Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 02, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Archive through July 02, 2006 « Previous Next »


Monday, June 19, 2006 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संदीप आणि ईतर मित्र असले तरी माझ्या कंपनीतल्या ईतर लोकांशी पण माझी दोस्ती होती. आमच्या कंपनीत मी एकटाच भारतीय होतो. बाकि तीस फ़्रेंच, दोन ब्रिटिश, एक जर्मन आणि एक साऊथ आफ़्रिकन होता. आमच्या ५ व्हिलांमधे आम्ही १७ जण रहात होतो.
माझ्या व्हिलात मी, जो आणी गेतन रहात असु. महिन्यातुन १५ ते २० दिवस ते दोघे साईट्स वरच असत. दिवसाचे काम आटपुन रात्री घरी आले, अशी सोय किंवा परिस्थितीहि नव्हती. त्यामुळे त्याना साईटवरच रहावे लागायचे.
पण मी रहायला लागल्यापासुन, मी घराला घरपण आणायचा प्रयत्न केला. आजुबाजुला मी बाग केली होतीच. घरातहि पुष्परचना वैगरे करु लागलो.

जॉय आणि अंजेला त्या दोघांसाठी ब्रेकफ़ास्ट आणि जेवणहि करुन ठेवत असत. माझा मीच करत असे. पण आम्ही घरात असलो तर एकाचवेळी डायनिंग टेबलवर जेवायची प्रथा मी पाडली. आधी मुकाट्याने खाली मान घालुन जेवणारे ते दोघे हळु हळु गप्पा मारु लागले.
जो ब्रिटिश तर गेतन फ़्रेंच. त्या दोघात विळ्याभोपळ्याचे सख्य. त्यामुळे त्यांच्यात संवाद नव्हताच. आणि एकमेकांचे ईंग्लिश त्या दोघाना कळायचेहि नाही. मी तो संवाद सुरु केला. या जो व्हॉट यु से, करत जोला संवादात ओढु लागलो.

पण त्याना जिंकले ते मी माझ्या पाककलेने. गेतन मेंटेनन्स मॅनेजर होता त्यामुळे त्याला काहिच शिजवता यायचे नाही. पण तो दोन चार देश हिंडुन आल्याने, चवीने खाणारा होता. माझ्या ताटात काहि छान वासाचे असले कि, तो हटकुन हात घालायचा. आता त्याला कुठे ऊष्टेखरकटे शिकवत बसायचे. म्हणुन मग मीच त्या दोघाना माझी खास डिश वाढु लागलो. आणि त्याना ती चटकच लागली.
जो आवर्जुन कृति विचारायचा. डायरीत लिहुन ठेवायचा. जोने कधीकाळी कुक म्हणुन काम केले होते, त्यामुळे त्याला रुचि होतीच. त्याला शाकाहार म्हणजे काय ते माहित होते, आणि तोहि कधीकधी माझ्यासाठी खास काहितरी करु लागला.
जो तसा वयाने फार नव्हता, पण खुप थकला होता. आयुष्यात टक्केटोणपे खाल्लेला होता. खुपदा रात्री दारु पित असे, पण बडबड नसे. जास्त पिणे त्याला सोसवतहि नसे. पण शुद्धीत असला म्हणजे छान गप्पा मारत बसत असे. त्या लोकांच्या वागणुकितले मला काहि खटकत असेल तर मी त ए मोकळ्पणी जोला विचारत असे. आणि तोहि मला पटतील अशी उत्तरे देत असे.
एकदा ऑफ़िसमधे गेतनच्या कपड्यात कसला तरी किडा शिरला. तो फारच वळवळु लागल्यावर त्याने सगळ्यांसमोर शर्ट काढला, पॅंटहि काढली. त्याच दिवशी रात्री एक फ़्रेंच सिनेमा बघताना, कथेशी अगदी विसंगत असे नग्न दृष्य आले, मी जोला विचारले, असे कसे रे तुम्ही, सगळी लाजलज्जा सोडलेले. त्याने दिलेले उत्तर खरेच विचार करण्यासारखे होते. त्याने मला विचारले तु युरपमधे गेला आहेस ना, मी म्हणालो हो, त्याने विचारले तु कुठल्या महिन्यात गेलास. मी म्हणालो, जुन मधे आणि डिसेंबरमधे, तेंव्हा तो म्हणाला जुनमधे सुर्य किती वाजेपर्यंत असतो, मी म्हणालो साडेदहा अकरापर्यंत, तर तो म्हणाला, त्यावेळी आम्ही रात्रीची झोप घेत असतो, आणि ऊजेडाची आम्हाला लाज वाटत नाही. !!!!
जोने मला परएक्ट चहा कसा बनवायचा वैगरे शिकवले. पिमेंटो, ब्री चीज सारख्या गोष्टींची चटक त्याने मला लावली.

गेतन मात्र फ़ार बडबड करायचा. विषयाचे बंधन त्याला नव्हतेच. तो कितीहि चुकीच्या ईंग्लिशमधे बोलला तरी मीत ए ऐकुन घेत असे. त्याला प्रत्येकवेळी भावना व्यक्त करता यायच्या नाहीत, पण मला त्याचे मन नीटच कळत असे.
कधीकधी अनेक खटपटी करुन तो रात्री परत येत असे. त्याने तसा निरोप न ठेवल्याने, मेडने त्याच्यासाठी काहिहि शिजवुन ठेवले नसे, मग तो माझ्यापुढे सगळा कच्चा माल ठेवत असे आणि म्हणे दे आता मला काहितरी करुन, मलाहि ते आव्हान वाटायचे, तो फ़्रेश होईपर्यंत मी त्याच्यासाठी काहितरी करुन ठेवायचो.
माझ्या हातच्या घडीच्या चपात्या म्हणजे त्या दोघांचा वीक पॉईंट होता. आमच्यासाठी चार जरा जास्तच कर असे ते मला सांगुन ठेवत. जो तर त्या चपातीचे चार पापुद्रे वेगळे करुन खायचा. गेतन म्हणायचा सगळीकडुन बंद आहे तरी आत हवा कशी भरतोस ?
मग माझ्याकडे रोटि शेफ आला. मला त्याचे तंत्र नीट जमायचे, त्यामुळे प्रत्येक चपाती टम्म फुगायची. बाहेर टिव्ही बघतच मी चपात्या करायचो. ते समोर असले तर फटाफट संपवायचे. माझे सगळे पीठ संपेपर्यंत हा प्रकार चालायचा.
गेतनने तिथे एक बाईक घेतली. आणि असाच मस्ती करत एका ऊसाच्या शेतात घुसला. बाहेर आला तर सगळीकडे ओरखडे, मी विचारले औषध लावु का तर शुरपणे म्हणाला, मी ब्रेव्ह आहे.
पण त्याचा ब्रेव्हपणा पुढच्याच आठवड्यात ऊघडा पडला. आमच्या कंपनीत एक मोठे गोदाम होते, आणि त्याच्या दोन्ही बाजुना रॅंप होता. गेतनला स्टंट करायची हुक्की आली. भर वेगात रॅंपवर गाडी चढवुन तो दुसर्‍या बाजुने जंप घेऊ लागला. एकदोनदा त्याने तो प्रयोग यशस्वी केला, पण मग त्याला आणखी चेव आला आणि परत एकदा तशी जंप मारताना त्याचा तोल गेला आणि एका बाजुने बरेच खरचटले. ऊजव्या हातालाच बराच मार लागला होता. सगळेजण त्याची टिंगल करु लागले, आणि तो पण सगळे हास्ण्यावारी नेत होता, पण मला कळत होते कि त्याला बरेच लागलेय. मी त्याला आधार देऊन घरी आणले. सगळ्या जखमांचे ड्रेसींग केले. त्याच्या आवडीचे सुप वैगरे केले. त्याला ताप पण आला, मग त्याला गोळ्या वैगरे दिल्या, आणि ताप ऊतरेपर्यंत त्याच्याजवळ बसुन राहिलो. ताप ऊतरल्यावर त्याला ब्लॅक कॉफी करुन दिली. दुसर्‍या दिवशीहि परत सगळे ड्रेसींग करुन दिले. सुदैवाने फ़्रॅक्चर नव्हते.
त्याला हे सगळे अनोखे होते. त्याने म्हणुनहि दाखवले, कि त्याच्या भावानेहि कधी त्याच्यासाठी ईतके केले नसते. मी म्हणालो, आमच्याकडे यात काहि विशेष मानत नाहीत.

नंतर मी सहज त्याला विचारले होते, कि जरा जास्तच प्यायला होतास का ? त्याने कबुल केले, आणि केवळ माझ्या आग्रहावरुन, त्याने सोमवार सकाळ ते शनिवार संध्याकाळ दारु पिणार नाही, असे वचन दिले. आणि शेवटपर्यंत पाळलेहि. एका फ़्रेंच माणसाने हे वचन दिले होते, हे फारच विशेष आहे.

आमच्या शेवटच्या भेटीच्या वेळी तो रडला, मी त्याला म्हणालो, काळजी घे धडपडु नकोस, तर तो पटकन म्हणाला, हो ना घेतलीच पाहिजे, तु कुठे असणार आहेस माझी काळजी घ्यायला.

तश्या त्या दोघांच्याहि बायका तिथेच होत्या. त्यांच्याबद्दल ऊद्या.

अपुर्ण




Tuesday, June 20, 2006 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिरिष कणेकरांच्या एका लेखात मी वाचले होते, कि त्याना म्हणे नेहमी प्रश्ण पडतो. कि लोक जेंव्हा बायका ठेवतात, तेंव्हा अश्या ठेवण्याजोग्या बायका कुठे मिळतात ? त्यासंबंधी प्राथमिक बोलणी कशी करतात ? आर्थिक व्यवहार कसा ठरवला जातो ? वैगरे वैगरे. त्यानी बहुदा नायजेरिया बघितला नसावा.

मी लेगोस विमानतळाच्या बाहेर पडल्यापासुन अश्या विचारणा सुरु झाल्याच होत्या. तसा हा प्रकार केनयातहि होता, पण तो तितक्या ऊघडपणे नव्हता.

नायजेरियात विवाहसंस्था, कुटुंबसंस्था अस्तित्वात आहेत कि नाहीत, याची शंका यावी ईतपत हा प्रकार चालतो तिथे. या सर्व प्रकरणाचे काहि पैलु मला दिसले ते ईथे लिहितोय.

मुळात नायजेरियात जे लोक बाहेरुन जातात, ते केवळ तिथल्या आर्थिक सुबत्तेपायी जातात. तिथली सामाजिक परिस्थिति बघता, कुणीहि तिथे कुटुंब ठेवायला तसे नाखुषच असते.

त्यामुळे तिथे येणारे युरपमधील कर्मचारी हा याचा एक पैलु. आपल्या नजरेला, एखादा गोरापान माणुस एखाद्या काळीच्या नादी कसा लागला असेल, याचे नवल वाटत राहते. पण अतिपरिचयात अवज्ञा, प्रमाणे त्याना गोर्‍या रंगाचे तेवढे आकर्षण नसते. आणि तशी त्याना काळि माणसे बघायची सवय त्यांच्या मायदेशातहि असते. ( आताचे नाही पण पंधरा वीस वर्षांपुर्वी, आपल्याकडे काळ्या किंवा गोर्‍या माणसाकडे सारख्याच अचंब्याने बघितले जायचे. )

दुसरा भाग असा कि, नायजेरिया काहि पर्यटकांचे स्वागत करणारा देश नाही, त्यामुळे तिथे तशी काहिहि आकर्षणे नाहीत. रात्री कुठे बाहेर जायचीहि सोय नाही. त्यामुळे केवळ टाईमपास हेदेखील एक कारण आहे.

तिसरा मुद्दा आर्थिक आहे. त्या लोकांचा तिथला पगार हा त्यांच्या देशात करपात्र धरला जात नाही. त्या पगाराचे प्रमाण आणि नायजेरियातली भावपातळी बघता, तसा मोकळा पैसा त्यांच्या हातात भरपुर असतो. आणि या बायकाना, अगदी महिनाभराचे जे पैसे द्यावे लागतात, ते तसे त्यांच्या दृष्टीने मामुलीच असतात.

चौथा मुदा, जो मला जोने सांगितला. ( तो शुद्धीत असला तर अश्या अनेक बाबींवर आम्ही मनमोकळेपणी बोलत असु. ) त्याच्या मते, महायुद्धानंतर युरपमधल्या स्त्रीया अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या. तिथले राहणीमान बघता, आता दोघानी काम करणे हि आर्थिक गरज आहे. तिथे तसा स्त्रीपुरुषांच्या मिळकतीत फारसा फरक नसतो. त्यामुळे वैवाहिक जीवनातदेखील, स्त्री बरोबरीच्या नात्याने वागते, आणि पुरुषाना नैसर्गिकरित्या ते रुचत नाही. त्यामुळे नायजेरियातील स्त्रीयांची वागणुक त्याना फारच आकर्षित करते.

माझ्या कंपनीत बरेचसे फ़्रेंच लोक, बदलीवर वैगरे येत असत. ऊतरल्या ऊतरल्या त्यांचा हा शोध सुरु होत असे. याबाबतीत आमचे ड्रायव्हर्स संदर्भ देण्याचे काम करत असत. ओगा, आय हॅव अ सिस्टर, शी विल बे गुड वाईफ, अशी सुरवात केली जात असे. एका माणसाचे सगळे सामानच एअर फ़्रान्सने पॅरिसला ठेवले होते. अंगावरच्या कपड्यांखेरीज त्याच्याकडे काहिच नव्हते, तरिहि तो येतानाच एका ” वाईफ ” ला घेऊन आला होता.

नायजेरियन मुलींची बाजुहि मला थोडीफार कळली. ऊष्ण हवामानात मुली लवकर वयात येतात, हे एक वैद्यकिय सत्य आहे. त्यामुळे तिथे बारा चौदा वर्षाची मुलगी, सहज एखाद्या बाईसारखी दिसत असे.
आर्थिक प्रश्ण तितकासा असावा असे मला वाटले नाही. कारण जेवढे पैसे त्याना दिले जातात, तेवढे त्याना कुठल्याहि नोकरीत मिळु शकतात. पण खुपश्या मुली, दिवसभर कुठेतरी नोकरी करुन, रात्री आपल्या ” नवर्‍या ” कडे राहतात. त्यांची जेवणखाण वेगळेच असल्याने, तीहि अपेक्षा नसे त्यांच्याकडुन.
गेतनची एक स्टेडी मैत्रिण होती, तिच्याहि मी बोलतहि असे. ( जो मात्र दरदिवशी कुणालातरी पकडुन आणायचा. मी समोर असला तर तो लाजायचा देखील, पण मी दुर्लक्ष करायचो. ) तिचे नाव होते मारिया. ती एका फ़ाईव्ह स्टार हॉटेलमधे काम करत असे. तिला मी सहजच विचारले, कि तुमच्याकडे आईबाबा विचारत नाहीत का, जेंव्हा तरुण मुलगी रात्रभर घराबाहेर राहुन येते तेंव्हा. तिला माझा रोखच कळला नाही, तिने शांतपणे सांगितले, हो विचारतात ना, काय कमाई केलीस म्हणुन. तिने ते अगदी मॅटर ऑफ़ फ़ॅक्ट असल्याप्रमाणे सांगितले.
तिथे तर तो अगदी समाजमान्य प्रकार आहे. कुणालाच त्यात काहि वावगे वाटत नाही. ( तश्या त्या मुली दिसायला वाईट असतात असे नाही, बहुतेक जणी बिपाशा बासुसारख्याच दिसतात. ) बहुतेक लोकांचा धर्म ख्रिश्चन असला तरी, लग्नात ( ते सुद्धा केलेच तर ) वधुचा ड्रेस निळ्या रंगाचा असतो. कुण्या वधुने पांढरा ड्रेस घातलाच तर सगळे गाव, लग्नाला आवर्जुन जाते. ( त्यांच्यामधे पांढरा रंग पावित्र्याचे प्रतीक आहे. )
समाजात अश्या मुलींचे स्थान जरा वरच असते आणि जी मुलगी रितसर प्रॉस्टिट्युट बनते, तिचा या सगळ्याजणी हेवा करतात. सगळ्याच तश्या असतात असे नाही, काहि या स्पर्धेत ऊतरत नाहीत. कधी रुप आडवे येते तर कधी धर्म. मग त्या मुली स्वतःला बॉर्न अगेन म्हणुन घेतात. अंजेला आणि जॉय स्वतःला तसे म्हणुन घ्यायच्या. ( एकदा तिला रजा हवी होती तर मी सरळच विचारले होते, तेंव्हा तिनेच सांगितले हे. )
मारिया तशी बरी होती, जोच्या बायका मात्र त्याला पीडत असत. दॅट ब्लडी होर, टुक अवे माय वॉच अश्या तक्रारी करत बसायचा, पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असायचे.
केनयाप्रमाणे मला तिथे, मिश्त संतति दिसली नाही. गोर्‍या लोकाना ती जबाबदारी नकोच असायची. आणि अश्या एखाद्या संबंधानंतर त्या मुलीला दुसरा प्रियकर मिळण्यात वा लग्नहि होण्यात कुठलीच अडचण येत नसे.
बरं हे प्रकरण गोर्‍या परदेशी लोकांचेच असायचे असे नाही. त्यांच्या त्यांच्यात पण असे सहजीवन असायचे. नाही पटले तर ते वेगळे होत. शी इज गुड, शी वॉज विथ मी बिफ़ोर, अशी ओळख करुन द्यायलादेखील त्याना काहि वाटत नसे.
मी एकदाच काय ते स्पष्ट करुन टाकल्यामुळे माझ्या वाटेला कुणी जात नसे. त्यांच्या नजरेत तर मी तपस्वीच होतो.
मारियाचे काहि किस्से सांगायलाच हवेत. अगदी पहिल्यांदा गेतनने तिची ओळख स्वतःची बायको म्हणुनच करुन दिली. तरी त्याची ईतर प्रकरणे होतीच. एकदा तो आणखीन कुणाला तरी घेऊन आला, मग त्याच्या लक्षात आले, कि मारिया पण येणार आहे, मग नव्या बायकोला घेऊन तो बाहेर गेला, आणि मला सांगुन गेला, कि मारिया आली तर तिला सांग मी फ़ोर्कादोस ( एक दुरची साईट ) ला गेलोय म्हणुन. मी त्याला कबुल झालो, त्याचा त्याला खुप आनंद झाला. पण पुढे तो तिच्याबरोबरच राहु लागला. ती हॉटेलमधे काम करत असल्याने, तिला थोडीफार जगाची माहिती होती. मला तिने भारतातुन साडी आणायला सांगितली होती. मी बाकिचा जामनिमा पण नेला होता.
तिला साडी खुपच आवडली, पण नेसायची कशी ते कळेना, गेतन म्हणाला तु नेसव तिला, माझ्यापुढचा यक्ष प्रश्ण मी कसा सोडवला माहीतीय.

मी स्वतःच तिला साडी नेसुन दाखवली. !!!!

अपुर्ण




Wednesday, June 21, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नायजेरियन माणसाच्या घरी जाण्याचे प्रसंग क्वचितच आले. असाच एकदा एका सहकार्‍याच्या घरी गेलो होतो. तो तसाच ऑफ़िसच्या कपड्यासकट कोचावर जाऊन बसला. त्याच्या बायकोने, येऊन त्याचे बुट मोजे काढले. एका टबमधे पाणी घेऊन आली व त्याचे पाय धुवुन पुसुन काढले. मग आणखी एक टब घेऊन आली आणि त्यात त्याचे हात धुतले. खुप ऊबग आला ते सगळे बघताना. ( पुर्वी मराठी सिनेमात एखादी आशा काळे, पदराने नवर्‍याचे बुट वैगरे पुसुन देत असे, तेंव्हा पण तसेच वाटे. ) हा माझा सहकारी ऑफ़िसमधे माझा मदतनीस असल्याने, त्याला काम सांगणे मला क्रमप्राप्तच होते, पण माझे काम निमुटपणे करणारा हा माणुस, घरी असे काहि करत असेल, याची मी कल्पनाहि करु शकत नव्हतो.

मग मी परत कुणाच्या घरी जाणे टाळलेच. पण आमच्या आवारातल्या सगळ्या व्हिलात मात्र मला मुक्त प्रवेश होता. कधी कधी तर तु त्यादिवशी गेतनला करुन दिलेस तसले काहि तरी आम्हाला करुन दे, असा आग्रहहि होत असे. मी माझ्या घरात असलो आणि किचनमधे असलो तरी कुणीहि सरळ किचनमधे घुसत असे. ( आणि त्यातले बहुतेक जण, व्यावसायिक शेफ होते. ) काहि जण तर पॅरिसहुन येतानाच माझ्याबद्दल ऐकुन आलेले असत. मग त्यांचे नायजेरियातले पहिले जेवण माझ्याच घरी होत असे.
मी टिव्हीवर खुप फ़्रेंच शेफ्स चे कार्यक्रम बघायचो, त्यातले घटक पदार्थ मला वर्ज्य असले तरी एकंदर चवीची मला कल्पना येत असे. मला तरी त्यात एकसुरीपणा जाणवायचा. त्यामानाने माझे पदार्थ वेगळे असल्याने, त्या लोकाना ते मनापासुन आवडत असत.

मी घरी पार्ट्या करायचो तेंव्हाहि गेतन जो साठी आवर्जुन सगळे राखुन ठेवायचे. घरात पुरुष, बायका मुले अशी वीस पंचवीस माणसे तरी जमलेली असत. त्या सगळ्याना बघुन ते लाजत व समोर येत नसत.
पार्टि संपल्यानंतर मात्र काय ऊरलेय याची चौकशी करत असत. असे आदरातिथ्य त्या दोघानाहि नवलाचे होते. गेतनने तर मला थेटच विचारले होते, कि या सगळ्यांकडुन तु किती पैसे घेतलेस ते. मी त्यात कसले पैसे, असे विचारल्यावर तो म्हणाला होता कि आम्ही मित्रालासुद्धा कॉफी फुकट पाजत नाही.
खरे तर असे एकत्र जमणे हेच आमच्यासाठी विरंगुळ्याचे होते. बाकि तसा मनोरंजनाचा अभावच होता.
तिथले टिव्हीवरचे एम नेट हा मात्र सणसणीत अपवाद. ( त्याबद्दल मी लिहिले होते. ) उत्तम सिनेमे, दर्जेदार ट्रॅव्हल शोज, ईतर मनोरंजन यांची रेलचेल असे अगदी. शिवाय महिन्याभराचे कार्यक्रम आधीच माहित असल्याने, नीट प्लॅनींगहि करता यायचे.

तिथला स्थानिक टिव्ही कार्यक्रम कधी बघितल्याचे आठवत नाही. माझ्याकडे तेंव्हा वर्ल्ड रीसीव्हर होता. आमच्या पाचहि व्हिलांच्या आवाराला अखंड कंपाऊंड होते. त्यावर काचांचे तुकडे आणि त्यावरहि काटेरी ताराचे कुंपण होते. तिथली बार्ब्ड वायर आपल्यापेक्षा थोडी वेगळी असते आणि परत त्याची स्पायरल मांडणी करुन ती बसवलेली असते. तर मी माझ्या रेडिओच्या एरियलला एक वायर गुंडाळुन तिथे दुसरे टोक या काटेरी कुंपणाला जोडुन टाकले. या ट्रिकमुळे माझा रेडिओ मला अगदी विविधभारती आणि ऑल ईंडिया रेडिओ ऐकवु लागला. फारच विजा चमकु लागल्या तर तेवढी ती वायर मी काढुन ठेवायचो.

तिथे सिनेमा थिएटर होते. पण त्याची अवस्था बघता, मला तिथे जायचा धीर झाला नाही. पण तिथे सिनेमे मात्र हिंदीच दाखवले जात. ( संपुर्ण आफ़्रिकेत हिंदी सिनेमा अतिषय लोकप्रिय आहे. ) मी असताना तिथे जे सिनेमे दाखवले जात ते पार दहाबारा वर्षांपुर्वीचे असत. माझे सगळे सहकारी ते बघुन येत आणि गाण्यांचा अर्थ सांग म्हणुन माझ्या मागे लागत. त्यात दाखवले जाणारे सगळे त्याना खरेच वाटत असे.

त्यांची लोकनृत्य बघण्याचा योग आला. संपुर्ण अंगावर पिसे डकवुन ओणव्याने केलेले अत्यंत जोरकस नृत्य असे ते, पण त्यातले हावभाव आणि हालचाली मात्र बीभत्स असत. सेक्स या एका भावनेशिवाय मानवी जीवनात काहि भावनाच नाही का, असे वाटायचे. पण तिथे तो नाच मात्र खुप लोकप्रिय होता.

तिथे स्थानिक चित्रपट निर्मिती नव्हतीच. ( साऊथ आफ़्रिका, ईजिप्त, अल्जीरिया सारखे काहि मोजकेच देश स्वतः चित्रपट निर्मिती करतात. ) पण त्या लोकांचे काहि सिनेमे व्हिडिओवर निघायचे. मारिया कधी कधी त्या कॅसेट्स घेऊन यायची. अगदी बटबटीत अभिनय आणि पांढरे रोगण लावलेले अभिनेते, तावातावाने कॅमेराकडे बघत म्हंटलेले संवाद असा एकंदर मामला. आणि धाडस करुन नेटाने बघितले तरी कथेच्या नावाने ऊजेडच असायचा.

स्थानिक वर्तमानपत्र तर कधी बघितल्याचेहि आठवत नाही. रस्त्यात कुठेहि न्युजपेपर स्टॉल दिसायचा नाही. पुस्तकाचे दुकानहि कुठे बघितल्याचे आठवत नाही. अगदी एअरपोर्टवरदेखील नाही. सुपरमार्केटमधे मात्र एका कोपर्‍यात परदेशी फ़ॅशन मॅगझिन्स वैगरे दिसायची.

पोस्टाच्या नावाने ऊजेडच होता. भारतातुन पत्रे मिळायची काहि सोयच नव्हती. मी मग वहिनीला महिन्यातुन एकदा कुरियरने पत्र पाठवायला लावायचो. अर्धा किलो वजनापर्यंत एकच दर असल्याने, लोकसत्ताच्या खास पुरवण्या, लोकप्रभा, चित्रलेखा सारखी साप्ताहिके ती पाठवत असे. मग मात्र माझी चंगळ असायची. आणि महिनाभरच्या जुन्या पुरवण्या माझे मित्र आनन्दाने घेऊन जायचे, वाचायला. बहुतेक सगळ्याना हिच पद्धत वापरावी लागे. अर्थात माझ्याईतके ऊत्साहि कुणी नसल्याने, घरच्या पत्रांसाठी ते अशी व्यवस्था करत असत. मुंबईतील एखाद्या घरी भारतातील सगळ्या नातेवाईकानी पत्रे लिहायची आणि मग त्या माणसाने, कुरियरने सगळी पत्रे एकत्र करुन तिथे पाठवायची, अशी व्यवस्था असे. आम्हाला ईथे पत्रे पाठवायची असतील तर भारतात जाणार्‍या एखाद्याला गळ घालावी लागत असे, आणि कुणीहि हि जबाबदारी आनंदाने पत्करत असे. भारतातुन काय आणु, यावर अनेक मित्रांचे उत्तर भरपुर स्टॅंप्स आण असेच असे.

मी फकत घरचे पत्र मिळवण्यासाठी ईतका आटापिटा का करतो, याचे गेतनला कोडे पडायचे. त्यालाच काय तिथल्या कुणालाच घरुन पत्र येत नसे.

टेलिफोनची पण तिच तर्‍हा होती. ईंटरनॅशनल लाईनच कधी मिळायची नाही. क्वचित कधी लाईन चालु असली तर आमच्या कंपनीतली ऑपरेटर मला बोलवायला यायची. मला घरी फोन कर म्हणुन सांगायची. पुढे तुरळक ठिकाणी कार्ड फोन सुरु झाले. पण तेहि खुपदा चालु नसायचेच.

विजेचा लंपंडाव तर नेहमीचाच. आमच्या कंपनीतील कोल्ड स्टोरेज चालु ठेवण्यासाठी, आम्हाला जनरेटर कायम चाल ठेवावा लागे. पेट्रोल स्वस्त असल्याने, त्याचा खर्च फार नसायचा.
घरी सुद्धा जनरेटर होताच.

पाणीपुरवठ्याची पण तशीच बोंब असायची. प्यायला तर आम्ही मिनरल वॉटरच वापरायचो. पाणी अनियमित असल्याने, मी पाणी भरुन ठेवु लागलो. मग मला पाणे दे करत बाकिची मंडळी माझ्या घरी यायची. अर्थात त्याना अंघोळ वैगरे करायची नसल्याने, त्यांची गरज फार नसायचीच.
भरपुर पाऊस पडत असला तरी ऊन पण तितकेच कडक पडायचे. एसी तर आवश्यकच असायचा, आणि भारतीयांकडे तरी तो असायचाच.
ईतक्या सगळ्या कठीण परिस्थितीतदेखील आम्ही सगळे तिथे आनंदाने रहात असु, तिथे सगळ्याना आकर्षित करणारा भाग म्हणजे तिथला पैसा,
ऊद्या त्याबद्दल लिहिन.

अपुर्ण




Thursday, June 22, 2006 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नायजेरियाचे चलन नायरा आणि त्याचे सबयुनिट कोबो. एका नायरात १०० कोबो. त्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा एक डॉलर बरोबर एक नायरा असा विनिमयाचा दर होता. दहा वर्षांपुर्वी तो एक डॉलर बरोबर ८० नायरा ईतका होता. अलिकडे तो एका डॉलरला १५० नायरा ईतका झाला, असे ऐकले.
ईतकि अधोगति व्हायला तिथले भ्रष्ट नेते आणि परदेशी लोकानी सतत केलेली लुट ही मुख्य कारणे. योग्य त्या नेतृत्वाचा अभाव, ऊदासिन जनता हेहि पैलु आहेतच.
नायजेरियात कर आहेत. पगाराचा जवळ जवळ ३० टक्के भाग, कराच्या रुपाने कापला जातो. त्यामुळे तिथे आम्हाला नाममात्र पगार मिळायचा. तो तर आमचा वरखर्चाचा पैस असायचा. आमचा खरा पगार त्या देशाच्या बाहेरच आम्हाला मिळायचा.
असा व्यवहार जवळ जवळ सगळ्याच कंपन्या करत असत. तिथे कार्यरत असणार्‍या बहुतेक सर्व कंपन्या मुळ विदेशी होत्या. त्या तिथे ज्या सेवा देत असत वा वस्तु विकत असत, त्याच्या किमतीपैकी केवळ पावभर हिस्सा नायरामधे दाखवला जात असे, आणि बाकिचा हिस्सा हा परकीय चलनात, देशाच्या बाहेर ईनव्हॉईस केला जात असे. आणि हा व्यवहार नेमका त्या लोकाना कळत नसे. म्हणजे अगदीच कल्पना नसे असे नाही, पण नेमक्या रकमेचा अजिबात अंदाज नसे.

युरपमधले देश अश्या व्यवहारावर कर आकारु नयेत म्हणुन, एखाद्या बेटावर किंवा ट्युनिशियासारख्या एखाद्या देशात एखादे नावापुरते ऑफ़िस थाटले जाई. आणि हा व्य्वहार जवळजवळ अधांतरी सुरळीत चालत असे.

पेट्रोलियम क्षेत्रातल्या कंपन्या रॉयल्टी वैगरे चुकवुन, कशी लुटमार करत असत ते लिहिले आहेच, पण तिथे ईतरहि ऊद्योग खासकरुन टेक्स्टाईल आणि फार्मास्युटिकल ऊद्योग असा छुपा व्यवहार करत असतच.
तिथला राज्यकारभार तसा अध्यक्षीय लोकशाहि प्रकारातला, पण ती छुपी हुकुमशाहिच होती. तसे आपल्या देशात राष्ट्रपति देखील तिन्ही दलांचे घटनात्मक प्रमुख असतात आणि ते या दलांची पाहणीहि करत असतात, पण आपल्या देशातील कुणाहि राष्ट्रपतिनी कधी लष्करी गणवेशात फोटो काढुन घेतलेला मी बघितला नाही. तिथे मात्र मी असताना जनरल सानी अबाचा या अध्यक्षाचे तसे फोटो प्रत्येक आस्थापनेत लावणे जवळजवळ सक्तीचे होते. ( आपल्याकडेहि खास करुन ग्रामीण भागात ईंदिरा गांधी व नेहरुंचे फोटो बैठकिच्या खोलीत लावलेले असत. पण ते त्या नेत्यांबद्दल वाटत असलेल्या आपुलकिमुळे असत. ) या अबाचाबद्दल लोक कुजबुज करत असत, पण त्यांच्यावर कसलेतरी दडपण असल्याचे जाणवत राहि. मी तिथे असतानाच या सानी अबाचाचा अपमृत्यु झाला, त्यावरची एकमेव प्रतिक्रिया म्हणजे भिंतीवरचे त्याचे फोटो ऊलटे करुन ठेवले गेले. त्यानंतर काहि काळातच या सानी अबाचाने तुरुंगात अनेक वर्षे डांबुन ठेवलेला विरोधी नेताहि मरण पावला. पण यापैकी कुठल्याच घटनेची तीव्र प्रतिक्रिया तिथे ऊमटली नाही.
सानी अबाचाच्या भ्रष्टाचारामुळेच, त्या देशाची ती हालत झाली होती. देशाच्या तिजोरीत रॉयल्टी जमा व्हायच्या ऐवजी तो ती स्वतःच हडप करत असे.
तसे बघायला गेले तर तिथे कायद्यांचे जंजाळच होते. करपद्धती, ईमिग्रेशन, कामगार अश्या अनेक बाबतीत असे कायदे होते, पण त्यांच्या अंमलबजावणीत आनंदच होता. आपल्याकडे कसे सगळे सरकारी व्यवहार लाल फितीत गुरफटलेले असतात, तसाच प्रकार तिथे होता, त्यामुळे बळी तो कान पिली, असा जंगल कायदाच तिथे लागु होता.

आम्हाला या सगळ्या प्रकाराची तशी थेट झळ क्वचितच पोहोचत असे. नाहि म्हंटले तरी भारताच्या मानाने खुपच सुखासीन जीवनमान होते आमचे.

आता व्यवहारातल्या गमती जमती सांगुन थोडा ताण हलका करतो.
तिथला स्थानिक पगार आम्हाला ( म्हणजे माझ्यासारख्या निर्व्यसनी आणि काळी बायको न केलेल्या माणसाला ) पुरुन ऊरायचा. होता होईतो खर्च खाण्यापिण्यावर. बाकि काहि वस्तु तिथे घेण्याचा प्रशणच नव्हता.
मी वर ऊल्लेख केलेले कोबो, तर मला कधी बघायलाहि मिळाले नाहीत. नायराच्या नोटा मात्र ५, १०, २० आणि ५० एवढ्याच असत. त्याचे मुल्य बघता, त्या देशाने यापेक्षा जास्त किमतीच्या नोटा प्रसारात आणायला हव्या होत्या, पण तितकी निर्णयक्षमता त्यांच्याकडे नव्हतीच.
बरं या नोटादेखील ईतक्या कळकट असत, कि हातात सुद्धा धरु नयेत असे वाटे. आमचे तिथे बॅंक अकाऊंटदेखील नसायचे, सगळा रोखीचाच व्यवहार. ऑफ़िसमधुन हवे तेंव्हा पैसे मिळत असत.
कमी किमतींच्या नोटा असल्याने, महिनाभराचे सामान वैगरे घ्यायचे असेल तर नोटांची अनेक बंडले न्यावी लागत. मग अश्यावेळी ड्रायव्हरला, सुपरमार्केटच्या अगदी जवळ गाडी न्यायला सांगुन, खाकी पिशवीत गुंडाळलेली बंडले आत न्यावी लागत.
सुपरमार्केटमधे दारुच्या बाटल्यांची रेलचेल असायची, पण त्यापैकी बराच माल बनावट असल्याचे, मला लोक सांगत. पण बाकि लागणारे सामान म्हणजे अगदी तांदुळ कणीक सुद्धा दरवेळी मिळेलच का, याची खात्री नसायची. त्यामुळे जी मिळेल ती वस्तु घेऊन त्याचा साठा करुन ठेवायची आमची प्रवृत्ती असायची. आता नवल वाटतय, कि एखाद्या दुकानात जिरे दिसले कि आमही एकमेकाना कळवत असु, आणि मग सगळे भारतीय वर्षभराचा जिर्‍याचा साठा करुन ठेवत असत. असाच प्रकार ओवा, तीळ, चिंच अश्या अनेक बाबतीत व्हायचा.
टिन्ड फ़ुड आणि बिस्किटे मात्र भरपुर असायची. फ़्रोझन वस्तु मोजक्याच असत.
भुगोलात जरी वाचले असले तरी तिथे मला कधीहि ताजे दुध मिळाले नाही. ( ताजे दुध कुठे मिळेल या माझ्या प्रश्णावर ओगा जिथे गायी कापतात ना तिथे जा, एखादी गाय दुध देणारी असेल तर तुला तिचे दुध काढुन देतील, असे मला अंजेलाने सांगितले होते ) त्यामुळे आम्ही टेट्रा पॅकमधले जर्मन दुधच वापरत असु. ते मात्र खुप चवदार आणि दाट असायचे.

तिथे मिळणारा बहुतेक पैसा आम्हाला खर्चच करावा लागे कारण साठवुन ठेवायला तिथे आमचे खाते नसायचे. शिवाय ऑफ़िशियली त्याचे डॉलर करणे अशक्यच होते. भारतात ड्राफ़्ट वैगरे पाठवणेहि शक्य नव्हते आणि तशी त्याची गरजहि नव्हती.
चोरुन एक्स्चेंज करायला गेलो तर अगदी कमी भाव मिळायचा. शिवाय डॉलर्सच्या ज्या नोटा मिळतील त्या अस्सल असतील याची खात्री नसायची. पण आमच्या कंपनीत सतत येजा करणार्‍या फ़्रेंच लोकांमुळे मला तशी फ़ॉरेन एक्स्चेंजची अडचण नव्हती.

तरिहि तिथला बॅंकांबद्दल काहि मनोरंजक गोष्टी लिहिनिच, पण ते ऊद्या.

अपुर्ण




Friday, June 23, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या यायच्या जायच्या रस्त्यावर काहि देखण्या बंगलीवजा ईमारती होत्या. नावावरुन तरी त्या बॅंका वाटायच्या. पण साधारणपणे बॅंकांच्या बाहेर जी वर्दळ दिसते ती तिथे कधीच दिसायची नाही. एखादा सुरक्षारक्षक सोडला तर तिथे कुणी माणुसहि दिसायचे नाही, पण ती बंगली मात्र चकाचक दिसायची. जो त्याना लॉंड्री म्हणायचा. ड्रग्जच्या व्यवहारातुन मिळवलेला पैसा साठवण्यासाठीच बहुदा त्यांचा वापर होत असावा.

काहि वर्षांपुर्वी तुमच्यापैकी अनेकजणाना फक्त तुमचा बॅंक अकाऊंट नंबर द्या, तिथे तुम्हाला मोठी रक्कम मिळेल, अश्य आशयाच्या ईमेल्स आल्या असतील, यातुन खरेच कुणाला फायदा झाला कि नाही, याची मला कल्पना नाही, पण हे सगळे नायजेरियन लोकांचेच ऊद्योग होते. त्या लोकांचे युरपमधे धागेदोरे असायचेच.

वर लिहिल्याप्रमाणे आमचे खातेच नसल्याने व तिथुन काहिच सेवा घ्यायची नसल्याने, आमचे बॅंकेत जाणेयेणे नसायचेच. पण तरिहि ऑफ़िसमधे चालणार्‍या व्यवहारावरुन तिथल्या कारभाराची कल्पना यायचीच.
चलनाचे मुल्य अतिषय कमी असल्याने, चेक लिहिताना मोठमोठ्या रकमांचे चेक्स लिहावे लागायचे. तिथे मिलियन, बिलियन असेच शब्द वापरले जातात. पण बॅंका एका मिलियनपेक्षा जास्त रकमेचा चेक लिहु देत नसत. कारण विचाराल तर त्यांच्या सॉफ़्टवेअरमधे जी कॉलम विड्थ होती, त्यात त्यापेक्षा जास्त रक्कम बसत नसे. पण आम्हाला एकेका सप्लायरलाच मोठमोठ्या रकमा द्यायच्या असायच्या, मग त्यावेळी एकेक मिलियनचा चेक लिहावा लागायचा.
बरं तेवढ्यावर ते प्रकरण मिटायचे नाही. एकदा चेक लिहिल्यानंतर परत एका वेगळ्या फ़ॉर्ममधे त्या चेकचे सगळे डिटेल्स लिहावे लागायचे. या फ़ॉर्मवरदेखील ज्यानी चेकवर सहि केली असेल त्यांचीच सहि लागायची. ( त्याला चेक इंटिमेशन असा समर्पक शब्द होता ) असे इंटिमेशन मिळाल्याशिवाय बॅंक चेक पास करत नसे. आणि चेक लिहिताना घ्यावी लागते ती सर्व खबरदारी हा फ़ॉर्म भरताना घ्यावी लागे.

ऑफ़िसच्या कामासाठी पेटी कॅश काढायची असेल तरि हाच ऊद्योग करावा लागत असे. एक दोन मिलियन नायरा विथड्रॉ करणे काहि विशेष नसे, पण बॅंकेकडे तेवढ्या नोटा असतील कि नाही, याची खात्री नसायची, मग आधी फोन करुन सांगावे लागे. शिवाय ५० नायरांची बंडल्स मिळतील याचीहि खात्री नसायची. मग मिळणार्‍या नोटा या संख्येने किती असतील याची कल्पना करा. त्या नोटा आणण्यासाठी एखादी मोठी बॅगच न्यावी लागे आणि ती ऊचलुन आणायला दोन तीन माणसे लागत.

परकिय चलनावर अनेक बंधने होती. ती बंधने ईतकी जाचक होती, कि व्यवहार जवळजवळ अशक्यच असे. आणि असा ऑफ़िशियली तिथे कोण व्यवहार करत असेल, असेहि मला वाटत नाही. शिवाय मनीचेंजरदेखील चांगला भाव देतील याची खात्री नसायची. शिवाय तो उद्योगहि चोरट्यानेच चालत असे. पण गोर्‍या लोकांचा व्यवहार मात्र सहज त्यांच्या चलनात चालत असे.

आता व्यवहारातील काहि वस्तुंचे ( त्यावेळचे ) भाव बघु. माझी आवडती सोललेली मोसंबी २० नायराला पाच मिळत असत. ब्रेड ४० नायराला एक मोठा मिळत असे. तिथला ब्रेड फारच गोड असे व त्याचे स्लाईसहि केलेले नसत. भाजुन सोललेले साधारण अर्धा किलो शेंगदाणे २० नायराला मिळत असत. केळी १० नायराला एक डझन मिळत असत. एक किलो कणीक ९० नायराना मिळत असे. बासमती तांदुळ १०० नायराना एक किलो मिळत असे. सफरचंद आयात केली जात त्यामुळे ती ५० नायराना तीन मिळत असत. पेट्रोल मात्र २० नायरा लिटर होते. १००० ते १२०० नायरात तासाभराचा विमानप्रवासाचे तिकिट मिळत असे. स्थानिक भाज्या १० ते २० नायरा किलो असत. नारळहि १० नायराना मिळत असे.
एकंदर तुमच्या लक्षात आले असेलच कि या भावांची आपल्याकडच्या भावाशी तुलना करणे अगदीच गैर आहे.
मी स्वतः एका फ़्रेंच कंपनीत काम करत असल्याने, आमच्या कंपनीत अनेक खाद्यपदार्थ आयात केले जात असत. तसेच स्थानिक बाजारातुनदेखील भाज्या, फळे वैगरे घेतली जात. आम्हा कर्मचार्‍याना ते सगळे, खरेदी किमतीत मिळत असे. आणि किती खरेदी करायची यावर काहि बंधन नव्हते. त्यामुळे तिथे दुर्मिळ असणारे काहि पदार्थ, मी माझ्या मित्राना पुरवु शकत होतो.

माझ्याकडे अर्थातच ओव्हरसीज अकाऊंट्सचे काम होते. ते काम अत्यंत गोपनीय समजले जात असल्याने, मला स्वतंत्र बसावे लागे, व तो सर्व व्यवहार मला एकट्याने कुणाचीहि मदत न घेता करावा लागे.
माझा संपर्क थेट ट्युनिस आणि पॅरिसमधल्या ऑफ़िसशी असे. पण माझे काम झटपट होत असल्याने, मला स्थानिक कामात लक्ष देता येत असे.
बिल गेट्सच्या विंडोजची पहिली ओळख मला तिथे झाली. मी पहिल्यांदा एक्सेल, वर्ड वैगरे शिकलो ते फ़्रेंचमधुनच. त्यावेळी बरेचसे शब्द कळत नसत पण मी ईथल्या आयकॉन्सवर अवलंबुन होतो. ईतर बाबतीत तो देश मागासलेला असला तरी मी तिथे लॅपटॉपच वापरत होतो.

त्यावेळी इंटरनेट, ईमेल्स, मोबाईल हे सगळे प्रकार भारतातहि आलेले नव्हते. आमच्या ऑफ़िसचा दुरवरच्या साईट्सशी संपर्क केवळ बिनतारी रेडिओने होवु शकत असे.

आणि बोलणे कसले तर मिरच्या संपल्यात पाठवुन द्या. ती एक पोरगी पळुन गेलीय, तिच्या जागी दुसरी पाठवा. आणि पुढच्या आठवड्यात कम्युनिटी प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे.

आता हा कम्युनिटी प्रॉब्लेम काय असायचा तो, पुढच्या भागात बघु.

अपुर्ण




Sunday, June 25, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचा मन्नु, मुग्गा असला तरी कधी कधी आम्ही त्याची मुग्गी करुन टाकतो.
mn


Monday, June 26, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नायजेरियात राहुन आलेल्या कुणालाहि तुम्ही विचारलेत, कि हा कम्युनिटी प्रॉब्लेम काय असता बॉ, तर उत्तर मिळण्याची शक्यता कमीच आहे. खांदे ऊडवुन एखादी शेलकि शिवी मात्र नकीच घातली जाईल.

तर या प्रॉब्लेमचे स्वरुप असे. एखादे ऑफ़िस ज्या भागात असते, त्या भागात एखाद्या वंशाचे म्हणजेच कम्युनिटीचे प्राबल्य असते. आणि केवळ तुमचे ऑफ़िस किंवा फ़ॅक्टरि तिथे आहे, या साठी त्या कम्युनिटीच्या काहि मागण्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतात.
या मागण्याचे स्वरुप आपल्यासारख्या गणेशोत्सवाच्या वा नवरात्रीच्या वेळी सक्तीने जमा केलेल्या वर्गणीसारखेच असते. पण कारण तितके स्तुत्य वा धार्मिक नसते. एखादा कम्युनिटी हॉल बांधुन द्या, फ़ुटबॉलचे सामने ठरवलेत पैसे द्या, चीफचा सत्कार करायचा आहे पैसे द्या, अश्या मागण्या सतत चालु असतात, या शिवाय आमच्या कमुनिटीतल्या अमुक ईतक्या लोकाना नोकरीवर ठेवा., तुमाला माल पुरवायचे कॉन्ट्रॅक्ट आम्हालाच द्या, अश्या एक ना अनेक. मारुतीच्या शेपटासारख्या मागण्या वाढतच जातात. उगीच कटकट नको म्हणुन बर्‍याचश्या कंपन्या त्या पुरवतातहि, पण सगळ्याच मागणे पुरवणे शक्यच नसते. आणि मग हा कम्युनिटी प्रॉब्लेम सामोरा येतो.
कुणा त्रयस्थाचा कश्याला, माझाच अनुभव आहे हा. खरे तर याची कुठलीही पुर्वकल्पना आम्हाला नव्हती. एका सकाळी गेलो तर गेट नेहमीप्रमाणे बंद नसुन सताड ऊघडे दिसले. आवारात बरिच अनोळकही माणसे व बायका दिसल्या. मी तिकडे दुर्लक्ष करुन ऑफ़िसमधे जायला लागलो तर ऑफ़िसला बाहेरुन कुलुप व एका माणसाने मला ढकलुन दिले. समोर बघितले तर गेतन आणि ईतर सहकारी झाडाखाली ऊभे होते. गेतनने मला तिकडे बोलावले. आम्ही निमुटपणे तिथे जाऊन ऊभे राहिलो. आमच्या डोळ्यासमोर कंपनीच्या मालाची लुटालुट चालली होती. कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या पिवुन फेकुन दिल्या जात होत्या. आमच्यावर ऊगारल्यासारखे केले जात होते. मुद्दाम आम्हाला दाखवुन बाटल्या तोंडाला लावल्या जात होत्या.

मी फारच टक लावुन बघतोय असे वाटल्याने कि काय एक आडदांड माणुस कोयता घेऊन माझ्या अंगावर धावुन आला. मीहि त्याच्या नजरेला नजर देऊन, ठाम ऊभा राहिलो. जवळ आल्यावर त्याचे अवसान गळाले. ईतक्यात माझा ड्रायव्हर माझ्याकडे धावत आला. पण त्या आधीच त्या माणसाने माघार घेतली होती. माझे ऑफ़िसमधले काळे सहाकारी मात्र कुठेच दिसत नव्हते. कदाचि ते घाबरले असतील, त्याना ताकिद देण्यात आली असेल, किंवा ते त्याना सामिलहि असतील. कुठलिही शक्यता मी नाकारत नाही. माझ्या ड्रायव्हरने जे केले त्याला धाडसच म्हणावे लागेल.

बराच वेळ ऊन्हात ऊभे राहिल्याने घश्याला कोरड पडली होती. नेहमी बंद असणारे गेट आज सताड ऊघडे होते पण तिथेच त्यांचा जमाव वाट अडवुन बसलेला होता, त्यामुळे आम्हाला बाहेरहि जाता येत नव्हते आणि बाहेर तरी आम्ही कुठे सुरक्षित होतो ? या गेटबाहेर मी जिच्याकडुन नेहमी मोसंबी घेत असे, ती मुलगी बसलेली होती. तिने गुपचुप मला दोन मोसंबी आणुन दिल्या. पैसे काढु लागलो तर तिने डोळ्यानेच दटावले. कदाचित मी पैश्याचे पाकिट बाहेर काढले असते, तर ते लुटले गेले असते. असा बराच वेळ झाल्यानंतर त्यांचा प्रतिनिधी आमच्या पर्सोनेल मॅनेजरच्या ऑफ़िसमधुन बाहेर आला, आणि त्याने आरोळी ठोकली. त्याबरोबर त्यांचे विजयनृत्य सुरु झाले. मगाशी माझ्या अंगावर धावुन आलेला माणुस मुद्दम येऊन शेकहॅंड करुन गेला. माझ्या ड्रायव्हरने मला आणि गेतनला बळेच तिथुन बाहेर काढले.

आता तुम्हाला जे प्रश्ण पडले असतील, त्याची मला कल्पना आहे. त्याची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो.
यावेळी आमचे वरिष्ठ अधिकारी, एका हॉटेलमधे लपुन बसले होते. वेळेवर ड्युटिवर हजर होणारे आम्हीच त्यांच्या ताब्यात सापडलो होतो.
या बाबतीत पोलिस काहिहि करत नाहीत. एकतर तिथे पोलिस परदेशी लोकाना लुबाडण्याशिवाय काहिच करत नाहीत. आणि कदाचित तेहि त्याना सामिल असण्याची शक्यता आहेच.

तिथल्या कायद्याप्रमाणे पर्सोनेल ऑफ़िसर हा स्थानिकच असावा लागतो. आमच्या कंपनीची पर्सोनेल मॅनेजर चीफ हेलन ओमांग नावाची एक पाताळयंत्री बाई होती. ( आजकाल एकता कपुरच्या सिरियलमधल्या सर्व खलनायिकांची ती पुर्वज होती ) आणि नंतर आम्हाला कळले कि तिनेच हा बनाव घडवुन आणला होता. माझे फ़्रेंच मित्र तर तिला तोंडावर फ़्रेंचमधुन शिव्या घालायचे आणि मग मला हळुच त्याचा अर्थ सांगायचे.

या बाईनेच आमच्या एम. डी. असलेल्या एका ब्रिटिश अधिकार्‍याला आयुष्यातुन ऊठवले. खरे तर हा माणुस खुप ऊमदा होता. तो आमच्याशी अगदी मनमोकळेपणी वागे. माझ्या घरी हक्काने जेवायला येई. दारतल्या आंब्याच्या मी केलेला मेथांबा त्याला खुप आवडे, व स्वतःसाठी तो करुन घेत असे.
त्याची बायको करेबियन होती. दोन गोंडस मुली होत्या. त्याहि सगळ्यांशी मिळुन मिसळुन रहायच्या. त्याची बायको आम्हा सगळ्याना घरी जेवायला बोलवायची. असे सगळे सुरळीत चालु असताना, या हेलन ओमांगने त्याला एका काळीच्या मोहजालात अडकवले. आणि तो माणुस वहावतच गेला. त्याची बायको त्याला सोडुन गेली. मग तर त्याचे चाळे वाढतच गेले. त्याच्यापासुन त्या बाईला मुलगाहि झाला. याचे माझ्या सहकार्‍याना पण खुप नवल वाटले, तसे तिथे प्रत्येकाची प्रेमपात्रे होती, पण गोष्टी या थराला कुणी नेल्या नव्हत्या. हि हेलन मुददाम त्या बाईला आणि मुलाला घेऊन यायची, व त्याला चारचौघात खजील करायची. अंजेला मला म्हणाली, कि तिने तुमच्या साहेबांवर व्हुडु ( काळि जादु ) केलीय. यातुन सुटका नाही. बोलाफुलाला गाठ पडली आणि त्याला कंपनीने काढुन टाकले. तेवढ्यात त्या बयेने आयुष्यभराची कमाई करुन घेतली होतीच.

तिथे आम्हा ईमिग्रेशनचे अधिकारी पण फार त्रास द्यायचे. अधुनमधुन तपासणीला यायचे ( किंवा आणवले जायचे ) आणि मग व्हिसामधे काहितरी खुसपट काढुन पैसे ऊकळायचे. हि खुसपट म्हणजे डेट स्टॅंप नीट ऊमटला नाही, असे क्षुल्लक असायची. यांचा ससेमिरा विमानतळावर ऊतरल्यापासुन ते थेट विमानात चढेपर्यंत चालु असायचा. थेट विमानात येऊनदेखील ते विमानातल्या दारुच्या बाटल्या मागुन न्यायचे. विमानाचे दार बंद करताना एअर हॉस्टेस सुटकेचा निःश्वास टाकत असत.

आता विचार करता हा कम्युनिटीचा ऊठाव मला अनाठायी वाटत नाही. पण खंत एवढीच कि या ऊठामागची प्रेरणा हि सर्व समाजाचे कल्याण हि नसुन केवळ स्वतःची कमाई करुन घेणे हिच होती.

अपुर्ण




Tuesday, June 27, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशी संकटे तर येतच होती. पण सगळ्याच कंपनीत अधुन मधुन असे प्रकार घडत असत. अगदी त्याच संध्याकाळी आम्ही ते किस्से एकमेकाना सांगत असु. त्या लोकाना तशी पैश्याचीच लालसा असे. सहसा फारशी मारामारी ते करत नसत.

नायजेरियात असताना मला फ़्रेंच लोकांची पण जवळुन ओळख झाली. माझा तसा काहि त्या भाषेचा वा त्यांच्याकडच्या कलाकृतिचा अभ्यास नाहि. पण आजवर मी जे थोर लोकांचे लेखन वाचले, ते तिथल्या उचभ्रु लोकांबद्दलच होते. तिथले कलाकार, लेखक वैगरे वैगरे. पण माझा संबंध येत होता तो फ़्रांसमधल्या सामान्य माणसांशी. कदाचित त्यांच्या देशात त्याना फारतर ट्रक ड्रायव्हरची वैगरेच नोकरि मिळु शकली असती. ( नाहि तर शिकला सवरलेला युरपियन माणुस कश्याला, बाहेर जाईल )
आपल्याला वाटते तितकी ती सगळीच माणसे काहि कलाप्रेमी नसतात. तसे त्या सगळ्याना एकाच मापात तोलणेहि योग्य नाही. त्यांच्याकडेहि प्रातिय मतभेद आहेतच. माझे मित्र मुद्दाम मल नकाश्यात आपले गाव दाखवायचे. आणि त्यांच्यातहि कंपुशाहि होतीच.
आपला फ़्रेंचपणा ते अखंड बडबड करुन आणि स्त्रीलंपटपणा करुन सिद्ध करत असत. ईंग्लिश बोलायला त्याना थोडा प्रयत्न करावा लागत असे. पण एकदा का त्यांच्या भाषेत बोलायला लागले कि तोंड मिटण्याचे नाव घेत नसत. त्या भाषेला एक लय आहे. ( आपल्या दादरा तालासारखी. ता धिन ना धा तिन ना, अशी ) थोडक्यात बोल, हा शब्दप्रयोगच नाही बहुदा त्यांच्या भाषेत.
काहि काहि उच्चार त्याना अजिबात जमत नसत. च हे अक्षर त्याना उच्चारताच येत नसे. त्याना नायजेरिया हा शब्द पण उच्चारता येत नसे, त्याचा उच्चार ते निजेरिया, असा करत असत. माझ्या नावाचाहि उच्चार त्याना जमत नसे, मला ते देनिश अशीच हाक मारत असत.
मुळात त्याना मैत्रीची सवयच नसते. कौटुंबिक बंध पण फार दृढ असावेत, असे वाटले नाही. त्यामुळे माझ्या दोस्तीने ते हरखुन जात असत. पॅरिसला गेले, कि हटकुन माझ्यासाठी काहितरी भेट आणत असत.
एकंदर सेक्स च्या बाबतीत तर ते खुपच ढिले असायचे. आपल्यासारख्याने सहज कुठल्याहि टपरीवरचा चहा प्यावा, तसे ते कुणाहि काळीच्या मागे लागत असत. कुठल्याहि वयाचा माणुस याला अपवाद नसे. आपण ईथे जे फ़्रेंच सिनेमे बघतो, ते त्यांच्याकडचे ऊत्कृष्ठ असतातहि पण तिथे तयार होणारे गल्लाभरु सिनेमे मला पाहता आले, आणि बहुतांशी सिनेमाचा विषय सेक्सशीच निगडित असायचा. आपल्याला कल्पनाहि करता येणे अशक्य व्हावे, असे नातेसंबंध त्यात असत.
मला लिखित फ़्रेंच थोडीफार कळत असली तरि बोलता यायची नाही आणि बोललेली फारशी कळायची पण नाही, तरिही मी फ़्रेंच आणि ईंग्लिश लोकामधे मी दुभाष्याची भुमिका निभाऊन नेत असे. माझ्या या कामगिरीवर दोन्ही पार्ट्या खुष असत.

आमच्या कंपनीत अनेक शेफ्स येत असत. काहि महिने थांबुन ते परत जात असत. आल्यावर हमखास माझ्याकडे जेवायला येत असत. मग कधीतरी माझ्यासाठी स्वता एखादा खास ब्रेड करुन आणत असत. हा एकच प्रकार मला आवडत असे. बाकि अंडे न वापरता त्याना काहि शिजवताच येत नसे.
त्यांच्या जेवणाची पद्धत पण सभ्य नाही. भले ते काटे चमचे वापरोत. पण ब्रेड मात्र हातानेच खातात. शिवाय जेवताना डिशभोवती भरपुर खरकटे करुन ठेवतात.

मुळात फ़्रेंच लोकाना सर्व्हिस हाच माझ्या कंपनीचा ऊद्योग होता. पण नायजेरियन अणि फ़्रेंच, सर्वच बाबतीत एकेमेकांपासुन वेगळे असुनहि, परस्परपुरक असत.

आमच्या प्रत्येक साईटवर एक फ़्रेंच सुपरवायझर कायम असे. त्याच्या सोबतीला एखादा शेफहि असे. बाकिचे कर्मचारी तिथले असत.
त्या साईटवर देखील गोरे तसेच स्थानिक लोकहि कामाला असत. खरे तर स्थानिक लोक काय काम करतात हाच मला प्रश्ण पडत असे. फ़ोर्कादोस ईथे आमची मोठी साईट होती. तिथे गोरे आणि काळे यांच्या जेवणाची व्यवस्था वेगळी असे. हा वर्णद्वेषाचा प्रकार नव्हता. एकमेकांचे खाणे एकमेकाना रुचणार नाही, म्हणुनच हि व्यवस्था. तिथे जेवणाची वेळ होईपर्यंत तिथले कर्मचारी नुसते खेळत असत. आमचा कॅफेटारिया आतुन बंद केलेला असे. जेवणवेळ झाली कि ते दार आतुन ऊगह्डुन एक माणुस पळत जात असे, मग ते सगळे झुंडीने आत शिरत. त्याना वाढायला भक्कम जाळीचे पार्टिशन होते, तरिहि जास्त वाढ करत त्यांचा रोजचा दंगा चालत असे. आणि त्या सगळ्याना तोंड द्यायचे काम, एकटा फ़्रेंच माणुस करत असे.
तिथले काहि स्थानिक मात्र खरोखर हुषारीने काम शिकत असत. आमच्या साईटवरच्या कितीतरी मुली. दोन हाताच्या तळव्यावर दोन आणि हातावर दोन अश्या चार चार डिशेश एकावेळी नेऊन, एक टेबल सर्व्ह करत असत. शिवाय ईतक्या सगळ्या लोकांच्या आवडीनिवडी त्या अचुक लक्षात ठेवत असत. काहि काहि लोक फ़्रेंच कुकिंग पण शिकुन घेत असत. हाऊसकिपिंग, बेड तयार करणे, हे पण त्या छान करत असत.

साईटवर देखील चोर्‍या मार्‍या होतच असत. खाण्यापिण्याच्या वस्तुंची तेवढी फिकिर नसायची, पण ते लोक किचनमधील सामानहि पळवायचे. चोर्‍या करायच्या वेगवेगळ्या आयडियाज ते शोधुन काढत असत. एक माणुस तर ऊंची दारुमधला एक पेग काढला, कि त्याच्या अर्धे पाणी त्यात मिसळुन ठेवायचा. असे बरेच दिवस चालले होते.

प्रत्यक्ष नायजेरियात फार कमी पण आजुबाजुच्या घाना, गेबॉन, आयव्हरी कोष्ट सारख्या देशातील फ़्रेंच शिकलेले लोकहि आमच्या कंपनीत होते. पण त्यांचा तोंडावळा एकसारखाच असल्याने, ते पटकन लक्षात येत नसे. ( पण त्याना ईमिग्रेशनचा त्रास नसायचा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या न्यायाने, ते अरे ला कारे करत असावेत. )

गावात काहि लेबनानी लोकांची सुपरमार्केट्सहि होती. ते लोक मात्र नायजेरियन्स ना पुरुन ऊरले होते. भारतीयांपैकी गुजराथी व्यापारी कुठे दिसले नाहीत. थोडीफार आशियायी दुकाने होती, ती सिंधि लोकानी चालवलेली होती. सिंधि लोकाना, तशी नाव घेण्यासारखी मायभुमिच नसल्याने, जिथे गेले तिथे अंगभुत कौशल्यावर टिकुन राहिले.

तिथेहि भारतीय सरकारतर्फे शाळा चालवली जात होती. एका वर्गात सहा सातच मुले असायची. पण सिलॅबस ईथलाच होता. अधुन मधुन भारतीय कलापथके पण येत. पण असे प्रसंग अगदीच विरळा.

अपुर्ण




Tuesday, June 27, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहज गुगलवर बघत होतो, पोर्ट हारकोर्टबद्दल आणखी काहि माहिती मिळतेय का ती
काय सापडले माहितीय ? हे बघा
http://www.world66.com/africa/nigeria/portharcourt/getting_there
हा, हा, हा !!!



Wednesday, June 28, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठल्याहि देशात आम्हा पुरुषांचा एक प्रॉब्लेम असतो तो केस कापण्याचा. एखाद्या गावात गेल्यावर आधी सलुन कुठे आहे त्याचा शोध घ्यावा लागायचा.
पोर्ट हारकोर्टमधे असे सलुन कुठे दिसतच नव्हते. शेवटी ड्रायव्हरच्या मागे लकडा लावला. खरे तर आपले केस कापणे हे तिथल्या कारिगराना आव्हानच असते. विनोद नव्हे, कारण त्याना सवय असते ती आफ़्रिकन केस कापायची. त्यात सुद्धा प्रत्येकाचा चमनगोटाच करायचा असल्याने, त्यात काहि कौशल्य लागायचे नाही. पण आपले केस कापणे त्याना जमत नाही.
मी त्यावेळी नविनच होतो, त्यामुळे माझ्या ड्रायव्हरला माझा स्वभाव माहित नव्हता. त्याने आपले नेले मला एका ठिकाणी. तिथे चक्क एक बाई केस कापायला होती. आणि अर्थातच खात्या पित्या घरची होती ती. तिचे अघळपघळ स्वागत बघुन जरा चरकलोच होतो. दुकानात एकच खुर्ची होती. बाहेरुन काहि ते सलुनसारखे दिसतहि नव्हते.
भारतातल्या सलुनमधे खुपदा मायापुरी, आणि स्क्रीन सारखी पुस्तके पेपर्स टेवलेले असतात. तिथे ” खास ” फ़्रेंच पुस्तके होती. पण बाकि कुणीच नसल्याने. मला खुर्चीवरच घेतले. गळ्याभोवती कापड बांधताना. हात जरा जास्तच सलगी करु लागले. मग केस कापतानाहि तसेच प्रकार सुरु झाले. तिरुपतिला गेल्यावर कसे डोक्यावर मधोमध वस्तरा फिरवुन अडवुन ठेवतात, तसा मी अडकलो होतो. मी मुद्दाम शिंकुन, खोकुन, डोळे चोळुन लटका निषेध व्यक्त करतच होतो. ” मदामु कट ओन्ली लिटील लिटील ” असे सांगुन सुटका करुन घेतली. तरी तिने विचारलेस ” ओगा यु नो डे लाईक माय स्टाईलो ” मी म्हणालो, ” मदामु वॉंट कम अगेन अगेन ” तिच्याकडुन सुटका झाल्यावर मात्र मी दुसर्‍या दिवशी ड्रायव्हरला, पुरुष कारागिर शोधायला पाठवले, शेवटी त्याला, शेल कंपनीत असा कारागिर भेटला, आणि शेवटपर्यंत मी त्याच्याकडुनच केस कापुन घेतले.

%&%&%&

माझे अनेक भारतीय मित्र एकटेच रहात होते. ज्याना थोडेफार जेवण करता येत असे, त्यांचे ठिक होते. पण बहुतेकजणाना मेडच्या हातचे जेवण जेवावे लागे. त्या भेंडीची पातळ भाजी करुन त्यात मायाळु घालुन ठेवत आणि फ़्राईड राईस करायला सांगितला तर कच्चा तांदुळ तळुन देत असत. ज्या मित्रांच्या बायका होत्या, त्या आल्या कि मेडला आपले पदार्थ शिकवणे हा ऊद्योगच असायचा. आणि त्यापण त्यातल्या त्यात सोपी वाटणारी भाजी वैगरे शिकुन घ्यायच्या. मग कधी वांगी सप्ताह तर कधी बटाटे सप्ताह.

दिवसभर घर त्यांच्याच ताब्यात असल्याने त्यांचेच राज्य असायचे. सांगकाम्याच असायच्या त्या. काहि तर चक्क झोपा काढायच्या. एकदा तर एका मित्राच्या मेडने फ़िल्टरमधे साबणाचे पाणीच भरुन ठेवले. तो मित्र बिचारा आठवडाभर तेच पाणी पित होता. ( त्याचे काय झाले असेल, ते जाणकार जाणतीलच. )

%&%&%&

नायजेरियात ” सॅनिटेशन ” नावाचा सरकारी उपचार असायचा. तसा नीट अर्थबोध व्हायचा नाही, तुम्हाला.
सॅनिटेशन म्हणजे सरकारी साफसफाई. साधारणपणे दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सकाळी, सकाळी नऊ ते अकरा. वाजेपर्यंत हे सॅनिटेशन चालायचे. दुसरा आणि चौथा शनिवार असा काहि नियम असायचा असे नाही. कधी कधी ते अनपेक्षितपणे रद्द व्हायचे तसेच अनपेक्षितपणे जाहिरहि व्हायचे. तिथे पावसाने, घराभोवती, रस्त्याभोवती भरमसाठ झाडे वाढत असत. ती तोडुन साफसफाई करावी. आणि कचरा वैगरे काढुन टाकावा, अशी अपेक्षा असायची. या काळात कुणालाहि रस्त्यावर येऊ दिले जात नसे. गाडीहि रस्त्यावर आणता येत नसे, जर कुणी आलेच तर त्याला पकडुन रस्ता झाडायला लावत.
पण या घोषणा आम्हाला कळत नसत. त्या स्थानिक रेडिओवरच दिल्या जात असत. आमचे ड्रायव्हर ते सांगत यायचे. मग आम्हाला पर्वणीच असायची. मस्तपैकी कॉफी पित एखादा सिनेमा वैगरे बघत बसायचो. आणि अकरा नंतर कोण कश्याला ऑफ़िसमधे जाईल. मी घरीच लॅपटॉपवर काम करत बसायचो.
यात नेमकी किती साफसफाई व्हायची याची कल्पना नाही, पण नवख्या माणसाला लुबाडायची संधी मात्र तिथल्या पोलिसाना मिळायची. वेल, त्या अर्थाने ती ” साफसफाई ” च होती.

%&%&%&

भरपुर पावसाने तिथे आजुबाजुला झाडे मात्र भराभर वाढत असत. आपल्याकडे कण्हेरी, टिकोमा सारखी झाडे दहा बारा फुटांपेक्षा जास्त वाढत नाहीत, तिथे मात्र ती सहज वीस फुटांपर्यंत वाढायची. आपल्याकडे जमिनीवर लोळणारी लाजाळु तिथे तीन चार फुट वाढायची.
गावाबाहेर पडले कि जंगली झाडे जास्तच दिसु लागत. आपल्याकडे रस्त्याच्या बाजुला साधारण तीन चार फुट झाडे दिसत नाहीत. तिथे ती अगदी रस्त्याला लागुनच असत. समोरुन येणार्‍या गाडीला टाळण्यासाठी वा खड्डा चुकवण्यासाठी गाडी जरा बाजुला घेतली तर गाडीच्या काचेला ती झुडुपे घासुन जात असत.

खड्डे तर अगणित असायचे. आणि ते पाण्याने भरलेले असायचे. भरपुर खोल असायचे त्यामुळे त्यातुन गाडी चालवणे कौशल्याचेच काम असायचे. अगदी सहासात किलोमीटरपर्यंत अशी रस्त्याची वाताहात झालेली असायची आणि त्यातुनच मोठेमोठे ट्रेलर्स जात असल्याने, चिखलाचा नुसता राडा झालेला असायचा. पण आमचे ड्रायव्हर्स मात्र कुशल असायचे.

तिथे शेतीभाती फारशी दिसायची नाही. पण घराच्या आवारात भरपुर फळझाडे दिसायची. तिथल्या ऊष्ण हवामानात होणारी झाडे तर असतच. पण द्राक्ष आणि पीचची झाडे पण दिसत असत. आंबे, फणस, काजु, यांची पण झाडे दिसत. पण आपल्यापेक्षा ती खुपच अवाढव्य वाढलेली असत.

%&%&%&

तिथली माणसेच नव्हे तर जनावरे पण चोर्‍या करण्यात पटाईत असत. आमच्या ऑफ़िसला सगळीकडुन मोठे भिंतीचे कुंपण होते. पण पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी मोठे मोठे झरोखे होते. आजुबाजुची माणसे त्या झरोख्यातुन आपल्ल्या बकर्‍या आमच्या ऑफ़िसमधे चरायला सोडत. ( तिथल्या बकर्‍या आपल्या बकर्‍यांपेक्षा बर्‍याच बुटक्या असतात. ) सकाळीच डिसपॅच करण्यासाठी म्हणुन बाहेर काढुन ठेवलेली भाजी वैगरे त्या फस्त करुन जात असत. आणि सकाळी आमची चाहुल लागली, कि पटापट त्या झरोख्यातुन पसार होत असत.

%&%&%&

कडक ऊन्हामुळे मी दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळतच असे. माझे सहकारी मात्र खुषाल बाहेर जात असत. मी त्याना म्हणायचो, कि काळ्यानो तुम्हाला ऊन्हापासुन दैवी संरक्षण आहे. ( त्याना काळे म्हणवुन घेण्यात कसलाच कमीपणा वाटत नाही )
माझ्या या टोमण्याची परतफेड एकदा अचानक झाली. एकदा सहकार्‍यांबरोबर कोल्ड स्टोरेजमधला स्टॉक घेत होतो, तर ते काळे, एखादा आयटम वा स्टॅक मोजुन बाहेर पळत असत. मी चिडुन म्हणालो, कारे काम करा कि जरा, मीपण आहे ना तुमच्याबरोबर. तर मला उत्तर मिळाले, ” नो वहाला डे फ़ॉर यु ओगा. यु डे ओईबो. ” ( अर्थ : तुला कसा त्रास होणाराय थंडीचा. गोरा ना तु. ? )

अपुर्ण




Thursday, June 29, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या कंपनीचा त्यावेळी भारतात काहिच कारभार नव्हता. त्यामुळे व्हिसा वैगरे सगळे मलाच बघावे लागे. नायजेरियाची एंबसी आहे दिल्लीला. आणि व्हिसा मिळायचा तो फक्त सहा महिन्यासाठी. त्यामुळे मला प्रत्येकवेळी दिल्लीला जाऊन व्हिसा काढावा लागे. ( एक रात्र पोर्ट हारकोर्टात, पुढची रात्र विमान, पुढची रात्र झुरिखमधे, त्यानंतरची रात्र परत विमानात, मगची रात्र मुंबईत आणि त्यापुढची दिल्लीत असे अनेकवेळा मी केले आहे. आणि जुन महिन्यात तर पोर्टमधला ओला ओन्हाळा, युरपमधला समर, मुंबईतला पावसाळा आणि दिल्लीतला कोरडा उन्हाळा असे सगळे ऋतु अनुभवायचो मी. )
या व्हिसाच्या गडबडीत मला अनेकवेळा तारेवरची कसरत करावी लागायची. व्हिसा संपायच्या आत मला नायजेरियाबाहेर पडावे लागे. एकदा असेच, मी भारतात यायला निघणार होतो, त्या दिवशी नेमके चार्टर्ड फ़्लाईट रद्द झाले. मला लेगोसला पोहोचुन विमान पकडणे अत्यंत गरजेचे होते. दुसर्‍या विमानांची तिकिटे काढायला आणखी दुर जावे लागणार होते, शिवाय ती मिळतील आणि मिळुनहि विमान उडेल याची खात्री नव्हती.
माझ्या ड्रायव्हरने गाडीने लेगोसला जायचा पर्याय सुचवला. त्याने आधी कधीही हा प्रवास केला नव्हता. रस्ता विचारत जाऊ असे म्हणण्याआधी रस्ता आहे का, याची पण खात्री नव्हती. पण केवळ माझ्यासाठी तो तयार झाला. हे वेडे साहस असणार आहे याची आम्हा दोघानाहि कल्पना होती. वाटेत कुठेहि गाडी थांबवणार नाही. खिडकिची काच अजिबात खाली करायची नाही अश्या अनेक अटि त्याने मला घातल्या. प्रवास दिवाऊजेडी करायचा असल्याने, मला तितकिशी भिती वाटत नव्हती.
एकंदर सात तासाचा प्रवास होता तो. वाटेत वारी नावाचे गाव लागते. तिथे आमची साईट होती. त्यामुळे तिथपर्यंतचा रस्ता माहित होता. माहित होता म्हणजे किती खराब आहे तो माहित होता. गचके खात, आम्ही तिथे पोहोचलो. तिथल्या सुपरवायझरने पण आमच्या साहसावर आश्चर्य व्यक्त केले. पण आमचा निर्धार कायम होता.
तिथुन पुढे अंदाजानेच जावे लागत होते. रस्त्यावर पाट्या वैगरे फारश्या नव्हत्या. वस्तीहि कुठे दिसत नव्हती आणि दिसली तरी तिथे थांबायची आमची तयारी नव्हती. तुरळक घरे दिसत. शेती वैगरे दिसत नव्हती. अधुन मधुन नद्या ओलांडत होतो. रस्ता अगदी वाईट नव्हता. खरेतर वारीपर्यंतच्या रस्त्यापेक्षा बराच होता. तिथे डोंगर वैगरे नसल्याने, रस्ता अगदी सपाटच होता, कुठेहि चढण ऊतरण नव्हती. पण आजुबाजुला मात्र बहुतांशी हिरवेगार जंगल दिसत होते. आपल्याकडच्या जंगलाचे दृष्य मला परिचित आहे. बरिचशी झाडेहि ओळखता येतात. पण तिथे मात्र ओळखीची झाडे फारच कमी दिसत होती. अगदी वेगळ्याप्रकारची पाने, आकार मला दिसत होते. माझा वेळ अगदी मजेत जात होता. खुपदा काहि ठिकाणी थांबायचा मोह व्हायचा. पण ड्रायव्हर खुपच तणावाखाली चालवत होता. विमानाची वेळ गाठुन द्यायचीच असे त्याने ठरवले होते.
वाटेत म्हणावे असे मोठे गाव लागत नव्हते. मग अचानक थोडी घरे दिसु लागली. ते गाव होते बेनीन सिटी. ( बेनीन देश वेगळा ) रस्त्यातच माणसे असल्याने वेगावर निर्बंध आले. माझ्या ड्रायव्हरने जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरवात केली. त्याने त्यातली काहि माणसे बिथरली. काहिजण गाडीवर काचेवर हात मारु लागले. मग माझ्या एकदम लक्षात आले कि संपुर्ण प्रवासात मला गाडी दिसली नव्हती. अगदी विरुद्ध बाजुने येणारिहि नव्हती. फक्त काहि ट्रक्स, टॅंकर्स दिसले होते तेवढेच.
बेनीन सिटीत एक कॉलेज दिसले. तिथल्या मुलांचा युनिफ़ॉर्म काय होता माहित आहे, जांभळा शर्ट आणि गुलाबी पॅंट. अगदी अनोखे दृष्य होते ते. बाजारातुन जाताना अनेक प्राणी, पक्षी मारुन टांगलेले दिसत होते. कोंबड्या वैगरे ते चक्क गाडीच्या काचेजवळ आणत होते. एकाने तर पिवळाधम्मक अजगर, तोहि जिवंत विकायला आणला होता. त्या सगळ्या गराड्यातुन आम्ही घाईने बाहेर पडलो. मग मात्र रस्ता सरळ लागला. त्यांचा हायवे वैगरे असावा. पण कुठेहि पाट्या नव्हत्या, त्यामुळे अजुन किती अंतर राहिलेय, ते कळतच नव्हते. पण शेवटी आम्ही लेगोस गाठलेच. तो प्रवास माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रवास होता. मी सारथ्याला तसे सांगितले, तर तो हसुन म्हणाला, ओगा यु डे मॅडो. ( अर्थ तु ठार वेडा आहेस ) अर्थात हे त्याने सांगायची गरज नव्हती.

%&%&%&

असे काहि प्रसंग लक्षात ठेवण्याजोगे घडले तरी आम्हा सगळ्याना विचलीत करणाराहि एक प्रसंग घडला.
संदीपच्या कंपनीतील सगळेच माझे मित्र झाले होते. तिथे असणार्‍या कारखानीस यांच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आम्ही साजरा करणार होतो. त्यासाठी काकि खास तिथे आल्या होत्या. संध्याकाळी पार्टी होती आणि त्यासाठी तयारी करायला त्यानी मला दुपारीच बोलावले होते.
मी त्यांच्या आवारात शिरलो आणि गेटवर नोंद करतच होत तेवढ्यात एक गाडी माझ्या मागोमाग जोरात आवारात शिरली. गाडीत कोणीतरी खिडकिबाहेर पाय काढुन झोपले होते. मला जरा ते विचित्र वाटले पण तरिही तिकडे दुर्लक्ष करुन मी आधी संदीपकडे गेलो. त्याला म्हणालो, कि तुमच्या कंपनीत एक गाडी शिरताना बघितली. तो जेऊन परत ऑफ़िसला जातच होता, बघतो म्हणाला. मी कारखानीसांकडे गेलो. आम्ही जेवायला बसलो. ते दोघे त्यांच्या लग्नाच्या पंगतीची आठवणी सांगत होते.

तेवढ्यात संदीप तिथे आला आणि म्हणाला, कि सिंगसाहेबाना हॉस्पिटलमधे ठेवलेय. ते दोघे निघुन गेले, आणि आम्ही पार्टीच्या तयारीला लागलो.
जेवण वैगरे झाले, तयारी करुन सगळ्यांची वाट बघत बसलो. तरी कुणीच येत नव्हते. मग कळले सगळे सिंग नावाच्या माणसाला, बघायला हॉस्पिटलमधे गेलेत. सिंग तिथुन रिटायर होऊन, भारतात परत जाणार होते, असे मला काकीनी सांगितले.

मग हळु हळु ते सगळे परत आल्यावर आम्हाला त्या अपघाताची बातमी कळली. सिंग पतिपत्नी आणि त्यांची दोन तरुण मुले. साठवलेले पैसे घेऊन सोने, डॉलर्स वैगरे आणायला बाहेर गेले होते. आम्हाला ड्रायव्हरशिवाय बाहेर जायची परवानगी नव्हती, आणि नेमका त्यांचा ड्रायव्हर जागेवर नव्हता. पण तरिही त्यानी हट्ट सोडला नाही. खुप दिवसानी गाडी चालवायला मिळाली या एक्साईटमेंटमधे त्यानी गाडी जोरात चालवली आणि नेमके नियंत्रण सुटुन गाडी ऊलटली. बराच वेळ ते गाडीतच अडकुन पडले होते. त्यांच्या सुदैवाने एक भला नायजेरियन तिथुन जात होता. त्याने त्याना हॉस्पिटलमधे पोहोचवले. मुलाना बर्‍याच जखमा झाल्या होत्या. पण त्या हॉस्पिटलमधे कसल्या सुविधाच नव्हत्या. त्या मुलाना कसलिही भुल न देता, तसेच टाके घातले, आणि त्यातल्या एकाला घेऊन, तो माणुस तिथे पोहोचला होता. ( मला दिसलेला माणुस तोच होता. )

श्री सिंग बेशुद्धच होते. त्याना बराच मारहि लागला होता. सौ. सिंग याना मानेला मागे जोरदार मार लागल्यामुळे त्यांच्या सर्व संवेदनाच नष्ट झाल्या होत्या. त्या व्यवस्थित बोलु शकत होत्या. पण त्याना कुटुंबातील ईतर सदस्यांची काहिच खबर दिली नव्हती. त्या हॉस्पिटलची कंडिशन ईतकी वाईट होती कि औषधे तर सोडाच, साधा पंखाहि नव्हता तिथे.
आमच्या पार्टीचा विरसच झाला होता. पण अन्न फुकट जाऊ नये, म्हणुन सगळे बळेबळेच खात होते.
दुसर्‍या दिवशी सगळ्या बायकाना पण सौ सिंगना बघायला जायचे होते. सगळ्या लहान मुलाना घेऊन, मी आमच्या घरी आलो. ( तरी त्यातली एक छोटी पोरगी म्हणालीच कि आम्हाला हॉस्पिटलमधे जायचेय. आम्हाला रक्ताची वैगरे भिती वाटत नाही, आम्ही टिव्हीवर सगळे बघतो. !!! ) तिथुन ते सगळे माझ्या घरी आले तर सौ. सिंग गेल्याच होत्या. श्री सिंग अजुनहि बेशुद्धच होते. आईचे अंत्यसंस्कार करण्यापुरता मुलगा ऊभा राहिला.
श्री. सिंगना तिथे कुठलेहि ऊपचार मिळण्याची शक्यता नव्हती. त्याना भारतात आणणेहि शक्य नव्हते. त्यांच्या कंपनीने बरेच प्रयत्न करुन, साऊथ आफ़्रिकेतील, डॉक्टर्स विदाऊट बॉर्डरशी संपर्क साधला. त्यांच्यासाठी खास विमान मागवले. पोर्टला नाईट लॅंडींगची सोय नव्हती, तरिहि कसेबसे ते विमान ऊतरले, आणि श्री सिंगना जोहान्सबर्गला नेण्यात आले. पण तिथेहि ते जगु शकले नाहीत. या प्रसंगाने, आम्हा सगळ्यांचा तिथे राहण्याचा मुडच गेला. आता जुन्या मित्रांपैकी कुणीच तिथे नाही.

%&%&%&

आता नायजेरियाची परिस्थिती कशी आहे. खरेच कळायला काहि मार्ग नाही. कुठे काहि वाचनातहि येत नाही. अधुन मधुन काहि रिक्रुटमेंटच्या जाहिराती वाचतो. म्हणजे अजुनहि तिथे लोक जात आहेत तर.
खनिज तेलाचा भरपुर साठा असुनहि त्या देशात काहिहि सुधारलेले दिसत नाही. पण भारतीय अजुनहि तिथे जातात. म्हणजे नोकरीच्या संधी आहेत.
पण किती दिवस हा खनिज तेलाचा साठा पुरणार आहे ? याच संपत्तीच्या जोरावर आखाती देशानी किती प्रगति केलीय ते मी बघितले आहे. अमरातीत तर आता खनिज तेलावरचे अवलंबित्व फारच कमी झालेय. निव्वळ व्यापार आणि पर्यटन यावर त्यांचे व्यवस्थित चाललेय.
मग नायजेरियात का नाहि असे होवु शकले. निसर्गाचे वरदान आणि भ्रष्ट राजकारण्यांचा शाप यात तो देश भरडुन निघतोय. लचके तोडायला गोरे आहेतच.

%&%&%&

इतके लिहु शकेन असे आधी वाटलेच नव्हते. लिहित गेलो तसे आठवत गेले.
तुमचा भरभरुन प्रतिसाद मिळाला, त्याने आणखीनच हुरुप आला.
आता मात्र हे लेखन इथेच थांबवतो.

थोडी विश्रांति घेऊ. मग आणखी एक देश बघु.

आपलाच,

दिनेश




Friday, June 30, 2006 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या काकु, म्हणजेच कुंदा महादेवकर आणि मी, फोटो नलिनीने काढलाय.
kk


Sunday, July 02, 2006 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे वडील माझ्या जन्माच्या आधी एकदा खुप आजारी पडले होते. त्यावेळी आमचे कुणीच नातेवाईक मुंबईत नव्हते, त्यावेळी राजापुरच्या श्री धूतपापेश्वर देवाने, त्याना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. तेंव्हापासुन आमच्या घरी हाच देव पुजला जातोय. मला मात्र दर्शनाचा योग आज पहिल्यांदाच आला. या देवाचे प्रचारातले नाव. धोपेश्वर. खुप पुरातन देऊळ आहे. लाकडी कोरीवकाम खुप सुंदर आहे. पुर्वी घाटी ( हा खास कोकणी शब्द ) चढुन जावे लागायचे, आता थेट रस्ता झालाय.
dh


Sunday, July 02, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या देवळाचा परिसर पण खुप रम्य आहे.

prs


Sunday, July 02, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे मुख्य आकर्षण म्हणजे ईथले धबधबे, हा देवळाच्या मागचा

dh


Sunday, July 02, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हा देवळाशेजारचा

db


Sunday, July 02, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी नजर नेहमी रानफुलाना शोधत असते या दिवसात सगळे हिरवेगार आहे. फुले मात्र फारच कमी. हि आहेत करटोलीची फुले. सध्या हिच आहेत सगळीकडे.

kr


Sunday, July 02, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेरड्याची रोपे नुकतीच उगवली आहेत. पण त्यापुर्वी फुललाय तो कप्रु चा नाजुक गुलाबी फुलोरा.

kp


Sunday, July 02, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि वर नजर टाकली तर कदम्बाचा राजसवृक्ष बहरलेला दिसलाच. सगळ्या अवस्था सादर करतोय. हि आहे " कलिका "

kb1


Sunday, July 02, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हे आहे उमलु लागलेले " फुल "

kb2

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators