Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पंजाबीड्रेस आणि आई ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » ललित » पंजाबीड्रेस आणि आई « Previous Next »

Psg
Thursday, June 28, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंजाबी ड्रेस आणि आई..

माझे आई-वडील नुकतेच ऑस्ट्रेलीयाला जाऊन आले. सुमारे दोन महिने आधी त्यांनी टूर बूक केली होती. तेव्हाच त्यांना माहितीपत्रक, काय करायचे, काय करायचे नाही, काय पहायचे ईत्यादी असलेली एक भलीमोठी यादी दिली होती. त्यात असे लिहिले होते की समस्त महिलावर्गाने पंजाबी ड्रेस किंवा जीन्स अथवा पँट, किंवा तत्सम कपडे घालणे आवश्यक आहे. थोडक्यात.. साडी नेसू नये!!

बापरे!! ही म्हणजे आमच्या आईची पंचाईत!! आईने आयुष्यात कधीही साडीशिवाय दुसरे काही परिधान केलेले नाही! आणि आता हे ३ आठवडे साडी नेसायचीच नाही!!

आमच्या आईला तर तसंही 'खुट्ट' झालं की टेन्शन येतं.. आता तर काय विचारायलाच नको.. "हे असे नियम कसे काय करू शकतात? मग काय भारतीय बायकांनी ऑस्ट्रेलियाला जायचंच नाही की काय? या वयात काय ड्रेस घालायचे का आम्ही? त्या ओढण्या सांभाळायच्या म्हणजे एक अजून त्रास.. आणि कोणी ओळखीचे भेटले तर काय म्हणतील?" वगैरे वगैरे वगैरे!

माझ्या बाबांची मस्त करमणूक होत होती हे सगळं ऐकून. ते जाणार होते तेव्हा तिथे थंडीचा मौसम असणार होता. त्यामुळे शक्यतो पाय लपेटले जातील असे कपडे घालणे आवश्यक होते. हे आईला बाबांनी सांगायचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायच्या मूड मधे नव्हती. शेवटी बाबांनी तिला विचारलेच.. "मग आता तू पंजाबी ड्रेस घालणार नाहीस म्हणून टूर रद्द करू का? का मी एकटाच जाऊ? सांगतो सगळ्यांना 'मंडळी' ड्रेस घालत नाहीत त्यामुळे टूरला आल्या नाहीत असं." हे इतकं ऐकल्यानंतर आई थोडी शांत झाली.

खरं तर पंजाबी ड्रेस 'आई लोकांनी' घालणं यात काहीच नवल, विशेष राहिलेले नाही. मध्यमवयीन बायका सर्रास हा वेष घालतात. एकट्या, किंवा मुलींबरोबर जाऊन व्यवस्थित निवड करून मनासारखे ड्रेस घालतात. छान दिसतात. 'या बाईला इतकी मोठी मुलगी आहे?' असा प्रश्न पडावा इतक्या तरूण दिसतात. सुटसुटीत, सांभाळायला सोपा असा हा ड्रेस. साडी सारखा घोळ नाही..

पण हे आमच्या आईला कधीही पटलं नाही. तिचं साड्यांवर अतिशय प्रेम. सर्व प्रकारच्या साड्या, अगदी साध्या कॉटनच्या साडीपासून पैठणी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या साड्या तिच्याकडे आहेत, आणि त्यात दरवर्षी हौसेनी भर पडतच असते. त्यातून कॉटन कलकत्ता सर्वात जास्त प्रिय! दर वेळी त्या साड्यांना स्टार्च, इस्त्री वगैरे अगदी प्रेमानी करते ती! त्यामुळे सुटसुटीत, सोपे मार्ग वगैरे माहित नाहीत, असले तरी मान्य नाहीत.

खरं तर तिने पंजाबी ड्रेस हा प्रकारच कधी वापरला नाही.. लहानपणी तशी फ़ॅशन नव्हती म्हणून नाही आणि पुढे सवय नाही म्हणून त्यामुळे लहानपणापासून कायम म्हणजे कायम- दिवसा, रात्री, सर्व छोट्यामोठ्या प्रवासात, ट्रीप्सना, सहलींना आईला आम्ही साडीतच पाहिलेलं. कधीही गंमत म्हणून, सहज म्हणूनही तिने ड्रेस घातला नाही.. आणि आता ती ३ आठवडे फ़क्त ड्रेसच घालणार म्हणल्यावर आमच्या मनात एकच विचार.. 'आई ड्रेसमधे कशी दिसेल?'

मग काय फ़र्मानं निघाली- मी, माझी बहीण आणि मावशी- तुमचे असतील, नसतील ते सर्व 'ढगळ, सैल, तोकडे नसलेले, लांबरुंद असलेले, चुडीदार नसलेले, सलवारी असलेले, गळे लहान असलेले, स्लीव्हलेस नसलेले आणि शक्यतो कॉटनचे' असे सर्व ड्रेस त्यांच्या ओढण्यांसकट आणून द्या!!! या अटींमधे खरं तर आमचे किती ड्रेस बसणार होते देवच जाणे. सध्या चुडीदारची फ़ॅशन असल्यामुळे माझे बहुतांश ड्रेस तसलेच. माझी बहीण 'खूपच जास्त व्यवस्थित' असल्यामुळे तिच्याकडे असलेल्या सलवारी आणि त्याच्या मॅचिंग ओढण्या यांचा मेळ असतोच असे नाही. मावशी जरा मॉड आहे आमची. तिचे ड्रेस थोडे भडक, थोडे फ़ॅशनेबल असतात्- ते तर आमच्या आईला चुकुनही पसंत पडायचे नाहीत.. असं करता करता आमचे तिघींचे मिळून १५ एक ड्रेस आम्ही आईच्या सुपूर्त केले.

मग ट्रायल! सगळे ड्रेस घालून पहा, नीट होत आहेत ना पहा असं आम्ही सांगितल्यामुळे आई रोज २-३ ड्रेस घालून पहायला लागली. ते करता करता चक्क 'सवय व्हावी म्हणून' त्यात वावरायलाही लागली. (एक दिवस आई स्वयंपाकघरात ड्रेस मधे वावरत असताना बाबांनी ओळखलंच नाही आईला. थेट स्वयंपाकघरात कोण बाई आली असा विचार करत बसले होते काही वेळ!!!!)

ड्रेसची सवय होईपर्यंत ऑस्ट्रेलीयाला गेलेही आई-बाबा. टूर ठरल्याप्रमाणे नीट पार पडत होती. अधून मधून फोन करत होते ते. आम्हाला एकच उत्सुकता- आईचं आणि ड्रेसचं जमतय की नाही?

आई-बाबा परत आले. आम्ही संध्याकाळी वार्ता घ्यायला हजर! पहिला प्रश्न- कसे आहात? दुसरा- आई, ड्रेस मधे छान वाटतं ना? आई खुश दिसत होती, त्या अर्थी तिचं आणि ड्रेसचं जमलं होतं! दुसर्‍या दिवशी फोटो आले. आई खरच छान दिसत होती ड्रेसमधे. आई मुळात बारिक आहेच. त्यामुळे तिला ड्रेस शोभून दिसत होते. असाही साक्षात्कार झाला की ड्रेस घातल्यामुळे आईच्या आणि माझ्यामधे असलेलं साम्य जास्तच लक्षात येतंय! त्यामुळे मला आई ड्रेसमधे जास्तच आवडली.

मग आमचं पुन्हा आईला चिडवणं सुरु झालं.. आई इतके दिवस घातलेसच की नाही ड्रेस? मग आता इथेही घाल की, होईल आपोआप सवय. बाबा पण हो म्हणाले. लगेच बाजारात जाऊन आईसाठी ५-६ ड्रेस घेऊन या असंही म्हणाले. पण आमच्या अपेक्षेप्रमाणे आई ठामपणे नाहीच म्हणाली. कधीतरी गंमत म्हणून घालणं वेगळं, आणि रोज घालणं वेगळं. त्यामुळे नकोच असं म्हणाली. आम्ही खट्टू झालो थोड्या.

नंतर रात्री सहज विचार करत होते की खरंच आई रोज ड्रेसमधे वावरायला लागली तर कशी दिसेल ना? थोडे दिवस सवय होईपर्यंत तरी आई ही 'आई' वाटणारच नाही! 'आई' म्हणजे कशी कॉटनची साडी नेसलेली, कंबरेला पदर खोचून कामं उरकणारी अशीच डोळ्यासमोर येते. माझ्याबरोबर बाजारात जाऊन स्वत:साठी ड्रेस आणणारी, नवीन फ़ॅशनबद्दल बोलणारी अशी आई स्वीकारायला जरा जडच जाईल.

रात्री मला स्वप्न पडलं.. मी, बहीण आणि आई कोणत्यातरी 'प्रचंड गहन, महत्त्वाच्या विषयावर' चर्चा करतोय, गप्पा मारतोय असं काहीतरी.. नीट आठवत नाही की काय बोलत होतो, पण एक मात्र नक्की.. स्वप्नात आईने साडीच नेसली होती! :-)





Supermom
Thursday, June 28, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, मस्त करमणूक झाली वाचून.

माझ्या आईला पण कायम साडीचीच सवय. कितीदा आग्रह केला, पण छे. पहिल्या वेळी माझ्याकडे अमेरिकेत आली तेव्हा मी नि भाग्या, आम्ही कित्ती हट्ट धरला. पण 'विचार करते' यापलीकडे प्रगती नाहीच.
या वेळी आली तर वर्षभरापूर्वीच बाबा गेलेले. त्यामुळे सहसा एखाद्या गोष्टीवर तिला आग्रह आम्ही करत नव्हतो.
पण या वेळी न्यू जर्सी च्या बर्फ़ात तिची मस्तच पंचाईत झाली. साडी कॉटन असो का झुळझुळीत, बर्फ़ासमोर काय पाड लागणार तिचा? मग आत स्लॅक्स घाल, वर लांब भलेमोठे मोजे चढव अशी सगळी तिच्या भाषेत म्हणजे 'सोंगं' करावी लागली. पायात घालायला म्हणून बूट घेऊन आली पण सवय नसल्याने ती इतकी फ़ेंगडी चालत होती की हसून माझी मुरकुंडी वळायची वेळ.

असो. शेवटी सारा सवयीचा भाग आहे ग. मी अगदी हौसेनं अमेरिकेतही सणवार करते, जरीच्या साड्या खूप खूप आवडतात म्हणून अगदी हौसेनं नेसते पण आपल्याला कोणी चोवीस तास साडी नेस म्हटलं तर कठीणच. नाही का?


Jaijuee
Thursday, June 28, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मैत्रिणीच्या आईची पण अशीच गम्मत आहे. त्या फ़ार शिस्तीत लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. त्यात स्त्रीराज्य गणल्या जाणार्‍या बँकेत ३५ वर्षे नोकरी, त्यांना ड्रेसची सवयच नव्हती मुळी! २६ जुलैच्या पावसानंतर त्यांनी धसका घेतला नी सोयीचा म्हणून ड्रेस वापरायला सुरुवात केली. मावशींना शोभतोही ड्रेस आणि लेकी-सूनेला कौतुकही आहे त्यांचे! त्यांची सांगली बँक आयसीआयसीआयमध्ये विलीन झाली. सगळा तरुण स्टाफ़ आता मावशींना चिडवतोय की आता तुम्ही पँट वापरा युनिफ़ॉर्म म्हणून! त्या एवढ्या बिचकल्या ह्या सगळ्यातून की त्यांनी पुन्हा साडीच सुरु केली!

माणसाच्या आयुष्यात काही गोष्टी तरी न बदलता कायम, स्थिर रहायला हव्यात ना? आई हा त्यातलाच कन्सेप्ट आहे. ती आपल्याला एकाच रुपात दिसवी असं आपल्याला वाटतच!

छान गमतीदार लेख आहे हं हा! मज्जा आली अश्या सगळ्या गोष्टी आठवून नी वाचून! :-)


Daad
Thursday, June 28, 2007 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, काय मस्तं लिहिलयस गं? मी सुद्धा बघितलंय माझ्या माम्या, मावश्यांना ट्रीपसाठी म्हणून पंजाबी घालून. आम्हाला छान वाटतं पण त्यांची तारांबळ होत्ये सुरुवातीला. एक मात्रं खरं की तुझ्या आईसारखंच परत आल्यावर मात्र, "घोळात"!
माझ्या सासूबाई इथे (ऑस्ट्रेलियाला) आल्या एका थंडीत. साडीत कसली आवरतेय थंडी? मग एक दिवस त्यांचं न ऐकता स्लोपी-जोज वगैरे घेऊन आलो. त्या तरी ग्रेटच. ते घालून वर साडी नेसतात. त्यांच्या नातवाला हात, नाक पुसायला handy पदर लागतो म्हणून.
मुळात खूप बारीक आहेत पण त्यामुळे ऑस्ट्रेलिया एकदम "मानवल्यासारख्या" दिसतात.
विषयांतर झालं गं.... पण तुझा लेख बेदम आवडला.


Disha013
Thursday, June 28, 2007 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लेख पुनम! मज्जा आली वाचुन!


Bee
Friday, June 29, 2007 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Poonam - wish you belated happy birth day.

मस्त लिहिले आहेस, नेहमीप्रमाणे तुझ्या खुमासदार शैलीत.

Princess
Friday, June 29, 2007 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, मज्जाच आहे ग. इकडे पण same pinch . अगदी अगदी माझीच आई आठवली. कितीही आग्रह केला तरी ती ड्रेस घालत नाहीच. आता तिला पण पुढल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला पाठवावे म्हणते

Zakasrao
Friday, June 29, 2007 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोजच्या आयुष्यातील प्रसंगावर लिहिण तुला छान जमत. क्लिक, नचिची शाळा बदलणे आणि आता हे. जमलय.
त्या केसरीच्या माय फ़ेअर लेडी मधे तर जिन्स डे वै ठेवतात अस वाचलय.त्याची आठवण आली.
पुनम तुझा कधी झाला बड्डे? मला तर आठवत की अलिकडे प्रिन्सेस चा बड्डे झाला. बी तुला तिला विश करायच आहे का? सॉरि विषयांतर झाले.


Manjud
Friday, June 29, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, सही धमाल लिहिले आहेस. माझ्या आईबद्दल असेच अगदी सेम टू सेम अनुभव आहेत. मी उंच असल्यामुळे तिला माझे ड्रेसेस होत नाहीत आणि बहीणीच्या ड्रेसचे गळे फारच बाई रूंद असे तिचे म्हणणे असते. ती ट्रिपला ड्रेस घेऊन गेली तरी घालतेच असे नाही उगाच बॅगेत ओझं वाढवून ठेवते इती बाबा. पण तिच्या दोन्ही नातींना मात्र तिने ड्रेस घातलेले अजिबात आवडत नाहीत.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators