Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
जीवघेणा आनंद

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » कथा कादंबरी » जीवघेणा आनंद « Previous Next »

Sarang23
Tuesday, June 26, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीवघेणा आनंद


रेणू बेडवर पडून पडून वैतागलीच होती. जुन्या आठवणींनी मन रमवाव म्हणून सागरची लग्नापुर्वी दिलेली गोडगुलाबी प्रेमपत्रे आणि कवितांची वही उशाशी घेऊन रेणू गुणगुणू लागली.

" अधरावर थरथरत्या
प्रितीची चाहुल ये
गालांवर रक्तिमशा
लज्जेचे पाउल ये
थरथरत्या हातांनी,
बावरल्या श्वासांनी
विरघळ ये मन्मिठीत
संजीवन दोघांना! "

सागरने लग्नाला मागणी घातल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या भावना सागरने याच कवितेत पकडल्या होत्या आणि लगेच रेणूच्या गोड गळ्यातून त्याला तशीच सुरेल चालही आली होती… कवितांची वही आणि जुनी प्रेमपत्रे, बेडरेस्ट सांगितल्या पासून कायम रेणूच्या उशाशीच असत.
रेणू गुणगुणत असतानाच निधी – रेणूची धाकटी बहीण – तिथे आली. काहीशी बावरलेली निधी उगीच रेणूच्या उशाशी बसून राहिली. बडबड्या निधीची शांतता रेणूला जाणवून गेली. न राहवून तिने निधीला समोर बसायला सांगितले. ज्या आठवणींत ती रमली होती त्या गमती जमती ती निधीला सांगू लागली. ते ऐकताना मनोमन सुखावणाऱ्या रेणूकडे पाहून निधी जास्तच खिन्न झाली. उसनं अवसान आणून निधीने बोलायला सुरूवात केली. रेणू हृदयविकाराने त्रस्त आहे ही पुरेपुर जाणीव असल्याने निधी शब्दांची जुळवाजुळव करून बोलायचे धाडस करू लागली. शक्य तितक्या हळूवारपणे, अर्धवट अडखळत, तिने सागर परत कधीच घरी येणार नसल्याची धक्कादायक बातमी रेणूला दिली. शब्दांच्या तलम बुरख्यातून घणाचे घाव बसतात तेंव्हा काय वेदना होतात ते त्यावेळी रेणूचा चेहरा सांगत होता.

खरं तर प्रल्हाद – सागरचा जीवलग मित्र – जेंव्हा सागरच्या ऑफिसच्या बस अपघाताची बातमी समजली तेंव्हा क्षणाचाही विलंब न करता अपघातस्थळी पोहोचला होता. पुर्ण चौकशी करूनच तो आता सागरच्या घरी आला होता. रेणूला आता त्याच्या आधाराची गरज असणार या स्वाभावीक भावनेने, दुःख बाजूला ठेवून तो तिथे थांबला होता. त्यानेच ही बातमी प्रथम निधीला दिली; आणि आता अर्धवट अडखळत, खाणाखुणांतून, कळेलही आणि कळणारही नाही अशा शब्दंचा वापर करून निधीने रेणूला.

ही बातमी समजताच रेणू अश्रुंच्या महापुरात हरवली. मोठ्या जड पावलांनी उठू्न ती पहिल्या मजल्यावरच्या सागरच्या स्टडी रुममध्ये गेली. दार लोटून घेऊन आरमखुर्चीत तिने त्राण हरपत चाललेले शरीर जवळजवळ फेकले. सागरच्या येण्याची तत्परतेने वाट पाहाणाऱ्या रेणूला त्याच्या निधनाचीच बातमी येईल हे स्वप्नातही वाटले नव्हते. तिच्या पायाखालची जमीन हळूहळू सरकत होती. खाली मात्र रेणूच्याच चिंतेने ग्रासलेले निधी आणि प्रल्हाद, सगळंकाही व्यवस्थित व्हावं, रेणूने या धक्क्यातून स्वतःला लवकरात लवकर सावरावं म्हणून मनोमन प्रार्थना करीत होते. त्यांना माहीत होतं की या धक्यातून सावरणं रेणूसाठी किती महत्त्वाचं आहे ते!

