|
मीनाक्षी हर्डीकर ऋतू येत होते, ऋतू जात होते .. परी चांदणे तेच, स्पर्शात होते .. कुणी मारवा गात जातो दिवाणा .. तुझी याद येते, सुनी रात होते .. उरी एकली मी, असूनी सवे तू .. अशी जिंकुनीही कशी मात होते ? मनीचे ऋतू आगळे, जाणले मी .. सदा आठवांचीच, बरसात होते .. कवाडे मनाची, भले बंद केली .. अशी का कधी सोय स्वप्नात होते ? कुणी लावते फास सहजी गळ्याला .. असे काय एका नकारात होते ? ऋतूंचा कशाला कुठे दाखला द्या ? तशीही अवेळीच बरसात होते .. कुणी एक राधा, झपाटून जावी, असे सावळ्या काय रंगात होते ? भले ताल बदलो, भले चाल बदलो तरी जीवना, गीत मी गात होते .. कुणी राज्य केले, कुणी रिक्त गेले .. अखेरीस सारे, स्मशानात होते .. लढे जो तमाशी लढे प्राक्तनाशी .. ' मिनू' जीत त्याचीच समरात होते ..
|
या गज़लचं स्वातीने केलेलं रसग्रहण सोबत देत आहे. गज़लमधली सौंदर्यस्थळं शोधायची तुम्ही.. ही फक्त दिशा आहे. ऋतू येत होते, ऋतू जात होते .. परी चांदणे तेच, स्पर्शात होते .. हा मीनूला पहिल्या फटक्यात साधलेला शेर. अनेको वर्षे लोटली तरीही प्रेमातली खुमारी अबाधित होती .. कुणी मारवा गात जातो दिवाणा .. तुझी याद येते, सुनी रात होते .. वा ! तुझी आठवण यायला साधी निर्हेतुकसुद्धा गोष्ट पुरते किंवा मीच आजूबाजूच्या कुठ्ल्याही गोष्टीत तुझी चाहूल शोधत असते / असतो. उरी एकली मी, असूनी सवे तू .. अशी जिंकुनीही कशी मात होते ? वरकरणी सुखी सहजीवन सुरू असूनही कुठेतरी काहीतरी हरवत चालल्याची, मनं दुरावत चालल्याची जाणीव.. त्या सहजीवनाला सुरुवात केली तेव्हा जिंकलो असं वाटलं होतं.. आता .... मनीचे ऋतू आगळे, जाणले मी .. सदा आठवांचीच, बरसात होते .. निसर्गात ऋतू चक्राकार गतीने येतात.. जातात.. पण तिच्या / त्याच्या मनात मात्र सदैव प्रिय व्यक्तीच्या आठवणींचाच ऋतू आहे. अखंड बरसात.. आठवणींची.. आणि आसवांचीही.. कवाडे मनाची, भले बंद केली .. अशी का कधी सोय स्वप्नात होते ? जागेपणी मनाला थोडाफार आवर घालता येईलही, पण ज्याची ओढ आहे त्याला स्वप्नात येण्यापासून रोखता येईल का? कुणी लावते फास सहजी गळ्याला .. असे काय एका नकारात होते ? एखादी गोष्ट इतकी हवीशी कशी होते, की नाही मिळाली तर उरलेलं आयुष्य मृतवत् भासावं? ऋतूंचा कशाला कुठे दाखला द्या ? तशीही अवेळीच बरसात होते .. ' नेमेचि येतो मग पावसाळा..' आठवतं ना? खरंच नेमेचि येतो का पण तो तरी? कुणी एक राधा, झपाटून जावी, असे सावळ्या काय रंगात होते ? अर्थ स्पष्ट आहे, सौंदर्य मांडणीत आहे. भले ताल बदलो, भले चाल बदलो तरी जीवना, गीत मी गात होते .. वा! सगळे बरे वाईट अनुभव पचवतानाच आयुष्यातून ' संगीत' न हरवू देणं.. छान! कुणी राज्य केले, कुणी रिक्त गेले .. अखेरीस सारे, स्मशानात होते .. अर्थ स्पष्ट आहे, सौंदर्य मांडणीत आहे. लढे जो तमाशी लढे प्राक्तनाशी .. मिनू जीत त्याचीच समरात होते .. नशिबाला न जुमानता अंधाराविरुद्ध लढा पुकारणं हीच जीत. इथे मीनूने तिचं नाव शेरात सुंदर प्रकारे ओवलं आहे. अर्थाच्या दृष्टीने असं नाव आल्यामुळे शेर स्वगतात्मक होतो.. स्वतःच स्वतःची समजूत काढल्याप्रमाणे. ज्या काळात पुस्तकं छापली जात नव्हती तेव्हा ही गज़ल कोणी लिहीली हे समजावं, स्मरणात रहावं म्हणून शेवटच्या शेरात नाव किंवा टोपणनाव ( तखल्लुस) गुंफायची पद्धत होती. आपल्या अभंगांत ' तुका म्हणे', ' एका जनार्दनी', इ. येतं त्यातलाच प्रकार. या शेवटच्या शेराला ' मक्ता' म्हणतात. एखाद्या गोष्टीचा ' मक्ता घेणे' हा वाक्प्रचार त्यावरूनच आला असेल का? Well done, मीनू!
|
Shyamli
| |
| Thursday, March 01, 2007 - 6:43 pm: |
| 
|
आय हाय मीनू तुस्सी तो छा गये यार, कुर्बान एकेक शेरावर सगळेच शेर सही पण जास्ती आवडलेले ३,५,६ स्वातीच्या रसग्रहणामुळे अजुनच आवडुन गेले सगळेच शेर 
|
Pulasti
| |
| Thursday, March 01, 2007 - 6:55 pm: |
| 
|
मतला खूप खूप आवडला. याद, स्वप्नं हे शेरही आवडले!! एक शंका. "आठवांची" हा शब्दप्रयोग वापरला गेलेला मी इतरही काही ठिकाणी पाहिला आहे. मला तो fabricated वाटतो आणि विषेश आवडत नाही. पण माझ्या आवडी-निवडीपेक्षा भाषेच्या दृष्टिकोनातून तो योग्य आहे का याबद्दल कुणी मार्गदर्शन करील तर उपयोग होइल. अभिनंदन मिनु! सुंदर गझल. -- पुलस्ति.
|
Anilbhai
| |
| Thursday, March 01, 2007 - 7:11 pm: |
| 
|
क्या बात है. मजा आला. सुंदर.
|
Chinnu
| |
| Thursday, March 01, 2007 - 7:13 pm: |
| 
|
मीनु, वाह वाह आणि वाह. सुंदर अगदी. कुणी मारवा.., कवाडे मनाची.., कुणी एक राधा.. आणि अखेर सारे स्मशानात होते! व्वाह. शेवटचा स्फुर्तीदायी शेर सगळ्यांवर मात! अभिनंदन! पुलस्ति, दवं ह्या शब्दाइतकाच आठवं हा शब्द मला आवडतो. आठवणी म्हटले कि खुप general संज्ञा वाटते, पण आठवं म्हटले कि गोड अशी प्रियाची आठवण असा अर्थ मला वाटतो. आणि Fabrication वाइट नसतं हो, त्याने भाषा घडत जाते! CBDG!
|
Yog
| |
| Thursday, March 01, 2007 - 8:54 pm: |
| 
|
वाह! मिनू मस्तच.. पहिल्याच चेन्डूवर चौकार. आता इतरान्चेही चौकार षटकार होवून जावू देत. वैभवा छान चाललय. लगे रहो.. 
|
Daad
| |
| Thursday, March 01, 2007 - 9:55 pm: |
| 
|
आहा, मिनू. क्या बात है. हर एक शेर आवडला. तरीही, कवाडे मनाची..., कुणी एक राधा..., कुणी राज्य केले..., लढे जो तमाशी.... भलतेच आवडले हे शेर. मस्तच! आठव हा माझाही आवडता शब्दप्रयोग आहे. बोली भाषेचा हा अविष्कार आहे.
|
Nakul
| |
| Thursday, March 01, 2007 - 11:04 pm: |
| 
|
वाह मीनू, सुरेख गझल !! सगळेच शेर सुरेख आहेत. वाह
|
ये बात!!! शेर सगळेच मस्त आहेत मीनु.. फक्त शेवटच्या दोन शेरांमुळे गज़ल गैर मुसलसील वाटते
|
वा मिनू यांची गज़ल खूपच खास झाली आहे. माझा दिवस आज खूप छान जाणार सकाळी सकाळी ही मेजवानी मिळाली. सगळ्या कार्यशाळेत भाग घेणाऱ्या कलाकारांचे अभिनंदन आणि गुर्जींना प्रणाम. गज़लेचा एकेक शेर वाचून आणि स्वातीचे रसग्रहण वाचून मजा आला. पुढच्या गज़लेच्या प्रतिक्षेत.. तुषार जोशी, नागपूर
|
Princess
| |
| Friday, March 02, 2007 - 3:23 am: |
| 
|
वाह मिनु...२,५,६ विशेष आवडले. सुरेख शब्द वापरले आहेत. स्वाती, तुझे रसग्रहण वाचुन पुन्हा गझल वाचताना अधिक मजा आली.
|
वा मिनु,,, अल्टीमेट गझल... एकेका शेरावर फिदा.... जबरदस्त!! कुणी लावते फास सहजी गळ्याला .. असे काय एका नकारात होते ? शब्दांचे पारणे फिटले इथे! ह्या वास्तवाला तोड नाही!! कार्यशाळेचे सार्थक झाले!!
|
वा मिनु!! खरच खुपच छान!!मला ५,६,८,९,१० हे विषेश आवडले. आणि स्वातीच रसग्रहण तर.......आणखी मजा आ गया!!
|
Meenu
| |
| Friday, March 02, 2007 - 4:35 am: |
| 
|
धन्यवाद वैभव .. वा ! स्वाती तुझ्याकडुन माझ्या गज़लचं रसग्रहण व्हावं यापेक्षा आनंदाची कुठली गोष्ट असु शकते .. मला माहीतीये की आभार वगैरे म्हणण्याची गरज नाहीये किंवा ते फारच औपचारीक वाटेल. पण काही गोष्टी नमुद कराव्याशा वाटतात त्या म्हणजे १. ही कार्यशाळा वैभवनी सुरु केली म्हणुनच माझा गज़ल लिहीण्याचा प्रयत्न इतका सशक्त झाला असं म्हणायला लागेल. २. तसं माझं आणि मराठी व्याकरणाच फारसं काही सख्य नाहीये. पण खरोखरीच व्याकरणशुद्ध लेखन करण्यात काय मजा आहे, आनंद आहे ते मी या कार्यशाळेमुळेच अनुभवू शकले. ३. मी पहीली गज़ल जी दिली त्यावर इस्लाह केला गेला त्याचा मला फारच उपयोग झाला. विचार अजुन स्पष्ट होत गेले आणि गज़ल अजुन अर्थपुर्ण .. ४. वैभवनी म्हणल्याप्रमाणे मी नक्कीच प्रयत्न करीन उत्तम गज़ल लिहीण्याचा धन्यवाद वैभव, स्वाती आणि ज्यांच्या प्रतिक्रीया वाचुन अजुन काही लिहावसं वाटतं त्या तुम्हा सर्वांना
|
व्वा काय सुंदर लिहिलं आहेस मिनू! पहिला शेर.. खरं तर सगळेच अप्रतिम व्वा.. मेघा
|
मिनु, मस्तच! वैभव, धन्यवाद. मी म्हटलच होतं की आम्हा रसिकांची चंगळ आहे.
|
मीनू, सुंदर. दाद द्यायला शब्द नाहीत. समजून घे. 
|
परि चांदणे तेच स्पर्शात होते.... वाह.... कुणी एक राधा, झपाटून जावी, असे सावळ्या काय रंगात होते ? क्या बात है!!! मला सगळ्यात आवडलेला शेर नाही सांगता येत... सगळेच छान आहेत....
|
मीनाक्षी हर्डीकर पुर्ण गज़लच छान आहे! पण मला खुप भावलेले आपले शेर.. १. कुणी एक राधा, झपाटून जावी, असे सावळ्या काय रंगात होते ? २.कुणी राज्य केले, कुणी रिक्त गेले .. अखेरीस सारे, स्मशानात होते .. आणी ३.लढे जो तमाशी लढे प्राक्तनाशी .. मिनू जीत त्याचीच समरात होते .. खुप छान जमली आहे गज़ल! well done!
