|
Gs1
| |
| Monday, April 17, 2006 - 7:55 am: |
| 
|
शनिवार १५ एप्रिल, खर तर दहा दिवसापुर्वीच बरीच मेलामेली होऊन आता पुढचा ट्रेक पावसाळ्यातच असे ठरले होते. पण गुरूवारीच पौर्णिमा झाली होती, त्यामुळे एखदा मूनलाईट ट्रेक करावा असा विचार बळावला. झटपट जमवाजमव झाली आणि शनिवारी रात्री आठच्या सुमारास गिरी, कूल, आरती आणि अर्जुन असे आम्ही पाच जण गाडी घेउन निघालो. पहिले लक्ष्य होते ते कोरलाईचा छोटासा किल्ला. पुणे मुंबई द्रुतगती मार्गाने निघालो, लगेचच सगळ्यांचे भूक, भूक सुरू झाले. मुंबईकडे जातांना लोणावळ्यानंतरच्या टोल प्लझाच्या अलिकडे जो पेट्रोल पंप आहे तिकडे एक श्री दत्त उपहारगृह आहे. तिकडे मिसळ, कोथिंबीरवडी, सबुदाणा खिचडी, खरवस वगैरे पदार्थ फार झकास मिळतात, पण त्यांची वेळ संपत आल्याने आम्हाला मिळाले नाहीत. पुढे पनवेलला गोवा नाक्यावरही त्यांचे मुख्य दुकान आहे, तेही बंदच होते. अलिबागमार्गे जायचे असल्याने पनवेलला मुंबई गोवा महामार्गाला लागलो, आणि पेण मार्गे अलिबागला पोहोचलो. हे अंतर तसे दीडशे किमी आहे, पण बराचसा प्रवास द्रुतगती मार्गाने झाल्याने जाणवले नाही. अलिबागहून मुरुड रस्ता पकडला चौल, रेवदंडा असे करत कुंडलिका नदीच्या खाडीवरच्या साळाव पुलापाशी आलो. (१८ किमी) इथे डावीकडे वळाले की चाळीस किमीवर रोहा. पुलावरूनच उजव्या बाजूला पाहिले की एक टेकडी समुद्रात घुसलेली दिसते. तिच्या तीन बाजूंना समुद्र आहे तर एका बाजूला खाडी. एका अगदी चिंचोळ्या पट्टीने ती मुख्य भूमीवरच्या कोरलाई गावाला जोडली आहे. आम्ही पुलावरून उजवीकडे मुरुडच्या दिशेने वळलो, लगेच कोरलई गाव आले. एव्हाना रात्रीचे बारा वाजले होते, गावात अजिबातच जाग नव्हती. त्यात पडकी घरे वगैरे बघुन काहींना भीती पण वाटू लागली होती. कोरलईचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे हे असे एक गाव आहे की जिथे सर्व व्यवहार हे पोर्तुगीज भाषेतून चालतात. कलौघात या पोर्तुगीजमध्ये कोकणी मिसळुन एक वेगळेच रसायन तयार झाले आहे असे वाचले होते. गावातल्या गल्ल्यांमधून पुढे जात शेवटी एका टेंपोमध्ये एक मनुष्य जागा दिसला. त्याला विचारून रस्ता बरोबर असल्याची आणि वरच्या माहितीची खात्री करून घेतली. त्यावर गावाच्या अर्ध्या ( ख्रिश्चन ) भागात असे आहे, आणि त्या लोकांना फिरंगी असेच संबोधले जाते असे कळले. गावाबाहेर पडलो, एका बाजूला समुद्र आणि दुसर्या बाजूला खाडी अशा अरूंद पट्टीवरून टेकडीनजीकच्या किनार्यावर आलो, किनार्याला लागून एक कच्चा रस्ता वर चढत होता. मध्येच थांबलो, आणि गाडीतून उतरलो. चंद्र माथ्यावर होता, समुद्राला उधाण आले होते, दूरवर नौकांचे दिवे दिसत होते. तो निर्मनुष्य किनारा, लाटांचा आवज, समुद्रावरचा वारा आणि रात्र अनुभवत थोडा वेळ थांबलो. अचानक त्या समुद्रातून एक मनुष्याकृती उगवली आणि आमच्याकडे बघुन काहीतरी ओरडू लागली, पण आम्ही तसेच पुढे गेलो. तो कच्चा रस्ता एका दीपगृहापाशी संपत होत. तिथेच गाडी लावली, तेवढ्यात तो मनुष्य मागून हजर. त्याने मासे पकडुन आणले होते आणि पाहिजेत का ? हेच तो ओरडुन विचारत होता. दीपगृहावरून सुरू होणार्या पायर्या वर किल्ल्याच्या तटाला भिडल्या होत्या. दहा पंधरा मिनिटात पटापट चढुन वर आलो. वरचे वातावरण एकंदरच गुढ वाटत होते. बरेच उध्वस्त बांधकाम, एक पडके चर्च, खालच्या दीपगृहातला प्रकाशाचा फिरता झोत, चहूबाजूंना पाणी, गडावर अर्थातच आम्ही सोडुन कोणीच नाही त्यामुळे मग लोकांना किले का रहस्य वगैरे मालिकांची आठवण येऊ लागली. एकंदर 'काहीतरी' घडायला एकदम योग्य वातावरण होते. हा तसा फार जुना किल्ला नाही. मुसलमानांनी बांधला, पोर्तुगीजांनी जिंकला, संभाजीराजांनीही एकदा घेणाचा अयशस्वी प्रयत्न केला आणि शेवटी चिमाजीअप्पानी स्वराज्यात दाखल केला, बुरुजांची फिरंगी नावे बदलून गणेश बुरूज वगैरे मराठी नावे दिली, दोन देवळेही बांधली. आता सगळेच एकेमेकांशेजारी पडीक अवस्थेत नांदत आहे. सगळा किल्ला पालथा घालून, एका टोकाला येऊन बसलो, उकाडा बराच होता, अधुन मधुन येणारी वार्याची झुळूक हाच काय तो दिलासा. तटबंदीवर बसून, समोरचा अथांग सागर, ढगांच्या आडुन चंद्राने चालवलेला पाण्याला मधुनच झळाळी आणण्याचा उद्योग असे सर्व पहात रात्रीचा एक एक घुटका घेत थोडा वेळ नि : शब्द आणि अंतर्मुख झालो. आयुष्याचे गतिमान 'जेट' एखाद्या रात्रीपुरते पुर्ण थांबवून उद्याच्या, परवाच्या कामांचा कुठलाही विचार न करता निव्वळ शांतता अनुभवायची असेल तर ती अशा उघड्या आकाशाखाली, अथांग समुद्राच्या काठी, वा चहुकडे अफाट पसरलेल्या दर्याखोर्यातच अनुभवायला मिळते. शांतपणा ही मनाची एक अवस्था आहे, त्यासाठी कुठे जायची गरज नाही हे वाचायला ठीक आहे, बुद्धीला पटते, तरीही दिल ढूंढता है, फिर वही, फुरसत के रात दिन.. कधीतरी रात्री अडीच तीनला वगैरे सपाट जमीन शोधुन पथार्या पसरल्या.
|
Gs1
| |
| Monday, April 17, 2006 - 8:58 am: |
| 
|
पहाटे चार वाजल्यापासून थंडी वाजू लागली होती. पाच वाजता गजर वाजू लागले, एकमेकांना उठवण्यात सहा वाजले, मग ओहोटीची वेळ साधण्यासाठी गडबडीने अलिबागकडे निघालो. अलिबागच्या समुद्रात एक मैलावर एका मोठ्या खडकावर कुलाबा किल्ला वसलेला आहे. समुद्रावरचा शिवाजी, म्हणजे कान्होजी आंग्रेंचे हे गाव. जोपर्यंत ते होते तोपर्यंत आपले किनारे आपले राहिले. कुलाबा किल्याला पूर्ण ओहोटी असेल त्याच्या आगेमागे दोन तासात पायीच जाउन येउ शकतो. पण एकदा भरतीचे पाणी भरायला सुरूवात झाली की मग आत असाल तर आतच थांबणे इष्ट. अशा वेळेला ओलांडण्याच्या प्रयत्नात आत्तापर्यंत सत्तावीस जणांनी प्राण गमावले आहेत. ओहोटीची वेळ काढणे तसे सोपे असते, जी काही तिथि असेल त्याच्या तीन चतुर्थांश केले की भरतीची वेळ येते. त्याच्या आधी किंवा नंतर सहा तासांनी ओहोटी. तृतीया असल्याने आम्ही बरोबर आठच्या सुमारास किल्ल्यात गेलो. दक्षिणेकडच्या तटबंदीच्या खिडक्यात बसून परिसर न्याहाळाला. एका बुरूजावर दोन तोफगाड्याही आहेत. त्यावर बसलो. आतले गोड्या पाण्याचे मोठे कुंड आणि प्यायच्या पाण्याची भुमीगत विहिर पहाण्यासारखी. त्या काळात सर्व डोंगरी वा सागरी किल्ल्यांवर असे नेमके पाण्याचे स्थान कसे शोधत असतील असा मला नेहेमी प्रश्न पडतो. तासाभरात परत फिरलो. पाण्याचे एकून रंगरूप बघुन त्यात डुंबण्याची इच्छा सुद्धा झाली नाही. एका हॉटेलात फ्रेश होउन अक्षी नागाव समुद्रकिनार्यावर गेलो. तिथे आरतीने बरीच तयारी करून आणलेल्या पदार्थांवर तुटुन पडलो. आता पुढचे लक्ष्य होते अवचितगड. त्यासाठी रोह्याला जायचे होते. पुन्हा मुरूड मार्गावरून प्रवास सुरू केला. वाटेत चौलला फफे यांच्या उपहारगृहात गेलो. तिथली लस्सी पिउन सगळे जण अगदी तृप्त झाले. तासाभरात रोह्याला पोहोचलो.
|
Gs1
| |
| Monday, April 17, 2006 - 1:44 pm: |
| 
|
रोह्याकडे जातांनाच वाटेत बिर्लांनी बांधलेले शुभ्र संगमरवरातले गणेश मंदिरही लागते. पण ते साडेअकराला बंद होत असल्याने आम्ही तसेच पुढे गेलो. रस्त्याने बराच काळ कुंडलिका नदी साथ करते. एवढ्या उन्हाळ्यातही ती बर्यापैकी भरून वहात होती. रोह्यावरून नागोठणेकडे वळलो, वाटेत एक पडम नावाचे गाव लागते, तिकडुन एक रस्ता अवचितगडावर जातो. अजुन एक रस्ता पिंगळसई या गावाहूनही जातो. पण पुढच्या मेढे या गावाहून जाणारा रस्ता हा जरा सावलीतून जाणारा असल्याचे पडमध्ये एका दुकानदाराने सांगितले. मेढेला गेलो ( रोह्यापासून ७ किमी), तिकडे विठ्ठलाच्या देवळाजवळ गाडी लावली आणि त्या भाजून काढणार्या उन्हात दुपारी एक वाजता वर चढायला सुरूवात केली. अवचितगडाच्या पुर्वेला साधारण तेवढ्याच उंचीचा एक डोंगर आहे. सुरूवातीची वाट ही त्या डोंगरावरून दोघांच्या मधल्या खिंडीकडे जात रहाते. त्यामुळे हा सर्व रस्ता अवचितगडाचे उजवीकडे जवळून दर्शन होत रहाते. गर्द रानातला अवचितगड असे वर्णन वाचले होते. त्यामुळे वासोट्यासारखे जंगल असेल अशी गोड कल्पना करून गेलो होतो. पण तसे काही नव्हते. अर्थात अगदी सिंहगडासारखे उजाडही नव्हते, अधुन मधुन झाडा - झुडपांची सावली आणि मधुनच येणारी वार्याची झुळुक याचा मोठा आधार वाटत होता. कोकण रेलवे गडाला वळसा घालून जाते, मध्ये एकदा तिनेही दर्शन दिले. धापा टाकत दोन तासांनी गडावर दाखल झालो. एकात एक गुंफलेली पाण्याची सहा टाकी आहेत गडावर, प्रत्येक टाक्यातल्या पाण्याचा रंग वेगळा हे एक वैशिष्ट्यच. पण पाणी बरेच खराब झाले होते. टाक्यांच्याच वरच्या बाजूला, एक अत्यंत सुरेख द्वादशकोनी तलाव आहे. आत उतरायला प्रशस्त पायर्या आहेत. तलाव आटला होता, त्यामूले पार तळापर्यंत उतरून गेलो. आत विलक्षण थंडावा होता, मग तेच विश्रांतीस्थळ केले. प्रतिध्वनींचे खेळ केले झेंडा लावलेल्या उत्तर बुरूजावर जाउन आलो, परिक्रमा केली. गडाच्या दक्षिणेकडची दूरवर पसरलेली हिरवीगार शेते बघुन आश्चर्य तर वाटलेच, पण डोळ्यांनाही छान थंडावा मिळाला. पावसाळ्यात किंवा पाउस संपल्यावर लगेच इकडे यायला फारच मजा येईल असे बोलत चार वाजता गड उतरायला सुरूवात केली. रोह्याला परतलो आणि तसेच पुढे कोलाडकडे निघालो. वातेत कुंडलिकेच्या एका लोभस वळणावर राहवले नाही, आणि उशीर होत होता तरी नदीत उतरलो. ट्रेकचा बराचसा शीण त्या खळाळात्या पाण्याने वाहून नेला. काठावरच इंस्तंट भेळ तयार करून खाल्ली आणि पुढे निघालो. रोह्यापासून कोलाड हे मुंबई गोवा महामार्गावरचे ठिकाण गाठले, तिथुन थेट ताम्हिणी घाटाने संधीप्रकाशातले सह्याद्रीचे रुद्रभीषण सौंदर्य बघत मुळशीमार्गे (१३० किमी) पुण्याला २४ तासात सव्वाचारशे किमी भटकुन, ३ किल्ले पदरात पाडुन नऊच्या सुमारास पोहोचलो. आता पावसाळ्याची वाट बघायची, पण कोण जाणे मेमध्ये असाच एखादा ट्रेक होईलही...
|
जीएसभाय, काल आरतीला फोन केला तर ती नुकतीच गडावरून उतरल्यागत वाटली... एका फटक्यात बरेच गड काबीज केलात ते आता कळलं... Keep it up .. बरं वाटतं वाचून...
|
Gs1
| |
| Tuesday, April 18, 2006 - 10:57 am: |
| 
|
विनय, पुढच्या वेळेला यायचे आहे तुम्हालाही... लक्षात आहे ना ?
|
सध्या घरातल्या घरात जिन्याच्या दहा पायर्या चढून प्रॅक्टिस करतो आहे... 
|
Moodi
| |
| Tuesday, April 18, 2006 - 9:21 pm: |
| 
|
मुसाफीर हूं यारो... काय जी एस एवढी मस्त ट्रिप करता मग फोटो कधी टाकणार? घाई नाही, पण उत्सुकता नक्कीच आहे. 
|
GS चक्क भर उन्हात ट्रेक... कल्पनाच करवत नाही... मान गये उस्ताद पुढल्या वेळी बिर्ला मंदिर चुकवू नका
|
Dilippwr
| |
| Thursday, April 20, 2006 - 6:54 am: |
| 
|
आठ्वड्या पुर्वी कोयनानगर ला जावुन आलो निमित्त होते एक नतलग पर्देशात असतात त्यानां कोयना पाहायचे होते.सकाळी निघालो गाडिने तिथे मागच्या वेळेला जेवण चांगले मिळाले नव्हते.म्हणून एका ओळ्खीच्या खाणावळीत जेवण सांगितले होते.त्याचा निघायच्या वेळेला फोन आला की आज कोयनेत मटण नाही तूंम्हीच घेउन या.मग मिच बाजारात जावुन मासे आणले. छान पैकि वाम मिळाली.कोयनेत ११ ला पोचलो.तिथे मासे दिले व फ़्रेश होउन बोटिंग साठि निघालो.बोट अधिच बूक करावि लागते.खाणावळवाल्याने बरोबर एक स्टोव एक माणुस दिला होता.बोटिन्ग करत जवळपास २०कि.म. आत गेलो दोनी बाजुला अतिशय दाट जंगल आहे.व अतीशय शांत आही
|
Cool
| |
| Thursday, April 20, 2006 - 7:00 am: |
| 
|
शुक्रवारी संध्य्काळि GS चा फोन आला, GS चा फोन म्हणजे नक्की भटकंतीचा कार्यक्रम असणार असा अंदाज केला आणि अगदी तसेच झाले. आपण एक मूनलाईट ट्रेक साठी वैराटगडावर जाणार आहोत असे GS ने सांगितले, माझी अर्थातच तयारी होतीच. मग शनीवारी खुप प्रयत्न करुन साडे सहा सातच्या आसपास office मधुन सुटका करुन घेतली, तोपर्यंत इतर सर्व जण येउन जमले होते आणि माझ्या मुळे उशीर झाला होता. मी पोहोचताच आमचा प्रवास सुरु झाला. प्रवास सुरु झाल्यावर मल कळले की वैराटगडावर जायचे नसुन कोकणात जायचे आहे. अंधार पडु लागला होता आणि गप्पांच्या साथीने आमचा प्रवास सुरु होता, मुंबई गोवा महामार्गावर क्षणभर विश्रांती नावाच्या एका hotel मधे पोटपूजा करुन आम्ही निघालो. हळुहळु कोकणात प्रवेश करत होतो, मला कोकणचे आणि समुद्राचे खुप आकर्षण आहे त्यामुळे तो कोकणातला रस्ता, उंच उंच नारळांची झाडे, कौलारु घरे, स्वच्छ अंद्र प्रकाशात या सर्वांचा आनंद घेत आम्ही जात होतो, रस्त्यात कोकणातील एका गावात पटांगणात सार्वजनीक रितिने चित्रपट पाहण्याचा कार्यक्रम सुरु होता, सर्वांनी अगदी एका क्षणात तो चित्रपट कुठला आहे ते ओळखले. अशा प्रकारे चित्रपट पाहण्याचे दिवस अजुन सुरु आहेत हे पाहुन बरं वाटलं. थोड्याच वेळात आम्ही कुंडलीका नदी जिथे समुद्राला मिळते त्या ठिकाणि एका पुलावर येउन पोहोचलो, समोर विक्रम इस्पात कंपनीचा प्रकल्प दिसत होता, चंद्र आता बर्यापैकी वर आल होता आणी उजव्या बाजुला कोर्लई गड दिसत होता, पाच मिनिटातच आम्ही गावात पोहोचलो. चौकशी करुन किल्ल्याच्या दिशेने निघालो. दोन्ही बाजुने मासे वाळत ठेवलेले दिसत होते आणी वातावरणात एक वास भरुन राहिला होता. तो सुगंध होता की दुर्गंध याची व्याख्या नाही करु शकणार, पण शाकाहारी व्यक्तीला सुद्धा किमान एकदा मासा खाउन बघण्याची इच्छ व्हावी असा काहीसा तो वास होता. ठोड्याश्या अंतरावर एक दिपस्तंभ दिसत होता, आणि किल्ल्याच्या तिनही बाजुने समुद्र पसरलेला होता. लगबगिने आम्ही दिपघराच्या जवळ पोहोचलो. आणि झटकन किल्ल्यावर जाण्यासाठी सज्ज झालो. थोड्याश्याच पायर्या चालुन आम्ही गडावर पोहोचलो आणी मागे वळुन पाहीले तर डोळ्यांच पारणं फिटण्यासारखं दृश्य दिसत होतां, चंद्राचा शीतल प्रकाश, लाटांचा आवाज, दुरवर मिणमिणारे दिवे, दिपस्तंभाच्या दिवाची एकसारखी होणारी हालचाल, आटोपशीर किल्ला. आम्ही सुरुवातीला डाव्या बाजुला एका बुरुजापर्यंत जावुन आलो. आणि मग मुळस्थानी परत येउन किल्ल्यातुन फिरायला सुरुवात केली. जी एस ने आठवणिने गडाचा नकाशा बरोबर आणला होता त्यामुळे त्यावरील खाणाखुणा शोधत आम्ही पुढे जात होतो. किला फिरत असतांना त्यावरील पोर्तुगीज अस्तित्वाच्या खुणा दिसत होत्या, त्यंचे जग जिंकण्याचे प्रतीक असणारे चिन्ह कोरुन ठेवलेले होते. समोरच एक पडके चर्च होते. गडावर बर्याच ठिकाणि भिंतींना तडे देउन उगवलेली झाडे होती आणी त्यांचा आकारही खुपच वेगळा आणि आकर्षक होता. चंद्रप्रकाश असल्यामुळे आम्हाला हे सर्व अगदी व्यवस्थीत दिसत होते. समुद्रावरुन येणारा वारा अंगाला भिडत होता. चर्च पासु थोड्याश्या अंतरावर पुढे एक छोटेसे मंदिर, त्यासमोरील तुळशी व्रुंदावन दिसले. तिकडे एक मला खुप आवडणारे चाप्याचे झाड होते आणि ते फुलांनी बहरुन गेले होते. त्या सुगंधाच भरभरुन आस्वाद घेतला. त्याच्या बाजुलाच एक पत्र्याचे कुलुपबंद शेड होते, कदाचीत गडावरील सामान ठेवण्याची जागा असेल. तिथुन पुढे बुरुजाकडे निघाल्यनंतर आमच्या समोरुन बकर्यांचा एक कळप धावत गेला. त्यांना बघुन जी एस ने मेंढ्या आहेत म्हणजे मेंढपाळ असेलच असे सुचक उद्गार काढले. मग आम्ही बराच वेळ बुरुजावर बसलो. अगोदर गप्पा मारल्या आणि नंतर सगळेच निशब्द झाले. ही निशब्दता झोपेमुळे मात्र झाली नव्हती, पण ते जादुई वातावरणच आम्हाला निशब्द करत होतं. समोर चंद्र आणि समुद्र यांच्यात प्रकाशाचा खुप छान खेळ सुरु होता. अगदी भरभरुन त्या शांततेचा आनंद प्रत्येकाने घेतला आणि मग झोपण्या साठी जागा शोधुन आडवे झालो. सकाळी भरती ओहोटीचे गणित साधुन कुलाब्याच्या किल्ल्यवर जायचे आहे असे जी एस ने अगोदर बजावले होते त्यामुळे सकाळि सगळेच वेळेत उठले. सकाळच्या उजेडात रात्री बघितलेल्या किल्ल्यावरील खाणखुणा परत पाहिल्या आणि धावत पळत पायथा गाठला. पुन्हा मागे प्रवास करुन आलिबगला येउन पोहोचलो.
|
Cool
| |
| Thursday, April 20, 2006 - 7:03 am: |
| 
|
ओहोटी होती त्यामुळे कुलाब्याच्या किल्ल्यावर जाण्यासाठि अगदी मोकळा रस्ता होता, सुज्ञ लोकांनी शुज गाडित ठेवले आणि इतरांनी ते हातात घेतले आणि वाळुवरुन किल्ल्याकडे निघालो, रविवार असल्यामुळे गर्दी होतीच, काही लोक घोडागाडीतुन किल्ल्याकडे जात होते. किल्ल्यात पोहोचल्यनंतर तिकिट काढुन आत प्रवेश केला. या किल्ल्यात एक खुप सुंदर मंदीर आहे, आणि सकाळच्या वेळची प्रसन्नता अगदी ठळकपणे जाणवत होती. मंदिर बघुन आम्ही परिक्रमा करायला सुरुवात केली. समुद्राच्या मधोमध किल्ला असुनही त्यात गोड पाण्याची एक विहिर आहे हे एक वैशिष्ट्य, या किल्ल्यावर सुद्धा अनेक चाप्याची झाडे होती. मग सर्वा बाजुने किल्ला बघत असतांना एक नजर लाटांकडे होतीच कारण एकदा पाणी वाढले की संध्याकळ पर्यंत सुटका नाही. किल्ला फिरत असतांना जी एस ने खिशातुन एक कागड काढुन यानंतर आपण अवचितगडावर जाणार असल्याची एक सुचना मला दिली, आणी इतर लोकांचे सुद्धा तयारी करुयात असे ठरले. मग सर्वांना त्याची सुचना दिली आणी बरीच भवती न भवती होउन जाण्याचे निश्चित झाले. मग या किल्ल्यातुन निघुन आम्ही पुन्हा आलिबाग मधे येउन पोहोचलो, एका hotel मधे fresh होउन पुन्हा आक्षी च्या बीच वर जावुन सोबत आणलेल्या पदार्थांवर ताव मारला. आणि अवचित गडाच्या दिशेने प्रयाण केले. मधे फफे यांच्या प्रसिद्ध hotel मधे मिसळ, लस्सी घेउन पुन्हा आम्ही आलिबग रोहा रस्त्यावर आलो. बराच वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही अवचीत गडाच्या जवळ येउन पोहोचलो. अवचित गडाचे वर्णन करतांना जी एस ने घनदाट जंलातील गड असे केले असल्यामुळे सर्वांनी येण्याची तयारी दाखवली होती पण आम्ही ज्यादिशेने गड पहात होतो त्या दिशेने घनदाट सोडाच पण साधे जंगल सुद्धा नव्हते. आता एवढ्या उन्हात कसे जाणार असा प्रश्न होता, मग आम्ही वळसा घालुन दुसर्या दिशेला गेलो. गावातील गावकर्यांना दिशा विचारुन, आम्ही मेढे गावातील विठ्ठल मंदिरासमोर येउन पोहोचलो. उन बर्या पैकी वाढले होते, पण या दिशेने निदान झाडांची संख्या बर्यापैकी होती त्यामुळे लगेचच निघालो. उन्हाचा त्रास होतच होता त्यामुळे सावकाश जात होतो, मधेच सावली बघुन थांबुन पुन्हा पुढे सुरु असे सुरु होते, खाली एका बाजुला चक्क हिरवेगार शेत दिसत होती. त्या रणरणत्या उन्हात हिरवीगारे शेत बघुन मन सुखावलं. मधेच कोकण रेल्वेने सुद्धा दर्शन दिले, ते सुद्धा शिट्टीचा वेगळा आवाज देउन. आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. किल्ल्यावरील सहा तळी बघितली, प्रत्येक तळ्यातील पाण्याचा रंग वेगळा होता. पाणी अर्थातच खराब होते. मग बाजुला असलेले द्वादशकोनी तळे बघितले, या किल्ल्यावर तर चाप्याची अनेक झाडे होती, उन्हात ती फुले चमकत होती. मग दुरवर असलेला झेंड बुरुज बघितला आणी आम्ही परतायला सुरुवात केली. उतरायला खुपच कमी वेळ लागला. पायथ्याशी असलेल्या विहिरीतुन गावतील लोक पाणी शेंदत होते, तिथे पाणी शेंदुन घेतले. त्या थंडगार पाण्याने शिणवटा पळवुन लावला. आता पुन्हा घराकडे परतायला सुरुवात झाली. जी एस ने आखलेल्या plan मधे खांदेरी-उंदेरी या दोन किल्ल्यांचा सुद्धा समावेश होता पण सर्वांचीच अवस्था बघुन तो विचार 'पुन्ह कधितरी येउ' असे म्हणुन रद्द करावा लागला. परतत असतांना एका वळणावर कुंडलीका नदीच्या पात्रात, त्या निळ्यात पाण्यात बसण्याची संधी मिळाली. मग एकिकडे भेळीचा आस्वाद घेत, प्रत्येकाने ती वेळ काल रात्री पासुनचे क्षण आठवण्यात घालवली. ताम्हीणी घाटातुन प्रवास करत आम्ही पुण्यात पोहोचलो. केवळ चोवीस तासात चारशे साडे चारशे कि मी चा प्रवास आम्ही केला होता, शारीरीक थकवा होताच पण गेले अनेक दिवस ट्रेक नसल्यामुळे मनाला आलेली मरगळ या चोवीस तासांनी दुर केली होती.
|
Aj_onnet
| |
| Thursday, April 20, 2006 - 11:32 am: |
| 
|
जीस, कूल, छानच वर्णन रे. आता काही photo पण येवू द्यात. मी असे किती trek मिसणारे कुणास ठाउक?
|
Dineshvs
| |
| Friday, April 21, 2006 - 12:42 am: |
| 
|
माझा चान्स हुकला तर. पण जंजिरा का नाही बघितला. कासे ईथला जलदुर्ग पण लांबुन बघता येतो. ( तिथे जाणे अशक्य आहे. ) मुरुड जवळच एका टेकडीवर दत्ताचे देऊळ आहे, तिथुन मुरुड गाव खुप छान दिसते.
|
Gs1
| |
| Friday, April 21, 2006 - 12:41 pm: |
| 
|
छान लिहिले आहेस रे कूल. फोटो टकतो लवकरच. दिनेश, तू मुंबईतच आहेस हे नंतर कळले, नाहीतर... जंजीरा दिवेआगारला जोडुन योजला आहे, कधी ठरतेय ते बघायचे..
|
Champak
| |
| Friday, April 21, 2006 - 1:14 pm: |
| 
|
तिथे जाणे अशक्य आहे. >>>>> चॅलेंज हे का? मस्त चाललीय कि भटकंती!
|
Dineshvs
| |
| Friday, April 21, 2006 - 5:22 pm: |
| 
|
जंजिरा ला जायला राजापुरी गावातुन होड्या मिळतात. हा किल्ला २० वर्षांपुर्वी नांदता होता. किनार्यापासुन जवळच दिसत असला तरी अशांत समुद्र आणि खडक यामुळे लांबचा वळसा घालुन जावे लागते. जंजिरा अभेद्य होता, तावर तोफा डागता याव्यात म्हणुन काश्याचा किल्ला बांधला होता. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही, आता तो किल्लाहि पडझडीला आलाय, तिथला समुद्रहि खवळलेला असतो, आणि कोणीहि होडीवाला तिथे जायला तयार होत नाहि.
|
Jo_s
| |
| Saturday, April 22, 2006 - 5:24 am: |
| 
|
जिएस, कुल मस्तच, वाचतानाही मजा आली तुम्हीतर किती एन्जॉय केलं असेल सुंदर वर्णन सुधीर
|
Mrunmayi
| |
| Wednesday, April 26, 2006 - 8:44 am: |
| 
|
GS जंजिराला नक्कीच जा. छानच आहे. तुम्हाला शिडाच्या होडीतून जाता येते पायथ्यापर्यंत.. तोही एक छान अनुभव आहे. बाकी प्रवास वर्णन छानच लिहीले आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|