|
Ajjuka
| |
| Saturday, January 05, 2008 - 4:51 am: |
| 
|
खुन्या मुरलीधर हे नाव पडले कारण चाफेकरांनी तिथे शस्त्र लपवली होती किंवा ग्रॅंडच्या खुनानंतर ते तिथे लपले होते. असं मी ऐकलंय. अकरा मारूती मधे बहुतेक मारूतीच्या खरंच अकरा मूर्ती आहेत. आणि समर्थ रामदासांशी काहीतरी लिंक आहे. नक्की माहित नाही. पण फारेंडा तुझी आयडीयाची कल्पना झ्याक!
|
Ankyno1
| |
| Saturday, January 05, 2008 - 4:55 am: |
| 
|
प्रमोदबन नंतरच्या उजव्या गल्लीत... जोग वाडा... अजूनही त्याच ठिकाणी रहातो... फक्त आता वाड्याच्या जागी अपार्ट्मेन्ट्स झालय (हे 'आता' ही १३ वर्षापूर्वीचं) माझ्या घराच्या खिडक्यान्मधून प्रमोदबन चा आख्खा जिना दिसायचा. आता दिसत नाही करण मधे दातारान्च्या रिकाम्या प्लाॅट वर बिल्डिन्ग उभी राहिली आहे. प्रमोदबन मधले वरद उपाध्ये (तळ मजला) आणि आशुतोश गोरे (सर्वात वरचा मजला) हे दोघेही माझे मित्र आहेत (दोघेही अजून तिथेच रहातात). त्यान्च्याबरोबर पार्किन्ग मधे क्रिकेट, जिन्यात पकडा-पकडी, गच्चीत पतंग उडवणे.... मस्त आठवणी जाग्या झाल्या.... मी आधी उल्लेख केलेला सायकल किस्सा प्रमोदबन आणि मार्केट सदन समोरच घडला होता ;)
|
Psg
| |
| Saturday, January 05, 2008 - 7:05 am: |
| 
|
खुन्या मुरलीधराची मी ऐकलेली अख्यायिका अशी आहे की 'द्रविड बंधू' म्हणून कोणी होते जे चाफेकर बंधूंचे मित्र होते, त्यांना या रॅंड खूनाच्या कारस्थानाची माहिती होती. रॅंडचा खून झाल्यानंतर हे द्रविड बंधू उलटले आणि त्यांनी चाफेकरांचा ठावठिकाणा ईंग्रजांना सांगितला. याचा सूड म्हणून चाफेकरांना अटक झाल्यानंतर त्यांच्या अन्य मित्रांपैकीच कोणीतरी या द्रविड बंधूंचा मुरलीधराच्या देवळापाशी खून केला.. म्हणून तो 'खुन्या मुरलीधर'! असे अनेक 'मारुति', 'विष्णू' आहेत पुण्यात. या बद्दल खरच शोधून माहिती काढली पाहिजे.. मजा येईल त्यांचा इतिहास जाणून घ्यायला
|
Mukund
| |
| Saturday, January 05, 2008 - 7:31 am: |
| 
|
पूनम.. माझे आजोळ "सोन्या"मारुती चौकातले "विष्णु"पुरा वाड्यातले आहे अमोलच्या आयडियाला माझेही अनुमोदन..
|
Anaghavn
| |
| Saturday, January 05, 2008 - 8:15 am: |
| 
|
तुम्च्याकडे "सरस्वति मंदिर्--काळा उंदिर" असं म्हणायचे का?
|
माझे जुने नाहीत पण नवेन किंवा सध्याचे दिवस पुण्यातले आहेत.... चाफेकर वाड्याशेजारी असा पत्ता मुद्दाम सांगताना खुप अभिमान वाटतो पण आश्चर्य म्हणजे बर्याच पुणेकरांना मात्र हा चाफेकर वाडा माहीतच नाहीये पण हे मात्र खरं की पुण्यातल्या देवांची नावं मात्र वेगळीच आहेत..कुण्या खुन्या तर कुणी पत्र्या..कोणी चक्का चिमण्याही...त्यामुळे तिथे अनेकदा जाऊन आले तरी नक्की होणता चौक आणि कोणता देव कुठे आहे हे काही अजुन माझ्या लक्षात रहातच नाहीत....शनिपार की नागनाथपार..र्इक्षावाल्याला किंवा कोणालाही सांगताना प्रत्येक वेळी आधी मनात विचार करावा लागतो.ऽवघड दिसतंय एकुणच
|
Ajjuka
| |
| Saturday, January 05, 2008 - 8:35 am: |
| 
|
माझा सायकल किस्सा पण प्रमोदबन च्या दारासमोरचाच. आमचं घर अरविंद लेल्यांच्या दवाखान्याच्या डोक्यावर होतं. चिपळूणकरांच्या शेजारी. आम्ही ते परचुर्यांना विकलं होतं आणि मग आता बहुतेक ते त्यांनी अजून कुणाला तरी विकलं. तू वरद उपाध्ये चा मित्र का? म्हणजे खूपच लहान आहेस. त्याची ताई गौरी सुद्धा माझ्यापेक्षा लहान होती. दातारांच्या वाड्यात मी बर्याचदा जायचे खेळायला. आणि ती गल्ली म्हणजे त्रिमूर्ती गणेशोत्सवाची गल्ली म्हणायचो. तिथल्या गणेशोत्सवात एवढ्या स्पर्धा आणि कार्यक्रमात भाग घेतलाय की ज्याचं नाव ते. गल्लीच्या टोकाला डोंगर्यांचा बंगला होता. तिथे तारा बापट बाईंकडे scholarship च्या क्लासला जायचे मी. जोग वाडा म्हणजे कॉर्नरच्या नंतरचा ना? कॉर्नरच्या बिल्डिंगमधे आम्ही गाणं शिकायला जायचो. एक गंमत.. आमच्या बिल्डिंगमधे २ मुली होत्या त्या दोघींना घरात गुड्डी म्हणायचे. त्यामुळे अर्थातच बिल्डिंगमधे त्या दोघींना छोटी गुड्डी आणि मोठी गुड्डी अशी नावं पडली होती. ती इतकी गडद झाली की त्यांची खरी नावं त्यांना सुद्धा आठवायला लागतील. पर्वाच त्यातली एकजण माझ्या प्रयोगाला आली होती. बाबांनी तिला ओळखलंच नाही. तिनं तिचं नाव सांगितलं खरं तेव्हाही नाही. मग मीच म्हणाले की अहो ही मोठी गुड्डी. मग लगेच लिंक लागली सगळ्यांना. अगदी माझ्या मावशीला आणि मावसभावालासुद्धा!! प्रत्येक शाळेला असं काहीतरी म्हणलं जायचंच इतर शाळेतल्यांच्याकडून. सरस्वती मंदीर... काळा उंदीर... रेणुका चं रडुका अहिल्यादेवी चं हिल्ल्यादेवी विमलाबाई गरवारे चं सेंट विमलीज आमच्या शाळेला पण होतं असं नाव. हुजूर हुजूर खाते खजूर खजूराची बी किडकी हुजूरपागा चिडकी.. आता शाळा इतकी महान होती त्यामुळे लोकांनी जळफळून शिकस्त करून कविता पाडली होती ही ही ही..
|
Ajjuka
| |
| Saturday, January 05, 2008 - 8:38 am: |
| 
|
मनिषा, नागनाथपार आता आम्हालाही ओळखता येणार नाही पटकन इतका तिथला रस्ता भसकन मोठा झालाय. आता वळणं उरलीच नाहीत त्या रस्त्याला. तीरासारखा सरळ झालाय.
|
Ankyno1
| |
| Saturday, January 05, 2008 - 9:46 am: |
| 
|
हो.... काॅर्नर चा प्लाॅट हा थिटे वाडा आणि त्याच्या दोन्ही बाजूला एल शेप मधे जोग वाडा.... सायकल किश्शातला मित्र म्हणजे डोन्गरेन्चा नातू... आणि त्याची आज्जी म्हणजे तारा बापट बाई..... वरद आणि मी एकाच वयाचे... पण आता सगळं स्वरूप पालटलय... १-२ अपवाद सोडले तर सगळे वाडे, जुन्या इमारती पाडून नवीन बिल्डिन्ग उभ्या राहिल्यात... एकूणच मोकळेपणा कमी होत चाललाय... मराठी लोक कमी होउन परप्रान्तीयान्ची जनसंख्या वाढती आहे.... पु. ल. न्नी मिश्किलीत म्हटलं होतं... पण आता खरच म्हणायची वेळ आलिये.... "पूर्वीचं पुणं राहिलं नाही"
|
Ajjuka
| |
| Saturday, January 05, 2008 - 10:13 am: |
| 
|
पूर्वीचं पुणं राह्यलं नाही.. हे मात्र अगदी अगदी!!!
|
Anaghavn
| |
| Saturday, January 05, 2008 - 10:26 am: |
| 
|
माझ्या शाळेचं नाव--"शारदा मंदिर्--मुलींची शाळा"---आमच्या समोरच मुला-मुलींची एकत्र असलेली आमच्याच संस्थेची "सरस्वती भुवन" म्हणुन शाळा होती.(म्हणजे अजुनही आहे). तिथली मुलं आम्हाला "शारदा मंदिर काळा उंदिर" म्हणायची. आणि अम्ही त्यांना--"संडास बाथरुम"--"SB--सरस्वति भुवन"
|
Zakki
| |
| Saturday, January 05, 2008 - 3:11 pm: |
| 
|
मी मराठ्यांचा इतिहास या प्रा. डॉ. श. गो. कोलरकर यांच्या पुस्तकात खुन्या मुरलीधराबद्दल खालील गोष्ट वाचली. "(दुसर्या) बाजीरावाच्या कारकिर्दीचा अगदी प्रारंभच एका लहानशा घटनेमुळे रक्तपात घडून आला. ..... पुण्यात नाना फडणीसाच्या सासर्याने मुरलीधराचे एक मंदीर बांधले त्याच्या उद्घाटनाकरिता बॅंडच्या दोन पार्ट्या एकाच वेळी येऊन पोहोचल्या. एका पथकाचे नेतृत्व कॅप्टन बॉइड याजकडे होते. बॅंड अगोदर कोणी वाजवायचा या साध्या प्रश्नावरून एकाएकी दंगल उसळली आणि त्यात कित्येक लोक ठार मारल्या गेले. या रक्तपातामुळे मंदिराचा उद्घाटन समारंभ पुढे ढकलावा लागला. या वेळेपासूनच मंदीराला खुन्या मुरलीधर असे नाव मिळाले." ख. खो. दे. जा. माझे इतिहासाचे ज्ञान या पुस्तकावर आधारित आहे. हे कोलारकर कोण मला माहित नाहीत. त्यांचे पुस्तक कितपत खरे हेहि माहित नाही. कुणाला माहित असल्यास सांगा. म्हणजे पुन: इतिहासाबद्दल लिहायचे की नाही हे मी ठरवीन. आमच्या शाळेत इतिहास शिकवायला द. मा. मिरासदार होते. ते इतिहासा ऐवजी 'व्यंकूची शिकवणि' इ. गोष्टी लिहिण्यापूर्वी वर्गात सांगत. त्यामुळे गेल्या काही वर्षात हे पुस्तक मिळवून वाचले तेव्हढेच मला माहित आहे. 'पानिपत' नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध होते. त्यात लिहीलेली नि या पुस्तकात लिहीलेल्या पानिपतची गोष्ट नि या पुस्तकातली मिळती जुळती आहे. अर्थात् त्या गोष्टी खर्या असतील, तर त्या काळाबद्दल वाचून मला रडू येते, नि कितीही अभिमान बाळगायचा म्हंटले तरी जड जाते.
|
Psg
| |
| Monday, January 07, 2008 - 11:28 am: |
| 
|
हो झक्की? ही माहिती आजच समजली.. आपण सगळेच एक काम करूया का? नुसत्या पुण्यातच नाही, प्रत्येक शहरातच अशी ऐतिहासिक महत्त्व असलेली ठिकाणं असतील, त्याबद्दल आपल्या आई-वडीलांना, काका-काकूला, आजी-आजोबांना विचारून अशी माहिती गोळा करू.. त्या लोकांना बरंच काही माहित असतं. अशी बर्यापैकी माहिती जमली तर फ़ारेंड म्हणतो तसा वेगळा बीबीही उघडता येईल..
|
Shyamli
| |
| Monday, January 07, 2008 - 12:18 pm: |
| 
|
खुन्या मुरलीधराची मी ऐकलेली अख्यायिका अशी आहे की 'द्रविड बंधू' ....... खून केला.. म्हणून तो 'खुन्या मुरलीधर'! >>>> हो पूनम मीही हेच ऐकलय पण याच द्रविडांचा वाडा अगदि खुन्या मुरलीधरासमोर आहे आता अपार्टमेंट झालय, पण तिथल कृष्णेवराच देऊळ आहे अजूनही. काही द्रविड कुटूंब आहेत तिथे अजुनही.
|
Dhumketu
| |
| Monday, January 07, 2008 - 1:26 pm: |
| 
|
एक पुस्तक होते, पुण्याबद्दल. त्यात बहुतेक नावे कशी आली त्याची माहीती होति.. ८-९ वर्षांपुर्वी मी ते एका मित्राला भेट दिले होते. त्याचे नाव विसरलो (पुस्तकाचे, मित्राचे नाही). पण आ.ब. चौकात चौकशी केली तर मिळू शकेल. त्यात खुन्या मुरलीधर, लकडी पूल, गणेश खिंड ही आणी बरीच नावे कशी आली ते दिले होते.
|
Slarti
| |
| Tuesday, January 08, 2008 - 3:14 am: |
| 
|
झक्की, खुन्या मुरलीधराच्या नावाचा इतिहास तुम्ही म्हणता तसाच आहे. अहिताग्नी राजवाडेलिखित एका पुस्तकात (नाव आठवत नाही) मी हेच वाचले होते. 'द्रविड बंधूंची कथा' म्हणजे आधुनिक दंतकथा आहे. डुल्या मारूतीबद्दल ऐकलेली कथा अशी - कुठल्यातरी पेशव्यांच्या मनात (बहुधा माधवराव) राजधानी पुण्याहून दुसरीकडे हलवण्याचा विचार आला आणि या मारुतीला कौल मागण्यात आला. तेव्हा तो नकारार्थी डुलला म्हणून त्याचे नाव डुल्या मारुती.... कृ.जा.प्र.पा.
|
सायकलीवरुन आठवल! तेच ते, रतन सायकल मार्टच, भाऊ महाराज बोळाच्या कोपर्यावरच, समोर एक फोटो स्टुडिओ होता! तिथुन आम्ही उन्चीने लहान सायकल भाड्याने घ्यायचो, मी तेव्हा खुपच लहान असल्याने (उन्चीने आणि वयानेही) थोरला भाऊ डबलसीट घेवुन फिरवायचा, पुढे पाचवीत गेल्यावर वडिलान्ची चोविस इन्ची सायकल मधल्या त्रिकोणातुन एक पाय पलीकडे घालून चालवायला लागलो, सुरवातीला हाप पेडल, नन्तर फुल पेडल! आणि मग सन्ध्याकाळी बाबा घरी आल्यावर बाहेरून काही भाजी, किराणा वगैरे आणायचा असेल तर अस्मादिक उत्साहाने तयार, त्या निमित्ताने सायकल चालवायला मिळायची! तेव्हा आम्ही नान्देडला होतो! बरीच भ्रमन्ती करीत बाराव्वीच्या सुमारास जेव्हा सातार्यात येवुन पोचलो होतो, तेव्हा माझ्याकडे एक चोविस इन्ची सायकल आलेली होती, आणि मला ती सीट वर बसुन चालवायला कठीण जायची म्हणुन कॅरेज वर बसुन चालवित कॉलेजला जायचो! पुढे बॅडमिन्टन व रनिन्ग तसेच इतर व्यायाम शौकाने उन्ची झपाट्याने वाढली! पण त्या आधीचा बराच काळ मी खुपच बुटका होतो! दहावीत असताना आम्ही परभणीत होतो, बाबान्ची लॅम्ब्रेटा होती, रोज त्यान्ना ती अन्गणाबाहेर उम्बरठ्याला फळी लावुन काढुन द्यायचो! भावाच बघुन आणि ऐकुन चालवायलाही शिकलो! पण कस? रस्त्या कडेला फुटपाथ किन्वा रोड डिव्हायडर किन्वा दगड बघायचा, त्यावर एक पाय ठेवुन मग गाडिवर बसायचे, गाडी चालवायची, अन थाम्बताना पुन्हा दगड, रोड डिव्हायडर किन्वा फुटपाथ शोधुन त्याला पाय टेकवुन थाम्बायचे, मग उडी मारुन उतरायचे! तेव्हा ट्रॅफिक नसायचे, आख्या शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या गाड्या, वडील काही बोलायचे नाहीत, पण पेट्रोल सम्पवले तर कानपिचक्या द्यायचे! आज माझी दहावीतली दोन्ही मुले गाडी चालवायला मागतात, त्यान्ना स्कुटी वगैरे येतेही, पण मी देत नाही..... त्यान्ना सान्गतो की मला जरी माझ्या बाबान्नी चालवायला दिली तरी जर त्यावेळेस काही लफड झाल तर ते निस्तरायची त्यान्ची क्षमता होती, आर्थिक आणि शारिरीकही! माझ्यात ते गट्स नाहीत, तेव्हा अठरा वर्षे वया आगोदर मी तुमच्या हातात गाडी देणार नाही!
|
जुने दिवस चान्गले होते की वाईट ते नाही सान्गता यायचे, पण त्यान्ना एक सुन्दर रुपेरी किनार होती....! पुण्यात असताना, तेव्हा मी असेन सातवी आठवीत, वडील रोज पर्वतीवर जाण्यासाठी म्हणुन पहाटे चारलाच उठवुन पाठवायचे! आम्ही मनाशी चरफडायचो की पहाटेच्या साखर झोपेतून उठुन हा काय दाविडी प्राणायाम? आता एक होत, शुक्रवार पेठेतून निघुन पर्वती पर्यन्त अन्धारातून कोण जाणार? तेही थन्डिचे? तशात येवुन जावुन अन्गावर हाफ चड्डी अन सिटीपोस्टाबाहेरच्या नेपाळी स्वेतरवाल्यान्कडचे विरविरीत स्वेटर! जाम थन्डी वाजायची, पण मग भटकायचे तरी कुठे? थन्डीपासून तर बचाव व्हायलाच हवा, एक तर चालत रहा, उब येईल (तेवढे कळायचे ते वय होते) नाहीतर शेकोटि शोधा! आमच्या सुदैवाने, तेव्हा, बर्याचादा रस्त्यान्च्या डाम्बरी करणाची कामे कित्येक दिवस नाही तर महिने एखाध्या एरियात चाललेली असत, म्हणजे एखादी गल्ली पुरी व्हायला सहज आठवडा दोन आठवडे लागायचे! तर अशा कामान्च्या जवळ डाम्बर वितळविण्याच्या वॅगन्स असत, त्या कायमच पेटवुन ठेवलेल्या असत, तर तिथे शेकायची सोय व्हायची! पण त्या काळात, एकन्दरीतच ऐकलेल्या गोष्टीन्मुळे आमचा एक पक्का ग्रह होता (तसाच नसला तरी अजुनही शन्का आहेच) की दुष्ट लोक लहान मुलान्ना पळवुन नेवुन त्यान्ना अपन्ग करुन मुम्बईत भीका मागायला लावतात अन त्यावर स्वतः मजा मारतात! अर्थात त्यामुळे अशि शेकोटी जरी मिळाली तरी तिथली प्रजा बघुन तिथे जास्त वेळ थाम्बण्याची आमची हिम्मत नसायची मग काय करावे? तर त्या वेळेस फुले (आणि नविन मन्डई देखिल) जोसात होती, तिकडे ट्रकच्या रान्गाच्या रान्गा लागलेल्या असायच्या, आणि ट्रकच्या इन्जिन धुराच्या उष्णतेमुळे एकन्दरीत वातावरणात उब असायची, तिथली सकाळची धावपळ बघणे हा एक अतिशय करमणुकीचा तसेच शिकण्याचा उद्योग होता! तिथुन कन्टाळुन निघालो की थेट घुसायचे ते भाऊमहाराज बोळात! आख्ख्या पुण्यात त्याच्या येवढा उबदार बोळ (त्याकाळचा) माझ्या तरी पहाण्यात नव्हता! प्रमोद नवलकर ज्या काळात रात्रीच्या मुम्बईची सफर करीत होते, त्यावेळेसच आम्ही पहाटेच्या थन्डीभरल्या पुण्याचे वेगळे रूप बघत होतो, निव्वळ योगायोगच हा, नाही का? त्यावेळेस जरी पर्वतीवर जाणे टाळले होते, तरी पुढे पुन्हा पुण्यात आल्यावर कॉलेज जीवनात पहाटे चारलाच उठुन आम्ही सायकलने पर्वतीला जायचो, दोन चारदा चढौतार करायचा अन साहानन्तरची पर्वतिवरची तपकीरी, पान्ढरी अन गुलाबी गर्दी होण्याच्या आत घरी परतायचे
|
Psg
| |
| Tuesday, January 08, 2008 - 5:17 am: |
| 
|
धूमकेतू, मित्राचे नाव आठवत आहे, तर त्याला पुस्तकाचे नाव आठवते का ते विचारणार का? झक्की आणि स्लार्तींनी वाचलेला इतिहास खरा असेल, आणि असंही होऊ शकतं की द्रविड बंधूंची हत्या करायला मुद्दामच खुन्या मुरलीधराची जागा निवडली असेल.. तो मुरलीधर नाहीतरी त्यासाठी आधीपासून (कु)प्रसिद्ध होताच!! (कारण द्रविड बंधूंची हत्या झालीये ही दंतकथा नाहीये )
|
मी चौथीत असतानाची गोष्ट हे! त्या काळी सारसबागेजवळ हल्लीसारखी जत्रा नसायची, पण भेळेच्या पाणीपुरीच्या गाड्या असायच्या! तेव्हा, अगदी चौथीतही, शाळेला दान्डी मारुन आम्ही भटकत सारसबागेजवळ सकाळी नऊ दहाच्या सुमारास पोचायचो, तेव्हा तिथल्या काही भेळपाणीपुरीच्या गाड्यान्च्या मागे वेगळाच उद्योग चालु असायचा! एकजण घट्ट मळलेल्या पीठाचे बारीक बारीक गोळे करीत रहायचा, दुसरा अतीशय वेगात रेटुन त्याच्या पुरी लाटायचा व ती उचलुन तळणार्याकडच्या मोठ्या अल्युमिनियमच्या ताटलीत भिरकावयाचा! तळणारा पहिला घाणा काढला की या पुर्या सपासप उचलून तो त्या तापलेल्या तेलाच्या कढईत सराईतपणे भिरकावयाचा! आम्ही दूर उभ राहून बराच वेळ हे बघत राहायचो! दूरच उभ रहायचो, कारण चुकून त्याला शन्का यायला नको की कदाचित पुर्यान्करता तर आम्ही आशाळभूतपणे तिथे उभे नाही ना! तेवढे भान त्या तेवढ्याश्या वयातही घरच्यान्च्या शिकवणूकी मुळे होते! चुकूनही कुठे "टुकत" बसलेले आईला खपायचे नाही, ती जाग्यावर कान पिळायची! हल्लीच्या पोरान्ना "टुकत" हा शब्द तरी गेला असेल की नाही शन्का हे! पण हे अस टुकत बसणे केवळ अन्न पदार्थान्करताच अस्त अस नाही बर का! कुठे काही जण जमून काही एक करत असतील, अन तुम्हाला त्यात जाणुनबुजून घेत नसतील, तर आईने शिकविलेल्या "न टुकत" बसण्याच्या शिस्तीचा आजही फायदाच होतो! अशा परिस्थितीत, तत्काळ मान वळवून आजुबाजुच्या अन्य असन्ख्य बाबीन्ची दखल घेवुन त्यात मन रमवता येणे सहज शक्य होते! अशीच एक, पण जरा वेगळी एक आठवण हे! जुन्या दिवसातली हे म्हणुन सान्गतो हे! आमच्या शेजारी जे रहात होते, त्यान्नी बाजारहाट केला होता, महिन्याचाच काय तर आगोटीच्या कामाचा वर्षाचा किराणा आणला होता अन त्यान्च्या खोलीत बसून पुड्या उघडणे, डब्यात भरणे इत्यादी कार्यक्रम चालू होते, कसा कोण जाणे, पण चाळीच्या कॉमन गॅलरीतून फिरत फिरत मी नेमका त्यान्च्या खिडकी जवळ पोचलो, आत लक्ष गेले, वरील प्रमाणे आत काम चाललेले होते, मी उलट्या पावली परत फिरू लागलो तोच त्या काकुन्नी मला बघितले आणि थाम्बविले, आत बोलावले व आणलेल्या किराणातून मी नको नको म्हणत असतानाही बेदाणे काढून माझ्या हातावर ठेवले. मी पण येवढा शहाणा की ते सम्पवुन टाकायच्या ऐवजी घरी घेवुन गेलो, अन "तू तिकडे गेलासच का" या अर्थाने आईचा असा काही शाब्दीक मार खाल्लाय की बोलता सोय नाही! तरी बर मी तिथे मुद्दमहून गेलो नव्हतो! पण काळ्या दगडावरच्या रेघेसारख्या या शिकवणी मेन्दूत कोरल्या गेल्यात! आज आई मला विचारणार नाहीये, की अमक्या तमक्या ठिकाणी तू गेलासच का! पण जेव्हा हा प्रश्ण माझा मलाच पडतो तेव्हा एकतर त्याचे सोईस्कर उत्तर शोधुन ठेवावे लागते अन्यथा नेक्स्ट टाईम जाणे टाळावे लागते! विषय जुन्या दिवसान्चा हे! मग या गोष्टीचा सम्बन्ध काय? तर तेव्हान्च्या अशा शिकवणी अजुनही असतात का? माझ्या घरात द्यायची वेळ येते का? प्रश्ण अनेक हेत! उत्तरेही आहेत, पण तो या बीबीचा विषय नाही! येवुन जावुन, गेले ते जुने दिवस, अन ती ती माणसे! पण वरल्या बेदाणे देण्याच्या गोष्टीवरुन एक सन्दर्भ आठवला तो लिहितो! एक म्हण हे, "पदरच खाव, पण नजरच खावू नये"! त्याचबरोबर, घरात आणलेले जिन्नस वगैरे "इतरान्च्या नजरेपासून" जपुन ठेवावेत, त्याच जाहीर प्रदर्शन करू नये असा खाक्या त्या काळी असायचा, लिम्बी अजुनही तो पाळते! माझी नजर गेली होती असे वाटल्याने तर मला बेदाणे दिले नसतील ना? आजही मी आख्ख्या आठवड्याची भाजी घेवुन घरी आलो तर अन ती जमिनीवर ओतुन मग तो पसारा भरत बसलो तर लिम्बी करवादते की तेवढ्यात कुणी बाहेरचे आले नि त्याच्या नजरेस हे पडले तर? काय होते त्याचे माझे खास अनुभव हेत, पण तो विषय इथे नको! पुरेस बोअर मारल ना?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|