Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
NavaRyAche ghar

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » कथा कादंबरी » NavaRyAche ghar « Previous Next »

Jaijuee
Friday, July 13, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्नाची हळद पंधरा दिवसात उतरली नव्हती तवा शकूच्या लक्षात आलं की तिच काई नेहमीसारखं नाहिये, काही तरी वेगळंच होतय अंगात. कशाचाच नीट उलगडा होईना तिला. कोनाशी बोलावं नी काय विचरावं ते बी सुदरना! जावेशी अजून तेवढ सूत नव्हतं आन सासूशी बोलायची हिम्मत नव्हती. नवर्‍यालाबी काय सांगाव जर तिलाच काय ते उमजत नव्हत? लग्नापूर्वी गोजाक्काने काही बाही सांगीतल्याल पण त्यातल ऊलीच कळल्यालं.

शेवटी धुण्यावर ती जावेला धीर करून बोलली, "बाई, जीवाला कस तरी होतय बघा. काही खाऊ नाई आन पिऊ नाईसं वाटतय!" जावेला यातला कुटचा अनुभव? लग्नाला पाच वर्ष झाल्लीती पण तिची कुस उजवली नव्हती. ती आपलं ओवा, बडीशेप आसलं काय तरी बडबडत र्‍हायली नि अजून फोड करून कसं सांगाव ते न उमजल्याने शकू र्‍हायली कापडं चुबकत! शेजारच्या फ़तरीवर धुण्यावर आलेल्या चंद्रानं मध्ये तोंड खुपसलन "वैनी, धाकट्या बाई पोटुशी हैती" हात थांबवून जाऊ शकूकडं पहातच र्‍हायली आन शकू आतल्या आत फुलत र्‍हायली.

जावेकडून दीराला, त्याच्याकडून नवर्‍याला नी सासर्‍याला, तिथून सासूला तर सासूकडून नणंदांना, सगळ्यान्सनी खबर लागली. हे काय बाबा आक्रीत? त्यांना पोर झाल्लीती २४ वर्षात देवीच्या नवसाने आन जावेला तर अजून काय नव्हतं नी हिचच कसं एवढ्यात झालं? थोड्या दिवसांनी सणाच्या निमित्तानं नणंदा घरी आल्या. रात्री सोप्यावर सगळी जमली. शकूला कळना झालं की ही सगळी अस काय करुन र्‍हायलीत? ती आतच र्‍हायली.

थोरल्या नणंदेने चंची सोडली "आई, अगं, वैनीच काय ग ह्ये?" मग धाकटीनही हात घातला, "काय समजायच आपन?" "फुटक नशीब माझ्या पोराचं. आधीच कुटनं तोंड काळं करू आली ही बया आन आता आमच्याबी घराला बट्टा लावतेय" सगळ्यांच्या मनातलं बोलून सासून गळा काढला. आतून ऐकणारी शकू सटपटलीच.

गरीबाघरची आसली तरी रीतीची होती ती. कॉलेज नाही पन शाळा, शिवण सगळ शिकवलेलं तिच्या बापाने. बापाच्या माघारी भावांनी ज्याच्याबरोबर पाट लावला त्याच्या मागून ती या घरात आली. तिच्या गावात येता जाता तिने कोणाला डोळा घातला नाई की कोणी तिची वाट अडवली नाई. नवर्‍याशिवाय दुसरा पुरुष मळमळलच तिला एकदम!

तिच्या वांत्या ऐकून सासूला आजून चेव आला नि तिच्या नणंदानी पण गलका सुरु केला.

क्रमश:


Cosmo
Friday, July 13, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

interesting!

'बी' च्या कथेला फ़ुलवण्याचा प्रयत्न ...please keep it up!

Jaijuee
Saturday, July 14, 2007 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"गपा ग आता" सासरा करवादला, "सोमा, तुजच का आता पोर हे?" नवर्‍याला पण नक्की कशातलं काय म्हाईत हुतं? "काइ म्हाईत नाई बा!" नवर्‍यानेच आसं झिडकारल्यावर बाकीचे सगळे कालवा करु लागले. जाउ तेवढ्यात मध्येच बोलली, "पन त्य चंद्रीनं गावभर भोंगा केला नव्हं? आता घराभाईर काडली तर गावकी हज्जार तोंडानं बोललं की?" "मग पोर होईस्तवर र्‍हाऊ द्यात, मग बघू काय करायचं ते!" सासर्‍याचे शब्द ऐकून शकूचा जीव थार्‍यावर आला.

