Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
shraddhak
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » shraddhak « Previous Next »

माझ्या रंगीबेरंगी BB बद्दल सर्व संबंधितांना मनापासून धन्यवाद.

जिथे मी गुलमोहरावर पण नियमित लिहू शकत नाही तिथे खास रंगीबेरंगी BB मध्ये काय लिहिणार हा मोठाच प्रश्न आहे.

चौफ़ेर लेखन करण्यासाठी मला सुचलेल्या या काही कल्पना :-

१. कापसावरील कीड आणि कीटकनाशक फ़वारणीसाठी योग्य रीत लेखमाला)
२. १०१ शेंगदाण्याच्या पाककृती पॉकेट बुक आवृत्ती ताबडतोब उपलब्ध होईल याची सुगरण भगिनींनी नोंद घ्यावी.)
३. ' पावसात खेळणारे हत्तीचे पिल्लू आणि त्याला रागवणारी आई हत्तीण ' खास बालवाचकांसाठी कथा यासोबतची चित्रे देखील लेखिका स्वत : च काढणार आहे याची भयग्रस्त वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.) याचसोबत या कथेचे बोबड्या बोलीतील audio version ही उपलब्ध करून दिले जाईल.
४. तुमच्या पाळीव प्राण्याला नीट दिसते आहे का? काही प्राथमिक चाचण्या!
५. प्रसंगाला अनुरुप टॅटूज कसे काढून घ्यावेत?

.... अजून कोणाला माझ्या चौफ़ेर लेखनासाठी योग्य कल्पना सुचत असल्यास कृपया कळवा. दर आठवड्याला एक भाग्यवान विजेता निवडला जाईल व त्याला एक ' बुधवार वृत्तांत ' बक्षीस मिळेल.
एक वाहून गेलेला बुधवारचा वृत्तांत!

सुपरथरकाप

साल २००५

अलार्म क्लॉकने संध्याकाळी सात ला गजर केला तसा अरुण उठला आणि बुधवारच्या व्रताला जाण्यासाठी तयार होऊ लागला.

अरुण हा एक पक्का बुधवारकर होता. बुधवारच्या व्रताला जातीने हजर राहणे हे तर त्याचे काम होतेच परंतु नवीन लोक शोधून त्यांना बुधवारच्या कार्यक्रमात सामील करून घेणे हेही त्याच्या अखत्यारीत येत होते.

.....तो बाहेर जायला निघाला पण त्याला दरवाजा सापडेना. कुठल्यातरी अदृश्य शक्तीने त्याच्या घराचा ताबा घेतला होता. अरुण आपल्या घरातच अडकून पडला होता. नाईलाजाने त्याने फोन करून त्याला बरे नसल्यामुळे व्रताला येता येणार नाही असे कळवले. कारण घरावर कुठल्यातरी अदृश्य शक्तीचा ताबा आहे आणि ती त्याला बाहेर जाण्याचा दरवाजा सापडू देत नाहीय या गोष्टीवर बुधवारी तरी कोणी विश्वास ठेवला नसता.

------------------------------------

तिकडे RP(rahulphatak) ने बुधवारसाठी जाताना रिक्षाने जायचे नाही असे पक्के ठरवले होते.

त्यानुसार तो बसची वाट पाहत होता. तेवढ्यात एक रिक्षा जवळ येऊन थांबली.

" बसा की साहेब रिक्षात. " रिक्षावाल्याने RP ला दरडावून म्हटले. त्याचा तो आवाज ऐकूनच की काय RP निमूटपणे रिक्षात चढला.

" मला... " त्याचे वाक्य तोडत रिक्षावाला गरजला.... " माहीतेय तुम्हाला कुठं जायचंय ते साहेब. गुमान बसून र्‍हावा. " एका उजाड माळावरून रिक्षा भरधाव वेगाने चालली होती.
.. एका ठिकाणी रिक्षा थांबवून त्याने RP ला उतरायला सांगितले. आसपासचा ओसाड परिसर पाहून RP ला भीती वाटू लागली.

" किती झाले? "
" पावणे पन्^नास रुपये... खात्री नसेल तर हे बघा. " असे म्हणून रिक्षावाल्याने बसल्या जागी हात लांबवून रिक्षाच्या सीटच्या मागे असलेले दरपत्रक काढले. ते करताना त्याचा ड्रायव्हरचा ड्रेस थोडासा सरकला व RP ला त्याचा जर्द हिरवा, चमकणारा स्किन फ़िट T-shirt दिसला. ' काळरात्र ' असल्यागत RP ने धूम ठोकली. परंतु तो हॉटेलपर्यंत पोचला कसा हे त्यालाही पडलेले कोडे आहे.

----------------------------------------

राकु ने बुधवारला जायला म्हणून ऑफ़िसची सगळी कामे भराभर आवरली आणि तो ऑफ़िसमधून निघाला.
रस्त्याने त्याला एक निळी साडी घातलेली तरुणी दिसली. तिने आपले लांबसडक केस मोकळे सोडले होते आणि त्यांना सनसिल्क shampoo सारखा वास येत होता.
" मला जरा लिफ़्ट देता का प्लीज? " राकुची बाईक जवळ आल्यावर तिने विचारले. राकुने तिला कुठे जायचेय तेही न विचारता मागे बसवून घेतले.
" माझी निळी साडी छान आहे नं? " तिने मागून विचारले.
" ह... "
" माझे केस किती छान लहरत आहेत ना वार्‍यावर? "
" हो ना... सनसिल्कने केस छान होतात. " काहीतरी बोलायचे म्हणून तो बोलला.
" पण मी कधी केसांना सनसिल्क लावत नाही. बियरने केस धुते मी नेहमी. "

...बियर आणि सनसिल्कचा वास? राकुच्या डोक्यात लख्ख उजेड पडला. त्याने करकचून ब्रेक मारला. मागे वळून पाहिले तोवर निळीवाली केव्हाच अदृश्य झाली होती.

------------------------------------------

गंधारने स्वत : चा सेलफोन काढून पुन्हा एकदा बघितला. बॅटरी लो झाली होती.

खरं म्हणजे असे कधी होत नसे. त्याचा फोन बराच वेळपर्यंत charged राहत असे. पण आज बॅटरी अचानकच लो झाली होती. त्याने घरी येऊन फोन किमान एक तास चार्जिंगला लावला. परंतु तरीही charge झाल्याचे कुठलेही चिन्ह त्याचा फोन वर दिसत नव्हते. निरुपायाने तसाच फोन घेऊन तो बुधवारच्या व्रतासाठी निघाला.

रस्त्याने जाताना एकदम त्याच्या फोनचा स्क्रीन उजळला आणि " आयेगा आनेवाला.... " हे गाणे वाजू लागले. हा singtone आपल्याकडे नाही असे त्याला पक्के आठवत होते. त्याने भयभीत होऊन फोनकडे पाहिले. गाणे थांबले होते व पुन्हा बॅटरी लो दिसत होती.

पुन्हा पुन्हा हाच प्रकार घडू लागला; फ़क्त दर वेळेस गाणे बदलू लागले. कधी " यारा सिली सिली " तर कधी " मेरे मेहबूब न जा आज की रात ना जा " अशी गाणी वाजत होती.

कसा बसा तोही इप्सित स्थळी येऊन पोचला.

-------------------------------------------

दीपने गोठ्याचे दार उघडले आणि बैलांना गाडीला जुंपायचे म्हणून तो त्यांचे दावे सोडू लागला.

" माणूस आहेस का दैत्य रे? " तेवढ्यात एक आवाज आला. दीपने दचकून वर बघितले.

पांढरा बैल बोलत होता. दीपची वाचा जायची वेळ आली.

" ह्यांचे बुधवार आणि आपण संध्याकाळीपण जुंपून घ्या. " काळ्या बैलाने पां. बै. च्या सुरात सूर मिसळला.

" दरवेळेस तुला वाटलं की जुंपून घ्यायला आम्ही काय तुझे नोकर आहोत का रे? आमचे म्हणून काही हक्क आहेत की नाही? " दोन्ही बैल एकसाथ म्हणाले.

दीपची पुरती बोबडी वळली आणि गोठ्याबाहेर उभ्या केलेल्या बाइकला किक मारून त्याने शक्य तितक्या लवकर बुधवारच्या venue कडे पळ काढला. त्याचा स्पीड जास्त होता म्हणून बरे झाले कारण त्या आवाजात त्याला बाईकने म्हटलेले.... " आता हे शेवटचंच.. पुन्हा कुठल्याही बुधवारी मी येणार नाही. " त्याला ऐकू आले नाही.

----------------------------------------

........ सगळे टेबलपाशी बसले तेव्हा थरथरतच होते. RP ला माळावरून धावत आल्याने धापही लागली होती. राकुच्या डोळ्यांपुढे निळ्या रंगाचे चित्रविचित्र आकार उमटत होते. गंधारचा मोबाईल आता " भूत हू मै " वाजवत होता.

तेवढ्यात प्रसन्ना चेहर्‍याने फ तिथे अवतीर्ण झाला. प्रत्येकाचे पडलेले चेहरे पाहून त्याने कारण विचारले तशी सगळ्यांनी आपापली स्टोरी त्याला सांगितली..

" ह त्यामानाने माझा प्रवास uneventful झाला आजचा... फ़क्त एक काकू रस्त्याने भेटल्या. त्यांना गाडीत लिफ़्ट दिली. That lady was perfectly normal. मस्त गप्पा मारत होती. तिला एके ठिकाणी जायचे होते. तिथे ती आणि तिच्या मैत्रिणी तिची पुण्यतिथी celebrate .... " फ जबरी दचकला.

... यापुढे खाण्यात किंवा पिण्यात कोणाचेही लक्ष लागले नाही. प्रत्येक जण जमेल तितका शुद्धीवर राहण्याचा प्रयत्न करत होता कारण अजून घरी परत जायचे होते. ते कसे जमणार याची इंता प्रत्येकाला लागली होती. आपण असा काय अपराध केला की ही अदृश्य शक्ती आपल्या मागे लागावी हे त्यांना कळत नव्हते.

.... तेवढ्यात फोन वाजला आणि या थरकाप उडवणार्‍या रहस्याचा उलगडा झाला.

श्रद्धाने कॉल केला होता. तिचे पुण्याचे तिकीट confirm झाले होते.
जहागिरदारांचा बंगला

... संध्याकाळचे सहा. हिवाळा असल्यामुळे अंधार पडायला सुरुवात झाली होती. गाव तसं लहानसंच पण आता बर्‍यापैकी वाढायला लागलेलं. मी अगदी लहानपणी इथे आले होते तेव्हाचं हे गाव मला अगदी अंधुक आठवत होतं. छोट्या छोट्या टेकड्यांनी बनलेला एक भाग आणि त्या पलिकडची रेल्वे लाईन ही या बाजूची गावसीमा. पलिकडे तेव्हा काही म्हणता काही वस्ती नव्हती. आता मात्र तो भाग अगदी गजबजल्या सारखा झालेला. बर्‍याच लोकांनी इकडे देखील सुंदर बंगले बांधले होते. अगदी कोणालाही तिथे राहायचा मोह व्हावा असा तो भाग सुंदर झाला होता. पण आठवतंय तेव्हापासून आदर्श कॉलनी ही इथली सुप्रसिद्ध वसाहत. अपार्टमेंट संस्क्^ऋती रुजायच्या आधी वसली असल्याने मुख्यत्वेकरून मोठे मोठे बंगले. विपुल जागेमुळे प्रत्येक बंगला प्रशस्त, देखणा, दूरवरूनही लक्ष वेधून घेणारा. आत्ताही जहागिरदारांचा बंगला शोधताना मला फ़ारशी अडचण झाली नाही.
.. आदर्श कॉलनीच्या सुरुवातीच्या, जणू येणार्‍यांच्या स्वागतासाठी उभारल्यासारख्या वाटणार्‍या, भव्य कमानीपाशी मी रिक्षा सोडली आणि पायी आत शिरले. दोन तीन गल्ल्या सोडून डावीकडे वळण घेतल्यावर मला तो स्पष्ट दिसला. आस्ते आस्ते कमी होणार्‍या संधिप्रकाशातही उठून दिसणारा पांढर्‍याशुभ्र रंगाचा... जवळपास तीन मजली वास्तू असावी ती. बाहेर बर्‍यापैकी उंच कंपाउंड होतं. आणि त्याच्यापाठीमागे गर्द हिरवी झाडी दिसत होती. ' एवढी बाग त्या कशी सांभाळत असतील देव जाणे? ' मी मनाशी म्हणाले. श्रीमती जहागिरदारांशी आधी फ़ोनवर बोलणं झालंच होतं. मी घर बघायला यायचं म्हटल्यावर त्यांनी मला अगदी तपशीलवार पत्ता सांगितला आणि त्यानुसार मी इथवर अचूक येऊन पोचले होते. ' आदर्श कॉलनीत आलीस ना की तू बंगला चुकणं शक्यच नाही बघ. वाटलंच तर तू रिक्षावाल्याला देखील सांग. या भागातला असेल तर तो तुला अगदी फ़ाटकापाशी आणून सोडेल. " श्रीमती जहागिरदार मला फोनवर पत्ता सांगताना म्हणाल्या होत्या. ते अतिशय खरं होतं. इतक्या सुंदर बंगल्याचा पत्ता या भागात तरी कोणी चुकू शकलं नसतं. दृष्ट लागण्यासारखी देखणी वास्तू होती ती... जहागिरदारांचा बंगला! मी भारून गेल्यासारखी फ़ाटकापाशीच खिळून उभी राहिले.

क्रमश :
जसं नीट निरीक्षण केलं तसं हळूहळू लक्षात यायला लागलं. दुरून देखणा भासणारा तो बंगला बहुधा निगराणीअभावी आपलं सौंदर्य हरवत चालला होता. बाहेरचं फ़ाटक त्याची साक्ष द्यायला पुरेसं होतं. पूर्वी त्यावरच्या नाजूक नक्षीमुळे ते खरंच दृष्ट लागेलसं दिसत असणार. पण आता मात्र त्याची पार रया गेली होती. कुठे कुठे गंजही लागला होता. मी पुढे होऊन कडी उघडली. केवढ्यांदातरी करकरत ते फ़ाटक उघडलं. कदाचित त्या शांत परिसरामुळे मला तो आवाज जास्त दचकवणारा वाटला असेल. आतमध्ये शिरले तेव्हा मला बागही नीट दिसली. झाडांच्या फ़ांद्यांची नीट छाटणी न केल्याने त्या बेसुमार आडव्यातिडव्या वाढल्या होत्या. डावीकडच्या बाजूला आधी प्रशस्त लॉन असावं. आता तिथे फ़क्त भरपूर गवत माजलं होतं. तिथेच एक म्हातारा माणूस लॉनच्या कडेला विटांचे तुकडे खोचून लावण्यात गर्क होता. जहागिरदारांचा माळी असावा. माझी चाहूल लागताच त्याने वर बघितलं.

" वहिनींना भेटायचंय का? " त्याने विचारलं तशी मी हो म्हणून मान डोलावली. तो उठून लगबगीने आत निघून गेला. त्याच्यामागे जावं की नाही या गोंधळात काही न सुचून मी तिथेच उभी राहिले. पाचच मिनिटांत मला श्रीमती जहागिरदार येताना दिसल्या. साठीपलीकडचं वय असावं बहुधा.... मला वयाचा तेवढासा अंदाज आला नाही. पण चेहर्‍यावरून बर्‍यापैकी थकल्यासारख्या दिसत होत्या. मूळच्या खूप देखण्या असणार त्या... पण आता वयोमानापरत्वे किंवा बहुधा आयुष्यातल्या एकंदरच चढ^उतारांनी त्यांचं देखणेपण हिरावून घेतलं होतं. नकळत मी त्यांची तुलना त्यांच्या बंगल्याशीच केली. ते दोघं एकमेकांना शोभत होते खरे!

त्या जवळ येऊन प्रसन्ना हसल्या. " अगं काळजी वाटायला लागली होती मला तुझी! म्हटलं नवखं गाव, संध्याकाळची वेळ... रस्ता तर चुकली नाहीस ना? " त्यांचं ते अनौपचारिक बोलणं मला फ़ार सुखावून गेलं. त्यांच्या तेवढ्या साध्या वाक्यातूनही जिव्हाळा अगदी ओसंडून वाहत होता. काही माणसं जात्याच लाघवी असायचीच!
" आत बसूयात का? बाग बघतेयस ना कशी वाढलीय? देखभाल करणं नाही होत आताशा आणि पावसाळाभर बागेकडे बघणंदेखील नको झालेलं. यंदा पाऊस मात्र जबरदस्त झाला हं आमच्या गावात.
... हं अगं... काय सांगणार होते नी काय सुरु केलं बघ! बागेत डास आहेत खूप. नाहीतर तिथे लॉनवर बसून छान गप्पा मारल्या असत्या तुझ्याशी. आणि हो, मला वहिनी म्हटलंस तरी चालेल. तेच नाव रुळलंय सगळ्यांच्या तोंडी. "

वहिनी होत्या खूप बोलक्या. आम्ही बोलत बोलत घरात येऊन पोहोचलो. घरात बाकी अजूनही लोक राहत असल्याच्या काही खुणा दिसत नव्हत्या. कशा राहत असतील त्या एकट्या? माझ्या चटकन मनात आलं. जणू तो प्रश्न ओळखल्यासारख्या त्या शांत सुरात म्हणाल्या,
" झाली आता सवय! मोठा मुलगा संजू तिकडे ऑस्ट्रेलियाला असतो, मधला जपान आणि मुलगी दूर दिल्लीला. बोलवत असतात सारखे; सोड ते गाव नि ये म्हणून! मला जाववत नाही गं... खरं म्हटलं तर मनाशी आणलं तरी जाता येणार नाही! "
मी वहिनींकडे बघितलं. काहीसे उदास, दु : खी भाव! किती तरी वेळ त्या दूरवर कुठेतरी शून्यात नजर लावून बघत राहिल्या. त्यांना पुन्हा बोलतं करावं म्हणून मी म्हणाले,
" खरंय तुमचं... तुम्ही सांगितलं होतं फोनवर गेली कित्येक वर्षं या बंगल्यात, या गावात राहताय तुम्ही. एखादा परिसर इतका सवयीचा झाला की नाही सोडता येत माणसाला.... "
" तसं नाही पोरी... ही शिक्षा आहे मला! इथे नाही राहायचं म्हटलं तरी मला इथून बाहेर जाता येणार नाही. " वहिनींचे डोळे एकाएकी भरून आले.

छे.. हे काहीतरी भलतंच होत होतं. मी त्यांच्या कुठल्या जुन्या जखमेवरची खपली काढली मला समजेना. आई नाहीतरी म्हणतच असते, नको तिथे भोचकपणा करून स्वत : चं तत्वज्ञान पाजळायची सवयच आहे मला. खरं तर मला चार सहा महिन्यांसाठी कुठे तरी पेईंग गेस्ट म्हणून राहायचं होतं; त्यासाठी जागा शोधता शोधता मला जहागिरदारांच्या बंगल्याचा पत्ता लागला होता.
" वहिनी, मी काही भलतंच बोलून गेले असेन तर माफ़ करा. " मी कशीबशी म्हणाले. वहिनी फ़िकटशा हसल्या.
" नाही पोरी, तुझ्या बोलण्याचं काही नाही गं. वय झालं आता. आताशा अगदी बारीक कारण पुरतं बघ मन हळवं व्हायला. आठवणींचं इतकं ओझं झालंय, पेलवत नाही आता. "

.... त्या पुन्हा गप्प झाल्या. त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. दूर कुठेतरी बघत त्या स्वत : मध्येच हरवून गेल्या होत्या. काय बघत असतील त्या? त्यांचा सोनेरी भूतकाळ.. त्या बंगल्याचं जुनं वैभव त्यांनी पहिल्यांदा या वास्तूत पाऊल घातलं तो दिवस की आणखी काही? मी काही न सुचून गोंधळल्यासारखी त्यांच्याकडे बघत राहिले.

क्रमश :
" तुला बंगला बघायचाय? " बर्‍याच वेळानी त्या भानावर आल्यासारख्या म्हणाल्या. मला त्या बंगल्याबद्दल अतिशय कुतुहल निर्माण झालंच होतं नाहीतरी. मी लगेच उठले.
" चल.... " त्या म्हणाल्या. जुन्या हिंदी सिनेमात बघायला मिळायचा तसा रुंद जिना होता पहिल्या मजल्यावर जायला. मी कुतुहलाने इकडे तिकडे पाहत जिना चढू लागले.

" ही माझ्या सासर्‍यांची खोली. " त्या डावीकडचा एक दरवाजा उघडत म्हणाल्या. अतिशय प्रशस्त खोली, त्यातच एका बाजूला देवघरदेखील होतं.
" इथेच ते शेवटी शेवटी तासंतास पूजा करत राहायचे. खाली मोठं देवघर आहे, पण त्यांनी तिथे येणं सोडून दिलं.... त्यामुळे मग त्यांच्या खोलीतच बनवून द्यावं लागलं देवघर. " वहिनी टूरिस्ट गाईडच्या अलिप्ततेने सांगत होत्या. माझं त्या काय सांगताहेत त्याकडे तसं फ़ारसं लक्ष नव्हतं. औपचारिक हं, हं एवढंच म्हणताना माझी नजर मात्र आजूबाजूच्या गोष्टींवर भिरभिरत होती. जहागिरदारांचं ते वैभव बघताना मला दिपून जायला झालं होतं.

........... सगळ्यात शेवटी त्या एका बंद खोलीपाशी आल्या. मला वाटलं त्या उघडतील ती खोली. म्हणून मी उत्सुकतेने बघत राहिले. त्या हलकेच वळल्या आणि म्हणाल्या....
" ही त्यांची खोली.... सुमावन्सं. चल, जाऊ या. त्यांना disturb केलेलं चालणार नाही. " त्या मागे वळून चालू लागल्या.
" म्हणजे तुमच्यासोबत त्या राहतात इथे? चांगलं आहे तुम्हाला सोबत असते कुणाचीतरी.... "
... त्या माझ्याकडे पाहून शांतपणे हसल्या. त्या मागे कसलातरी गूढ अर्थ आहे असं मला चटकन जाणवून गेलं. पण मी ते तितकंसं मनावर घेतलं नाही. त्याच खोलीसमोर असलेला एक लहानसा जिना चढून आम्ही गच्चीवर गेलो. आता अंधार पडला होता बर्‍यापैकी. चंद्राच्या रुपेरी प्रकाशात गच्ची न्हाऊन निघाली होती. गच्चीच्या दुसर्‍या टोकाला कठड्यावर एक कमानीसारखा भाग होता. ती कमान त्या चंद्रप्रकाशात अतिशय लक्षवेधक दिसत होती. मंतरल्यासारखी मी तिच्या दिशेने चालू लागले.

" थांऽऽऽऽब..... जाऊ नकोस.... तिकडे नको जाऊस... थांब.... माझं काही चुकलं असेल तर माफ कर.. पण थांब........... " मी गर्रकन मागे वळले. वहिनींचा चेहर्‍यावरची भीती पाहिली आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला.
" वहिनी?? "
" थांब गं जाऊ नकोस. " वहिनींच्या चेहर्‍यावरचे भाव वेगळेच होते.
" वहिनी.. मी फ़क्त ती कमान बघायची म्हणून.... " माझं वाक्य अर्धवटच राहिलं. कसल्यातरी अनाकलनीय ताणामुळे वहिनी तिथेच बेशुद्ध होऊन कोसळल्या.
" वहिनी... वहिनी उठा... उठा ना... " मी वेड्यासारखी त्यांना हलवू लागले. सुमावन्स!!! माझ्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली. त्यांना बोलावून आणावं.

" सुमावन्स... सुमावन्स... " मी दडादडा जिना उतरून त्या मजल्यावर आले. त्या बंद खोलीचं दार ठोठावलं जोरजोरात... कुणीही उत्तर दिलं नाही.

" कुणाला बोलावताय ताई? " मी दचकलेच. मागे जहागिरदारांचा माळी उभा होता.
" माळीकाका... वहिनी... वहिनी.. बेशुद्ध पडल्यात गच्चीवर.... सुमावन्स.... त्या का उघडत नाहीयेत दार? "
" सुमावन्स दार उघडायच्या नाही ताई. त्यांना जाऊन पन्^नास वर्षं होतील आता.... "
" काऽऽऽय? " आता बेशुद्ध पडण्याची पाळी माझी होती खरं तर.... पण मी जिन्याच्या कठड्याला गच्च धरून कशी बशी उभी राहिले. सगळ्यात आधी वहिनींना मदतीची गरज होती.
.... माळीकाकांच्या मदतीने मी वहिनींना त्यांच्या रुममध्ये आणलं.. दहा एक मिनिटांतच त्या शुद्धीवर आल्या. तोपर्यंत माळीकाका जवळच्या एका डॉक्टरांना घेऊन आले होते. ते डॉक्टर त्यांच्या परिचयातले असावेत.

" वहिनी... सुमा नाहीये आता. कधी येणारही नाही. " ते त्यांच्याकडे बघत अतिशय आश्वासक आवाजात म्हणाले. मग माझ्याकडे वळून त्यांनी विचारलं...

" तुम्ही पेईंग गेस्ट म्हणून राहणार आहात का इथं? "
" नाही अजून काही नक्की नाही. का? "
" मी तुम्हाला एक विनंती करू का? किमान आजची रात्र तुम्ही वहिनींजवळ राहू शकाल का? "
" अं हो... राहीन की! त्यात काय? " मी चटकन बोलून गेले खरी... पण मला एकदम सुमावन्संचा प्रकार आठवला आणि मला तिथून एकदम पळून जावंस वाटायला लागलं.

क्रमशः
रात्रीचे साडे अकरा झाले असावेत. वहिनी अजून ग्लानीतच होत्या. त्यांच्या मनावर कुठल्यातरी गोष्टीचा प्रचंड ताण जाणवत होता. पण एवढा ताण कशाचा? सुमावन्संच्या मृत्यूचा? पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे ऐन तारुण्यात सुमावन्सं वारल्या असणार. कशाने?
" जान्हवी, पाणी देतेस थोडं? " वहिनींनी मारलेल्या हाकेने मी दचकले. उठून त्यांना पाणी नेऊन दिलं. वहिनींचे डोळे पाणावले होते.
" पोरी, उगाच माझ्यापायी तुला इतका त्रास.... " त्या पुढे बोलू पाहत होत्या पण मी त्यांना अडवलं.
" वहिनी जेवता का थोडं? शारदा काकू ( हे मला माळी काकांनी सांगितलं होतं... त्या जहागिरदारांच्या स्वयंपाकीण बाई होत्या.) येऊन करून गेल्यात सगळं. "
" तू जेवलीस? " खरं तर त्या सगळ्या विचित्र वातावरणात मला जेवणदेखील गेलं नव्हतं. भूकदेखील मरून गेली होती पण वहिनींना बरं वाटावं म्हणून मी होकारार्थी मान डोलावली.
" मला भूक नाहीये गं. मी थोड्या वेळाने दूध घेईन. सुमावन्स जेवल्या का? " मला पुन्हा अस्वस्थ वाटायला लागलं. काय बोलावं सुचेना.
" .... तुला मी विक्षिप्त, डोक्यावर परिणाम झालेली वाटत असेन नं? " वहिनी एकदम उद्गारल्या.
" सगळे असंच समजतात. माझी मुलं, इथले नोकर, डॉक्टर.... सगळेच! पण सुमावन्सं अजून इथे वावरताहेत हे सत्य आहे. या घरातून मी कुठे बाहेर जाऊ शकत नाही कारण त्यांनी.... त्यांनी मला रोखलंय. त्या मला इथून जाऊ देणार नाहीत. कारण त्यांच्या आत्महत्येला मी जबाबदार आहे.... त्याचीच शिक्षा..... " वहिनींना बोलता बोलता दम लागला. माझं डोकं सुन्न झालं होतं. वहिनींची वाक्यं माझ्या मेंदूपर्यंत पोचत नव्हती. सुमावन्संनी आत्महत्या केली होती? आणि वहिनी म्हणत असतील ते खरं असेल तर त्यांचा आत्मा????? देवा रे... कुठून मला बुद्धी दिलीस हे घर बघायला यायची? माझा काय संबंध या सगळ्यांशी? कोण कुठल्या वहिनी आणि त्या त्यांच्या सुमावन्सं.... मरू दे. मी एक क्षणही इथं थांबणार नाही. मला अंधाराची भीती वाटत नव्हतीच. रिक्षा घेतली तर पंधरा मिनिटांत गेस्ट हाउसवर पोचेन, अशा विचारांच्या तिरीमिरीत मी एकदम उठले. वहिनी श्रांत होऊन उशीला पाठ लावून डोळे मिटून बसल्या होत्या. त्यांच्या त्या करूण चेहर्‍याकडे मला बघवेना. मी निघून जायचा विचार रद्द केला. याचं दुसरं कारण की, पन्नास वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दलचं कुतुहल मला अडवत होतं. मी वहिनींजवळ जाऊन बसले. माझी उत्सुकता जाणूनच की काय त्यांनी बोलायला सुरुवात केली.
" .... अवघी वीस वर्षांची होते मी या घरात लग्न होऊन आले तेव्हा. जहागिरदारांचं घराणं नावाजलेलं होतं. सासरे या भागातले नावाजलेले जमीनदार. भरपूर शेती, वाडवडलांची गडगंज संपत्ती... कशाला कशाला म्हणून काही कमी नव्हती. सासर्‍यांना ही दोनच मुलं... आमचे हे आणि त्याहून धाकट्या सुमावन्सं. जहागिरदारांच्या तीन पिढ्यांतली एकटी मुलगी म्हणून सुमावन्संना फ़ुलासारखं जपायचे. घरचं वैभव, सुंदर रूप, जोडीला हे घरचे लाड... सुमावन्सं अहंकारी झाल्या नसत्या तर नवल!
सगळ्या घरावर त्यांची अनिर्बंध सत्ता होती. प्रत्येकाला त्यांचा हुकूम मानावा लागे. अगदी मलासुद्धा. सुमावन्सं माझ्याहून दोन वर्षांनी लहान.. मला राग राग यायचा त्यांचा. आपण का म्हणून यांचं ऐकायचं असं वाटायचं. पण तक्रार करायची सोय नव्हती. घरात सुमावन्संच्या विरुद्ध ब्र काढलेला देखील खपत नसे.
हळू हळू सुमावन्संविषयीची चीड वाढत गेली मनात.... मी वाट पहात होते; त्यांना कशा रीतीने माझ्यासमोर नमवता येईल याची.... अखेर ती संधी एकदा मला मिळाली. एका संध्याकाळी उशिरा बागेतली चमेलीची फ़ुलं काढून आणायला सासूबाईंनी सांगितली म्हणून मी तिकडे गेले. तेव्हा लगतच्या आंब्याच्या झाडापाशी उभं राहून कोणीतरी बोलतंय असं मला वाटलं.
....त्या सुमावन्सं होत्या. आणि त्यांच्यासोबत एक तरुण उभा होता. सुमावन्संचं प्रेम होतं त्याच्यावर. दोघं लग्नही करणार होते म्हणे! पण ते त्या काळी तरी शक्य नव्हतं. तो मुलगा रघुनाथ परजातीचा होता. सासरे किंवा हे कोणीही सुमावन्संना हे लग्न करू दिलं नसतं.
" वहिनी, तुझ्या पाया पडते. घरात कोणाला हे सांगू नकोस गं. कळलं तर ती लोक जीव घेतील माझा.... " नेहमी स्वतःच्या तोर्‍यात वावरणार्‍या सुमावन्सं आज माझ्यापुढे अगदी लाचार झाल्या होत्या. मी.. मला काहीच सुचत नव्हतं. डावात चाचपडत असताना एकदम हुकमाचा एक्का हाती यावा तसं झालं. आता सुमावन्संना माझ्यापुढे नमून राहावं लागणार होतं.
...त्यानंतर सुमावन्संनी माझ्यावर हुकूम गाजवणं थांबवलं. त्या माझ्याशी फ़ारशा बोलतही नसत. त्यांना लग्नाची चिंता लागून राहिली असावी. त्यामुळे दिवसरात्र आपल्या खोलीत त्या बसून राहायच्या. एक दिवस सासूबाईंनी दिलेली काहीतरी वस्तू मी त्यांच्या खोलीत ठेवायला गेले; तेव्हा त्या मूकपणे रडत होत्या. मला एकाएकी त्यांची दया आली. मी जाऊन त्यांच्या पाठीवर मायेने हात ठेवला.
" वन्सं, काय हो काय झालं? "
उत्तरादाखल त्यांनी माझ्याकडे नुसतं नजर उचलून पाहिलं. किती असहाय्य दिसल्या त्या तेव्हा. माझ्या मनात एकाएकी काहीतरी आलं.
" वन्सं, हे किंवा मामंजी इतकंच काय सासूबाईदेखील तुम्हाला त्या मुलाशी लग्न करू द्यायच्या नाहीत. तुम्ही त्याचा विचार सोडून द्या वन्सं. " वन्संनी एकदम चवताळून माझ्याकडे पाहिलं. माझी तशी फारशी चूक नव्हती. एका पारंपारिक कुटुंबात वाढलेली मुलगी मी. मला घराच्या उंबरठ्यापलिकडंच जगदेखील ठाऊक नव्हतं. आई वडील मोठे भाऊ यांच्यासमोर तोंडदेखील न उघडणारी मी; वन्संना तोंड द्याव्या लागणार्‍या संकटांची कल्पना करून खरोखर हादरले होते.
" वहिनीऽऽऽ... " सुमावन्सं कडाडल्या.
" तुम्हाला काय कारण आहे माझ्या खासगी बाबींत सल्ले द्यायचं. तो सर्वस्वी माझा प्रश्न आहे आणि मी बघेन तो कसा सोडवायचा ते. तुझ्यासारख्या अडाणी बाईने त्यात लक्ष घालायचं काम नाही. "
वन्संचे शब्द मला चरचरून झोंबले. न जाणो कुठून माझ्यातदेखील बोलण्याचं बळ आलं.
" वन्सं, तुमच्या या प्रकरणाबद्दल मी घरात बोलले तर काय होईल माहितेय नं? " माझा आवाज माझ्या नकळत खुनशी झाला होता. वन्सं एकदम चपापल्या.
" खबरदार वहिनी... याबद्दल एक शब्दही कुठं बोलतात तर. कुठून त्यादिवशी तुमच्या दृष्टीस पडले असं झालंय मला. की पाळत ठेवूनच होतात माझ्यावर देव जाणे! " सुमावन्संच्या आधीच्या स्वभावाने उसळी घेतली होती.
" अस्सं... मग मी देखील दाखवून देईन तुम्हाला... मी काय करू शकते ते. " मी रागाने धुमसत त्या खोलीबाहेर पडले.
माझ्या मनात कसंही करून आता हे घरच्यांच्या कानावर घालणं हा एकच गोष्ट होती. त्या गोष्टीच्या भल्याबुर्‍या परिणामांचा विचार करायला माझं चित्त थार्‍यावर होतंच कुठे? त्याच रात्री हे ऑफ़िसातून परत आल्यावर मी ते सारं त्यांच्या कानावर घातलं.
.... जहागिरदारांच्या घरावर जणू वीज कोसळली. कितीही लाडक्या असल्या तरी सुमावन्संना या एका बाबतीत कुणीही ऐकणार नव्हतं. मामंजी संतापले. वन्संना त्यांनी त्याच खोलीत कोंडून घातलं. रोज त्यांना जेवण खाण, लागलं सवरलं त्याच खोलीत नेऊन दिलं जायचं. सासूबाई आणि ह्यांनीदेखील त्यांच्याशी बोलणं टाकलं. इकडे माझा जीव तुटत होता. अजाणता मी केवढी मोठी चूक करून बसले होते याची जाणीव मला दुसर्‍या दिवशी वन्संचा चेहरा पाहताच झाली. मी त्यांचं जेवण घेऊन त्यांच्या खोलीत गेले.
" वन्सं जेवता ना? " मी भीत भीत विचारलं.
ताडकन नजर वर करून त्यांनी माझ्याकडे बघितलं. बोलल्या काही नाहीत. पण मी उभ्या उभ्या गारठले. काय नव्हतं त्या नजरेत... राग, तिरस्कार, अश्रू, दुःख, निराशा, असहायता..... मी त्यांचे पाय पकडले.
" वन्सं माफ करा हो.... माफ करा मला. मी चुकले हो वन्सं... विचार नाही केला तुमचं काय होईल याचा. "
" जाऊ दे वहिनी.. हेच होतं नशिबी माझ्या. त्यात तुमचं तरी काय चुकलं? " कुठेतरी शून्यात बघत त्या भकास आवाजात म्हणाल्या.
दिवसेंदिवस त्या खंगायला लागल्या. जेवेनात. राग, मारणं, समजूत सगळे उपाय थकले. सार्‍या घरावर या गोष्टीचं सावट होतं अहोरात्र. आधीचा आनंद जणू लोपलाच!
..... त्याही दिवशी रात्री मी वन्संचं जेवण घेऊन त्यांच्या खोलीत गेले. सासूबाई आणि मामंजी गावाला गेले होते. हे बाहेर बैठकीच्या खोलीत कुणाशीतरी बोलत बसले होते. मी खोलीची कडी काढून आत शिरताक्षणी वन्संनी मला एक जबरदस्त हिसडा दिला आणि त्या गच्चीकडे धावल्या. मीही कशीबशी उठून त्यांच्यामागोमाग धावले. वन्सं कमानीकडे जात होत्या. मला एका क्षणात लख्खकन कारण उमजलं. मी जिवाच्या आकांताने त्यांना हाका घालू लागले, थांबायला विनवू लागले. पण त्या आपल्या निश्चयापासून ढळल्या नाहीत. कमानीपासच्या गच्चीच्या कठड्यावरून स्वतःला खाली झोकून देण्याआधी त्या गर्रकन वळल्या आणि मला म्हटल्या....
" मला या घरातून जाऊ दिलं नाहीस. तुलादेखील या घरातून कधीच बाहेर जाता येणार नाही. " बस्स! त्यांनी आपलं आयुष्य संपवलं.
...... यानंतर जवळ जवळ दहा वर्षं लोटली. जहागिरदारांनी सुमावन्संवर केलेल्या अन्यायाची पुरेपूर किंमत चुकवली. सासूबाई लाडक्या लेकीच्या दुःखाने झुरून झुरून वारल्या. मामंजींनी तेव्हापासून स्वतःला अहोरात्र देवपूजेत गुंतवून घेतलं. कुणाशीच बोलेना झाले. दिवसरात्र सुमावन्संसाठी रडत राहिले. हेदेखील सुमावन्संच्या मृत्यूचं दुःख आयुष्यभर वागवतच जगायला लागले. तशातच ह्यांची बदली नागपूरला झाली. मी आनंदले. नवीन जागी नवं आयुष्य सुरु करायचं म्हणून खूश झाले. या शापित वास्तूतून अखेर माझी, माझ्या कुटुंबाची सुटका होणार होती. आमचा जायचा दिवस जवळ येत होता. सामानाची बांधाबांध सुरु होती. तेवढ्यात ते अघटित घडलं आणि केवळ.. केवळ मलाच जाणवलं.... " वहिनी क्षणभर थांबल्या.
" ........सुमावन्सं परतल्या होत्या.

.... माझी वाट त्यांनी अडवून धरली. मी नागपूरला जाऊ शकले नाही. त्यांनी म्हटलं होतं तसं मी कधीच या घरातून जाऊ शकले नाही. त्यांचं आयुष्य मी उध्वस्त केलं. मला शिक्षा भोगणं भाग आहे. डॉक्टर्स म्हणतात त्या guilt complex मुळे मला असले भास होतात. ते खरं नाहीये, पोरी... त्या आहेत. इथेच आहेत. माझ्यावर पहारा ठेवून आहेत. ते माझं प्राक्तन आहे. "
वहिनी बोलायच्या थांबल्या. त्यांच्या थकलेल्या चेहर्‍याकडे पहाताना माझ्या मनात एकाच वेळी कणव आणि चीड दाटून आली. ही कसली शिक्षा आणि तीही अजाणतेपणी घडलेल्या चुकीपायी?
.... सकाळचे सहा वाजायला आले होते. बाहेर हलके हलके उजाडायला लागलं होतं. माझ्या मनात काय आलं देव जाणे, मी एकदम वहिनींना हाताला धरून उभं केलं.
" वहिनी, सोडा ती समजूत. तुम्हाला इथे राहून अशा पद्धतीने घुसमटताना पाहू शकत नाहीये मी. चला... आत्ता, या क्षणी या जागेतून बाहेर पडा. चला, मी आहे तुमच्यासोबत. जवळ जवळ खेचतच मी त्यांना जिन्यावरून खाली आणलं. मुख्य दरवाजाकडे चालवलं. माझा इरादा पक्का होता. त्या गैरसमजातून मी त्यांना बाहेर काढणार होते. त्यांना त्या बंगल्यातून बाहेर काढणार होते. त्यांच्यासारख्या मोठ्या मनाच्या बाईने एका चुकीपायी आपलं संपूर्ण आयुष्य त्या घराशी जखडून घेऊन काढावं हे मला पटण्यासारखं नव्हतं. सुमावन्सं गेल्या होत्या, सुटल्या होत्या.... मात्र यांच्या कपाळी आयुष्यभराची वेदना, दुःखं लिहून गेल्या होत्या.
मी मुख्य दरवाजा उघडला. जोरात हवेचा झोत आत आला. वहिनींची चाल मंदावली. आणि त्या हवेच्या झोताने की काय देव जाणे, बैठकीच्या खोलीतला सुमावन्संचा भलाथोरला फोटो खाली कोसळला. काचेचा चक्काचूर होऊन इकडे तिकडे तुकडे उडाले. वहिनींचा जाता पाय उंबरठ्यातच अडला. मी तेव्हापावेतो दरवाजाबाहेर पोचले होते. फोटो पडल्याचा आवाज झाल्यावर मी मागे वळले. वहिनी उंबरठ्याच्या आतच उभ्या होत्या. त्यांच्या चेहर्‍यावर काही वेगळेच भाव होते. त्यांनी एकवार मागे वळून त्या फोटोकडे बघितलं.
" बघ तुला सांगितलं होतं ना...... माझी त्या शापातून मुक्तता होणं नाही. मला जाता येणार नाही. " त्यांच्या चेहर्‍यावर एक चमत्कारिक हास्य होतं. मला माहीत होतं; आता त्यांना खेचूनदेखील त्या वास्तूच्या बाहेर आणता येणार नाही. सुमावन्सं ते होऊ देणार नाहीत. त्या होत्या की नाहीत? ह्याची शहानिशा करायची माझ्यात ताकद उरली नव्हती. डोकं बधीर झालं होतं.

त्या वळल्या आणि परतू लागल्या. बाहेरच्या गार वार्‍यात मी कितीतरी वेळ गोठल्यासारखी तशीच उभी होते.

समाप्त

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner shraddhak Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators