Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 08, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Archive through August 08, 2007 « Previous Next »


Wednesday, July 04, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्याचे म्हणजे ऐन पावसाळ्याचे दिवस झाडांसाठी हिरवे दिवस असतात. बहुतेक झाडांचे फुलायचे दिवस सरलेले असतात. त्यामुळे मिळणार्‍या पाण्याचा जास्तीत जास्त फायदा करुन घेत, झाडे भरपुर पाने तयार करुन घेतात.

पण संगीतक्षेत्रात जश्या श्रेष्ठ कलाकारांच्या मैफ़ीली अत्यंत दुर्मिळ असतात, तसेच मोठ्या करमळीचे असते. तसे कदंब कुंतीही पावसाळ्यात फुलत राहतात, पण मोठी करमळ, म्हणजे आपल्याकडील वृक्षांपैकी सगळ्यात मोठे फुल येणारे झाड.

या झाडाचे सगळेच खास. याची पाने २५ ते ३० सेमी लांब हिरवीगार. शिवाय पानावर जपानी कागदी पंख्याप्रमाणे घड्या घातलेल्या. पानाची ठेवणही गोलाकारात. त्यामूळे नुसती पाने असलेले झाडही देखणे दिसते. याच्या मोठ्या पानांचा वनवासी, पत्रावळ म्हणुन उपयोग करतात. जंगलातल्या झाडांची पाने खुपच मोठी असतात.

कोकणातील घाटातुन फिरताना मोठ्या करमळीची अनेक झाडे दिसतात. कोल्हापुरच्या महावीर उद्यानात गेटजवळच नीट जोपासलेले तीन वृक्ष आहेत.

तिथल्याच एका भेटीत मला या झाडाची फळे बघायला मिळाली. मोठ्या सफरचंदाएवढी फळे लागतात याला


karamaLeeche phaL

वर कोवळ्या शहाळ्याप्रमाणे संदले असतात. आत मऊ आंबट गर असतो. चवीला आंबट असतात हि फळे, आणि कोकणात त्याचे लोणचेही करतात. नुसतेही मीठ लावुन हे फळ खाता येते.

त्याच दरम्यान मी याच्या फुलांबद्दल वाचले. जंगलातल्या झाडांचा मागोवा घेणे शक्य नव्हते, पण महावीर उद्यानातले हे वृक्ष मात्र आवाक्यातले होते.

पण माझ्या पदरात नैराश्यच आले. खरे तर त्याची सर्व कथाच, तूमच्याबरोबर शेअर करायची आहे.

एका भेटीत मला या झाडांवर खाली झुकलेल्या लिंबाएवढ्या आकाराच्या कळ्या दिसल्या. त्या नंतरचा एक दिवस अंदाजाने ठरवुन, मी भल्या पहाटे तिथे दाखल झालो.

सकाळी आठ वाजता जरा उजाडताच, त्या झाडाखाली ठिय्या देऊन बसलो.


karamaLeechee kaLee

झाडावर मोठ्या मोसंबी एवढी कळी दिसत होती. माझ्या उंचीपेक्षाही कमी उंचीवर होती. वरच्या फोटोत दिसल्याप्रमाणे कळीची अवस्था होती. सुर्य जरा वर आल्यावर उमलेल असे वाटत होते.

मग तिथल्या बाकिच्या झाडांचे फोटो काढत फ़िरलो. माळीबुवानी चौकशी केली. कौतुक म्हणजे त्याना त्या फुलाचे, डिलेनिया इंडिका, हे शास्त्रीय नावही माहित होते. माझा उत्साह बघुन त्याना खुप आनंद झाला. ते फुल दुर्मिळ असल्याचेही त्यानी आवर्जुन सांगितले.

पण वरच्या कळीने काहि उमलावयचे मनावर घेतले नव्हते. मी बोटानी हळुवार उकलायचा प्रयत्न केला, पण पाकळ्या खुपच घट्ट लागत होत्या.

सकाळी आठ वाजल्यापासुन दुपारी एक वाजेपर्यंत मी झाडाखाली बसुन होतो. रविवार असल्याने बागेत इतर फारसे कुणी नव्हते. एक वाजता मी जेवायला म्हणुन बाहेर गेलो.
आणि तिथेच सर्व घोटाळा झाला. परत आलो तर झाडाखाली एक प्रेमी युगुल बसले होते, आणि त्यातल्या तिने, ती कळी तोडली होती.

मला माझा संताप अनावर झाला. पण तिला काही बोलणे शक्यच नव्हते. तिच्या कुस्करण्यातुन जे उरले होते, तेच आता तुमच्या पुढे ठेवतोय.


तसे हे फुल भले मोठे म्हणजे तब्बल १२ ते १५ सेमी पेक्षाही जास्त व्यासाचे असते. पाचच पण खुप मोठ्या आणि पांढर्‍याशुभ्र पाकळ्या असतात. आणि सोबतच्या फोटोत बघता आहात तो या फुलाचा मधला भाग.

हा भागही सहज ६ ते ७ सेमी व्यासाचा. बदामी रंगाचे हे पुंकेसर गुच्छाच्या रुपात असतात. आणि तो मधला भाग म्हणजे कळासाध्याच असतो. साधारण कुंदाच्या फुलाची आठवण करुन देणारा हा भाग असतो. चक्क फुलात फुल. पण कुंदाच्या फुलापेक्षा याच्या पाकळ्या खुपच जास्त. या फोटोत तब्बल २१ पाकळ्या दिस्ताहेत. त्यातल्या दोनतीन तर गोलाकारात जागा न मिळाल्याने, मधेच उभ्या आहेत.

मी स्वतः क्वचितच कुठले फुल तोडतो. आणि आता कॅमेरा घेतल्यापासुन, दुरवरचे फुलही न तोडता जवळुन बघता येते. पण त्यावेळी माझा खरेच नाईलाज झाला होता.



karamaLaachya phulatalaa aatalaa bhaag

एवढ्यावरच हे प्रकरण संपले नाही. मी या फुलाच्या तिने कुसकरुन टाकलेल्या पाकळ्या गोळा केल्या. या पाकळ्याही मांसल असतात. प्राणी आणि पक्षी आवडीने खातात. पण तेही गळुन पडलेल्या पाकळ्याच खातात. तो फोटो इथे देणे मला अशक्य आहे.

माझा उद्योग बघुन, बहुतेक त्या मुलीला वाईट वाटले. आणि मला खुष करण्यासाठी तिने ते पुंकेसर काढुन, ते फुल मूळ रुपात मला परत दिले ( काय बोलायचं राव ?!!!) आणि इतके अत्याचार होवुनही, या फुलाने देखणेपणाचा वसा सोडला नव्हता.


kaLasaadhyaay

या मधल्या फुलाचा आधार असलेला भागही विलक्षण देखणा होता. अगदी साच्यातुन काढलेल्या मोदकासारखा दिसणारा हा आकार, एरवी मला बघायला मिळालाही नसता.

त्या तीन झाडात मिळुन ती एकच कळी त्या दिवशी होती. माळीबुवानी मग सांगितले कि हे फुल फुलायलाही खुप वेळ घेते. बरोबर आहे, अशी अजोड कलाकृति घडवायला वेळ लागणारच. पण परत परत त्या झाडाखाली जाऊन बसणे मला शक्य नव्हते.

पण मग आता प्रश्ण असा आहे कि एवढ्या ध्यास घेतला तर, म्या पामराला त्या अजोड कलाकृतीचे दर्शन घडले का ?






Thursday, July 05, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हे फ़ुल मला माझ्या मुंबईच्या घराच्या कॉलनीतच दिसले.
फोटो अगदी पहाटे काढला. ( म्हणुन तितका स्पष्ट नाही ) रात्रीच कळी हेरुन ठेवली होती.
दुहेरी समाधान. स्वतः बघितल्याचे आणि तुम्हा मंडळीना निदान फ़ोटोत तरी दाखवु शकतोय याचे.
फ़ुलाचा व्यास १२ ते १५ सेमी आहे, हे लक्षात घ्या.


moThyaa karamaLeeche phul


Friday, July 06, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रबराच्या झाडाकडे बघुन मला आणखी एका झाडाची आठवण होते, तो म्हणजे उंडीचा. नाव थोडे विचित्र आहे खरे, पण वृक्ष मात्र देखणा. समुद्रकाठावर फिरताना खुपदा पोपटी पिवळी बोराएवढी गोल फळे पडलेली दिसतात. ती असतात उंडीची

undi

Calophyllum inophyllum असे याचे शास्त्रीय नाव. नावातल्या दोन्ही शब्दात पानांचा गौरव आहे. गर्द हिरवी जाड आणि ठळक शिरांची पाने असतात याची. पाने चमकदार असतात.

याला संस्कृतमधे पुन्नाग असेही नाव आहे. मराठीत यावरुन नागणी असेही नाव आहे. तर इंग्लिशमधे अलेक्झांड्रिया लॉरेल, असे नाव आहे.

जानेवारीपासुन याला फुले यायला सुरवात होते. ती थेट जुलैपर्यंत ( वरचा फोटो मडगाव स्टेशनच्या प्लॅटफ़ॉर्म १ लगतच्या झाडांच्या फुलाचा आहे. ) गच्च हिरव्या पानात याच्या कळ्या मोत्याप्रमाणे चमकत असतात. फुलांच्या पाकळ्याही शुभ्र रंगाच्या. आतमधे गुच्छात पिवळे सोनेरी पुंकेसर. फुलाना मंद सुवासही असतो.

याच्या बियांपासुन तेल काढतात. याचा उपयोग संधिवात, त्वचारोगावर करतात, तसेच दिव्यात घालण्यासाठीही वापरतात. याच तेलामूळे केसांची वाढ होते असे समजतात, त्यामूळे अर्थात त्या औषधात हे तेल असतेच. शिवाय याच तेलापासुन बायोडिझेलही मिळवता येण्याची शक्यता आहे.

याचे लाकुडही मौल्यवान असते. अरब लोकांच्या बोटी म्हणजेच धो साठी, या लाकडाची फार मागणी असे. या लाकडाच्या लांबीइतकी नाणी ठेवुन, त्याचे मूल्य ठरवले जात असे. ( म्हणुन तो Spar Tree ) या लाकडाच्या मजबुत आणि तरिही लवचिक असण्यामूळे, रेल्वे स्लीपेर्स, पुल वैगरेसाठी पण याचा उपयोग होत असे.




Monday, July 09, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे मिरची आणली ते पोर्तुगीजानी. सगळ्यांच्या मागुन आली आणि तिखट होवुन बसली. त्यापुर्वी मात्र आपल्याकडे, तिखटपणासाठी मिरी, आले, सुंठ, पिंपळी असे मसाल्याचे पदार्थच वापरत असत. या सगळ्यांचे औषधी उपयोग तर आपल्याला परंपरेने माहित आहेत.

miri

Piper nigrum असे याचे शास्त्रीय नाव. आपण इतिहासाच्या पुस्तकात नेहमीच वाचत आलो कि, भारतीय मसाल्यांच्या व्यापारासाठी युरपमधील व्यापारी पहिल्यांदा इथे आले.
हि वेल तशी मूळची केरळमधल्या मलबार प्रांतातली. याची वेल नाजुक असते आणि तिला आधाराची तसेच सावलीचीही गरज असते. म्हणुन नारळाच्या, सुपारीच्या किंवा पांगार्‍याच्या झाडावर हि वेल चढवतात.
हिची पाने साधारण विड्याच्या पानासारखीच असतात. पण रंगाने काळपट हिरवी व थोडी जाड असतात. चवीला तिखट लागतात. हा वेल जिथे जमिनीला टेकतो, तिथे त्याला मुळे फुटतात.

आपण खातो त्या मिर्‍या म्हणजे या वेलीची फळे. ती अशी घोसाने लागतात. आधी हिरवी, आणि पिकली कि लालचुटुक होतात. मिरीचे दाणे हिरवे असतानाच वाळवले कि काळे होतात आणि तीच आपली काळी मिरी.
पिकलेल्या मिरीचे वरचे साल काढले आणि ती वाळवली कि ती होते पांढरी मिरी.

आपल्याकडे मिरीचा स्वतंत्र वापर आता फारच कमी झालाय. पाश्चात्य पद्धतीच्या जेवणातच त्याचा जास्त वापर होतो. अर्थात आपल्या गरम व इतर मसाल्यातील मिरीचे स्थान अढळ आहे.

ओल्या हिरव्या मिरीचे घोस, मुंबईत ठराविक ठिकाणी ( म्हणजे ग्रांट रोडच्या भाजी गल्लीत, सेंट्रल माटुंगा स्टेशनच्या समोर, पार्ला ईत्यादी ) ठिकाणी विकायला असतात. गुजराथी लोक हे मिरीचे दाणे आणि लिंबाचे मिठाच्या पाण्यातले लोणचे घालतात. लिलामरी नावाचे हे लोणचे, चवीला छान लागते. खास करुन गुजराथी खिचडी बरोबर ते छान लागते.
काळ्या मिरीच्या भरड पुडीशिवाय गुजराथी आणि सिंधी पद्धतीच्या पापडाची कल्पनाच करता येणार नाही. लाल मिरी मात्र आपल्याकडे सहसा बघायला मिळत नाही. मी झुरिखमधे पेपर मिल घेतली, त्यात हे तिन्ही रंगाचे दाणे होते.
पांढर्‍या मिरपुडीच्या आपल्याकडे क्वचित वापर होतो. चिनमधे मात्र ती तयार पदार्थावर शिवरण्यासाठी वापरतात.
मिरीबद्दल इतिहासात बरेच वाचायला मिळते. पुर्वी तर तिला सोन्याचे मोल होते. त्या व्यापारावर सत्ता असावी म्हणुन चढाओढ असे. अजुनही भारताचा, खास करुन मलबार प्रांताचा उत्तम मिरीबाबत नावलौकिक आहे.
पण तरिही भारतात दर्जेदार मिरी क्वचितच मिळते. ज्यानी आखाती प्रदेशात मिळणारी, ( मूळ भारतीयच ) चाखुन बघितलीय, त्याना माझे म्हणणे नक्कीच कळेल.




Tuesday, July 10, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कय नवल आहे बघा, मागाहुन आलेल्या मिरचीचा झणझणीतपणा सिद्ध करण्यासाठी आपण परिचयाच्या लवंगीचाच दाखला देतो. मला हो म्हनत्यात लवंगी मिरची, हि लावणी आठवली ना ?

lavang

Eugenia caryophyllus किंवा Syzygium aromaticum असे लवंगीचे शास्त्रीय नाव. याचे इंग्लिश नाव, Clove हे खिळा, अश्या अर्थाच्या लॅटिन शब्दावरुन आलेय. हा एक मध्यम उंचीचा बारिक पानांचा वृक्ष असतो. कोकणातले दमट हवामान या झाडाला खास करुन भावते.

या झाडाचे कुळ तसे पेरु आणि जांभळाच्या कुळाशी नाते सांगणारे. त्या झाडांच्या पानाप्रमाणे या झाडाचीही पाने चुरली तर छान वास येतो. पण लवंगा म्हणजे या झाडाच्या कळ्या. कळ्या असतानाच त्यात स्वाद ठासुन भरलेला असतो. वरच्या फोटोत दिसतेय तशी कळी उमलली तर त्याचा स्वाद कमी होतो. म्हणुन कळ्या उमलण्यापुर्वीच खुडुन वाळवतात. लवंगेचा वरचा फ़ुगीर भाग हलक्या हाताने उकलला तर पाकळ्या अलग होतात आणि आत बाल्यावस्थेतले पुंकेसर दिसतात.

हे झाड मूळचे इंडोनेशियामधले. पण फार पुर्वीपासुन त्याचा व्यापार होत असे. प्राचीन इजिप्त, रोम आणि चिन, सगळ्याच संस्कृतीमधे लवंगा माहित होत्या. जेवणाच्या पदार्थात, खास करुन भातामधे, जेवल्यानंतर चघळुन तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी, हवा शुद्ध करण्यासाठी लवंगा वापरत असत. पण खास उपयोग होत असे तो, दातदुखी थांबवण्यासाठी. ( आपल्यासारखे दात नीट घासायची पद्धत युरपमधे नव्हती ) अजुनही डेंटिस्ट याच कारणासाठी लवंगेचे तेल वापरतात. एक टुथपेस्ट तर या लवंगेचीच जाहिरात करत असे. या तेलाचे अनेक उपयोग आहेत. अगदी तणनाशक म्हणुनही ते वापरता येते.

मिरचीमुळे लवंगाचा वापर कमी झाला असला तरी, पुलाव बिर्याणीत तिचे स्थान अढळ आहे. गोड पदार्थ म्हणजे दुधी हलवा, मोरंबा यातही लवंगा आवर्जुन घालतात. त्याने स्वाद तर येतोच, शिवाय पदार्थाला मुंग्याही लागत नाहीत. बंगाल आणि कोकणातही केला जाणारा एक खास पदार्थ, लवंगलतिका नावाने ओळखला जातो. विड्याचे पान टोचायला अजुनही लवंग वापरली जाते. मटणाचा उग्र वास कमी करण्यासाठी लवंगेचा उपयोग होतो. ( आपल्या जठरातले हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करण्यासाठी लवंगेचा उपयोग होतो ) पण तरिही अल्सर असलेल्यानी, किंवा गरोदरपणात लवंगा जास्त प्रमाणात खाऊ नयेत.
इंडोनेशियात लवंगेपासुन सिगरेटही बनवतात.

लवंगीचा आकारही मोहक असतो, याच नावाने एक दागिनाही ओळखला जातो. दागिन्यातला कुठलाही मोल्यवान खडा धरुन ठेवण्यासाठी जे बेसिक डिझाईन वापरले जाते, ते बहुतेक लवंगेपासुनच स्फुरले असावे.

लवंगेतले तेल लवंग उत्तम रितीने धरुन ठेवते, पण तिची पुड केल्यास ते तेल उडुन जाते. ( म्हणुन जर केकमधे वैगरे घालण्यासाठी हवी असेल तर पुड ताजीच करावी. ) तसेच हे तेल तीव्र असल्याने, थेट त्वचेवर लावु नये.




Wednesday, July 11, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लवंगेप्रमाणेच जायफळाचे मूळस्थान इंडोनेशिया आहे. आजही जावळजवळ ७५ टक्के जायफळाची शेती तिथेच होते. पण अगदी १२ व्या शतकापासुन ते भुमध्यसमुद्राच्या परिसरात वापरात आहे. अरब व्यापार्‍यानी जायफळाचा तिथे प्रसार केला असे मानले जाते.

jaayaphaL

Myristica fragrans असे याचे शास्त्रीय नाव. मध्यम उंचीचा हा वृक्ष असतो. पाने बारिक आणि साधी असतात. पाने अगदी विरळ असतात.
या झाडाला पिचच्या आकाराची फळे लागतात. यावर एक उभी नैसर्गिक चीर असते. फळ पिकले कि या चिरेवर ते उकलते.

या वरच्या फळाची चव कडवट आंबटसर असते. त्याला खुपच तीव्र स्वाद असतो. कोकणात या फळाचे लोणचे घालतात. ( कोकणात कसले लोणचे घालत नाहीत, त्याचीच यादी करणे सोपे होईल. जोक्स अपार्ट, मूळातच भाजीपाल्याची कमतरता असल्याने, रानभाज्या, लोणची यांची निकड भासली असावी. ) इतर देशात हि फळे पाकवुन खाल्ली जातात.


jaayapatri

या फळाच्या आतमधे लाल जायपत्रीच्या आवरणात आणि शिवाय आणखी एका कठिण कवचात जायफळ असते. अखंड म्हणजे कवचासकट जायफळ घेतले तर त्या कवचावर जायपत्रीच्या खुणा दिसतात. आपल्याकडे जायपत्रीचा स्वतंत्र असा वापर क्वचितच केला जातो. पण जायफळापेक्षा त्याचा स्वाद खुपच वेगळा असतो.

त्या कठिण कवचातले जायफळ आधि ओले असते. मग़ पुढे ते सुकुन आक्रसते. तसे आक्रसले कि आतमधे मोकळी जागा तयार होते. अख्खे जायफळ हलवुन, आतल्या जायफळाचा अंदाज घेता येतो. ( जायफळाचे रुप बरेचसे सुपारीसारखे असल्याने, त्याचे झाड सुपारीसारखेच असावे, असा बर्‍याच जणांचा समज असतो. )

आपल्याकडे गोड पदार्थात जायफळ वापरायची पद्धत आहे. आयत्यावेळी किसुन वा उगाळुन जायफळ वापरले तर त्याचा स्वाद खुलुन येतो.
लहान मुलांच्या जन्मघुटीत जायफळ असते. बाळाना शांत झोप लागावी म्हणुन त्याची योजना असते.
जायफळाचा वापर पुर्वीपासुन बोट लागु नये म्हणुनही केला जातो.
जायफळापासुन तेलही काढता येते. आणि ते सुगंधी द्रव्यात वापरले जाते. टूथपेस्ट, कफ़ सिरपमधेही ते वापरले जाते.




Thursday, July 12, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जायफळासोबत किंवा स्वतंत्रपणेदेखील आपल्याकडे वेलचीचा वापर पुर्वापार होत आलाय. विड्यामधे किंवा जेवणानंतर चघळण्यासाठी वेलची वापरली जाते.
शिरा, खिरी सोडाच पण केळ्याच्या शिकरणातही वेलची पूड घातली जात असे. तसे याला वेलची, वेलदोडा, इलायची, विलायची अशी अनेक नावे वापरतो आपण.
आपली वेलची जायफळ घालुन केलेली कॉफ़ी, म्हणजे खास आपली निर्मिती आहे. तुर्कस्तान किंवा अरब जगतात वेलची आणि कॉफ़ी उकळुन जो काहवा नावाचा प्रकार करतात, तो मात्र आपल्या घश्याखाली उतरणे कठिण असते.


velachee

Elettaria cardamomum असे याचे शास्त्रीय नाव. वेलचीचे झाड कसे असेल याची मला खुप उत्सुकता होती. आमचे शेजारी कुर्गी होते, त्यांच्याकडुन पहिल्यांदा वेलचीच्या शेतीबद्दल ऐकले होते. पुढे प्रत्यक्षही बघायला मिळाले.

आले हळदीच्या कुळाटले हे झाड. तुम्ही सोनटक्क्याचे झाड बघितले असेल, तर या झाडाची कल्पना नक्कीच येईल. पण सोनटक्क्याच्या झाडापेक्षा हे झाड बरेच मोठे असते. उंचीला सहज एक दीड मीटर्स पर्यंत असते.

या कुळाची खासियत म्हणजे, यांचा पुष्पकोष अतिशय देखणा असतो. क्वचित तो फुलांपेक्षाही देखणा असतो.

पण वेलचीच्या झाडाकडे बघुन याला वेलच्या नेमक्या कश्या आणि कुठे लागत असतील, हे पटकन लक्षात येत नाही.


velacheechee phaLe

या झाडाला पुष्पकोष वा फुले आलेली दिसत नाहीत. पण याच्या मुळाशी मात्र काहि कोवळे अंकुर दिसतात.

याच अंकुराना छोटीशी निळसर पांढरट फुले येतात. आणि मग त्या अंकुरानाच वेलच्या लागतात. झाडावर असताना त्या हिरव्या, टपोर्‍या दाण्यासारख्या दिसतात.

वाळवल्या कि त्या त्रिकोणी आकाराच्या होतात आणि त्यावर सुरकुत्या पडतात. हिरव्या वेलच्या अलिकडे जास्त लोकप्रिय झाल्यात. पुर्वी ब्लीच केलेल्या पांढर्‍या वेलच्या मिळायच्या.

याच्या पानानाही मंद सुवास येतो. आणि काहि थाई डिशेसमधे पान वापरतातही.

वेलचीचा व्यापारही पुर्वीपासुन होतोय. मध्ययुगीन युरपमधे त्याला ग्रेन्स ऑफ़ पॅराडाईज असे म्हणत असत. आपल्या कोकणपट्टीत याचे चांगले उत्पन्न येते. खास बागेतुन आणलेल्या वेलचीचा सुगंध घरभर पसरतो.
वेलच्या झाडाला अगदी मुळाशी लागत असल्यामूळे हि झाडे जरा उंचावर लावतात. भारतात काहि ठिकाणी वेलची जंगलातदेखील वाढते. बडी वेलची वा मसाला वेलचीचे झाडही असेच असते. पण त्याचा आकार मोठा आणि स्वाद बराच वेगळा असतो.




Friday, July 13, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विशाळगडावर गेलो, कि पायथ्याशी ओल्या तमालपत्राच्या जुड्या, ढिगाने विकायला आलेल्या दिसतात. तमालपत्र, तेजपत्ता अश्या नावाने ओळखली जाणारी हि पाने, पुलाव, बिर्यानीत वैगरे आवश्यक असतात.
हि पाने जाड असतात, व बरिच चिवटही असतात. ओली असतानाच खुडुन ती सुकवली जातात. सुकली कि हिरवा रंग थोडा कमी होतो, पण स्वाद मात्र खुलतो.


dalachini

Cinnamomum cassia असे या झाडाचे शास्त्रीय नाव. याचे मध्यम आकाराचे झाड असते. या झाडाची वरचेवर छाटणी करतात. पर्णसंभार खुपच दाट असतो. पनांच्या शिरा देठापासुनच निघालेल्या असतात. आणि मुख्य शिरेला समांतर टोकापर्यंत गेलेल्या असतात. क्वचित यावर उंबराच्या पानाप्रमाणे गाठीही दिसतात. पानाला तो सुगंध असतोच. याला क्वचित हिरवी लहान फ़ुले आलेली दिसतात आणि हिरवीच फळेही आलेली दिसतात. याची कोवळी पालवी लालसर पोपटी असते. पण पानांची टोके मात्र लाल असतात.

या झाडाची साल तपकिरी रंगाची असते, आणि तिच आपण दालचिनी म्हणुन वापरतो. गोडसर आणि किंचीत तिखट चव असलेली दालचिनी, आपल्या चांगल्याच परिचयाची आहे. गरम मसाल्यात, तसेच नारळीभातात, साखरभातात वैगरे आपण वापरतोच.
पावसाळ्यात चहात मसाला घालुन प्यायची, खास करुन गुजराथेत पद्धत आहे. या मसाल्यात मिरी, सुंठ वैगरे घटक प्रामुख्याने असतात. पण मला स्वतःला, दालचिनीची पुड घालुन केलेला चहा खुप आवडतो. ( ट्राय करुन बघाच. तसा चहा तरी कुठे अस्सल मिळतो म्हणा हल्ली. खपाच्या प्रमाणात चहाच्या लागवडीखालचे क्षेत्र कुठे वाढलेय ? आपण पितो ते एक मिक्श्चर असते. आणि त्यात इतर अनेक वनस्पतिंचे मिश्रण असते. केनयामधल्या केरिचो या गावी चहाचे मळे आहेत. तिथल्या चहाला अप्रतिम चव लागते. आपल्याकडे अस्सल दार्जीलिंग वा असाम चहा, सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलाय )

नावाप्रमाणेच दालचिनी मूळ चिनची. तिथे खास करुन बीफ़ डिशेस मधे ती वापरतात. आपण पुर्वीपासुन हिलाच दालचिनी समजतो. पण खरी दालचिनी वेगळी असते.
Cinnamomum zeylanciaum असे तिचे नाव आहे. नावावरुन अंदाज येतो त्याप्रमाणे, हि खरी दालचिनी फक्त श्रीलंकेत होते.

अत्यंत पातळ अशी या झाडाची साल असते. आणि तिची चिरुटाप्रमाणे केलेली गुंडाळी विकायला येते. हिचा रंग फ़िका, स्वाद थोडा माईल्ड असतो, आणि चवीला गोडसर लागते. हिची पुड करणे जरा जिकिरीचेच असते. त्यामुळे अख्खीच वापरतात. आणि त्या रुपातही तिचा स्वाद खुलुन येतो. दक्षिण भारतात हिची लागवड करतात. पण आपल्याकडे हिचा फारसा प्रसार नाही.

खोट्या म्हणजे आपल्या दालचिनीचे औषधी उपयोग आहेत. सर्दी, मधुमेह, रक्तदाबाचे विकार यावर ती वापरतात. पण हा वापर योग्य त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.




Monday, July 16, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आषाढ श्रावणाची चाहुल लागली, कि हळदीची पानं बाजारात दिसायला लागतात. आणि मग आईचे पातोळ्या, उकडीचे मोदक, लोणकढे तुप वैगरेचे बेत व्हायला लागतात. नुसत्या सहवासाने हळदीची पाने, या पदार्थाना तो स्वाद मिळवुन देतात.
हळद तशी आपल्या सगळ्याना परिचीत. तिचे औषधी गुणधर्म पण आपल्याकडे परंपरेने माहित आहेत. आणि याच बळावर आपण अलिकडची पेटंटची लढाई लढलो.


haLadeechaa tura

Curcuma Longa असे हळदीचे शास्त्रीय नाव. हळदीचे रोप कर्दळीसारखेच दिसते. पण वरच्या फोटोत दिसतोय तो पुष्पकोश, वरती न येता बुंध्याच्या मधुनच फ़ुटतो. यात छोटी पिवळी जांभळी फ़ुलेही येतात. या दिवसात कोकणात अनेकांच्या परसात हळद लावली जाते.

आंबेहळद पण अशीच असते, फक्त तिचा रंग केशरी असतो. हिवाळ्याच्या दिवसात बाजारात ओली हळद येते. ओली हळद, आले, लिंबु, सैंधव यांचे लोणचे घालण्याच्या प्रघात आहे. अगदी साधे असे हे लोणचे तोंडाला चव तर आणतेच शिवाय औषधीही आहे.

हळदीचे औषधी गुणधर्म आपल्याला माहित असल्याचा उल्लेख वर आला आहेच. जगभरात मात्र ते हल्लीच लक्षात आले आहेत.

हळदीच्या उत्पादनात सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. हळदीच्या मुळापासुन हळद करण्यासाठी ती शिजवुन सुकवावी लागते. त्यासाठी जमिनीत मोठेमोठे रांजण बनवलेले असतात. त्याना पेव असे म्हणतात. पेव फुटणे हा शब्दप्रयोग त्याच संदर्भातला.

आपल्याकडे वरण, खिचडि, कांदेपोहे असे पदार्थ केवळ हळदीमुळे तो रंग ल्यालेले असतात. बिस्किटे, सॉसेस, आईसक्रीम्स, मस्का, अश्या अनेक पदार्थात रंगासाठी हळद वापरलेली असते.

हळदीचा जंतुनाशक गुण आपण जाणतोच. जखमेवर हळद लावतात तसेच घसा आला तर गरम दुधात हळद घालुन देतात. जपनसकट अनेक आशियायी देशात, हळदीचा काढा प्यायला जातो. अलिकडच्या संशोधनानुसार कॅन्सर, अल्झायमर्स डिसिझ, लिव्हर डिसऑर्डर, अश्या अनेक विकारात हळद उपयोगी पडते. ट्युमर्स, सोरायसिस सारख्या विकारातही हळद वापरतात. हळदीची रोपे लावल्यास मुंग्या तिथे फिरकत नाहीत, असा समज आहे.

हळदीचा उपयोग त्वचा उजळण्यासाठीही केला जातो. लग्नात हळद फक्त लावतच नाहीत तर खेळतातही. पुर्वी लग्नात वधुवरांचे चेहरे पिवळेधम्मक दिसत असत. अजुनही पुजा वैगरे विधीत, हळकुंड खास करुन लेकुरवाळी हळद, आवश्यक समजली जाते.


मसाल्यांच्या झाडाबद्दल लिहायला घेतले म्हणुन त्याचा समारोप करतोय. या विषयावर मीठ आणि मसाले, असा एक लेख मी पुर्वीच लिहिला होता. आज त्यांच्या झाडांबद्दल थोडक्यात लिहितोय.

मसाल्यात आपण जास्त करुन वापरतो ते धणे, म्हणजे कोथिंबीरीचे फळ. तसेच जिरे, शहाजिरे, करावे हे सगळे मसाले याच गटातले. पार्सली पण याच गटातली. ओवा देखील याच गटातला. या सगळ्यांची झाडे सारखीच असतात. बडिशेप पण याच कुळातली. लहानपणी शाळेच्या बाहेर ओली बडिशेप विकायला असायची. अजुनही असेल ती.
ओव्याच्या बाबतीत मात्र जरा गोंधळ आहे. ओव्याची पाने म्हणुन एक वनस्पति कुंडितुन लावलेली असते. बदामाकृति, जाडसर पाने असलेली हि वनस्पति, खास करुन पानांच्या भजीसाठी लावतात. याच्या पानाला ओव्यासारखा वास येत असला तरी, हे ओव्याचे झाड नव्हे.
कोल्हापुर भागात माईनमुळ्यांचे लोणचे फार लोकप्रिय आहे. या मुळ्या जरी कडवट असल्या तरी त्याचे लोणचे मात्र खुप चवदार लागते. या माईनमुळ्यांच्या पानालाही ओव्यासारखाच वास येतो. या झाडाची पाने नायजेरियात मटणाचा तीव्र गंध कमी करण्यासाठी वापरतात. गुजराथमधेही या मुळ्या लोकप्रिय आहेत. तिथे त्याला गरमर म्हणतात. आणि गरमरनु अथाणु, म्हणजे लोणचे देखील त्याना अतिप्रिय आहे.
बाळशेपा म्हणजे शेपुच्या भाजीच्या बिया. यापासुनच ग्राईप वॉटर बनवतात. शेपुची भाजी आपल्याकडे अनेकजणाना आवडत नसली तरी, अरब आणि फ़्रेंच जेवणात ती वापरली जाते. अरब जेवणात बाळशेपाही वापरतात.
भाजीचे गाजर देखील याच कुळातले. त्याचा बियाही अश्याच असतात. हिंगाची वनस्पति देखील याच कुळातली. यालाचे गाजरासारखेच पण आकारमानाने बरेच मोठे मूळ असते. या मुळाना चिरा देऊन त्यातला डिंक गोळा करतात. तो म्हणजे आपला हिंग. शुद्ध हिंग आपल्याकडे फारसा वापरत नाहीत. बाजारात बांधानी हिंग म्हणजेच शुद्ध हिंग आणि तांदळाचे पिठ यांचे मिश्रणच विकायला असते.

पंजाबी प्रभावामूळे आपल्याला सिनेमात हल्ली सरसो फ़ार दिसते. पिवळाधम्मक फ़ुलोरा येणारी हि वनस्पति, आपल्याकडे खुप लोकप्रिय असली तरी ती मूळ युरपमधली. तिथेही ती लोकप्रिय आहेच. याच्या काळी, तपकिरी, पिवळी, गावरान अश्या काही उपजाती आहेत. कोबी, फ़्लॉवर, मुळा, अलकोल यादेखील याच कुळातल्या.

आल्याची ओळख आपल्याला झालीच आहे. आल्याचा एक वेगळा प्रकार म्हणजे गलांगल. आपल्याकडे तो मिळत नाही. खास करुन थाई जेवणात वापरतात. आल्याचाच एक उपप्रकार म्हणजे जिंजर लिली. याचे झाड खुप उंच म्हणजे दोनेक मीटर्स वाढते. याला अतिशय सुंदर, जाड पाकळ्यांची, गुलाबी रंगाची आणि थेट कमळासारखी दिसणारी फ़ुले येतात. या फुलांच्या कळ्या म्हणजेच जिंजर लिली.

आपल्याकडे जेवणात पुर्वी तिखटपणासाठी मिरीबरोबर पिंपळी वापरत असत. याचा वेल मिरीसारखाच असतो. अतिशय गुणकारी अशी हि वनस्पति आता लोकप्रियतेत मागे पडलीय. आयुर्वेदात वर्धमान पिंपळी प्रयोग, म्हणुन एक उपचार आहे. दुध पचण्यासाठी व एकंदर प्रकृति सुधारण्यासाठी तो करतात.
चक्रीफ़ुल म्हणजे चाफा कुळातील एका वनस्पतीची बोंडे तर नागकेशर म्हणजे याच वर्गातल्या एका फ़ुलाचे पुंकेसर.
दगडफ़ुल हा एक वेगळाच प्रकार आहे. खडकावर पोसलेले एका प्रकारचे शैवाल आणि त्यावर पोसलेली एका प्रकारची बुरशी म्हणजे दगडफुल. त्याची काळी बाजु म्हणजे शैवाल तर पांढरी बाजु म्हणजे बुरशी.

मेथी म्हणजे मेथीच्या भाजीच्या बिया तर कलौंजी म्हणजे कांद्याच्या बिया. कलौंजीचा प्रसार आपल्याकडे फारसा नाही, पण बंगाल आणि पंजाब मधे तो आहे.

तीळाचे झुडुपही छोटेसे असते, व त्याला जांभळट रंगाची फुले येतात. पांढर्‍या तिळासारखेच काळे तीळही असतात. कारळे मात्र एक वेगळी वनस्पति आहे. चमकदार पिवळ्या रंगाची फ़ुले येणारी हि छोटीशी झाडे खुपदा शेताच्या कडेने लावलेली असतात. याचा वापर जास्त करुन चटणी करण्यासाठी होतो.

खसखस म्हणजे अफ़ुचे बी. लांब पानाचे याचे झाड असते. याच्या पानांचीही भाजी करतात. तसे हे झाड कुठेही उगवु शकते, पण याची शेती करण्यासाठी खास कायदेशीर परवानगी लागते. याला सुंदर लाल रंगाची फुले येतात. मग त्याला हिरवे गोल बोंड धरते. या बोंडाना चिरा देऊन जो चीक पाझरतो ती अफ़ु. हा चीक काढुन घेतला कि त्यात ज्या बिया तयार होतात, ती खसखस. खसखशीत मादक द्रव्यांचा अंशही नसतो. पांढरी तशीश काळी अश्या दोन रंगाची खसखस असते.

लसणीचे झाड म्हणजे कांद्याची छोटी आवृत्तीच. लसणीचा प्रसार आणि वापर जगभर आहे. मोठ्या पाकळ्यांची व छोट्या पाकळ्यांची असे दोन मुख्य प्रकार. काहिवेळा लसणीच्या एकाच पाकळीचा गड्डा तयार होतो. आणि तो चढेल किमतीला विकला जातो.

केशर म्हणजे फ़ुलातले पुंकेसर. भारत, इराण, स्पेन अश्या मोजक्याच ठिकाणी केशर होते. रंगद्रव्याच्या दृष्टिने बघितले तर प्राजक्ताच्या फ़ुलाचा देठ आणि केशर यात फारसा फरक नाही. फर आहे तो स्वादात. केशराची लागवड आणि उत्पादन अगदीच मर्यादित असल्याने, यात बरिच भेसळ केली जाते.

हा छोटेखानी लेख केवळ या गटाचा समारोप करण्यासाठीच. आता पुढे सुरु करु.





Monday, July 16, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या लेखापर्यंत मी जवळजवळ ६५ वनस्पतिंची ओळख, हो फक्त ओळखच करुन दिली आहे. अजुन बरेच लिहायचे आहे, पण तुर्तास एक मोठा ब्रेक.
तोपर्यंत रिझवण्यासाठी हा एक फोटो. या झाडाचे उत्पादन, तुम्हा सगळ्यानाच आवडते. बघा ओळखता येतय का ते ?


लहानपणापासुन आपल्याला चॉकलेटची चटक लागलेली असते. माझ्या लहानपणी कॅडबरीचे चॉकलेट तसे महागच होते. त्याचवेळी एक्लेअर्स बाजारात आले, आणि ते मात्र आवाक्यातले होते.
पुढे चॉकलेट म्हणजे फ़्रान्स वा युरप असे समीकरण डोक्यात बसले. ( चॉकलेट नावाचा एक सिनेमाही अलिकडे येऊन गेला ) त्यामूळे उगाचच असा समज झाला होता कि चॉकलेटसाठी लागणार्‍या कोकोचे उत्पादन त्याच भागात होत असावे.
पण हा गैरसमजच ठरला. कोकोची झाडे विषुवृत्ताच्या १० अंश मर्यादेतच वाढतात. या झाडाचे मूळ दक्षिण अमेरिकेतले मानले जाते. माया संस्कृतीमधे कोकोच्या बिया चलन म्हणुन वापरल्या जात असत. पुढे स्पॅनिश लोकानी ती झाडे आफ़्रिकेत नेली. सध्या आयव्हरी कोस्ट. नायजेरिया, घाना सारखे काहि देश कोकोचे बहुतेक उत्पादन करतात. ( युरपमधील चॉकलेट उत्पादक अर्थातच हे सत्य उघड करत नाहीत. )
आपल्याकडे कर्नाटक, आणि इतर दक्षिण राज्यात कोकोचे उत्पादन होते. ( कोकेन हे मादक द्रव्य ज्या झाडापासुन मिळवतात ते झाड वेगळे ) कोकोचे फ़ुल इथे बघता आहातच.



oLakha paahu

याचे झाड मात्र खुप मोठे असते. वरच्या फोटोत दिसतेय ते फुल अत्यंत देखणे असले तरी त्याचा आकार एक सेमीपेक्षाही कमी असतो. त्यामूळे नुसत्या डोळ्याना हि कलाकुसर जाणवतही नाही.
हि फुले खोडावर आणि आडव्या फांद्यांवरच येतात. मग तिथे कोकोचे फळ धरते.

( कोकोच्या फ़ळाचा एक फोटो, इतरत्र पोस्ट करतोय. हा फोटो मी काढलेला नाही. पण मायबोलिवर पुर्वी झळकला होता. त्या कलाकाराचे आभार तर मानतोच शिवाय तो इथे पोस्ट करण्यास परवानगीही गृहित धरतोय ) या फळांचा रंग पिवळा, गुलाबीही असु शकतो.
नायजेरियातल्या पोर्ट हारकोर्टमधे हे फळ बाजारात विकायला असायचे. काहि पुर्वग्रहांमुळे मी ते चाखुन बघितले नाही.
कोको या फळांच्या बियांपासुन करतात. पण ती प्रक्रिया तशी सोपी नाही. या फळाचे साल बरेच जाड आणि चिवट असते. आत गोडसर गरात मोठ्या मोठ्या बिया असतात. हे फळ फ़ोडताना, धातुचे हत्यार वापरत नाहीत. लाकडाच्या फळीनेच ते फोडतात.
आतला गर व बिया काढुन घेतात. या बिया व गर सात दिवस फ़र्मेंट करावा लागतो. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धति वापरतात. आपल्याकडे कर्नाटकात, बांबुच्या टोपल्यात केळीची पाने लावुन त्यात या बिया व गर घालतात आणि वरुन केळीचीच पाने झाकतात. या अवधीत गर आंबुन निघुन जातो व बिया शिल्लक राहतात. योग्य तो स्वाद मिळवण्यासाठी हि प्रक्रिया आवश्यक ठरते.
मग या बिया कडक उन्हात सुकवल्या जातात. सुकवल्यानंतर आतला पांढरा गर तपकिरी झालेला असतो. या सर्व प्रक्रियेत खुप मनुष्यबळ लागते. ( तरिही कर्नाटकातल्या आठवडी बाजारात या बिया दोन चार रुपये किलोने मिळतात. )
यापुढची प्रक्रिया मात्र औद्योगिक आहे. या बिया भाजुन, त्याच्या वरचे आवरण काढणे, त्यातला सुप्तावस्थेतला कोंब काढणे हे सगळे करावे लागते. कोकोच्या बियात भरपुर प्रमाणात मेद असतो. तोच कोको बटर. तोही वेगळा करावा लागतो. आणि जे बाकि उरते ती कोको पावडर.
या कोको बटरचे सौंदर्य प्रसाधनात मानाचे स्थान आहे. नायजेरियातल्या मुली, या बटरचा वापर करुन आपली त्वचा तुकतुकीत ठेवतात. केसाना लावण्यासाठीही ते वापरतात.
चॉकलेटला मुलायमपणा येण्यासाठी काहि प्रमाणात परत कोको बटर मिसळावे लागते. कोको पावडर जितकी बारिक, तितले चॉकलेट मुलायम होते. म्हणुन या प्रक्रियेवर खुप नियंत्रण ठेवावे लागते.
याच्या गरापासुन मद्यही करतात. कोकोपासुन तरतरी येते हे आपण जाणतोच. पण खास प्रेमाचा आणि चॉकलेट्स चा निकटचा संबंध आहे. हि एक रासायनिक प्रक्रिया आहे, त्यामुळे शरिरात काहि संप्रेरके तयार होतात व मानुष्य प्रेमात पडतो. किंवा प्रेमात पडलेल्या व्यक्तीला चॉकलेट्स जास्तच आवडु लागतात. खरे खोटे, ते प्रेमीच जाणोत.




Tuesday, July 17, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हे कसलं आहे ?

puzzle


Sunday, July 29, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तशी काहि फार जुनी गोष्ट नाही ही. घरी एखादा घरगुति समारंभ असला, म्हणजे जसा कि बारसं वा साखरपुडा, कि पाहुण्याना देण्यासाठी खास महाराष्ट्रीय पद्धतीची कॉफ़ी बनवली जायची. नेसकॉफ़ी त्यावेळी फारशी प्रचारात नव्हती. साधीच कॉफ़ी पाण्यात उअकळली जायची. ती उकळुन झाली कि त्यात वेलची जायफळ टाकले जायचे. मग थंड पाण्याचा हबका मारायचा आणि मग आपण चहाला जेवढे दुध घालतो तेवढे दुध घालुन, ती कॉफ़ी पाहुण्याना दिली जायची. नेहमीच्या चहापेक्षा तो जरा वेगळा प्रकार म्हणुन लोक आवडीने प्यायचे. हि कॉफ़ी पिवुन झाली को कपाच्या तळाला पावडरीचा गाळ दिसायचा.

cofeechee phaLe

पुढे बाजारात नेसकॉफ़ी आली. ती उकळायची गरज नसायची. गरम दुधात घातली कि झाले. आपल्याकडे ती लगेच लोकप्रियही झाली, पण दाक्षिणात्य मात्र त्या कॉफ़ीकडे ढुंकुन बघत नसत. मद्राशी मित्रमैत्रीणींबरोबर हॉटेलमधे गेलो, कि ते लोक आवर्जुन फ़िल्टर कॉफ़ी मागवत.

आमच्या शेजारी कुर्गी कुटुंब आणि वरती तामिळ कुटुंब. दोघांच्याही भिन्न तर्‍हा. दोघेही आम्हाला आवर्जुन कॉफ़ी पाजत. कुर्गी लोकात फ़्रेंच पर्क्युलेटरचा देशी अवतार असे. एकावर एक असे दोन डबे. त्यातला मधल्या झाकणाला बारिक जाळी. आणि त्यावर आणखी एक जाळीची चकती. त्यावर खास त्यांच्या शेतातल्या कॉफ़ीची पुड घालुन रात्री झोपताना त्यावर उकळते पाणी ओतायचे. मग थेंबाथेंबाने खालच्या डब्यात कॉफ़ी गोळा व्हायची. ती वेलची, साखर घालुन प्यायची.
तामिळ मामी कच्च्या बिया आणुन घरी भाजायच्या. त्या रोज सकाळी हाताने फ़िरवायच्या यंत्रावर दळुन बारिक करायच्या. मग ती पावडर उकळुन, त्यात दुध साखर घालुन, त्यांच्या खास भांड्यात वर खाली करुन फ़ेस आणुन हातात ठेवणार.
नेसकॉफ़ीमधे मिसळल्या जाणार्‍या चिकोरीचे उत्पादन गुजराथमधे होते. त्यामूळे कि काय गुजराथ्यांमधेही कॉफ़ीचा प्रचार झाला. कुठल्याही गुजराथी घरी अगदी उभ्याउभ्या गेलात तरी गेल्याबरोबर पाणी, मग कॉफ़ी आणी मग वरियाळी, म्हणजे बडिशेप हे पुढे येणारच.
अरब आणि फ़्रेंच लोकातही कॉफ़ी अतिप्रिय. अरब लोक करतात ते काहवा. सुरईसारख्या धातुच्या भांड्यात कॉफ़ी, साखर आणि वेलची उकळली जाते. अगदी उलुश्या कपात घालुन ती आदराने दिली जाते. या कपाला कान वैगरे नसतो, तसेच कॉफ़ीत दुधही घालत नाहीत ते. पण तयार झालेला काहवा, काळाकुट्ट आणि मधा इतका घट्ट असतो. अरबी मित्रांच्या आग्रहाने तोही चाखुन बघितला.
फ़्रेंच प्रकरण म्हणजे विजेवर चालणारे कॉफ़ी मेकर. त्यातल्या वरच्या भांड्यात फ़िल्टर पेपर घाला, मग कॉफ़ी पावडर घाला. बाजुच्या भांड्यात पाणी घाला. ते विजेवर उकळुन, हळुहळु कॉफ़ी तयार होते. ते कपात ओतुन त्यात साखरेचे क्युब्ज घाला. आणि तशीच प्या. तेही रसायन चाखुन बघितले. त्यात कितीही दुध घातले तरी ती माझ्या जिभेला रुचेल एवढी माईल्ड होईना. शेवटी कपभर दुधात, दोन चमचे त्यांच्या कॉफ़ीचा द्राव असा समझोता झाला.

माझ्या एका कोलकत्त्याच्या मित्राने एक खास उपकरण बनवले होते. प्रेशरकुकरच्या वेंटला एक वक्रनलिका बसवुन तिचे दुसरे टोक खाली सोडलेले होते. कपात थंड दुध, नेसकॉफ़ी आणि साखर घालुन ( कुकरमधुन दमदार वाफ यायला सुरवात झाली कि ) त्यात हे टोक सोडायचे. दोन मिनिटात फ़ेसाळ एस्प्रेसो कॉफ़ी तयार व्हायची.
माझा स्वताचा आणखी एक खास प्रकार आहे. कपभर गरम पाण्यात अर्धा चमचा नेसकॉफ़ी, अर्धा चमचा साखर, आणि एका लिंबाचा रस, हे रसायन, मलातरी खुप तरतरी आणते.

तश्या कॉफ़ी तयार करायच्या अनेक पद्धति आहेत. ( सध्या कॉफ़ी बियर, असे नॉन अल्कोहोलिक ड्रिंकही मिळते. )
या कॉफ़ीचे उगमस्थान, इथिओपियामधील काफ़्का हे गाव मानले जाते. तिथल्या मेंढपाळाना, बकर्‍या एका झाडाची फळे खाल्ल्यावर जास्तच टणाटण उड्या मारताना आढळल्या. त्या फळांचा पद्धतशीर विकास व लागवड करुन, कॉफ़ी तयार झाली.
कॉफ़ीचे रोबस्टा आणि अरेबिका असे दोन प्रमुख प्रकार. शिवाय अनेक उपप्रकारही आहेत.

याचे झाड मध्यम उंचीचे. मोठ्या पानांचे असे असते. उष्ण व दमट हवामान लागत असले तरी प्रत्यक्ष झाडाला मात्र सावली लागते. याला सुंदर पांढरी फुले येतात. मग हिरवी फळे धरतात. हि फळे साधारण एक सेमीची होतात व पिकुन लाल होतात. अशी लाल झालेली फळे हाताने खुडतात. वरचा गर हा अगदी मऊ असतो व हि फळे हाताने चोळल्यास तो सुटा होतो. आत शेंगदाण्याएवढी बी असते. तीच कॉफ़ीची बी. अलिकडे या बिया कच्च्या, भाजलेल्या व ताज्या दळलेल्या, अश्या बाजारात मिळायला लागल्या आहेत. या बियाना भाजेपर्यंत काहि खास स्वाद नसतो. सगळा स्वाद भाजण्यामूळेच येतो.

जास्त कॉफ़ी पिणे अर्थातच हितकर नाही. अलिकडे कॅफ़िनमुक्त कॉफ़ीही मिळायला लागली आहे, पण तरिही अतिसेवन वाईटच.




Monday, July 30, 2007 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नस्ति यस्य गृहे माता, तस्य माता हरितकी, म्हणजेच ज्या घरात मुलाबाळांची व इतरांचेदेखील काळजी घेण्यास माता नाही, तिथे हि जबाबदारी हरितकी पार पाडेल. हरितकी म्हणजे हिरडा.

hirada


Terminiyaa chebula असे याचे शास्त्रीय नाव. याची झाडे सर्व भारतभर आढळतात. कोकणात आणि गुजराथमधे ती फार आहेत. कोल्हापुर जिल्ह्यातल्या राधानगरी, गगनबावडा, चंदगड या सगळ्याच एस्टी स्टॅंडजवळ हिरड्याची मोठी झाडे आहेत. आंबाघाटातही ती विपुल आहेत.

याचे झाड भरपुर मोठे, आणि भरपुर पर्णसंभाराचे असते. याचा फ़ुलोरा आणि फळे दोन्हीही पानाच्या आतच असतात. पण नीट बघितले तर हि फळे सहज ओळखु येतात.

हरितकी, हेमवती, हिमजा, गिरिजा, अमृता, सुधा, सुधोद्भवा अशी अनेक नावे हिरड्याला आहेत. अगदी कोवळा असतो तो बाळहिरडा आणि कठिण, जड, लांबट, पाण्यातही बुडणारा, दोन तोळ्यांपेक्षा जास्त वजनाचा तो सुरवारी हिरडा.
याशिवाय आकारावरुन त्याचे अभया, अमोधा, नंदिनी, पाचनी, पत्थ्या, बल्या, चेतकी, रोहिणी, विजया, वयस्था, प्राणदा असे अनेक प्रकार आहेत.

आहारशास्त्रानुसार, आपल्या जेवणात सहा रस म्हणजे चवी असाव्यात असा संकेत आहे. या सहांपैकी खारट चव सोडली तर बाकि पाचही चवी हिरड्यात असतात. पण तुरट रस जास्त असतो. ( आणि नेमका हाच रस आपल्या आहारात अलिकडे कमी असतो. ) यामुळे वात, कफ आणि पित्त या तिन्ही दोषांवर हिरडा उपयोगी ठरतो.

खास करुन सुरवारी हिरडा, मृदुविरेचन, अश्रोघ्न, श्लेष्मघ्न, शोथग़्ह्न, रक्तसंग्राहिक, बल्य, पत्थ्य, गुल्महर, व्रणरोपण या गुणधर्माचा असतो. याचे तुकडे करुन, तुपात परतुन, रोज खाणे चांगले. नियमित सेवनाने शरिरातील सर्व क्रिया सुधारतात. म्हणुन हा रसायनही आहे. ह्याने भुक लागते, अन्न पचते, मुरडा होत नाही, उमासे येत नाहीत, रक्तवाहिन्यांचा पोत सुधारतो, झोप चांगली लागते, त्वचेचा रंग उजळतो.

आयुर्वेदात प्रत्येक ऋतुमधे कुठला आहार करावा याबद्दल मार्गदर्शन केले आहे. हिरडा मात्र सर्व ऋतुमधे घेण्यास योग्य आहे. वर्षा ऋतुमधे तो सैंधवासह, शरद ऋतुमधे साखरेसह, हेमंतऋतुमधे सुंठीसह, शिशिर ऋतुमधे पिंपळीसह, वसंत ऋतुमधे मधासह आणि ग्रीष्म ऋतुमधे गुळासह घ्यावा.

एक वर्षाच्या बाळापासुन कुणालाही हिरडा घेणे श्रेयस्कर आहे.
हिरडा, आवळा आणि बेहडा ( या बेहड्याचीही आपण ओळख करुन घेऊ ) या तीन तुरट चवीच्या फळांचे त्रिफळा चुर्ण हे औषध प्रसिद्धच आहे. सोम्य रेचक तर ते आहेच त्याशिवाय चेहरा धुण्यासाठी आणि केस धुण्यासाठीही ते आदर्श आहे. याशिवाय गंधर्व हरितकी, पत्थ्या भल्लतक, अभयारिष्ट, अभया लवण, चित्रक हरितकी लेह, हरितकी खंड, अभयादिमोदक, पुनर्नवाषृक काढा, अग्निमुखरस, अग्नितुंडि, आम्लपित्तांतक अश्या अनेक औषधात हिरडा असतो.
हिरड्यांचा वापर रंग उद्योगात आणि कातडी कमावण्यासाठी पण करतात. हिरडे गोळा करुन विकणे, हा वनवासी जनाना पैसा मिळवुन देणारा उद्योग आहे.




Wednesday, August 01, 2007 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिरड्यानंतर बेहड्याच्या उल्लेख अपरिहार्य आहे. हि दोन नावे जोडीनेच घ्यावी लागतात. भारतात वाळवंट सोडले तर बहुतेक सगळीकडे हा वृक्ष दिसतो. गोव्यात हि झाडे भरपुर आहेत. याचे झाड खुप मोठे होते, आणि पर्णसंभारही दाट असतो. सावलीसाठी उत्तम वृक्ष आहे हा.

behada

Myrobalan belleric असे याचे शास्रीय नाव. याची पाने वडाच्या पानासारखीच पण जरा पातळ असतात. या पानांचा देठ लांब व बारिक असतो. फांद्यांच्या टोकाला पानांची रचना एखाद्या फुलाप्रमाणे असते. कोवळी पाने लाल दिसतात.

झाड नेहमी पाहण्यातले असले तरी या फळांबद्दल अनेकाना माहिती नसते. याचीही फळे पानांच्या आडच असतात, पण नीट निरखुन बघितले तर सहज दिसतात.

यालाच संस्कृतमधे बिभीतक असेही नाव आहे मराठीत वेहळा, हेळा, घटिंग अशीही नावे आहेत.
याची कच्ची फळे रेचक असतात, तर पिकलेली फळे विरुद्ध गुणधर्माची, म्हणजे रेच थांबवणारी असतात. फळात पांढरा गर असतो, आणि तो गोडसर लागतो. ( जास्त खाल्ला तर मात्र नशा येते. ) आवळा आणि हिरडा सारखाच हा तुरट चवीचा असला तरी, आवळा पित्तावर, हिरडा वातावर आणि बेहडा कफावर गुणकारी आहे. म्हणुनच या तिघांची एकत्र योजना त्रिफळा चुर्णात केलेली असते.
बेहड्यापासुन तेल निघते, आणि याने पांढरे केस काळे होतात. याने त्वचेवरील व्रण भरुन येतात. जनावरांच्या जखमांवरही बेहड्याची साल गुणकारी ठरते.




Wednesday, August 01, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हे जे लिहितोय, ते अनेक पुस्तकातुन वाचुन, प्रत्यक्ष अनुभवातुन, वैगरे, पण माझ्यापेक्षा शेळ्या, गायीगुरे श्रेष्ठ आहेत म्हणायची. कारण वनस्पतिंचे ज्ञान मिळवायला त्याना असले काहि उपद्व्याप करावे लागत नाहीत. एरवी हिरवं काहिही दिसलं तरी चुबुर चुबुर खाणारे हे मुके प्राणी, एका विषकन्येकडे मात्र ढुंकुनही बघत नाहीत, ती विषकन्या आहे कण्हेर.

saadhi kaNher

Nerium odorum हे तिचे शास्त्रीय नाव. आपल्याला अगदी परिचित. ही वरच्या फोटोत दिसतेय ती, अगदी साधी जात. याला थोडाफार सुगंधही असतो.

मध्यम उंचीचे हे झुडुप, शत्रुच नसल्याने मजेत वाढते. याची लांबट पाने चिवट असतात. दोन पाने बोटात धरुन वाजवली कि फ़टफ़ट वाजतातही.

या पानाच्या शिरेची मजा म्हणजे, पानाच्या वर असण्यापेक्षा हि पानाच्या खालीच जास्त उठावदार असते. हि फ़ुले बहुदा गुच्छातच येतात. पांढरी ते गडद गुलाबी अश्या अनेक छटा यात दिसतात. पाकळ्यांची संख्याही अनियमित असते. यापैकी पांढरी कण्हेर औषधी आहे. डोकेदुखीमधे वैगरे या पांढर्‍या कण्हेरीची मुळे वरुन लावण्यासाठी वापरतात. पण त्याची मात्रा अगदी अल्प असावी लागते. थोडीही मात्रा जास्त झाली तर, नाडीचे ठोके मंदावतात, आकडी येते व हृदयक्रिया बंद पडु शकते.

या फुलांचा चेंगटपणा म्हणजे सुकली तरी ती फुले गुच्छातच राहतात. अजिबात गळुन पडत नाहीत.


gulabi kaNher

वरच्या फोटोत दिसतेय ती सिंगल कण्हेर. यातही पांढरी ते गडद गुलाबी अश्या अनेक छटा आहेत. या कण्हेरीला शेंगा आल्याचे मी बघितले आहे.

पानावरही नक्षी असणारी एक जात, असते याची.


pivaLee kaNher


खरे तर पिवळी कण्हेर, बिट्टि किंवा गोविंदवृक्ष हा या कुळातला नव्हेच. Thevetia peruviana असे त्याचे शास्त्रीय नाव. अर्थात दक्षिण अमेरिकेतील पेरु हे त्याचे मूळ ठिकाण.

केवळ पानातील साधर्म्यामूळे आपण त्याला कण्हेर म्हणतो. पण याची पाने कण्हेरीपेक्षा अरुंद असतात. हे झाड भराभर वाढते. याला फार लवकर फुले यायला सुरवात होते. फुले एकेकटी येत असली तरी भरपुर येतात. कुठलाही ऋतु असो, झाडावर ( गोविंदाच्या पूजेसाठी ) एकतरी फुल असणारच, म्हणुन तर गोविंदवृक्ष हे नाव.

यातच पिवळ्यासोबत पांढरी आणि किंचीत केशरी अश्या दोन जाती दिसतात. ( सोनचाफ्यातही याच छटा असतात. )


keshari kaNher

या फुलांची खासियत म्हणजे, आपल्याला वाटते तेवढी ती उमलतच नाहीत. काहि ठिकाणी पाकळ्या थोड्या उकलतात हे खरे, पण फुल पुर्ण उमलत नाही.

तसेच हि फुले झाडावर फारशी टिकत नाहीत. ताजी असतानाच गळुन पडतात.

गळुन पडली कि या झाडाला हिरव्या रंगाचे एक फळ लागते. लंबगोल अश्या फळाला एक आडवी रेघ असते. या फळाची बी म्हणजेच बिट्टि. फ़िक्कट चॉकलेटी रंगाचे लंबगोल त्रिकोणी असे हे फळ, पुर्वी मुलींच्या खेळण्याचे साधन असे. यानाच इंग्लिशमधे लकि नट्स असेही म्हणतात.

( मला हा खेळ कधी जमलाच नाही. मोठी बहिण खेळताना, मी तिला फार त्रास द्यायचो लहानपणी. चलाखी, हस्तकौशल्य, अवधान या सगळ्यांचा कस लावणारा हा बैठा खेळ, अलिकडे विस्मृतीतच गेलाय. )

याची फळे अत्यंत विषारी असतात. केरळमधे आत्महत्या करण्यासाठी, हि फळे कुटुन खाल्ली जातात.

तशी या वृक्षाचीही साल औषधी आहे, पण ती अत्यंत अल्पमात्रेत द्यावी लागते. म्हणुनच ती सहसा वापरत नाहीत.

जरी आपली नसली तरी कण्हेर फार काळापासुन आपल्याकडे लावली जाते, गणपतीला ज्या पत्री वाहतात, त्यात कण्हेर असते. पांढर्‍या कण्हेरीला भरपुर फुले येणे, हा शुभशकुन मानतात.





Thursday, August 02, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

( सुवर्णाला ) अग्निपरिक्षा द्यावी लागते त्याचे काहि वाटत नाही, पण गुंजेशी तुलना होते, त्याची खंत वाटते, अश्या अर्थाचे एक संस्कृत वचन आहे.

पुर्वी सोन्यासारख्या मौल्यवान वस्तुंचे वजन करण्यासाठी गुंजांचा वापर केला जात असे. गुंजा, मासा, तोळा अशी वजने होती.

लहानपणी जो खजिना आपण गोळा करत असु, त्यात गुंजा असतच. तसा गुंजांचा काहि उपयोग नसे, पण त्या वयात त्या फ़ार मौल्यवान वाटत एवढे खरे.

आजही त्यांचे गारुड माझ्या मनावर आहे. मुंबईतली जी झाडे आहेत. ( बाबुलनाथाच्या पायथ्याशी, महापौर निवासाजवळ, फ़ोर्टमधे युनिव्हरसिटीजवळ वैगेरे ) त्या झाडांखालुन जाताना अजुनही मी दोनचार गुंजा उचलुन हातात घेतो.

गुंजांची झाड मध्यम उंचीचे असते, त्याची पाने सयुंक्त असौन, चिंचेच्या पानापेक्षा बरिच मोठी असतात. याला सुंदर पिवळा फुलोरा येतो.


Gujechaa phulora

पण हे झाड अगदीच बेंगरुळ. हा फुलोरा नीट निरखुन बघितला तरच दिसणार. यावेळी पाने वैगरे गळलेली नसतात.

पण एकाच बिंदुतुन निघालेले हे तुरे सुंदर दिसतात. या फुलोर्‍यानंतर याला अर्धचंद्राकृति शेंगा लागतात. त्याची अर्थात झुपक्यानेच लगडतात. गुंजा तयार झाल्या कि या शेंगा दुशीकडुन उअकलायला लागतात. आतल्या सोनेरी पार्श्वभुमीवर लालभडक गुंजा सुरेख दिसतात. यापैकी काहि गुंजा झाडाखाली पडतात तर काहि शेंगानाच चिकटुन राहतात.

या सगळ्या सुकलेल्या शेंगांचा एक गुंतावळा झाडावर तयार होता. आणि यामुळे झाडाच्या बेंगरुळपणात भरच पडते. ( डॉ. डहाणुकरानी याचे अतिषय समर्पक वर्णन केलेय. मी तो संपुर्ण उतारा इतरत्र दिला आहे. )


Thoralee Gunj

या गुंजांची पुर्ण लाल असलेली एक जात तर मधे एक काळा ठिपका असलेली जात आहे. याचा आकार साधारण उडत्या तबकड्यांसारखा असतो. सश्याच्या डोळ्याना नेहमी गुंजांची उपमा दिली जाते.

याची एक वेगळी जात जंगलात दिसते.


chhoTee gunj

याचा वेल असतो. अर्थात शेंगांचा बेंगरुळपणा दोन्हीकडे सारखाच.

यात लालभडक रंगाबरोबर गुलाबी किंवा काळ्या रंगाच्याही गुंजा दिसतात. सोन्याच्या वजनासाठी नेमक्या कुठल्या गुंजा वापरत असत, त्याची मला कल्पना नाही, पण या बियांचा नियमित आकार आणि नेमके वजन, यामूळेच त्याना हा मान मिळाला असणार.

या वेलीची पाने, गोडसर लागतात. आणि मसाला पानात ती घालुन खातातही. हि पाने मात्र खुपशी चिंचेच्या पानासारखीच दिसतात.

माकडेपण गुंजा गोळा करतात, आणि त्यालाच ते निखारे समजुन त्यापासुन उब मिळवतात. या त्यांच्या तथाकथित मूर्खपणाला नावे ठेवणारेही एक वचन आहे.

मारुति चितमपल्लींच्या पुस्तकात मात्र एक अद्भुत उल्लेख आहे. माकडे अग्निला खुप भितात. त्यामुळे प्रत्यक्ष आगीपासुन ती दूरच राहतात. पण थंडीपासुन बचाव करण्यासाठी ती लाकडे गोळा करुन, त्याची शेकोटी रचतात. ती अर्थातच पेटवत नाहीत, पण त्याभोवती बसुन, उब घेतात. ( हा उल्लेख मूर्खपणाचा वाटतोय खरा, पण पुढचा उल्लेख अद्भुत आहे. ) या माकडानी रचलेल्या शेकोटीतली लाकडे पळवुन, पेटवली तर ती अजिबात पेटत नाहीत. माकडानी जणु त्या लाकडातले अग्नितत्वच काढुन घेतलेले असते. ( चितमपल्लींच्या पुस्तकात असे अनेक अद्भुत उल्लेख आढळतात. तर्काच्या कसोटीवर ते पटत नसले तरी त्यांचा दिर्घ अनुभव लक्षात घेतला, तर त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. )




Friday, August 03, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागरगोटा. लहानपणीच्या खजिन्यातली आणखी एक मौल्यवान वस्तु. याचे रुप बघुन तो झाडाबिडाला लागत असेल असे वाटायचेच नाही. शिवाय याचे नाव, सागरगोटा. त्यामूळे समुद्रात वैगरे तो मिळत असावा, असा ठाम समज होता माझा पुर्वी. ( सोबतचा फोटो, मायबोलिकर नलिनी, च्या सौजन्याने. )


saagaragoTe

Desmodium gangeticum असे सागरगोट्याचे शास्त्रीय नाव.

याचा काटेरी वेल असतो. काटे फारच तीक्ष्ण असतात. या काट्यांच्या आधाराने वेल पसरत जातो. पाने साधारण कढिपत्त्याच्या पानासारखीच असतात.

याला लंबगोल अशी फळे लागतात. यावरही काटे असतात. यातल्या बिया म्हणजे सागरगोटा. या बिया पक्व होवुन सुकल्या कि शेंग तडकते आणि कालांतराने हे सागरगोटे खाली पडतात. यालाच मराठीत गजगा किंवा गजरा असे नाव आहे.

लहान मुलाना जी बाळघुटी उगाळुन देतात, त्यात सागरगोटा असतो. यात थोडासा घोळ होतो, तो म्हणजे या घुटीत सागरगोटा, कवचासकट उगाळला जातो. याचे कवच खुप कठिण असते. आणि ते सहसा फुटत नाही.

कवच फ़ोडण्यासाठी सागरगोटा मंद विस्तवावर भाजावा लागतो. यातला गरच औषधी असतो.

दम्यावरील प्रसिद्ध औषध, कुबेरवटी यापासुन तयार करतात. स्त्रियांच्या काहि विकारावरही सागरगोटा उपयोगी पडतो.

सागरगोटे पुर्वी मुलींच्या खेळण्यात असत. पाच किंवा सात सागरगोटे, फ़ाश्यांप्रमाणे जमिनीवर पसरवायचे, मग त्यातला एक वर उडवुन, तो वरच्यावर अलगद झेलायचा. तेवढ्या अवधीत खालचे सागरगोटे, एक, दोन, तीन असे क्रमाक्रमाने गट करुन उचलायचे. त्यावेळी बाकिच्या सागरगोट्याना धक्का लावायचा नसे कि वर उडवलेला सागरगोटा, खाली पडु द्यायचा नसे. यापुढेही दोन बोटांची कमान करुन त्यातुन एकेक सागरगोटा पुढे ढकलणे, दोन पायांच्या तळव्यांची विहिर करुन त्यात सागरगोटे ढकलणे ( प्रत्येकवेळी सागरगोटा वर उडवुन ) असे प्रकार असत.

सागार्गोट्यांबद्दलचा एक किस्सा इथे परत लिहिण्याचा मोह मला आवरत नाही. माझ्या एका मित्राच्या लग्नासाठी, माझे दोन मित्र, एकाची बायको असे आम्ही जामनगरला गेलो होतो. गावात बघण्यासारखे काय आहे, अशी चौकशी केली तर स्मशाण असे उत्तर मिळाले. तिथले स्मशाण खरोखरच बघण्यासारखे आहे. तिथे काहि सुंदर पुतळे वैगरे तयार केलेले आहेत. तर आम्हाला खास गाडीने तिथे पाठवण्यात आले. गाडी तासाभराने आम्हाला परत न्यायला येणार होती. आम्ही सगळे स्मशाण फ़िरुन बघितले, आणि गाडीची वाट बघत बसलो.
तिथे गेटजवळ एक हातगाडीवाला, बांगड्या, टिकल्या वैगरे विकत होता. त्याच्याबरोबर आम्ही थोडा टाईमपास केला, बहुतेक वस्तुंचे भाव विचारुन बघितले, पण घेतले मात्र काहिच नाही.
तेवढ्यात माझे लक्ष तिथे असलेल्या सागरगोट्यांच्या वेलाकडे गेले. त्याला वरती काहि शेंगा लागल्या होत्या. जवळची काठी घेऊन, आम्ही ते पाडायचा प्रयत्न करु लागलो. पण काहि जमेना.
तेवढ्यात तो हातगाडीवाला म्हणाला, तूम्हाला सागरगोटे हवेत तर माझ्याकडे आहेत, घ्या.
खास शहरी मानसिकतेने, आम्ही त्याला भाव विचारला.
त्यावर त्याने दिलेले उत्तर, आमच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले, तो म्हणाला, मी दिवसभर इथेच असतो. खाली पडतात ते सागरगोटे जमा करुन ठेवतो मी, त्याचे कसले पैसे ?




Monday, August 06, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी नायजेरियातली पहिली रात्र मला अजुन आठवतेय. मुंबई ते फ़्रॅंकफ़ुर्टचा मस्त प्रवास, तिथे घालवलेला काहि काळ आणि मग मात्र सरळ उत्तर दक्षिण असा एकाच टाईमझोन मधुन केलेला, फ़्रॅंकफ़ुर्ट ते अक्रा आणि अक्रा ते लेगोस असा कंटाळवाणा प्रवास. खाली रखरखीत सहारा वाळवंट. तिथे उतरल्यावर सगळे आडदांड नायजेरियन्स. इमिग्रेशनपासुनच छळवादाला सुरवात. बाहेर आलो तर लोकल होस्ट निघुन गेलेला, कसेबसे त्याला गाठुन, कंपनीच्या गेस्ट हाऊसमधे गेलो तर रात्र झाली. जेवायची इच्छाच नव्हती.
पण पुरेशी झोप झाल्यावर सकाळी मात्र प्रसन्न वाटत होते. कुठल्याही नविन गावी गेलो, कि पहाटेच गाव जागे होण्यापुर्वी मला फ़ेरफ़टका मारायला आवडतो. खिडकि उघडुन अंदाज घेतला, तर समोरच फ़ळानी लगडलेले झाड, आणि झाडाखाली फळांचा सडा. भराभर आटपुन खाली गेलो, तर तिथल्या रखवालदाराने, ती सगळी फळे झाडुने लोटुन ठेवली होती. पण मला बघुन तो हसला, मग मी सगळी भीडभाड सोडुन ती फळे हवीत म्हणुन सांगितली. ती कचर्‍यातुन वेचुन देण्यापेक्षा त्याने हातातल्या काठीने झाडावरुन मला दोनतीन काढुन दिली. पारणे फ़ेडल्यागत मी ती कचाकच खाऊ लागलो. तो माणुस माझ्याकडे अचंबित होवुन बघु लागला. मी एक जंगली माणुस आहे, याची त्याला खात्री पटली होती. त्याच्या मते मी अभक्ष्यभक्षण करत होतो ना.

ती फळे म्हणजे खोटा बदाम.


khoTyaa badaamaachaa mohor

हो खोटाच बदाम म्हणायचे त्याला. खरे बदाम जेव्हा बाजारातही बघायला मिळत नसत त्या शाळकरी वयातला तो सोबती होता.

या खोट्या बदामाची झाडे आता मुंबईत जागोजाग दिसतात. आमच्या शाळकरी वयात मात्र त्याची तितकी झाडे नव्हती. आम्ही ते बदाम चक्क विकत घेऊन खात असु. पाच पैश्याला तीन मिळायचे ते.

लालसर रंग. पाच सेमी लांब आणि तीन सेमी रुंद असा आकार. दोन्हीकडुन निमुळता आणि मधे फ़ुगीर. चव म्हणाल तर फक्त गोडसर, धड गोडही नव्हे, किंचीत तुरटदेखील. एवढ्या मोठ्या फळातला खायचा भाग जेमतेम अर्धा सेमी जाडीचा. तो खाऊन झाला ( त्याने तोंड लाल व्हायचे ) कि मधला चिवट भाग दगडाचे घाव घालुन फोडायचा. बरेच घाव घालावे लागत. आत अगदी बारिकसा बदाम असे. तो नखाने अलगद काढुन, खाण्यात काय आनंद असायचा, म्हणुन सांगु.

याची झाडे सावलीसाठी उत्तम. सरळ वाढणारे एक मुख्य खोड आणि त्याला आडव्या फ़ुटलेल्या फ़ांद्या. या फ़ांद्यांची एकावर एक अशी चक्रे झालेली असतात.

पानेही भरपुर मोठी आणि दाट. पाने गळताना, लाल होतात. ( याची पिवळी फळे येणारे एक झाड आमच्या दारात आहे. त्याची पाने पिवळी होवुन गळतात. ) मग लगेच नवी पालवी येते आणि पावसाच्या आधी वरच्या फोटोतल्यासारखा मोहोर येतो. फ़ांद्यांच्या टोकाशी गुच्छात फळे लागतात. त्यातली एकदोन रोज पिकतात, आणि झाडाखाली सडा पडतो.

आजकाल मात्र मुलाना हि फळे खायची माहितीच नाही. तशी चवही आजकालच्या गोडखाऊ मुलाना आवडेल अशीही नाही.

आमच्या ऑफ़िसच्या दारात या दिवसात सकाळी याचा सडा पडलेला असतो. उचलुन घ्यायचा मोह आवरावा लागतो.
एकदा मुद्दाम संध्याकाळी, दोनचार फळे पाडली. ऑफ़िसमधल्या मुलीना आग्रह केला, त्यानी खाल्ली. ओके चव आहे म्हणाल्या.
पण ते बहुदा, मला नाराज न करण्यासाठी.





Tuesday, August 07, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चमकदार हिरव्या पानाचे आणि शुभ्र फ़ुलानी डवरलेलं अनंताचं झाड अनेक घरासमोर लावलेले असते. साधारणपणे पान्ढरी सुगंधी फुले ऐन उन्हाळ्यात फुलतात. अनंत फुलायची सुरवात उन्हाळ्यातच होते, पण पावसातही तो फुलत राहतो.

अनंताची फुले सुवासिक असली तरी खुपदा विचित्र आकाराची असतात. यात पाकळ्यांची दोन ते तीन घेर असतात. कळी भाल्यासारखी टोकदार असते, फुल फुलायच्या आदल्या रात्री ती अलगद उकलायला सुरवात होते, पण उत्तररात्री मात्र पुर्णपणे उकलते. उकलुन तिचे पाकळ्यांचे थर अगदी देठाकडे धावतात, त्यामुळे फुल खुपच बेढब दिसते. एखादी जात मात्र अशी नेटकी फुलते.



anant

Tabernae montana coronaria असे याचे शास्त्रीय नाव. याचे झाड फारतर दोन मीटर वाढते. क्वचितच त्यापेक्षा जास्त उंची ते गाठते.

जास्तकरुन शुभ्र फुलांची जात दिसत असली तरी क्वचित याची पिवळी फुलेही दिसतात.

कधीकधी काही अनाकलनीय कारणांमूळे याचे एखादे झाड अजिबात फुलत नाही. अश्या झाडावर ग्रहणात कुर्‍हाड मारली तर ते फुलते, असा समज आहे.

या झाडाला चीक असतो, तो चीक आणि खास करुन याचे मूळ औषधी आहे. ( आयुर्वेदीक औषध अनंतमूळ ही मात्र वेगळी वेल आहे, तिचे नाव Taylofora indica, asthamatika असे आहे. )

या फुलणार्‍या अनंताचा एक खास उपयोग आहे. ( या उपयोगावरुनच त्याला तेलगु भाषेत नंदिवर्धनमु, असे नाव आहे ) वेळेअभावी प्रसुति झाल्यास, स्त्रियाना खुप त्रास होतो. त्यावेळी जो ताप येतो, त्यावा नंदज्वर असे म्हणतात. त्यामूळे डोके जड होते, गरगरते, डोळ्यांपूढे अंधारी येते, दातखीळ बसते, शिरा ताठरतात, अश्या वेळी या झाडाची उत्तरेकडची मुळी आणुन, उगाळुन तिचा लेप कपाळावर देतात. मूळी केसातदेखील खोवतात.

दक्षिण कोकणात, या मूळीचा असा उपयोग, वैद्य करत असतात. डोळ्यांच्या, दाताच्या विकारावरदेखील याचा उपयोग होतो.
पण या सर्व उपयोगापेक्षा, अनन्ताचा सुगंधच जास्त महत्वाचा.




Wednesday, August 08, 2007 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SaptaparNee



Alstonia scholaris असे शास्त्रीय नाव असलेले हे झाड, मराठीत सप्तपर्णी नावाने ओळखले जाते.
सप्तपर्णी वा सातवीण म्हणजे सात पानांचे झाड, ( वरच्या फोटोत तर दहा दिसताहेत. कबुल आहे मला, कारण सप्तपर्णी हे नाव झाडाला कबुल नसावे बहुतेक. याला पाच ते दहा अशी कितीही पाने असु शकतात, पण सरासरी सातच असतात. )

अश्या गोलाकारात पसरलेल्या पानाच्या मध्यातुन आणखी कोंब फ़ुटतो, आणि त्याला परत सातच पाने असतात. झाडाची वाढ अशीच होत राहते.

फुलांचा रंग हिरवा नसतो, हा समज दूर केला, तर या झाडाकडॅ बघुन अनेक फुले फुलली आहेत असे वाटते, जून पाने हिरवीजर्द तर नविन येणारी पोपटी, त्यामुळे झाड आणखीनच वेधक दिसते.

पानांनीच फुलाचे रुप घ्यायचे कारण, बहुदा फुलांचे साधेपण असावे. याला मोहोर येतो तो हिरव्याच रंगाचा. फुले अगदीच लहान तरी गुच्छात असतात. जानेवारी फ़ेब्रुआरी महिन्यात याला मोहोर फुटतो, आणि आजुबाजुचा परिसर याच्या गंधाने भरुन जातो. याचा वृक्षही भरपुर उंच व डेरेदार असल्याने, खुप लांबवर हा गंध पसरलेला असतो. या गंधाला सुगंध म्हणता येणार नाही. तसा तो दुर्गंधही नसतो, पण काहि जणाना खास करुन दमेकर्‍याना, याचा खुप त्रास होतो. लहान मुलाना तर हमखास सर्दी होते. ( मुंबई तसेच कोकणात याची भरपुर लागवड झालीय. ती करताना अर्थातच या अवगुणाचा विचार झालेला नाही. )

याला लांबट शेंगा जोडीजोडीने लागतात.

याच्या नावाची एक गम्मतच आहे. यातले स्कॉलरिस आलेय ते कधीकाळी शाळेच्या पाट्यांची कड या झाडाच्या लाकडापासुन करत असत म्हणुन. साधारणपणे या झाडाजवळ प्राणी फ़िरकत नाहीत, ( त्यानाही या गंधाचा त्रास होत असावा ) म्हणुन ते डेव्हिल्स ट्री. कुठेकुठे मराठीतही त्याला सैतानाचे झाड म्हणतात.

या झाडाची साल पांढरट करडी असते. ती गुणाने तुरट, कडू, ऊष्ण, मंदगंधी असते. रक्तदोष, व्रण, कृमि आदीवर उपयोगी ठरते. या सालीचा काढा तापावरही देतात. याने ताप उतरतो, पण इतर औषधांप्रमाणे घाम वा थकवा येत नाही.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators