Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गीत हे गाशील तेंव्हा.. ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » कथा कादंबरी » गीत हे गाशील तेंव्हा.. « Previous Next »

Cool
Wednesday, May 23, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याच त्या बातम्या वाचुन कंटाळल्याने वैभव बाहेर आला. सकाळी गॅलरीतुन समोरच्या बसस्टॉपचं निरिक्षण करणे हा त्याचा आवडता टाईमपास होता. आज रविवार असल्यामुळे तशी गर्दी कमी होती त्यामुळे तिथे असणार्‍या निवडक लोकांवरुन त्याची नजर फिरु लागली, आणि अचानक..

तीच !!!..
नाही नाही, शक्यच नाही !!
.. अरे हो तीच आहे. !
बस स्टॉप वर उभी असलेली ती मुलगी बघताच त्याच्या चेहर्‍यावरील भाव बदलले. तेवढ्यात आलेल्या बस मध्ये बसुन ती निघुन सुद्धा गेली, पण वैभवच्या विचारातुन काही केल्या ती जात नव्हती. ती आज अचानक इकडे कशी आणि ती सुद्धा बस मध्ये. त्याला काही कळतच नव्हते.

..................................................................


"ए दादा, आम्हाला तुझी मदत पाहीजे."

"काय गं, बोल ना? "

"अरे, आमच्या सरांनी एक नवीन उपक्रम सुरु केला आहे, त्यांचं सांगणं आहे की प्रत्येकाने बी. कॉम होण्याच्या आत सुट्टीत एखाद्या कंपनीत काम केलेच पाहीजे. तशा प्रकारे बरंच काही शिकता येत असं ते म्हणत होते. तर तू एका जणासाठी जरा तुझ्या कंपनीच्या अकाउंट ऑफिस मध्ये सांगुन बघ ना, फक्त तीन चार महिन्यांसाठीच गरज आहे. "

"काय राणी साहेब? आपण चक्क काम करणार ! मानलं पाहिजे बरं का, तुमच्या सरांना ."

"ए गप्पे, मला आजिबात इंटरेस्ट नाहीये, माझी एक मैत्रीण उस्तुक आहे असे काम करायला, तिच्यासाठी विचार "

"ठिक आहे. मी विचारुन बघतो, बाय द वे, नाव काय तुझ्या या कामसु मैत्रिणीअं"

"स्मिता ".


थोड्या दिवसानेच वैभवच्या ओळखीने स्मिता शिकण्यासाठी म्हणुन त्याच्या कंपनीत हजर झाली. याच वेळी वैभव आणि स्मिताची ओळख झाली. आई वडिलांची एकुलती एक मुलगी असलेली स्मिता नावाप्रमाणे हसतमुख होती. त्यामुळे तिला भेटणारा सुद्धा प्रसन्न होत असे. वैभव आपल्या साध्या सरळ वागण्याने कुणाशीही जवळीक करु शकत असे. मनातुन एकदम प्रसन्न आणि समाधानी असलेली व्यक्ती आपोआपच प्रसिद्ध होते, अगदी तसाच होता वैभव.

वैभव आणि स्मिता एकाच कंपनीत कामाला असल्यामुळे बर्‍याच वेळेला कामासंदर्भात त्यांची भेट घडत असे. थोड्याच दिवसात स्मिताने कामात चांगली गती प्राप्त केली होती. अकांउंट च्या साहेबांकडुन स्मिताची तारिफ ऐकुन वैभव सुखावला. त्या दोघांची हळुहळू ओळख वाढत चालली होती.

.....................................................................


दार उघडुन स्मिता आत आली, समोरच विनय झोपलेला होता. त्याला तसा झोपलेला बघुन तीला खुप बरं वाटलं, ती पुढे होउन त्याच्या बाजुला जाउन बसली, आणि त्याच्या चेहर्‍यावरुन हात फिरवला. या स्पर्शाने त्याची झोप चाळवली. त्याने डोळे किलकिले करुन बघितले तर समोर स्मिता बसलेली होती. तिला बघताच तो उठुन बसला.

"अरे उठलास का? झोपायचंस की, बर्‍याच दिवसांनी तुला असं झोपतांना बघितलं नाही मी."

"अगं झोप कसली, जरा विचार करता करता गुंगी आली एवढचं, बर ते जाउ दे तुझं काय झालं?", त्याने अधिरतेने विचारलं

"तेच नेहमीचं उत्तर, वी शल गेट बॅक टू यू लेटर ! आणि तुझं ?"

"अगदी हेच..."

विनयचे हे शब्द जणू हवेत विरुन गेले. त्यानंतर बराच वेळ कुणीही काहीही बोललं नाही. दोघेही शांत बसुन होते.

.............................................................

वैभवला आजकाल आपण स्मिता चा एवढा विचार का करतोय हेच कळत नव्हतं. त्याच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला होता
कदाचीत आपल्याला ती आवडायला तर नाही ना लागली?

हो असेच असेल.
पण हे बरोबर आहे?
अरे यात काय वाईट आहे, एखादी व्यक्ती एखाद्याला आवडणे अगदी साहजिक आहे.
पण तिचं काय? तिला सुद्धा माझ्या विषयी हेच वाटत असेल. अंदाज काढायला काय हरकत आहे. शिवाय तिच्या आवडी निवडी, तिच्या अपेक्षा यांची सुद्धा माहिती घ्यायलाच लागेल.

थोड्याच दिवसात स्मिताच्या आवडी निवडी तिच्याशी होणार्‍या गप्पामधुन वैभवला कळू लागल्या. आपल्या दोघांच्या आवडी निवडी एवढ्या जुळतात याबद्दल त्याला सुखद आश्चर्य वाटत होते. आपण तिच्यात अधिकाधिक गुंतत जातोय याची त्याला जाणिव झाली, एवढेच नव्हे तर आपण तिला कसे सुखी ठेउ शकतो याचेच विcआर त्याच्या मनात खेळायला सुरुवात झाली. आता पुढे काय? अजुनही आपल्याला तिच्यामनातील आपल्याविषयीच्या भावना ओळखता आल्या नाहीत. कसे कळणार की तिला काय वाटतेय.. ?

" शक्य नाही " वैभवने आपल्या बहिणीकडे स्मिताविषयीच्या आपल्या भावना बोलुन दाखविल्यानंतर तिची प्रतिक्रिया.

" पण काय झालं? काय शक्य नाही? मला ती आवडते, मला वाटतं की मी तिला सुखी ठेउ शकतो, आमच्या आवडी निवडी सुद्धा जुळतात मग, मग का शक्य नाही असे तुला वाटते? " , वैभव

" अरे तू म्हणतो ते सगळे पटते मला, पण तूला एक महत्त्वाची गोष्ट अजुनही कळलेली नाही, ती म्हणजे स्मिता विनय नावाच्या एका मुलाच्या प्रेमात आहे, आणि ती दोघे लवकरच लग्न करणार आहेत गेल्या काही दिवसांपासुनच मला हे तुला सांगयला पाहिजे होते......... "

... वैभव ला पुढचे शब्द ऐकु आले नाहीत, तो स्तब्ध पणे उभा होता, आयुष्यात पहिल्यांदाच त्याला एवढा मोठा धक्का बसत होता...

..................................................

विनय संध्याकाळी काही कामासाठी म्हणुन बाहेर पडला. काम आटोपल्यावर पुन्हा घरी जाण्यासाठी तो बस स्टॉप कडे निघाला. तेवढ्यात रस्त्यापलिकडे त्याला स्मिता दिसली. " अरे ही काय करतेय इकडे? " असा विचार करुन तो तिच्याकडे जाणार तेवढ्यात त्याला तिच्या मागे एक मुलगा उभा राहिलेला दिसला, तो स्मिताशी बोलण्याच्या पवित्र्यात उभा होता, पण अजुन तरी तो काही तिच्याशी बोलत नव्हता. त्यांच्याकडेच लक्ष ठेवुन विनय ने रस्ता ओलांडला. त्यामुलाने आपला हात तिच्या खांद्यावर ठेवण्यासाठी उचलला, आणि तेवढ्यात काहीतरी झाल्यासारखा तो मागे सरकला आणि झपाट्याने तो तिथुन निघुन गेला. आता मात्र विनय मागे सरकला, आपण तिथे असल्याची जाणिव स्मिता होउ नये याची त्याने खबरदारी घेतली. बस येताच स्मिता निघुन गेली, आणि दुसर्‍या बसने विनय घरी निघाला. वाटेत त्याच्या डोक्यात अनेक विचार येत होते.

विनय घरी पोहचला तेंव्हा स्मिता आवरुन बाहेर येत होती. तिला पाहताच तो भडकला

" कुठे गेली होतीस तू या वेळी? "

" अरे एका मैत्रीणीकडे गेले होते, तिच्या ऑफिस मध्य काही संधी मिळते का ते बघायला "

" मैत्रिणी कडे की मित्रा कडे? "
" काय बोलतोयस तू हे विनय ?"
" मला काही सांगू नकोस, मी माझ्या डोळ्याने बघितलय, बस स्टॉप वर तुला एका मित्रासोबत "
" कुठला मित्र, काय झालंय तुला विनय? "
" आज मला कळल, तुला नोकरी का करायची ते, तुला तुझ्या मित्रांना भेटता यावे म्हणुनच ना !"


स्मिता सुन्न झाली, तिला विनयच्या वागण्याविषयी काहीच अंदाज लागेना. तिला एवढे मात्र समजत होते की त्याची सध्या मानसिक स्थिती ठिक नसल्यामुळे हे असे होत असेल, आणि म्हणुनच तीने सर्व काही ऐकुन घेतले, एकही शब्द न बोलता.

.....................................................................


वैभवने काही दिवसातच स्वतःला सावरले, त्याच्या स्मितासोबत वागण्यात कुठलाही बदल झाला नाही. मात्र हळुहळू स्वतःच्या मनाला स्मितापासुन दुर नेण्याचे त्याने ठरवले.

पण काही दिवसातच त्याला स्मिताच्या जवळ जावेच लागले. प्रसंग कठीण होता. विनय आणि स्मिताच्या लग्नाला त्यांच्या घरुन परवानगी नाही असे त्याला कळले. पण दोघांचेही एकमेकांवर फार प्रेम होते, आणि कुठल्याही परिस्थीत लग्न करायचेच असा त्यांcआ निर्धार होता. या प्रसंगात स्मिताच्या बाजुने उभा राहिला वैभव. त्याने पटकन स्वतःच्या ओळखी वापरुन त्या दोघांचे रजिस्टर लग्न लावुन देण्याचे ठरवले, लग्नानंतर विनयने दुसर्‍या शहरात नोकरी करावी असेही त्याने स्मिताला सुचवले, त्या शहरात त्या दोघांची राहण्याची व्यवस्था सुद्धा वैभवनेच करुन दिली. असे सगळे असतांना स्वत मात्र तिच्या लग्नाला तो उपस्थीत नव्हता, उदास मनाने घरात बसुन होता. त्यामुळे शेवट्पर्यंत स्मिताच विनय याला त्याने पाहिलेच नव्हते. लग्नानंतर लगेच सर्व मित्र त्या दोघांना स्टेशन वर सोडण्यासाठी गेले असतांना दुरवरुन एका वैभवने स्मिताला बघितले आणि लगेच पाठ फिरवली. त्यानंतर त्याला स्मिता कधिही दिसली नाही.
.....................................................................
दिसली !!!
हो तीच !!
नाही नाही शक्यच नाही
अरे हो तीच आहे !

बस स्टॉप वर उभी असलेली ती मुलगी बघताच त्याच्या चेहर्‍यावरील भाव बदलले.
.....................................................................
आज जवळपास एका वर्षानंतर त्याला ती दिसली, बस स्टॉप वर स्मिता दिसताच त्याला आनंद झाला त्याच बरोबर आश्चर्य सुद्धा. ही इकडे कशी.

त्याने तिची माहीती काढली आणि त्याला प्रचंड मोठा धक्का बसला. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले आणि दिवस बदलले. अचानक विनयची नोकरी गेली. बरेच दिवस प्रयत्न करुनही त्याला दुसरी नोकरी न मिळाल्यामुळे पुन्हा ते या शहरात आले होते. आणि दोघांनीही नोकरी साठी प्रयत्न करावा असे ठरवुन ती नोकरी शोधत होती. आपल्या स्मिताला अशा अवस्थेत बघुन वैभवला फार वाईट वाटले. आपण तिला मदत करावी असे ठरवुन तो एक दिवस तीला बसस्टॉपवर भेटायला गेला. पण काय सांगावे या विचारात तो अडकला., आपण तिला फक्ता आधार द्यावा असा विचार करुन त्याने हात उचलला, पण ती स्वाभिमानी आहे, थेटपणे आधार स्विकारेल की नाही याचा विचार करुन त्याने झटकन हात मागे घेतला आणि तो काहीतरी निश्चय करुन तेथुन निघाला.
.....................................................................
त्या दिवशीच्या प्रसंगानंतर स्मिताच्या मनात वादळ उठले होते, अर्थात या बद्दल ती विनय ला आजिबात दोषी मानत नव्हती, कारण नोकरी गेल्या मुळे तो खचला आहे, आणि त्यामुळे त्याची वागणूक बदलते, पण आपणच त्याला आधार दिला पाहिजे याची तिला पुरेपुर जाणिव होती. जास्त दिवस बसुन राहणे शक्य नव्हते. म्हणुन ती आज पुन्हा घराबाहेर पडली. बसस्टॉप वर येताच तीला समोरुन वैभव येतांना दिसला, बर्‍याच दिवसांनी कोणितरी ओळखीचं भेटलं म्हणुन तिला बरं वाटल. गप्पा सुरु झाल्या पण स्वतः विषयी त्याला काहीही कळु नये याची ती खबरदारी घेत होती. गप्पामधे वैभव म्हणाला,

"अगं मी तुला त्या दिवशिच बघतिलं होतं या बसस्टॉप वर, मी बोलणार सुद्धा होतो पण नंतर म्हटलं नंतर निवांत गप्पा माराव्यात. "

वैभवचे हे शब्द ऐकताच स्मिताच्या चेहर्‍यावरील भाव बदलले. तीच्या डोळ्यात अंगार उतरला,

" तूच तो काय, मला अगोदरच कळायला हवं होतं, तूला मी हवी होते, तशी मिळाली नाही म्हणुन माझ्या संसारात विष कालवायला बघतोस माझ्या लग्नात माझी मदत केलीस मान्य पण का मी उपकराच्या ओझ्याखाली रहावे म्हणुनच ना अरे का माझ्या सुखी जीवनाची माती करतोस, काय मिळेल तुला हे करुन, केवळ असुरी आनंदच ना "

स्मिता बोलतच राहिली, तिच्या आवाजात प्रचंड घृणा होती आणि वैभव सुन्ना झाला होता. त्याला काहीच कळत नव्हते. ज्या आपल्या प्रेमाखातर त्याने एवढे केले होतेई तीच स्मिता आज त्याच्या वर नाही नाही ते आरोप करत होती. वैभवचा विश्वासच बसत नव्हता. स्मिता तिथुन निघुन गेली तरी तो बसुन होता, शुन्यात बघत....

स्मिता घरी पोहचली, विनयला बघताच मात्र तिच्या भावनांचा बांध फुटला, तिने त्याच्या कुशीत जाउन अश्रुंना वाट करुन दिली. तिला काहीच कळत नव्हते, आपण काय बोललो चुक की बरोबर की ती फक्त एक प्रतिक्रिया होती. काहीच कळत नव्हते..

.....................................................................

स्मिताला थोड्याच दिवसात एका ठिकाणी नोकरी लागली, आणि तिने कामात स्वतःला गुंतवुन घेतले. सरांनी त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्नस फाईल करायला सांगितले म्हणुन ती त्यांच्या कपाटातुन कागदपत्रे काढत होती. तेवढ्यात एका फाईल मधुन काहितरी खाली पडले, तिने ते उचलले आणि सहजच तिची त्यावरुन नजर फिरली. तिला काहीसे ओळखीचे वाटले, तर ते तिचेच नोकरिसाठीचे ऍप्लिकेशन होते आणि त्या सोबत काहीतरी जोडलेले होते. काय असावे या उस्तुकतेने तिने ते पान उघडले आणि त्यावरील शब्द वाचताच तिचे आपल्या डोल्यावर विश्वास बसेना. तिच्या सरांना एक शिफारस पत्र लिहिण्यात आले होते, त्यात स्मितात ही त्या पदासाठी एक योग्य उमेदवार असुन तिची च निवड करावी असा आग्रह होता, आणि लिहिणार्‍याचे नाव होते वैभव.....

पत्र वाचताच स्मिता स्तब्ध झाली, तिच्या डोळ्यातुन पश्च्यातापाचे अश्रु येण्यास सुरुवात झाली.
"मला माफ कर रे वैभव मी तुझे निखळ प्रेम समजुच शकले नाही, जेंव्हा जेंव्हा मला गरज होती तेंव्हा तू माझ्या साठी उभा होतास हे मी विसरले, त्या बदल्यात मात्र तुला काहीही नको होते हे मला कळायला हवे होते.. माझा फार मोठा अपराध झाला, जमल्यास मला माफ करशील.. "

मात्र आता फार उशीर झाला होता.

"गीत हे गाशील तेव्हा, मी जगी असणार नाही
प्रीत ही स्मरशील तेव्हा, मी तुला दिसणार नाही

कालचे ना आज पाणी, अर्थ हे उरणार नाहीत
पाहूनी चंद्राकडे मी आसवे पुसणार नाही

चांदणे बिलगेल अंगा, कोवळे रेशीम होऊन
त्या क्षणी पाऊल माझे, हे पुन्हा फसणार नाही"

समाप्त
... सुभाष डिके (कुल)



Rajya
Thursday, May 24, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कूल,
कथा ठिक वाटली एवढंच म्हणु शकतो.

काही काही प्रसंग संदर्भहीन वाटतात. जसे, विनयचे स्मितावर जर एवढे प्रेम असेल तर एका क्षुल्लक कारणासाठी तो स्मिता बरोबर भांडणार नाही, भांडणारच असेल तर विनयच्या संशयी स्वभावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही, तसेच विनय हे पात्र या कथेत फक्त एकदाच आलेले आहे त्यामुळे त्याचा स्वभाव कळत नाही.

दुसरा प्रसंग स्मिता व वैभव यांच्या भेटीचा (स्मिताच्या लग्नानंतरचा). स्मिता जर एवढी समंजस मुलगी असेल तर कुठलाही विचार न करता आपल्या उपकारकर्त्यावर ईतक्या टोकाचा आरोप नाही करणार.

कथेच्या शेवटी असलेली गझल (कविता) वाचुन असे वाटते की वैभवने आत्महत्या केली असावी, पण कदाचीत तसे नसावे,

एकंदरीत ही कथा म्हणजे एक फसलेला प्रयत्न वाटतो, जाणकारांनी प्रकाश पाडावा.

कूल,


Maasture
Thursday, May 24, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर आहे राजासाहेब. अगदीच फसलाय प्रयत्न. अगदी ठिसूळ पाया आणि प्रसंग.

पण कूल तुमचा हा पहिलाच प्रयत्न दिसतोय, म्हणून नाउमेद होऊ नका, यातून शिकून पुढे चांगले लिहिण्यासाठी शुभेच्छा.


Swasti
Saturday, May 26, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिकेसाहेब ,
प्रामाणिक मत , राग नसावा. .

तुम्ही कधीपासुन k serials चे episods लिहु लागलात ?


Mavla
Monday, May 28, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुल भाउ, कथेत डाळ कमी आणि पाणि जादा झालय बहुतेक

Giriraj
Monday, May 28, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे असले काही लिहिण्यापेक्षा तुला परिचित असलेल्या पार्श्वभूमीवर लिही कथा.. कथा लिहितांना तुझी प्रसंग फ़िरवत नेण्याची पद्धत चांगली आहे.. त्यातून उत्कंठा वाढीस लागतेय पण या कथेत तशी काही जानच नाही त्यामुळे शैली चांगली असूनही परिणाम साधत नहिये..

फ़ुकटचे सल्ले समाप्त! :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators