Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
BhaktaasaaThee

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » ललित » BhaktaasaaThee « Previous Next »

Daad
Monday, July 30, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाताला धरून, हिसडून, खेचून खाली ओढला त्याला दुसर्‍या आईने. पालथ्या पडलेल्या धृवाला सावरायला कुण्णी कुण्णी आलं नाही......

कडाडणारी सावत्र आई- तातांची पट्टराणी, जमिनीवर असहाय्यपणे पडलेला, दुखावलेला तो स्वत: धृव, राणीच्या आदेशावरून सेविकांनी धरून ठेवलेली त्याची जन्मदात्री आई, हे स्तंभित होऊन बघणारा मंत्रीगण, कुत्सित हसणारी त्याची सावत्र भावंडं..... ह्या सगळ्या सगळ्या पेक्षा त्याला जाचली ती त्याच्या तातांनी फिरवलेली मान, चोरलेली नजर, ज्या त्यांच्या हक्काच्या मांडीवरून त्याला ओढून, ओरबाडून, हुसकावून काढला त्या मांडीला झाकून उभ्या ठाकल्या त्या सावत्र आईच्या, पट्टराणीच्या मागे लपलेले त्याचे तात.... मनात आणते तर....

धृवाला, ही अपमानाची परमावधी होती, अगदी त्या वयातही. तातांच्या मांडीवर बसण्यात आपली चूक काय तेच न कळलेला हा कुमार अतिशय अतिशय अचंभित होऊन सार्‍या मोठ्यांच्या चेहर्‍याकडे पहात होता. राज्याच्या अवघड समस्यांवर क्षणात उत्तरं देणारे मंत्री, सल्लागार त्याची नजर चुकवत होत्ये. कुणाकडेच त्याच्या नजरेतल्या प्रश्नांना उत्तरं नव्हती. ज्याने उत्तर द्यायचं तो नजर फिरवून बसलेला, जिने जवळ घ्यायचं ती बंदीवान, सावत्र का होईना पण जिला 'आई' म्हणायचं तिच्या नजरेत फक्त तिरस्कार होता.....

कुमार धृव उठला. त्याने आपल्या त्या आयुष्याकडे पाठ फिरवली. त्याला पडलेल्या प्रश्नांच्या उत्तारांसाठी तो घर सोडून निघाला..... अन, राजवाड्याचं महाद्वार ओलांडेपर्यंत कुणीच मायेचा अडसर घातला नाही हे बघून तर कुमार ताड ताड पावले टाकत दूर दूर निघाला...
दूर म्हणजे कोठे? माहीत नाही. पण शरीरात प्राण आहे तोपर्यंत या सगळ्यापासून दूर, जिथे त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळेत्या क्षणापर्यंत, त्या स्थळाच्या शोधात.
दर्‍या-दरकुटे ओलांडत निघाला. रागाने, अपमानाने धुमसत निघालेला कोवळा कळा.... किती ओरखाडे, किती ठेचा, किती पडणे-झडणे, लहा लहा उन्हा-तानात भटकला.... दहा-दिशा फिरत राहिला, शोधत राहिला.... वाट फुटेल तसा चालत राहिला.

पुढे तर वाटच संपली. कड्याच्या टोकाशी जाऊन त्याने पुढे पाऊल घातले. पण आपणहून शरीराचा त्याग करणं त्या जिवाला पटलं नाही. तिथेच निर्वाण मांडायचं ठरवलं त्याने. 'तिथे बाहेर नाही मिळत माझ्या प्रश्नाचं उत्तर तर इथे माझ्या आत तरी असेल. ते मिळेपर्यंत आता थारा नाही.'

तिथल्याच एका खडकावर बसला. सहज सिद्धासन घातलं. आपल्या धापणार्‍या श्वासाबरोबर तो आत आत उतरत गेला. क्षोभाने कोंदलेली मुद्रा हळू हळू मावळू लागली......

क्रमश:


Daad
Monday, July 30, 2007 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती काळ गेला असा? माहीत नाही! अन्न-पाण्याविना कृश झाला कुमार. पण आपला हट्ट सोडला नव्हता.
गोरजवेळा असावी.... झांज येऊ पहात होता तरीही ठाण न सोडल्या त्या लहानग्याला एक अपरिचित सुगंध जाणवला. अन, कसला बरे हा.... याचा विचार येण्यापूर्वीच सगळा आसमंत त्या सुगंधाने कोंदून गेला. आत बाहेर त्याच सुगंधाच्या लाटा उठू लागल्या.

ज्या रूपाच्या प्राप्तीसाठी कोटी कोटी योगीजनं खड्गाच्या धारेवरती शरीरे फेकू जातात ते, सत्-चित्ताचे लावण्यरूप त्याच्या समोर ठाकले होते.

'भक्ता डोळे उघड.... अरे मी आलोय!'

अतिशय क्लांत झालेल्या पापण्या उघडून धृवाने समोर पाहिले....

त्याला दिसले रत्नजडित चंदनाच्या खडावांत विसावलेले समचरण. पिवळा पीतांबर कसला आहे. त्याच्या आभेने संधीप्रकाशही अधिक उजळला आहे. कटीस मेखला आहे. गळ्यातली वैजयंतीमाला नाभीशी रुळते आहे अन तिच्याही वर कौस्तुभमणी विराजलाय. कानातल्या मकर कुंडलांची अन मस्तकावरल्या मुकुटातली रत्नांची प्रभा अवर्णनीय आहे. सार्‍या विश्वाच्या कल्याणकारी शक्ती, शंख, चक्र, गदा अन पद्म होऊन चारी सकन्कण बाहूंत सज्ज होऊन ठाकल्या आहेत.
प्रसन्नवदने आपले लोभावणारे स्मित सांडत देवाने आपल्या भक्ताला परत एकदा हाक मारली, 'उठ, भक्ता... माझ्या वत्सा ऊठ. ह्या अशा निर्जन स्थळी माझी दृढ तपस्या आरंभलेल्या तुला, माझ्या निस्सिम भक्ताला भेटायला मी आलोय..... '

आपली नजर त्या चैतन्याच्या पुतळ्यावरून काढून घेत कुमार क्षीण स्वरात म्हणाला...
'कोण तू?....'
क्रमश:


Daad
Monday, July 30, 2007 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन देव थक्कित झाला, अचंभित झाला. आजवर त्याच्या नुसत्या दर्शनाच्या गुणे मुक्तीची द्वारे उघडल्या भक्तांच्याहून वेगळा होता हा....
पहिल्यांदाच देवाला आपला परिहार आपणच द्यायचा होता.....

शब्द शोधत देव म्हणाला, 'ज्याची तू वाट पहात इतुका काळ येथे तिष्ठला आहेस, येथे निर्वाण मांडलेस, आपली काया सांडण्याची गती आणलीस, तोच मी! अरे तुझ्यासाठी वैकुंठाहून आलोय. सार्‍या जगाचा कर्ता, धरता... सार्‍या विश्वाचा पिता, सार्‍या विश्वाची माता...'

धृवाने नुसतीच मान हलवली....
'माझी हाक ऐकून येणारी माझी माता.... अशी नसते रे, तू कुणी दुसराच आहेस. माझ्या मनाच्या गाभार्‍यात जे रूप मला दिसलं होतं ते हे नव्हे....'
देव ऐकतच राहिला...
'माझा टाहो ऐकून अनवाणीही धावत येणारी माझी माय... तिला तिच्या वस्त्र, प्रावरणं, अलंकारादीची शुद्धा नसत्ये, आकांताने धावणार्‍या तिला फक्त तिचा धृव दिसतो...'

अन, ध्रूवाची शुद्ध हरपली. श्वास मंदावू लागला. पापण्याआडची आता किंचित झिलमिलणारी दृष्टी त्याने पुन्हा आत ओढून घेतली..... त्याला अजून वाट बघायची होती..... आपल्या प्रश्नांची उत्तरे घेऊन कोण येणार होतं?

देव उभाच ठाकला, हतबल झाला. सुचेना, की आता काय करू? कसे करू? कोणत्या उपाये समजावू ह्याला? की....
रे, तोच मी, मी तोच!

ह्या सानुल्याच्या जीवाची जाणीव्-नेणीव हरपण्यापूर्वी, ती थड लागण्यापूर्वी मला त्वरा करायला हवी. हे माझेच करणे आहे. त्याचे कोड पुरवण्यापायी मलाच झटायला हवे....
ह्या माझ्या लहानग्यासाठी त्याची माय होऊनच आले पाहिजे, मला... तरच.... तरच कळेल की ह्याचे हृदयी कोणता सल खुपतो आहे.... त्याविणे उपाय नाही. आता निमिषाचाही वेळ घालवता नये.
...... अन आल्यापावली देव वळला.... परत वैकुंठाला जाण्यासाठी!

क्रमश:


Daad
Monday, July 30, 2007 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन, तीरासारखा परत आला, धावत आला. धापा टाकीत उभा ठाकला धृवाच्या सामोरी. अन, हाक घातली.
'बाळा रे, काय झाले माझ्या लहानग्याला? डोळे उघड ना रे....'

त्या स्वरातले आर्त ऐकून धृवाने शुद्धीची ऐलथड्-पैलथड करणारी नजर पुन्हा एकदा उघडली....त्याला दिसले....

धुळीने माखलेले समचरण.
जागोजागी चिरफाळ्या उडालेला पीतांबर. त्याल दिसले पाऊले, पोटर्‍यांवरचे ओरखडे-ओरबाडे.
अन दिसले की, मेखला तुटून अर्धीच लोंबते आहे. गदा आडवी पडली आहे अन, चक्र धूळीत लोळते आहे.
डाव्याच दंडात बाहूभूषण आहे अन उजवेच मनगट कंकणविभूषित आहे.
वैजयंती उजव्या खांद्यावरून हातावर ओघळली आहे अन, कैस्तुभमणी पाठीवरी पडला आहे.
शेला घामाने भिजून धापणार्‍या छातीस चिकटला आहे. धावत आल्याने कुंडले अजूनी हालत आहेत.
मस्तकावरील मुकुट कुठेतरी पडला असावा...., कारण घामाने डवरल्या देवाच्या मोहनी मुद्रेच्या निढळी, एरवी शोभणारी कुंतलांची महिरप घामाने चिप्प होऊन चिकटली आहे.
भव्य कपाळावरल्या अष्टगंधाचा नाम अन कुंकुमतिलकाचे ओघळ नाकावरून वहात त्याचे शेल्याला डागही पडले आहेत.

अन,
अन... या कशाकशाची शुद्ध नसलेला तो देवाधीदेव, स्वरात अत्यंत काळजी अन, डोळ्यात अपार माया, असे ते जगद्नियंत्याचे मातारूप आपल्या लहानग्याची अवस्था पाहून कळवळले. या हृदयीचे त्या हृदयी घालावे तसे त्याचे दु:ख आपसूकच देवाला कळले. देव भावविव्हल होऊन धृवाच्या शेजारी धुळीत बसला.
त्याने वाकून या बाळाचे मस्तक हुंगले अन त्याच्या कपाळी ओठ टेकले. अत्यंत मृदू होत, हळूवारपणे त्याने धृवाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले अन, आपल्या शेल्याने त्याला वारा घालू लागला.

परत एकदा शुद्धीची ऐलतीर गाठीत धृवाने डोळे उघडले.

एव्हाना गडद रात्र झाली होती. खूप खूप वर आकाशाचा गाभारा तारकांनी उजळला होता. मकर कुंडलांच्या झुरमुरत्या मवाळ प्रकाशात धृवाला, देवाच्या डोळ्यात मायेचे ढग दिसले...

त्याला जाणवले की कोणताच प्रश्न नाही शिल्लक आता अन त्याने तृप्ततेने डोळे मिटले. शत-तारकांना कोटी-चंद्रांना लाजवेल असे स्मित त्याच्या चेहर्‍यावर पसरले.
आपल्या ह्या लहानग्याची तन-मनाची तृप्ती देखून देव सुखावला, धन्य झाला!
समाप्त


Itgirl
Tuesday, July 31, 2007 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, आत्ता वाचलय हे! डोळ्यात पाणी कघी जमल ते लक्षातच नाही आल... अत्यंत सुंदर जमल आहे लिखाण.

Chetnaa
Tuesday, July 31, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, फ़ारच सुंदर...
अप्रतिम... शब्दच सापडत नाहिहेत वर्णायला....


Mankya
Tuesday, July 31, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद .. .. .. .. !

माणिक !


Sush
Tuesday, July 31, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी अनेकदा ऐकलेली हि कथा, पन नेहमिच्या कथेप्रमाणेच वाटली होति.
पण आज......
परत एकदा वाचली आणी नव्याने उमगली. आता कळली त्या ध्रुवाची तडफड. आता कळालि त्याच्या जिवाची तगमग आणि कळाले बरेच काहि...
शब्दात नाही सान्गता येत.
खरच डोळ्यात कधी पाणी आले कळालेच नाही.

दाद, नाम काफ़ि है
किती सुन्दररित्या हाताळता सगळं, कथा म्हणु नका, ललित म्हणु नका, विनोदि साहित्य म्हणु नका, सर्वच खुप सुन्दर रित्या फुलवता. u r great



Sharmilaj
Tuesday, July 31, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम आहे दाद, हा लेख. आवदला आपल्याला.

Dineshvs
Wednesday, August 01, 2007 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरेच अप्रतिम कथा आहे हि. माहित असलेलीच कथा इतक्या सुंदर रितीने परत सादर करणे, याला खरेच कौशल्य लागते.

Sunidhee
Wednesday, August 01, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद !!!! अनेकदा वाचलेली ध्रुवकहाणी आज वाचताना नव्याने वाचत आहोत असे वाटले.. सुंदर.. फार फार प्रतिभावान आहेस !!

Cool
Wednesday, August 01, 2007 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


खूपच सुंदर, तुमच्या कथेला द्यावी तेवढी दाद थोडीच आहे...


त्या लहानग्याला एक अपरिचित सुगंध जाणवला. अन, कसला बरे हा.... याचा विचार येण्यापूर्वीच सगळा आसमंत त्या सुगंधाने कोंदून गेला. आत बाहेर त्याच सुगंधाच्या लाटा उठू लागल्या.

ज्या रूपाच्या प्राप्तीसाठी कोटी कोटी योगीजनं खड्गाच्या धारेवरती शरीरे फेकू जातात ते, सत्-चित्ताचे लावण्यरूप त्याच्या समोर ठाकले होते.

>>>
अप्रतीम वर्णन...

त्याला दिसले रत्नजडित चंदनाच्या खडावांत विसावलेले समचरण. पिवळा पीतांबर कसला आहे. त्याच्या आभेने संधीप्रकाशही अधिक उजळला आहे. कटीस मेखला आहे. गळ्यातली वैजयंतीमाला नाभीशी रुळते आहे अन तिच्याही वर कौस्तुभमणी विराजलाय. कानातल्या मकर कुंडलांची अन मस्तकावरल्या मुकुटातली रत्नांची प्रभा अवर्णनीय आहे. सार्‍या विश्वाच्या कल्याणकारी शक्ती, शंख, चक्र, गदा अन पद्म होऊन चारी सकन्कण बाहूंत सज्ज होऊन ठाकल्या आहेत.
प्रसन्नवदने आपले लोभावणारे स्मित सांडत देवाने आपल्या भक्ताला परत एकदा हाक मारली

>>>
प्रत्यक्षात डोळ्यासमोर उभे राहीले


Prajaktad
Wednesday, August 01, 2007 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेट! ...दाद इतक उत्तम तुच लिहु शकतेस..

Vvdpune
Thursday, August 02, 2007 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय प्रतिक्रिया लिहावी तेच कळत नाही, पण वाचुन डोळ्यात पाणी आले. यापेक्षा अधिक काय लिहू?

Ramani
Friday, August 03, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी, सुश, दिनेशदा सगळ्यांना अनुमोदक. दाद..... !!

Daad
Saturday, August 04, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे अगदी मनापासून आभार.

Disha013
Tuesday, August 07, 2007 - 7:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,इतकं अलंकारिक तुच लिहु शकतेस.सुंदर!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators