Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 22, 2005

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » गोरखगड गोरक्षगड्) » Archive through December 22, 2005 « Previous Next »

Gs1
Monday, December 19, 2005 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



शनिवार दिनांक १७ डिसेंबर. मिहिर, गिरी, अर्जुन, केदार आणि मी असे पाच जण सायंकाळी साडेसहाच्या इंद्रायणी एक्स्प्रेसने पुण्याहून निघालो. केदार त्या आधी पाऊण तास रांगेत उभा होता, पण गर्दीच इतकी की तिकिट अगदी शेवटच्या क्षणी मिळाले. त्यात इंद्रायणी दोन नंबरला लागलेली, शेवटी रुळावरून उड्या टाकून गाडी पकडावी लागली.

आमचे लक्ष्य होते देहरी हे गोरखगडाच्या पायथ्याचे गाव. इथे पोहोचणे तसे आडवळणाचे आहे. कर्जत मुरबाड रस्त्यावर साधारण पंचेचाळीस किमीवर म्हसा हे गाव लागते, तिकडुन धसई या गावाकडे जाणारा फाटा पकडला की १८ किमीवर देहरी गाव लागते.

मुंबईकरांना यायचे झाल्यास, कल्याणहून मुरबाड, आणि मग म्हसामार्गे देहरी असे जास्त सोयीचे पडते.

उभ्यानेच प्रवास करत कर्जत गाठले, लोणावळ्याला कूल आणि कर्जतला दिनेश सामील झाले आणि आमची सात जणांची टोळी कर्जत स्टॅंडला पोहोचली. पण साडेआठ वाजून गेले होते आणि शेवटची बस निघून गेली होती. वीस पंचवीस जण असतो तर थेट स्पेशल गाडी पण सोडली आसती अशी माहिती मिळाली.

कर्जत गावात गेलो, तिकडे एका तीन आसनी रिक्षावाल्याच्या मदतीने जवळच्या एका गावात रहाणारे सहा आसनीवाले घरोघरी जाऊन शोधले. पण रात्रीची वेळ, जंगलातला रस्ता आणि एकुणचे तिकडे वाढलेले दरोड्याचे प्रकार यामुळे कोणी तयार होईना. शेवटी एकाला तयार केला, कर्जतला आलो आणि अखेर पावणेदहाच्या सुमारास त्या रिक्षातून रिक्षावाल्याबरोबर त्याचे दोन सोबती आणि आम्ही सात असे दहा जण निघालो.

रिक्षात बसताच दिनेशने हातात एक डिश ठेवली आणि मी बेहद्द खुश झालो. चक्क उंधियो, तो सुद्धा त्याने स्वत : बनवलेला ! मग काय, तुटुन पडलो...

खाण्यात कर्जतजवळचे पहिले पाच सात किमी कसे गेले ते कळले नाही पण नंतर लक्षात आले की आमची ही रिक्षा हे एक स्पेशल वाहन होते. ती चार प्रकारे चालत होती, उतारावर आम्ही सर्व बसून ती पळत असे. त्यानंतरच्या सपाट रस्त्यावर ती थोडाकाळ फ़स्ट गिअरमध्ये कशी बशी धापा टकत असे, मग एकदा का उतारावर मिळालेल्या मोमेन्टमची पुर्वपुण्याई संपली की सपाट रस्त्यावरही तिची त्रिशंकूसारखी अवस्था होउन ना पुढे ना मागे अशी ती जागेवरच घरघरू लागे, मग आम्हाला उतरण्यावाचून पर्याय नसे. आणि अर्थातच छोट्याशा चढावरही सर्वांनी उतरून ती ढकलत नेणे क्रमप्राप्त होते. एवढे करूनही ती वाटेत एवढी तापली की काही काळ रस्त्यावर मुक्काम ठोकावा लागला. त्या वेळेचा अर्थातच शेकोटी पेटवून मग मिहिरच्या डब्याचा फडशा पाडण्यात सदुपयोग करण्यात आला, जोडीला दिनेशने आणलेले खारवलेले काजू

थोडक्यात उतारावरचा प्रवास रिक्षातून, सपातीवरचा चालत आणि चढावरचा रिक्षा ढकलत असे अडीच तासात साधारण तीस एक किमी करूनही आमचा संयम सुटत नाही आणि आम्ही ते एंजॉयच करतो आहोत हे बघुन रिक्षावाल्याचा संयम मात्र सुटला, आणि एका घाटात आता रिक्षा बंद पडली असे सांगून आम्हाला तसेच उतरवून देउन भाड्याचे पैसे घेउन तो पसार झाला. पुढचा सर्व रस्ता रिक्षा ढकलत नेण्यापेक्षा नुसतेच आमचे सामन घेउन चालणे आम्हालाही सोयीस्कर वाटले.

म्हसा गाव दहा एक किमी तरी दूर होते. गुरूवारीच पौर्णिमा झाल्याने गोरखगडावर मूनलाईट ट्रेक करुया अशी मूळ कल्पना होती. त्यात थोडा बदल होऊन आम्ही म्हसा गावाकडे त्या निर्जन रस्त्यावरून माथ्यावर आलेल्या चंद्राच्या साक्षीने रात्री एक वाजता मूनलाईट ट्रेक सुरू केला..

चेस्टरटनचे एक वाक्य मात्र आठवले

An adventure is only an inconvenience rightly considered. An inconvenience is only an adventure wrongly considered.











Gs1
Monday, December 19, 2005 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



घाट चढत राहिलो, माथ्यावर एक पोलिसांची गस्ती जीप होती, त्यांनी अडवून चौकशी पण केली. पुढे निघालो, एखादे वाहन आले तर लिफ़्ट मिळेल अशी शक्यताही कमी होती, आणि नंतरच्या अडीच तासात केवळ दोन वाहने आम्हाला ओलांडुन गेली.

पूर्ण शांतता, कुठल्याही दिशेला एकही दूरपर्यंत दिवा नाही अशा वातावरणाचा आनंद घेत, एक दोनदा थांबुन चक्क रस्त्यावरच पाच मिनिटे आडवे होत असे दोन अडीच तास चालत राहिलो. रात्री पावणेतीनच्या आसपास म्हसा गाव लागले

चौकात एके ठिकाणी जाग होती. रविवारच्या बाजरासाठी दोन टेंपो माल उतरवत होते. त्यातल्या एकाने माल उतरवला की देहरीपर्यंत सोडतो असे आश्वासन दिले. मग थोडा वेळ तिथेच हॉटेलच्या ओसरीवर बसलो. गिरी समोरच शेकोटीला गेला. निघायची वेळ झाली, ड्रायव्हरने सर्वांना चला बसा असे बोलावले पण तिथे गेल्यावर बसवण्यास अचानक नकार दिला आणि तो निघून गेला. आता पहाटे पाचपर्यंत काही मिळण्याची शक्यता नव्हती. गावातले एक देउळ शोधले आणि पथारी पसरली.

बरोबर पाचला उठुन पुन्हा चौक ! भल्या पहाटे एक दुकान उघडले होते. तिथे चहा, दुध होईपर्यंत एक जीप आली, त्या जीपने तडक देहरीला गेलो. अतिरिक्त सामान कोपर्‍यावरच्या घरात टाकले, दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली आणि पावणेसातला चढाई सुरू केली तेंव्हा थोडेसे उजाडू लागले होते, पण पश्चिम क्षितिजावर अजुनही चंद्र होता..

देहरी गावाच्या अलिकडेच एक ओढा व विहिर लागते, त्याच्या बाजुला देउळ आहे आणि देवळाच्या मागूनच गोरखगडाकडे जाणारी पायवाट सुरू होते.

गावातूनच डावीकडचा मच्छिंद्रचा सुळका आणि उजवीकडचा गोरखचा सुळका दिसत असतात. गोरखगडाच्या बाजूने डोंगराची एक सोंड दक्षिणेकडे धावते, तिच्यापासून सुरू होणारी एक पुर्वपश्चिम सोंड या देवळामागे उतरते. त्यावर चढायला सुरूवात केली, लगेच रस्ता चुकलो, बरेच भटकत एका आजोबांच्या हाळीमुळे पुन्हा वाटेला लागलो.

पूर्व - पश्चिम सोंडेच्या धारेवरून चालत, शेवटपर्यंत जायचे, तिथे थोडे उतरून पुन्हा, मुख्य सोंडेवर चढाई आणि मग सुळक्याला वळसा घालून मागच्या बाजूला जायचे असा मार्ग आहे. अगदी शेवटी जुन्या बांधकामाचे काही अवशेष दिसतात. वाटेत एका अर्जुनवृक्षापाशी गिरी आणि कूलच्या बालसुलभ लीला ( म्हणजे झाडवर उंच चढुन बसणे व फोटो काढेपर्यंत खाली न येणे वगैरे ) पहात पाच मिनिटे विसावलो.

अशा दोन अडीच तासांच्या वाटचालीनंतर सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचलो. इथे अजुन काही सामानसह दिनेश थांबले, त्यांच्या जोडीला औरंगाबादवरून आलेले काही ट्रेकर्स होते.

तिथे वर शंभर फुटांवर एक शेंदरी रंग फासलेली गुहा दिसते. खोदीव पायर्‍या, खोबणी, कपारी यांचा आधार घेत तिकडे चढुन गेलो आणि लक्षात आले की ती गुहा नाही तर पुढचा मार्ग हा आतून कोरून काढला आहे. भुयारी मार्गातला थंडावा विलक्षण होता. तशा पंधरा वीस पायर्‍यांनंतर उघड्यावर आलो. पुन्हा एकडा खोबणी, कपारी असे करत जवळ जवळ अर्धा सुळका चधुन झाला.

आता समोर दोन रस्ते होते, डावीकडचा एका हनुमानाच्या छोट्याशा गुहेत जातो, उजवीकडचा एका रहाण्यास योग्य अशा व पिण्यायोग्य पाण्याची टाकी असलेल्या गुहेकडे जातो. ही गुहा सुळक्याच्या उत्तर मुखावर खोदली आहे, समोर जेमतेम चार फुटांचे प्रांगण आणि मग सरळ दरी.

सुळक्याच्या माथ्यावर जाण्यासाठी इथुनच पुढे जावे लागते. उभ्या कातळात खोदलेल्या पावट्या, मध्येच येणारी वळणे like a spiral staircase , ती अर्ध्या तासाची थरारक चढाई हा एकुणच ट्रेकचा उत्कर्षबिंदू होता. सुळक्याचा माथा हा जेमतेम हजार स्क्वेअर फुटांचा सुद्धा नसेल. वर देउळ आणि गोरखनाथांची समाधी आहे.

गोरखगड हा तसाही रुढ अर्थाने किल्ला नाही. ( आठव्या वा बाराव्या) शतकात गोरखनाथांनी इथे राहून साधना केली. त्यामूले या स्थळाचे एक वेगळे महत्व. नंतर त्याचा टेहेळणीसाठी वापर झाल्याचे उल्लेख आहेत.

गोरखगडाच्या माथ्यावरून दिसणारे चौफेर दृश्य तर अजोड आहे.

उत्तरेला लगेच खाली मच्छिंद्रगडाच्या सुळक्याचा माथा फार लोभस दिसतो. त्या सुळक्यावर फक्त रॉक लाईंबरसना साधने वापरूनच जाता येते.

इशान्येला ( उत्तर पूर्व्) नजर जाईल तिथे आणि पुढेही पसरलेल्या सह्याद्रीच्या बळकट भींतीचे दर्शन घडते. सह्याद्री हा एकसंघपणे उत्तर दक्षिण पसरला आहे आणि तो देश व कोकण याम्ना वेगळे करतो असे वाचलेले असते, नकाशे पाहिले असतात. पण ते खरच असते कसे, दिसते कसे असे हे त्या मुख्य रांगेतून थोडे वेगळे उभे असणारे पण तरिही रांगेच्या जवळ असणारे असे कोकणातले किल्ले निवडुन त्यावरून सह्याद्रीकडे पाहिले की लक्षात येते.

पूर्वेला प्रचंड नैसर्गिक बुरुजांमुळे छातीत धडकी भरवणारा दमदम्या पर्वत अगदी खेटून उभा आहे.

दक्षिणेला गोरखगडहूनही बराच ऊंच असा सिद्धगड. गोरखगड सिद्धगड असाही ट्रेक करता येतो.

पश्चिमेला आम्ही आलो ती वाट, देहरी, नारिवली, उचले ही गावे आणि क्षितिजापर्यंत पोहोचलेली कोकणची भूमी.

दुर्बीणीतून हे सर्व न्याहाळले. हठयोगावर आधारित अशा गूधतेचे वलय स्वत : भोवती बाळगणार्‍या नाथपंथाचे हे एक शक्ती स्थान. थोडा वेळ न बोलता बसलो आणि मग समाधानाने परत फिरलो.

उतरण्यात काकणभर अधिकच थरार होता. हळू हळू उनही तापू लागले होते. सुळक्याच्या पायथ्याशी दिनेशने बनवलेले चीज पोटॅटो वाट बघत होते. पण उन्हामुळे ते खायचे सुचेना. मग थोडे खाली उतरून सावलीत बसलो. ते खाऊन आणि जवळ जवळ सगळे पाणी संपवून पुन्हा उतरायला लागलो.

घामाची आंघोळ होत दीड वाजता पायथ्याशी पोहोचलो. सकाळची विहिर पाहून मला राहवलेच नाही. एक बादली घेउन आलो. दिनेशने पाणी शेंदुन स्वत : आंघोळ केली आणि मलाही एका दगडावर बसवून जोरदार अभिषेक केला.

बटाट्याचा तांबडा रस्सा, भाकरी असे जेवून जीपने कर्जत गाठले आणि कोणार्क एक्सप्रेसने पुढच्या ट्रेकचे बेत करत सातच्या आसपास पुण्याला परतलो.

स्वर्गसुख म्हणताते ते हेच असावे असे रात्री चांदण्यात चालतांना, सुळक्यावर उभे होतो तेंव्हा, विहिरीवर आंघोळ करतांना आणि वाटचालीदरम्यान पाण्याचा एक एक घोट पितांना.. अशा अनेक क्षणी या ट्रेकमध्ये वाटून गेले...




Cool
Monday, December 19, 2005 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


जी एस मस्तच रे.. स्वर्ग सुख अगदी बरोबर शब्द, दुसरा शब्द येणंच शक्य नाही..


Cool
Monday, December 19, 2005 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागच्या वेळचा तोरण्याचा अनुभव घेतल्यानंतर या रविवारचे वेध खुप अगोदर पासुनच लागले होते. या रविवारी गोरखगडावर जायचे असे 'एकमताने' ठरले होते. शनिवारी संध्याकाळी इंद्रायणी एक्सप्रेस ने कर्जत पर्यंत जायचे होते पुण्यातुन निघाली. निघणायांमधे जीएस, केदार, अर्जुन, गिरि आणि मिहिर यांचा समावेश होता. शनिवार असल्यामुळे अर्थातच गाडीमधे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. कसाबसा सर्वांनी शिरकाव करुन घेतला. मी त्यांना लोणावळ्यात join करणार होतो. त्याआधीच मला चार नंबर डब्यात ये असा निरोप मिळाला. गर्दीत उभे राहुनच कर्जत पर्यंतच प्रवास झाला. गाडी नेहमीच्या वेळेपेक्शा उशिराने धावत होती, त्यामुळे साधारण सव्वा आठ वाजता कर्जतला पोहोचणे अपेक्शीत असतांना गाडी साडे आठ वाजता पोहोचली. कर्जत स्टेशनवर दिनेश आमची वाट पहातच होते. पोहोचल्यानंतर लगेलच आम्ही कर्जत बस स्थानकाकडे निघालो आणि तिकडे जावुन पोहोचताच शेवटची गाडी निघुन गेल्याचं कळलं. आता पुढे थेट सकाळीच गाडी आहे त्यामुळे तुम्ही मुक्काम करा व सकाळी जा, किंवा बावीस रुपये कि.मी. या हिशोबाने बस hire करा असे दोन सल्ले आम्हाला मिळाले. आम्हाला moon light trek करायचा असल्यामुळे अर्थातच आम्ही त्यांना नकार देउन इतर साधनांच्या शोधात निघालो. गावात जाउन चौकशी केली असता. गावातुन तिकडे जाण्यासाठी एकही गाडी मिळेना. ट्रेक cancel करावा लागतो की काय अशी शंका येउ लागली. शेवटी एका रिक्शाचालकाने तुम्ही माझ्या बरोबर माझ्या गावात चला मी तुम्हाला गाडी मिळवुन देतो असे आश्वासन दिल्यामुळे इतर मंडळींना स्टेशन वर सोडुन मी आणी जीएस त्याच्या बरोबर गेलो. रिक्शा चालकाने त्याच्या गावात जाउन एका ड्रायव्हरला तयार करण्याचा प्रयत्न केला, तर त्या ड्रायव्हरच्या आईने त्याला जबरदस्त विरोध केला. आमच्या पैकी काही जणांच्या घरी प्रत्येकवेळी असाच प्रसंग येत असल्यामुळे आम्हाला काही विशेष वाटले नाही. मग पुन्हा द्सया ड्रायव्हरच्या घरी जाउन पोहोचलो. त्याच्या घरी सुद्धा ड्रायव्हरच्या आईने विरोध दर्शविला, पण कर्जत ते देहरी आठशे रुपयांचा सौदा होत असल्यामुळे तो आमच्या बरोबर त्याची Ape गाडी घेउन येण्यासाठी तयार झाला. पण त्याला आम्ही ज्या गावाला जायचे असे सांगितले ते गावच मुळी ठावुक नव्हते. त्यावेळि जी एस ने त्याला कुठे जायचे ते अश्या प्रकारे सांगितले की जणु ते जीएस चे आजोळ असावे. "कर्जत मुरबाड रस्त्याने म्हसा पर्यत जायचे आणि मग तो रस्ता सोडुन द्यायचा, उजव्या हाताला धसई गावाला जायचा रस्ता पकडायचा, त्याच रस्त्याने नैरोली गावाच्या पुढे लगेचच देहरी गाव लागते. तेथेच आम्हाला जायचे आहे." वा मान गये. यालाच म्हणतात ट्रेकींगचे प्रेम, खोल शिरुन माहीती काढुन मगच
ट्रेकला सुरुवात. तर गाडी घेउन आम्ही कर्जत स्टेशन वर पोहोचलो तिकडे सर्वजण दिनेश ने आठवणीने बनवुन आणलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत होते. आम्ही सात जण आणि त्या ड्रायव्हर ने सोबत आणलेले दोन असे एकुन दहा जण कर्जत वरुन निघालो. गाडीमधे वजन जास्त झाल्यामुळे कींवा गाडिमधे तांत्रिक खराबी असल्यामुळे, गाडि अगदिच हळू चालत होती. काही ठिकाणी तर सरळ रस्त्यावर सुद्धा काही जणांना उतरुन चालावे लागत होते. अश्या गाडिमुळे सर्वच जण वैतागले होते पण ट्रेक महत्वाचा असल्यामुळे उशिरा का होईना पण तिकडे पोहोचण्याशी मतलब असा विचार सर्वांनीच केला. पण पुढे पुढे गाडिचा स्पीड इतका कमी झाला की चालु गाडीतुन कुणीही उतरुन गाडिबरोबर चालत जात. थोड्यावेळानंतर ऎन रस्त्यात गाडी थांबवली आणी इंजिन गरम झालं आहे त्यामुळे अजुन थोडा वेळ गाडी पुढे जाउ शकणार नाही असं जाहीर करुन ड्रायव्हरबुवांनी लगेचच रस्त्याच्या बाजुला शेकोटी सुद्धा पेटवली. मग आम्हाला देखिल उतरण्याशिवाय पर्याय नव्हता त्यातच मिहिरला भुक लागल्यामुळे (किंवा दहाच्या आत जेवुन घे असा बायकोने दम दिला असेल त्यामुळे) त्याने लगेचच डब्बा काढुन जेवायला सुरुवात केली आणी मग सर्वांनीच त्याच्या सोबत स्वतःचीही भुक भागवली. गाडी सुरु झाल्यानंतर तिचा थोडासा स्पीड वाढलेला बघुन सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. थोड्या वेळ असा सुखाचा प्रवास झाल्यानंतर कळंब गावाच्या घाटात गाडी पोहोचल्यानंतर लोड सहन होत नाही म्हणुन सर्वजण पुन्हा खाली उतरले आणि रिकामी गाडी पुढे गेली. त्या घाटातच आमचा ट्रेक सुरु झाला, आम्ही घाट चढायला सुरुवात केली आणि अर्ध्यावर पोहोचलो तेवढ्यात आमची गाडी मागे येतांना दिसली. गाडि ठिक झाली वाटतं अशी आशा वाटतं असतांनाच ड्रायव्हर ने आता आणखी पुढे मी येउ शकत नाही, गाडी बंद पडली असे
उत्तर देउन धक्काच दिला. तांत्रिक खराबी असल्यामुळे आम्ही काहीही म्हणुन शकत नव्हतो. आमचा त्यामुळे नाईलाज झाला आणी आम्ही आमचे सर्व सामान काढुन त्याला जाण्याची परवानगी दिली. आम्ही नेमके कुठे आहोत ते ठावुक नाही, अजुन किती पुढे जायचे ते सुद्धा ठाउक नाही, ट्रेकचे पुढे काय होणार, अशा विचित्र मनस्थितीत आम्ही चालायला सुरुवात केली. पुढचे वळण घेतल्यावर आम्हाला समोर पोलीसांची गाडी दिसली आणि कदाचित आमच्या गाडीचा ड्रायव्हर त्यांना बघुन मागे गेला असेल अशी पुसटशी शंका आम्हाला आली. आम्ही दुरुन येत असलेले पाहुन पोलीसांनी खास पोलीसी आवाजात कोण आहे रे असा सवाल केला, आम्ही थोडेसे पुढे येताच आमच्या चेहयावरचे भाव
बघुन त्यांचा आवाज सुद्धा बदलला आणी मग कुठुन आलात, पायी का चाललात वैगरे प्रश्न विचारले आणि साधारण दहा कीमी वर म्हसा गाव आहे, मधे दुसरे कुठलेही गाव नाही अशी माहिती दिली. आम्ही मग चालायला सुरुवात केली, डोळ्यासमोर लांबच लांब रस्ता दिसत होता, मधुन एखादी गाडी जाताच आम्ही लिफ़्ट मागण्याच्या प्रयत्न केले पण वेगवेगळ्या आकाराचे सात जण, काहींच्या हातात काठ्या असा अवतार असल्यामुळे लांबुनच त्यांचा स्पीड वाढलेला असायचा. रमत गमत, गप्पा मारत, आम्ही चालतच होतो. गंमत म्हणजे रस्त्यावरचे सर्वच मैलाचे दगड रंगवण्यात येत असल्यामुळे सर्वच अगदी कोरे होते त्यामुळे आपण किती चालुन आलो आणि अजुन किती जायचे काहीच कळत नव्हते. आमचा चंद्रप्रकाशात गोरखगड चढण्याचा plan होता दुर्दैवाने आम्ही रात्रीच्या बारा वाजता नुसतेच रस्त्यावरुन चालत होतो. हळुहळु आपण एका जंगलातल्या घाटात आहोत याची जाणीव झाली आणी नकळत सर्वांचा वेग वाढला. दुरवर दिवे दिसु लागल्यामुळे सर्वांच्याच जीवात जीव आला, पुढच्या काही मिनिटातच आम्ही म्हसा गावात येउन पोहोचलो. आम्ही गावात पोहोचे पर्यंत साधारण दोन वाजले होते. म्हसा गावचा बाजार असल्यामुळे तिकडे एक गाडी रिकामी करण्याचे काम सुरु होते त्या ड्रायव्हर ने तुम्ही थोड्यावेळ बसा मग नेउन सोडतो असे आश्वासन दिले पण गाडी रिकामी झाल्यावर नकार देउन तो गाडी घेउन निघुन गेला

Cool
Monday, December 19, 2005 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पर्यायाने आम्ही एक शंकराचं देउळ शोधलं आणी झोपण्यासाठी पथारी टाकली. सकाळी पाच वाजता गाडी घेउन देहरी गावात जायचे ठरले. थोड्याच वेळात सगळे झोपेच्या आधिन झाले. सकाळी बरोबर पाच वाजता उठुन आम्ही परत गावात आलो. तिकडे एका hotel मधे चहा मारत असतांनाच एक जीप थांबली होती. आम्ही लगेलच त्याच्याशी बोलुन त्याला देहरी गावात जाण्यासाठी तयार केले. दहा पंधरा मिनिटातच आम्ही देहरी गावात पोहोचलो. गाडी थांबताच एक hotel उघडे दिसले, त्याचा मालक लगेचच आमच्या कडे आला आणी आम्ही गोरखगडावर जाणार असे कळताच जेवण वैगरे पाहीजे असेल तर मिळेल अशी त्याने जाहीरात केली. त्याच्याकडेच मग काही सामान ठेवले आणी जरुरीचे सामान घेउन आम्ही गडाच्या दिशेने निघालो. सकाळची प्रसन्न वेळ होती आणि डोळ्यासमोर मच्छींद्रगड आणि गोरखगड दिसत होते. उत्साहात आम्ही गडाच्या दिशेने जाण्यासाठी सुरुवात केली.गावातुन बाहेर पडल्यावर लगेचच एक गोरक्शनाथांचे मंदिर लागले. मंदिराच्या बाहेरुन डाव्या बाजुची वाट आम्ही निवडली. थोडा वेळ त्याच वाटेवरुन चालत जात असतांनाच आमच्या वरच्या बाजुला एका गाववाल्याने हाक मारली. आणि मग कळले की आपण जी वाट चालत आहोत ती मच्छिंद्रगडावर जाते, मग त्यांच्याच सुचने वरुन आम्ही घनदाट झाडी मधुन सरपटत त्यांच्या आवाजाच्या दिशेने निघालो. त्यांच्या जवळ पोहोचल्यानंतर मग त्यांनी आम्हाला गडाच्या पायथ्यापर्यंत घेउन जाणारी वाट दाखवली. त्या वाटेवरुन आम्ही गडाच्या पायथ्याशी येउन पोहोचलो होतो. एवढावेळ आम्ही पुर्वेच्या दिशेने चालत असल्यामुळे आणी मधेच सह्याद्रीची पर्वत रांग असल्यामुळे सुर्य आमच्या समोर आला नव्हता. आम्ही गडाच्या पायथ्याशी येउन पोहोचताच आमच्या समोर दिसणार सौंदर्य बघुन आम्ही शब्दाच्या पलिकडे गेलो. समोर एकमेकांच्या हातात हात घालुन उभी असलेले, आणि क्शितिजापर्यंत पोहोचणारी पर्वत, त्यावरुन येणारं सोनेरी उन, डाव्या बाजुला मच्छींद्रगड आणि उजव्या बाजुला सिद्धगड, समोर उचंच उंच गोरखगडाचा कातळ, एकुणच अप्रतिम सौंदर्य. अशा भारावलेल्या स्थितीत काही वेळ गेला आणी मग आम्ही चढाई करण्याचे ठरवले. आमच्या अगोदर तिकडे एक औरंगाबाद वरुन आलेला group होता आणि त्यातील सदस्य चाळीशीच्या आसपासचे होते. पैकी काही सदस्यांनी पुढे खुप अवघड आहे म्हणून माघार घेतली होती आणी आम्हाला जपुन जा असा सल्ला सुद्धा दिला. त्यांच्याच बरोबर बसण्याचं दिनेश यांनी ठरवलं. मग आमच्या सामनातील अत्यावश्यक गोष्टी बरोबर घेउन आम्ही सुरुवात केली. एक छोटासा Rock Patch पुर्ण केल्यानंतर आम्ही एका कोथळुन काढलेल्या गुहेच्या दारावर पोहोचलो. या ठिकाणी डॊंगर कोथळुन काही पायया केलेल्या आहेत. त्याच्या थोडंस वर जाताच आम्हाला एक मोठी गुहा दिसली या इथेच त्या ग्रुपचे काही सदस्य जेवण करत होते, तर काही आराम करत होते. मग या गुहेच्या उजव्या बाजुने निघुन आम्ही एका मोठ्या कातळाच्या खाली येउन पोहोचलो. हाच तो कातळ ज्याच्याविषयी खुपसं ऎकलं होतं. खाली खोल दरी आणी समोर कातळात असलेल्या पायया. आम्ही एकमेकांना prompting करत चढायला सुरुवात केली. चढणे अवघड असले तरी प्रत्येक पायरी ला उजव्या बाजुला खाचा पाडलेल्या आहेत आणि त्यामुळेच चढाई सुकर होते. ज्या कोणी त्या खाचा केल्या असतील त्याला मनापासुन सलाम. जपुन चालत आम्ही वर येउन पोहोचलो आणी सुख म्हणजे वेगळं काय असतं असाच प्रश्न प्रत्येकाच्या तोंडुन बाहेर पडला. समोर साधारण १००० Sq Ft एवढाच गडाचा माथा. त्यावरील मंदिर बाजुच्या झाडाची थंडगार सावली, चौफेर दिसणारं सौंदर्य , आणी मनात गड सर केल्याचा आनंद, सर्वोच्च क्शणात गेलो होतो आम्ही सगळे. रात्रीची पायपीट, सकाळी चुकलेली वाट या सगळ्या गोष्टींचं त्यावेळी काही सुद्धा वाटतं नव्हतं. त्याच शांततेचा थोडासा आस्वाद घेतल्यानंतर पोटाने मागणी सुरु केली आणी मग गिरि, केदार, मिहिर यांनी आणलेल्या फराळावर आडवा हात मारला. आता खाली उतरायचे होते, या ठिकाणी चढण्यापेक्शा खाली उतरणे थोडेसे अवघड कारण चढतांना तुमचे लक्श फक्त समोरच्या पायरी कडे असते पण उतरतांना मात्र समोर खोलच खोल दरी, जंगल दिसत असते आणि आपण किती उंचावर आहोत हे जाणवत रहाते. म्हणुन आम्ही अगदिच जपुन प्रसंगी बसुन (जीएस Techonology ) वापरुन तो Rock patch उतरुन गेलो. उतरल्यानंतर काही क्शण तिकडच्या गुहेत विश्रांती घेतली आणी मग गड उतरायला सुरुवात केली. आम्ही उतरुन येईपर्यंत दिनेश यांनी आमच्या साठी खायला सुद्धा करुन ठेवले होते. त्यावर लगेचच ताव मारला आणि आम्ही गड उतरायला सुरुवात केली. गड उतरतांना आमच्या बरोबर एक कुत्री गडमाथ्यावरुन आली होती. आम्ही गड उतरत असतांना, आम्ही सकाळी कुठे रस्ता चुकलो ते सुद्धा कळले. गोरखनाथ मंदिरापासुन उजव्या बाजुची वाट न निवडता आम्ही डावया बाजुने गेलो होतो. गावात पोहोचत असतांना सर्वांनी एका विहिरवर जाउन तिच्या एकदम थंड पाण्यात स्वतःला फ्रेश केले. आणी मग Hotel वर जाउन जेवणावर तुटुन पडले. जेवण करत असतांनाच त्याच hotel ची एक गाडी सुद्धा आहे असे कळले मग तीच गाडी घेउन आम्ही कर्जत पर्यंत आलो. पण थोडासा उशीर झाला असल्यामुळे आमची सिंहगड एक्सप्रेस चुकली होती मग थोडा वेळ वाट बघितल्यानंतर कोणार्क एक्सप्रेस आली तिच्या तुन आम्ही मग पुणाच्या दिशेने आणि दिनेश मुंबईच्या दिशेने गेले. अविस्मरणीय अश्या गोष्टींच दान आमच्या पदरात टाकुन हा ट्रेक संपत होता आणि स्वर्गीय सुख या शब्दाचा खराखुरा अर्थ आम्हाला कळला होता.

Dhumketu
Monday, December 19, 2005 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे जाम जळवता... आता मी "my experiences" मध्ये अजीबात येणार नाही....

असे पायाचे तुकडे पडल्याशिवाय ट्रेक चे पुण्य लाभत नाही..

गोरखगडावर गेलो होतो तेव्हा selectica च्या ग्रुप बरोबर गेलो होतो... तरी एक मन सांगत होते की जाऊ नकोस पोरी असतील... दुसरे लग्न न झालेले मन सांगत होते की जा रे चान्स सोडू नकोस :-)
खरे म्हणजे पोरी असताना असे ट्रेक करूच नयेत ( समस्त पोरीबाळींची माफ़ी मागून ) .. जाम त्रास झाला :-(
( दुसरे मन आता त्रास देणार नाही :-) )


Zelam
Monday, December 19, 2005 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए धूमकेतू, पोरीबाळीनी का बरे असे trek करु नयेत?
मी हा trek केला होता मुलगी असून कुणाला त्रास न देता.
बाकी वर्णन मस्तच. तुम्ही डोंगरावरून सकाळ पाहिलीत, मी देहरी गावातून संध्याकाळ. अजूनही सांज ये गोकुळी' गाणं ऐकलं की तीच संध्याकाळ आठवते.


Naatyaa
Monday, December 19, 2005 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे.. छान होता व्रुत्तांत दोघांचा..

Amitpen
Tuesday, December 20, 2005 - 12:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे!!....तुम्ही काय मोहिम काढलीये का सगळे गड पादाक्रांत करायची.....:-)

Dineshvs
Tuesday, December 20, 2005 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकुण या सहलीतला माझा अनुभव हा एकमेव होता. संध्याकाळी लिहितो. आत्ताच घरी आलोय. गिर्‍याला जरा बरं वाटत नाहीये. त्याला भेटुन निघालो. आता ऑफ़िस गाठायचेय. संध्याकाळी लिहिन.
मित्रमंडळीना फोटो पोहोचतीलच.


Limbutimbu
Tuesday, December 20, 2005 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है! मज्जा केलित की रे भो!

ट्रेक टू ट्रेक
गिर्‍या रेऽऽऽऽ
या बारीला विहीरीवर का?
DDD

Indradhanushya
Tuesday, December 20, 2005 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS मस्तच...
तुला सेल नंबर साठी मेल केला होता... पण तुझा reply नाही आला... गोरखगडचा Trek मिसल्याबद्दल खरचं वाईट वाटतं... :-(

Moonlight Trek चा अनुभव आम्ही १० डिसेंबरला नेरळ ते माथेरान या ४ तासाच्या तंगडतोडीत घेतला... पौर्णिमेच्या चांदण्यात फ़िरण्याचा अनुभव काही औरच असतो... :-)


Kedarrp
Tuesday, December 20, 2005 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोरखगड भ्रमणवृत्तांत

जायचे कसेः स्वतःचे वाहन असेल तर उत्तमच, नाहीतर, पुण्याहून मुंबईकडे जाणारी कुठलिही ट्रेन पकडावी. बोरघाट पार करत कर्जत येथे उतरावे. कर्जतहून मुरबाडकडे जाणारी बस किंवा खाजगी वाहन करावे. कर्जतहून शेवटची बस संध्याकाळी ६.०० वाजता आहे. कर्जतपासून ४५ किमी. वर म्हसा हे गाव लागते, तेथे उतरावे. उजवीकडे देहरी या गावाकडे एक रस्ता फुटतो. म्हसा येथून देहरी १२ किमी. आहे. खाजगी जीपगाड्या सहज उपलब्ध असतात. (रु. ८/- प्रतिबैठक‌). देहरी येथे तुम्ही थेट गोरखगडाच्या पायथ्याशी पोचू शकता.

वृत्तांतः आधी ठरवल्याप्रमाणे सर्व मंडळी (जीएस, केदार, गिरी, मिहीर आणि अर्जुन)ठीक सहाच्या सुमारास पुणे स्टेशनवर गोळा झाली. त्यादिवशी पुण्यातील बहुतेक सर्व जणांना रेल्वेने प्रवास करण्याची शिक्षा केली असावी. तिकीटे काढायला ही तोबा गर्दी! गांडुळाप्रमाणे ९‍‍‍‍‍-१० रांगा इकडून-तिकडून वळवळत होत्या. शेवटी त्यातल्या त्यात अल्पवयीन रांगेत शिरलो. इंद्रायणी ६.३० ची होती. आणि बरोब्बर ६.२८ ला तिकीटे हातात मिळाली. उंदराच्या मागे जशी मांजर लागते तसे आम्ही इंद्रायणी (की उंद्रायणी...)कडे सुसाट पळालो. थोडक्यात काय, तर ट्रेकची सुरवात अशी रोमांचक झाली. असो.

लोणावळ्याला श्री.कूल आणि कर्जतला श्री.दिनेश सामील झाले. राज्य-परिवहन मंडळाची बस मिळते का याचा एक असफल प्रयत्न करून, अखेरीस कर्जत स्थानकावर श्री. दिनेश यांच्या हातचा केवळ अप्रतिम असा उंधियो आणि पाव यांचा आस्वाद घेतला. सोबत कर्जतची बोरं होतीच. सुमारे साडेनऊला श्री. जीएस यांनी म्हशापर्यंत एक वडाप (याला पुणेकर डुक्कर-रिक्षा आणि पुण्याबाहेरचे टमटम किंवा डुगडुगी असेही म्हणतात) ठरवला. पुढे चालक आणि दोन्ही बाजूस जय-विजय (चालकाचे सहकारी), मधे चार आणि मागे तीन अशी बैठकव्यवस्था करून एकदा्चा तो वडाप म्हशाकडे कूच करता झाला. मागे बसणा-यांना रस्त्यावरील गोधनत्याज्य आणि डिझेलचा धूर यांचा संमिश्र गंध अनुभवता येत होता. वडाप ज्या वेगाने जात होता, त्यानुसार पहाटेपर्यंत म्हसा नक्की येईल असे वाटत होते. भरीस भर म्हणूनच चढावावर वडाप आणि चालक यांना मागून धक्का देण्याचे सत्कार्य घडत होते. वीसेक किमी. झाल्यावर वडाप गरम झाल्याने मधेच रस्त्यावर सक्तीचा विश्राम घ्यावा लागला. असेच कधी थांबत तर कधी टेकू देत मार्गक्रमण सुरू राहिले. एका चढावावर (नेहमीप्रमाणे) मागून चालत चालत वडाप गाठल्यावर अचानक चालक महाशयांनी वडापाने स्वेच्छानिवृत्ती जाहीर केल्याची घोषणा केली. आता हे खरे होते की थाप ते त्या वडापालाच माहित. मुकाट्याने झालेले पैसे चुकते करत सात मराठे वीर पदयात्रा चालू करते झाले.

रात्रीची ११.३० ची वेळ. अजून म्हसा किती लांब आहे ते कुणालाच नक्की माहित नव्हते. कधी स्वच्छ चंद्रप्रकाश तर कधी दाट झाडी डोक्यावर बाळगत पुढे जात होतो. अखेरीस २.३० च्या सुमारास म्हसा आले. आवडत्या रेडयाला पाहून म्हशीला जितका आनंद होत असेल, त्याच्या कितीतरी पट अधिक आनंद आम्हाला म्हशाला पोचल्यावर झाला. त्यावेळी देहरीला जाण्यास वाहन न मिळाल्यामुळे, गावातीलच एका देवळात विश्रांती घ्यायचे ठरले.

सकाळी ५.०० च्या ठोक्याला सगळे प्रामाणिकपणे उठून तयार झाले. नाक्यावरच्या उपाहारगृहामधे गरमागरम चहा आणि दूध घेऊन देहरीकडे प्रयाण केले. पायथ्याशी पोचेपर्यंत ६.३० झाले होते. पायथ्यावरून मच्छिंद्रगड, गोरखगड आणि सिद्धगड या त्रयींनी धुक्याचे उपरणे लपेटून दर्शन दिले. अर्धे सामान खाली ठऊन ७.०० वाजता गड चढायला सुरवात केली. पायथ्याशीच उजवीकडे वळण्याऐवजी डावीकडची वाट घेत सोंड चढायला लागलो. काही वेळातच एका आजोबांनी आमचा आवाज ऐकत, ती वाट गोरखगडाकडे जात नसल्याचे सांगितले नसते तर आज "मच्छिंद्रगड-भ्रमणवृत्तांत" लिहावा लागला असता. असो. गोरखगडाकडे जाणारी वाट घट्ट पकडून ठेवत, अखेर ९.०० वाजता मुख्य सुळक्याच्या पायथ्याशी पोचलो.

आता खरी आणि खडी चढाई सुरू होत होती. कातळात कोरलेल्या पाय-या सर करत मु्ख्य गुहेपाशी येऊन पोचलो. तिथे आधीच औरंगाबादचा एक गट न्याहरीच्या तयारीत होता. गुहेपासून थोडे पुढे गेले की अखेरचा पण अवघड असा चढ येतो. प्रत्येक पाय अचूक नियंत्रण साधत ठेवावा लागत होता. बूडत्याला काडीचा, लेंग्याला नाडीचा, तसा हाताला त्या पाय-यांमधे केलेल्या खोबणींचा आधार होता. त्यामुळेच वरपर्यंत जाणे सुलभ झाले. माथ्यावर गोरखनाथांची समाधी आणि शंकराचे देऊळ साधारण १००० चौ. फीट च्या सपाट जागेत बांधले आहे. सुरेख आहे. उत्तरेस मच्छिंद्रगडाचा सुळका, पूर्वेस दमदम्या आणि त्याच्या पलिकडे सिद्धगड सह्याद्रीच्या बलाढ्य रांगांच्या पार्श्वभूमीवर खुणावत होते.

खाली उतरताना दुप्पट काळजी घेत सर्वजण सुमारे १२.०० च्या आसपास सुळक्याचा पायथ्याशी पोचलो. झपझप उतरत सगळ्यांनी गडाच्या पायथ्याशी असलेली बाव गाठली. काही प्रमाणात ताजेतवाने आणि सुस्नात होत, सकाळी जिथे अर्धे सामान ठेवले होते तिथे दाखल झालो. बेत खासा होता. तांदळाच्या भाकरी, कांदा-बटाटा रस्सा, फोडणीचे वरण, भात, कांदा आणि पापड. सोबत खारावलेले काजू. (श्री. दिनेश यांच्या सहयोगाने). आत्माराम तृप्त झाला.

कर्जत ते म्हसा प्रवासाचा महान अनुभव पदरी असल्याने देहरी ते कर्जत थेट जीप करायचे ठरले. कर्जतला येईपर्यंत अपेक्षेप्रमाणे सिंहगड आधीच गेली होती. ५.०० ची कोणार्क पकडण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. अखेरीस गोरखनाथ कृपेने संध्याकाळी ७.०० ला पुण्यात आणि नंतर आपापल्या घरी सुखरूप दाखल झालो.

केदार.

Gs1
Tuesday, December 20, 2005 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे इन्द्रा, मला नाही मिळाला तुझा निरोप. पुन्हा पाठवतोस का ? मी पाठवलेले निरोपही लोकांना मिळतात की नाही हे तपासून बघायला पाहिजे.


Dineshvs
Tuesday, December 20, 2005 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अनायासे सुट्टी होती, म्हणुन GS1 ला खुप आधीच, या तारखाना माझ्यासाठी काहितरी अरेंज कर अशी गळ घालुन ठेवली होती. त्यानुसार त्याने व्यवस्था केली होतीच. ( मंडळ त्याबद्दल मनापासुन आभारी आहे. ) शनिवारचा दिवस तसा घाईगडबडीतच गेला. रात्री आठ वाजायच्या आत कर्जतला पोहोचायचे आहे एवढेच लक्षात होते. GS1 ला फ़ोन पण करायचा राहुन गेला. संध्याकाळची गर्दी लक्षात घेता, शक्य तितक्या लवकर निघालो. कसाबसा ऊंधियो आटपला, भाकर्‍या न्यायच्या होत्या, पण तेवढा वेळ नव्हता. थेट गाडीची वाट बघण्यापेक्षा, कल्याण, अंबरनाथ, बदलापुर आणि कर्जत अश्या गाड्या बदलत कर्जतल पोहोचलो.
अंबरनथहुन GS1 ला फ़ोन केला. माझ्या अवतारावरुन फ़ोनवाल्याने हायकिंगला निघालात का म्हणुन विचारलेच, पण तोपर्यंत मी गडाचे नाव पण विसरलो होतो. मित्र मला कुठेतरी नेणार आहेत, एवढेच सांगु शकलो. गावात भाकर्‍या नाहित तर निदान चपात्या तरी मिळतात का ते बघितले, पण तसे हॉटेलच दिसत नव्हते, शिवाय गाडीची वेळ पण होत आली होती. मग कर्जतला ऊतरलो. ईंद्रायणी यायला बराच वेळ होता, म्हणुन गाड्याना ईंजिन कसे लावतात, गाडी येण्यापुर्वी रेल खान पान सेवावाल्यांची तयारी कशी चालते, ते बघत बसलो. आणखी थोडा वेळ मिळता तर, अनिल अवचट स्टाईल लेख लिहु शकलो असतो. तिथेहि चपात्यांची चौकशी केली, पण यश नाही आले, मग छोटे पाव घेतले.

पुनेसे आनेवाली ईंद्रायणी एक्स्प्रेस आज पाच से दस मिनिट देरीसे आनेकी संभावना है, अशी ऊदघोषणा झाली. पाच से दस म्हणजे पाच अधिक दहा, पंधरा अधिक हातचे पाच वीस, असा हिशेब करायचा हे माहित होतेच. तुमच्यापैकी कुणाला आठवतेय का माहित नाही, पण मागे एकदा ईंद्रायणी खंडाळ्यापासुन थेट कर्जत पर्यंत, ड्रायव्हरशिवाय घसरत आली होती. तशी त्यादिवशी यायला हवी होती. आठ पाचला येणारी गाडी साडेआठला आली. गाडीला जातीने सामोरा गेलो. अपेक्षेप्रमाणे मला बघुन त्यानी आरोळ्या ठोकल्याच.

आता सगळे GS1 आणि कुलच्या ताब्यात होतो. अंधारात वाट काढत एस्टी स्टॅंड वर पोहोचलो, तर गाडी निघुन गेली होती. मग तिथल्या साहेबानी आलो होतो त्याच्या विरुद्ध बाजुने गावात जा असे सांगितले. आणि परत कुणास ठाऊक कसे ते ( पृथ्वी गोल आणि छोटीहि असल्यानेच बहुदा ) परत स्टेशनलाच येऊन पोहोचलो. मग GS1 आणि कुल गावात वाहनांची सोय करायला गेले. माझे ओझे कमी व्हावे या एकमेव स्वार्थी हेतुने मी ऊ.धियो बाहेर काढला आणि पंगत जमवली. बरोबर अननस आणि बोरे पण खल्ली. ( शू, हे कुल आणि GS1 ला माहित नाही. ) ते दोघे आम्हाला गाडी मिळाली, लगेच येतोय असे फ़ोनवर निरोप देऊन धीर देत होते. आम्ही मात्र सावकाश होवु द्या, करत होतो.
जे काहि वाहन आणले ते एकमेव होते. ड्रायव्हर, त्याचे दोन सोबती आणि आम्ही सात जण बसलो, जरा जरी चढण आली, कि गाडी धापा टाकत असे. खरे म्हणजे, त्यानी आम्हाला तशी कल्पना आधीच दिली होती, पण चढण म्हणजे काय, याची व्याख्या ठरली नव्हती. दर दोन मिनिटाला खाश्या स्वार्‍याना पायऊतार व्हावे लागत होते. चालत्या गाडीतुन चढु अगर ऊतरु नये, असा दम मी कुलला दिला. त्याने आत्तापुरती सुट द्या, असे विनवले.
सहारला ऊतरणार्‍या विमानंचा डीसेंट साधारण तिथुन सुरु होतो, त्यामुळे दर पच मिनिटाला डोक्यावरुन विमान दिसत होते.
मधे एकदा गाडी हटुनच बसली. मग तिथेच शेकोटी करुन सगळे बसलो. मिहिरचा डब्बा सगळ्यानी घासघास खाल्ला, तोंडी लावायला काजु होतेच. माझ्याकडे कायम काजु असल्याने, आज प्रोग्रॅम आहे वाटतं, अश्या प्रश्णांची मला सवय झालीय. गाडीची दुरुस्ती पण एकदा झालीच. मग अगदी खरोखरची चढण आल्यावर मात्र, सगळे न सांगताच खाली ऊतरलो. मग डुर डुर आवाज काढत गाडी बरीच पुढे गेली. अगदी पार दिसेनाशी झाली. मी धावत जाऊन, त्या ड्रायव्हरच्या साथीदाराना गाठले. मला जरा त्यांच्या हेतुबद्दल शंका यायला लागली होती. तो ड्रायव्हर नवा आहे, या भागात कधी आलेलाच नाही, त्याला रस्ता माहित नाही वैगरे मोलाची माहिती मिळाली. आणि जादु केल्यासारखी आमची गाडी ऊलटी येताना दिसली. तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आमचा मार्ग आम्हाला मोकळा, अश्या तोडग्यावर बोलणी फ़िस्कटली. आम्ही आपले सामान ताब्यात घेतले आणि विनोबा एक्स्प्रेस पकडली. रस्त्यावर वाहने क्वचितच दिसत होती. शिवाय सात संशयित वाटणार्‍या व्यक्ती, काळे कपडे, पाठीवर बोजे, एकाच्या हातात काठी, असे बघुन कुठलेहि वाहन वेग वाढवुन निघुन जात होते. म्हसा किती लांब आहे, असे ओरडुन विचारल्यावर हे ईथेच पासुन पाच किलोमीटरवर अशी ऊत्तरे मिळाली.

वाटेत अचानक पोलिसांचे तपासणी पथक भेटले. त्यानी जुजबी चौकशी केली. पण त्यांची एकंदर देहबोलि बघुन आम्ही काढता पाय घेतला. आमची गाडी बहुदा, त्याना बघुनच, बुडाला चाकं लावुन माघारी पळाली होती तर.

पुढे सुरु झाला आमचा चांदण्यातला ट्रेक. रस्ता लांबलचक सर्ळसोट दिसायचा, तर कधी मधेच ऊतार तर मधेच चढ दिसायचा. मैलाचे दगड रंगवणे चालले असल्याने, काहिच माहिती मिळु शकत नव्हती. दुख्खात सुच एवढेच कि रस्त्याला कुठेहि फ़ाटा फ़ुटलेला नव्हता. पोर्णिमेचा आसपासची तिथी असल्याने, चांदण्या तुरळक दिसत होत्या, हे मृग, ते हस्त, तो व्याध, ती तुळा अशी माझी बडबड चालली होती. जी चांदणी वाटायची तिचे एक्दम विमान व्हायचे आणि व्हाईस व्हर्सा.

जंगलातल्या काहि पक्ष्यानी आमच्या येण्याची दखल घेतली होती. पोर्णिमेला डबल ड्युटी केली असल्यानी, पिशाच्य योनीतल्या मंडळीनी आमच्या वाटेला येण्याची तसदी घेतली नव्हती. ( आम्हीपण त्याना मोठ्या मनाने माफ करुन टाकले. आले असते तर आम्हीहि जंगलतोड, राखेचा तुटवडा वैगरे बाबींवर मौलिक चर्चा केली असती कि ) . दोन तास वैगरे पायपिट केल्यानंतर गाव जवळ पास आल्याच्या खुणा दिसत होत्या. वाटेत काहि ” दुरदिवे कळलावे ” दिसले, पण ते हडळीची मशाल किंवा वेताळाची पालखी असे काहि प्रकार असावेत.

शेवटी म्हसा, गावची पाटी दिसली, भाज्यांचे टेंपो भरण्याचे काम चालु होते, त्यातला एक आम्हाला गडाच्या पायथ्यापर्यंत सोडायला तयार पण झाला पण, मग त्याने ऐनवेळी चकमा दिला. मग आम्ही जवळचे देऊळ शोधुन पथार्‍या पसरल्या. शंकराचे देऊळ चांगलेच ऐसपैस होते. सगळेजण स्वेटर, कानटोप्या अश्या जय्यत तयारीत होते. मी थंड रक्ताचा प्राणी असल्याने, मला थंडीच वाजत नाही. माझे एका टिशर्टावर भागते. गिर्‍याने मला त्याची कानटोपी देऊ केली, पण मला खरेच गरज वाटली नाही.

GS1 ने सगळ्याना पहाटे पाच वाजता ऊठवले. सगळी मुले शहाण्यासारखी पटापट ऊठली. ( सॉरी, सॉरी चुक झाली. शहाणे मुले शहाण्या मुलांसारखीच ऊठणार ना. त्यातली का दिड आणि काहि ऊंटावरची असली तरी. )

मग वाईट मुलानी चहा आणि शहाण्या मुलानी दुध पिण्याचा कार्यक्रम आटपला, मग एका जीपवाल्याने आम्हाला गडाच्या पायथ्याशी नेऊन सोडले. वाटेत एक मोठा ग्रुप आम्हाला तिथे जाताना दिसला.

तिथे आम्ही, निसर्ग श्रेष्ठ कि माणुस ? या विषयावर तात्विक चर्चा केली. यावरुन आमच्यात ऊघड ऊघड दोन तट पडले. काहिजणानी निसर्गावर विजय मिळवल्याचा दावा केला, तर काहिनी निसर्ग हाच श्रेष्ठ आहे असे मानले.

तशी गडावर चढायला एक रुळलेली वाट आहे. पण आम्ही ती चुकलो. ” वाटेवर काटे वेचित चाललो ” अशीच आमची अवस्था होती. थोडीफ़ार पायवाट दिसायची पण ती मधेच कुठेतरी लुप्त व्हायची. मग एकमेकाना हाकारे घालुन, वर वर सरकत होतो. ईथे गोची होती ती आधाराला पकडायच्या झाडांची. सध्या तिथे कारवीचे दाट रान माजलय. ( चला हरदासबुवा मुळ पदावर आले. हि कारवी म्हणजे आपल्या संह्याद्रीचे वैभव आहे. दोन मीटरभर सरळसोट वाढणारी हि काठी वनवासी जनांच्या झोपड्यांच्या भिंतीचा आधार बनते. कारवीला दरवर्षी फ़ुलोरा येत नाही, ऊपजात आणि स्थानानुसार तीन, पाच किंवा सात वर्षानी ती फ़ुलते. याबाबतीत मात्र ती नियमित आहे. गुलबट जांभळ्या रंगाच्या टप्पोर्‍या फ़ुलानी सगळा परिसर भरुन जातो. फ़ुलली कि करवी मरते. आणि पुन्हा नव्याने ऊगवते. फ़क्त ती फ़ुलेपर्यंत संयम दाखवणे गरजेचे आहे. संधी मिळाली तर तिचे फ़ोटो काढायची खुप ईच्छा आहे. ईतिश्री कारवीपुराणम संपुर्णम )
पण हि कारवी मात्र अगदी नाजुक असते, आधार घेऊ बघितल्यास ती कटकन मोडते. मुरुडशेंगांची झुडुपे शेंगानी भरलेली होती, पण तेहि तसे नाजुकच झुडुप. वाकेरीचे जीवघेणे काट्यानी आणि करवंदाच्या जाळ्यानी आम्हा सगळ्याना ओरबाडले. पण आधाराला दुसरे काहिच नव्हते. शेवटी कसेबसे आम्ही मुख्य वाटेला लागलो. आता बर्‍यापैकी ऊभी चढण लागली.
वाटेत गिर्‍या आणि त्याच्या नादाने कुल कांडोळीच्या झाडावर चढुन बसले होते. या झाडाचे मुद्दाम खोटेच नाव त्याना सांगितले मी.
मराठीत जरी हा कांडोळ असला तरी ईंग्लिशमधे हा घोष्ट ट्री. याचे खोड पांढरे शुभ्र खोड अंधारात चमकते आणि त्याच्या फ़ांद्या हाडासारख्या दिसतात. या दिवसात याना पिवळा फ़ुलोरा आलेला असतो, आणि त्याला घाण वास येतो. शिवाय त्यातले पाचमुखी लाल फ़ळ अनेक कुसळानी युक्त असते. आणि त्यचा स्पर्ष झाला तर भयंकर खाज येते.
तरिहि हा विषारी नाही. पोटदुखीवर याचा डिंक, कराया गम वापरला जातो. तसेच औषधी गोळ्या एकसंध राहण्यासाठी पण हा वापरतात.

अधुन मधुन आजुबाजुच्या सह्यकड्यांचे सुंदर दर्शन होत होते. हि वाट पण मजेदार आहे. कधी वर कधी खाली, अशी जाते ती. काहि भाग दाट वनातुन तर काहि ऊघड्या जागेतुन जातो. वाटेत कुठेहि पाण्याची सोय नाही. त्यामुळे तहानेने जीव हैराण झाला होता. सुर्य बराच वर चढला होता. २२ डिसेंबर हा वर्षातला सगळ्यात लहान दिवस, आणि या दिवसातले ऊन जर ईतके प्रखर असेल, तर ऐन ऊन्हाळ्यात काय होणार आहे, याची कल्पनाच करवत नाही.

अगदी शेवटच्या कड्यावर चढता चढता मी तिथेच थांबायचा निर्णय घेतला. अर्थशास्त्रातल्या मार्जिनल युटिलिटीचा विचार करता, ईतक्या श्रमानंतर वर गेल्यावर फ़ार काहि हासिल होईल असे मला वाटले नाही, शिवाय जिथे थांबणार होतो, तिथुनहि काहि अप्रतिम दृषे दिसत होतीच. सोबतहि मिळाली. नेहमीप्रमाणे मला सोडुन जाताना, गिर्‍याची चलबिचल झालीच.

खाली भेटलेली माणसे, औरंगाबादहुन आली होती. त्यांचे आणि माझे दुरान्वयाने व्यावसायिक संबंध असल्याचे लक्षात आले, आणि मी त्यांचा शिंदेसर झालो. त्यानी भोजनाला सुरवात केलीच होती, आणि भारताच्या थोर ग्रामीण परंपरेनुसार मला त्यानी आपल्यात सामावुन घेतले. खास मराठवाडी जेवणाचा आस्वाद घेतला. तोपर्यंत ऊन्हे चांगलीच चढली होती. मी त्याना खाली जाऊन सावलीत झोपायचे सुचवले. एवढ्याश्या ओळखीनंतर त्याना मला एकट्याला सोडुन जायचे योग्य वाटत नव्हते, पण मी त्याना आग्रह केला.
नंतर त्या एकाकी कड्यावर तासभर मी एकटा होतो. गालिबच्या, ” चलिये अब ऐसी जगह ” या गझलेतले ” बेदरो दीवारका ईक घर बनाना चाहिये ” म्हणजे काय ते मी अनुभवले.

जेवण नाहितर किमान नाश्ता शिजवायची तयारी होती माझी पण, पाण्याचा तुटवडा होता. तरिहि तिथे शेकोटी करुन सोबत नेलेले बटाटे भाजलेच. तासाभरत सगळे परत आले. सगळ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. पाणी अगदीच अपुरे होते. त्यामुळे भरभर खाली ऊतरायला सुरवात केली. मधले काहि अवघड टप्पे सोडले तर, वाट अगदी सोपी आहे. फ़क्त चढताना आम्ही ती चुकलो होतो.

मी वर जाताना आणि ऊतरतानाहि मला झेपेल अश्याच वेगाने येत होतो. त्यामुळे मी रेंगाळतो. तरिही अर्जुन, केदार माझी जबाबदारी त्यांच्यावर असल्यासारखे मला अखंड सोबत करत होते. माझ्यासारख्या म्हातार्‍या माणसाबद्दल त्यानी खरेच खुप आस्था दाखवली.

खाली ऊतरल्याबरोबर, एक विहिर दिसली. पाणी बघुन माझ्यातला आदिमानव जागा होतो. पोहर्‍याने भरभर पाणी काढुन डोक्यावर ओतुन घेतले. माझे बघुन GS1 ने पण धीर केला. बाकि जणानी, कोणी हात पाय तर कोणी डोके धुवुन घेतले. नैसर्गिक थंड पाण्यातला गारवा हा बोचत नाही. ऊलट तो तल्लखी दुर करतो. पाण्यात पाय सोडुन बसल्याने, खुप छान वाटते मला.

आधी सांगितल्याप्रमाणे जेवणाची व्यवस्था झालीच होती. तांदळाच्या भाकर्‍या, कांदेबटाटे रस्सा, भात, वरण, पापड, कांदा असा छान चवीचा बेत होता. त्याची रंगत वाढवायला काजु होतेच. तिथल्या तिथेच कर्जतपर्यंत गाडीची सोय झाली. वाटेत अनेक गड, किल्ले, परत कधी येणार, असे विचारत होते.




Dineshvs
Tuesday, December 20, 2005 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसा मी GS1 बरोबर नियमित जाऊ शकत नाही, पण या निमित्ताने सगळ्या दुर्गभ्रमणप्रेमी मंडळीना काहि सुचवावेसे वाटते.

GS1 ने हा स्तुत्य ऊपक्रम सुरु केलाय. पण तरिही सगळ्या गडांची अद्यावत माहिती. तिथे कसे जायचे, नेमके अंतर अशी माहिती ऊपलब्ध होत नाही, अजुनहि. या बाबतीत, आपल्याला काहि करता येईल का ? मी ओमानमधे असताना, काहि गोरे प्रवासी असे लेखन करत असत. त्यानी वर्णन केलेल्या काहि जागा मी जाऊन बघितल्या सुद्धा. त्यांची वर्णने ईतकी नेमकी असत, कि अमुक एका जागी, तुमचे मायलेज नोंद करा, तिथुन अमुक ईतक्या किमी नंतर एक ऊजवा फाटा फ़ुटेल. तिथे एक दुकान आहे. मग अमुक एका किमीनंतर चढ लागेल, असे नेमके ऊल्लेख असत. तो लेख वाचुन अगदी बिनघोर तिथे जाता येत असे. तर असे नेमके लेखन आपल्याला करता आले पाहिजे.

आम्ही गेलो होत तिथे संपुर्ण वाटेवर देखील कुठेहि माहितीफ़लक नाही. आपल्याकडचे माहितीफ़लकांची अवस्था कायम दयनीय असते. पत्र्याचे असतील तर ते गंजुन गेलेले असतात.
अश्या शिखरांची एखादी प्रतिकृति, पायथ्याजवळ ठेवता आली. वर चढण्याची वाट त्यात दाखवता आली, तर किती छान होईल. निदान ज्याना वर चढणे अगदीच अशक्य आहे, त्याना निदान दृस्टीसुख तरी मिळेल.

कळसुबाईवर चढताना अवघड जागी शिड्या लावलेल्या आहेत. त्यामुळे शिखर गाठणे फ़ारसे अवघड नाही. तश्या सोयी अनेक ठिकाणी करणे अत्यंत आवश्यक आहे. शिड्या, पायर्‍या, डागडुजी करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच असलेल्या सोयी टिकवणे हेहि आवश्यक आहे. याबाबतीत जेजुरिच्या पायर्‍या ऊल्लेखनीय आहेत. गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे त्या नऊ लाख नाहीत, तर ३७२ आहेत. तसेच अधुन मधुन विश्रांतिच्या पण जागा आहेत.
गोरखगडाचे काहि टप्पे ऊभ्या चढणीचे आहेत. तिथे आधारालाहि काहि नाही. मातीहि ठिसुळ आहे. निदान अश्या ठिकाणी तरी पायर्‍या हव्यातच. या पायर्‍या बांधल्याने गिर्यारोहणातला थरार अजिबात कमी होणार नाही. कळसुबाईला पण अगदी शेवटच्या टप्प्यात एक बर्‍यापैकी रुळलेली वाट आहे, आणि ज्याना थरार अनुभवायचा आहे त्यांच्यासाठी कायमस्वरुपी साखळदंड लावलेला आहे.

ज्याकाळी गडावर मनुष्यवस्ती होती, त्याकाळात तिथे पाण्याची काहितरी व्यवस्था होतीच. आज त्या कुंडांची अवस्था दयनीय आहे. ती साफ़ करणेहि अत्यंत आवश्यक आहे. अगदी आशेने आलेल्या तहानलेल्या जीवाची अश्या ठिकाणी घोर निराशा होते. कर्नाळ्याच्या सुळक्याच्या पोटातली कुंडे अजुनहि सुस्थितीत आहेत. कळसुबाईवर पण पाण्याची सोय आहे.

आपले पुरातत्व खाते निव्वळ पाट्या लावण्यापेक्षा काहि करते का ? हा माझ्या मनात संशय आहे. गोरखगडावर मी जिथे थांबलो होतो, त्या परिसरात अनेक घडीव दगड पडलेले होते. कधीकाळी तिथे पायर्‍या असाव्यात. त्या परत मुळ अवस्थेत बांधण्यात काय गैर आहे. आपल्या डोळ्यासमोर एकेक चिरा निखळताना बघण्यात, त्या खात्याला काय पुरुषार्थ वाटतो ?

अजंठाच्या विकासाला जपान सरकारची मदत झाली, तशी भिकच घ्यायची गरज नाही. आधी अश्या सोयी करा आणि मग खुशाल त्या गडावर जायचे तिकीट लावा. कारण आधी वर्गणी गोळा केली तर त्याचा विनियोग, त्या कामासाठी होईल अशी खात्री, आपल्यापैकी कुणालाच वाटत नाही.




Vinaydesai
Tuesday, December 20, 2005 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, गोविंदा, गिरी... आता तुमच्या ID ना चेहरे आणि स्वभाव चिकटलेले असल्यामुळे मुळ दृश्य डोळ्यासमोर आणायला सोपं जातं... तुमच्या बरोबर एक Trek कधीतरी करीन म्हणतो.. म्हातार्‍याना संभाळण्याची सोय असते ऐकून हुरूप आलेला आहे.... :-)


Champak
Tuesday, December 20, 2005 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही लोक फ़ोटो का टाकत नाहीत?

Dineshvs
Tuesday, December 20, 2005 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय परत जायची घाई केलीस. आपण आपले गेलो असतो. काठ्या टेकत टेकत.

Dhumketu
Tuesday, December 20, 2005 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश चांगली कल्पना आहे.
उसगावात एक appalachian trail वरचा छोटासा ट्रेक केला होता. (
www.appalachiantrail.org ) ह्या लोकांनी ईतिहास नसतानाही ईतके सर्व केले आहे..
ईथे पत्र्याच्या पाट्या लावण्याऐवजी लाकडावर कोरून पाट्या लावल्या आहेत. काही ठीकाणी झाडावर कोरून लिहीले आहे. आता ते बरोबर का चूक हा प्रश्न वेगळा. पण मला ते आवडले होते.
( मध्ये आल्प्स मध्ये प्रशांत खापणे बरोबर छोटासा ट्रेक करायची संधी साधली होती. तिथेही लाकडावर कोरले होते असे वाटते...प्रशांत वा तिथले कुणीतरी माहीती देईलच )

ही ( http://www.esakal.com/20051220/pune5.html ) बातमी वाचली असेलच.
मध्ये रायगडावर आम्ही तिथल्या काही लोकांना विचारले होते की आम्ही ईथे जे पडले आहे ते बांधू शकतो का...पण त्याला पुरातत्वखात्याची परवानगी लागेल असे सांगीतले. पण त्याशिवाय खूप काही दुसरे करू शकता येते हे आता लक्षात येते.. त्यावेळी चूक झाली.. ..तेव्हाच काहीतरी सुरु करता आले असते ही टोचणी सदैव लागून राहते... तेव्हाचा ग्रूप केव्हाच विखुरला.. असो..

दिनेश जिथे थांबला होतात तिथून गुहा दिसत होती का?
माझ्या आठवणीप्रमाणे पाणी दोन ठीकाणी आहे. मुख्य चढ संपून एका पठारावर येतो तिथे ( मच्छिंद्रगड दिसत नाही... त्याच्या आणी आपल्या मधे गोरखगडाचा पहीला कातळ येतो.. तिथे पहील्या कातळातील पायर्‍या दिसतात.. त्या गुहेत लुप्त झाल्यासारख्या वाटतात ) तो कातळ सूरु होण्याअगोदरच ( to be specific. एक पुरुष कातळ चढल्यावर्) डावीकडे वाट जाते.. ती एका टाक्याकडे नेते.
दुसरे ठीकाण बहूतेक तो कातळ चढून गेल्यावर आहे. ईथून मच्छिंद्रगड दिसतो. आणी मग शेवटचा टप्पा सूरू होतो.


Cool
Wednesday, December 21, 2005 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सह्याद्रीच्या वेडावनार्‍या रांगा,


sahyadri

सर्व फोटो दिनेश यांनी काढले आहेत, मी त्यांच्या वतीने post करतोय.


Cool
Wednesday, December 21, 2005 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


समोर दिसणारा सिद्धगड..

Siddha

Cool
Wednesday, December 21, 2005 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आणि शेवटी, गावातुन दिसणारा गोरखगड उजवीकडे, आणि मच्छींद्रगड

gorakh

Maetrin
Wednesday, December 21, 2005 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yaar,khoopach jaLaylaa hotay.......:-(((
barech divas zhale Indialaa jaaun.



Dineshvs
Wednesday, December 21, 2005 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो धुमकेतु, मी जिथे थांबलो होतो तिथुन एक चौकोनी गुहा दिसत होती, पण तिथे जायला वाट सापडत नव्हती.

कळसुबाईवर शिड्या कोणी लावल्या कल्पना नाही, पण त्यामुळे खरेच सोय होते. आता त्या जरा तुटत आल्यात. तरिहि काम भागतेय. कर्नाळ्याचा कठडा मात्र आता तुटलाय.
मी मागे लिहिले होते, कि रायगडावरच्या बाजाराचे कल्पनाचित्र सुद्धा मी कधी कुठे बघितले नाही. राज्याभिषेकावरची अनेक बघितली, त्यातली काहि अपमानकारक पण आहेत. ( कारण एका चित्रात काहि जण चक्क राजांकडे पाठ करुन टोपीकरानी आणलेला नजराणा बघताहेत. ) तरिहि त्या चित्रातले खांब, पडदे निदान त्या काळाचा भास तरी निर्माण करतात. आपल्या कुठल्याच गडाचे असे चित्र मी बघितले नाही.

पायर्‍या वैगरे खरेच मनावर घ्यायला हव्यात. GS1 वाचतो आहेस ना ?



Gs1
Thursday, December 22, 2005 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



किल्ल्यांबाबत करायची कामे

दिनेश तुझ्या पोस्टमध्ये तू ट्रेक वर्तुळात नेहेमी चर्चिले जाणारे महत्वाचे मुद्दे मांडले आहेस.

त्यातल्या अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्याचा प्राधान्यक्रम आणि आपली क्षमता लक्षात घेउन आपण काय करायचे ते ठरवता येईल असे वाटते.

१. नेमके लेखन व नकाशे वेब अथवा पुस्तकरुपाने : किल्ल्याची माहिती, पहाण्यासारख्या गोष्टी, चढाईचे मार्ग, मुक्कामाची, पाण्याची सोय या गोष्टी लेखन आणि नकाशा या स्वरूपात बर्‍यापैकी उपलब्ध आहेत. एकत्र नाहित हे मात्र खरे. आनंद पाळंदेंच्या पुस्तकात नकास्षावरून मार्गाची कल्पना येते. प्र. के. घाणेकर, गोनिदा, पाटणकर, गुणाजी वगैरे पुस्तकातून वृत्तांत वाचता येतात आणि बरीच माहितीही मिळते, अनेक ट्रेकर्सचे ब्लॉग, ट्रेकक्षितिजसारख्या साईट्स यातूनही बरीच मदत होते. कधी कधी हे सर्व तपशील एकमेकांशी जुळतातच असे नाही. पण जे मिळते ते पुरेसे आहे, आणि एक्सप्लोरेशनचा आनंद हवा तर थोडी तरी अनिश्चितता हवी असे मला वाटते.

२. पायथ्याशी माहितीफलक, नकाशा : हे काही गडांखाली ट्रेक संस्थांनी पुढाकार घेउन केले. आपणही करू शकू. एका गडासाठी तीन हजार रुपये खर्चात काम होउ शकेल फ़्लेक्सवर प्रिंट केलेल्या आठ फुटी नकाशाचे.

३. मार्गावर खुणा, फलक : मार्गावर बाण काढणे पुरेसे आहे. महत्वाच्या ठिकाणी फलक लावता येतील. हेही आपण करू शकू असे काम आहे.

४. शिड्या, पायर्‍या : दुर्गावर जाणे हे सहलीसारखे सोपे करू नये असे मला वाटते. नाहीतर सिंह्गडासारखी पार वाट लागायला वेळ लागणार नाही. पण जे आहे ते ढासळू नये म्हणून त्यावर उगवणारी झुडपे तोडण्याचे काम आपण करू शकतो. काही संस्था अवघड जागी आधाराला खोबणी करतात, ते शिडी वा बांधीव पायर्‍यांपेक्षा अधिक नैसर्गिक व उपयोगी वाटते. दोन बोटे अडकतील एवढे छोटे भोक कातळात योग्य जागी केले तरी पुरते. ते करणेही तसे सोपे आणि आपल्या आवाक्यातले आहे.

५. पाण्याची सोय : जवळ जवळ प्रत्येक किल्ला बांधतांना पाण्याची सोय हा मुख्य मुद्दा पाहिला गेला आहे. ती टाकी स्वच्छ ठेवणे, गाळ काढणे ही कामे करू शकतो, पण थोडे मार्गदर्शन लागेल जाणकाराकडुन.

६. गडाची चित्र : मस्त कल्पना आहे. पुण्यात एकाने फक्त गडांच्या वेगवेगळ्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते. मायबोलीवर फ, रचना, जुई असे अनेक चांगले चित्रकार आहेत, ते सहभागी झाले तर हेही करणे सहज शक्य आहे. बाकी वाटेचे, प्रत्येक भागाचे वगैरे फोटो काढुन ठेवले तर त्याचाही उपयोग होईल. नुकतेच एक मोठे प्रोजेक्ट माझ्या एका मित्राने हाती घेतले आहे, २५० किल्ल्यांचे व्हिडिओ शुटिंग, फोटो, नकाशे वगैरे..

अजुन काही गोष्टी म्हणजे

१. गडाची स्वच्छता, कचरा गोळा करून खाली आणणे, भींतींवरची आधुनिक कला पुसणे.

२. बर्‍याच किल्ल्यांच्या कुशीत वनवासी पाडे आहेत, त्यांचा सहभाग या सगळ्यात घेउन त्यांना येणार्‍यांकडुन थोडेफार उत्पन्न मिळेल असे काही करता येईल.

एक चांगले आहे की ट्रेकिंगला नेणारे बरेच ग्रुप आपापल्या परीने यातले काही ना काही काम करतांना दिसून येतात.

सरकारने किल्ल्यांचा विकास करायची योजना आखली आहे. दहा कोटी खर्च करणार आहेत. पण बहुतेक सगळा पैसा हा रस्ता, स्मारके यातच जाईल असे दिसते.










Bee
Thursday, December 22, 2005 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोविंदा खूपच छान योजना आहेत तुझ्या. खरच अमलात आणण्याचा प्रयत्न करा. माझ्या शुभेच्छा!

दिनेश, काल तुम्ही पाठवलेली सगळी दृष्ये पाहिलीत. I can feel the lovely atmoshphere and the beauty out there!

आपल्या भारतात काय बघण्यासारखे नाही!! फ़क्त देर आहे थोडे नीट नेटके Touristic करण्याची.


Limbutimbu
Thursday, December 22, 2005 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीयस, जिओ मेरे लाऽऽल!
अरे दहा बारा वर्षान्पूर्वी गडकिल्ले लेण्यान्चे स्लाईडशो करताना महाराष्ट्रातील त्या त्या किल्ल्याचे लेण्याचे नेमके स्थान दाखविता यावे म्हणुन महाराष्ट्राचा नकाशा भिन्तीवर रन्गवुन त्याची स्लाईड काढण्यासाठी एकदा मी माझ्या घरातली एक सलग भिन्त पान्ढर्‍या रन्गाने रन्गविली होती असे आठवते, पण अन्य कार्यबाहुल्ल्यामुळे ( की कार्यबहुलामुळे ) तो प्रोजेक्ट तसाच वळचणीला,उप्स, वळचणीला नाही तर भिन्तीलाच टान्गुन राहीला! :-(
नन्तर गडान्च्या प्रतिकृती करण्याचे दोन तीन अयशस्वी प्रयत्नही केले!
आता तुम्ही लोक्स म्हणता तसच पुन्हा एक किडा डोक्यात वळवळतो हे, गुगल अर्थ वरुन ते ते गड शोधुन काढुन आयते हवाई फोटो घेवुन त्याच्या जोडीला रस्ते, पायवाटा यान्चे अद्ययावत नकाशे उपलब्ध करुन देता येतिल असे वाटते, IT तन्त्रज्ञानामुळे हे आता सहज शक्य होइल! ( हे जाणवले म्हणुनच मी आधिचा स्लाईडकरता भिन्त रन्गविण्याचा उपद्व्याप सान्गितला )
पण दुर्दैवाने मला गुगल अर्थ उपलब्ध होवु शकत नाही कारण आमचे डब्बे पीसी!
मध्यन्तरी दिपूनी कुठलीतरी लिन्क दिलिहोती त्यावरुन तो एक्स्प्रेस हायवेवरुन तरन्गत वाशी पर्यन्त पोचला होता असे कळले तर मी त्याच लिन्क वरुन माझ गाव शोधुन काढल अन एक दोन किल्ले देखिल पण ती लिन्क अन्तराळात फारच वरुन तरन्गत असल्याने स्पष्टता खुपच कमी होती म्हणुन नाद सोडुन दिला!
तरीही अजुनही मनात हे की तालुकापातळीवर त्या त्या तालुक्याच्या नकाशात महत्वाची स्थळे दाखविता येतिल व हे काम HTML मधेही करता येइल
मात्र त्यासाठी माहितीचा प्रचण्ड साठा वर्गवारी करुन मिळवला पाहीजे व त्यातिल गरजेचे तेवढेच प्रकाशित केले पाहीजे
अन त्यासाठी त्या करा करा करा म्हणुन करकरणार्‍या दिपूलाही कामाला लावले पाहीजे! नुस्ता घरकोम्बडा झाला हे! DDD


Indradhanushya
Thursday, December 22, 2005 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, GS , LT एका जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलात... छान :-)

GS ... मुंबई आणि डोंबिवलीचे trekers गडांच्या डागडुजी विषयी बरेच प्रयत्न करताना दिसतात, परंतू हे सगळे असंघटीत असल्याने अपेक्षित यश हाती लागत नाही. तसेच पुणे आणि इतर राज्यातल्या इतर भागातूनही मदतीचा ओघ वाहत असतो.
वर जे मुद्दे मांडले आहेस ते सगळेच आपापल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढुन पुर्ण करणे शक्य नसले तरी कठिण आहे. पण जर का या विखुरलेल्या trekers नां आणि त्यांच्या संघटनानां एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर हे अवघड काम वेगवेगळ्या टप्प्यात पार पाडता येईल. फ़क्त सगळे धारकरी एकाच छत्राखाली एकत्रीत होणे गरजेचे आहे.
आजच्या IT च्या युगात एखाद्या website द्वारे किंवा trekshitij च्या सहाय्याने अश्या योजनांची शक्यता पडताळून पहाणे शक्य आहे.



Limbutimbu
Thursday, December 22, 2005 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.... सगळे धारकरी एकाच
अब्बे धारकरी काय?
धार म्हणल की पहिल्या धारेची... ...!
की तुला यसजीवरचे बुधवारकर्स आठवले?
ग्येला बाजार गडकरी तरी म्हणना! :-)


Dineshvs
Thursday, December 22, 2005 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते आपण एखाद्या गडाचा एखादा दिवस ठरवुया. त्या दिवशी तिथे सगळ्यानी जमायचे. आणि त्यापुर्वी, नीट योजना आखुन एकेक काम पुर्ण करायचे. यात अनेक ग्रुपनी सहभागी झाले पाहिजे. एकाच फ़ेरीत सगळे काम होईल, हे शक्यच नाही. म्हणुन सगळ्यांचा सहभाग हवा.
अशी एखादी योजना, जी सहज आवाक्यातली असेल, तर माझा खारीचा वाटा मी निश्चितच ऊचलेन.

GS1 तु म्हणतो आहेस ती पुस्तके मी वाचली आहेत. पण तरिही मला ओमानमधले लेख जास्त नेमके वाटतात. असे लेखन तु नक्कीच करु शकशील. लेखन करायचेच म्हणुन एखादी ट्रिप आखुया.

स्थानिक लोकाना, पण काहि मार्गदर्शन करता येईल. त्यामुळे ते वाटाडे म्हणुन सोबत करु शकतील. आपण गेलो होतो तेंव्हा, अतिरिक्त सामान खाली ठेवायची फ़ारच छान सोय झाली होती.


Dhumketu
Thursday, December 22, 2005 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीएस, तुझे पोस्ट culture मध्ये हलवशील का? (अजूनही मला वाटते की हे सर्व वर्णन/अनुभवकथन तिकडेच प्रस्तुत ठरेल... असो.. vc व्हायचा ईथे)

१. नेमके लेखन व नकाशे वेब अथवा पुस्तकरुपाने : खूपशी पुस्तके बाजारात असल्यामुळे त्यात पडू नये असे माझेही मत आहे.

२. पायथ्याशी माहितीफलक, नकाशा : करता येईल. माझ्या मते जर आपण पुस्तकांच्या लेखकांना विचारले तर ते त्यांचे नकाशे कॉपी करायला देतील.
माहीतीफ़लक: जर आपण गडांच्या पायथ्याशी असलेल्या शाळेशी सपर्क साधला तर ३०% शाळा तरी मुलांमार्फ़त काम करून घेऊ शकतील.

जर कोणास आठवत असेल तर राजगडावर एक भला मोठा गडाचा नकाशा होता.. गडकर्‍याच्या कोठीबाहेर लावलेला होता. पन त्याचे काही काळानंतर तीन तुकडे झाले. गडकरी म्हणाले होते की सरकार तो परत लावेल...पण सरकार ने तो ताब्यात घेतला आणी मागची ८-१० वर्षे त्यवर कामच सुरू आहे असे दिसते.
असेही नकाशे आपल्याला बसवता येतील. फ़क्त स्वस्तात टिकावू फ़लक कसे बसवायचे हा प्रश्न आहे. आजकाल जाहीरातींसाठी एक प्रकारचे प्लास्टीक वापरतात पत्र्यांऐवजी त्याचीही चौकशी करता येईल पण माझ्या माहीती प्रमाणे ते जरासे महाग जाते.

३. मार्गावर खुणा, फलक, दिशादर्शक बाण: आपण रेडीयम वा चमकणारे काही मिसळू शकतो का की जे रात्री चमकू शकेल?

४. शिड्या, पायर् ०द्या : जीएसला अनुमोदन.

५. पाण्याची सोय: आजकाल पाण्याची टाकी साफ़ केली तरी लगेच खाली होतात कारण वर्दळ. बुझली गेलेली टाकी शोधून ती साफ़ केली तर काही काळ हा प्रश्न सुटेल असे वाटते.
मध्ये राजगडावर गेलो होतो तेव्हा एक ग्रुपने सर्व टाकी मुळापासून साफ़ केली होती. उन्हाळ्यात त्या टाक्यातील सर्व पाणी काढुन कोरडी केली होती आणी साफ़सफ़ाई चालू होती.

१. गडाची स्वच्छता: गडावर ईतक्या तर्‍हेचे लोक येतात की त्यांना घाण करू न देणे हे अवघड पडते. आणी एखादा ग्रुप साफ़ करेलही पण त्यालाही मर्यादा असतात. ह्यात जर पायथ्याच्या गावातील लोकांनी काही केले तरच शक्य आहे. जसे की अशा टवाळखोरांना दम भरणे. प्लास्टीक चेक करणे.
मध्ये राजगडाच्या गडगर्‍यांना एका टोळक्याने हाणले कारण काय तर त्यांना गडावर दारू पिण्यासाठी मज्जाव केला. तेव्हापासून गडगरी जास्ती अध्यात मध्यात नसतात. अशा काही गोष्टी जर पायथ्याच्या लोकांनी पुढाकार घेतला तरच टाळू शकतात.
तरीपण आपल्या परीने आपण हे काम करायलाच पाहीजे.


LT, गुगल अर्थ : ह्या (
http://www.amitkulkarni.info/pics/ ) वर जा आणी तिथली एक kmz फ़ाईल उतरवून घे. त्यात खूपशे किल्ले आहेत. पायवाटा दाखवण्याचेही काम ईथे सुरू आहे ( http://www.esakal.com/20051220/pune5.html )

पाणी शोधणे वा टाके शोधणे: कोणी पायाळू आहे का ईथे? चेष्टा नाही पण पायाळू माणसे पटकन जमीनीखालचे पाणी शोधू शकतात ह्यावर माझा विश्वास आहे.
मी गिरिदर्शन ह्या ग्रुप बरोबर जायचो. तिथल्या एका मित्राने मला ही पधत सांगीतली आहे. पण तो म्हणाला की बनेशवरच्या गोमुखाचे पाणी कसे जाते हे शोधून काढले होते.
सोललेला नारळ घ्यायचा. फ़क्त शेंडी ठेवायची. आता मला हे आठवत नाही की डोळे शेंडीखाली ठेवायचे का उघडे ठेवायचे. तो नारळ उजव्या तळहातावर आडवा ठेवायचा. उजवा तळहात जमीनीला समांतर. नारळाची शेंडीही पुढे पॉईंट केली पाहीजे. असा नारळ घेऊन चालले की जेव्हा नारळाखाली पाणी येईल तेव्हा तो उभा राहतो.
मी प्रयत्न करून पाहीला होता पण तसे काही अनुभवास आले नाही. पण कोणास आले तर त्याला घेऊन जाऊ पाणी शोधायला.


Moodi
Thursday, December 22, 2005 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश आणी जी एस धुमकेतुच्या अन तुम्हा दोघांच्या सुचनाही अतिशय उत्तम आहेत.
मला काही सुचवावेसे वाटतय, राग मानु नका, मला ट्रेकिंगचा अनुभव नसला तरी जे सांगावेसे वाटतेय ते सांगते.

तुमच्यासारखे नियमीत ट्रेक करणारे निसर्गप्रेमी गडकरी महाराष्ट्राभर विखुरलेत, अश्यातील काहींच्या वेब साईटस पण आहेत तसेच काही जण स्थानिक पेपर, मित्र मंडळी अश्या विवीध गोष्टींमार्गे जाहिरात होऊन एकत्र येतात. त्यावेळी अशाना एकत्र केले गेले अन त्या उत्साही संघटना अन तुम्ही सर्व एकत्र आले तर मोठा ग्रुप तयार होइल, अन यातील सर्व नक्कीच सहभागी होतील या स्तुत्य उपक्रमात.

पाहिजे तर त्याना त्यांच्या वेब साईटवर इ मेल करुन संपर्क साधा, सकाळ वगैरेत वर्गणी एकत्र करुन जाहिरात द्या, युथ हॉस्टेल वगैरे ग्रुपची शक्य असल्यास मदत घ्या. सर्वानी चहुकडुन एकत्र येणे महत्वाचे. अन जर यात काही गडप्रेमी पोलीस वगैरेत नोकरीला असतील तर आणखी चांगले, लोकाना थोडा वचक तरी बसेल. आजकाल पोलीसाना कुणी घाबरत नसले तरी प्रयोगाला काय हरकत, अर्थात तो गडप्रेमी पोलीस पण मोकळ्या स्वभावाचा हवाय अन तुमच्या मताशी पण सहमत होणारा पाहिजे.

गावातील लोकांचा अन पायथ्याकडील लोकांचा सहभाग तर सोन्याहुन पिवळे कारण काही टारगट टोळकी त्याना पण त्रास देत असतीलच की, मोळी एकत्र बांधा.


Chinnu
Thursday, December 22, 2005 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप चांगली चर्चा आहे. मूडी तुझे एकत्र मोळी बांधणे एकदम पटते बघ. लोकहो, मला चित्र रंगविणे फ़ार जमत नही, पण मला sketches काढायला आवडते. जर मझ्यालायक काहीही काम असेल तर जरूर सांगा.
जे गडाविषयक पोस्ट मायबोलीवर टाकता, त्यातच तुम्हाला त्या गडासंबधी द्यायच्या सुचना पण मांडल्यास, तो गड चढु इछ्छिणार्यांन्ना लिखाण माहीतीपुर्वक ठरेल. माझ्या शुभेछछा!


Moodi
Thursday, December 22, 2005 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी प्रेमीनो चर्चा चाललीच आहे तर इथे बघा.

http://www.loksatta.com/daily/20051223/mv02.htm

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators