|
Dineshvs
| |
| Monday, July 17, 2006 - 5:26 pm: |
| 
|
गेली अनेक वर्षे, ठोसेघरच्या धबधब्याचा उल्लेख पेपरमधे वाचत होतो. तिथे झालेले अपघात, कोसळलेल्या दरडी, नव्याने बांधलेली गॅलरी, असे बरेच काहि वाचत होतो. त्यामुळे तिथे जायचा ध्यासच घेतला होया मी. तसे सातारा परिचीत आणि अपरिचीतदेखील. लहानपणापासुन आजोळी जाताना, आमची एस्टीचा जेवणाचा थांबा म्हणुन हे गाव माहीत. ( त्याकाळी रातराण्या, म्हणजेच रात्री धावणार्या यस्ट्या नव्हत्या. ) पुढे पुण्याला वैगरे जाताना ते गाव लागायचेच पण मुद्दाम थंबणे व्हायचे नाही कधी. अजिंक्यतारा मात्र नेहमी ओळख दाखवत असायचा. आपला अजय तिथला आहे, असे समजल्यावर तर मी त्याची पाठच धरली होती. थांबा जरा पाऊस पडु द्या, बांधार्यात पाणी भरु द्या, असे सांगुन तो मला धीर देत होता. शेवटी एकदा दरडहि कोसळली. मग मात्र आम्ही जायचेच असे ठरवले. आणखी कुणालाहि बोलवा, असे उदार मनाने त्याने सांगितलेहि होते, पण माझ्या वेळात ईतराना वाईवरुन सातारा करायला लावणे तसेच ( ट्रेक वाटणार नाही, अश्या ) ट्रेकला यायची गळ कुणाला घालणे मला जमले नाही. गेल्या शनिवारी संध्याकाळी गोव्याहुन निघालो. बर्याच वर्षानी फोंडा, दाजीपुर, राधानगरी अश्या मार्गाने आलो. पुर्वी सगळ्याच गाड्या याच मार्गाने जात असत, आता मात्र बहुतेक गाड्या करुळच्या घाटातुन जातात. ( गोव्यातुन घाटावर जाण्यासाठी, म्हणजेच बेळगाव वा कोल्हापुरला जाण्यासाठी, अंबोली, अनमोड, चोर्ला, तिलारी, करुळ म्हणजेच गगनबावडा, भूईबावडा, आणि फोंडा असे सात पर्याय आहेत. चोर्ला घाट आता रस्ता खराब झाल्याने बंद आहे. अंबोली घाटातल्या धबधब्याची अति जाहिरात झाल्याने, आता तिथे हैदोस सुरु असतो. काल तब्बल साडेतीन तास वाहतुक खोळंबली होती. तिलारीचा घाट फ़क्त त्या प्रकल्पासाठीच बांधला होता. त्यामुळे त्या माथ्यावर कुठलेहि गाव नाही. प्रकल्प रखडल्याने, तिथल्या कर्मचार्यांच्या वसाहती, ओस पडल्या आहेत. पण तरिही तो घाट चढणे येर्या गबाळ्या चालकाचे काम नाही. १०० मीटर्ससुद्धा धड सरळ रस्ता नाही तिथे. खाजगी गाड्याना तशीहि परवानगी नाही तिथे. एस्टीचे जिगरबाज ड्रायव्हर मात्र कुशलतेने गाड्या नेतात तिथुन. अनमोड मात्र हिरवागार आहे. चोर्ला, अंबोली, करुळ आणि भूईबावडा या घाटांबद्दल मी लिहिलेच होते. ) फोंडा पण तसाच रौद्रभीषण आहे. लहानपणी तो मला हमखास लागायचा. त्यावेळचा उन्हाळा, आंबे, फणस, सुके मासे आणि डिझेल यांच्या एकत्र वासाने डोके भणभणायचे माझे. यावेळी मात्र मी खर्या अर्थाने तो एन्जॉय केला. फोंडा गाव सोडले कि तीव्र चढाने गाडी वर वर जात असते. परवा रात्र तशी अंधारीच होते. पण चांदण्याची उणीव काजव्यानी भरुन काढली होती. त्यातले काहि बसमधे पण घुसले होते. जसा जसा घाटमाथा आणि दाजीपुर जवळ आले तसे तर सगळीकडे ढगच भरुन राहिले होते. अजिबात व्हीजीबिलीटी नसताना एशियाडच्या कुशल चालकाने लीलया तो भाग पार केला. राधानगरी स्टॅंडच्या बाहेर असलेली हिरड्याची दोन झाडे लहानपणापासुन बघत आलोय. आजहि ती शाबुत बघुन खुप चान वाटले. तसा हा भाग अभयारण्य आहे. त्या दाट जंगलाची मजा रात्रीमुळे घेता आली नाही. कोल्हापुरला जाईपर्यंत मध्यरात्र उलटुन गेली होती. तरिही कोल्हापुरात जाग होती. रंकाळ्याची पातळी बरीच वाढलेली होती. त्यातल्या जलपर्णी बाहेर काढुन त्याचे प्रचंड ढीग केलेले होते. ( या जलपर्णीने अगदी उच्छाद मांडला आहे सगळीकडे. तशी तीहि परकीयच, पण आता सगळ्या जलाशयात दिसते. काडीचा उपयोग नसतो तिचा, पण सगळा पृष्ठभाग व्यापत असल्याने, मासे व ईतर जलचराना अपायकारकच असते. ) कराडच्या स्टॅंडवर तर शुकशुकाटच होता, पण त्यामानाने सातार्याला बर्यापैकी जग होती. मी अगदी पहाटेच तिथे पोहोचलो, ईतक्या पहाटे पहाटे अजयला उठवणे प्रशस्त न वाटल्याने, तिथेच आडवा झालो. बरोबरची पुस्तके वाचुन काढली. मग सकाळच्या वर्तमानपत्रांच्या गाड्या येऊ लागल्या. त्या सगळ्यांचे शिस्तबद्ध काम बघता बघता पावणेपाच झाले, मग अजयला फोन केला. तो माझी वाट बघत जागतच होता, मग त्याच्या बरोबर त्याच्या घरी गेलो. त्याच्या घराचा परिसर अत्यंत रम्य आहे. सगळ्या गडांचे दर्शन घर बसल्याच होते. परसात आंबा, सिताफळ, जांभुळ, लिंबु बरोबरच कोरफड, वाळा, आघाडा, गवती चहा अशीहि झाडे आहेत. आणि सगळ्यात अप्रुप्राचे म्हणजे अंजीरानी लगडलेले झाड आहे. ( झाड अंजीराचेच आहे. ) जास्त वेळ न घालवता, आम्ही बाहेर पडलो. त्यापुर्वी त्याच्या आईने छानसा नास्ता दिलाच होता. नुकतीच दरड कोसळल्याने, ठोसेघरला एस्टी जात नव्हती. रिक्षा किंवा ट्रॅक्स हाच पर्याय होता. दोघेच असल्याने रिक्षाच केली. वाटेत उनपावसाचा खेळ सुरु होताच. तसे उन फारसे नव्हतेच, पाऊस अधुनमधुन थांबत होता, असेच म्हणायला हवे. साधारण २५ किलोमीटरवर धबधब्याची पाटी दिसते, पण त्यापुढे काहि पवनचक्क्या दिसत होत्या, म्हणुन जरा पुढे गेलो. तिथे तर पावसाने रिक्षालाच काय आम्हालाहि झोडपुन काढले. पवनचक्क्यांच्या अगदी जवळ जाऊनदेखील, आम्हाला पावसाच्या मार्यामुळे, फोटो काढता आले नाहीत. मग परत धबधब्याकडे आलो. तिथे एक चहाची टपरी आहे. तिथे गरमागरम चहा घेतला, आणि धबधब्याकडे वळलो. पहिल्यांदा जिथे गेलो तो टप्पा धबधब्याच्या वरचा होता, तिथुन खाली प्रचंड वेगाने पाणी पडत होते. पण त्याने धबधब्याचा अंदाज येत नव्हता. संरक्षक कठड्यामुळे खाली उतरता येत नव्हते. अजय मला सारखे उडी मारुन जाऊया असे सुचवत होता, पण मी तयार नव्हतो, कारण तशी जागा निसरडी होती आणि तिथे धोक्याचे फलक लावले होते. खरे तर तिथल्या दृष्याने मन भरत नव्हते. मनातल्या कल्पनेशी तुलना करता तिथे काहितरी न्युन जाणवत होते. तिथुन पुढे जरा गेल्यावर मला आणखी एक धबधबा दिसला, मग मात्र मी पण उडी मारुन कच्च्या वाटेवरुन चालु लागलो. सुरक्षित वाटतय तो पर्यंत जाउ असे म्हणत दोघे पुढे निघालो. तो धबधबा आणखी जवळ जवळ दिसु लागला, पण तरिही त्याचे पुर्ण दर्शन होत नव्हते. म्हणुन आम्ही आणखी पुढे गेलो. आणि अहो आश्चर्यम, आम्ही चक्क नव्याने बांधलेल्या गॅलरीकडे पोहोचला. तिथे यायला व्यवस्थित रस्ता आहे हेहि नंतर कळले. तिथला नजारा तर अप्रतिमच होता. डाव्या कोपर्यात मुख्य धबधबा, त्याच्या बाजुला आणखी एक धबधबा, शिवाय समोर आणखी एक धबधबा अशी चंगळ होती. तिथली गॅलरी अगदी नेमक्या जागी आहे. अगदी शेवटपर्यंत कडा दिसतो. आपण धबधब्याच्या नेमके समोरच असतो. त्या गॅलरीची उंची पण बर्यापैकी असल्याने, लहान मुलाना फारसे रेलता येणार नाही. ( कुल, गिरु सारख्या अगदी लहान मुलांसाठी त्या भिंतीला झरोखे पण आहेत. ) पण आम्ही तिथे पोहोचलो आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. अजयच्या आईने बजाऊनदेखील आम्ही छत्री वैगरे आणलीच नव्हती, त्यामुळे भिजत पाऊस थांबण्याची वाट बघण्याशिवाय काय करणार. झाडाखाली ऊभे राहण्यात पण अर्थ नव्हता, कारण झाडे होती ती डोंगरी आवळ्याची आणि महारुखाची. तरीहि त्यातले बारिकसे आवळे मी गट्टम केलेच. ( अति तुरट लागले ते ) आणि महारुखाची चौधरी फळे हवेत भिरकावण्याचा बालिश खेळ देखील खेळलो. भरपुर कोसळुन पाऊस थांबला. आता आम्हाला हवे तसे फोटो मिळाले. मग परत रुळलेल्या वाटेने वर आलो. वाटेत एका छोट्याश्या खोलीत तिथल्या परिसरातील जीवसृष्टी, फुले निसर्ग यांच्या प्रकाशचित्रांचे छोटेसे प्रदर्शन बघितले, अभिप्राय लिहिला. तिथल्या फोटोंचा दर्जा खास नाही, पण मुळ विषयच देखणे असल्याने, परत यायचा निश्चय तिथेच करुन टाकला. रिक्षावाल्याला थांबवुन ठेवला होता. परत उसळपाव आणि चहा घेऊन परतीच्या वाटेला लागलो. अजुनहि माळावर फुले नाहीत. पण आषाढ आमरीची चांदण्यांची चादर मात्र सगळीकडे अंथरलीय. आकाशाच्या निळ्या गादीवरुन अलगद ओढुन तिला हिरव्यागार गालिच्यावर पखरलेय. बदामाकृती एक वा दोन पाने. बोटभर लवचिक देठ आणि एक ते पाच या संख्येत डुळणारी पांढरी नाजुक फुले. लौकिक संपत्ती ती एवढीच, पण सगळे आंगण तिलाच आंदण दिल्याप्रमाणे ती जागच्या जागी झुलत थरथरत असते. वाटेतच सज्जनगड लागतो. रिक्षावाल्यावर आम्ही चांगलेच ईंप्रेशन पाडल्याने, तो आम्हाला गडाच्या पायथ्याशी सोडायला तयार झाला. चौकशी करता तो शिंदेच निघाला. अगदी थोड्या पायर्या चढुन आपण सज्जनगडावर पोहोचतो. गडावर बर्यापैकी वस्ती आणि बांधकामे आहेत. माझा प्लॅन ठरल्यापासुन GS1 ला फोनाफोनी सुरुच होती. सकाळी त्याला झोपेतुन उठवण्याचे पातक पण माझ्याच माथी लागले होते. गडावर प्रसादाला यायचे आम्नत्रण पण देऊन झाले होते, पण माझी जातीने गडावर पावलो तरी खाश्यांच्या स्वार्या मात्र मजल दरमजल करतच होत्या. गडावर प्रसादाची म्हणजेच जेवायची छान सोय आहे. पुरुषाना ऊघड्या अंगाने बसावे लागते. सम्र्थांच्या सानिध्यात असल्याने, भोजनापुर्वी नामःस्मरण केले जाते. भात आमटी, वांगे बटाटा भाजी, कारळ्याची चटणी आणि गव्हाची खीर असे साधे आणि चवदार जेवण जेवलो. समर्थांच्या वापरातल्या बर्याच वस्तु, म्हणजे पादुका, वल्कले, पाण्याचे हंडे, पलंग, काठ्या वैगरे तिथे बघायला मिळात मग गडाचा रमणीय परिसर बघुन घेतला. आजुबाजुचे अने डोंगर गावे सुंदर दिसत होती. नेहमीप्रमाणे अर्धवट अवस्थेत असलेली धरण योजना होतीच. आतापर्यंत आमची सहल अगदी आरामात आणि ठरलेल्या वेळेत पार पडली होती. जरा कड्यावर टेकलो आणि गावातुन एस्टी आल्यावरच गड उतरलो. गडावर आणि वाटेतहि काहि छान पक्षी दिसले, पण फोटो काढण्याएअतके निवांत बसत नव्हते ते. तिथुन एस्टीने गावात आलो. सकाळी जाण्यापुर्वी अजयचा बागेत ज्या कळ्या बघितल्या होत्या, त्या उमलल्या होत्या. त्यांचे फोटो काढले आणि परत निघालो. कोल्हापुरला परत अंघोळ वैगरे आटपुन आज सकाळी रहाटगाडग्याला जुंपुन घेतले. अजयशी फोनवर बोललो होतो, पण प्रत्यक्ष भेट कालच झाली. माझी बडबड, दादागिरी आणि पर्यायाने मला सहन केले, म्हणजे मुलगा फारच सहनशील आहे, अगत्यशील पण आहे, त्यामुळे त्याच्या स्वभावाचा फायदा घेत आणखी काहि सहली करीन म्हणतोय. ता. क. फोटो माझ्या बीबी वर आहेत.
|
Bee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 3:40 am: |
| 
|
दिनेश, निसर्गपर वर्णनात तुमचा हात कुणीच धरू शकत नाही.. एक सईला सोडल तर. पण ती कुठे हरवली की कुणी तिला चोरल माहिती नाही. खूप सुंदर लिहिल आहे पण खूप छळल मात्र. का ते सांगायची गरज नाही.. ते वाळवंटात राहणार्यांना माहिती आहे. अजय, तुमच्याकडे हप्ताभर मुक्कामाला आलो तर चालेल का? पाहुणा म्हणून नाही एक त्रास न देणारा मित्र म्हणून दिनेश, जमल्यास गव्हाच्या खिरीची कृती लिहा.. नक्की नक्की लिहा.. अजय, माझ्या योगाच्या गुरुजींई आम्हाला असे सांगितले की सज्जनगडावर जिथे समर्थ रामदास स्वामी सुर्यनमस्कार घालत तिथे त्यांच्या हाताचे पंजे अजून शाबूत आहेत. तुला कधी योग आलाय का हे बघण्याचा.. बाकी तू करतो तरी काय? नाही म्हंटल गाव इतक्या दूर तिथे उदरभरणासाठी काय व्यवसायपाणी आहेत..
|
Karadkar
| |
| Tuesday, July 18, 2006 - 4:52 am: |
| 
|
बी, सातारा नक्की कशापसुन दूर आहे रे? आणितिथे नोकर्या नाहित असे तुला का वाटले? दिनेश, आमच्या गावाला पण जाउन आलात तर म्हणजे तुमची ST गेली :P
|
Bee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:28 am: |
| 
|
मिनोते, किती दिवसानंतर इथे भटकलीस. आजकाल पूर्वीप्रमाणे तुझी उपस्थिती राहत नाही. कुछ खास बात विणकाम, भरतकामात मग्न आहेस का दिनेश ह्यांनी जसे वर्णन केले की अजय ह्यांच्या घरातूनच विविध गड दृष्टीक्षेपास पडतात. म्हणून मला वाटले अजय ह्यांचे घर सातारा गावाच्या पंचक्रोशीत येत नाही. सातार्यात नोकर्या मिळत नाही असे नव्हते मला म्हणायचे दिनेश, आमचा वर्हाड तुम्हाला आवडत नाही का..
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 18, 2006 - 8:15 am: |
| 
|
मिनोति, मला तुमच्या गावातल्या संगमावर पण जायचे होते, पण आता तिथे खास काहि नाही असे कळले. आणखी काय आहे तिथे ? तेहि असेच वाटेवरचे गाव. बी, अजयचे आईबाबा तिथे असतात. आणि खरेच त्याच्या घरातुन अनेक गड दिसतात. तसा सातारा शहरातुन कुठुनहि अजिंक्यतारा दिसतो.
|
Moodi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 8:50 am: |
| 
|
दिनेश खूप छान वाटले वाचुन. बरे झाले सज्जनगडला पण जाऊन दर्शन घेऊन आलात ते. मला जवळच चाफळ आहे, पुढे जमल्यास तिकडे पण जाऊन या. बी एकदा वर्हाड सोडून पुणे ते कोल्हापूर अशी पण एक ट्रीप करुन ये. निसर्ग काय असतो ते तुला नक्कीच समजेल. सातारा अमरावती अन अकोला सारखेच मोठे आहे, छान आहे.
|
Aj_onnet
| |
| Tuesday, July 18, 2006 - 11:53 am: |
| 
|
दिनेशजी, मस्त लिहलेय! परत एकदा कालचा रविवार डोळ्यासमोर तरळून गेला. दिनेशजींची परवानगी गृहीत धरून इथे थोडी भर घालतो! ठोसेघर हे सातार्याच्या नैऋत्येस साधारण पंचवीस किलोमीटरवर अन बर्याच उंचीवर (समुद्रसपाटीपासून तीन साडेतीन हजार फूट)सह्याद्रीच्या कुशीत लपलेले छोटेसे खेडे आहे. ठोसेघर अन चाळकेवाडी ह्या दोन गावांच्या मध्ये तारळी नावाच्या नदी एका दरीतून साधारण सहा सातशे फूट खोल कोसळते अन तिथे हे धबधब्याचे रमणीय दृष्य अनुभवायास मिळते. त्या उभ्या दरीच्या डोंगररांगातून अनेक छोटेमोठे ओहोळही खाली झेपावतात. अन आपल्याला विवीध आकार अन प्रकाराच्या धबधब्यांची एक रांगच ओळीने दिसते. छोटे धबधबे हे पावसाची मोठी सर आली की प्रकटतात अन पावूस कमी झाल्यावर अदृश्यही होतात. त्यामुळेच मोठे धबधबे हे पांढरेशुभ्र तर छोटे लाल चॉकलेटी अश्या रंगांच्या छ्टाही पहायला मिळतात. ठोसेघरला जाताना आपणला बर्याच पवन्चक्क्या आजुबाजुला दिसत राहतात. पुढे चाळकेवाडीच्या पठारावर तर त्यांचे जाळेच दिसते. ह्या परीसरात पर्जन्यमान खूप आहे. कालच्या रविवारीही, सातार्यात पाउस अजिबात नव्हता, सज्जनगडला थोडा होता. ठोसेघरला भरपूर होता. अन चाळकेवाडिच्या पठारावर धुव्वांधार होता. पाउस कमी झाला की ही पठारे विविध रानफुलांनी सजायला लागतात. पण त्यांचा कालावधी खूप कमी असतो. एका विशिष्ट्य आठवड्यात विशिष्त फुलेच फुलतात. तर पुढच्या आठवड्यात दुसरी. त्यामुळे ते एक दोन महीने ही पठारे विविध रंगांनी फुलुन गेलेली दिसतात. सज्जन गड हा सातार्यापासून १३ किलोमीटरवर त्याच रस्त्यावर आहे. किल्ला जास्त उंच नाही आणी जवळपास वरपर्यंत हा रस्ता जातो. प्रवेशद्वार अन बुरुन्ज अन तटबंदी सुस्थितीत आहे. किल्ल्यवर काही जुनी टाकी तर काही बांधीव तळी आहेत. किल्ला राबता असल्याने व्यवस्थीत आहे. किल्ल्यवरून उरमोडी नदीचा अन तिच्यावरील धरणाचा मस्त view दिसतो. सातार्याहून ठोसेघरला सकाळी ६.३०, १०.०० २.०० अन ५.०० अश्या बस आहेत. त्यातली शेवटची मुक्कामी राहते. बाकीच्या लगेच परत फिरतात. तिथे आता छोटी उपहारगृहे ही झाली अहेत. अन तिथे चहा, नाष्ता अन जेवणाची सोय होवू शकते.
|
Aj_onnet
| |
| Tuesday, July 18, 2006 - 12:18 pm: |
| 
|
ठोसेघरला मी पहिल्यांदा ९२-९३ ला गेलो होतो. तेही सरत्या पावसात. तेंव्हा हा परीसर फारसा प्रसिद्ध नव्हता. एकदोनच बस जायच्या. रस्ताही बराच खराब होता. धबधब्याच्या परिसरात अजिबात सोयी नव्हत्या. नुसता आवाजाचा वेध घेत झाडीतून वाटचाल करायला लागायची. जळवा फार होत्या. पण तेन्व्हा अगदी धबधब्याच्या जवळ जायला यायचे. नंतर चाळकेवाडी पवन उर्जा प्रकल्प झाला, रस्ते सुधरले, पर्यटक यायला लागले. आता बर्यापैकी सुविधा पुरवल्या गेल्यात. जागोजागी संरक्षक जाळ्या बसवल्यात. पायर्यांचा आखीव मार्ग केलाय. त्यामुळे सुरक्षितता आली तरी, धबधब्याच्या जवळ जायचा आनंद हिरवला गेलाय. हा धबधबा दोन टप्प्यात कोसळतो. पहीला कमी उंचीचा आहे. तर दुसरा खूप मोठा. दोन्ही टप्प्यात साधारण शे दोनशे मीटरचे अंतर आहे. पहील्या टप्प्याच्या इथे मोठा डोह तयार झाला आहे. अन त्या काठी उभे राहून मस्त तुषारांचा अन उन असेल तर हलत्या इंद्रधनुष्याचा अनुभव घेता यायचा. दुसर्या टप्प्या च्याही खूप जवळ जायला यायचे. एका ठिकाणाहून तर तो धबधबा खाली दरीत पडताना बरोबर वरून पहायला मिळायचा. पण आता हे सर्व कुंपणाच्या आत बंद झाले आहे. नवी gallery मात्र मस्त जागेवर उभारली आहे. तिथून सर्व धबधब्यांचे व्यवस्थीत निरीक्षण करता येते.
|
Aj_onnet
| |
| Tuesday, July 18, 2006 - 12:33 pm: |
| 
|
--म्हणजे मुलगा फारच सहनशील आहे, अगत्यशील पण आहे बाकी दिनेशजींनी माझे फारच कौतुक केले आहे. उलट त्यांनीच मला सहन केले असे म्हणता येईल! दिनेशजी बरोबर निसर्गभ्रमणाचा एक फायदा म्हणजे ते एखाद्या संदर्भग्रंथासारखे फुले झाडे पक्षी कविता अन गाणी अश्या विविध विषयांवर अचूक माहिती देत राहतात. त्यामूळे निसर्गाची नव्याने ओळख होते. बी, नक्की या. कोणत्याही ऋतूत हा परिसर रमणीयच असतो. माझे गाव सातारा असले तरी मी नोकरीसाठी सोमवार ते शुक्रवार पुण्यात असतो अन सप्ताहांती सातार्याला. पुणे ते सातारा हे फक्त दोनच तासांचे अंतर आहे. सातारा हा सात डोंगरात वसला आहे म्हनुन त्याचे नाव सातारा आहे. सातार्यातून कुठुनही, अजिंक्यतारा, कल्याणगड, चंदनवंदन हे किल्ले अन जरंडा, यवतेश्वर, पाटेश्वर, अन धावडशीचे डोंगर दिसतात.
|
दिनेश, सुंदर.. गिरिभ्रमन इतके enjoy करता येते.. !!! खरच वर्णन वाचावे ते तुमच्याच लेखणीतुन आलेले..!!!
|
Karadkar
| |
| Tuesday, July 18, 2006 - 7:24 pm: |
| 
|
बी, माझे नाव मिनोती आहे त्याचे मिनोते करु नको अधिच सांगतेय. दिनेश, घाट म्हणजे संगम आता फ़क्त चौपाटीसारखा वापरला जातो. नदीचे पात्र पूर्वी कृष्णाबाईच्या देवळापसुन खुप जवळ होते आता ते खुप सरकले आहे. यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे म्हणुन मग तिकडे जरा स्वच्छ्ता वाढलीय. पण एकदा संगम नक्की बघुन या. त्या प्रकारचा संगम जगातला एकमेव आहे.
|
दिनेश, अजय खासचं... वर्णन आवडलं दिनेश, तुम्ही वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी आहात का? तिथल्या निसर्गाबद्दल मनात कुतुहल निर्माण झाले आहे...
|
Giriraj
| |
| Friday, July 21, 2006 - 10:48 am: |
| 
|
अजय,मि तुझा 'तिरस्कार' करायचा विचार करतोय... बी,वर्हाडात कायबी नसते बुवा! मामा ठाकूर,मै आ रहा हूँ
|
Dineshvs
| |
| Friday, July 21, 2006 - 5:04 pm: |
| 
|
ईंद्रधनुष्य, मी या जगातल्या सगळ्याच ज्ञानाचा विद्यार्थी ( आर्थी = याचक ) आहे. Bee उत्तर द्यायचे राहिले. सध्या माझे सगळे वर्हाडकर मित्र, म्हणजे तु, भाग्य वैगरे देशाबाहेर आहात. ईथे आलात तर न बोलावता येईन. गिर्या, मला तुझ्या सोबतीची वाईट सवय लावुन, तू मात्र लांब जाऊन राहिला आहेस.
|
Swaroop
| |
| Friday, February 23, 2007 - 2:25 pm: |
| 
|
मी ठोसेघर एक पर्यटनस्थळ म्हणुन प्रसिद्ध होण्याच्या आधीपासुन बघत आलोय... अजय म्हणतो तसे आधी तिकडे जायला पक्का रस्ता सुद्धा नव्हता... झाडीतुन आवाजाचा माग काढत जावं लागायच.... मस्त वाटायच अगदी.... एकदम शांत... निवांत! मी जेंव्हा पहिल्यांदा तिकडे गेलो ना मला एकदम तो ज्युरासिक पार्कचा तो सीन आठवला.... त्या दरीत ते helicopter मधुन उतरतात ना... तो. सेम तसेच वाटत होता सगळा परिसर.... आता पायर्या,रेलिंग वगैरे मुळे सोय झालीय पण ती पुर्वीची मजा नाही उरली!
|
Dineshvs
| |
| Friday, February 23, 2007 - 4:19 pm: |
| 
|
स्वरुप आमचा कांसच्या पठारावरची फुले बघायचा कार्यक्रम राहुनच गेला. अजय म्हणाला, कि यावेळी ऋतुमान बिघडल्यामूळे, फारशी फुलेच नव्हती फुलली.
|
Aaspaas
| |
| Friday, February 23, 2007 - 5:07 pm: |
| 
|
दिनेश माफ करा, पण जलपर्णीचे उत्तम कंपोस्ट [कुजण] होते. मल वाटते निसर्गात कोणतीच गोष्ट वाया जात नाही किंवा निरुपयोगी नसते. हां, माणसाने त्याच्यासाठी काही गोष्टी याअर्थाने ठरवल्या आहेत.
|
Dineshvs
| |
| Saturday, February 24, 2007 - 6:55 am: |
| 
|
आसपास, माफ़ी कश्याबद्दल. पण मूळात जलपर्णी पाण्यातुन काढणेच जिकिरीचे असते ना, त्याचे काय ? कोल्हापुरच्या रंकाळा तलावाचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. शिवाय ती ईतक्या झपाट्याने वाढते, कि सगळा जलाशय व्यापुन टाकते. त्यामुळे त्याखाली पाणवनस्पति जगु शकत नाहीत, वा जलचर तग धरु शकत नाहीत. त्यापासुन बायोगॅस करायचे पण प्रयत्न झाले होते, पण त्यात यश आले नाही. गुरे पण ती खात नाहीत.
|
Saavat
| |
| Sunday, February 25, 2007 - 7:11 am: |
| 
|
दिनेश, सज्जनगडाच ऐतिहासिक महत्व या बद्द्ल सांगाल का?तुमच्या शब्दात वाचायला आवडेल.
|
Aaspaas
| |
| Sunday, February 25, 2007 - 9:55 am: |
| 
|
दिनेश तुमचे एवढे लिखाण वाचून जसा ज्युरासिक पार्क आठवला तसा, मला वाटले धबधब्यावरुन मी उडी ठोकली आहे आणि वरुन दिसणारा तळ आता येतच नाहीय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|