Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मियाऽऽउं!

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » ललित » मियाऽऽउं! « Previous Next »

Sayuri
Monday, July 30, 2007 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'बंटी और बबली' मधल्या बंटीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर, "ये वर्ल्ड है ना वर्ल्ड, इसमें दो तरह के लोग होते हैं, एक जिन्हें बिल्लीयां बहोत पसंद है और एक वो जो बिल्लीयोंको सिर्फ नफ़रतकी नजरसे देखते हैं" खरंय. नुसतं 'मांजर' म्हटलं तरी चेहर्‍यावर हास्य खुलणारे किंवा त्याउलट कपाळावर आठी उमटणारे चेहरे इतक्याच दोन प्रकृती सर्वसाधारणपणे आढळतात. अर्थात त्यापैकी दुसरी प्रकृती उगाचच निर्माण झाली आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही. पण मांजर का वाईट हे पटवताना बहुतेक वेळा त्याची कुत्र्याशी तुलना करुन मग कुत्रा कसा जास्त बुद्धिमान असतो किंवा स्वामीभक्त असतो वगैरेच्या कथा ऐकवल्या जातात. होय मान्य आहे, नाही कोण म्हणतंय! पण मुळात मांजर आणि कुत्रा यांची तुलना करण्यातच काय अर्थ आहे, कारण दोन्ही पूर्णपणे भिन्न प्राणी आहेत. मांजर भले त्याच्या मालकाशी एकनिष्ठ नसेल किंवा मतलब साधून झाल्यावर ओळख दाखवणारही कदाचित पण शेवटी प्रत्येकात काहीतरी कमी असतंच की. फक्त कोणाला ते जास्त महत्त्वाचं वाटतं कोणाला कमी इतकंच. (आता मला कुत्रे येणार्‍याजाणार्‍यावर विनाकारण भुंकत राहतात, धावून जातात ते भारी त्रासदायक वाटतं. बरं त्याचा स्पेशल खुराक सांभाळा, फिरायला न्या, आंघोळ घाला, वगैरे लफडी वाढतात ते वेगळंच )त्यामुळे मी आहेच मुळी पहिल्या प्रकारात मोडणारी. होय, त्यांच्या सर्व गुणदोषांसकट मांजरं मला प्रिय आहेत.

तसा लहानपणी मी आपण होऊन 'कुत्रा पाळूया किंवा निदान मांजर तरी आणूया' असा आईकडे धोशा लावलेला आठवत नाही. किंवा मांजर पाळण्याआधीही घरात 'एखादं माऊ पाळूया ना' किंवा 'काय मज्जा येते मांजराशी खेळायला' असले संवाद घडून मग त्यावर 'मांजर पाळायचं की नाही' अश्या प्रकारची चर्चा झाल्याचं आठवत नाही. तसाही घरी कोणालाच मांजरांचा तिटकारा वगैरे नव्हता. तरीही बाबांपेक्षा आईकडे मांजरांप्रती जास्त सॉफ्ट कॉर्नर आहे हे जाणवलं होतं. (अर्थात पुढे मार्जारआगमन झाल्यानंतर सगळ्यांची तीच परिस्थिती झाली ही गोष्ट वेगळी. मग काय आमच्या घरातल्या सर्व सॉफ्टकॉर्नर्सचा उशीप्रमाणे यथेच्छ उपयोग आमच्या मांजरांनी करुन घेतला)

एक दिवस अचानक एका मांजरीच्या छोट्या पिल्लाचं घरी आगमन झालं. मी तेव्हा तिसरी-चौथीत असेन. ते कसं घरी आलं किंवा कुठुन आणलं (बहुतेक बिल्डींगच्या जवळच आढळलं होतं) हे तपशील थोडे विसरायला झालेत तरी ते मांजर मात्र कायमचं स्मरणात राहिलंय. मला आठवतंय त्यानुसार पहिल्यांदा मी त्या पिल्लाच्या जवळही जायला तयार नव्हते. ते पिल्लू मात्र घर अगदी सरावाचं असल्यागत भीडभाड न बाळगता, बिनधास्त इकडेतिकडे फिरलं, थोडंफार म्याव म्याव करुन आम्हाला त्याचा आवाज ऐकवला, दिलेलं दूध चटचट प्यायलंही. (या उलट आमच्याकडे दुसरं जे मांजर आणलं होतं त्याची पहिल्या दिवशी नवीन घर पाहून उडालेली घाबरगुंडी अजून आठवते!) मला दिवसभर आज काहीतरी वेगळं घडलंय हे जाणवत राहिलं. दुसर्‍या दिवशी मात्र न घाबरता त्याला हात लावला. तो मऊ स्पर्श खूप आवडला. मग काहीही कारण नसताना त्याचं 'टमकू' असं एक निरर्थक नाव ठेवलं गेलं पण त्याला त्या नावाने आम्ही कधीच हाक मारली नाही. 'स्वार्थी', 'आपमतलबी', 'लुच्ची' वगैरे मांजरांना हमखास चिकटणारी विशेषणं या मांजरापासून फटकून दूर होती की काय कोणास ठाऊक पण हे मांजर खरोखर अतिशय शहाणं होतं. घरच्या दूधभाताची सवय लागल्यामुळे म्हणा पण 'बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत' ही शिकवण आमच्यापेक्षा त्यानेच जास्त अंगी बाणवली होती बहुतेक कारण बाहेरुन चिमण्या, उंदीर किंवा तत्सम खाद्यविशेष त्याने कधीही तोंडात पकडून घरात आणल्याचं आठवत नाही. कधीही मातीतून लोळून आलंय, चिखल तुडवत आलंय असं न दिसल्याने कायम बेटं आंघोळ केल्यासारखं स्वच्छ दिसायचं. सकाळच्या कोवळ्या उन्हात गॅलरीत ते पहुडलेलं असे. त्याच्या मऊ केसांना बिलगून असलेली सूर्याच्या कोवळ्या किरणांची प्रभा पाहणं मोठं आनंददायी असे. अशा वेळेस उन्हामुळे त्याच्या पातळ कानांच्या शिराही स्पष्ट उठून दिसून कान लालसर दिसायचे.

खूपसं पांढरं आणि उगाच आपले नावाला काही काळे ठिपके असं रंगरुप असणार्‍या त्या पिल्लाने खूप लळा लावला. (तेव्हा मला सोनेरी-पिवळ्या रंगांची मांजरं जास्त आवडायची. पण तो योग कधीच आला नाही. नंतर पाळलेली तिन्ही मांजरंसुद्धा काळीपांढरीच होती.) ते पिल्लू हळूहळू मोठं होऊ लागलं. त्याच्यासाठी घरातल्या एका कोपर्‍यात आईच्या जुन्या सुती साडीचा मऊ बिछाना तयार केला गेला. तो त्याला भारी आवडायचा. मुळातच शांत स्वभावाचं आणि नाजूक म्याव करणारं ते मांजर शहाण्यासारखं दिलेल्या वेळेलाच दिलं तेव्हढंच दूध किंवा खाणं खायचं. मांजरांमध्ये जात्याच असणारा आगाऊपणा, अधाशीपणा कधीच आढळला नाही त्याच्यात. घरी लबाडपणे वागून पदरात जास्त मोठं घबाड पाडून घेणे किंवा घराबाहेरच्या स्वजातीय बंधूंशी भांडणे करुन त्याची निशाणं अंगावर वागवत, बोंबलत घरात प्रवेश करणे इत्यादी घटना त्या काळात कधी घडल्याचं स्मरणात नाही. किंवा त्याच्या इतर लीलांमुळे शेजार्‍यांच्या तक्रारीही कधी घरी आल्या नाहीत. उलट काहीजण त्याला खेळायला म्हणून त्यांच्या घरी जरावेळ घेऊनही जायचे. तेव्हा त्यांच्या घरातून हसण्याखिदळण्याचे आवाज ऐकू यायचे. आमच्या घरी आम्ही बहिणी खूप खेळलोय त्याच्याशी. वीतभर दोरीपासून, पिंगपॉंगचा बॉल किंवा काही नाही तर अगदी रुमालाचा बेडूक असली कसलीही आयुधं घेऊन त्याच्याबरोबर आम्ही खेळत असू. त्याच्या मोहक हालचालींनी खूप आनंद दिला. खेळून कितीही दमणूक झाली तरी स्वारी झोपायला त्याच्या बिछान्यावरच जाणार. नाहीतर कुठेही ताणून द्यायची मांजरांची सवयच असते. (खासकरुन कोच अडवून ठेवणे असले उद्योग कधी त्याने केले नाहीत. नंतर पाळलेल्या तिन्ही मांजरांना कोचावरच ताणून द्यायची सवय लागली होती. त्यामुळे पाहुणे येण्याआधी करायच्या पसारा आवरण्यासारख्या तयारीत कोचावरच्या झोपलेल्या मांजराचं मुटकुळं तसंच्या तसं उचलून दुसरीकडे ठेवणे हेसुद्धा एक काम असायचं) त्याची ही वैशिष्ट्ये तेव्हा खास लक्षात आली नाहीत पण पुढे पाळलेल्या तीन मांजराचे स्वभावनमुने बघण्यात आले तेव्हा वारंवार या शहाण्या पिल्लाची आठवण येऊन खूप वाईट वाटे.

वाईट अशासाठी वाटायचं कारण दुर्दैवाने या मांजराचा मृत्यू आमच्याच घरात आमच्या डोळ्यासमोर झाला. त्या छोट्या पिल्लाचं पूर्ण वाढलेल्या मांजरात रुपांतर होण्याआधीच एक दिवस अचानक ते आम्हाला सोडून गेलं. आपल्या लाडक्या गोष्टीचा अंत डोळ्यासमोर होण्यासारखे दुसरे दु:ख नाही. त्या लहान वयात तो दिवस खूप परिणाम करुन गेला. त्याला कसलासा आजार झाला होता बहुतेक असं आता वाटतं कारण ते न हिंडता फिरता त्याच्यासाठी ठेवलेल्या मऊ गादीवर स्वस्थ पडून रहात असे. आम्हाला वाटायचं दमलं असेल. तशीही मांजरांना झोप प्रिय असतेच. पण प्रत्यक्षात अशक्तपणामुळे ते हिंडतफिरत नसणार. ते मांजर इतकं शहाणं होतं की त्या आजारी अवस्थेतही ते टॉयलेटसाठी बाथरुम मध्ये जात असे. आम्ही त्याला टॉयलेट ट्रेनिंग वगैरे काहीही दिलं नव्हतं. (तसं काही स्पेशल असतं प्राण्यांसाठी हेही ज्ञान नव्हतं तेव्हा) पण प्रथमपासून त्याला आपण होऊनच बाथरुममध्ये जाण्याची सवयच लागली होती आणि ती शेवटपर्यंत राहिली होती. ते बघून डोळे जाम भरुन यायचे. शेवटी त्याला खाणंही पचेनासं झालं. त्याच्या वाडग्यातलं तसंच्या तसं राहिलेलं दूध पाहून शंकेची पाल मनात चुकचुकली आणि अशातच एका दुपारी त्याचा श्वास थांबला. मृत्यू झाल्यानंतर शरीर एकदम ताठ झालं होतं....

नंतर त्याचा आवडता बिछाना असलेला तो रिकामा कोपरा पाहणे म्हणजे एक शिक्षाच होती. त्याच्या जाण्याने जी एक पोकळी झाली ती कशानेच भरुन निघाली नाही...नंतर पाळलेल्या मांजरांनीही नाही.... कॅमेर्‍यात कधीही बंदिस्त न करु न शकलेल्या या छोट्या दोस्ताला माझ्या मनातल्या एका कोपर्‍यात एक चिरंतन स्थान आहे. त्याच्याविषयी आता अधिक काहीच लिहू शकणार नाही.


Mansmi18
Monday, July 30, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी,

वाचताना डोळे भरुन आले. अतिशय साधे सरळ ह्रुदयस्पर्षी लिखाण.

अभिनंदन.



Daad
Monday, July 30, 2007 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मी म्हणतायत तसं अगदी साधं सरळ पण हृदयस्पर्शी. इतकं सहज लिहिणं सोप्पं नही. छान लिहिलयस. लिहीत रहा.
(मी कुत्रे वेडी पण तुझ्या टमकूने हलवलं. शहाणंच होतं ते)


Marhatmoli
Monday, July 30, 2007 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! सायुरि सुंदर लेख. मी generelly मांजरिना नफ़रत की निगाह से बघते पण तुझ टमकु आवडला. त्याचा photo पण छान अलाय एकदम उठुन आळोखेपिळोखे द्यायला लागेल अस वाटतय

Zakki
Monday, July 30, 2007 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, माझ्या मुलीला वयाच्या तीन वर्षापासून मांजराची आवड. पण सौ. ने म्हणजे 'अज्जिबात नाऽही' अशा शब्दात तिची बोळवण केली. मग तिने मांजरांची चित्रे, सेरॅमिकची छोटी मांजरे यावर आपली भूक भागवली. लग्न झाल्यानंतर लवकरच तिने स्वत:च्या घरात एक मांजर आणले. तिच्या मैत्रिणीने दिले, म्हणून.

मांजर होते तीन वर्षाचे. तो बोका आहे. त्याचे नाव तिने मिस्टर मियाओगी (कराटे किडमधला गुरू) असे ठेवले. पशुवैद्याकडील पहिल्याच भेटीत कळले की त्याला हृदयरोग आहे, नि एरवीहि त्याची प्रकृति बरी नाही. पण माझी मुलगी इतक्या प्रेमाने त्याला वागवते, ते पाहून मला गद्गदून येते.

नुकतेच कळले की त्याचे सर्व दात काढायला पाहिजेत. ते पण झाले. मग अनेक दिवस त्याला सॉलिड अन्न खाता येत नव्हते. इतर काही जबरदस्तिने खायला द्यायचे, मग ते ओकायचे. अधून मधून रागाने ते मुलीला चावायचे! हे सगळे उपचार मुलीने अत्यंत प्रेमाने केले. मध्यंतरी एक दोनदा आठवडाभर गावाला गेली तेंव्हा तिने तिच्या भावाला (माझ्या मुलाला) त्याची काळजी घ्यायला सांगितले होते. त्याला अर्थातच त्यात इन्टरेस्ट नव्हता, पण मुलीने दररोज दोन तीनदा फोन करून त्याला मांजराची व्यवस्थित काळजी घ्यायला लावली.

अशी ती मार्जारप्रेमी मुलगी. तो बोका मेला तर माझ्या एकुलत्या एक प्रेमळ मुलीला किती दु:ख होईल या कल्पनेने मला वाईट वाटते. देव करो नि तिला लवकरच एखादे निरोगी छान छान पिल्लू मिळो. सध्या तरी या मांजराच्या देखभालीपुढे तिला दुसर्‍या मांजराकडे लक्ष द्यायला वेळ नाही.


Bee
Tuesday, July 31, 2007 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, खूप तरल लिहिलं आहेस.. मुक्या जनावराविषयी प्रेम करणारेही आहेत ह्या जगात. मला वाईट फ़क्त ह्याचच वाटतं की मुक्या जनावरांवर प्रेम करणारे मासाहारी कसे काय असू शकतात.. पण असेही लोक दिसतात तेंव्हा कळत नाही की ह्यांचे प्रेम पाळीव प्राण्यावर आहे की एकूणच प्राण्यांवर आहे.

Kashi
Tuesday, July 31, 2007 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी....मी एक मांजरप्रेमी...लग्नहोइ पर्यंत आमच्याकडे अनेक मांजरी होत्या..माझ्या आजीपासुन चालत आलेल्या अनेक पिढ्या मंजरी आमच्या आयुश्याचा एक अविभाज्य भाग होत्या..

Sayuri
Tuesday, July 31, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना धन्यवाद. मायबोलीवर चढवलेलं माझं हे पहिलंच लिखाण. अनेक दिवसांपासून आमच्या मार्जारविशेषांच्या आठवणी मनात रुंजी घालत होत्या. त्या कागदावर उतरवल्या (नव्हे अजून उतरत आहेत...आणखी तीन मांजरं बाकी आहेत.

मराठमोळी,
अगं हा आमच्या मांजराचा फोटो नाही. ते इमेलने येतात ना मांजरांच्या मोहक अदांचे वॉलपेपर्स वगैरे त्यातलंच हे एक आहे. दिसण्यात आमच्या मांजराच्या थोडं जवळपास जातं हे. आमच्या मांजराचा फोटो काढायचा राहूनच गेलं :-(

झक्की,
तुमच्या मुलीच्या मांजराविषयी वाचून वाईट वाटलं. देव करो आणि त्याचं दु:ख कमी होवो. मांजरांचा लळा फार पटकन लागतो आणि तो सुटणं अवघडच.



Manutai
Tuesday, July 31, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिया ०दऽऽउं!
Vज़

same article from Manogat website. I think you only written it sayuri, isn't it? or somebody may hv copied yr article.


Manutai
Tuesday, July 31, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

VJ सोम, ३०/०७/२००७ - ००:२३. विचार | अनुभव | वाङ्मय | विरंगुळा
Vज़

हे पोस्ट करायचे राहिलेच की!


Sayuri
Tuesday, July 31, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yes thts me. I posted it on manogat too :-)
Thanks manutai (tumcha id mast ahe)

Manutai
Tuesday, July 31, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनी i mean म्हणजे मांजरीच पण मी नव्हे, माझी मांजर डोळ्यांची लेक. मला पण मनुताई (खरी मांजर) आवडते, पण कुत्रा जास्त आवडतो.

thank u, u hv clarified immediately. नसता मायबोलीवर कधीकधी वाद सुरु होतो.


Pillu
Tuesday, July 31, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी खरेच छान लिहिले आहेस. मी मार्जार प्रेमी नाही.पण तिटकर वैगेरे नाही. माझ्याकडे छान कुत्रा आहे. पण दुर्दैवाने माझ्या हातुन एक दुर्घटना झाली तेव्हापासुन मांजर हा विषय काढला तरी घाबरयला होते. पण त्याची कबुली मात्र द्यावी असे वाटते कारण लहान पणा पासुन हा विषय माझे डोके खातोय. मी ४ / ५ वर्षांचा होतो आणि मी माझ्या काकुकडे आश्रीत म्हणुन रहात होतो. काकुने एक मांजर पाळली होती. तिला लहान अशी ३ पिल्ल होती. त्यांच्या बरोबर मी खेळत असे. एकदा मी खेळत अस्ताना त्या लहान पिल्लांना एका डब्यात बंद केले झाकण लावले अन चुकुन त्यांच्या कडे लक्ष न देता खेळण्यात गुंग होऊन गेलो. बर्‍याच वेळाने काकुने पिल्लांना दुध देण्याकरीता आवाज दिला पण कोणी आले नाही तिने मला विचारले की पिल्लांना कुठे पाहीलेस का मी खरेच विसरुन गेलो होतो. मी नाही म्हणुन सांगीतले म्हणुन ती घरा बाहेर येऊन बघु लागली. तेव्हा मांजर त्या डब्याजवळ घुटमळत होती्ए तिने पाहीले काकुला काय वाटले कुणास ठाऊक पण तिने तो डबा ऊघडला आणि त्या बिचार्‍या मांजरांचा काही दोष नस्ताना दुर्देवी अंत पहावा लागला कारण मी डब्याचे झाकण लावले होते त्या मुळे त्यांचा गुद्मरुन अंत झाला याला लहान असलो तरी मी कारणीभुत होतो. ही सल मला आयुष्यभर सलत राहणार आहे.

Pillu
Tuesday, July 31, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे मी चार ते पाच वर्षाचा होतो असे लिहिले होते पण ह्यात ४५ वर्ष आले आहे

Sunidhee
Wednesday, August 01, 2007 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं!! किती ग गोड मांजर बाळ होतं ते सायुरी.. पाणी आले डोळ्यातून.
माझे पण मांजराचे पिल्लु मला लवकर सोडून गेले. ते आमच्या घराबाहेर असताना २ मोठ्या कुत्रांनी त्याच्यावर हल्ला केला. एकदम भूंकण्याचा आणी पिल्लाचे आर्त म्याऊ ऐकू आले म्हणुन हातात होते ते फेकून धावत सुटले आणि त्या कुत्र्याना हाकलून लावले.. पिलावर ओरखडा पण आला नव्हता पण बहुतेक शॉक नी ते गेले, आणि मी काहीही करु शकले नाही.. ते मनाला इतके लागले की मी शपथ घेतली.. ह्या पुढे कधीही प्राणी पाळणार नाही.. अजुन पण ती मोडली नाही.. सहनच होत नाही त्यांचे लळा लावून सोडुन जाणे. :-(

झक्की, पिल्लु :-(


Sanghamitra
Wednesday, August 01, 2007 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच लिहीलेय सायुरी. मस्त वाटले वाचून.

Pillu
Thursday, August 02, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे आहे सुनिधी
पण मी मांजर पाळत नसलो तरी ईतर प्राणी मात्र पाळले आहेत.कुत्रा,कासव,लव्ह बर्ड असे पण मांजर पाळायचे धाडस मात्र होत नाही


Sayuri
Thursday, August 02, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना प्रतिसादासाठी आभार.
Pillu, Sunidhi,
hmmm मी तुमच्या जागी असते तर माझंसुद्धा तसंच झालं असतं

Cinderella
Friday, August 03, 2007 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, खुप छान वाटले तुझा लेख वाचुन. मी आणि आमच्या घरातील सर्वच (एक मोठी बहिण सोडता...) मांजरप्रेमी आहेत. मला पण आमच्या सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात शहाण्या मांजरीची, सोनीची आठवण झाली. तिच्याविषयी असाच एक लेख लिहावासा वाटते आहे.
आणि भारतात असशील तर एक सुंदर पिवळे-सोनेरी मांजर तुला भेट देइन
:-)

Disha013
Friday, August 03, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी,खुप छान लेख.
(मला कुत्रे आवडतात. मांजरांच्या बाबतीत मी तटस्थ असते. तरिही तुझे वर्णन आवडले खुप.


Sayuri
Friday, August 03, 2007 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Disha, Cinderella,
Thanks :-)
सिंड्रेला लिही ना मग सोनीवर..वाचायला आवडेल. प्रत्येक मांजराची तर्‍हा वेगळी असते :-)

Swa_26
Tuesday, August 07, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरि, खरंच खूप छान आहे तुझे लिखाण..
आमच्याकडे पण सगळे मांजरप्रेमीच :-) माझ्या फोटोग्राफर भावाचा तर एकही रोल असा नसेल, ज्यात मांजराचा फोटो नाही :-)
एकदा माझ्या माउचा पाय fracture झालेला. कोणालाच हात लाउ देत नव्हती. मग मीच घरात त्या मोडलेल्या पायावर एक पट्टी बांधली आणि औषध लावले. त्या गडबडीत तिने मला २ ते ३ वेळा ओरबाडले... पण तिला दुखत होते ना!!
पण नंतर तिचा अंत पहावा लागल्याने आता मन धजावत नाही परत काही मांजर घरात आणायला.. :-(





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators