Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 03, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Archive through July 03, 2007 « Previous Next »


Sunday, June 03, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवग्याच्या जोडीने मी हादग्याच्या फुलांचा उल्लेख केला होता. काल तिही शोधुन काढली.

Hadaga


Monday, June 04, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा नायजेरियातला मित्र, तिथे होता आणि मी भारतात रजेवर आलो होतो. त्यावेळी त्याच्या लेकीचा, म्हणजेच गायत्रीचा जन्म झाला होता. त्याने आवर्जुन तिला भेटुन ये असे सांगितले होते आणि त्याच दरम्यान माझी डॉ. डहाणुकरांशीही भेट झाली होती. मी तिकडे गेल्यावर संदीपला सहज म्हणालो, कि गायत्री नावाचे एक झाडहि असते. तर त्याने अर्थातच विचारले, कसे असते, मी म्हणालो निळ्या फुलांचे. आणि मग लक्षात आले कि झाडाच्या बाबतीत कितीही वर्णनं केली तरी प्रत्यक्ष बघितल्याशिवाय, झाड कळत नाही.
त्यावेळी डॉ. डहाणुकरांच्या पुस्तकात चित्रे नव्हती. पण त्यानी केलेले वर्णन पक्कं डोक्यात होतं. गेली ११ वर्षे या झाडाचा शोध घेत होतो. आणि मग डॉक्टरानी दिलेल्या पत्त्यावर ते अचुक सापडलं.


gayatree

Guaiacum officinale अश्या शास्त्रीय नावcअहे हे झाड आलेय दक्षिण अमेरिकेतुन. तसे ते ८ ते १० मीटर्सपर्यंत उंच वाढु शकते, पण आपल्याकडे एवढे वाढत नाही. याचे पाने गोल आणि संयुक्त. पण आकाराने एक सेमी एवढीच. झाडाला एक छत्रीसारखा आकार आलेला असतो. आणि पानांच्या दाट पसार्‍यामुळे याची सावलीही शीतल असते.

पण याचे फुलांचे वैभव बघायचे असेल तर मात्र नेमका मुहुर्त गाठावा लागतो. मार्च ते मे पर्यंत कधीही हा बहर येतो. पण तो फक्त आठ दहा दिवसच टिकतो. आणि बहुदा त्यामुळेच हे झाड माझ्या नजरेतुन सुटले होते.

आपल्याकडे निळी फुले येणारी झाडे अगदीच मोजकी. पण या झाडाची निळाई मात्र खासच. कळ्या हिरव्या आणि निळ्या. नुकतीच उमललेली फुले. पाच नाजुक पाकळ्यांची आणि निळीशार. त्यात पिवळे पुंकेसर. दुसर्‍या दिवशी फुले होणार आकाशी रंगाची आणि मग होणार पांढरीशुभ्र. हे तिन्ही रंग एकाच वेळी झाडावर असतात. फुलांच्या शुभ्र पाकळ्यांचा सडा झाडाखाली पडलेला असतो. त्या पाकळ्या दिसतात थेट पत्त्यांमधल्या चौकट सारख्या, पण रंगाने शुभ्र.

त्यानंतर झाड हिरव्या केशरी फळांनी भरुन जाते. तिही काहि कमी देखणी नसतात. पण याचे वैभव आहे ते याच्या फुलात.

यालाच गम ग्वायकम किंवा लिग्नम व्हायटी असेही नाव आहे. यापासुन अर्थातच औषधी गोंद मिळतो. त्याचा उपयोग सिफिलिस सारख्या रोगात होतो. म्हणुन त्याचे नाव ऑफ़िसिनेल. आणि ग्वायकमचा अर्थ आहे वुड ऑफ़ लाईफ़. कारण याचे लाकुड टिकाऊ. टणक. पाण्यापेक्षा जड असणारे. याचे लाकुड कुजत नाही. अगदी प्राचीन काळापासुन रस्त्यावरचे खांब म्हणुन दक्षिण अमेरिकेत याच्या लाकडाचा उपयोग होत आलाय. पुरातन संस्कृतीमधे मुर्ती कोरण्यासाठी हे लाकुड वापरत असत. आणि अश्या मुर्ती ८०० वर्षानंतरही शाबुत आहेत.
पुर्वी बॉलबेअरिंग्स करण्यासाठी हे लाकुड वापरत असत. यातल्या गोंदामुळे त्याला आपसुक वंगण मिळत असे. जुन्या काळात कोर्टात, न्यायाधिश जो हातोडा ठोकुन ऑर्डर ऑर्डर असे म्हणत, तो हातोडाही याच लाकडापासुन बनवत असत.
या लाकडाचे बरेच औषधी उपयोग आहेत. सांधेदुखी, टॉन्सिल्स सारख्या अनेक विकारात ते वापरतात. या लाकडाची पावडर करड्या रंगाची असते पण उन्हात ठेवल्यावर ती हिरवी होते. हिच याच्या अस्सलपणाची कसोटी आहे.

आणि आता सांगायचे म्हणजे, याचे गायत्री हे नाव, डॉक्टरांच्या माळीबुवानी ठेवलेले. नथिंग ऑफ़िशियल अबाऊट इट.




Tuesday, June 05, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉलेजमधे असताना मला परिक्षेला सेंटर म्हणुन नेहमी, दादरच्या हिंदु कॉलनीतले राजा शिवाजी विद्यालयच येत असे. आणि त्यावेळी खिडकितुन हि देखणी फुले दिसत असत. त्यापुर्वी जाता येता या झाडाखाली पडलेली हि विटकरी रंगाची फुले बघत असु. पण झाडावर असताना केवळ हिरव्या आणि विटकरी रंगाची हि कलाकुसर, झाडाखालुन दिसणे शक्यच नव्हते. कारण हे झाड अक्षरशः ताडमाड उंच वाढते. याला फांद्याही फार उंचावर फुटतात.

junglee badam

Sterculia foetida किंवा मराठीत जंगली बदाम असे याचे नाव आहे. मुंबईत तो बर्‍या प्रमाणात आहे.
डिसेंबरमधे याची सावरीच्या पानासारखीच दिसणारी पाने गळुन जातात, आणि झाडाला वरिलप्रमाणे मोहोर येतो.

खरे तर हि फुले नव्हेतच. पाकळ्यासारखी दिसताहेत ती बाह्यदलं. आधी हिरवी असणारी हि बाह्यदलं हळुहळु लालविटकरी रंगाची होत जातात. आणि मग गळुन जातात. या फुलात पाकळ्या वैगरे नसतातच. याच्या बाह्यदलांची संख्याही अनियमित. चार, पाच सहा आठ कितीही असु शकतात.

मग याना जठरासारख्या आकाराची हिरवी फळे लागतात. त्यापुर्वी पालवी आलेली असतेच. हि फळेही आधी हिरवी आणि पिकल्यावर लालभडक होतात. मग ती खालच्या बाजुने उकलतात. आत काळ्या टपोर्‍या बिया दिसतात.

या बियावरची काळी साल अलगद सोलुन काढली कि आत तपकिरी रंगाची आणखी एक साल असते. पण आतली साल अखंड ठेवुन वरची साल सोलणे अवघड असते. आणि तो आमचा लहानपणीचा उद्योग होता. या बिया भाजुन खाता येतात. पण कच्च्या खाल्ल्या तर चक्कर येते. आफ़्रिकेत याच्या सालीचे औषधी उपयोगही करतात.

अगदी उंच वाढणारा, डेरेदार असा हा वृक्ष. देखणी फुले फळे असणार्‍या या वृक्षाला एक शाप आहे, आणि तो आहे दुर्गंधीचा. स्टर्कस म्हणजे शेण ते आपण बघितलेच. आणि फ़िटिडा म्हणजे दुर्गंधी. या फुलांचा जेव्हा झाडाखाली सडा पडतो, तेव्हा अगदी असह्य दुर्गंधी सुटते. आणि दिवसभर हि फुले गळतच असतात.

हा वृक्ष आपल्याकडे पुर्व आफ़्रिकेतुन आलाय. ऑस्ट्रेलियात पण तो आढळतो.




Wednesday, June 06, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मार्च एप्रिलमधे मुंबईतून बाहेर पडताना, नेरूळचा डोंगर आला कि माझे डोळे या गुलाबी बहराचा शोध घेऊ लागतात. आणि हा सगळा डोंगर गुलाबी गिरिपुष्पानी भरुन गेलेला असतो. हि झाडे मुद्दाम लावली आहेत, हे खरे, पण ज्याने लावली, त्याच्या निवडीची दाद द्यायलाच हवी.

GiripuShpa bahar

Gliricidia maculata या मूळ नावाचे गिरिपुष्प हे भाषांतर मात्र झक्क जमलेय. आपल्याकडच्या डोंगरावर हे झाड उत्तम वाढु शकते.

एरवी हे झाड अगदीच साधे. कढीपत्त्याच्या पानासारखीच पण आकाराने मोठी आणि रंगाने फ़िक्कट अशी पाने असतात याची. फांद्या सरळ आणि लांबलचक असतात.
त्रास दिला नाही तर हे झाड चारपाच मीटर्स पर्यंत वाढु शकते. ( वरचा फोटो अश्याच एका झाडाच्या बहराचा आहे. ) पण एवढी उंची त्याची त्यालाच झेपत नाही. फांद्या फारश्या रुंद नसल्याने वार्‍याने, पावसाने काटकन मोडतात. पण तेही चांगले कारण याच्या फांद्या पावसात जमिनीत रोवल्या तर सहज जगतात.
हिवाळा संपताना याची पाने गळुन जातात. आणि सगळे झाड असे गुलाबी मोहोराने भरुन जाते.


Giripushpa

हा गुलाबी रंग अगदी मोहकसा. त्याला किंचीत जांभळी झाक असते, त्यामुळे तो फारच मोहक दिसतो. एक मोठी पाकळी पुर्ण उमलून मागे वळलेली असते. तीचा मध्यभाग पिवळा असतो. इतर दोन पाकळ्याही अश्याच वळलेल्या पण जरा छोट्या. आणि एक नळीसारखी मुख्य पाकळी. अश्या रचनेमूळे हे छोटेसे फुल भरगच्च दिसते. याला म्हणावा असा सुगंध नसतो.

शेताच्या बागेच्या कुंपणासाठी हे आदर्श झाड आहे. छाटणी केली तर आकारही आटोक्यात राहतो. शेताच्या कुंपणासाठी हे झाड वापरण्याचे आणखी एक कारण म्हणजे, याच्या पानात भरपुर नत्र असते आणि त्यापासुन उत्तम खत तयार होते. कॉफ़ी कोकोच्या बागात, याची लागवड करतात. सावली आणि नत्र असे दोन्ही फायदे. हे झाड आपल्याकडे आलेय दक्षिण अमेरिकेतुन. आलेय तसे अलिकडेच पण याचा भरपुर प्रसार झालाय. गुरांच्या खास करुन बकरीच्या खाद्यासाठी या पानाचा छान उपयोग होतो. या पानातले प्रथिनाचे उच्च प्रमाण यासाठी आदर्श आहे.

ग्लिरिसिडिया चे भाषांतर आपण गिरिपुष्प म्हणुन केले असले तरी या शब्दाचा अर्थ आहे, उंदरांचा नाश करणारा. याच्या बियांपासुन व पानापासुन, उंदरासाठीचे विष तयार करत असत. ( म्हणजे शेतासाठी आणखी एक उपयोगच की ) आणि मॅक्युलाटा चा अर्थ आहे ठिपके असणारा. खोडावर आणि पानांच्या मागे ठिपके असतात म्हणून हे नाव.




Thursday, June 07, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भस्मविलेपीत रुप साजिरे, आणुनीया चिंतनी
अपर्णा तप करते काननी.

पार्वतीच्या उग्र तपश्चर्येचे वर्णन करताना, तिचे अपर्णा हे नाव लक्ष वेधुन घेते. हळुहळु अन्न पाण्याचा त्याग तिने केला. शेवटी केवळ बेलाचे पान चाटुन ती राहु लागली आणि पुढे तिने तेही सोडुन दिले. म्हणून ती अपर्णा.

उन्हातानातून घामाघुम झाल्यावर आपण गटागट फ़्रीजमधले पाणी पितो. पण आपल्याकडे पुर्वापार काहि पेयांची योजना यासाठी केली आहे. बेलफळाचे सरबत हे असेच एक पेय.


bilvadal

Aegle marmelos असे नाव असलेले हे झाड आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. झाड बघितलेले नसले तरी बिल्वदलं सगळ्यांच्याच परिचयाची असतात. मध्यम उंचीचे हे झाड सहसा दिसत असले तरी प्रचंड वाढलेली बेलाची झाडे मी बघितली आहेत.

याच्या काटेरी फांद्याना त्रिदलीय पाने येतात. पाने हिरवीगार असतात. पण क्वचित कोवळी पालवी आणि जीर्ण पाने लाल रंगाची होतात. कोवळी असताना पाने पोपटी रंगाची तर जून झाल्यावर गर्द हिरवी होतात.

मार्चमधे याची बहुतेक पाने गळुन जातात व नवी पालवी येते. त्याचवेळी याला बहर येतो. हिरवट पिवळ्या रंगाची पाच पाकळ्यांची फुले येतात. मग याला फळे धरतात.


belaphaL

Golden Apple असे याचे फळांवरुन पडलेले नाव आहे. याचे फळ हिरवे असते व आकाराने टेनिसच्या बॉलएवढे. आपल्याकडे या फळांचा आकार किंचीत लंबगोल असतो. पण उत्तरेकडे याला छोट्या कलिंगडाएवढी फळे लागतात. घाटकोपर पश्चिमेला असे मोठी फळे लागणारे झाड आहे.

हे फळ पिकायला जवळजवळ वर्षभर वेळ घेते. पिकल्यावर हे पिवळट केशरी रंगाचे होते. याचा कडवट गोडसर वास झाडाच्या परिसरात येत असतो. जंगलात ससे, हरणं, माकडे, अस्वले, हि फळे फोडुन खातात. जंगलात या झाडाचा प्रसार याच मंडळींमुळे होतो. शहरात मात्र शिवालयाच्या परिसरात आवर्जुन बेलाची लागवड करतात. शंकराला बेलाची पाने वहायची प्रथा आहे, आणि ती अमरनाथाच्या गुंफ़ेतही पाळली जाते.

या फळाचा गर पिवळट केशरी असतो. चवीला पिठुळ गोडसर आणि किंचीत कडवट लागतो. याचे सरबत चवदार नसले तरी प्यायल्यावर तरतरी येते. आपल्याकडे हे सरबत फारसे माहित नाही, पण उत्तरेकडे ते खुप लोकप्रिय आहे. याचा मोरंबा देखील करतात.

बेलाचे औषधी उपयोग अनेक. आयुर्वेदातल्या दशमूळात, याच्या मूळाचा समावेश होतो. बेलफळाचे सरबत वा मोरंबा, आव आणि अतिसार यावर उपयोगी आहे. डोळे आल्यास वा त्यांची जळजळ झाल्यास, याच्या पानांचा लेप लावतात. याच्या काढ्याने मज्जासंस्थेला बळ मिळते. ब्लडप्रेशर आणि मधुमेहावरही याच्या पानांचा काढा देतात. चित्रा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींसाठी तो आराध्य वृक्ष आहे. इतक्या गुणवान वृक्षाला, श्रीवृक्ष, असेही एक नाव आहे.




Friday, June 08, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या चवीसा चूस किंवा चसका लागतो, म्हणतात ना, तसे खुपदा कवठाच्या बाबतीत होते. आधी खुप जणाना या नावाचे फळ असते हेच माहित नसते. बरं फ़ळाचे बाह्यरुप इतके खडबडीत, कि याला काय चव लागणार, असाच कुणीही विचार करणार. पण पुर्ण पिकलेल्या कवठाची गुळ तिखट घालुन, नुसती कालवलेली चटणी आणि वरुन हिंग जिर्‍याची फोडणी ! अहा !! ज्यानी खाल्लीय, त्यानाच माहित.

kavaTh

Feronia elephantum असे याचे शास्त्रीय नाव. संस्कृतमधे कपित्थ. हा वृक्ष खास कोरड्या हवेतला. कोकणात हा माहित नाही.

झाडाची पाने गोलसर. लिंबुवर्गातील झाड असल्याने, पाने चुरल्यास तो खास गंध येतोच. झाडाचे खोड करडे पांढरे. आणि पसारा भरपुर. वाव मिळेल तसे हे झाड उभे आडवे वाढते.

या झाडाची फुले सुंदर असतात. पण ती फारच थोडा काळ झाडावर असतात. लाल चुटुक देठ, पाच पांढरी बाह्यदलं आणि आत दहा बारा गुलाबी मोतिया रंगाच्या पाकळ्या. याच्या नावातलं फ़ेरोनिया, हे खास या नाजुक फ़ुलांमूळे. आणि हत्तीच्या आवडीचे फळ म्हणुन एलीफंटम.

या झाडाला इंग्लिशमधे Wood Apple असेही नाव आहे. अगदी लहान असल्यापासुन या फळाचा रंग तसाच असतो. थेट लाकडाचा भास होतो. हे फळ झाडावर बरेच महिने राहते. हळुहळु मोठे होत जाते. आठ ते दहा सेमी व्यासाचे हे फळ, अंधारात किंचीत चमकते. झाडावर भरपुर फळे असतात. आणि असे मोठमोठ्या फळानी भरलेले झाड चांदण्या रात्री खुपच देखणे दिसते.

क जीवनसत्वाने परिपुर्ण असे हे फळ, पिकले कि छान वास सुटतो. बाजारात खुपदा कोवळी फळे आणली जातात. ती धड पिकत नाहीत. खुपदा त्यात बुरशी होते. म्हणुन घेताना नेहमी छान वास येणारे व पुर्ण पिकलेले फळ घ्यावे. साधारण महाशिवरात्रीला हि फळे बाजारात येतात. फळ आपटुन फोडावे लागते. ( कच्चे फळ खाल्ले तर हमखास घसा धरतो. ) आत चिंचेसारखा गर असतो, व बारिक पांढर्‍या बिया असतात. या बिया खाता येतात.

काहि वर्षांपुर्वी कालनिर्णय कॅलेंडरने कवठाच्या पाककृतींची स्पर्धा ठेवली होती. त्यात कवठाचे अनेक पदार्थ सुचवण्यात आले होते. मला स्वतःला मात्र वर सांगितलेली चटणीच जास्त आवडते.


kavaThaachee chaTaNee

पुण्यातही याची झाडे आहेत. नेवास्याला पण आहेत. गुजराथमधेही याची झाडे आहेत, कोल्हापुरजवळच्या नरसोबाच्या वाडीत याची खुप झाडे आहेत. तिथे या कवठाची बर्फ़ी मिळते. भडक केशरी रंगाची गोडमिट्ट बर्फी मला अजिबात आवडली नाही.
पोटाच्या अनेक विकारावर कवठ औषध आहे. ( इतके चवदार औषध, कदाचित दुसरे नसेल. ) तसे हे फळ बाजारात वर्षभर मिळते असे नाही. मी मस्कतला असताना, या फळाची खुप आठवण काढत होतो. आणि त्याचवेळी फिलिपिनो सेक्शनमधे मला कवठाच्या जामची बाटली दिसली. खुप गोड होता तो प्रकार, पण तरिही उर्मी भागवता आली.




Monday, June 11, 2007 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाडांच्या बाबतीत आपण पानाना नेहमी गृहितच धरतो. पानं काय असणारच. हिरवीच असणार वैगरे. पण या झाडाची पाने मात्र याला अपवाद आहेत. किंबहुना, पाने हेच या झाडाचे वैभव आहे

suvarnapatr

Chrysophyllum cainito असे नाव असलेल्या या झाडाला सुवर्णपत्र अहे मराठीत नावही आहे. क्रायसो म्हणजे सोनेरी आणि फ़ॉयलम म्हणजे पाने. हे पान वरुन हिरवेगार, चमकदार तर खालच्या बाजुने गर्द जांभळट लालसर रंगाचे. शिवाय त्याव्र बारिक सोनेरी लव असते. ती उन्हात चमकते देखील. पिकुन खाली पडलेल्या पानाचा हिरवा रंग निघुन गेलेला असतो, पण लाल आणि सोनेरी दोन्ही रंग शाबुत असतात.

मुंबईत रुईया कॉलेजच्या मागे एक वृक्ष अजुनही टिकुन आहे. ( तिथेच शिरीष, वाकेरी, मुचकुंद, रामधनचंपा सगळे होते. सगळे आता काळाच्या पडद्या आड गेलेत. ) आणि खास म्हणजे हुतात्मा चौकात आणि काळा घोडा परिसरात, म्हणजेच फ़्लोरा फ़ाऊंटन आणि जहांगिर आर्ट गॅलरीच्या परिसरात बरिच सुवर्णपत्रांची झाडे आहेत. तिथे गेला असाल तर त्या सगळ्या गर्दीत वर बघायला वेळ झाला नसेल, पुढच्यावेळी मात्र जरुर बघा.

हे झाड तसे खुप उंच वाढते, पण याच्या सुंदर रंगाच्या पानांमूळे ते ऑफ़िसेस मधे शोभेसाठी म्हणुनही लावतात. इतकेच नव्हे तर याचा कृत्रिम अवतारही मिळतो.

या झाडाला फळे येतात आणि ती खाता येतात हे माहित होते. पण मुंबईच्या बाजारात कधी हि फळे बघितली नव्हती. शिवाय झाडावर शोधुनही सापडली नव्हती. याची चव मला बघता आली ती माझ्या नायजेरियन हाऊसमेडमूळे. हा बाबा मासमटण काही खात नाही, वेड्यासारख्या भाज्या आणि फळेच खातो, म्हणुन तिच्या जिवाला घोर. त्यामूळे तिला माहित असलेली सगळी फळे ती माझ्यासाठी रानातुन घेऊन यायची.
एक दिवशी तिने विचारले, Oga you no day eat star apple now ? याचा अर्थ सायबा तु कधी Star apple खाल्ले आहेस का. मी विचारले काय असते ते. Its fruit no now oga असे उत्तर मिळाले. मी म्हणालो, ये घेऊन.

( या Apple शब्दाचा घोळ आहे जरा. आपल्या चाफ़ा, या शब्दाप्रमाणे सबगोलंकार रितीने तो वापरतात. Star Apple, Wood apple, Pine apple, Screw pine apple, Custard apple, Rose apple, Crab apple सगळ्याला आपले Apple म्हणायचे. कुणी म्हणेल मराठीतही आपण, रामफळ, सिताफळ, लक्ष्मणफळ, जायफळ, मायफळ, बेलफळ असे शब्द वापरतोच कि. पण फरक असा आहे कि मराठीत फळ हे सर्वनाम आहे, इंग्लिशमधे apple हे विशेषनामदेखील आहे. असो. )

तर ती एकेदिवशी गडद किरिमिजी रंगाची, चिकुच्या आकाराची फळॅ घेऊन आली. तिने पानासकट ती तोडली होती म्हणुन मला कळले कि ती सुवर्णपत्रांचीच फळे आहेत. मी कापायला गेलो, तर तिने मला थांबवले. तिने ते कसे खायचे ते पण शिकवले. पहिल्यांदा ते फळ दोन तळव्यात धरुन लाडु वळतो तसे गोलगोल वळायचे. असे करताना जरा दाब द्यायचा. मग त्याची साल मऊ पडते. ती अलगद बाजुला करायची. आत एक अर्धपारदर्शक, गोळा असतो. त्याला उभ्या धारा असतात. वरुन बघितले तर ते * सारखे दिसते. ( म्हणुन Star apple म्हणायचे हो ) . चवीला थेट ताडगोळ्यासारखे लागते.

पण भारतात मात्र काहि ते फळ अजुन दिसले नाही कुठे.



Friday, June 15, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईत आणि इतरही रस्त्याच्या कडेने दिसणारे झाड म्हणजे हा करंज. हिरवट पिवळसर खोडावर भरपुर पर्णसंभाराची डेरेदार छत्री घेऊन हा उभा असतो.

karanj

Pongamia pinnata असे याचे शास्त्रीय नाव. हे नाव थोडेसे तामिळ वाटेल. आणि ते आहेच कारण हा शब्द आलाय या झाडाच्या पुग्गुम किंवा पुंगुमार या तामिळ नावावरुन.
याला संस्कृतमधे स्निग्धपत्र असे नाव आहे. मार्च एप्रिलमधे जेव्हा सगळीकडे उन्हामूळे रखरखाट असतो. वातावरणात, झाडांवर धुळीचे पुटे असतात, त्यावेळी करंजाची पोपटी रंगाची तुकतुकीत पालवी, लक्ष वेधुन घेते. आजुबाजुच्या सगळ्या झाडांमधे याचा हा देखणा पर्णसंभार अगदी उठुन दिसतो. फ़ुटभर लांबीच्या संयुक्त पानात, सात ते नऊ टोकदार पाने असतात.

या नव्या पालवीबरोबरच याला बहरही येतो. नाजुक गुलबट जांभळ्या रंगाची हि फुले घोसाघोसानी झाडावर लटकत असतात. चार मुख्य पाकळ्या आणि एक पाचवी छोटी पाकळी. याची एक न फ़ुलणारी जातही मी पाहिलीय. बकुळीप्रमाणेच हि फुले ताजी असतानाच गळुन पडतात, आणि झाडाखाली याचा सडा असतो. लांबुन तो कुरमुर्‍यांसारखाच दिसतो. या फुलांचे थरावर थर पडुन जाडसर गालिचा तयार होतो.

याच्या खोडाची एक शालेय जीवनातली मजा. आमच्या शाळेच्या मैदानाच्या कडेने हि झाडे होती. त्यावेळच्या वाईट खोड्यांप्रमाणे आम्ही या झाडाच्या खोडावर नावे कोरत असु. या झाडाचे वेगळेपण म्हणजे, झाड या जखमा स्वतः भरुन टाकत असे. त्यामुळे एनग्रेव्ह केलेली नावे चक्क एमबॉस होवुन जात. ( निव्वळ प्रयोग म्हणुनही कुणी असे करु नका रे. )

फ़ुलानंतर या झाडाला आधी हिरव्या आणि मग पिवळसर तपकिरी रंगाच्या शेंगा लागतात. दोन इंच लांबीच्या या शेंगाचा आकार करंजीसारखाच असतो. यात एक ते दोन बिया असतात. आणि त्यापासुन तेल निघते. याची झाडे रानावनातही आढळतात आणि या बिया गोळा करुन विकणे, हा उद्योग अनेक गिरिजनांच्या हातात चार पैसे टिकवतो.
या बियांपासुन करंजेल नावाचे तेल काढतात. पुर्वी ते दिव्यात जाळायलाही वापरत असत. या तेलाला एक प्रकारचा उग्र वास येतो. हे तेल जंतुनाशक आहे. त्वचारोगांवर, दुषित जखमांवर हे वापरतात. हे तेल अंगाला लावले तर डास ढेकुण चावत नाहीत. या बियांची पेंडदेखील जंतुनाशक आहे. टेनिस कोर्टावर, बागेतल्या हिरवळीत मुंग्या, वाळवी येऊ नये म्हणुन हि पेंड पसरतात.




Sunday, June 17, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोस्तानो आज थोडी गंम्मत. ओळखता हे फुल कसले आहे ते ?

oLakhaa paahu


Monday, June 18, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोरखचिंचेचे झाड तसे सहज बघण्यातले नाही. पण बघितल्यावर त्याचे अदभूत रुप, नजर खिळवुन ठेवते. मुंबईत तर माझ्या बघण्यात चारपाचच झाडे आहेत याची.

gorakhachincheche jhaaD

Adansonia digitata असे याचे नाव. यातला पहिला शब्द एका फ़्रेंच शास्त्रज्ञाच्या नावावरुन आणि दुसरा शब्द आहे तो हाताच्या पंज्यासारख्या पानांमूळे. तसे हे झाड आपल्याकडे आफ़्रिकेतून आलेय. पण फार प्राचीनकाळी आले असावे. या वृक्षाखाली स्वामी गोरखनाथानी विद्यादान केले असे मानतात. म्हणुन हे नाव.

या झाडाचे रुप बघता आहातच. तुकतुकीत कांतीचे खोड आकाराने प्रचंड असते. बुंध्यावरुन हात फ़िरवायचा मोह आवरत नाही. याच्या खोडात, पाण्याचा प्रचंड साठा असतो. हि सवय आफ़्रिकेतल्या वाळवंटातली. मुंबईत कुणीतरी फार वर्षांपुर्वी हि झाडे लावली आहेत. याचा बुंधा निमुळता होत जातो, आणि मग याला आडव्या फांद्या फ़ुटतात. पण नवल म्हणजे याच झाडाचे रोपटे मात्र साधेसुधे असते. बुंध्याला हा आकार नसतो. आणि पानेही वेगळी असतात. पण याच्या बिया सहज रुजतात.
याचे आफ़्रिकेतले नाव बाओबाब. तिथे तो परमपुज्य आहे. पण त्याच्यासंबंधी आख्यायिका पण भरपुर. जादुटोण्यातही याचा वापर. एका आख्यायिकेप्रमाणे, देवाने कोल्ह्याला एक गाजर दिले, ते त्याने जमिनीत उलटे खोचले, त्याचेच पुढे हे झाड झाले. मोहन आपटे यांच्या पुस्तकात, पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण जरा जरी जास्त असते तर काय झाले असते, याचे कल्पनाचित्र रंगवले आहे. त्या संदर्भात त्यानी लिहिले आहे कि, तसे असते तर सजीवाना आजचा बांधा व उंची लाभली नसती. जमिनीच्या दिशेने सगळ्या सजीवांची शरीरे रुंद असती. या झाडाकडे बघुन असेच काहिसे वाटते.

याच्या सालीपासुन वाख मिळतो. आणि त्याचा दोर वळता येतो. याच्या बुंध्यात भरपुर पाणी असते, आणि ते बुंध्याला भोक पाडुन काढुन घेता येते. याचा बुंधा पोखरुन, आफ़्रिकेतल्या मधमाश्या पोळं बांधतात.

तसे फुले आणि पाने नसलेले याचे रुप काहि कमी देखणे नसते. पण पाने आणि फुले दोन्ही याची शोभा त्रिगुणीत करतात. हाताच्या पंज्यासारखी याची पाने असतात. रंगाने हिरवीगार.


Gorakhachincheche phul

पांढरीशुभ्र फुले उत्तररात्री उमलतात. फ़ुल सहज आठ दहा सेमी व्यासाचे. फुलाचे वर्णन काय करावे. पाच भागातली, बाहेरच्या बाजुला वळलेली हिरवी बाह्यदले. आतल्या बाजुला वळलेल्या शुभ्र पाच पाकळ्या. मधे पॉमपॉमसारखे शुभ्र पुंकेसर. त्यातुनच निघालेला एक स्त्रीकेसर. जसा दिवस चढतो, तशी यावर तपकिरी नक्षी उमटते आणि दुपारनंतर हे फुल गळुनही पडते. फुलाला मंद सुगंधही असतो.

या फ़ुलांच्या देठावरच, छोट्या दुधीभोपळ्याच्या आकाराची फळे धरतात. त्याच गोरखचिंचा. फळावर तपकिरी सोनेरी लव असते. फळ पुर्ण वाढले कि सुकवुन ठेवता येते. देशी औषधे विकणार्‍या वैदुंकडे हे फळ असतेच. आतला गर पिठुळ आंबट असतो. रंगाने तपकिरी असतो आणि त्यात मोठ्या बिया असतात.
व्हिटॅमीन सी ने युक्त हा गर स्कर्व्ही रोगात वापरतात. याचे सरबतही करता येते. उष्णतेचे विकार, दाह. पित्त यावर वापरतात. याने शोष कमी होतो. म्हणजे वाळवंटात होवु शकणार्‍या सगळ्या व्याधींवरचा उपायच कि.




Monday, June 18, 2007 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज मात्र मलाच कोडे पडलेय. हे फ़ुल कधी बघितलेही नव्हते. उंचावर असल्याने क्लोजप मिळाला नाही. नाहि म्हणायला सिंगापुरमधल्या, मार्गारेट थॅचर, नाव दिलेल्या एका ऑर्किडच्या फ़ुलाभोवती पिळदार पाकळ्या होत्या. पण ते वेगळेच होते.

unknown


Thursday, June 21, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहि वर्षांपुर्वी मी, क्षिप्रा, आरती, रुपाली असे काहि मायबोलिकर गाढेश्वरच्या धरणावर गेलो होतो. त्यावेळी आम्हाला तिथे हि फुले दिसली. ऐन पावसात अश्या तेजस्वी रंगाची फुले अगदी तुरळकच. आणि गर्द हिरव्या रानात तर हि फुले दुरुनही लक्ष वेधुन घेतात. त्यावेळी आम्ही हे फुल तोडलेही होते. क्षिप्रा आणि आरतीला ते घरी रुजावे असे वाटत होते. मी जरा शंका व्यक्त केली, कारण एकतर आम्ही त्याचे फुलच तोडले होते, त्याचा जमिनीखालचा कंद उकरला नव्हता. शिवाय कुणी घरी हे फुले रुजवलेले मी बघितले नव्हते. यामूळे त्या दोघी जरा खट्टु झाल्या.

पुढच्या पावसाळ्यात मला अचानक क्षिप्राचा फोन आला. तिच्या घरच्या कुंडीत या फुलाचा वेल आपोआप वाढु लागला होता. यथावकाश त्याला फुलेही धरली.


kaLalavee

Gloriosa superba किंवा ग्लोरी लिली, हि या फुलाची इंग्लिश नावे. पण हि नावे अर्थातच वरलीया रंगाला भुलुन दिलेली आहेत. याचे मराठी नाव कळलावी जास्त यथार्थ आहे. कसे ते बघुच.

कोकणपट्टीत, अगदी नव्या मुंबईत, इतकेच कशाला बेलपुर स्टेशनच्या परिसरात देखील हि फुले आढळतात. दहा ते बारा सेमी लांबीचा व दोन ते तीन सेमी व्यासाचा याचा कंद वर्षभर जमिनीत निद्रावस्थेत असतो. पावसाच्या एक दोन सरी येऊन गेल्या, कि याला सुंदर हिरवे कोंब येतात. याची पाने बांबुच्या पानासारखी पण खुपच मुलायम. शिवाय पानाची टोके तणाव्याचेही काम करतात. कुठल्याही आधाराने हा वेल वरवर चढत जातो. याचे देठही नाजुक आणि कटकन मोडणारे, पण वाढ मात्र भराभर होत जाते. जुलै मधे याला तुरे येतात आणि त्याला हिरव्या कळ्या येतात. कळ्या बोटभर लांबीच्या झाल्या कि त्यावर पिवळी छटा चढते. एका सकाळी पाकळ्या विलग होतात. त्याची टोके लालमलाल होतात. हळुहळु हा रंग सगळ्या पाकळीवर पसरतो. पण मधल्या काळात, हिरवा, पिवळा आणि लाल असे ट्रफिक सिग्नलचे तिन्ही रंग एकाचवेळी या फ़ुलात दिसतात.

या फुलाचे फ़ुलणे जरा अतिच होते. पाकळ्या चक्क १८० अंश कोनात फ़िरुन देठाकडे वळतात. सहा पुंकेसर गोफ खेळायच्या पवित्र्यात फ़ेर धरुन असतात, आणि वक्राकार स्त्रीकेसर मात्र परत देठाकडे वळलेला. ( सगळे स्वपरागीभवन टाळण्यासाठी बरं ) या फुलाची इतर देशात दिसणारी जात, मात्र वेगळ्या आकाराची असते.

कलिहारी लांगलिकी दीप्ता च गर्भघातिनी |
अग्निजिव्हा वन्हिशिखा वन्हिवक्त्रा च लांगुली ||

अशी हिची संस्कृत नावे. गर्भघातिनी हे नाव याच्या कंदामुळे पडलेय. या कंदात एवढी शक्ती असते कि अडलेल्या बाळंतीणीच्या उश्याजवळ जरी हा कंद ठेवला तर ती लवकर मोकळी होते. ( पिवळ्या धोत्र्याच्या मुळीचा पण असाच वापर केलेला मी ऐकला आहे. आधुनिक प्रसुतिशास्त्रात एर्गोमेट्रिन सारखे एक औषध याच कारणासाठी वापरतात. ) सुलभ प्रसुतिसाठी पोटावर या कंदाचा लेप लावतात, पण या कंदामूळे गर्भपातही होवु शकतो. एकुण हा कंद विखारीच. हा कंद घरात ठेवला, तर घरात भांडणे होतात, असाही समज आहे.
हिलाच बचनाग, खड्यानाग अशीही नावे आहेत. हिला गौरीचे हात असेही एक नाव आहे. गौरीच्या सजावटीत हिला स्थान आहेच. ( पावसाळ्यात उगवणार्‍या आघाड्याला, जिवतीच्या पुजेत आणि तेरड्याला गौरी शंकरोबाच्या पुजेत स्थान देऊन आपण त्या झाडांचा गौरवच केला आहे. ) फुले लालभडक होवुन गळुन गेली कि एक तोंडल्याएवढे आणि धारा असलेले फळही या वेलाला लागते. त्यातल्या बियांमुळेच याचा प्रसार होतो.




Friday, June 22, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पन्नास साठ वर्षांपुर्वी, द्राक्षासव हे आयुर्वेदिक औषध फार लोकप्रिय होते. त्याची चव साधारण वाईनसारखीच असायची.
कमल ओगले आणि मंगला बर्वे, यांची पुस्तके बाजारात येण्यापुर्वी, लक्ष्मीबाई धुरंधर यांचे हजार पाककृति, हे पुस्तक फार लोकप्रिय होते. त्याकाळातील संपर्कांची साधने लक्षात घेता, लक्ष्मीबाईनी ज्या चिकाटीने या पाककृति गोळ्या केल्या आणि लिहुन काढल्या, त्याबद्दल मला आजही अचंबा वाटतो. या पुस्तकात व्हॅनिला इसेन्स करायची कृति आहे, उडदाची डाळ कशी करावी याचीही कृति त्यात आहे. याच पुस्तकात द्राक्षासवाची सविस्तर कृति आहे. त्या कृतितील धायटीची फुले हा घटक, माझ्या अकारण लक्षात राहिला.

पण पुस्तकात चित्र नसल्याने, हि फ़ुले कशी दिसतात याची काहि कल्पनाच नव्हती. आणि मग मात्र एक सुखद धक्का बसला. महाराष्ट्रातील बहुतेक प्रवासात, घाटातुन, रस्त्याच्या कडेने आपली अखंड सोबत करणारे झुडुप धायटीचेच असते.


dhayaTi

Woodfordia floribunda हे याचे शास्त्रीय नाव. याचा अर्थ बहुसंख्येने फुले धारण करणारा असा होतो. इंग्लिश नाव रेड बेल बुश असेही आहे.

वर लिहिल्याप्रमाणे बहुतेक घाटात रस्त्यांच्या कडेने हे झुडुप असतेच. हा घाट कोकणातला असो वा नासिक जव्हारचा असो. धायटी असणारच. नीट वाढला तर याचा वृक्ष दोनतीन मीटर्सपर्यंत वाढु शकतो. पण सहसा याची अर्धा एक मीटरपर्यंत वाढलेली झुडुपेच दिसतात.

झाड वा झुडुप असो, ते जरा बेंगरुळच दिसते. काटक्या अगदीच किरकोळ असतात. पाने साधी समोरासमोर पण निस्तेज हिरव्या रंगाची असतात.

फ़ेब्रुआरी ते मार्च हा धायटीच्या फुलण्याचा काळ. प्रत्येक पेरावर सभोवताली हि लालकेशरी फुले दिसतात.
फ़ुल म्हणजे एक इंचभराची पोकळ नळीच असते. तिचे टोक जरा रुंद झालेले असते, आणि कडा दातेरी झालेल्या असतात. त्यातुन लाल पुंकेसर बाहेर डोकावत असतात. झुडुपावर हि फ़ुले खुप असतात आणि झुडुपाखाली सुकलेल्या फ़ुलांचा थर असतो.
जास्त संख्येने असली तरी, फ़ुलांच्या लहान आकारामूळे हे झुडुप लक्षात आलेही नसते. यावर या धायटीची युक्ती म्हणजे, याची पानेही लाल रंगाची होतात. हिरवी लाल पाने असलेले हे झुडुप मग सहज लक्षात येते. सुकली तरी फुलांचा रंग टिकुन असतो.

बियर, वाईन करताना किण्वन प्रक्रियेसाठी, म्हणजे फ़रमेंटेशन होण्यासाठी हॉप्स वापरतात. ( हॉप्सचा वेल असतो. त्याला हिरवे पुष्पकोष लागलेले असतात. द्राक्षे तुडवताना, हा अख्खा वेलच त्यात घालतात. ) तसेच आयुर्वेदिक आसवं आणि आरिष्टं करताना, धायटीची फुले वापरतात. ( अर्थात गुळ आणि उसाचा रसही वापरतात. ) या फ़ुलांमुळे आसवांना सुंदर रंगही येतो. तसेच धायटी स्वतःच अनेक विकारांवरचे औषध आहे. आणि म्हणुनही तिला अनेक आयुर्वेदिक औषधात स्थान आहे.
या फुलात जवळजवळ २० टक्के टॅनिक आम्ल असते, याचा उपयोग पुर्वी सुती व रेशमी कपडे रंगवण्यासाठीही करत असत.




Monday, June 25, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी म्हणजे तीन वर्षांचा होईपर्यंत मला र हे अक्षर अजिबात उच्चारायला येत नसे. आई हरप्रकारे मला शिकवायचा प्रयत्न करत असे. तिला कुणीतरी सुचवले कि पिंपळाच्या पानाची पत्रावळ करुन, त्यावर मला गरमागरम तूपभात वाढाचा. आईने मलकापुरला तसे केले. आणि बोलापानाची गाठ म्हणा वा इतर काही, त्यानंतर थोड्याच दिवसात मला र चा उच्चार जमायला लागला.

PimpaL

Ficus religiosa असे याचे शास्त्रीय नाव. गौतम बुद्धाला ज्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले तो हाच बोधिवृक्ष.
पिंपळाच्या नावातच असल्याप्रमाणे याला धार्मिक महत्व आहेच.
आपल्याकडे आसेतुहिमाचल हा वृक्ष सापडतो. याचा प्रचंड वाढलेला वृक्ष आपल्या सगळ्यांच्याच चांगलाच परिचयाचा. देवळाजवळ शक्यतो मारुतीच्या देवळाजवळ हा असणारच. अनेक गावाच्या वेशीवर किंवा अगदी मध्यभागी पिंपळाचे भलेथोरले वृक्ष असतात. त्याला पार वैगरे असणारच. मालवणमधला एस्टीचा स्टॉपच पिंपळाकडे, म्हणुन ओळखला जातो. गोव्यातही असे बसस्टॉप आहेत.
अनेक झाडांच्या पानाचे वर्णन करताना, आपण पाने साधारण पिंपळाच्या पानासारखी असे सहज म्हनून जातो. पण तरिही पिंपळाच्या पानाचा आकार काहि खासच. आठ ते दहा सेमी लांबीचा देठ. त्यावर देठाशी रुंद आणि टोकाशी निमुळते होत गेलेले पान. टोकाशी एक सुंदर शेपटी. आणि कडाही मोहक नागमोडी. ( मारुति चितमपल्लीना या पानात एका सुदृढ माणसाची आकृति दिसते )
पिंपळाला ऐन वैशाखात नवी पालवी येते. पालवीची झळाळी काहि औरच. तांबुस वर्णाची हि पाने, नुसती चमचम करत असतात.
या पानांची आणखी एक खासियत म्हणजे, वारा असो वा नसो, हि पाने कायम सळसळ करत असतात. वैशाखातल्या उन्हात तर ते फारच जाणवते. आजुबाजुची झाडे निस्तेज होवुन बसलेली असताना, पिंपळ मात्र टाळ्या वाजवत असतो. ( मला आठवतय बहुतेक पु भा भावे यांचा एक लेख आपल्या शालेय पुस्तकात होता. त्यात असा सळसळणारा पिंपळ, वाळ्याचे सरबत, लालभडक कपड्यातली स्त्री, असे शब्दचित्र आहे. ) . अशी सळसळ रात्रीही चालु असते, आणि अकारण त्याचा संबंध भुताखेतांशी लावला जातो. मला वाटते, या पानांचा लांब देठ आणि रुंद आकार. त्याशिवाय नागमोडी कडा आणि टोक, यामुळे हे पान नैसर्गिकरित्या डोलत असावे.
पिंपळाची पाने जुन झाली कि चमक जाते, पण तरिही पान आपला आकार राखुन असते. पाने गळली कि कुजुन त्याची जाळी तयार होते. आमच्या मलकापुरच्या घरी, पुजेत पिंपळाच्या पानावर काढलेले शंकराचे चित्र आहे. आईने परवा सांगितले कि ते तिच्या मैत्रिणीने माझ्या मोठ्या बहिणीच्या पहिल्या वाढदिवसाला ते दिले होते. म्हणजे तब्बल ५३ वर्षे ते चित्र आमच्या घरात आहे. ज्या झाडाच्या पानाची पत्रावळ आईनी केली होती, ते झाडही अजुन दिमाखात उभे आहे.

पिंपळाला छोटीछोटी म्हणजे वाटाण्याएवढी फळे लागतात. आधी पोपटी रंगाची असणारी हि फळे, मग निळसर होतात. पक्षी आणि माकडांचा हा आवडता खाऊ. त्यामूळे झाडावर या मंडळींचा राबता असतोच. पिंपळाच्या दाट पसार्‍यामूळे, हि मंडळी यात सुखैनेव राहु शकतात. जुन्या झाडावर खुपदा ढोल्या दिसतात, आणि त्यात पोपट, धनेश इतकेच काय घुबड सुद्धा वस्तीला असतात.
या ( किंवा फायकस कुळातल्या सगळ्याच ) फळांची एक खासियत असते. याचे फळ म्हणजेच याचे फुल असते. आणि या फळात काहि खास प्रकारचे किटक असतातच. या किटकांशिवाय झाडाना बिया तयार करता येणार नाहीत आणि किटकाना या झाडांशिवाय जगता येणार नाही. फळ कच्चे असतानाच हे किटक त्यात अंडी घालतात. त्यांच्या सोयीसाठी फळाला एक छिद्र असते. त्यातच त्यांची वाढ होते. आणि फळातुन बाहेर पडताना, ते परागकण घेऊन जातात.
या फळांच्या बिया, त्यावरच्या कठिण आवरणामुळे सहज रुजत नाहीत. पण पक्ष्यांच्या विष्टेतुन पडलेल्या बिया मात्र सहज रुजतात. म्हणुन पिंपळाची रोपटी उंच इमारतीवर वा वळचणीला उगवलेली दिसतात.
पिंपळाची बहुतेक रोपे अशीच रुजतात. अनेकवेळा ती इतर झाडावरही रुजतात. तिथेचे ती सुखाने वाढु लागतात. यथावकाश मुळे जमिनीपर्यंत पोहोचतात. आणि मग पिंपळाचे झाड स्वतंत्ररित्या वाढु लागते. हि दोन झाडे सुखाने एकत्र जगतात. पिंपळामूळे दुसरे झाड मरत नाही. काहि काळाने मात्र ते अपुर्‍या प्रकाशामूळे वा वयोमानामूळे मरते. पण पिंपळाचे झाड मात्र अनेक वर्षे जगते. श्रीलंकेतील एक झाड २००० वर्षे वयाचे असल्याचे मानले जाते. सम्राट अशोकाच्या पुत्राने, म्हणजे महिन्द्राने बोद्धगयेतील वृक्षाची फांदी श्रीलंकेत नेऊन रुजवली, असे मानतात.

पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्यांसाठी हा आराध्य वृक्ष आहे. यालाच माऊलीनी अश्वत्थ असे म्हंटले आहे. कफ आणि पित्तनाशक असा हा वृक्ष आहे. विषमज्वर, कृमी, कुष्ठ, दाह, वाचादोष, क्षय आदी अनेक रोगांवर यापासुन औषधोपचार करता येतो. उदरशूल, पोटाचे अन्य विकार तसेच रक्ताच्या कर्करोगावरही याच्या सालीचा काढा देतात. पिंपळाच्या कोवळ्या पानाची तेलात परतुन केलेली चटणीही रुचकर लागते.




Monday, June 25, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिंपळाची एक वेगळी जात, खास करुन समुद्रकिनार्‍यावर दिसते.

pimpaLa


Tuesday, June 26, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वटोरक्तफलः शुंगीन्यग्रोधः स्कन्धजोधृवः |
क्षीरीवैश्रवणावासोबहुपादोवनस्पतिः ||

या श्लोकातली वट, रक्तफल, शुंगी, न्यग्रोध, स्कंधज, ध्रुव, क्षीरी, वैश्रवणवास, बहुपाद, वनस्पति ही नावे कमी म्हणुन कि काय याला यमप्रिय, जटाल, महच्छाय, यक्षावास, स्कंधरुह, कर्मज, जटी, पादरोहण अशी अनेक नावे आहेत याला.


vaTavRux

Ficus benghalensis असे याचे शास्त्रीय नाव. नवातला बंगाल, त्या प्रांताशी असलेला संबंधच दाखवतो. कोलकत्त्याच्या बोटॅनिकल गार्डनमधील झाड जगातील सर्वात मोठे वडाचे झाड मानले जाते. त्याच्या पसारा ४ एकरावर पसरलेला असुन, ते १७८२ पासुन तिथे असल्याचे मानतात.

माझ्या घराजवळही असेच एक मोठे पसरलेले झाड आहे. वडाचे धार्मिक महत्वही आहेच. भोळा शंकर आपल्याकडे पुरेसे लक्ष देत नाही असे बघुन, पार्वतीने त्याला शाप देऊन त्याचे वृक्षात रुपांतर केले अशी पुराणकथा आहे. तसेच सावित्रीची कथाही याच झाडाशी निगडीत.

वडाची झाडे तशी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाशी. पिंपळाप्रमाणेच वडाचाही पार गावात असणारच. गोव्यात अनेक बसस्टॉपची नावे वडाकडे अशी आहेत.

वडाच्या कोंबाना एक खास आवरण असते. ते आवरण फ़ोडुन पान बाहेर येते आणि या आवरणांचा सडा झाडाखाली असतो. वडाची गोलसर पाने आपल्या चांगल्याच परिचयाशी असतात. तशी हि पाने मजबुतही असतात. वटपोर्णिमेचे वाण ती सहज पेलतात. याच्या पत्रावळ्या करता येतात.

वडाची फळे म्हणजे वडांगळे


laal vaDaangaLe

खरे तर याना फळे म्हणणे तितकेसे बरोबर नाही. हा सुक्ष्म फुलांचा गुच्छ असतो. छिद्राजवळ नर फुले असतात आणि आत मादी फ़ुले असतात. आत सुक्ष्म किटकांची वस्ती असते. त्यांच्यामूळेच परागीभवन होवुन बिया तयार होतात.

हि फळे पिकली कि लालभडक होतात. वरच्या झाडाच्या फोटोत नीट दिसत नसली तरी वडाच्या हिरव्यागार पानात हि गोल लाल फळे खुप शोभुन दिसतात. मिनिएचर शैलीतील चित्रात हा फळावलेला वृक्ष सुंदर रितीनी रंगवलेला दिसतो.

हि फळे गोडसर असतात. आणि अनेक पक्ष्यांचा हा आवडता खाऊ असतो. कावळे, कोकिळा, पोपट, सातबाया, दयाळ, साळुंक्या, होले, पारवे, धनेश असे अनेक पक्षी या झाडावर येतात. दाट पसार्‍यामूळे बगळे करकोचेही असतात. वटवाघळेही विश्रांतिसाठी आलेली असतात. ( या सगळ्यांच्या पोटची उब मिळाल्यामुळेच वडाच्या बिया रुजतात. ) खारींची धावपळ चाललेली असते. सहज दिसणार्‍या तपकिरी पंखावर पांढरे ठिपके असणार्‍या फुलपाखरांच्या अळ्या, वडावरच पोसतात. हत्तीनादेखील वडाची पाने खुप आवडतात.

वडाची खासियत म्हणजे याच्या पारंब्या. फायकस कुटुंबात पारंब्या असतात, पण वडासारखा चलाख उपयोग कुणी करत नसेल त्याचा. ( पुण्यात पारंब्याच्या सहाय्याने एका झाडाने कुंपणापलिकडे उडी मारल्याचे वाचले होते. ) या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचायला खुप कालावधि घेतात, ( कधीकधी खालच्या रहदारीमूळे त्यांची वाढ खुंटते ) पण तोपर्यंत मुलाबाळाना सूरपारंब्या खेळण्यासाठी त्यांचा छान उपयोग होतो.
या कोवळ्या पारंब्यापासुनच वटजटादी तेल तयार करतात. केसांच्या निकोप वाढीसाठी ते वापरतात.
( मराठी साहित्यात मात्र या पारंब्याना गुढ अर्थ चिकटवला जातो. बॅरिष्टर नाटक, दळवींच्या, अंधाराच्या पारंब्या, या कादंबरीवर आधारित आहे. तसेच चेतन दातारांच्या, सावल्या नाटकाच्या नेपथ्यातही, पारंब्या एक गुढ संदर्भ घेऊन येतात. )
वरचेच तेल जखमा भरुन येण्यासाठी पण वापरतात. वडाचे कोवळे कोंब, औषधी असतात. बत्ताश्यातुन दिलेला वडाचा चीक वीर्यवर्धक असतो.
मघा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींसाठी तो आराध्य वृक्ष आहे. याला यज्ञीय वृक्ष मानले जाते. या झाडावर ब्रम्हाचा वास असतो, असे मानतात. याला पित्याचे स्थान आहे. या झाडाचा मंत्र ओम पितृभ्यो नमः, असा आहे.
वटपोर्णिमेला या झाडाची कत्तल होते. खरे तर या दिवशी, स्त्रीयानी मोठ्या वटवृक्षाच्या सानिध्यात रहावे, असा हेतु आहे. पण शॉर्टकट म्हणुन, वडाच्या फांद्या घरी पुजल्या जातात. ते एकवेळ परवडले, पण अलिकडे रस्त्या रुंदीच्या नावाखाली अनेक पुरातन वटवृक्षांची कत्तल झाली. पुणे सातारा रोड जेव्हा बांधत होते, त्यावेळी अशी शेकडो झाडे तोडण्यात आली.

वडाची एक पिवळी वडांगळे येणारी जात माझ्या घराजवळ आहे. याची पानेही जरा वेगळी, म्हणजे टोकदार असतात.


pivaLee vaDaangaLe

वडाचीच एक छोट्या पानाची जात असते. तेही झाड खुप मोठे होते. रस्त्याच्या कडेला, अलिकडे तो लावलेला दिसतो.
त्याशिवाय छोट्या पानाची आणखी एक जात असते. त्याच्या पानाला देठाजवळ छोटीशी खळी असते, कृष्णकन्हैया लहानपणे त्यात लोणी घेऊन खात असे अशी आख्यायिका. आणि त्यामुळे त्यालाच माखनकटोरी असे कौतुकाचे नावही आहे. याच्या शास्त्रीय नावातही Ficus krishnae कन्हैया आहेच.





Wednesday, June 27, 2007 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझेच मी म्हणु कि, भाग्य या घराचे
दिसले मला कधीचे, हे फ़ुल उंबराचे

असे एक मराठी गाणे आहे, आणि

जग हे बंदिशाला
उंबरामधले किडेमकोडे
उंबरी करते लीला

असेही आहे. खरे तर दोन्ही गाण्यात सत्याचा विपर्यासच झालाय. ग्रामीण भागात दुर्मिळ गोष्टींसाठी किंवा क्वचित भेटणार्‍या व्यक्तीसाठी अजुनही, उंबराच्या फुलाची उपमा दिली जाते. मी लहानपणी कुणाला विचारले, कि बाबानो कधी बघितलेत का उंबराचे फ़ुल, तर ते फक्त रात्रीच उमलते, भाग्यवान माणसालाच दिसते, आणि आकाराने गाडीच्या चाकाएवढे असते, अशी मजेशीर उत्तरे मिळाली होती.
फ़ायकस कुळातील इतर झाडांप्रमाणे, उंबराचे फ़ुल अस्तित्वातच नसते. ते फळ म्हणजेच फ़ुल. शिवाय त्यात जर किटक नसले तर, पुढची सगळी वाढच खुंटेल


Umbar

उंबर किंवा औदुंबर तसा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा. शालेय पुस्तकात, बालकविंची औदुंबर कविताही होती. त्यातला पाय टाकुनी जळात बसलेल्या औदुंबराची, ती खासियतच आहे. उत्तम वाढलेल्या उंबराच्या झाडापाशी विहिर खणली तर हमखास पाणी लागते असा संकेत आहे. किंवा असे म्हणुया कि, भुगर्भातील पाण्याच्या साठ्याजवळच उंबर नीट वाढु शकतो.
उंबराचे मोठे झाड असे फ़ळानी भरुन जाते. डॉ. राणी बंग यांच्या गोईण, पुस्तकात असा उल्लेख आहे, कि वनवासी मुलीचे लग्न जमवताना, सासरच्या घराच्या बाजुला, एखादे उंबराचे झाड आहे का, हे बघुन घेतात. त्यामागचे कारण म्हणजे, सासरच्या लोकानी लेकीला उपाशीतापाशी ठेवले तर उंबरे खाऊन, तिची तहानभुक भागु शकेल.

ते खरेही आहे, उंबराच्या झाडाखालुन जाताना, एखादेतरी पिकलेले उंबर तोंडात टाकावे, असाही संकेत आहे. ( वरच्या फोटोतले झाड चोर्ला घाटात, जरा उतारावर होते. ते बघुन माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. आणि हक्काचा गिर्‍या सोबत असल्याने, ती हौस सहज भागवता आली होती. ) उंबरात किडे असणारच. पण फळ उकलुन फ़ुंक मारली तर ते निघुन जातात. फळ गोडसर लागते. पण त्या फळाची खासियत म्हणजे उंबर खाल्यानंतर बराच वेळ तहान वा भुक लागत नाही.

उंबराच्या पानाचे एक वैशिष्ठ म्हणजे यावर लाल रंगाच्या अनेक गाठी असतात. यात चक्क जिवंत किडे असतात. आणि त्याना पंख फ़ुटले कि खालच्या बाजुने ते बाहेर पडतात व उडुन जातात.

उंबराचा पाला बकर्‍याना पण खुप आवडतो. त्याने बकर्‍याना जास्त दूध येते. कच्च्या उंबराची भाजी करतात. उंबराची कोवळी फांदी तोडली तर त्यातुन बराचे वेळ पाण्यासारखा द्रव स्त्रवत राहतो. त्याला उंबराचे पाणी म्हणतात, आणि उष्णतेच्या विकारावार ते औषध आहे.
उंबराला अग्निसादक असे नाव आहे. तो थंड प्रकृतीचा म्हणजेच शीतवीर्य आहे. दाह कमी करायला उंबरासारखे औषध नाही. ( हिरण्यकश्यपुचे पोट फ़ाडल्यानंतर नरसिंहाच्या बोटाना झालेला दाह, या उंबरानेच शमवला होता. ) अनेक विषांवर उतारा म्हणुन उंबर वापरतात. कडकी, मूळव्याध या विकारांवरही तो वापरतात. तो रक्तस्तंभकही म्हणजेच रक्तस्त्राव थांबवणारा आहे. तोंड आले असता, उंबराच्या पानांचा काढा देतात. कृत्तिका नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींसाठी तो आराध्यवृक्ष आहे.
उंबराचे लाकुडही मजबुत असते. खास करुन मुख्य दाराच्या पट्टीसाठी ते वापरतात. म्हणुनच तर तो उंबरठा.
उंबराचे किंवा औदुंबराचे आणि श्री दत्तात्रयाचे नाव एकदमच घ्यावे लागते. दत्ताच्या देवळाजवळ हा वृक्ष बहुदा असतोच. याच कारणासाठी शक्यतो उंबराचे झाड पुर्णपणे तोडत नाहीत.



Thursday, June 28, 2007 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पैठणीच्या पारंपारिक रंगांची यादी गुलबक्षी, वायंगी, डाळिंबी, कुसुंबी, अंजिरी अश्या रंगछटांशिवाय पुरी होत नाही. आणि हे सगळे रंग वनस्पतिंचे आहेत. लता आणि हेमंत कुमारच्या, मी डोलकर डोलकर, या गाण्यातही अंजिरी साडीचा उल्लेख आहे.
हा अंजिरी रंग बघितला तर लाल आणी हिरव्या रंगाचे मिश्रण असते. पण हे दोन रंग एकत्र करुन असा रंग मिळवता येत नाही. या रंगांचे ताणेबाणे घेतले तर मात्र हि छटा मिळु शकते.

उंबरानंतर अंजिराची आठवण येणे सहाजिकच होते. सुंदर चवीचे हे फळ, पंचवीस तीस वर्षांपुर्वी मुंबईत ताजे क्वचितच मिळायचे. पुढे त्याची पद्धतशीर लागवड झाली, म्हणुन शहरात ताजी अंजिरे मिळु लागली. पुर्वी ते फक्त सुका मेवा म्हणुनच मिळत असे.


anjir

वरचा फोटो आहे मायबोलीकर अजय al_omnet च्या परसातल्या झाडाचा. त्यांच्याकडे हे झाड चांगलेच मोठे झाले आहे.
व्यापारी तत्वावर लागवड करताना मात्र, फळांची तोडणी सोपी व्हावी म्हणुन झाडाची उंची आठ दहा फ़ुटच ठेवली जाते. उत्तम फळधारणा होण्यासाठी, खोडावर चाकुने जखमा कराव्या लागतात. त्यानंतर उत्तम टपोरी फळे धरतात. आपल्याकडे मावळ प्रांतात याची भरपुर लागवड झालीय. पुर्वी शिरवळची अंजिरे प्रसिद्ध होती.

अंजिराला तसा स्वाद नसतो. तसेच ते फळ रसदार असते असेही म्हणता येणार नाही. पण सगळी कसर गराचा गोडवा भरुन काढतो. अंजिरात जवळजवळ ८३ टक्के साखर असते. अ, ब आणि क हि तिन्ही जीवनसत्वे असतात. त्यांचा सारक गुण तर पुर्वापार माहित आहे.
Adam आणि Eve च्या गार्डन ऑफ़ ईडन मधे अंजिराची झाडे होती असे मानतात. त्या दोघांच्या लज्जारक्षणासाठी अंजिराच्या पानाची योजना केली होती. बायबलमधे येशुने, एका अंजिराच्या झाडाला, शाप वैगरे दिल्याचा उल्लेख आहे. पण त्याला उःशाप वैगरे दिल्याचे, मला माहित नाही.
तरिही अंजिराचा उगम अशिया मायनॉरमधला मानतात. प्राचीन इजिप्तमधे अंजिरे माहित होती. सिसिलियन गार्डनमधे जगातील सर्वात जुने अंजिराचे झाड असल्याचे मानतात. सध्या भुमध्य समुद्राच्या परिसरात, त्याची भरपुर लागवड होते. फ़्रान्स, ग्रीस, टर्की, ब्राझिल हे देश प्रमुख निर्यातदार आहेत. इराणमधेही अंजिराची लागवड होते आणि तिथली सुकलेली अंजिरे आखाती प्रदेशात खुप लोकप्रिय आहेत. तिथेच अंजिराचा जामही मिळतो. खुप गोड असल्याने तो नुसता खाता येत नाही, पण दुधात मिसळुन मात्र खुप छान लागतो. अंजिराच्या बियांमुळे त्या गराला एक छान पोत मिळतो.

आपल्याकडे अंजिरी रंगाची अंजिरे जास्त दिसत असली तरी त्याचे रंगावरुन अनेक प्रकार आहेत. काळ्या पासुन सोनेरी रंगापर्यंत अनेक रंग त्यात दिसतात. हिरवा रंग असतो पण व्यापारी क्षेत्रात त्याला पांढरी अंजिरे म्हणतात. रंगावरुनच त्याना Kadota, Buissone, Barbillone, Dauphine Violette अशी अनेक विशेषनामे पडली आहेत.
फायकस कुटुंबातले असले तरी घट्ट गरामुळे अंजिरात किटक नसतात. तरीही फळाची मुखाशी उघडण्याची सवय टिकुन आहे. आपल्याकडे बाजारात आणली जातात ती कोवळी अंजिरे असतात. ( त्यामुळे खुपदा देठाजवळ ते अगोड निघते. ) तसे अंजिर तोडल्यावरही पिकु शकते, पण झाडावर पिकलेल्या अंजिराची चव काही न्यारीच असते. अशी झाडावर पिकलेली अंजिरेच सुकवली जातात, म्हणुन ती जास्त गोड लागतात.

अंजिराचे शास्त्रीय नाव आहे Ficus carica . आपण खातो ती अंजिरे बहुदा खास प्रकारे विकसित केलेली असतात. त्यांची लागवड कलम करुनच करतात. या फळात परागीभवन वैगरे होत नाही बियाही लागवडीयोग्य नसतात.
अंजिराचा चीक थोडासा अपायकारक असतो. तोडणी करणार्‍याना यापासुन थोडे जपावे लागते. पण त्यापासुन चीज करता येते. ( दुध घट्ट करण्यासाठी तो वापरतात. ) पुर्वी तो साबण म्हणुन वापरत असत, पण त्यामुळे हाताची आग होत असल्याने, तो उपयोग मागे पडलाय. याच चीकापासुन, मीट टेंडरायझर वैगरे बनवतात.




Friday, June 29, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ायकस कुळातले एक महत्वाचे झाड म्हणजे रबराचे झाड. यालाच आसाम रबर ट्री किंवा इंडियन रबर ट्री असेही नाव आहे.

rabaraachee paane

Ficus elastica असे याचे शास्त्रीय नाव. प्रचंड मोठे वाढणारे हे झाड मूळचे आपल्या आसाममधले. याची उंची सहज ३० ते ४० मीटर्सपर्यन्त जाते. क्वचित त्याहुनही जास्त होते.

खरे तर वरच्या पानांकडे बघुन तुम्हाला हे झाड खुप ओळखीचे वाटले असेल. गेल्या पंधरा वीस वर्षात, इन्डोअर प्लांट म्हणुन ते चांगलेच लोकप्रिय झालेय. अत्यंत चमकदार तेजस्वी पाने हे याचे वैशिष्ठ. नीट निगा राखली तर या पानाची चमक जास्तच जाणवते. पानावर अनेक समांतर रेषाही दिसतात.

कोवळे पान एका खास नाजुक गुलाबी आवरणात वाढते. ते पान उलगडले कि, ते आवरण गळुन पडते, पण आतल्या पानाच्या पोटात आणखी एक आवरण असतेच.
एकेक पान उलगडुन त्याचा विस्तार वाढतच जातो.
यात गर्द हिरवी आणि लालसर अशी पाने असलेल्या दोन जाती दिसतात. काहि शोभेच्या प्रकारात पानावर थोडीफार पिवळी नक्षीही दिसते.

याचे खोडही आकर्षक असते. वडाच्या पारंब्याप्रमाणेच यालाही बारिक पारंब्या येतात. या कुळाचे वैशिष्ठ जपणारी लहान फळे या झाडाला येतात. त्यातल्या बियांचा प्रसारही पक्ष्यांमुळेच होतो.

हे झाडही पहिल्यांदा दुसर्‍या झाडावर रुजते. मग स्वतःची मुळे जमिनीपर्यंत पोचली कि स्वतंत्ररित्या वाढु लागते.

आपल्याकडे खुपदा आपण हे घरात किंवा ऑफ़िसमधे लावलेले बघतो, त्यामुळे त्याची उंची कमी असते. पण नीट जोपासले तर ते छान वाढु शकते.


rabaraache jhaaD

हत्तीना या झाडाचीही पाने खुप आवडतात. आसाममधे साधारण १८७४ पासुन याची लागवड केली जाते. या झाडाच्या चिकापासुन म्हणजेच लॅटेक्स पासुन रबर तयार करता येतो. तसा तो केलाही जात असे, पण पुढे दुसरी एक जात, ज्याला पॅरा रबर प्लांट किंवा Hevea brasiliensis असे नाव आहे, जास्त लोकप्रिय झाली. हे झाड खुपच मोठे वाढते. याच्या खोडाला आडव्या चिरा देऊन, त्यातुन गळणारा चिक गोळा केला जातो. गाडीच्या टायर्स पासुन गर्भनिरोधकांपर्यंत अनेक वस्तुंसाठी वापरला जाणारा रबर या झाडापासुन मिळतो. आसाम रबर ट्री पेक्षा, या झडाचे एकरी उत्पन्न जास्त असते. आपल्याकडे केरळ मधे या रबराच्या झाडांची पद्धतशीर लागवड केलेली आहे.
मुळ रबर प्लांट मात्र आता सावलीसाठीच खासकरुन लावले जाते.




Tuesday, July 03, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ायकस कुळातले आणखी एक झाड म्हणजे, पायरी ( आंबा नव्हे ) . यालाच पिंपर, पिंपरि अशीही नावे आहेत. ( पिंपरी चंचवड चा संबंध या झाडांशी असेल का ?)


paayaree



पायरीचे झाड तसे ओळखायला कठिण नाही. आधी यात जांभळाच्या झाडाचा भास होतो. पाने साधारण तशीच पण आकाराने लहान व जरा जाड असतात. आणि रंगाने पोपटी हिरवीगार असतात. झाडाचे खोड अगदी नितळ आणि पांढरट असते.
याची नव्याने लागवड झालेली झाडे फारशी दिसत नाहीत, पण पुर्वी रस्त्याच्या कडेने लावलेली मोठी झाडे दिसुन येतात. आणि ती छान विस्तारलेलीही दिसतात. यावर बहुदा एक प्रकारचे बांडगुळ असते, आणि ते बांडगुळही गोल आकारात वाढते. या बांडगुळांमुळेच या झाडाला शोभा येते.

फ़ायकस कुटुंबाच्या इतर झाडांप्रमानेच यालाही फुले कम फळे येतात. हिरव्या वाटाण्यासारखी हि फले झाडाखाली गळुन पडतात. आणि पक्षी ती आवडीने खातात.
या झाडाचा प्रसारही पक्ष्यांमार्फतच होतो, आणि बहुदा याची झाडे दुसर्‍या झाडाच्या खोडावरच रुजतात.
एकदा रुजले कि मुख्य झाडाच्या खोडाभोवती, या झाडाच्या मुळांचा वेढा पडतो आणि जाळीदार नक्षी तयार होते. पुढे त्याचे खोडात रुपांतर होते.
मग हे झाड स्वतंत्रपणे वाढु लागते.

तसे हे झाड औषधीही आहे. या झाडाच्या सालीला पंचवल्कलात स्थान आहे. मेदोरोग, मूर्च्छा, रक्तदोष, दाह, सूज अश्या विकारांत याची योजना करतात. तसेच उत्तरा फाल्गुनी नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींसाठी तो आराध्य वृक्ष आहे.

या कुळाशी संबंधित नसलेल्या एका झाडालाही पारोसा पिंपळ असे नाव आहे


paarosaa pimpaL

याच्या फुलाकडे बघुन भेंडीच्या फुलाचीच आठवण होते. आणि याला भेंडी असेही नाव आहे. पाने थोडीफार पिंपळासारखी असतात इतकेच.
सकाळी पिवळी जर्द असणारी हि फुले, संध्याकळी लाल होतात. याची फळे टणक पण त्यांचा देठ लवचिक असतो. त्यामुळे लहानपणी एकमेकाच्या डोक्यात टणकन मारायला याचा उपयोग व्हायचा.
तशेच फळाच्या आत पिवळा घट्ट पदार्थ असायचा. आणि तो पाण्यात मिसळुन छान पिवळा रंग तयार व्हायचा. साधारण समुद्रकिनारी हा वृक्ष छान वाढतो.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators