|
Dineshvs
| |
| Monday, March 31, 2008 - 12:09 pm: |
| 
|
बरेच दिवस जी एस च्या बरोबर जायचे मनात होते, पण माझ्या वेळात बसणारा आणि तब्येतीला मानवणारा कार्यक्रम कधी ठरतोय याची वाट बघत होतो. या मोहिमेची घोषणा झाली आणि मी जरा मनावर घेतले. नेहमीप्रमाणे, तुम्ही आधी पुण्याला या, मग आपण जाऊ, असे चालले होते, पण हा गड कोकणात असल्याने, मुंबईहून थेट जाणे शक्य होते. कुणी येताहेत का त्याची वाट बघत होतो. साधना येणार होतीच, मी बॉम्बे व्हायकिंगला विचारून घेतले, पण त्याच्या काहि घरगुति कार्यक्रमामूळे तो येऊ शकणार नव्हता. पण त्याने गाडी ठरवण्यास मदत केली. आमचा चालक राहुल असणार होता, या राहुलसोबत आधीच भटकंती केल्यामूळे, तो खास दोस्तीतला होता. ( आम्ही मुंबईकर असल्याने ) अगदी ठरल्या वेळी, म्हणजे बरोबर पाच वाजता मी आणि राहुल निघालो. अगदी सांगितल्या वेळी साधना, पंकज आणि त्यांचा छोटा मित्र, ओमकार आम्हाला भेटले, आणि मग आमची गाडी भरधाव निघाली. सहज चाचपणी म्हणून आरती, नलिनी आणि गिर्याकडे चौकशी करुन ते कुठपर्यंत आलेत याची चौकशी केली. ते सगळे तयारच होते, पण निघाले नव्हते. आता हायवेवर मोबाईल ऑफ़ असतील, रात्री ठिक दहा वाजता खेडला भेटु असे ठरले. माझ्या पायाखालचाच, गोवा हायवे असल्याने, रस्ता माझ्या ओळखीचा होता. वाटेत साधना पंकजशी गप्पा चालुच होत्या. रस्त्यावर फ़ारशी रहदारी नसल्याने, राहुल तर बाजुच्या रेल्वेगाडीशी स्पर्धा करत जात होता. बराच वेळ झाला तरी आम्हाला कुठेच, खेड नावाची पाटी दिसत नव्हती. हे गाव याच रस्त्यावर लागते याची मला खात्री होती, पण महाडच्या आधी का नंतर ते लक्षात येत नव्हते. ( यापुर्वीचे सगळे प्रवास रात्री अर्धवट झोपेत केले होते ना ) शेवटी एका ठिकाणी थांबून विचारून घेतले आणि खात्री झाल्यावर पुढे निघालो. महाड ओलांडल्यावर एका ठिकाणी विश्रांतिसाठी थांबलो. ताजी कलिंगडे विकायला होती त्याच्या कापा विकत घेतल्या. त्या बघुन आमच्या मागे एक गाय लागली, आणि आमच्या हातातून जवळजवळ ओढूनच ती त्या फ़ोडी घेऊ लागली. तिथे परत जरा पुणेकरांची चाचपणी केली. शर्यतीत आम्ही बरेच पुढे होतो. कशेडीचा घाट सुरु झाला आणि आम्हाला आभाळातल्या चांदण्या हाताशी आल्या असे वाटु लागले. राहुलने या घाटातून ज्या सफ़ाईने गाडी नेली त्याला खरेच तोड नाही. आम्ही खेडला पोहोचलो, त्यावेळी पुणेकर अजुन बरेच मागे होते ( आम्ही अर्थातच मुंबईकर असल्याने, अगदी ठरल्या वेळेच्या आधीच म्हणजे रात्री साडेनऊलाच खेडला पोहोचलो. ) पोटपूजा आटोपुन घ्यावी या हेतूने आम्ही जरा चाचपणी सुरु केली. एका चौकात ( तो शिवाजी चौक होता, हे निदान महाराष्ट्राच्या बाबतीत तरी सांगावे लागू नये. ) . आम्हाला स्नेह नावाचे आईस्क्रीम पार्लर दिसले. तिथल्या काकूना विनंति करुन वरची गॅलरी उघडून घेतली. साधनाच्या घरचा डबा होताच तरिही अगदीच अवघडल्यासारखे वाटू नये म्हणुन आम्ही डोसा आणि उत्तप्पा मागवला. फारशी अपेक्षा नव्हती पण ते पदार्थ खुपच छान चवीचे होते. चटणी पण अगदी ताजी होती आणि तिला बडीशेपेचा छान स्वाद होता, भरपेट खाल्ल्यावर मी त्या काकुना मुद्दाम सांगितले, पदार्थांच्या उत्तम चवीबद्दल. त्याना खुप आनंद झाला आणि त्यानीही आमची पावभाजी पण छान असते, अवश्य खायला या असे सांगितले. परत एकदा पुणेकरांची चाचपणी केल्यावर ते लोक अजुन बरेच दूर आहेत असे कळले. साडेदहा वाजले होते, तेवढ्यात जी एस ने सांगितले कि धूमकेतू खेडलाच आहे, मग त्याला फोनाफोनी करुन शोधून काढले, आणि मग आम्ही राहूलला गाडीत ठेवुन सगळे त्याच्या सासरवाडीला गेलो. ईतक्या रात्री देखील त्याच्या सासरवाडीच्या मंडळीनी आमची उत्तम बडदास्त ठेवली होती. तिथे आम्ही जरा आडवे झालो. पुणेकर कधी पोहोचताहेत याची वाट बघत बसलो. रात्री सव्वा दीड वाजता जी एसने फोन केला, आम्ही पाच मिनिटात तयार झालो. सोबत वाट दाखवायला धुमकेतू होताच. ( आकाशातला नव्हे, आपला ) अष्टमीचा चंद्र नुकताच उगवला होता आणि तो बराच मोठाही दिसत होता. खोपी गावापर्यंत रस्ता ठिक होता, मग मात्र जरा कच्चे पॅच लागू लागले. आमचा राहुल त्यातूनही कुशलतेने गाडी हाकत होता, बाकिचे जरा मागे पडत होते. मग आम्ही जरा थांबून त्यांची वाट बघत असु. थोड्याच वेळात जंगलाचा वारा लागु लागला. अचानक आमच्या गाडीपूढे एक ससा दौडु लागला. सश्याची चाल आजवर केवळ कल्पनेतच आणि कथेत बघितली होती, पण जमिनीवर अगदी निमिषभर पाय टेकवत ससा जणु तरंगतच चालला होता. आम्ही गाडी थांबवली कि तोहि थांबत असे, गाडी सुरु केली कि परत याचे गाडीपूढे धाव सुरु. असे बराचवेळ चालल्यावर तो झाडीत गुडुप झाला. मग एक काहितरी पिसारा फुलवलेले मोठे प्रकरण आले. आधी राहुलला तो मोर वाटला, मी फक्त त्याचा पिसारा बघितला आणि तो मला टर्कीसारखा दिसला. मग कळले कि ते साळिंदर होते. परत एकदा तसाच ससा गाडीपूढे धाऊ लागला, मी आणि साधना दोघेहि कोकणातले असल्याने, आम्हाला दुसरीच शंका येऊन गेली आणि मी राहुलला गाडीच्या बाहेर पडू दिले नाही. वाटेत एक गव्यासारखा पण प्राणी दिसला, पण ती म्हैसच होती. असे करता करता पहाटे साडेतीन वाजता आम्ही गावात पोहोचलो. गावात अर्थातच नीजानीज झाली होती. आम्ही गावात कुठे देऊळ आहे का त्याचा शोध घेतला, पण सापडले नाहीच. जिथे आम्ही गाड्या उभ्या केल्या होत्या तिथुन जवळच, एक छान सारवलेले अंगण होते. तिथल्या आजीना विचारून आम्ही तिथे पथार्या पसरल्या, इतक्या रात्री पुण्यातल्या मित्रमैत्रीणींची चौकशी करण्यात अर्थ नव्हता, तरिही नलिनी आणि गिर्याचे बोलणे झालेच. आमची झोपेची वेळ आणि कोंबड्यांची ( कोबंडा चे अनेकवचन ) आरवायची वेळ एकच झाल्याने, त्यानी आपले काम सुरु केले. माझ्यासारख्या काहि भाग्यवंताना त्याही वातावरणात मस्त झोप लागली. नेहमीच्या सवयीने पहाटे साडेपाच वाजताच मला जाग आली, अंधारात बघितले तर साधना पण जागीच होती, मग आम्ही दोघानी गावात शोधाशोध सुरु केली. गिर्या पण आलाच. अजुन फ़टफ़टलेही नव्हते, पण मला एक जांभळाचे झाड दिसले. त्याच्या कोवळ्या पानांचा वापर करुन मी दात घासून घेतले. गावात पाण्याची व्यवस्था दिसत असली तरी पाणी मुबलक नव्हते. रस्त्यावरच्या चढावर मला काहि करवंद कुंदाच्या जाळ्या दिसल्या, अर्थातच मी त्यात घुसलो. आणि मला अचानक एक नेर्ली उर्फ़ अंबोलीची वेल दिसली. भरपुर नेर्ली लागलेली होती. करवंदे, जांभळे, तोरणं, हशाळे, अळु, जगमं, नेर्ली हा रानमेवा मला अतिप्रिय. यातले बाकिचे प्रकार अजुनही मिळतात पण जगमं मी अनेक वर्षात खाल्लेली नाहीत. आणि नेर्ली फारच मोजक्या ठिकाणी मिळतात. सुंदर गुलाबी रंग आणि आंबटगोड चवीची हि फळे अगदी मोजक्या ठिकाणी विकत मिळतात. आणि त्याचा वेल तर मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो. हावरटासारखी नेर्ली तोडुन घेतली. आता पर्यंत सगळेजण उठले होते. आम्ही भराभर चुल मांडली आणि चहा कॉफ़ीची फ़ेरी झडली, तेवढ्यात आरतीने पोह्याची तयारी केली. तिने भरपुर पोहे आणले होते, आम्हाला दोनतीनवेळा ते करावे लागले, आणि अश्या रितीने आमच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला. पोह्याना छानच चव आली होती. आम्ही लगेच तयार होवुन, गडाकडे कूच केले. जी एसने नेहमीप्रमाणेच मला न रेंगाळण्याची तंबी दिली आणि मी ती नेहमीप्रमाणेच काना आड केली. पुढे कुंभा, नेर्ली, शिकेकाई, पांगारा, बहावा, अंजन, धायटीच्या प्रत्येक झुडुपा झाडाने मला थांबवले. मग चढाई सुरु झाली. यावेळी पक्षांची ओळख करुन द्यायचा अलका होती, म्हणुन माझी चंगळ होती. ठळक पायवाट असल्याने रस्ता चुकण्याचा प्रश्नच नव्हता. मग मात्र काहि अवघड चढाईचे टप्पे लागले. उनही जाणवु लागले. अधूनमधून निदान मानसिक आधाराला कारवी होती, पण ती आता सुकली होती. बरेच खुंट पर्णहीन होते तर काहि गणित कच्चे असणारी कारवीची झाडे, सूकलेला फ़ुलोरा मिरवत मला हिणवत होती. काहि सुकुन गेलेल्या झाडांवर ऑर्किड्सही दिसलि. या सगळ्यात रेंगाळल्याने, मी बराच मागे पडलो. गिर्याची सौ, शीतल पण माझ्याच बरोबरीने. एका टप्प्यावर आमचा धीर खचला, आधी गिर्याने शीतलला नेटाने वर नेले. आणि अर्थातच मग त्याने माझा ताबा घेतला. तो माझा स्वघोषित केअरटेकर आहे. आणि माझी साथ तो कधीही सोडत नाही. शेवटी वरातीमागचे आमचे घोडे वर पोहोचले. तिथे आम्ही सर्वजण परत एकत्र आलो, ग्रुप फोटो झाले, सगळ्यानी मी किडुकमिडुक खाऊ दिला. गडावर अर्थातच नेहमीप्रमाणे काहिच बघण्यासारखे नव्हते. एक भवानीचे देऊळ आणि समोर काहि शेवाळे भरलेल्या पाण्याची डबकी. ( त्यातही मी उडी मारलीच ) तिथेहि काहि वेगळी फुले दिसली. मग बाकिचे सगळे समोरच्या गडावर गेले. मी, शीतल आणि नलिनी मागे पडलो. तिथे मला एकाचवेळी पांढरी आणि पिवळी फ़ुले येणारे गेळाचे झाड दिसले, त्याच्या मागे कढिपत्त्याचे झाड होते. उत्तम वासाचा तो कढिपत्ता मी तोडून घेतला. शेवटी परत एकदा मी, शीतल, नलिनी आणि नाईलाजाने गिर्या मागे राहिलो. नलिनीच्या आणि माझ्या बर्याच दिवसाच्या गप्पा राहिल्या होत्या. तिला अनेक झाडे दाखवत राहिल्याने आम्ही बरेच मागे पडलो. शेवटी एका नेर्लीच्या वेलाने माझा सगळा संयम गळुन पडला. मुठमुठभर नेर्ली तोडुन घेतली. तिथल्या एका चौथर्यावर चढायला नलिनीने परवानगी दिली नाही म्हणुन, नाहीतर त्या वेलावर मी एकही फळ बाकि ठेवले नसते. मग त्याचा मजेत आस्वाद घेत आम्ही तळाकडे कूच केले. आधीचा ग्रुप बहुतेक सगळा आडवा झाला होता. आम्ही मात्र गेल्या गेल्या कंबर कसून जेवणाच्या तयारीला लागलो. दोन चुली पेटवल्या. साजूक तुपातली आंबेमोहोर तांदळाची खिचडी आणि टोमॅटो बटाट्याच्या रस्सा असा बेत होता. सोबतीला निखार्यावर भाजलेले पापड, मिरचीचा ठेचा, कोथींबीर वडी, ठेपले, पाव असा मस्त बेत होता. आरती, पंकज, शीतल, नलिनी, अनिता असा सगळ्यांचाच हातभार लागल्याने, पदार्थाना अप्रतिम चव आली होती. ताटेच कमी पडल्याने आणि आम्ही सर्वधर्मसमभाव मानत असल्याने, एकेका ताटात दोघादोघानी जेऊन, बंधुभाव जपला. अगदी मस्त अंगतपंगत जमली होती. जेवणानंतर सगळ्यानी मसाला पानाचा आस्वाद घेतला. लगेचच आवरा आवर करु लागलो. उच्चविद्या विभूषित मायबोलीकरणी, अगदी घरचे कार्य असल्याप्रमाणे, झाडलोट, भांडी घासण्यापासून सगळे करत होत्या. आरती तर यावेळी एखाद्या आदर्श गृहिणीप्रमाणे सगळ्यांचे हवेनको बघत होती. अश्यावेळी अर्थातच येऊ न शकलेल्या मायबोलीकरांची मला खुप आठवण आली. मग मात्र आम्ही निघायची घाई केली. आम्ही मुंबईकर असल्याने वेळेवर तयार झालो. ( सगळे टोमणे हेतूतः मारले आहेत याची मंडळानी कृपया नोंद घ्यावी ) जाताना सगळेच हळवे झालो. आता परत कधी, हा सवाल सगळ्यांच्याच मनात होता. रात्री अंधारात घाट चढल्याने, आम्हाला त्याचा पुर्ण आनंद घेता आला नव्हता, उतरताना मात्र आम्ही वाटेत थांबुन डोळे निववून घेतले. अवघड टप्पा पार केल्यावर, आज आपली अंघोळ झाली नाही, हे आठवले. खोपी गावातली छोटी नदी बघुन राहुलला राहवले नाही. राहुल, ओमकार आणि पंकज पाण्यात डुंबू लागले मग मी आणि साधनानेही पाण्यात धाव घेतली. त्या उबदार पाण्याने आमचा शीणवटा कुठल्याकुठे पळवून लावला. आम्ही पाण्यात डुंबत असतानाच बाकिच्या मंडळींच्या गाड्या येताना बघितल्या, आणि भरपुर आरडाओरडा करून त्याना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण बहुदा चालकासकट सगळेजणच झोपले असल्याने, त्याना आम्ही दिसलो नाहीत. पाण्यात डुंबल्याने आम्हाला परत भूक लागली, मग आम्ही खेडला थोडेसे खाऊन घेतले, आणि मग राहुलने जी भन्नाट गाडी हाणली कि आम्ही जवळजवळ तरंगतच, नऊच्या आधीच घरी पोहोचलो. आवडत्या मंडळींचा मनसोक्त सहवास लाभल्याने, कालचा शीण अजिबातच जाणवत नाही, आता. शिवाय नविन ओळखी झाल्या त्या वेगळ्याच. फोटो धुवायला दिलेत, आले कि टांगतोच इथे. अभ्यासू लोकांचे डिटेलवार वृतांत येतीलच. तोपर्यंत चवथी फ़ तुकडीतल्या एका ढ मुलाचा निबंध गोड मानून घ्या.
|
दिनेशदादा, तुमच्या इतक्या छान शब्दचित्राला चवथी फ वगैरे म्हणणे शोभत नाही. असो. निसर्ग इतका बारकाईने बघणारा, झाडांची, प्राण्यांची इतकी उत्तम जाण असणारा क्वचित भेटतो. तुमच्यासारखाच मला रानमेव्याची चव घ्यायला आवडते. पण बर्याचदा बरोबरची मंडळी, विषारी असेल, धूळ असेल वगैरे म्हणून नाके मुरडतात. कधीतरी तुमच्याबरोबर ट्रेक करायला मिळेल अशी आशा करतो.
|
Dineshvs
| |
| Monday, March 31, 2008 - 4:31 pm: |
| 
|
आभार शेंडेनक्षत्र, धुमकेतू जे वर्णन करतो ना नकाशासकट तसे मला जमणार नाही. तो तर अगदी छान नकाशाचा वगैरे अभ्यास करून आला होता. आणि हो या सहलीत मला फ़ुलवेडा आणि झाडबाबा, अश्या पदव्या पण मिळाल्या बरं का. गडाचे दुरवरून दर्शन

|
Dineshvs
| |
| Monday, March 31, 2008 - 4:37 pm: |
| 
|
आणि हो, शक्यतो पावसाळ्यात कुठेही जाऊ. कारवीत हरवलेले मायबोलीकर. एक सात वर्षाचा हिशेब चुकवुन अवेळी फ़ुललेली कारवी, ( फोटोत फ़क्त सुकलेले पुष्पकोशच दिसताहेत )

|
Dineshvs
| |
| Monday, March 31, 2008 - 4:38 pm: |
| 
|
एका सुकलेल्या झाडाच्या शेंड्यावर, फ़ुललेली ऑर्किड

|
Dineshvs
| |
| Monday, March 31, 2008 - 5:15 pm: |
| 
|
आम्हाला न्हाऊ घालणारी नदी

|
Dhumketu
| |
| Tuesday, April 01, 2008 - 5:31 am: |
| 
|
पहीला वृतांत कोण टाकते ह्याची उत्सुकता होती.. तुम्ही बाजी मारलीत... येताना चालक झोपला होता की नाही काहीच माहीती नाही.. कारण आम्हीच झोपलो होतो...पण अपघात न होता आलो म्हणजे झोपला नसावा बहुतेक.. येताना वासोटा आणी नागेश्वर चे छान दर्शन झाले. फ़क्त 'पिकनीक'मध्ये चकदेव झाला नाही ह्याचीच खंत वाटते.
|
धुमकेतू, लेका तुला लिहायला काय झाले रे? जरा छानसा डिटेलवार वृत्तांत लिही की.
|
Ashbaby
| |
| Tuesday, April 01, 2008 - 6:31 am: |
| 
|
दिनेश, छान वर्णन लिहीलेत. ऑर्किड पण छान. ३१ मार्च च्या गडबडीत बरा वेळ मिळाला.... ( आम्ही मुंबईकर असल्याने ) सांभाळुन, पुणेकरांशी पंगा घेताय... या सहलीत मला फ़ुलवेडा आणि झाडबाबा, अश्या पदव्या पण मिळाल्या बरं का अजुन बरेच पदवीदान केले आम्ही वर बसल्या बसल्या... (उदा. वृक्षभाऊ वगैरे) खेडचे हॉटेल अनपेक्षितपणे चांगले निघाले. पदार्थ आणि सोबत मनोरंजनही चांगले होते. धुमकेतू आणि पुणेकर दोघांच्याही कृपेने खेडकरांचा पाहुणचारही लाभला. बिचारे आमच्याबरोबर साडेअकरा वाजेपर्यंत बसुन राहिले. शेवटी आम्ही पेंगायला लागल्यावर गाद्या, पंखा, एसी आणि शिवाय टीव्ही सगळी सोय करून दिली. बाकीची मंडळी कधी टाकताहेत फोटो आणि वृत्तांत? साधना.
|
Giriraj
| |
| Tuesday, April 01, 2008 - 7:06 am: |
| 
|
आम्ही या ट्रेकला बबडू आणि कंपनी ची खूपच आठवण काढली!
|
सहीच दिनेशशेठ. मस्त वर्णन.
|
Phdixit
| |
| Tuesday, April 01, 2008 - 3:17 pm: |
| 
|
वा दिनेशदा काय झकास फोटो आले आहेत. मस्तच हा शिंदी गावातून काढलेला महीमंडण गड 
|
बबडु ची कंपनी पण आहे ?
|
Zakasrao
| |
| Wednesday, April 02, 2008 - 4:26 am: |
| 
|
झाडबाबा की जय हो चांगला लिहिलात वृतांत. जरा फ़ोटो टाका रे. दोन चारच का फ़क्त बाकीचे कुठे आहेत फ़ोटो??
|
Itsme
| |
| Wednesday, April 02, 2008 - 4:57 am: |
| 
|
फदी, आता तुझा 'डाव' public ला समजला आहे, त्यामुळे तु 'वा वा' करणे सोडुन दे .... झकास, पुढच्या ट्रेक ला आले की बाकीचे फोटो बघायला मिळतात
|
Tonaga
| |
| Wednesday, April 02, 2008 - 6:00 am: |
| 
|
जरा फ़ोटो टाका रे. दोन चारच का फ़क्त बाकीचे कुठे आहेत फ़ोटो?? >>>>मला तर या फोटोत फक्त झाडे, दगड,उंचवटा, हवा, आकाश दिसते आहे. ते तर पृथ्वीवर कोठेही फोटो काढला तरी दिसते. त्यासाठी एवढी तंगडतोड कशासाठी? त.टी. वणवा घ्या!!
|
Mimajhi
| |
| Wednesday, April 02, 2008 - 6:44 am: |
| 
|
या फोल्डरचे नाव 'माझे दुर्गभ्रमण' असे आहे. त्यातल्या 'माझे' तसेच मी, मला ईत्यादी शब्दांबद्दल दिनेश शिंदेने नेहेमीप्रमाणेच भरभरून लिहिले आहे आता 'दुर्गभ्रमण' याबद्दलही कोणी लिहिले तर वाचायला आवडेल.
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 02, 2008 - 7:30 am: |
| 
|
टोणगा, ओळखलंच का शेवटी ? ओके तो किल्ला धारावीचा आहे, नदी म्हणजे मिठी नदी, फ़ुले काय मला कुठेही दिसतात, आणि फ़ोटोतली सगळीच मंडळी पाठमोरी असल्याने, तो फ़ोटो मायबोलीकरांचाच काय कोरीयन शिष्ठमंडळाचा म्हणूनही खपवता येईल. हा हा हा !!! आणि मीमाझी, टपकालात इथेही ? भाषा सुधारली कशी अचानक ? का आधीची अशुद्ध भाषा मुद्दाम लिहिली होती ? माझ्याबद्दल आणखी काय जाणुन घ्यायचे आहे ते बोला !!!
|
अरे? इथेही VnC चालते का? मला माहीत नव्हते. ते जाऊ द्या ... अरे काय? बाकीची सगळी प्रतिभावान मंडळी कुठे गेली? का परतीच्या प्रवासात झोप लागली ती अजुन झोपेतच आहेत का, जाग नाही आली का?
|
Itsme
| |
| Wednesday, April 02, 2008 - 11:37 am: |
| 
|
शिंदी गावाकडे जाणारा कच्चा रस्ता ...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|