|
Chetnaa
| |
| Thursday, July 12, 2007 - 2:38 am: |
| 
|
पुढच्यास ठेच.... पहाटे पहाटे गायनाचे सूर कानावर आले.सूर शेजारच्या फ़्लट मधुन येत होते.इतके दिवस रिकाम्या असलेल्या फ़्लट मधे मागच्याच आठवड्यात एक कुटुंब रहायला आले होतें. नवरा,बायको अन मुलगी असे सुटसुटीत छोटेसे कुटुंब. आवाज शेजारच्या वहिनींचा वाटत होता.म्हणजे वहिनी गातात तर. आणि रियाज ही सुरु दिसतोय. म्हणजे अता रोज आमची सुप्रभात गोड सुरांनी होणार.थोडा वेळ का होईना रोज अंथरुणात लोळत लोळत मस्तपैकी सुरांचा आस्वाद घ्यायचे ठरवले. आणि मनातच खुश झालो येणार्या सुमधुर सुरांच्या सुप्रभातीच्या आगमनाने. नाष्टा करताना सहज म्हणुन सौं ना हा बेत सांगुनही टाकला. आणि बोलण्याच्या भरात वहिनींच्या आवाजाचे आणि गायकीचे कौतुकही केले. पण हाय रे दैवा! इतका वेळ मी खाता खाता बोलत होतो,त्यामुले सौं कडे लक्ष नव्हते. पुढ्यात चहाचा कप दाणकन आपटला गेला,तसे एकदम सौं च्या चेहर्याकडे लक्ष गेले. आणि पुन्हा एकदा नको ती चुक करुन बसलो याची जाणीव झाली.पण आता खूप उशीर झाला होता.तीर सुटुन गेला होता.जसा सुटुन गेलेला तीर परत फ़िरने शक्य नव्हते तसेच सौं च्या डोळ्यांत फ़ुललेला अंगार विझवणे आता माझ्या हातात राहिले नव्हते.तीच्या समोर एका स्त्री ची,तेही शेजारणीच्या गुणांची स्तुती मी केली होती आणि या गुन्ह्याला माफ़ी नव्हती. आता या तोफ़ेला कसे तोंड द्यावे तेच कळत नव्हते.शेवटी मी नेहमीचाच उपाय आचरणात आणायचे ठरविले,आणि भांड्यांचा वर्षाव व्हायच्या आत तिथुन पोबारा केला. अगदी नेहमी प्रमाणे... ओलिम्पिक मधे जर अस्मादिकांना धाडले असते तर सौं ना याच नजरेने पहायला लावले असते. आणि नक्किच सुवर्ण पदक पटकावले असते.पण आपल्या देशात आमच्या सारख्या गुणवान लोकांना संधी मिळत नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव. आम्ही बापडे काय करणार? नेहमी प्रमाणे आज रात्री जेवायला मिळणार नव्हतेच. ?? शिवाय सर्व शस्त्रांनी युक्त सौ घरी वाट बघत असणार म्हणुन सरळ थिएटर गाठले. शेवटचा शो संपल्यावर, आता पर्यन्त सौ नक्की झोपली असणार याचा अंदाज घेत घरी पोहचलो. हळुच लॅच की ने दार उघडले.सौ वाट बघता बघता सोफ़्यावरच पसरली होती.घोरण्याच्या आवाजाने तिच्या गाढ झोपेची खात्री करुन दिली,तसे देवाचे आभार मानतच मी बेडरुम गाठली. आतुन दार बंद करुन पलंगावर अंग टाकले व हुश्य केले. आता सकाळ पर्यन्त तरी धोका टळला होता.एव्हाना गाण्याचे सूर व सुप्रभात सर्व काही साफ़ विसरुन गेलो होतो. विसरण्यातच भलं होतं आता.मनातल्या मनात सकाळच्या युध्दाची तयारी करतच झोपी गेलो. सकाळी सौं चे किंचाळणे कनावर पडले तेव्हा मी अर्धवट झोपेतच होतो.तरिही युध्दाची तुतारी फ़ुंकली जातेय हे झोपेतही जाणवले नेहमी प्रमाणे आणि मी झोपेतच बचावात्मक पवित्रा घ्यायला सरसावलो.परत एकदा लांबलचक किंचाळणे कानावर आले ते झोपेतुन खडबडुन जागे करतच.घटिका भरली होती तर? किंचाळणे थांबतच नव्हते.आजचा प्रकार काहिसा वेगळा जाणवत होता.कारण इतर वेळी युध्दाची तुतारी फ़ुंकली जात असताना दारावर धडकाही बसत,त्या आज बसत नव्हत्या.बिचारं दार! आजवर स्वामी निष्ठतेने त्याने खूप धडका सहन केल्या होत्या.आज वाचलं होतं बिचारं! पण आज किंचाळणंही वेगळच वाटतय. नक्कीच झुरळ दिसलं असणार. पण नेहमी पेक्षा आजचे किंचाळणे जरा जास्तच लांबलं होतं, झुरळांची पलटण तर आली नाही ना आमच्या घरात मार्चींग करायला? बाकी आपण या झुरळांना मानतो बुआ! आमच्या सौ सुद्धा त्यांच्यापुढे नांगी टाकतात.वा रे पठ्ठे सौं च्या तांडव न्रुत्याने घराचे भयपटातील घरासारखे भग्नावशेषात रुपांतर होणे टाळण्यासाठी आता ताबडतोब काहीतरी हालचाल करणे जरुरी होते. शिवाय सौं ना झुरळां पासुन संरक्षण दिल्या मुळे कालचा राग विसरायला लावुन स्वत: च्याही संरक्षणाची आस होती.परमार्थात स्वार्थ साधण्याची संधी आयतीच चालुन आली होती.एखाद्या मुरलेल्या राजकारण्या सारखा मी ताडकन उठलो आणि ही संधी साधायला बाहेर आलो. आणि आऽ वासुन पहातच राहिलो. सौ पथारी पसरुन त्यावर ऐसपैस मांडी घालुन बसल्या होत्या.एक हात कानावर व दुसरा हाताने हातवारे करित चक्क गात होत्या. अर्थात ते गाणे कमी किंचाळणे जास्त होते.म्हणुनच मीही फ़सलो होतो की,झुरळांच्या ताफ़्याला घाबरुन तांडव चाललंय की काय? पण आता आमच्या वरच तांडव करण्याची वेळ आली होती.कारण आमच्या सौं नी नवीन एखादा प्रोग्राम हाती घेतला की सोसायटीच्या सर्व मेंबर्स च्या तक्रारींना तोंड देता देता मीच तोंडघशी पडत असे.या वेळी कानघशीही पडावे लागणार बहुतेक?वहिनींच्या गायकी च्या स्तुतीचा बदला अगदी चुन चुन्के धर्मेंद्र स्टाईल ने घेतला जाणार!!!!!!!! मागे एकदा असेच टी.व्ही.वर मल्लिकाला बघुन उस्फ़ुर्तपणे काही उद्गार माझ्या तोंडुन बाहेर पडले आणि मग पुढे महिनाभर तोंड शिवुन? बसण्याची वेळ आली.शिवाय महिनाभर टी.व्ही. बन्द. मल्लिकाचए नशिब थोर की ती आमच्या सौं च्या पहुंच के बाहर है.म्हणुन सुटली बिचारी??पण आम्ही मात्र पुरते अडकलो आणि कायन साठी सौं च्या नजरेच्या पहार्यात रुतुन बसलो. अजुनही स्क्रीनवर मल्लिका दिसली की नजर आमच्यावर रोखली जाते,एवढी आरपार की वरुनच काय मनातल्या मनात मल्लिकाचं नाव उच्चारायल पण धडकिच भरते. डोळे भरुन तिला पहाणे तर दूरच... आणि तरिही परत एका परस्त्रीची स्तुती करण्याचा अक्षम्य अपराध या पामराकडुन घडला होता.या गुन्ह्याला माफ़ी नव्हती,कुठलेही अपील ( मल्लिका चे नाही हो) चालणार नव्हते.शिक्षेला तोंड देणे एवढेच माझ्या हाती राहिलय आता.पाहुया किती महिने चालतो आता हा बदला.देव या वेळी तरी तिला लवकर शांत करो..... अचानक सौं चे गायन थांबले.कनांना जरा बरं वाटतं न वाटतं तोच कडकडाट झाला..... " काय हो? आता बोला की,काल तर खूप स्तुतीसुमने उधळीत होतात तुमच्या तोंडून,आता काय दातखिळी बसली का? त्या सटवीने गाण्याचा काय ठेका घेतलाय एकटीने?आता माझ्यापुढे गा म्हणावं! मुद्दामच तिच्या आधी उठले गायाला... " त्याही स्थितीत मला हसु आले.कुठे कोकिळा अन कुठे कावळी? पण सौं नी ज्या आत्मविश्वासाने वहिनींच्या गायकीला च लेंज केले? मानलं बुआ शिवाय ह्यांच्या दणदणित आवाजा पुढे त्यांनी आवाज कसा लावायचा? बघा,बघा, माझ्या बद्दल चार कौतुकाचे शब्द तोंडातून काढताना केव्हढा विचार करताय? काल मात्र तोंडाला अगदी पूऽर आला होता.एवढं मेल ह्यांना खुश करण्यासाठी ह्यांच्या कानावर सकाळी सकाळी गोड सूर पाडण्यासाठी मी क्लास सुरु केला गाण्याचा,मेलं उठवत नव्हतं तरी सक्काळी सक्काळी उठुन गात बसले एवढ्या सुरात.पण दोन शब्द नाहीत हो स्तुतीचे, माझं मेलं नशिबच फ़ुटकंऽऽऽ... " kramash:
|
Manogat
| |
| Thursday, July 12, 2007 - 12:21 pm: |
| 
|
चेतना, सही मस्त लिहिल आहेस....
|
Itgirl
| |
| Thursday, July 12, 2007 - 1:44 pm: |
| 
|
चेतना, : D dept च्या boring meeting नंतर एकदम fresh वाटले!!
|
Chetnaa
| |
| Thursday, July 12, 2007 - 2:56 pm: |
| 
|
धन्यवाद मनोगत,आयटीगर्ल.. उद्या टाकते आता उरलेली... 
|
Athak
| |
| Thursday, July 12, 2007 - 4:02 pm: |
| 
|
वा वा मान गये हिम्मत की दाद देनी पडेगी छानच चेतना good , keep going वाचु दे पामराचे हाल
|
फ़ार छान लिहिलं आहेस, पुढचं लवकर लिहा......................
|
Chetnaa
| |
| Friday, July 13, 2007 - 2:49 am: |
| 
|
थं क्स.. गणेश,अथक.... आता लिहिते पुढची....
|
Chetnaa
| |
| Friday, July 13, 2007 - 3:06 am: |
| 
|
अरे बापरे,आता मात्र सुरांना भलतेच वळण लागत होते.सुरांना भिजवायला गंगा यमुना वहायला लागल्या्ए ब्रम्हास्त्र बाहेर पडले तसा मी घाबरलोच. आता सर्व सोसायटी डोक्यावर, नाही नाही आवाजावर उठवते की काय? तशी मी घाई केली. " अगं,अगं असं काय वसु? खरंच तू छान गातेस पण आजच्या साठी पुरे झाले गं!! " मी अगदी काकुळतीने म्हणालो.ती खुश झाली आणि अधिकच उत्साहाने आलाप घेऊ लागली. इतक्यात दाराची बेल वाजली. नक्किच चोंबड्या असणार.दारात सदाभाऊ उर्फ़ सदाकदा चोंबडे, आमचे हमखास नाक खुपसणारे शेजारी उभे पहाताच मी डोक्यावर हात मारला. हा चोंबड्या माझ्या बायकोचा एक नंबरचा चमचाही होता.माझी बायको बहुदा जगातली शेवटची बाई उरली होती जिच्यापुढे त्याची थोडीतरी डाळ शिजत होती.बाहेर अनेकदा चपलांचा प्रसाद खाल्ल्यावर बाहेरची पुजा करणे त्याने केव्हाच सोडले होते. आणि आमच्या बायकोलाही भाव देणारे हे एकमेव वीर होते,कारण एकतर आमच्या बायको कडे कुणी ढुंकुनही पहाण्याची शक्यता नव्हती. आणि पाहिलेच तर भल्या भल्यांनाही कापरे फ़ुटत असे. " काय हो पानसे? काय झाले तरी काय?वहिनी पडल्या बिडल्या की काय? मघा पासुन किती जोराने किंचाळताहेत? आणि तुम्ही काय ठोंब्या सारखे बघत उभे आहात? वहिनीऽऽऽऽऽऽ हा बघा मी आलोच तुम्हाला मदत करायला. आता काहेई काळजी करायची नाही.मी आहे ना? " स्वता:ला काय शहारुख समजतो, " म म मै हू ना? ",आगाऊ कुठला. झाली याची चोंबडेपणाची सुरुवात.... " काही पड्ले बिडले नाही हो सदाभाऊऽऽ मी किनई,गाण्याचा रियाज करत होते ऽऽ " " हो काऽऽ,तरिच म्हटलं,सक्काळीच एवढे गोड सूर कुठून येताहेत? " " अय्या खरं ऽऽ च? काय म्हणालात? परत एकदा म्हणा ना ऽऽ " त्याच्याशी गोडीने बोलत आणि माझ्या कडे मारक्या म्हशी सारखे बघत सौ म्हणाल्या. " अहो वहिनी खरंच तुम्ही किती छा ऽऽ न गाता असं वाटतं ऐकत ऽऽ च रहावं " लागला लागला झाडावर चढवायला. मी मनातल्या मनात चरफ़डतच रागाने सद्याच्या पार्श्वभागावर सणसणीत लाथ ठेऊन दिली,तेव्हा थोडे बरे वाटले. " इश्श्य, खरंच का? थांबा हं, मी परत तुम्हाला ऐकवते. " " नको, नको वहिनी,आत्ताच ऐकले ना? तेच विसरायला खूप दिवस लागतील, आणखी नवीन कुठे साठवू? त्यापेक्षा तुमच्या गो ऽऽ ड आवाजात आपण गप्पाच मारुया. तेही तुमच्या हातचा गोऽऽ ड चहा घेत. कशी वाटते आयडीया ? " अच्छा मैफ़िल जमवुन माझी सगळी सकाळ ख्राब करण्याचा वीचार दिसतोय बेट्याचा. आता मात्र चोंबडे वहिनींना बोलवायलाच हवे. तेवढ्यात त्या आल्याच. त्या आपल्या प्रतापी नवर्याला पुरेपूर ओळखुन होत्या. " चहा पिताय? केव्हाची दात घासा म्हणून ओरडतेय तर फ़ुरसत नव्हती आणि इथे काय बेड टी घ्यायला आलाय? चला घरी, मी देते तुम्हाला बेड टी.... " वहिनी सद्याला बखोटीला पकडतच घेउन गेल्या. आता घरी गेल्यावर त्या सद्याला बेड वर आपटून मस्त पैकी चहा ओततील त्याच्या डोक्यावर.व्वा ऽऽ ब्रेव्हो, वहिनी... किप इट अप... मझ्या चेहर्यावर या वीचारांनी हसू दिसल,न की काय कोण जाणे? कारण सौ आता खाऊ की गिळु या नजरेने माझ्या कडे पहात होत्या. " चांगले गाणे ऐकुन स्तुती करत होते माझ्या गाण्याची,नाही ना ऐकवले तुम्हाला अन त्यांच्या त्या सटवीला. चांगलाच धडा शिकवेन एखाद्या दिवशी तिलाही. पण आधी या गाणार्या सटवीच्या आणि तुमच्याही नाकावर टिच्चून तिच्यापेक्षा चांगलं नाही गायले,तर नाव बदलीन माझे... " असं म्हणत सौं नी परत एकदा तोंड उघडलं आ.आअऽऽऽ घाबरुन घाईघाईतच मी म्हटलं, " वसू ऽऽ, वश्या ऽऽ लाडक्या ऽऽ आपण आत्ताच तुझं नाव बदलुन लता ठेवुया का? मग काय बिशाद वहिनींची, की तुझ्या पुढे गातील .... " " कळतात हो मला ही असली तिरसट बोलणी ऽऽ आता तर नाहीच ऐकायची मी.... " असे म्हणत सौ ने परत आपला आ ऽऽ वासला. आता मात्र सुटकेचा कुठलाच मार्ग मला दिसत नव्हता.तसा मी डोक्यावर हात मारुन घेतला.परत एकदा,काय करणार? सवयच झालीय सौं च्या कारकिर्दीत डोक्यावरचे केस झडुन पार टक्कल पडायला लागलय. डोक्यावर मारी त्याच्या केसांना कोण तारी? आणि आम्हाला तर आता प्रत्यक्ष ब्रम्हदेवही तारु शकत नव्हता. तर मंडळी, जाता जाता तुम्हाला सावधगिरीचा इशारा देतोय. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा. मी स्वत:च पुढे असल्याने, स्वत:च्या अनुभवाने ( आधी घेतलेला असुनही,आठवा मल्लिका? ) शहाणा होउ शकलो नाही,पण तुम्ही तरी व्हा. आणि बायको समोर कधीही परस्त्रीची स्तुती करुन स्वत:च्या पायावर धोंडा पाडुन घेउ नका. मग ती स्त्री खरोखरीची किंवा चित्रातली, चित्रपटातली असो वा दगडातली म्हणजेच शिल्पातली ( नाव ऐकुन टवकारलेच का कान? ). त्या प्रसिध्द तीन माकडां सारखे डोळे, कान व तोंड बंद करुन बसा. नाहीतर भोगा माझ्यासारखे....... समाप्त
|
Zakasrao
| |
| Friday, July 13, 2007 - 4:36 am: |
| 
|
डोक्यावर मारी त्याच्या केसांना कोण तारी>>>> चेतना पहिलच लिखाण आहे अजुन सुधारणेला वाव आहे. पण हे ही जमलय बरं! BTW तुला हे पुरुषांच कस काय माहिती बुवा? घरी चांगल निरिक्षण करतेस नहुतेक. दिवे घे. लिहित रहा.
|
Chetnaa
| |
| Friday, July 13, 2007 - 6:12 am: |
| 
|
हाय झकास,थं क्स... हो, घरीच निरीक्षण करते, पण इतरांच्या... माझ्या नाही काही
|
Shyamli
| |
| Friday, July 13, 2007 - 6:15 am: |
| 
|
मस्त ग चेतना लगे रहो
|
Itgirl
| |
| Friday, July 13, 2007 - 7:03 am: |
| 
|
चेतना, :D हा शेवटचा भाग तर मस्तच जमलाय!!
|
Bee
| |
| Friday, July 13, 2007 - 10:17 am: |
| 
|
मलाही अखेरचा पार्ट अधिक आवडला..
|
चेतना रंगतदार झालेय. अगदी हास्यरंग मधे वगैरे येते तसे वाटतेय. काही काही पंचेस अगदी छान. फक्त कल्पना थोडी गुळगुळीत (म्हणजे खूप वेळा वापरलेली) आहे. पण तरीही लिखाणाच्या शैलीमुळे मजा येतेय वाचायला. लिहीत रहा.
|
Chetnaa
| |
| Friday, July 13, 2007 - 5:04 pm: |
| 
|
बी,सन्घमित्रा,शामली,आयटी गर्ल.... थन्क्स.. सन्घमित्रा अग,४-५ वर्षांपूर्वी लिहिली होती... विनोदी पहिलिच कथा होती ही... इथे सर्वान्ना लिहिताना पाहुन टाकावेसे वाटले... इथला प्रतिसाद खरंच चांगला वाटतो मला... सर्वाचे परत आभार..
|
Athak
| |
| Saturday, July 14, 2007 - 6:06 am: |
| 
|
बापरे ... चेतना लिहीलय लई भारी ब्रम्हदेव तारी त्याला कोण मारी
|
Daad
| |
| Monday, July 16, 2007 - 6:56 am: |
| 
|
चेतना, छान जमलय. विनोदी लिहिणं कठीण असतं. आता हसा, असं सांगून लोक नक्कीच हसत नाहीत... पण तुम्हाला बेअरिंग चांगलं जमलय.
|
Chetnaa
| |
| Monday, July 16, 2007 - 9:55 am: |
| 
|
दाद,अथक थांन्कु दाद,तुमचे लिखाण खूप छान असते... तुमची दाद... म्हणजे माझ्या सारख्या नवीन लेखन करणार्यांना प्रोत्साहन.... thank you kaahi lihitaa yet naahi
|
Zelam
| |
| Monday, July 16, 2007 - 2:00 pm: |
| 
|
चेतना, खरंच छान आहे पहिलाच प्रयत्न (विनोदी कथेचा) असला तरीही. काही पंचेस मस्तच.
|
मागे एकदा असेच टी.व्ही.वर मल्लिकाला बघुन उस्फ़ुर्तपणे काही उद्गार माझ्या तोंडुन बाहेर पडले आणि मग पुढे महिनाभर तोंड शिवुन>>.. चेतना छान लिहिले आहेस...
|
|
|