|
Psg
| |
| Friday, March 02, 2007 - 5:53 am: |
| 
|
खरच मीनू.. सुरेख गजल! आवडली खूप.. साधी, सोपी तरीही सुंदर! तुला जे म्हणायचं होतं ते अगदी पूर्णपणे प्रत्येक शेरातून समजतय! आता गजल लिहायला लागलीस, तर सोडू नकोस!
|
Zaad
| |
| Friday, March 02, 2007 - 5:58 am: |
| 
|
वरील सगळ्यांना माझं अनुमोदन! मीनू, खूपच सुंदर!!!
|
Jo_s
| |
| Friday, March 02, 2007 - 6:07 am: |
| 
|
लढे जो तमाशी लढे प्राक्तनाशी .. ' मिनू' जीत त्याचीच समरात होते .. मिनू क्या बात है ग्रेट खरच वैभवनी ही कार्यशाळा चालू केली म्हणून मीही काहीतरी प्रयत्न केला. नाहीतर गझल पासून ४ हात लांबच रहात होतो.
|
Suvikask
| |
| Friday, March 02, 2007 - 6:38 am: |
| 
|
मिनू, अप्रतिम... एकेक शेर म्हणजे शेर (वाघ) आहे
|
Jayavi
| |
| Friday, March 02, 2007 - 6:39 am: |
| 
|
मीनू.....पहिल्या गझलच्या प्रसूतीबद्दल तुझं अभिनंदन तुझ्या कविताच इतक्या सुरेख असतात ना.... त्यात गझलचं व्याकरण जमलं आणि अतिशय सुरेख गझल जन्माला आली. पहिला शेर तर अप्रतिम.....! तुझे सगळॆच शेर एकसे बढकर एक आहेत. शेवटच्या शेरात स्वत:चं नाव गुंफ़णं.....लाजवाब कुणी एक राधा, झपाटून जावी, असे सावळ्या काय रंगात होते ? हा शेर सगळ्यात जास्त आवडला. जियो यार...........और भी आने दो. वैभव, स्वाती, प्रसाद......तुम्ही अजून जे कोणी असाल ते.... तुमचं कौतुक कुठल्या शब्दात करावं हेच कळत नाही.
|
वा मीनाक्षी केवळ अप्रतिम...! सगळे शेर सव्वाशेर आहेत...! सलामी तर जोरदार झाली आहे... वैभवराव आपले आभार मानावे तितके कमीच..!!!
|
Abhi_
| |
| Friday, March 02, 2007 - 7:33 am: |
| 
|
मीनू, खूपच छान!!! पहिलाच प्रयत्न आहे असं अजिबात जाणवत नाही.. पुढील लेखनाला शुभेच्छा!! वैभव, स्वाती, सारंग, प्रसाद आणि इतर जाणकार या स्तुत्य उपक्रमाबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार!!
|
Milya
| |
| Friday, March 02, 2007 - 7:56 am: |
| 
|
मीनु : वा वा एकदम मस्तच गं... एक एक शेर सही उतरला आहे तुझ्या लेखणीतून... खरयं सलामी च जोरदार झालेली आहे... वैभवा आता अश्याच पुढच्या गज़लची वाट पहातो आहे...
|
Mankya
| |
| Friday, March 02, 2007 - 8:05 am: |
| 
|
लाजवाब मीनू ..... लाजवाब ! आपण तर सगळ्याच शेरांवर फिदा ओ ! असे सावळ्या काय रंगात होते ? .... आरपार गेला मनाच्या हा तर ! अभिनंदन मीनू .... अभिनंदन ! ( अर्थात वैभवा तुझेही ... सुत्रधार आहेस तू तर ! ) रसग्रहणाबद्दल काय बोलणार ... स्वत : स्वाती अंबोळे ! ( बस नाम ही काफि है ! ) माणिक !
|
Manas6
| |
| Friday, March 02, 2007 - 8:45 am: |
| 
|
कुणी एक राधा, झपाटून जावी, असे सावळ्या काय रंगात होते ? .... मिनु, डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.. -मानस
|
मिनू ज़बरदस्त... एकदम फ़िदा आणि फ़ना... अजुन शब्दच नाही आहेत.. आणि वैभवला कोटी कोटी धन्यवाद.. या भाषाविष्काराची अनुभूती दिल्याबद्दल.. एका वेगळ्याच दुनीयेत घेऊन जातात गज़ल..
|
Sarang23
| |
| Friday, March 02, 2007 - 10:03 am: |
| 
|
वा!! मिनू... झकास गझल! सगळ्याच कल्पना छान! गझलेत सगळीकडेच सौंदर्य विखुरलय व्यवस्थित... कधी ते शब्दरचनेत, कधी भावनांच्या गुंत्यात तर कधी दुसर्या ओळीतील विरोधाभासात छान येतय! खूप खूप कौतुक वाटतय मला हा पहिलाच प्रयत्न इतका सुंदर आहे हे बघून! आता लेखन थांबवू नकोस! अशाच सुंदर सुंदर गझल लिहीत जा! अगदी क्षुल्लक चुका दुरुस्त कराव्यात हा गृहपाठ वैभवने सांगितला आहेच जसे की, "असे सावळ्या काय रंगात होते" ऐवजी "असे काय सावळ्या रंगात होते" हे वृत्तात कसं बसेल किंवा "असूनी" ऐवजी "असुनी" वगैरे..., पण ते तू करशीलच! अनेक शुभेच्छा! चक्रपाणी आणि पुलस्ती यांचेही या सहभागाबद्दल अभिनंदन! पण त्या गझल कुठेही प्रकाशीत करताना किमान मायबोलीच्या कार्यशाळेचा आणि आवर्जून वैभवचा(ऋतू येत होते ऋतू जात होते ही गझल वैभवने २ वर्षांपुर्वीच लिहीली होती... एक नितांतसुंदर गझल आहे ती! आणि त्याच गझलेची जमीन असलेल्या मतल्यातली पहिली ओळ त्याने या कार्यशाळेला दिली! त्याबद्दल तुला आधीच सलाम केलाय रे वैभवा!)उल्लेख होणे गरजेचे होते असे वाटले... असो चक्रपाणि तुमच्या गझलेतील तिसर्या शेरात "सुद्धा" हा शद्ब चुकीचा वापरला आहे... तो 'सु' वृत्ताप्रमाणे लघू आहे पण जोडाक्षरावरील आघातामुळे गुरू आहे. त्यामुळे ते चुकते... आपले नाव जाणकारांच्या यादीत असल्यामुळे कदाचीत वैभवने आपल्या गझलवर चर्चा केली नसेल म्हणून हे नमूद केले. आपण योग्य तो बदल करावा... दोघांनाही पुढील लेखनासाठी शुभेच्छा! चला आता सुरुवात तर सचिनने (मिनू) चांगली केली आहे पुढेही सगळं जमलं की world cup आपलाच समजा! पुढच्या गझलची वाट पाहतो आहे...
|
Mankya
| |
| Friday, March 02, 2007 - 10:09 am: |
| 
|
वैभवा ( मित्रा ).... सारंग नी सांगितलेली तुझी गझल येथे टाक ना ! एखादे उदा . म्हणून टाक हव तर ... पण टाकच ! माणिक !
|
वा मिनू, खूपच छान ! . खरोखर एकेक शेर जमला आहे.
|
मिनू, तुमच्या गझलेतले काही शेर अप्रतिमच आहेत. उदाहरणार्थ, तिसरा, पाचवा आणि दहावा शेर लाजवाब आहेत. हे शेर खूपच सहज़तेने उतरले आहेत, ही गोष्ट वाखाणण्याज़ोगी आहे. हे शेर पहिल्या प्रयत्नाचे वाटत नसल्याने तुमचे मन:पूर्वक अभिनंदन. एकूण पहिलाच प्रयत्न बव्हंशी यशस्वी झाला आहे. मी फ़ार मोठा ज़ाणकार वगैरे नसलो, तरी आज़वर मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गझलेचे धडे गिरवले आणि ज्या गझलकार मित्रांशी चर्चा केली, त्यावरून इतके सांगू शकतो की १. शेराच्या दोन्ही ओळींतला परस्परसंबंध सुस्पष्ट होणे फार महत्त्वाचे आहे. तुमच्या गझलेतल्या मतल्यात याचा अभाव ज़ाणवतो आहे. ऋतूंचे येणे-ज़ाणे आणि चांदणे यांच्यातला परस्परसंबंध आणखी स्पष्ट व्हायला हवा. २. मतल्यातले ऋतू, मनाचे ऋतू, ऋतूंचे दाखले यांतून गझलेत येणारी वारंवारता टाळावी. त्याचप्रमाणे जीवनाचे गाणे आणि मारवा गाणे यांपैकी जीवनाचेच गाणे ठेवले असतेत, तर गझलेची लज़्ज़त वाढली असती. जीवनाच्या गाण्याचा शेर मारवा गाण्याच्या तुलनेत उज़वा असल्याने तो राहू द्यावा, असे माझे वैयक्तिक मत आहे. ३. गझलेतील कमाल शेरांवर बंधन नसले, तरी ही गझल खूपच मोठी आहे, असे मला वाटते (११ शेर). साधारण ७ शेरांपर्यंत गझल आटोपशीर ठेवल्यास बरे. अशा वेळी कोणते शेर काढायचे, हे ठरवणे कठीण असले, तरी सरावाने तुम्हाला ते शक्य होईलच, यात अजिबात शंका नाही. ४. शेर क्र. २, ४ ज़रा वृत्तांतात्मक वाटताहेत. वृत्तांतात्मक शेरातून वाचकाला "हम्म हम्म्म्म...बरे...बरे.."च्या पुढे ज़ाता येत नाही. असे शेर टाळावेत. सरावाअंती हे शक्य होईल. ५. गझल ही कविता असली, तरी त्यात आखीवरेखीव शब्दच वापरले ज़ावेत, असे नाही. साध्यासोप्या शब्दांनीही ती खुलवता येते, नि त्यामुळेच जास्त परिणामकारक होते. उदाहरणार्थ, "एकली मी" च्या ऐवजी "एकटी मी", "समरात"च्या ऐवजी "युद्धात" ('यु' पुढील जोडाक्षरामुळे यु ह्रस्व असूनही गुरू होतोय, हे येथे लक्षात घ्या) अशा बदलांमुळे गझलेच्या सौंदर्याला कुठे बाधा येते आहे, असे मला दिसत नाही. तुम्हाला काय वाटते? ६. आदरणीय कै. सुरेश भटांनी म्हटले आहे, की मक्त्यात स्वत:चे नाव (तखल्लुस) विणून आपण एका अमूल्य शब्दाची ज़ागा खातो. मलाही असेच वाटते. शक्य असेल, तर आण तेव्हा तखल्लुसाचा मोह टाळावा स्वातीताईंनी तुमच्या गझलेतील सौंदर्यस्थळे दाखवून दिलीच आहेत. सारंगराव, वैभव नि इतर मार्गदर्शकांच्या विवेचनातून तुम्हाला गझललेखनात गती येणारच, या विश्वासाबरोबरच पुढील लेखनासाठी माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा.
|
Sarang23
| |
| Friday, March 02, 2007 - 11:24 am: |
| 
|
चक्रपाणि, सुचना क्र. पाच मधे युधात म्हटलं तर वृत्त चुकतं की... सुधा आणि सुद्धा यात फरक आहे हे सांगण्यासाठीच वरची ओळ... सुधाचा वेगळा अर्थ आहे... जर तुम्हाला सुधा अपेक्षित असेल तर सुद्धा लिहू नका. आपण जाणकारांना विचारूनच हा शद्ब वापरला असेल तरीही माझ्या तोकड्या ज्ञानाप्रमाणे सुद्धा मधला सु दिर्घ असतो... कधीही...! आपल्या सुचना विचार करायला लावणार्या आहेत... फक्त मिनूलाच नाही तर कार्यशाळेतल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल...! इतरही गझलांवर अशी चर्चा करावी ही विनंती...
|
Zakasrao
| |
| Friday, March 02, 2007 - 12:06 pm: |
| 
|
मला कविता वैगेरे जास्त कळत नाही म्हणुन मी या bb वर येत नाही. आत फ़क्त check कराव म्हणुन येथे आलो तर मिनुची मस्त गजल वाचायला मिळाली.मला जितका अर्थ कळाला होता त्यापेक्षा जास्त अर्थ त्यात होता हे स्वातीच्या रसग्रहणावरुन कळाले मग तर गजल तर आणखीनच आवडली. इतक्या छोट्या गजलमधे इतका अर्थ भरलेला असतो ही आज कळाले. आणी अशी गजल लिहिल्याबद्दल मिनूचे आभार मानावे तितके कमीच. मी आता इकडे नेहमी येत जाइन. पुन्हा एकदा HAATS OFF TO YOU मिनू
|
Niru_kul
| |
| Friday, March 02, 2007 - 12:22 pm: |
| 
|
मीनू.... गज़ल अप्रतिम आहे.... शब्दच नाहीत माझ्याकडे..... आणि मला तर आता जाम भिती वाटते आहे.... माझी गज़ल तर मला एकदमच फिकी भासू लागली आहे.... पण आता मी जास्त चांगल्या प्रकारे लिहीण्याचा प्रयत्न करीन.... प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद.... तसेच वैभव गुरुजींचेही मी आभार मानतो..... कारण जर आज ही कार्यशाळा नसती, तर कदाचित मी आयुष्यात कधीच गज़ल लिहीण्याचा प्रयत्न केला नसता.....
|
मीनू, ' असे काय त्या श्याम रंगात होते' चालेल का?
|
Chinnu
| |
| Friday, March 02, 2007 - 3:02 pm: |
| 
|
धन्यवाद मृण. आता कळाले मला. चक्रपाणि वृथा शंका उपस्थित केल्याबद्दल दिलगीर आहे. स्वाती, मी पामर, तरीही मला श्याम रंगापेक्षा सावळा वर्ण जास्त effective वाटतो!
|
Ashwini
| |
| Friday, March 02, 2007 - 3:11 pm: |
| 
|
मीनू, 'चांदणे स्पर्शात' आणि 'सावळ्या रंगात'..... एकदम खास. स्वाती, रसग्रहणातली वाक्ये सुद्धा एकेक कविताच आहेत.
|
Meenu
| |
| Friday, March 02, 2007 - 4:08 pm: |
| 
|
बापरे एवढ्या प्रतिक्रीया पाहुन मला भरुनच आलय खरं तर. बरं सगळ्यांना सर्वप्रथम धन्यवाद ... चला आता त्या राधेच्या शेराबद्दल बोलु या. स्वाती, सारंग माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहेत तरी मला काय वाटतय ते मांडायचा हा प्रयत्न. कुणी एक राधा, झपाटून जावी, असे सावळ्या काय रंगात होते ? असा आहे आत्ताचा हा शेर ... सारंगनी सुचवल्याप्रमाणे 'काय' आधी आणायचं का ..? खरं म्हणजे मला तशी गरज वाटत नाहीये. याचं कारण म्हणजे आत्ता 'काय' आहे त्या ठीकाणी ठेवुन मी दोन अर्थ काढते या शेराचे. कुणालाही उद्देशुन विचारलेला प्रश्न "अस काय होतं त्या सावळ्या रंगात ? " पण दुसरा प्रश्न प्रत्यक्ष त्या सावळ्या ला विचारलेला "असे काय रंगात होते ? " की राधेनी भाळावं ? ह्या शेरमधे एक छोटा पण सुंदर बदल नंतर सुचला. काम पुर्ण झालं होतं म्हणुन तो बदल इथे घेतला नाही. त्या बदलानंतर हा मला अपेक्षित असलेला परीणाम अधिक चांगल्या प्रकारे येत होता. म्हणुनच केवळ तो खाली देत आहे. कुणी एक राधा, झपाटून जावी, अरे सावळ्या काय रंगात होते ?
|
Meenu
| |
| Friday, March 02, 2007 - 4:12 pm: |
| 
|
सारंग र्हस्व, दिर्घ वगैरेसाठी मला खरोखर तयारीच करावी लागेल व्याकरण कच्च ... पण प्रयत्न करेन ..
|
Meenu
| |
| Friday, March 02, 2007 - 4:15 pm: |
| 
|
पुलस्ति आठवांची या शब्दात काही गैर आहे का मला माहीत नाही. पण हा जास्त गोड लागतो हे मात्र खरं आणि म्हणुन आवडतो वापरायला ..
|
Meenu
| |
| Friday, March 02, 2007 - 4:31 pm: |
| 
|
चक्रपाणी .. तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल आणि सुचनांबद्दल आभारी आहे. मला पुर्ण जाणीव आहे की गज़लमधे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात. माझा मात्र तसा काही गज़लचा अभ्यास नाहीये. तरी माझ्या परीनी तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न करते. १. ऋतुंचे येणे जाणे आणि चांदणे यातला परस्परसंबंध ... ऋतु येत होते ऋतु जात होते या मतल्यावरुन सर्वप्रथम सामान्यपणे कुणाच्याही काय लक्षात येईल तर काळ उलटतो आहे. आणि अधिक विचार करता लक्षात येईल की बदल होत आहे. खूप वेळा बदलांमधे न बदलता टिकुन राहणारी गोष्ट कौतुकाचा विषय असते (विधायक असेल तर अर्थात). ऋतु आले गेले तरी चांदणे तसेच राहीले. चांदणे हे रुपक मग स्पर्शातले चांदणे म्हणजे प्रेम, आत्मीयता, स्नेह असे अनेक अर्थ काढता येतील. मला तर यात परस्परसंबंध अगदी स्पष्ट वाटला होता ... नाही येत आहे का तसा ..?
|
Meenu
| |
| Friday, March 02, 2007 - 5:19 pm: |
| 
|
स्वाती .. त्या दिवशी मी nj वर तुला एक विनंती लिहीली आणि उत्तर बघायचं राहुन गेलं असो. .. चक्रपाणी .. तुमच्या पुढच्या प्रश्नांबद्दल .. २. खरं म्हणजे त्या शेरांचे अर्थ वेगवेगळे आहेत. तरीही वारंवारता टाळण्याचा मुद्दा चांगला आहे. मी नक्की लक्षात ठेवीन. ३. याला वैभवनी उत्तर दिलच आहे. त्यावर आमचीही चर्चा झाली होती.
|
Meenu
| |
| Friday, March 02, 2007 - 5:49 pm: |
| 
|
४. शेर दुसरा आणि चौथा वृतांत्तात्मक आहेत तसं म्हणलं तर पण मला वाटतं त्यातल्या विचारांचं सौंदर्य आणि भावनांची तीव्रता हे त्या शेरांच फलित आहे. (चु. भु. दे. घे.) एक शंका, असे वृतांतात्मक वाटतीलसे शेर असु नयेत असं असतं का ..? ५. हम्म ठीक आहे. 'एकटी मी' असच लिहीलं होतं आधी, त्याचं 'एकली मी' का केलं ? याला खरं तर काही फारस कारण नाहीये. पण 'समरात' हा शब्द तसाच आला होता आणि तसाच वापरला. बदलायची आवश्यकता भासली नाही. ६. आ. कै. सुरेश भटांच मत मला माहीती होतच. पण तो माझा माझ्याशी संवाद आहे. मला चांगलं वाटलं तिथे नाव वापरायला. नाव काढलं असतं तर तो शेर मी असा लिहीणार होते. लढे जो तमाशी, लढे प्राक्तनाशी .. खरी जीत त्याचीच समरात होते .. (चु. भु. दे. घे.)
इतक्या बारकाईनी वाचुन प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद. असच मार्गदर्शन पुढेही येऊ दे.
|
चिन्नू, शांतता नको होतेच्या बाबतीत मृण्मयी म्हणतात, ते बरोबर आहे. त्यावरून अर्थ स्पष्ट झालाच असेल. खुलाशाबाबत करायचा खुलासा असा, की, (तिच्या) अबोल्यांनी सगळे खुलासे केलेच (आणि खरी परिस्थिती काय आहे, हे मला कळले) म्हणजे खरे तर आणखी प्रश्न पडायला नकोत कुठले; पण इकडे तिच्या अबोल्यांनी मात्र सगळे स्पष्ट सांगूनही (हे असे का, ते तसे का, माझे काय चुकले, ती अशी का वागते आहे इत्यादी इत्यादी) अनेक प्रश्न निर्माण केले. सगळे काही 'क्लिअरकट' सांगून मग त्यानंतरही असे प्रश्न पडणार असतील, तर मग ते निर्माण करणारे असे अबोले वाह्यातच म्हणू नयेत का?
|
|
|