आता खोलीत रेणू एकटीच होती. कदाचीत बाहेरही ती एकटीच असती! सागरच्या आठवणींमध्ये गुंतून रेणू खिडकीतून समोरच्या गुलमोहराकडे एकटक पाहात होती. त्या घरात साठलेल्या अनेक आठवणींनी रेणूचं मन पोखरायला सुरुवात केली. सगळ्या आठवांचा एकच गलका रेणूला त्रस्त करून सोडत होता. लाल डोळ्यांच्या कडांतून संथपणे वाहणारी दुःखाची धार गालांवरून ओघळत पोटाशी घडी घातलेल्या हातांच्या आश्रयाला येत होती. रेणूचा श्वास मध्येच खोल खोल जात होता तर मध्येच धडधड वाढून धाप लागल्यागत पळत होता. रेणूला ती संध्याकाळाची गार हवा मलूल करणारी आणि भेसूर वाटू लागली. गुलमोहराला स्पर्श करून येणारा वाराही रेणूला नकोसा वाटू लागला. पिवळसर संधीप्रकाश अंगावर ल्यायलेला गुलमोहर काविळ झाल्याप्रमाणे पिवळाफेक भासू लागला. अशा वातावरणात सागर हमखास बासरी वाजवायचा! तिने अनावधानाने कान झाकून घेतले. तिला आत्ताही बासरीचे मंजूळ स्वर ऐकू येत होते. असा संधीप्रकाश पडल्यावर बासरी घेऊन हमखास गच्चीवर जाणाऱ्या सागरच्या आठवणीने ती पुन्हा एकदा हमसून हमसून रडू लागली.

थोडासा दुःखाचा पूर ओसरल्यावर सागरच्या आठवणीने रेणू पुन्हा एकदा विचारांच्या तंद्रीत पुर्णपणे हरवून गेली. रेणूच्या डोळ्यासमोर सागर तरळू लागला…
सागर… सहा फूट उंच, तरतरीत, गोरा गोरापान, काळेभोर डोळे, नाजूक कुरळे केस, अंगावर निळा शर्ट घातला की अगदी स्वप्नातला राजकुमार! व्यवहारचतूर, तल्लख बुद्धी, बोलण्यातही रुबाबदार, एकंदरीत एक भारदस्त व्यक्तिमत्व. जणू आपल्याला पडलेलं एक रुपेरी स्वप्नच!

पौर्णिमेच्या चंद्रासारखं आपलं शरीर कलेकलेने अमावस्येकडे ढकलत चाललेल्या व्याधीचा विचार मनात येऊन रेणूला अपार खिन्नता आली. या, या व्याधीमुळेच सागरने हातातल्या कित्येक संधी सोडून दिल्या होत्या. आपल्यापासून दूर जावे लागू नये म्हणून त्याने कुठेही बाहेर जाणे टाळले होते. कित्येक मोठमोठ्या कंपन्यांच्या गलेलठ्ठ ऑफर्स सरळ सरळ नाकारल्या होत्या.

आपल्याला स्वतःच्या प्राणांपेक्षाही जास्त जपणारा सागर; आपल्या आजारपणासाठी स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याचा बळी देणारा सागर; आपला एक एक शब्द झेलणारा सागर; ऐन थंडीतल्या दुलईप्रमाणे सतत मायेची ऊब देणारा सागर; पहाटेच्या पवित्र मंत्रांसारखा सागर; रात्रीच्या शितल चांदण्यांसारखा सागर; आयुष्याचा कण ना कण आणि क्षण ना क्षण व्यापून टाकणारा सागर, आज आपल्याला कायमचा सोडून गेलाय… तोच सागर… आता संध्याकाळी आल्या आल्या आपला हात हातात घेणार नाही; दोन्ही हातांनी आपला चेहरा ओंजळीत धरणार नाही; त्याच्या पवित्र प्रेमाचं चुंबन आपल्या ललाटावर अंकित करणार नाही… तो आता कधीच परत येणार नाही. संपुर्ण आयुष्याचा एक छोटेखानी चित्रपटच झरझर तिच्या डोळ्यांपुढून सरकून गेला! तोही कायमचा!!

हताश अंतःकरणाने रेणूने आपले दोन्ही हात खुर्चीच्या लाकडी हातांवर ठेवले. एव्हाना रेणूच्या श्वासांची लय बऱ्यापैकी गडबडली होती. रेणूला श्वास घ्यायला बराच त्रास होऊ लागला. खोल खोल श्वास घेण्यामुळे पाठ सरळ करावी लागून छाती जोरजोरात वर खाली होऊ लागली. शरीर आखडायला लागले. डोळे आणखीच लालभडक दिसू लागले. छातीतून तिव्र वेदना उठून एक थंडगार कळ क्षणाक्षणाला डोळ्यांवर येऊन साकळू लागली. श्वासांच्या विचित्र आवाजात तोंडातून निर्माण होणारा हुंकारही मिसळू लागला. घशातली घुर्घुर, हुंकार आणि श्वास यांच्या संमिश्र आवाजामुळे रेणूची बेचैनी अधिकाधिक वाढली आणि तिची अवस्था आणखीच नाजूक होऊ लागली.

" सागर… सागर…. "
सागरच्या भेटीस आतुरलेल्या रेणूच्या मुखावर नकळतच हाका आल्या.
रेणूच्या तोंडून पडलेल्या त्या अस्पष्ट हाकांमुळे निधी आणि प्रल्हाद धावतच वरचा खोलीकडे आले. की होल मधून रेणूची तडफड पाहाताच निधीच्या अंगावर काटा आला.
" ताई प्लिज दार उघड "
दारावर जोरजोरात थाप मारून निधी रेणूला भानावर आणण्याचा प्रयत्न करू लागली.
" रेणू, तू अशाने तुझा त्रास वाढवून घेते आहेस. किती त्रास करून घेशील स्वतःला… प्लिज, प्लिज दार उघड "
प्रल्हादही रेणूला समजावू लागला. त्या आवाजाने तिच्या शरीराची तडफड आणि थरथर काहीशी ओसरत जाऊन ती भानावर आली.

" मला काहीही होत नाहीये मला एकटे सोडा. प्लिज. "
दार उघडून रेणू बोलली. मृत्युशी झुंजल्यामुळे पांढराफटक पडलेला चेहरा ओंजळीत झाकून रेणू पुन्हा खुर्चीत बसली. काहीही न बोलता निधी पाणी आणायला निघून गेली. प्रल्हादही डॉक्टरांना फोन करण्यासाठी पुन्हा खाली आला. त्यांना ताबडतोब घरी यायला सांगून, कपाटातल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये त्यांच्याच सांगण्यावरून तातडीने ऍcओस्प्रिने डेप्लत्त

बाहेर कुणाची तरी चाहूल लागताच प्रल्हाद दार उघडण्यासाठी जाऊ लागला, पण तोपर्यंत लॅच की वापरून दरवाजा उघडला गेला. अपघातस्थळापासून खूप दूर असलेला सागर प्रवसाचा शीण घेऊनच आत आला. ब्रिफकेस आणि छत्री सोफ्यावर टाकून तो सरळ रेणूकडे जायला निघाला; पण निधीच्या रडण्याचा आणि प्रल्हादचा त्याला रेणूच्या नजरेआड करण्याचा प्रयत्न पाहून आश्चर्यचकीत होऊन निश्चल उभा राहिला.

मात्र प्रल्हादला खूप खूप उशीर झाला होता.

काळजावर हात ठेऊन रेणू निधीच्या खांद्यावर पडली होती. डॉक्टर आले तेंव्हा त्यांनी रेणू गतप्राण झाल्याचे सांगितले. हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने – जो अत्यानंदाने येतो…


सारंग


Manutai
Tuesday, June 26, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीवघेणी(!) कथा चांगली आहे. {Sं {EE}{LEE} kase Taakaayache? jeevagheNee n.ntar Taakaayache hote...}

Daad
Tuesday, June 26, 2007 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, जीवेघेणा आनंद चांगली उतरलीये. विशेषत: तिच्या मनाची तडफड, त्याचा तिच्या शरिरावर परिणाम, त्यातही- हृदयविकाराच्या झटक्याचं वर्णन. छान जमलंय.
लिहीत रहा, शुभेच्छा!


Marhatmoli
Tuesday, June 26, 2007 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर लिहलिय कथा सारंग. पुढच्या लिखाणासाठि शुभेछ्छा

Vaibhav_joshi
Wednesday, June 27, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा आवडली सारंग . लिहीत रहा . शुभेच्छा

Deemdu
Wednesday, June 27, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ करा पण मला जरा झेपली नाहीये ही कथा, म्हणजे बाकी details ठीक पण सागर गेला म्हणुन रेणू दुःखी झाली ना? मग तिला अत्यानंदाचा झटका कसा येईल?

Mi_anu
Wednesday, June 27, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगली आहे.
जरा रोमिओ ज्युलियटचा शेवट आठवला. ज्युलियट 'खोटी खोटी' मेली हे रोमियोला माहिती नसते त्यामुळे तो खरं खरं विष घेतो. आणी तितक्यात ज्युलियट उठते तोपर्यंत रोमियो खराखरा मेलेला असतो. मग हीपण खरीखरी मरते.
इथे रोल्स उलटे.


Sanghamitra
Wednesday, June 27, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग छान जमलीय. भाषा आणि वर्णन दमदार आहे.
डीम्डू म्हणतेय ते कन्फ्युजन मलाही झालं होतं.
पण तिनं त्याला येताना पहिलं असावं त्यामुळं असणार तो अत्यानंद.


Nandini2911
Wednesday, June 27, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग.. वा बरेच दिवसानी दिसतोयस.
एकदम छान वर्णन. कथा आवडली.


Manjud
Wednesday, June 27, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

concept चांगला आहे. पण confusion माझंही झालं ते या शेवटच्या वाक्यामुळे... हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने – जो अत्यानंदाने येतो…

झटका हा झटकाच असतो. ह्रदयविकाराच्या झटक्याचं असं निदान कसं होतं? की हा झटका अत्यानंदाने आला किंवा तीव्र दु:खामुळे आला. रेणू गेली ती बहुतेक तीव्र दु:खामुळेच असं मला वाटतं. अर्थात हे लेखकानेच ठरवायचं. आणि प्रल्हादला उशीर कशासाठी झाला होता? काही त्रुटी राहिल्या कथेत असे वाटते आहे.

माफ करा. हे माझं मत मी मांडलं आहे. भावना दुखावल्यास क्षमस्व.


Sarang23
Wednesday, June 27, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे मनापासून आभार...
सन्मी, you got it right.

मंजीरी, भावना दुखवण्याच्या प्रश्नच येत नाही. तुम्ही शंका विचारल्या, मी त्यावर माझी, म्हणजेच लेखकाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो.

...पण निधीच्या रडण्याचा आणि प्रल्हादचा त्याला रेणूच्या नजरेआड करण्याचा प्रयत्न पाहून आश्चर्यचकीत होऊन निश्चल उभा राहिला.

मात्र प्रल्हादला खूप खूप उशीर झाला होता.


माझ्या मते या ओळी हेच सांगतात की सागरला रेणूच्या नजरेआड करण्याचा प्रल्हादचा प्रयत्न निष्फ़ळ ठरला होता. आणि रेणूने त्याला पाहिलं होतं... मंजीरी, माझ्यामते हे explanation पुरेसं असावं की प्रल्हादने सागरलाच दरवाजा उघडून आत येताना पाहिलं... पण त्याला रेणूच्या नजरेआड करण्यात त्याला उशीर झाला होता...


By the way, heart attack is defined as a sudden severe instance of abnormal heart function. And this can be because of severe emotional distress, intense sorrow or extreme happiness. Now in above case the only possibility is of extreme happiness.



Manjud
Wednesday, June 27, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, Sorry, I wrongly interpreted the story

प्रतिक्रीया द्यायच्या आधि मी कथा पुन्हा वाचायला हवी होती. Thanks for explanation


Disha013
Wednesday, June 27, 2007 - 7:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त जमलिये कथा सारंग.
अत्यानंन्दानेही हार्ट attack येवु शकतो हे खरेच.


Rajankul
Thursday, June 28, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय को explanation एकबार बोला ना कथा एकदम बाद

Arc
Thursday, June 28, 2007 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिला heart problem असतानादेखिल ते लोक तिच्याशी खोटे का बोलतात?

Rajya
Thursday, June 28, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, :-)
मला कथा फार आवडली, पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!
सारंग काही negative प्रतिक्रियाही येतील, त्यामुळे बिल्कुल निराश होऊ नको.
त्या प्रतिक्रियांचा उपयोग लेखनात प्रगती करण्यासाठी होवो ही अपेक्षा. अगदिच शक्य असेल तर असल्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष कर.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators