Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Konkan: आनंदसण!!

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » ललित » Konkan: आनंदसण!! « Previous Next »

Zulelal
Wednesday, August 15, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उजाडायच्या आधीच आसपास असंख्य पाखरांच्या किलबिलीचं संगीत सुरु होतं आणि एखाद्या कोंबड्याची बांग त्यात ‘र्‍हिदम’ पेरते... गोठ्यातल्या गायि-म्हशीचं लांबलचक हंबरणं आणि घराच्या पडवीतला पाडसाचा प्रतिसाद आतुरतेचे सूर आळवतात... रेडिओवरची ‘मंगलप्रभात’ पहाटेचं वातावरण पवित्र करते आणि या भारावलेपणातच आपण अंथरुणावरून उठून बाहेर पडतो.. जांभ्या दगडांच्या ओबडधोबड तुकड्यांनी बांधलेल्या ‘गडग्यां’च्या मधल्या रस्त्यावरून चालताना, बांबूच्या बेड्यापलीकडल्या एखाड्या दुपाखी कौलारू घरातली जागती चाहूल सकाळ झाल्याची जाणीव करून देत असते...
... आणि एका ‘जादू’चा अनुभव सुरू होतो... मागल्या दारीच्या अंगणात्ल्या ‘पाणचुली’वर उकळणार्‍या पाण्याचा खमंग वास परमळत असतो... दुधाच्या कासंड्या घेऊन ‘वाड्या’कडे ये-जा करणार्या घरधन्याच्या हालचाली टिपताना पडवीतल्या पाडसाची धडपड वाढत जाते...
गोठ्याकडून येणार्‍या प्रत्येक हंबरण्याबरोबर कान टवकारणारी पाडसं टपोर्‍या डोळ्यांनी मालकाची लगबग टिपत अस्वस्थ होतात, आणि ‘दावं’ सुटताच, वाकड्यातिकड्या उड्या मारत आईच्या ओढीनं गोठ्याकडे धाव घेतात...

.... मग सुरु होतो, एक अद्भुत ‘मातृसोहळा’!!...

कोवळी, सोनेरी उन्हं कौलारू घरांवर आणि केंबळी वाड्यांवर पसरतात आणि कोकणातलं ते खेडं जागं होतं... रात्रीच्या ‘पसार्‍या'ला गेलेली जनावरं टम्म फुगल्या पोटांचा जडपणा सावरत समाधानानं गोठ्याकडं परतत असतात... कमरेच्या कोयंड्याला कोयता अडकवून हिरव्या चारीचा भारा रानातून आणण्यासाठी बापये गडी तयार होत असतात आणि वाफाळलेला भात अन कुळदाच्या पिठीची गरमगरम न्ह्यारी स्वैपाक्घरात रटरटायला लागते... मागल्या पडवीवर पत्रावळी लावल्या जातात आणि परसभरात सगळीकडे कुळदाचा खमंग वास दरवळतो... विहीरीवरच्या रहाटाचे एकसुरी फेरेही एव्हाना सुरू झालेले असतात. कामावरची ‘बायामाणसं’ ‘चा’ पिऊन, ‘कोप’ धुवून परड्यातल्या फोपळींना पाणी ‘दाखवाला’ दाखल होतात आणि न्याहरी आटपून एक जथ्था रानाकडे रवाना होतो... इकडे लख्ख सारवलेल्या अंगणाचे केरवारे सुरू होतात, कुठे घरतल्या सारवणाची तयारी सुरू होते, कुणी सारवण झालेल्या अंगणात रांगोळी घालू लागते. देवघरातल्या घंटेचा किणकिणाट सकाळची प्रसन्नता आणकीनच खुलवतो... उन्हं चढत जातात... पहाटे संगीत पेरणारा पाखरांचा कलकलाट मंदमंद होत
कानाआड जातो आणि कोकणातलं ते अवघं गाव कामाधंद्याला लागतं...

खाडीकिनारी तालुक्याला जाणार्‍याची गर्दी सुरू होते आणि तरीतून पलिकडे जाण्यासाठी नंबर लागतात... पलीकडची एस्टी भरते आणि त्याच किनार्‍याला ‘तर’ विसावते. गर्दी ओसरते आणि खाडीचे मंद, संथ पाणी विश्रांती घ्यायला लागते... सकाळपासून ताजीतवानी झालेली काठावरची माडंझाडं एकएक करून खाडीच्या आरश्यात स्वत:चं रूप न्याहाळत वार्‍याबरोबर डुलायला लागतात... बाजूच्या वेळूच्या बनाची सळसळ सुरू होते आणि त्या ‘आनंदसणा’त आंब्ये-फणसपण सामील होतात... पहाटेची तीच टवटवी, उन्हं डोक्यावर आली, तरी तशीच ताजीताजी असते...

दुपारी जेवणं आटपली, की सगळीकडे चारदोन तासांची निजानीज होते, आणि गाव थोडासा सुस्तावतो... संध्याकाळी, तिन्हिसांजेला पुन्हा पहाटेचे सूर गावात घुमायला लागतात... रात्री मिणमिणत्या विजेत कुठे भजनं रंगतात, घराघरात देवाधर्माचे विधी सुरू होतात, चंदन-धुपाचा गंध अवघा गाव व्यापून ताकतो, ... आणि, काही वेळात, निजानीजही होते... पुन्हा गाव शांतशांत होऊन पहुडतो...

कोकणातल्या कुठल्याही गावात आजही हेच चित्र दिसतं म्हणूनच, कोकण ही आजही एक ‘अपूर्वाई’ आहे... सकाळी दरवज्याला भैयानं लटकावलेल्या ‘पिशवीच्या दुधा’चा वाफाळलेला कप तोंडला लावताना ‘कार्टून नेट्वर्क’वरचा स्कूबी शो बघणर्‍या मुलांसाठी, कोकणातलं खेडं हा एक जिवंत चमत्कार आहे. चारदोन दिवसाची सुट्टी घ्यावी आणि कोकणातल्या कुठल्यातरी गावी मुक्काम ठोकावा... तरीतून खाडी पार करण्याचा आणि बैलगाडीच्या सफरीचा आनंद काय असतो, गायीची ‘पाडी’, ‘लुचते’ कशी, आपण पिशवीतून पाहातो, ते दूध कोण देतं, ते काढतात कसं, मार्केटातल्या भैय्याच्या टोपलीतली हिरवीकंच भाजी कुठल्या झाडांना लागते, झाडावर लटकताना ती कशी दिसते, आंब्या-फणसाची झाडं कशी असतात, काजू कसा भाजावा, कसा फोडावा आणि कसा खावा... फणसाचे गरे कसे ‘गट्टम’ करावेत आणि
आख्खा हापूस कसा चोखावा, शेत कसं नांगरावं, अनवाणी पायांनी डोंगरकपारी कशा तुडवाव्यात... सगळंसगळं, ‘याचि देहि’ अनुभवण्यासाठी, कोकणाला पर्याय नाही.... कोकण हे सगळ्या अनोख्या, आणि अनेक अननभूत आनंदाचं उत्तर आहे...

टीव्हीवरच्या एखाद्या कार्यक्रमात पाहिलेली अन ऐक्लेली समुद्राची निवांत गाज अनुभवायची असेल, तर कोकणाचा किनाराच गाठायला हवा.. रात्रीच्या वेळी, झाडाझुडुपांच्या गर्दीतून वाट काढत जामिनीवर सांडणारं चांदणं पाहायचं असेल, तरीदेखील कोकणालाच पसंती द्यावी, आणि आकाशातला चांदण्याचा पसारा मोजायचा असेल, तरी, कोकणच खरं...

आजकाल कोकणाचा कायापालट होतोय... निसर्गानं भरभरून दिलेलं हे दान, जगानं अनुभवावं, आणि जागाच्या समाधानासोबत आपल्या गाठीशी थोडी ‘माया’ही गोळा व्हावी,असा ‘व्यवहारी’ विचार आजकाल कोकणात सुरू झालाय. आता पहिल्यासारखं कुणाच्याही घरातला गुळपाण्याचा पाहुणचार कदाचित आपल्या वाट्याला येणार नाही. बाहेरच्या, पडवीवरच्या दुकानातलीच एखादी ‘बिस्लेरी’ विकत घेऊन आपल्याला तहान भागवावी लागेल... पाहुणचारासाठी पैसे मोजावे लागतील... कारण आता पाहुणचाराला व्यवसायाची आणि व्यवहाराची जोड मिळाली आहे...

कोकणाचा कॆलिफोर्निया करायचं एक स्वप्नं कित्येक व्र्षांपासून कोकणानं उराशी जपलं होतं... आता कॆलिफोर्नियाचा अर्थ कोकणाला उमगलाय... कोकणात नुस्ताच कॆलिफोर्नियाच नव्हे, नंदनवन फुलवण्याचं एक स्वप्न साकारतंय...

कोकण आपली वाट पाहातय... येवा... कोकण आपलंच आसा!



Zulelal
Wednesday, August 15, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(सुरुवातीचीच दुरुस्ती)
उजाडायच्या आधीच....

Moderator_2
Wednesday, August 15, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुरुस्ती केली आहे. आपणही आपले पोष्ट एडीट करु शकता. युजर आयडी च्या बाजुला पेपर / पेंसिल वर क्लिक करा.

Kashi
Thursday, August 16, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुंदर.!!!!!!!!!!!!!!! झुलेलाल तुम्ही केलेली वर्णनं खुप जिवंत असतात...कोकण डोळ्यासमोर उभे राहीले.

Sanghamitra
Thursday, August 16, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुसतं डोळ्यांपुढं उभंच राहीलं नाहीतर तिथे जाऊनच आल्यासारखं वाटलं.
सुंदर लिहीलेय हो. फारच.
भाषा, वर्णन आणि बहाव अगदी योग्य. ना कमी ना जास्त.
लिहीत रहा.


Chinnu
Thursday, August 16, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल, सन्मीला मोदक!
मस्त वाटलं वाचुन. आनंदसण - नाव सुद्धा सुरेख आहे.


Daad
Thursday, August 16, 2007 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल, सन्मीक माज्याकडसून हळदीच्या पानार उकडलेले मोदक!पोटभर.
माझं आजोळ कोकणातलं. लहानपणी सुट्टीत गेलोय. आत्ता मधल्या अनेक वर्षांत म्हणावं तसं जाणं झालेलं नाही.
तुमच्या लेखाच्या निमित्ताने मनात जपलेला, वसलेला तो गाव (वालावली) जागा झाला. जियो! असेच लिहीत रहा. (एक मात्रं नक्की, पुढच्या सुट्टीतल्या भारताच्या फेरीत कोकण भेट आता अटळ झाली)


Rajya
Friday, August 17, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल, मस्त हो :-)
तुमचं लिखाण आवडतं मला :-)


Farend
Tuesday, August 21, 2007 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाफाळलेला भात आणि कुळथाचं पीठ! झुलेलाल एकदम जुनी आठवण करून दिलीत, रत्नागिरी जवळच्या गणेश गुळ्यात मी तो एका सकाळी खाल्ला तसा परत कोठेच मिळाला नाही. मस्त वर्णन केले आहे कोकणचे.

कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची सरकारची वचने आम्ही लहान असल्यापासून ऐकतोय, पण फळफळावळ आणि निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत (विशेषत: समुद्रकिनारे) कोकण म्हणजे कॅलिफोर्निया आणि हवाई एकत्र आहे. आणि कॅलिफोर्निया मधे एव्हढे चांगले आंबे मिळत नाहीत :-)


Swa_26
Friday, August 24, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!! झुलेलाल.. मस्त लिहिलंय. आताच गावी जाऊन आले, तरी परत जावेसे वाटायला लागलेय!!

Saee
Tuesday, September 11, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, आज वाचला हा लेख. दिनेश फारच ओघवतं लिखाण. तुम्ही हे फक्त निरीक्षणातून लिहीलंत की कोकणातलेच आहात? प्रत्येकाने प्राणवायू मिळवण्यासाठी नियमीतपणे कोकणात गेलं पाहिजे असं माझं मत आहे. (अर्थात प्राणवायूसाठीची व्यक्तिपरत्वे वेगळी ठिकाणे असू शकतात.) फक्त बैलगाडीच्या उल्लेखाचं नवल वाटलं, कारण देशावरच्या खेड्यांच्या तुलनेत कोकणात बैलगाड्या तशा कमीच,अगदी नाहीच्या प्रमाणात.
लिहीत रहा.

वालावल आणि गणेशगुळे ही वर उल्लेख झालेली दोन्ही गावं अगदी स्वप्नवत आहेत.


Manuswini
Tuesday, September 11, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल, अगदी अगदी...
काय सुंदर हो. अशीं सकाळ फक्त कोकणात असा हे माझे मत.
गाईच्या ताज्या दूधाचा चहा काय मस्त लागतो.
मला कायम लहानपणी पडलेला प्रश्ण आणि त्याचे उत्तर अजुनही कुणीच दीले नाही गावी, ही गुरें न चुकता घरी कशी येतातं.. ते पण शीस्तीत संध्याकाळी, अगदी घड्याळ लावावे तसे. आमचा एकच बैल जरा उनाड होता आजीच्या मते नी त्याला आणायला जावे लागत असे.

आणि आजीने स्वःता जात्यावर दळलेले कुळिथाचे पिठलं भात. मला तो गावठी लाल भात सहसा आवडायचा नाही पण पिठले असेल तर मात्र खायची.
ते मागे दिनेशजींनी असेच वर्णन केले होते, त्या आठवणींनी जाग्या होवुन मग मी पण तिथेच काहीतरी किबीर्डवले.

दाद, वालावलकर का ग तुझे नाव सहज गावावरून विचारते.

सई, तुला आठवतो का ग दिनेशजींचा लेख? कारण तुही तेव्हा काहीतरी लिहिले होतेस. छान होता तो लेख,पुन्हा पुन्हा वाचावा असा.


Saee
Wednesday, September 12, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमका कोणता आठवत नाही मला. दिनेशना विचारता येईल. आता तू म्हणतेस तर पुन्हा वाचायला हवा.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators