपडे एका बादलीत काढून बादली बेडरूमच्या दरवाज्याबाहेर आपटत तिनं दरवाजावर थाप मारली... आतून काहीच प्रतिसाद नव्हता. मग तिनं जोरजोरात दरवाजावर हात मारायला सुरुवात केली. आत शांतच होतं. सगळ्यांच्या डोळ्यात भीती जमा होत होती... ‘बंड्या' मोलकरणीनं जराशा जोरातच बाहेरून बेडरूमच्या दरवाज्याशी तोंड नेत हाक मारली... पण काहीच प्रतिसाद नव्हता. ‘बंड्या, बंड्या'... तिनं आणखी जोरात हाका सुरू केल्या... ‘आता दार उगडलं न्हाईस, तर बग... मला लई उशीर होतूया’ ती म्हणाली. तिचा आवाज आता मऊ झाला होता. ‘बंड्या, माज्या राजा, दार उगड रे, मला आटपूंद्या कामं.. घरी पोर वाट बगतायत रे, भुका लागल्या असतीनं ना त्यास्नी...' ती काकुळतीला येऊन दरवाज्याशी बोलली. .... आणि आतून आवाज आला. बेडरूमच्या दरवाजाची कडी काढून बंड्या शांतपणे बाहेर आला होता. बंड्या सुखरूप होता. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता. वासूच्या चेहऱ्यावरची चिंता पुसली होती. माझ्याकडं पाहून तो हसला, आणि त्यानं मान वळवली. तो त्या खुंटीवरच्या पिशवीकडे पाहातोय, असं मला वाटलं. ‘बाबा, काय झालं?' घरातल्या गर्दीकडे पाहात भांबावलेल्या बंड्यानं वासूच्या गळ्याभोवती हात टाकत विचारलं, आणि वासूला एकदम प्रेमाचं भरतं आलं... ‘अरे तू आत अडकलास रे... आमचं पाणीपाणी झालं होतं रे सोन्या’ त्याच्या केसात हात फिरवत वासू म्हणाला... ‘बाबा, पण मी झोपलो होतो. गंगूबाईनं हाक मारली, म्हणून जागा झालो...' बंड्या जोरात म्हणाला, आणि सगळ्यांचे चेहरे पडले. आपण नुस्तीच चर्चा करत होतो, तेव्हा बंड्याला हाक मारायचं कुणालाच कसं सुचलं नाही, असाच विचार सगळ्यांच्या मनात येत असावा. "म्हणजे, बंड्या आत अडकला नव्हता तर...' शिरसाटांकडे पाहात कुणीतरी खवचटपणे विचारलंच. सगळ्या बिल्डिंगभर झालं, की’... त्यानं पुढचे शब्द गिळले आणि सगळे शिरसाटांकडे पाहू लागले. शिरसाटांनी मान फिरवली होती. तेवढ्यात पुन्हा दरवाजाची बेल वाजली... 'फायर ब्रिगेड'... वासूचा थोरला मुलगा ओरडला... जडपणे उठून वासू दरवाजाजवळ गेला आणि ‘काही झालेलं नाही इथे' असं आतूनच ओरडला... पुन्हा एकदा बेल वाजली. निळ्या ड्रेसवाल्यांची फौज हत्यारं घेऊन बाहेर उभी होती. कसंनुसं हासत वासूनं नकारर्थी मान हलवली, आणि विचित्र नजरेनं वासूकडे आणि घरातल्या गर्दीकडे पाहात निळा ड्रेसवाले खाली उतरले. ‘चल वासू, मी निघतो...' मी खुर्चीतून उठत म्हणालो. वासूनं मान हलवली. ‘ये कधीतरी निवांत गप्पा मारायला' वासू माझ्याकडे पाहात म्हणाला. चप्पल पायात सरकवताना मी पुन्हा त्या खुंटीकडं पाहिलं... ती... तीच पिशवी वाऱ्याबरोबर मस्तपैकी झुलत होती. ----
|
छान. पण पिशवीचा संबंध कळला नाही. गळ्याभोवती फास असा आहे का?
|
Zulelal
| |
| Friday, August 24, 2007 - 4:39 am: |
| 
|
वाचा, आधीचे- वासूचे `वस्तु'शास्त्र.
|
छानच!! child psychology आता मोलकरणींनाच कळ्ते म्हणायची!!! 
|
Kanak27
| |
| Friday, August 24, 2007 - 10:10 am: |
| 
|
एकदम मस्त वाचताना लेखकाचे प्रसन्गनुसार बदलणारा चेहरा दिसतो
|
Ajai
| |
| Friday, August 24, 2007 - 10:29 am: |
| 
|
अतिशय सुमार, विनोदाच्या नक्कि कोणत्या प्रकारात मोडतो हा लेख?
|
Psg
| |
| Friday, August 24, 2007 - 10:59 am: |
| 
|
झुलेलाल, ही कथा चांगली आहे. आणि ही स्वतंत्र कथा म्हणूनही वाचता येईल. ती 'पिशवी' इथे अजिबातच नसती तरी चालले असते.
|
Disha013
| |
| Friday, August 24, 2007 - 7:40 pm: |
| 
|
छान लिहीलय!शेवट म्हणजे डोंगर पोखरुन उंदीर निघाला!
|
Farend
| |
| Saturday, August 25, 2007 - 12:14 am: |
| 
|
मलाही कळाली नाही, पहिली सुद्धा कळाली नव्हती. त्याला मुलगा होण्याचा संबंध त्या पिशवीशी होता हे पहिल्या भागात कळाले, पण पुढे त्या पिशवी ने एवढा विनोद काय निर्माण होतो समजत नाही. कोणी खुलासा करेल काय?
|
Manjud
| |
| Saturday, August 25, 2007 - 5:27 am: |
| 
|
पिशवीचा संबंध कळला नाही. एकुणच तुमचा कथा / ललित लिहिण्याचा वेग जास्तं आहे. त्यामुळे मागच्या कथेचा काही संदर्भ असेल तर चटकन लक्षात येत नाही. निदान कथा चालू करताना " ......भाग २ " असं लिहिलं असतं तर थोडा तरी संदर्भ मिळाला असता. प्रतिक्रीया वाचल्यावर कळलं. खरं तर कथेत पिशवी घातलीच नसती तरी चालली असती.
|
Maudee
| |
| Wednesday, August 29, 2007 - 8:51 am: |
| 
|
कथा चांगली आहे पण विनोदी नाही वाटली.... बहुतेक कथाकादंबरी मध्ये यायला हवी होती
|
Prajaktad
| |
| Wednesday, August 29, 2007 - 6:37 pm: |
| 
|
लिखाण विनोदी न वाटता एक साधिशी घटना कथारुपाने वाचतोय अस वाटत...बाकी ललित लिखाण यापेक्षा जास्त चांगले वाटले...
|
|
|