आई बाप नसलेलं माहेर म्हणजे आसुन नसल्यासारखच. आताच्या घडीला माहेरी गेली तर भावजया टोचून जीव पिसडून टाकतील. कष्ट तर सगळीकडेच होते की! इथे निदान नवर्‍याचं छप्पर तरी डोक्यावर होतं. डोळ्यासमोर र्‍हायलो तर चुकून कधी नरमतील ही आस पण होती!

त्या दिवसांनतर शकूशी कोनी बोललं नाई की चाललं नाई. दारच्या कुत्र्याशी कुणी मायेने दोन शब्द बोललं आसेल पन शकूचे हाल कुणी विचारीना! पहिलं पोर, पन कसले डोहाळे नी कुटची सुईण? शकू तिथे दिवस काढत र्‍हायली, शिळंसुकं खात र्‍हायली आन पडतील ते कष्ट उपसत र्‍हायली. शेवटी गोठ्यातच तिनं वेणा दिल्या नी तिथेच तिचे पोर जन्माला आलं.

पण त्या वीतभर पोराला सासू नदीत बुडवायला निघाली तसा शकूचा जीव धसकला. तिनं पोराला मिठीच घातली. आता आपलं पोर काही हे ठेवत नाहीत हे बघून पोराला थानाशी घेऊन शकू नवर्‍याच्या घरून निघाली आणि भावांच्या दारावर उभी र्‍हायली.

क्रमश:


Limbutimbu
Saturday, July 14, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाईजुई! गुड वर्क! ..

Athak
Saturday, July 14, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा सुधारीत आवृत्ती जमेश :-) , good work ,
आधीच्या अंकाची लई चिरफाड झाली :-)


Chetnaa
Saturday, July 14, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाई जुई, छान जमतेय ग... :-)
कर पूर्ण लवकर...


T_pritam
Saturday, July 14, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jaijuee,
maanya aahe ki 'Bee' ni lihileli original katha khupach ardhavat hoti aani khupshya ghatana neet basavalya navhatyaa. Pan tyaach barobar tyaanchya plot var tumhi ithey parat katha lihina mala tari thik vaatat nahi. Tumhala jar tyaana samajavayacha hota tar tumhi privately tyaana mail karu shakala astaa.

No doubt, tumhi chaan lihitay, pan ithey asa vaatun jaatay ki tumhii tyanchi katha parat lihun muddam tyaana kamipana aananyaacha prayatna kartaay, which i think is equally wrong.

Bee ni lihileli katha mala ajeebaat aavadali nahi, kaaran bakichyaani mhatalyapramane ti ajun phulavun lihayachi aavashyakata hoti. Pan ti dusarya kuni tari ithey lihavi hi apeksha ajeebat navhati...

Maaf kara, pan mala tumacha he ti gosht parat lihina aavadala nahii. I don't think its healthy coz it might set a bad example aani yaapudhe kadachit pratyek jan konachyahi kathecha plot aapalyaala hava tasa lihit rahil, ...mul lekhaka/lekhike peksha aapan varchadh aahot he sidhha karanyaasathi....

krupayaa aapan asaa payandaa padu naye hi vinanti...

Ksha
Saturday, July 14, 2007 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i second pritam. जरीही B ची कथा सुमार दर्जाची असली तरी याचा अर्थ असा नाही की "बघ, अशी लिहायची कथा" असे दाखवायलाच हवे.
तुम्ही खूप चांगलं लिहिताय आणि त्यामागचा उद्देशही चांगलाच असेल. पण त्याबाबत गफलत होऊ शकते हे लक्षात घ्या. मी इथे कुणालाही support किंवा विरोध करत नाहीये, पण प्रितमने म्हंटल्यानुसार असा नवा पायंडा पडू शकतो जे योग्य नाही.

बाकी परमदयाळू नेमस्तकांनी या मायबोलीवर मर्यादीत व्यक्तिस्वातंत्र्य दिलेले आहेच :-)


Nilima_v
Sunday, July 15, 2007 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good work JaaiJui.
Thanks for taking efforts.

Nilima_v
Sunday, July 15, 2007 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kamkuwat Managataachee Shakoo sheewatee kashee Thaam aani khamakee banate he changle rangaw ( just a request) hee ghatana kathechee jaan aahe.

Bee
Monday, July 16, 2007 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाईजुई, खूप छान रंगली आहे कथा. खास म्हणजे गावाकडची भाषा सहज सुंदर जमली आहे. जरी ही कथा तू माझ्या कथेवरून लिहित आहेस तरी ती पुर्णपणे तुझी स्वतःची कलाकृती वाटते आहे. तुझ्यापरिने तुला जमेल तशाप्रकारे पुर्ण कर.. माझी कसलीच हरकत नाही.

Daad
Monday, July 16, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानलं बी, तुम्हाला. मनाचा मोठेपणा!
जाईजुई... छानच चाललय. भाषेचा बाज, पात्रं, घटना खुलवणं अगदी हातचा (डाव्या) खेळ दिसतोय..... मजा आया!


Manjud
Monday, July 16, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, very good ह्याला म्हणतात खिलाडूव्रुत्ती.

जाईजुई, कथेच्या सुरुवातीला तुम्ही बी ला उद्देशून लिहायला हवं होतंत. निदान त्याची परवानगी तरी घ्यायला हवी होतीत.

प्रितम आणि क्षशी सहमत.


Bee
Monday, July 16, 2007 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु, तुझी सूचना चांगली आहे पण तेवढी औपचारीकता मला तरी नाही लागत. जुई, काही हरकत नाही..

Jaijuee
Monday, July 16, 2007 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोराला कडेवर बघून कोनीच काई विचारलं नाई, पोराचं थोडं कौतुक झालं. भावजयाही लग्नाला, सणाला शकूला घेऊन गेल्या. अश्याच एका लग्नात सासरच्यांनी पोराला पाह्यलं आणि हरकलेच सगळे. पोराने अगदी बापाचा तोंडावळा घेतलेला. "माजीच कर्तूत!" म्हणून नवराही खूश झाला. नणंदाही दोन शब्द बोलल्या.

"माजं पोरगं" म्हणत नवरा भावाघरी याया-जाया लागला. शकूला जरा बरं वाटलं. पोराला कदी आंगडं, कदी करदोटा आनायला लागला. शकू दोन तीनदा आजूबाजू बोवाळून र्‍हायली पण तिच्याशी काई तो बोलला नाई. शकू आसूसत र्‍हायली की आज ना उद्या तो आपल्याकडं बघलं, पोराला घीऊन घरी चल म्हणेल.

चार पाच महीने झाले तरी नवरा काई बोलला नाई. शकूने मन घट्ट केलं आन शिवणकाम सुरु केलं. चार पैसे गाठीशी बांदायलाच हवे होते. तोंडावर नाई तरी आडून आडून गावकी बोलतच होती, नवरा येतो तर मग नांदवायला का नेत नाई? आसं सगळ्यांनाच वाटत होतं.

शकू भावांच्या घरी राबत र्‍हायली, वेळ मिळलं तशी कापडं टाचत र्‍हायली, मामा मामीचे लाड नसले तरी तिचं पोर वाढत र्‍हायलं, शकूचं एकटं आसणं गावाच्या नजरंत आन शकूच्या मनात खूपत र्‍हायलं! काय झालं ते न विचारता लोक तिला बोल लावत र्‍हायली आन दगडासारख्या घटपनानं शकू सगळं सोसत र्‍हायली.

"बाई, ताईंना एवढबी कळना की आपलं मानूस येत जात आसेल तर त्याला धरून ठिवावं ते? बगा, कुंभाराच्या अनीचं काय झालं आता!तिच्या नवयाने तिकडे दुसरा मव्हतीर लावलं आन ही बसली इकडं कर्माला बोल लावत" "तर वो, बूच नसल्याली शिशी आन नवर्‍यानं टाकलेली बाई, दोगांची तिच तरा! कुनी विचारत नाई" भावजयांचं बोलनं ऐकून शकूला आंगभर इंगळ्या डसल्या. तिला वाटलं कि आसच तरातरा जावं नी एकेकाला विचरावं, "भरल्या पोटी तुमच्या शानपनाच्या गप्पा. जेवा तान्या पोराला घीऊन मी एकटी दारात उबी र्‍हायले, तेवा का माज्या सासरी जाब विचारला नाई? नवरा नेमी येतो त्याला कोनी काई का म्हनत नाई?"

भावांच्या आधारावरच जगत होती ना ती? अपमान न गिळून सांगते कुनाला? कडूजार तोंड घेऊन शकू रामाच्या देवळात गेली. आज बुवाचं किर्तन होतं. बुवांनी "लंकाकांड" सुरु केलं, एका मागून एक युद्ध होत होती. शकू हळूहळू कथेत रमून गेली, बुवांनी जणू तिच्या डोळ्यांसमोरच रामाचा लंकेवरचा विजय उभा केला. सीतामाईची सत्वपरीक्षा सुरु झाली आणि शकुच्या मनातला कडवटपणा पुन्हा वर ऊफाळून आला. "का नेमी नेमी बाईनंच भोगावं? जवा रावनानं उचलून नेली तेवा होतेच की ह्ये दोन दोन शूर? त्यांना राखता आली नाई ना! आन सीतामाई त्या रक्ससाकडं होती तेवा रामबी येकटाच होता ना रानात? मग त्याला कुनी कसली परीक्सा द्यायाला सांगीतली? मूळीच देऊ नाई सीतेने परीक्सा नि काई रामाकडं जावं नाई" बुवांच्या रसाळ भाषेत त्यांनी निरुपण सुरु केलं ", पहा बरं सीतामाईंचं मन किती मोठं आहे. अहो, जिने काहीच पाप केलं नाही, जिचा ह्या सगळ्यात काहीच दोष नव्हता आणि ज्या रामाचं नाव कायम तिच्या ओठातून येत राहिलं, त्या तिच्या जीवलगाने तिच्यावर संशय घ्यावा! पण तिने अग्नीप्रवेश करून आपलं पावित्र्य राखलं आणि आपल्या पतीचा मान ठेवला. स्त्रीकडेच ही ताकद आहे बरे का? आपल्या मुलांचे, पतीचे सगळे अपराध पोटात घेऊन उदंड माया तीच देऊ शकते. सीतामाईने कसलाही अहंकार ठेवला नाही. पतीने दोनदा त्याग करूनही तिने पतीला कसलही दुषण दिलं नाही. पतीने क्षमायाचना न करताही तिने पतीला मोठ्या मनानं क्षमा केली. उगाच का तिला देवी म्हणतो आपण? हा संसार सुरळीत ठेवण्याची शक्ती केवळ स्त्रीकडेच आहे. म्हणूनच तर स्त्रीला आदीमाया म्हणतो आपण. तर मंडळी म्हणा जय सीताराम, जय जय सीताराम"

बुवांचं सांगणं ऐकून शकू घराकडं निघाली. घरी जाऊन तिनं आपली, पोराची पिशवी भरली आन पोराला घीऊन तडक सासरच्या वाटंला लागली. तिला नसली तरी तिच्या पोराला बापाची गरज होती. तिच्या नवर्‍याचं घर राकायसाठी सासरच्यांना माफ़ी करायची ताकद तिच्यामध्ये आता आली होती.

समाप्त
("बी" च्या कथेवर आधारीत)


Ravisha
Monday, July 16, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाईजुई,छान... आवडला "नवर्‍याचं घर" चा remake :-)
"लंकाकांड" उल्लेखनीय आणि हो बी,तुमचा मोठेपणाही :-)


Rajankul
Monday, July 16, 2007 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमीबी १५ दिवसच? बाई मानुसाला तरी समजाया हव की न्ह्यायी? का ह्यो बी च आहे?

Mansmi18
Monday, July 16, 2007 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही असे वाटते की आधी "बी" ची परवानगी घ्यायला हवी होती.
बी ने हे खिलडुवृत्तीने घेतले ते ठीक आहे पण कथा सुरु करण्यापुर्वी दोन वाक्ये टाकली असती तर बर झाले असते.

नशीब समजा तुम्ही पुलंची कथा "पालिस" मारायला घेतली नाहीत नाहीतर "सुनिताबाई" लाटणे घेउन मागे आल्या असत्या:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators