Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
वादळवारं

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » ललित » वादळवारं « Previous Next »

Supermom
Tuesday, May 22, 2007 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत आल्यापासून एक गोष्ट माझ्या लक्षात प्रकर्षाने आली ती म्हणजे इथे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण खूपच मोठे आहे. आपल्या भारतात ते नाही असे नाही पण नागपूर, मुंबई, पुणे इथे रहात असताना मी कधी चक्रीवादळ, भूकंप वगैरे झाल्याचे ऐकले नाही. म्हणजे निदान काही भाग तरी सुरक्षित आहेत.

सर्वात आधी जेव्हा सॅन फ़्रॅन्सिस्को ला रहात होतो तेव्हा एके दिवशी सकाळी उठल्यावर शेजारच्या मैत्रिणीने सुहास्य वदनाने विचारले,
'काय, काल काही जाणवलं का?'

'म्हणजे काय?...' माझ्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह.
'अग, काल थोडासा भूकंपाचा धक्का बसला ना.. खिडक्या, दार किंचित हलल्याचे जाणवले नाही का?'

आम्ही उभयता मस्त पावभाजी चापून गाढ झोपलो होतो. तेव्हा आमच्या संसाराच्या इंजिनाला दोन डबे जोडल्या गेलेले नसल्यामुळे आत्तासारखी सावध झोप तेव्हा नव्हती. त्यामुळे छप्पर उडाले असते तरी समजले नसतेच. त्यामुले आपल्याला कळले कसे नाही हा प्रश्न डोक्यात आला नाही.

मग नंतर शुक्रवार रात्री नियमित होणार्‍या देसी लोकांच्या गेट टुगेदर मधे 'इथे कॅलिफ़ोर्नियात अधून मधून असे धक्के बसतच असतात. या प्रदेशाला भूकंपाचा धोका आहे.' हे दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्यामुले तिथला प्रोजेक्ट संपून जेव्हा नॉर्थ कॅरोलिना मधे जायचे ठरले तेव्हा अगदी सुटल्यासारखे वाटले होते. पण तिथेही हरीकेन्स नामक वादळे येतात हे कळले.

बोनी की काहीतरी नावाचे वादळ हजेरी लावून गेले तेव्हा आम्ही नेमके भारतात सुट्टीसाठी गेले होतो.परत आल्यावर मित्रमैत्रिणींनी सुरस आणि चमत्कारिक कहाण्या वर्णिल्याच. पण तेव्हाही हुश्श!.... झाले होते.

त्यानंतर शिकागो, न्यूयॉर्क येथील बर्फ़वादळांना सुद्धा यशस्वीरीत्या तोंड देऊन झाले. आता इथले आयुष्य अंगवळणी पडल्याने तशी हवामानाचीही सवय झाली होती.

पण २००२ साली टेक्सास मधे प्रोजेक्ट सुरू झाला आणि आठ महिन्याचे दोन चिमुकले जीव घेऊन शिकागोहून तिकडे जायचे ठरले.
तोवर तिथल्या टोर्नॅडो उर्फ़ चक्रीवादळ या प्रकाराची थोडीसुद्धा माहिती नव्हती. मे महिन्यात आम्ही तिथे पोचलो तेव्हा तिथल्या भाषेत टोर्नॅडो सीझन सुरूच होता.

मी, नवरा आणि कार सीट्स मधे ठेवलेली छोटीशी दोन मुटकुळी विमानतळावर उतरली तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. हॉटेल चांगले दीड तासावर होते.

बघताक्षणीच भीतीदायक हुरहूर मनात उत्पन्न करणारे राक्षसी ढग अन त्यावर आसूड ओढल्यासारख्या विजा चमकायला नुकतीच सुरुवात झाली होती.

नवरा रेंटल कार आणायला गेला होता. काचेच्या भल्या थोरल्या खिडकीतून मी बाहेर बघत होते. नवरा परत आला अन माझ्या डोळ्यातली भीती त्याला दिसली.
लहानपणापासून मी मुसळधार पाऊस अन विजांना फ़ार घाबरते.

'घाबरू नकोस. माझा नेहेमीचाच रस्ता आहे हा...' माझ्या पाठीवर थोपटत त्याने आश्वासक सुरात सांगितले. तो दोन महिने आधी त्या प्रोजेक्टवर काम करून आला होता.


Supermom
Wednesday, May 23, 2007 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामान गाडीत भरून आम्ही निघालो. रस्ता जवळपास निर्मनुष्य होता. एखादीच गाडी जाताना दिसत होती. विजांच्या चमकण्याला आता ढगांच्या गडगडाटाची जोड मिळाली होती.

गाडीने वेग घेतला अन नेहमीप्रमाणे मागच्या सीटवर दोन्ही बाळं अगदी गाढ झोपी गेली. थोडं अंतर पुढे गेलो असू, अन पावसाचे मोठाले थेंब तडतडू लागले.बघता बघता जोर वाढला, अन पाऊस मुसळधार बरसू लागला. प्रचंड मेघगर्जना ऐकू येत होती. निसर्गाचं इतकं रौद्र रूप आम्ही दोघांनीही कधीच पाहिलं नव्हतं.

'थांबायचं का हो कुठे?' माझा प्रश्न.

'कुठे थांबणार इतक्या पावसात? हॉटेल तरी कसं शोधणार? एव्हाना आपण अर्ध्या तासाचा रस्ता पार केलाच आहे. आपलं रिझर्वेशन आहे त्या हॉटेलमधे पोचू लवकरच. काळजी कशाला करतेस?'

नवर्‍याने मला धीर दिला. तसंही तो माझ्या विजांच्या फ़ोबियाची नेहेमीच चेष्टा करत असे.

पण पाऊस थांबायचे काही नाव नव्हते. आता तर पुढचे काहीच दिसेना. विजांचा लखलखाट क्षणभर प्रकाशून लुप्त होत होता. रस्ता मुळीच दिसेना तेव्हा मी तर खूपच घाबरून गेले.सुदैवाने देवाने माझ्या नवर्‍याला डोक्यात बर्फ़ाचा थंडपणा देऊन पाठविले आहे. त्यामुळे तो शांतपणे हळूहळू ड्रायव्हिंग करत होता. मधूनच मला धीर देत होता. अन या सार्‍या नाट्यात दोन्ही चिमुकले मात्र अगदी गाढ झोपले होते. विजा, ढग, पाऊस यापैकी कशाच्याही आवाजाने त्यांची झोप मोडली नाही.

अक्षरश जीव मुठीत धरून कसेबसे हॉटेलमधे पोचलो. मुलांचे दूध व खाणे याची पिशवी फ़क्त आत नेली. पाऊस इतका कोसळत होता की बाकी सामान बाहेरसुद्धा न काढता आम्ही मुलांना उचलून आत पळालो. रात्रभर पावसाचे तांडव सुरूच होते. असा पाऊस आम्ही दोघांनीही ना अमेरिकेत, ना भारतात, कुठेच पाहिला नव्हता.

सकाळ मात्र एकदम प्रसन्न उजाडली. जणू रात्री काही घडलंच नव्हतं. खिडकी उघडून बाहेर बघताना खूपच छान वाटत होतं. मुलंही खिदळत होती.

पण टेक्सास च्या टोर्नॅडोचं भयावह रूप पुढे दिसणार आहे याची सुतराम कल्पना तेव्हा आम्हाला नव्हती.


Supermom
Wednesday, May 23, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टेक्सास ला येऊन एक महिना झाला असेल. त्या दिवशी शनिवार होता. सकाळपासूनच पावसाचा रंग होता. पण तिथल्या धुवाधार पावसाचे आता काही वाटेनासे झाले होते.
दिवसभर पाऊस पडणार असल्याने कुठेच न जाता घरीच बसून मस्त सिनेमे बघायचा बेत होता. मी आणि नवरा टी व्ही समोर बसलो होतो. मुलगी खेळत होती तर मुलगा खोलीभर रांगत होता. त्यांची गंमत पाहताना खूप बरे वाटत होते.
अचानक रांगता रांगता मुलाने जमिनीवर पडलेल्या रिमोटवर हात मारला आणि व्ही सी आर बदलून टी. व्ही. चॅनेल्स सुरू झाले. (हा देखिल एक विचित्र योगायोगच म्हटला पाहिजे.) मी ते बदलायला म्हणून रिमोट उचलायला उठले आणि आमचे दोघांचेही लक्ष एकाच वेळी स्क्रीनवरून सरकणार्‍या लाल अक्षरांकडे गेले.
'tornado warning. take cover immediately.'

आम्ही दोघे एकमेकांकडे बघून काही बोलणार तोच फ़ोन वाजला. खालची रिसेप्शनिस्ट ताबडतोब लॉबीत यायला सांगत होती.कसेबसे मुलांना उचलून खाली पळालो. तेवढ्या घाईतही नवर्‍याने पाकीट खिशात सरकवलेच. ही त्याची आणखी एक सवय. एकदा तर फ़ायर अलार्म वाजतोय, खाली आगीचा बंब दिसतोय आणि हा आपला आधी पाकीट घ्यायच्या फ़िकिरीत. कारण त्याचे म्हणणे असे की सगळी कार्डे बरोबर असली की चिन्ता नसते.ते ही खरेच आहे म्हणा...

धडाधड जिना उचलून खाली आलो तर रिसेप्शनिस्ट फ़ोनवर कोणाशीतरी- बहुधा तिच्या मॅनेजरशी बोलतेय, 'आय हॅव टू बेबीज हिअर. आय डोन्ट नो व्हाॅट टू डू...'

परिस्थिती गंभीर आहे हे आमच्या लगेच लक्षात आले कारण सगळी माणसे तिथेच जमली होती. त्यात लहान मुले फ़क्त आमचीच.

श्वास रोखून आम्ही लॉबीतल्या टी. व्ही. च्या स्क्रीनकडे बघू लागलो. तेवढ्यात tornado कुठून कुठून रोरावत जाऊ शकेल अशा भागाचे प्रसारण सुरू होतो. सारखे सांगत होते. 'go to the basement if possible..." हॉटेलला कुठून तळघर असणार?
टी. व्हीवर आता काय सुरू होते ते कुणालाच काही कळत नव्हते. तेवढ्यात फ़क्त रिसेप्शनिस्ट चा आवाज आला, 'ओ माय गॉड, दॅट्स अस....'

एक म्हातारी अमेरिकन बाई पुढे झाली आणि तिने 'मुलीला मी सांभाळते. दे माझ्याजवळ..' असे नवर्‍याला सांगून मुलीला तिच्याजवळ घेतले.मुलगा माझ्या जवळ होता. सर्वांनी मिळून आम्हा दोघींना बाथरूममधे नेऊन बसवले. एरवी कोणाही जवळ जाताच भोकाड पसरणारी माझी लेक अगदी त्या बाईला घट्ट चिकटून बसली होती. धोक्याची जाणीव, आईबाबा घाबरलेले हे सारे लहान मुलांनाही कळत होते की काय कोण जाणे.

बाहेर आता भर दिवसा अंधार झाकोळला होता. आधी पक्ष्यांचे ओरडणे एकदम गपकन थांबले. मग आला तो पाऊस. भयाण कोसळणारा.वारा इतका भणाणत होता की त्याच्या आवाजाने पण धस्स होत होते. एकूणच अतिशय विचित्र अन अंगावर काटा आणणारा प्रकार होता तो. सगळे लोक चिडीचुप्प बसले होते. अगदी श्वास रोखून बसल्यासारखे. देवाचा धावा करीत...

असा थोडाच वेळ गेला असेल, आम्हाला मात्र तो अगदी प्रचंड मोठा भासला. अन एका क्षणात पाऊस थांबला. आकाश स्वच्छ झाले. बाहेरचे वातावरण पुन्हा व्यवस्थित झाले. काय घडतेय ते न कळल्याने सारे हळूहळू खिडकीजवळ जाऊन बघू लागले.

मग कळले की tornado अगदी जवळ आला होता. पण इतरांच्या, जाणकार लोकांच्या सांगण्याप्रमाणे 'it didn't touch down...' किंवा तो जवळून निघून गेला.

सगळेजण पुन्हा हसू खेळू लागले.मनावरचे ओझे उतरल्यावर आता हास्यविनोद सुरू झाले.

पण हा विलक्षण अनुभव आमच्या मनात घर करून राहिला आहे.
अजूनही कधी tornado warning आली की टेक्सासची ती भयंकर दुपार आठवते.


Sneha1
Wednesday, May 23, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिले आहे. वाचताना अंगावर काटा आला. आणि मी मुम्बईला असताना अनुभवलेल्या पुराची आठ्वन आली.

Disha013
Wednesday, May 23, 2007 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीलयं. मागे कॅटरिना आली तेव्हा आम्ही टेक्सास्मधेच होतो. आम्ही सर्व मैत्रीणींनी जय्यत तयारी केलेली. वीज नसेल म्हणुन २दिवसाचे जेवण,मेण्बत्त्या,गरम कपडे वगैरे. पण आमच्या गावातुन गेलीच नाही कॅटरिना,पण तुफ़ान वादळी पाउस झालेला.

Vadini
Wednesday, May 23, 2007 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे सुपरमॉम,काय अनुभव आहे. भारतात असे काही अनुभवास येत नाही हे खरे.येथे जर्मनीत आम्ही वादळाचा थोडासा अनुभव घेतला, पण तुम्ही सांगताय ते काही औरच आहे .

Bhagya
Wednesday, May 23, 2007 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत नैसर्गिक आपत्त्या जास्त आहेत हे खरे. हे वाचून मला FloriDa चे category 5 चे cyclone आठवले. तसेच दोन चिमुकल्यांना दोन्ही काखात मारून, seattle च्या भूकंपात घर हादरत असताना जिना उतरून काढलेला पळ आठवला.

Sayonara
Thursday, May 24, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sm , तुझ्या नशिबाने तुला आता NJ मध्ये असं काही अनुभवायला मिळणार नाही. :-)

Dineshvs
Thursday, May 24, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विलक्षण अनुभव सुपरमॉम. आपल्याकडे चक्रीवादळे केवळ पुर्वकिनार्‍यावरच येतात.
तसेच मुंबईचे भौगोलिक स्थान असे आहे कि, सहसा तिथे चक्रीवादळ येऊ शकत नाही.
पण आपल्याकडे वावटळी येतात. पंधरा दिवसापुर्वीच आजर्‍याला बघितली मी. बराचवेळ बसला समांतर जात होती ती वावटळ.
कोयनेच्या भुकंपावेळी मी अगदीच लहान होतो. त्यावेळचे काहिच आठवत नाही.


Supermom
Thursday, May 24, 2007 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

हा अनुभव खरेच भयंकर होता. विशेषतः दोन बाळांना घट्ट छातीशी धरून प्रार्थना करण्याखेरीज आपल्या हातात काही नाही ही जाणीवच भीतीदायक होती.
निसर्गापुढे आपली हुशारी, विज्ञान, मनुष्यबळ सारेच किती तोकडे आणि असहाय असते याची प्रचिती अशा वेळी आल्याशिवाय रहात नाही.


Mukund
Saturday, May 26, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम... खरच छानच लिहिले आहेस... अगदी तिथे तुमच्या बरोबर गाडीत व हॉटेल मधे असल्या सारखे वाटले व वाचताना छातीची धडधड वाढली!

मीही कॅन्सास ला बरीच वर्षे राहात आहे त्यामुळे असल्या प्रकाराचा(टोरनॅडो) मलाही खुपदा अनुभव आला आहे आणी वर सुपरमॉम म्हणते त्याप्रमाणे तशा वेळचा इथल्यासारखा ढगांचा गडगडाट मी कुट्ठेच ऐकला नाही... विजांचे तांडवनृत्य म्हणतात ना.. तोच शब्द योग्य आहे तशा विजांना... पण सुदैवाने प्रत्यक्ष एकाही टोरनॅडो मधे अजुन पर्यंत तरी अडकलो नाही. टेक्सास, ओक्लोहोमा,कॅन्सास,आयोवा,नेब्रास्का या राज्यांच्या पट्ट्याला टोरनॅडो ऍली असेच म्हणतात त्याचे कारण असे की हा सबंध प्रदेश अतिशय सपाट आहे. दक्षिणेकडुन गल्फ़ ऑफ़ मेक्सीको वरुन येणारे गरम वारे जेव्हा उत्तरेकडुन कॅनडावरुन येणार्‍या थंड वार्‍यांशी जेव्हा कोलाइड होतात(मार्च ते जुलै मधे हे जास्त होते) तेव्हा असे प्रचंड टोरनॅडो तयार होतात.म्हणुन या प्रदेशातल्या सगळ्या घरांना तळघर सक्तीचे असते. तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी
Twister हा मुव्ही पाहीला असेलच. थोडी अतिशयोक्ती आहे नट काय काय करतात व कसे वाचतात तशा टोरनॅडो मधे.... पण मुव्ही खरच चांगला चित्रीत केला आहे. सुपरमॉम काय म्हणते आहे याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर तो मुव्ही जरुर बघा.

आणी हो.. सुपरमॉम.. अगदी बरोबर म्हणालीस बघ.. अशा वेळी निसर्गापुढे.....

मला हा अनुभव अगदी जवळचा वाटला आणी ३ आठवड्यांपुर्वीच मी राहतो त्याच्या २०० मैल नैर्युत्तेला ग्रीन्सबर्ग नावाचे अक्खे गावच्या गाव अशा टोरनॅडो मधे उध्वस्त झाले. तो टॉरनॅडो
F5 कॅटॅगरीचा होता.. फ़ुजीता स्केलमधली सगळ्यात मोठी कॅटॅगरी.. त्याचा व्यास जवळ जवळ दोन मैल होता.. त्याचे फोटो गुगलवर बघा.. विश्वास बसणार नाही.. मग तुम्हाला कळेल वरच्या लेखातील सुपरमॉमची भिती...

Psg
Saturday, May 26, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, खरच जबरदस्त लिहिलं आहेस. तुझ्याकडे 'आम आदमी'ला सहसा न येणार्‍या अनुभवांची शिदोरीच आहे! :-)
बापरे! असले अनुभव कोणाला येऊ नयेत पण. new jersey खूपच सेफ़ आहे ना त्यामानाने?


Gobu
Saturday, May 26, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमम्मी,
अगदी छान लिहीलेस ह!

आम्ही उभयता मस्त पावभाजी चापून गाढ झोपलो होतो. तेव्हा आमच्या संसाराच्या इंजिनाला दोन डबे जोडल्या गेलेले नसल्यामुळे आत्तासारखी सावध झोप तेव्हा नव्हती. त्यामुळे छप्पर उडाले असते तरी समजले नसतेच.


Sneha21
Monday, May 28, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच वर्णन.......मला तर ट्विस्टर मूवि आठ्वला.....

Jagu
Monday, May 28, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमाॅम खुप छान वर्णन केल आहे. तुमच्या दोन मुलांनीही लहानपणीच हा भयानक अनुभव घेतला.

Daad
Monday, May 28, 2007 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, छान लिहिलयस. असला अनुभव नाही कधीच. Twister बघितला होता तेच काय ते.

Monakshi
Monday, May 28, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ख़रंच सुमॉ,

मलाही twister मूव्ही ची आठवण झाली. तुमचा अनुभव ख़रंच ख़ूप थरारक आहे. इथे मुंबईत tornedo नाही पण २६ जुलैच्या पावसाचा चांगलाच अनुभव घेतलाय. त्यावेळी मी जेव्ह्ढी चालले असेन तेव्ह्ढी आतापर्यंत कधीच चालले नसेन.

ख़रंच नैसर्गिक आपत्ती म्हणजे माणसाची सत्वपरिक्षाच असते.


Ashwini
Monday, May 28, 2007 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom, तुझी वर्णनशैली खूप सुंदर आहे. खरच twister ची आठवण आली.

Chyayla
Monday, May 28, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे या BB वर ईतके वादळ येउन गेले तरी पत्ताच नाही... SuperMom खरच छान वादळ लिहिलेस आवडल आपल्याला.. आमच्या एरिझोना मधे असल काही होत नाही हो. पण तुझ्यामुळे टेक्सासच्या Tornado मधुन फ़िरुन आल्या सारख वाटल.

Ajjuka
Tuesday, May 29, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भयंकरच गं..
मला आठवलं मी अथेन्स, जॉर्जिया अमधे रहात असतानाचं... student असताना apts तर साधीच परवडणार त्यामुळे अर्थातच काही सुटकेचा मार्ग नाही हे होतेच. आमच्याकडे टिव्ही नव्हता त्यामुळे स्कूलमधे जे काय कळेल तेवढेच. पहिल्यांदा warning मिळाली तेव्हा काय करायचं तेच कळेना. आलं twister तर सुटकेचा काही मार्ग नाहीये हे लक्षात आल्यावर धडकीच भरली. मग सुटका नाही तर नाही निदान जिथे कुठे जाऊन पडू तिथे आपली ओळख आपल्याकडे असावी... निदान बेवारस मृतदेह म्हणून तरी गणना होऊ नये. १०००० मैलाच्या पलिकडे असलेल्या घरच्यांना कळावं तरी.. असा विचार केला. मग आम्ही प्रवासात पासपोर्ट चं पाऊच असतं ना तसं पाऊच तयारच ठेवलं. पासपोर्ट, स्कूलचे पेपर्स, घरच्यांचे फोटो, कार्डस.. सगळंच. कायम सॅकमधे असायचं ते. warning च्या काळात तर रात्री झोपताना गळ्यात अडकवून झोपायचो. न जाणो रातोरात झोपेत असताना आलं वादळ आणि पाऊच घ्यायलाही वेळ मिळाला नाही तर...
आता हसू येतं त्याचं पण तेव्हा खरोखरीच आम्हाला तेवढा एकच उपाय सापडला होता. आणि हो माझ्या अर्ध्याहून अधिक महत्वाच्या गोष्टी आमच्या costume shop च्या माझ्या drawer मधे कुलूपबंद असायच्या.. सगळी पत्र विशेषतः.. कारण shop basement ला होतं...
एकदा अशीच warning होती. पाऊस भरपूर होता. आम्ही दोघीही आपापल्या departments मधे होतो. सगळं आभाळ काळं जांभळं होत. माझ्या रूममेटचा फोन आला मला. पाऊच आहे ना? ते घे आणि shop मधून बाहेर पडून लगेच बस पकड. शेवटची बस आहे. नंतर चालत यावं लागेल. मग त्यावर मी.. 'आलेच.. जियेंगे तो साथ साथ, मरेंगे तो साथ साथ..' असा पावटा विनोद केला. घरी पोचलो आणि पाऊस अजूनच वाढला. रात्रभर दोघीजणी बसून होतो. पहाटे कधीतरी आम्हालाही झोप लागली आणि पाऊसही थांबला होता. सकाळी ऊन होतं. स्कूल मधे गेलो. आमच्य clerk county पासून ३५ मैलावर असलेली gwyneth county उध्वस्त झाली होती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती..
असो.. सुमॉ, तुझ्या लेखानंतर हे सगळं आठवलं..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators