Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
`श्रावणखुणा!!...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » ललित » `श्रावणखुणा!!... « Previous Next »

Zulelal
Sunday, August 19, 2007 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या `शहरी' श्रावणखुणा!..
'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनि ऊन पडे' ..."श्रावणा'च्या कवितेतल्या या ओळी सहजपणे आठवाव्यात, असा श्रावण सध्या इथेही, आमच्या शहरातही बरसतोय. पहाटेच्या निळ्याशार आकाशातल्या पूर्वेला तांबडं फुटत असतानाच अचानक माथ्यावरच्या आकाशावरला एखादा काळा ढग हातपाय पसरायला लागतो आणि बघताबघता चारी दिशा कवेत घेतो. पूर्वेची लाली पार काळवंडून जाते, आणि पहाटस्वप्नातून जागे हाऊन किलबिल करणाऱ्या चिमण्यापाखरांची पळापळ सुरू होते. सिमेंटच्या जंगलातल्या एखाद्या कोपऱ्याला पत्र्याच्या आडोशाखाली काडीकाडी जमवून बांधलेल्या घरातून बाहेर पडून आताआत्ता घुमायला लागलेली जंगली कबुतरं भेदरल्यागत फडफड करत बसतात, आणि बिल्डिंगच्या आडोश्‍याला विसावून मिटल्या डोळ्यांनी आकाशाकडे माना लावून बसतात. पिवल्या फुलांचा बहर ओसरलेल्या बाहव्याच्या एखाद्या फांदीवरच्या एखाद्या विस्कटलेल्या, अस्ताव्यस्त दिसणाऱ्या घरट्यातली कावळ्याची पिल्लं उगीचच कलकलाट करायला लागतात, आणि चहूबाजूंनी कावळ्यांचा एकच कल्ला सुरू होतो. बिचाऱ्या चिमण्या त्या कलकलाटातच कुठेतरी हरवून गेल्यासारख्या चिडीचिप होऊन पाऊस झेलायच्या तयारीत पंख फुगवून बदामाच्या झाडावरल्या एखाद्या रुंद पानाखाली आसरा घेऊन दडी मारतात, आणि काळवंडलेलं आकाश एकदम ओथंबल्यागत होऊन सरसरा जमिनीवर बरसायला लागतं... एक सणसणीत सर मिनिटभरासाठी कोसळते आणि घराघरातला पंख्याचा वेग काहीसा मंदावतो... दमट, घामेजलेल्या हवेला एक थंडशी शिरशिरी येते आणि जराकुठे गारगार वाटायला लागतंय, तोवर ती सर गडप होऊन पुन्हा उन्हाचे कवडसे घराच्या खिडक्‍यांमधून आत दाखल होतात. पुन्हा तोच घामट उकाडा सुरू होतो, आणि पंख्यांच्या वेग वाढतो... श्रावणसरींचं सुख अनुभवू म्हणताम्हणता त्या सरीच गायब होऊन जातात, आणि झाडाच्या पानांआड, पत्र्याच्या आडोशाने आणि क
ाटक्‍यांच्या घरट्यात घाबरून बसलेली तमाम पाखरं पुन्हा पंख पसरून बाहेर पडतात. क्षणभराच्या काळोखीनं केलेली फजिती लपविण्यासाठी, जणू काहीच झालंच नाही, अशा थाटात पुन्हा चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होतो. आपल्या कोवळ्या पिल्लांवर डाफरल्यागत आवाज काढत कावळीही पुन्हा पंख पसरते, आणि मानेभोवती चोची खुपसून उगीचच साफसफाई केल्याच्या ढोंगात कबुतरं बुडून जातात. एखादं कबुतर मस्तपैकी गिरकी मारून पुन्हा येऊन विसावतं आणि घुमतघुमत, सारंकाही "आलबेल' असल्याचा इशारा देतं... मग अवघी फौज आकाशात भरारी मारायला पंख पसरते... एक काळा ढगच जणू एखाद्या इमारतीच्या भिंतीआडून आकाशाकडे झेपावतो...
महिन्याभरापूर्वीच्या पावसानं गॅलरीतल्या कुंड्यांमधल्या रोपट्यांना चांगले कोंब फुटलेले असतात. त्यामुळे, सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा कुंड्यांना पाणी घालायचं घरधनीणीचं एक काम कमी झालेलं असतं. श्रावण सुरू झाल्यापासून कोसळणाऱ्या अशा अवचित सरी मात्र, कुंडीतल्या या रोपट्यांना हुलकावणी देऊनच गायब होतात, आणि पावसाचे चुकार तुषार अंगावर झेलण्यासाठी आतुर झालेली ती कुंडीतली रोपटी, हिरमुसली झाल्यागत कोमेजली होतात. त्यातच, उन्हाचे सपकारे आणखी भर घालतात, आणि पावसाळ्याच्या हिरवाईचा तजेला अंगावर असतानाही, बाथरूमच्या नळाचं, प्लास्टिकच्या "मगा'तून खिडकीबाहेर आलेल्या हातानं ओतलेलं पाणी पिऊन बिचाऱ्यांना पुन्हा तरारावं लागतं. दोनचार दिवसांपासून फुलूफुलू म्हणणारी एखादी कळीदेखील या तरतरीबरोबरच हळूच उमलून जाते, आणि "निसर्ग' बहरल्याच्या आनंदानं घरधन्याला उकळ्या फुटतात. श्रावण-श्रावण म्हणतात, तो हाच असला पाहिजे, असं समजत, चहाचा वाफाळलेला कप हातात धरून, सिगरेटचे मस्त झुरके मारत, आणि वर्तमानपत्राच्या बातम्यांचे मथळे न्याहाळत खिडकीच्या चौकटीतून फ्लॅटबाहेरच्या दहा बाय बाराच्या मोकळ्या जागेवर माळ्यानं केलेल्या बगीच्याचा तुकडा मनात साठवत तोही लहानपणीच्या आठवणीत दंग होऊन जातो. खिडकीच्या "फ्रेम'मधून दिसणारं हे हिरवाईभरलं रूपदेखील त्याला आपलंआपलंसंस वाटू लागतं, आणि "निसर्ग-निसर्ग' म्हणतात, तोही हाच असला पाहिजे, याची त्याला खात्री पटते. घरासमोरच्या बागेतल्या कृत्रिम हिरवळीतच तो "नैसर्गिक निसर्गा'चा अनुभव धुंडाळत राहातो, आणि बघताबघता त्यातच रमूनदेखील जातो...
शहरातल्या श्रावणछटांमध्येही निसर्ग शोधताना त्याच्या मनालाही अभिमानाचे धुमारे फुटू लागतात... आपल्या इथे बहरलेल्या या निसर्गालाही सौंदर्याची छटा आहेच, या अभिमानाने त्याचा ऊर भरून जातो, आणि त्यात रमणाऱ्या या निसर्गवेड्याला आपल्या घराभोवतीच्या हिरवाईचं प्रचंड अप्रूप वाटू लागतं... इथंही श्रावण सुरू झाला, की पक्षी किलबिल करतातच... "हॉल'च्या खिडकीबाहेर कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या दोऱ्यांवर पावसाचे थेंब पडून कपड्यांवर काळे डाग पडू नयेत, म्हणून वर तयार केलेल्या पत्र्याच्या टीचभर छपरावर पावसाचा तडतडाट होतो, तेव्हाही, पावसाचा "ताशा' वाजल्याचा अनुभव घेत सुखावूनही जातो... घराबाहेरच्या कुंडीतल्या सदाफुलीच्या एखाद्या रोपट्याची कळी खुलली, आणि तिच्या सदाबहार फुलावर या पावसाचे चारदोन चुकार थेंब विसावले, तरी त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. आणि घरासमोरच्या "कंपाऊंड वॉल'शी लगट करणाऱ्या गुलमोहर, बाहवा आणि बदामाच्या झाडांच्या वेगवेगळ्या हिरव्या छटांमधून याचा श्रावण खुणावू लागतो... हिरवाईच्या या वेगवेगळ्या छटा त्याचं मन तृप्ततृप्त करून सोडतात, आणि त्या धुंदीतच हातातला चहा कप रिता करून "शॉवर'खाली उभा राहून एखादं आवडतं गाणं गुणगुणत, तो "न्हाऊन' निघतो... आपल्या समोरच्या निसर्गाच्या सौंदर्याकडे पाठ फिरवून आपण उगीचच कधीकाळी अनुभवलेल्या श्रावणाच्या आठवणीत रमलो, या जाणीवेनं त्याचं मन खंतावतं, आणि शॉवरच्या धारांना भिजलेले डोक्‍यावरचे ओले केस खसाखसा पुसतानाच, त्या जुन्या आठवणीही मनाच्या कप्प्यात बंद करायला तो धडपडू लागतो. आपण आता "इथले' झालो आहोत, याचं त्याला भान येतं आणि तो घराबाहेर पडतो... संध्याकाळी ऑफिसमधून घरी यायच्या आधी चार क्षण निवांतपणे घालवावेत, म्हणून त्याची पावलं जुहूच्या समुद्राकडे वळतात, आणि वाळूत पहिला पाय टाकताच, वाऱ्याबरोबर वाहात आले
ल्या एका प्लास्टिकच्या पिशवीचा पायाला विळखा पडतो... अथांग पसरलेल्या गर्दीतून समुद्राची एखादी, कोवळी, अस्पर्श, अवखळ लाट आपल्यापर्यंत येईल आणि पायाशी लडिवाळपणे घोळवत जुन्या, लहानपणीच्या ओळखीचं हसेल, म्हणून उगीचच तो गर्दीतून वाट काढत लाटांपर्यंत पोहोचायचा एक प्रयत्न करूनही पाहातो. पण फेरीवाले, आणि चटयांवर बसून भेळपुरी चापणाऱ्यांच्या "पर्यटनाच्या आनंदा'वर आपले "विरजण' नको, असा साळसूद विचार करत रस्त्याकडेच्या सिमेंटच्या बांधावरच टेकतो. समुद्राची ती लहानपणी कधी ऐकलेली निवांत गाज कानात साठवण्यासाठी याचे कान पुन्हा एकदा त्या दिशेला लागतात, पण नंतर तो हट्ट सोडून पश्‍चिमेला मावळणाऱ्या सूर्यबिंबाकडे टक लावून बसून राहातो...
... समुद्ररेषा आकाशाला भिडते, तिथवर नजर लावून कितीतरी वेळ बसलेला तो आता फक्त वर्तमानातच जगत असतो... सवयीनंच कधीतरी त्याला सांजवेळेची चाहूल लागते, आणि रस्त्यावर उजळलेल्या दिव्यांमुळे, रात्र झाल्याची जाणीव होऊन तो उठू लागतो... मानेभोवतीचा घाम हातातल्या रुमालानं खसाखसा पुसत तो बससाठी स्टॉपकडे वळतो, तेव्हा पुन्हा एक अशीच श्रावणसर अंगावरून सरसरून पुढे सरकते आणि आळसावलेलं त्याचं मन ताजंतवानं होतं... आता अंधार पडला असेल, म्हणून तो लहानपणीच्या सवयीनं आकाशाकडे पाहातो. आकाशातलं चमचमतं तारकादळ न्याहाळावं, चारदोन तरी चांदण्या मोजाव्यात म्हणून तो आकाश शोधू लागतो, पण आपण आता "इथले' आहोत, याची जाणीव होऊन तो पुन्हा रस्त्याकडे पाहात चालू लागतो. रात्रीच्या वेळी कधीतरी इथली वीज गेली, म्हणजे इथेदेखील चांदण्या मोजता येतील आणि जमिनीवर ओसंडणारं चांदणंही अनुभवता येईल, अशी मनाची समजूत काढत तो घर गाठतो... सकाळी कपड्यावर मारलेल्या कुठल्यातरी "इम्पोर्टेड स्प्रे'मध्ये आता घामाचा दर्पही मिसळलेला असतो... इतका घाम येऊनही, "स्प्रे'च्या खाणाखुणा अजूनही आहेत, या समाधानातच तो कपडे हॅंगरला अडकवतो, आणि तडक शॉवरखाली जाऊन न्हाऊन निघत "ताजातवाना' होतो....

Daad
Sunday, August 19, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्च! अप्रतिम, झुलेलाल!
आपण आता इथले झालोय ही ओळ गाण्याच्या धृपदासारखी आळवावी लागते.
फारच छान!


Zulelal
Tuesday, August 21, 2007 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार. `इथल्या' जगण्याशी तन्मय झालेल्या सर्वांचे.

Srk
Wednesday, August 22, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप खूप सुंदर उतरलय. माणसाच्या मनाची गंम्मतच आहे. लग्न होऊन मुंबईला आले तेव्हा गावाची तिथल्या सगळ्या गोष्टींची खूप आठवण येत असे. आता ईथे आल्यावर मुंबईच्या आठवणी सुटत नाहीत.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators