Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 12, 2007

Hitguj » Views and Comments » General » टेनीस .....Greatest Ever!! » Archive through June 12, 2007 « Previous Next »

Mukund
Thursday, May 03, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मे महीन्याची सुरुवात झाली... म्हणजे रोलॅंड गॅरस वरच्या तांबड्या मातीतली फ़्रेंच ओपन टेनीस स्पर्धा जवळच आली..:-)

का कुणास ठाउक.. टेनीस मधे चार सो कॉल्ड ग्रॅंड स्लॅम स्पर्धा असल्या तरी ऑस्ट्रेलियन ओपनचे एवढ महत्व वाटत नाही... दुर्लक्षीत झालेले सावत्र मुल.. असेच त्या स्पर्धेबद्दल वाटते.. पण फ़्रेंच ओपन, विंबल्डन व यु एस ओपन या तीन स्पर्धांचे अप्रुप काही वेगळेच आहे. फ़्रेंच ओपनच्या निमित्ताने या महिन्यात त्या स्पर्धेबद्दल थोडा उहापोह आपण टेनीस प्रेमी इथे करुयात असे मला वाटले.

माझ्या या स्पर्धेबद्दलच्या पहिल्या आठवणी म्हणजे १९७४ ते १९८१ दरम्यान ६ वेळा ही स्पर्धा जिंकुन बोर्गने केलेला विक्रम! त्या दरम्यान मला खास आठवतो तो म्हणजे १९७८ चा अंतिम सामना... त्या वर्षीचा फ़ुटबॉल विश्वकरंडक अर्जेंटिनामधे होता व अर्जेंटिनाने फ़ुटबॉलमधे विश्वकरंडक जिंकण्याच्या शक्यतेमुळे अर्जेंटिनाबद्दल एक कुतुहल माझ्या मनात आले होते व त्यामुळे फ़्रेंच ओपन फ़ायनलला बोर्गसारखाच लांब केसांचा व डोक्याला पट्टी बांधणारा अर्जेंटिनाचा गुलेर्मो विलास पाहुन तो सामना मी खुप मन लावुन पाहीला.पण बोर्गने त्याचा सहज पाडाव केला. वास्तवीक पाहता गुलेर्मो हा क्ले कोर्ट स्पेशलीस्ट होता व चार वेळा फ़ायनलला जाणारा व आदल्या वर्षीचा विजेता होता पण बोर्ग त्या काळात एका वेगळ्याच पातळीवर खेळत असल्यामुळे( सध्याच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट टिम सारखा!)रोलॅंड गॅरसच्या तांबड्या मातीवर तो त्या काळात हरणे अशक्यच होते.. इतके त्याचे या स्पर्धेवर वर्चस्व होते. फ़्रेंच ओपनवर बोर्गसारखे निर्विवाद वर्चस्व अजुनपर्यंत कोणीच गाजवले नाही. चारवेळा सोडाच! पण लागोपाठ तिन वेळा पण ही स्पर्धा अजुन कोणी जिंकली नाही. पण या वर्षी नादाल तसे करण्याची दाट शक्यता आहे...

अशा रितीने सत्तरीच्या दशकात बोर्गने या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. त्याच्या १९८१ च्या शेवटच्या अंतिम सामन्यात त्याने एका खेळाडुला हरवले खरे.... पण तो सामना बघताना हरणारा खेळाडु मला खुप प्रभावित करुन गेला व त्या खेळाडुने त्या सामन्यात अजिंक्य बोर्गला जवळजवळ पदच्युत केले होते.... बोर्ग हरता हरता वाचला होता....तो खेळाडु पुढे ८० च्या दशकात या स्पर्धेवरच नव्हे तर जगभर टेनीसमधे वर्चस्व गाजवुन गेला... तो खेळाडु होता इव्हान लेंडल! पुढची ९ वर्षे ही स्पर्धा लेंडल व स्वीडनचा अजुन एक चांगला खेळाडु जो बोर्गनंतर उदयास आला.. मॅट्स विलॅंडर....या दोघांनीच डॉमीनेट केली. १९८२ ते १९८९ पर्यंत ही स्पर्धा या दोघांनी आलटुन पालटुन जिंकली... अपवाद होता १९८३! त्या वर्षी फ़्रांसचा स्वत्:चा खेळाडु.. यान्निक नोहा.. याने ती स्पर्धा जिंकली. त्याच्या केसांमुळे यान्निक नोहा माझ्या लक्षात राहीला.

पण ८० चे दशक जरी लेंडल व विलॅंडर यांनी रोलॅंड गॅरस वर गाजवले तरी फ़्रेंच ओपनच्या त्या दशकाला एक कंटाळवाणे दशक म्हणुन सगळ्यांनी पाहीले. त्याचे मुख्य कारण म्हणजे लेंडल व विलॅंडर यांचा कमालीचा अचुक खेळ! जणु काही दोन टेनीस मशीन खेळत आहेत असेच त्यांच्या लॉंग रॅलीज मुळे वाटायचे. त्या दोघांच्या खेळात कमालीचे सातत्य होते व दोघांचा स्टॅमीनाही जबरदस्त होता. माझ्या मते लेंडल इतका फिजीकली फ़िट खेळाडू मी टेनीसमधे कधीच पाहीला नाही! कधी कधी त्यांचे रॅलीज ३०-३० ते ४०-४० फटक्यांपर्यंत चालायचे. त्या तांबड्या मातीवर घसरून बॉलपर्यन्त कसे पोहोचायचे ते कौशल्य लेंडलने सगळ्या जगाला दाखवुन दिले.

१९८९ लक्षात राहीले ते एका १७ वर्षाच्या चायनीज अमेरीकन खेळाडुमुळे... मायकेल चॅंग! अंतिम फेरीत त्याने चक्क एडबर्ग ला हरवले! तेवढेच नाही तर अंतिम फेरीत पोहोचायच्या आधी दुसर्‍या फेरीत त्याने सॅंप्रासला व चौथ्या फेरीत चक्क लेंडलला हरवले होते! आणी अंतिम फेरीत त्याचा तो प्रत्येक बॉलचा वेगात धावुन..... रोलॅंड गॅरसच्या तांबड्या मातीत..... बुट घसरवत केलेला पाठलाग मी कधीही विसरणार नाही.... पण हा चॅंग पुढे ऍगॅसी व सॅंप्रासच्या पुढे अगदीच फिका पडला....

९० चे दशक हे बंच ऑफ़ अननोन खेळाडुंनी ही स्पर्धा जिंकुन गाजवले. त्यात सर्जे ब्रुगेरा व जीम करीअर यांनी ही स्पर्धा दोनदा जिंकुन व गुस्टाव्हो क्युरीटन या अतिशय किडमिडीत खेळाडुने ३ वेळा ही स्पर्धा जिंकुन आपले नाव कमावले.पण त्या विजेत्यांमधे ७० आणी ८० च्या दशकातल्या महान खेळाडुं सारखा दम नव्हता अस मला नेहमीच वाटले.

आणी आता या २००० च्या दशकात नादाल या स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवायच्या मार्गावर आहे. गेली दोन वर्षे ही स्पर्धा जिंकुन.... तेही गेल्या वर्षी रॉजर फ़ेडररला हरवुन.... त्याने या तांबड्या मातीवर
He is the player to beat! असे सिद्ध केलेले आहे. पण नादाल यायच्या आधी या दशकात पण गेल्या दशकाचाच सिलसिला सुरु राहीला व कोस्टा,फ़रेरो व गॅडीओ असे काही अनोळखी खेळाडू विजयी होउन गेले.

पण फ़्रेंच ओपन ही सपर्धा जरी लेंडल,विलॅंडर व बोर्ग या सारख्या विजेत्यांमुळे लक्षात राहीली तरी मी असे म्हणेन की लोकांच्या मनात ही स्पर्धा ज्या महान खेळांडुंना ही स्पर्धा कधीच जिंकता आली नाही त्या मुळे जास्त लक्षात राहते! आणी ही स्पर्धा न जिंकु शकणार्‍या खेळाडुंच्या नावाची यादी पाहीली तर विश्वासच बसत नाही! त्या यादीत टेनीसमधले बरेच अतिरथी महारथी आहेत.... पिट सॅंप्रास.... रॉजर फ़ेडरर.. जिमी कॉनर्स... जॉन मॅकेन्रो.. स्टिफ़ान एडबर्ग.... आणी बोरीस बेकर!
Can you believe it? त्यामुळे ही स्पर्धा जेव्हा प्रत्येक ब्रुगेरा किंवा कॅफ़ेल्नीकॉव्ह किंवा कार्लोस मोया जिंकतो.... तेव्हा मला असे वाटते की या महान खेळाडुंच्या ह्रुदयात घणाचे घाव बसत असतील... की कोण हे कुठले खेळाडु? आणी फ़्रेंच ओपन जिंकुन जातात! आणी आम्ही टेनीस मधले हुज हु असुनसुद्धा आम्हाला ही स्पर्धा जिंकता आली नाही... कमाल आहे!

म्हणुनच अजुन असे वाद होतात की सॅंप्रास किंवा रॉजर फ़ेडररला ग्रेटेस्ट एव्हर! असे म्हणता येणार नाही... कारण ते रोलॅन्ड गॅरसची तांबडी माती कधीच सर करु शकले नाहीत... म्हणुनच मला या स्पर्धेचे दरवर्षी अप्रुप वाटते... या वर्षी ही स्पर्धा कोणी नो-बडी जिंकणार की नादालसारखा खेळाडु बोर्ग्-लेंडल्-विलॅन्डरचा वारसा इथल्या तांबडमातीवर चालवणार की शेवटी एकदाची ही स्पर्धा जिंकुन फ़ेडरर ग्रेटेस्ट एव्हर म्हणुन स्वत्:ला सिद्ध करणार? पाहुयात....घोडा मैदान ३ आठवडेच दुर आहे..:-)

पुढच्या पोस्टींग मधे ख्रिस एव्हर्ट लॉइड(सात वेळा इथली चॅंपीयन व ९ वेळा अंतिम फेरीत जाणारी!) व स्टेफ़ी ग्राफ़(सहा वेळा इथली चॅंपीयन व तीही ९ वेळा अंतिम फेरीत जाणारी!) या दोन महान खेळाडुंच्या या स्पर्धेवरच्या प्रभुत्वाचा आढावा घेउ...


Mukund
Sunday, May 06, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल,अमेय,सिंड्रेला... धन्यवाद.

जसे बोर्ग,लेंडल व विलॅंडरने गेली तीन दशके फ़ेंच ओपन मधे गाजवली तसेच महिलांमधे ही तिन दशके तिन जणीनी गाजवली. या तिघींचे या स्पर्धेवरचे प्रभुत्व तुम्हाला एकाच आकडेवारीवरुन दिसुन येईल...१९७४ ते २००६ या ३२ वर्षात या तिघींपैकी एक तरी एकुण २४ फ़ायनल्स मधे खेळले होते...
amazing!आणी या तिघी म्हणजे ख्रिस एव्हर्ट, स्टेफ़ी ग्राफ़ व अरांचा सॅंकेज व्हीकारिओ...

मी जेव्हा टेनीस बघायचे सुरु केले तेव्हा पहिल्याच वर्षी मला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ख्रिस एव्हर्ट व मार्टिना नवरातिलोव्हा यांच्यातला सामना बघायला मिळाला. या दोन महान महिला टेनीस खेळाडुंमधला तो पहीला अंतिम सामना होता. हेच द्रुष्य जगभरच्या टेनीस शौकीनांना पुढची १२ वर्षे याच नाही तर इतरही ग्रॅंड स्लॅम फ़ायनलमधे बघायला मिळणार होते. टेनीसमधली एक ग्रेटेस्ट रायव्हलरी म्हणुन या दोघांकडे बघीतले जाते. विंबल्डनच्या फ़ास्ट सरफ़ेसवर मार्टीना विजयी होत गेली पण एक अपवाद सोडता या स्पर्धेत ख्रिस एव्हर्ट ने तिला नेहमीच पराभुत केले. का कुणास ठाउक.... पण मी तेव्हा लहान असुनसुद्धा मार्टीना पुरुषी दिसत असल्यामुळे प्रत्येक वेळेला ख्रिस एव्हर्टच....जी एका बाहुलीसारखी दिसायची... जिंकावी असे आम्हाला वाटायचे. आणी विंबल्डनमधे तसे व्हायचे नाही पण या स्पर्धेत मात्र ख्रिस एव्हर्ट जिंकायची...म्हणुनही मला ही स्पर्धा बघताना आनंद व्हायचा...:-)पण मार्टीनाला क्रेडीट दिलेच पाहीजे की हा तिचा आवडता सरफ़ेस नसुनसुद्धा तीही ६ वेळा अंतिम फेरीत आली होती व २ वेळा तिने स्पर्धा जिंकुन दाखवली.पण ख्रिस एव्हर्टचा नजाकती व ग्रेसफ़ुल खेळ माझ्या मनात कायमचा घर करुन गेला.तिने तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकली(तिचा हा पराक्रम अजुन अबाधीत आहे..) पण तिच्यामधे गर्वाचा लवलेशही नव्हता. प्रत्येक वेळेला ट्रॉफी वर उचलुन पोज देताना तिचे ते स्मितहास्य व विनम्रपणा मला खुप आवडायचा.

तिने १९८८ मधे निव्रुत्ती जाहीर केल्यावर मला खुप दु:ख झाले. गेली १०-१२ वर्षे जी नजाकत व कौशल्य तिने दाखवले होते त्याला मुकावे लागणार म्हणुन खरच वाइट वाटले. पण तिच्या अस्ताबरोबरच अजुन एका लेजंडच्या कारकिर्दीचा उदय झाला..... आणी ती लेजंड म्हणजे
none other than Steffi Graf!कौशल्य,पॉवर आणी सातत्य या तिन्ही गुणांचा सुंदर संगम सगळ्यांना स्टेफ़ीच्या खेळात अनुभवयाला मिळाला. Physically I think Steffi was the most gifted female Tennis player! त्याचबरोबर तिच्यात असलेली जिद्द पाहुन पहिल्याच वर्षी तीने माझ्याच नाही पण जगभरच्या सगळ्या टेनीसप्रेमींच्या ह्रुदयात घर केले.आणी १९८७ च्या अंतिम सामन्यात तिने मार्टिनाला हरवुन दुधात साखरच टाकली व पुढची १२ वर्षे तिने या स्पर्धेवर आपली छाप उमटवली. तिचा तो चाबकासारखा फ़ोरहॅंड चा फटका व तिचे ते कोर्टवरचे वेगात धावुन बॉल कव्हर करायचे कौशल्य पाहुन तिने ती एका वेगळ्याच लीगमधे असल्याचे सगळ्या जगाला दाखवुन दिले. १९८७ ते १९९८ च्या दरम्यान तिच्यात व अरांचा मधे बरेच अतितटीचे सामने रोलॅंड गॅरस वर झाले.पण मला सगळ्यात रोमहर्षक सामना त्या दोघांमधला... आवडला तो म्हणजे १९९६ चा अंतिम सामना... तिसरा सेट नुसताच वेळेने लांबला नाही तर त्यातला प्रत्येक पॉइंट इतका अतितटीने त्या दोघीनी लढवला..की त्या त्या सामन्याला एपीक.. हा एकच शब्द योग्य आहे... टेनीस प्रेमींना तो सामना म्हणजे एक मेजवानीच होती.. अशा सामन्यांमुळे रोलॅंड गॅरस पुढची अनेक वर्षे त्या दोघींची आठ्वण काढत राहील....

आणी हो... १९९९ ची फ़ायनल कोण विसरेल? स्टेफ़ीच्या कारकिर्दीतली ते शेवटचे वर्ष होते अंतिम फेरीत नव्या उमेदीची मार्टिना हिंगस तिच्याविरुद्ध होती. पहिला सेट मार्टिनाने सहज जिंकला व दुसर्‍या सेटमधे तिच्याकडे मॅच पॉइंट असताना ती सर्व्ह करत होती. पण अशा वेळी स्टेफ़ीने ती ऑल टाइम ग्रेट का मानली जाते त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. तो पॉइंट वाचवुन तिने तो सेट जिंकला. एकदा अशी थोडीशी संधी मिळताच एखादी भुकेली वाघीण आपल्या भक्श्यावर जशी उडी मारेल तशा जोमात स्टेफ़ीने तिसर्‍या सेट मधे खेळ केला. मार्टिना हिंगसने स्टेफ़ीचे लक्ष विचलीत करण्याचे सगळे प्रयत्न करुन पाहीले.. अगदी अंडर आर्म सर्व्हीससुद्धा करुन पाहीली.. पण एकदा अजिंक्यपद पंजात आल्यावर ते सहजासहजी सोडुन दिले असते तर ती स्टेफ़ी कुठली... व तिसरा सेट जिंकुन स्टेफ़ीने आपल्या अलौकीक कारकिर्द्रेची सांगता तिच्या या स्पर्धेच्या सहाव्या अजिंक्यपदाने केली... बिचार्‍या मार्टिनाचे त्या पराभवानंतरचे हमसुन हमसुन रडणे व तिच्या आइकडे धावत जाउन तिला मारलेली मिठी व त्या मिठीत आइने केलेले तिचे सात्वन सगळ्यांच्या लक्षात राहीले..

याच पॅरीस सारख्या रमणीय ठिकाणी स्टेफ़ी व आंद्रे ऍगॅसी यांचे प्रेम जमले व या दोन महान टेनीस खेळाडूंनी मग पुढे जाउन लग्नही केले.

ख्रिस एव्हर्ट व स्टेफ़ी ग्राफ़ या दोघींच्या मानाने अरांचाकडे नैसर्गीक कौशल्य नव्हते. पण त्याची भरपाई तिने तिच्यात असलेल्या प्रचंड चिकाटीने भरुन काढली. त्या चिकाटीमुळेच तिही या स्पर्धेत सहा वेळा अंतिम फेरीत आली व तीन वेळा विजयी सुद्धा झाली! तिचे ते नेव्हर से डाय.. ऍटीट्युड खरच दाद देण्यासारखे होते. स्टेफ़ीचा प्रत्येक फ़ोरहॅंड ती कसेही करुन परतवायची व आपण बघणारे मान शेक करुन म्हणायचो की हाउ इन द वर्ल्ड शी मॅनेज्ड दॅट!.... बेसलाइनवर उभे राहुन एखादा किल्ला जिवाच्या आकांताने लढवायच्या आवेशात ती सामना लढायची. त्यामुळे दिसायला क्युट नसुनसुद्धा तिने अनेक टेनीसप्रेमींच्या ह्रुदयात स्थान मिळवले.

या तिघींमुळे फ़्रेंच ओपन स्पर्धेचा अंतिम फेरीचा वीकेंड नेहमीच वाट बघायला लावणारा होता. खासकरुन ९० च्या दशकात जेव्हा पुरुषांच्या अंतिम फेरीत जे सुमार दर्जाचे खेळाडु येत होते त्या पार्श्वभुमीवर स्टेफ़ी ग्राफ़ व अरांचाने टेनीसप्रेमींना या स्पर्धेत गुंतवुन ठेवले हे निश्चीत!

आणखीन दोन जणींचा या स्पर्धेच्या अनुशंगाने इथे उल्लेख करणे आवश्यकच आहे. त्या दोघी जणी म्हणजे मॉनिका सेलेस व जस्टीन हेनीन..... मॉनिका सेलेस नावाचे झंझावात ही स्पर्धा १९९०-९१-९२ असे लागोपाठ तिन वर्षे जिंकुन गेले व स्टेफ़ी ग्राफ़चे प्रभुत्व अल्पकाळाचेच आहे की काय असे सगळ्यांना वाटु लागले होते.पण मॉनिकाच्या दुर्दैवाने एका जर्मन माथेफिरुला तिचे असे वर्चस्व आवडले नाही व १९९३ मधे हॅंबर्गमधल्या एका स्पर्धेत त्या जर्मन माथेफिरुने तिच्यावर सामना चालु असताना चाकुचे वार केले. ती मरता मरता वाचली पण त्या मानसीक धक्यातुन ती परत कधीच सवरली नाही... नाहीतर अजुन किती फ़्रेंच स्पर्धा तिने जिंकल्या असत्या हे कोणीच सांगु शकत नाही.. पण स्टेफ़ीला तिने दोनदा फ़ायनलमधे हरवले... त्या दोघींमधला १९९२ चा अंतिम सामना १९९६ च्या अरांचा बरोबरच्या अंतिम सामन्या सारखाच अविस्मरणिय झाला... शेवटच्या सेटमधे शेवटी शेवटी मॉनीकाचे ग्रंटींग एवढे वाढले की शेवटी स्टेफ़ीने त्याबाबत पंचांकडे तक्रार केली होती.

आणी गेल्या चार वर्षात ही स्पर्धा ३ वेळा जिंकुन इवल्याश्या जस्टीन हेनीनने सुद्धा या स्पर्धेवर आपली छाप उमटवली आहे. या दशकात बहुतेक तीच या स्पर्धेवर वर्चस्व गाजवेल असे दिसत आहे. तिच्या एवढ्याश्या शरीरयष्टीतुन एवढी पॉवर ती जनरेट करु शकते यातच तिचे कौशल्य दिसुन येते त्याचबरोबर तिच्या शॉटचे प्लेसमेंट व तिची चित्त्यासारखी चपळताही प्रतिस्पर्ध्याला हतबल करते.

पण माझ्या मते या स्पर्धेच्या इतिहासात ख्रिस एव्हर्ट, स्टेफ़ी ग्राफ़ व अरांचा सॅंकेज या तिन महान खेळाडुंचे स्थान नेहमीच अढळ राहील....

नेमस्तक... हे पोस्ट व या आधीचे माझे पोस्ट फ़ेडररला संबधीत नाही. पण टेनीस साठी दुसरा बीबी नसल्यामुळे इथे लिहीले आहे. हवे असल्यास तुम्ही ही दोन्ही पोस्ट उडवु शकता....


Abhi_
Monday, May 07, 2007 - 11:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>हवे असल्यास तुम्ही ही दोन्ही पोस्ट उडवु शकता....
>>ह्या बी बी चे नाव बदलले आहे.

मॉडरेटर धन्यवाद!! ही खरी दाद मुकुंदच्या लेखनाला!!!

मुकुंद मस्त लिहिता आहात!! :-)

जसं तुम्ही १९९९ च्या फायनल बद्दल लिहिले आहेत तसंच जर अजून एका सामन्याबद्दल लिहिलंत तर मला आवडेल. मला साल आणि स्पर्धेची फेरी आठवत नाहिये. (कदाचीत उपांत्य फेरी..) गॅब्रिएला सबातिनी आणि मेरी ज्यो फर्नान्डिस यांच्यातला तो सामना होता. सबातिनी दोन सेटमध्ये मॅच जिंकणार असं वाटत असतानाच मेरी ज्यो ने दोन का तीन मॅच पॉईंट वाचवत नंतर तो सेट व तिसरा सेट जिंकून तो सामना जिंकला होता. :-)


Mukund
Wednesday, May 09, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक... आभारी आहे...

अभी.. अरे तो सामना पाहील्याचे आठवत नाही रे. दिलगीर आहे त्याबद्दल..पण या स्पर्धेचा अजुन एक सामना अगदी स्पष्ट आठवत आहे मला... त्याबद्दल मी तुला थोडेसे सांगु शकतो..

साल होते १९८४.. खर सांगु? ८० व ९० च्या दशकातला काळ मला टेनीसच्या द्रुष्टीने सुवर्णकाळ वाटतो. तेव्हाचे खेळाडु बघ.. कॉनर्स,मॅकेन्रो,लेंडल,बेकर,विलॅंडर,एडबर्ग,सॅंप्रास,ऍगॅसी व गोरान इव्होनेव्हीक... एक गोरान सोडलास तर प्रत्येकाच्या खात्यात चार पेक्षा जास्त ग्रॅंड स्लॅम टायटल्स आहेत.. त्यामुळे त्या वेळी प्रत्येक ग्रॅंड स्लॅम फ़ायनल व सेमीफ़ायनलला याच महान खेळाडुंमधे एक उत्कट संघर्ष बघायचे सौभाग्य टेनीसप्रेमींना मिळायचे. त्यांची वेगवेगळी मानसीक घडण व त्यामुळे कोर्टवर होणारी चकमक बघण्यात खरच खुप मजा यायची. कधी एक दुसर्‍यावर फ़्रेंच ओपन मधे कुरघोडी करायचा तर तोच खेळाडू विंबल्डन मधे किंवा यु एस ओपन मधे त्याची व्याजासकट परतफेड करायचा.. ती १५ ते २० वर्षे अशा रोमहर्षक सामन्यानी ओतप्रोत भरलेली आहेत. त्या काळात जर कोणी टेनीस पाहीले असेल तर त्यांना मी काय म्हणत आहे ते नक्कीच कळेल.

तर मी सांगत होतो...वर्ष होते १९८४... कलाकार होते.. इव्हान लेंडल व जॉन मॅकेन्रो... रंगमंच होता.. रोलॅंड गॅरस चे तांबड्या मातीचे कोर्ट... व सीन होता.. अंतिम फेरीतला सामना..

आता थोडी पार्श्वभुमी.... जॉन मॅकेन्रोचा खेळ ज्यांनी पाहीला असेल ते याची साक्ष देतीलच की तो एक अतिशय गिफ़्टेड व टॅलंटेड खेळाडु होता.. पण तेवढाच तो गरम डोक्याचा व अखिलाडु व्रुत्तिचा होता.. त्याने कोर्टवर पंचावर मारलेली टेंपर टॅंट्रम्स सगळ्या जगाला ठाउक आहेत. पण त्याच्या टेनीस कौशल्याबद्दल व नजाकती खेळाबद्दल वादच नव्हता. पण सगळ्या अमेरीकन खेळाडुंप्रमाणे त्यालाही हार्ड कोर्ट किंवा ग्रास कोर्ट सारखे फ़ास्ट सरफ़ेस आवडायचे. कारण बहुतेक सगळे अमेरीकन टेनीस खेळाडु सर्व्ह आणी व्हॉली खेळणे पसंत करतात. हार्ड कोर्ट किंवा विंबल्डनच्या फ़ास्ट कोर्ट वर तसा खेळच जास्त फायदाचा व यशस्वी होउ शकणारा असतो. पण रोलॅंड गॅरसच्या तांबड्या मातीच्या संथ सरफ़ेसवर मात्र तोच खेळ अंगलट येउ शकतो.. कारण प्रतिस्पर्धी खेळाडुला बेसलाइनवर उभे राहुन तुमची सर्व्हीस परत करायला बराच वेळ मिळु शकतो जो ग्रास व हार्ड कोर्टवर मिळत नाही त्यामुळे प्रतिस्पर्धी जर चांगला खेळाडु असेल तर तुम्ही तुमची सर्व्हीस करुन जेव्हा व्हॉली साठी नेटजवळ आलात तर तो चांगला पासींग शॉट मारुन तुम्हाला हरवु शकतो. म्हणुन रोलॅंड गॅरस वर प्रामुख्याने तुम्हाला बेसलाइन वरुनच खेळाडु लढताना दिसतील.

तर असा हा सर्व्ह आणी व्हॉली करण्यात पटाइत असणारा अती टॅलंटेड मॅकेन्रो त्या अंतिम सामन्यात खेळत होता त्याच्या अगदी विरुद्ध रितीने खेळणार्‍या इव्हान लेंडल बरोबर! हा इव्हान लेंडल सर्व्ह आणि व्हॉली खेळणे कधीच पसंत करत नसायचा.(म्हणुनच भगीरथ प्रयत्न करुनसुद्धा लेंडल विंबल्डन स्पर्धा कधीच जिंकु शकला नाही!:-() मात्र बेसलाइनवर उभे राहुन जबरदस्त फ़ोरहॅन्ड टॉपस्पीन करुन चेंडु परत करण्यात त्याचा हातखंडा होता. तसे तो प्रतिस्पर्धी दमेसपर्यंत करु शकायचा.. दिवसातुन आठ आठ तास व्यायाम करुन त्याचे शरीर म्हणजे एखाद्या रोबॉटीक यंत्रासारखे न दमता काम करायचे... प्रतिस्पर्धी अगदी दमुन जायचा पण हा पट्ठ्या काही दमायचा नाही.

तर असे दोन विरोधाभास असलेले दोन महान खेळाडू एकमेकांसमोर शड्डु ठोकुन उभे राहीले होते. बर रोलॅंड गॅरस वरच्या स्लो सरफ़ेसवर लेंडलचे पारडे जरी जड वाटत असले तरी मॅकेन्रोच्या मनात अति विश्वास! की या आधी त्याने ५ ग्रॅंड स्लॅम जिंकल्या आहेत व जगात तो पहिल्या नंबरचा खेळाडु आहे... या स्पर्धेतही त्याला या वर्षी पहिले सिडींग दिलेले होते. लेंडल ला दुसरे सिडींग होते. त्यामुळे मॅकेन्रोच्या मनात दांडगा विश्वास होता की लेंडलला.. जो आतापर्‍यंत एकही ग्रॅंड स्लॅम जिंकला नव्हता व जो मॅकेन्रोच्या मते त्याच्यापेक्षा कनिष्ट प्रतिचा खेळाडु होता... तो या सरफ़ेसवर पण सहज हरवु शकेल.

वास्तवीक पाहता या सरफ़ेसवर लेंडलचा खेळ खरच मॅकेन्रोपेक्षा सरस होता.. पण आत्मविश्वासाची कमी असल्यामुळे म्हणा की मॅकेन्रोच्या दांडग्या विश्वासामुळे म्हणा.. लेंडल सुरुवातीपासुनच अगदी चाचपडत खेळु लागला. त्याचा पुरेपुर फायदा घेत मॅकेन्रोने पहीले दोन सेट हा हा म्हणता घशात टाकले की हो...

त्यानंतर काय झाले हे पाहण्याचे सौभाग्य ज्यांना लाभले त्यांनाच मी काय म्हणत आहे ते कळेल! पहीले दोन सेट असे गमावल्यावर लेंडल साइड्लाइनवर रुमालाने घाम पुसत पाणी पित पित त्याच्या रॅकेटकडे बघत होता. पाणी पिउन झाल्यावर नेहमीप्रमाणे तो त्याच्या रॅकेटच्या जाळीवर आपल्या बोटांनी त्या जाळीचे तंतु ठिक करत त्या जाळीकडे बघत २ मिनीटे स्तब्ध बसुन राहीला व आपले विचार गॅदर करत तो दोन मिनीटांनी उठला.. तेही पंचांनी त्याला वेळ होत असल्याची वॉर्नींग दिल्यावर....

त्यानंतर त्याने असा खेळ ठेवणीतुन काढला म्हणुन सांगु!...की पुढचे दिड दोन तास मॅकेन्रोला कळलेच नाही की कुठल्या वादळात किंवा झंझावातात तो अचानक सापडला! रोलॅन्ड गॅरसच्या कोर्टवर मॅकेन्रो एका बाजुपासुन दुसर्‍या बाजुपर्यंत पुढचे दिड दोन तास अक्षरश: केवीलवाणे होत जीव घेउन नाचत होता... लेंडलचे ते फ़ोरहॅंड टॉप स्पीन पासींग शॉट परत करण्यासाठी... अलबत अयशस्वीपणे तो नुसताच इकडुन तिकडे नाचत होता... आणी जेव्हा पासींग शॉट्स साठी नाचत नव्हता तेव्हा सर्व्ह आणी व्हॉली करुन नुसताच नेटजवळ लेंडलने मारलेल्या पासींग शॉटकडे दगडासारखा, पायात बेड्या असल्यासारखा निश्चल होउन बघत होता... अतिशय दयनिय अवस्था करुन टाकली होती लेंडलने त्याची. रोलॅंड गॅरस वर कसे खेळायचे याचे जळजळीत प्रात्यक्षिक त्या दिवशी लेंडलने दाखवले... तसा खेळ आजपर्यंत फ़्रेंच ओपनमधे कोणीच दाखवला नाही..
Simply superb!Hats off to Lendl!अक्षरश्: डोळ्याचे पारणे फेडले त्या दिवशी लेंडलने.... मॅकेन्रो अगदी शाळकरी मुलगा वाटत होता त्यापुढे. मला त्या दिवशी पहिल्यांदाच मॅकेन्रोची दया आली. त्याच्या जागी ब्रम्हदेव जरी असला असता त्या दिवशी तरी लेंडलला काही फरक पडला नसता..... अशा झोनमधे लेंडल पुढचे ३ सेट खेळला...

आणी सामना संपल्यावर स्कोरबोर्ड दाखवत होता की लेंडलने पाच सेट मधे मॅकेन्रोला हरवुन आपले पहीले ग्रॅंड स्लॅम जिंकले आहे...आणी मॅकेन्रो? तो हताशपणे साइड्लाइनवर रुमालात डोके घालुन बसला होता.. सामना संपल्यावर तो इतका शेल शॉक व उद्विग्न झाला होता की त्याची मुलाखत घ्यायला आलेल्या टीव्ही समालोचकाला दुर्लक्षीत करुन तो त्याची टेनीस बॅग गळ्यात लटकवुन सरळ ड्रेसींग रुमकडे चालता झाला... रोलॅंड गॅरस वरचा प्रत्येक माणुस टाळ्यांच्या कडकडाटात सन्मानाने उभे राहुन लेंडलचे कौतुक करत होता व मॅकेन्रोच्या अशा अखिलाडू व्रुत्तिचा बु करुन निषेध करत होता.... ते एकाच वेळेला चाललेले..... टाळ्यांचा कडकडाट व बुइंग मी कधीच विसरणार नाही.. पण त्याहीपेक्षा मी कधीच विसरणार नाही.... ते म्हणजे लेंडलचा त्या दिवशीचा खेळ व त्याचे ग्रॅंड स्लॅम स्पर्धेचे पहिले विजेतेपद!


Mukund
Tuesday, May 15, 2007 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल नादालने इटालियन ओपन स्पर्धा लागोपाठ ३ वेळा जिंकुन क्ले कोर्टवर लागोपाठ ७७ मॅचेस जिंकुन एका सरफ़ेसवर सतत ७५ मॅचेस जिंकण्याचा(ग्रास कोर्टवर) मॅकेन्रोचा विक्रम मोडला. क्ले कोर्टवर तो गेली २ वर्षे अपराजीत आहे.

आणी फ़ेडरर प्रथमच गेल्या चार वर्षात इतका वाइट खेळत आहे. गेल्या दोन महीन्यात तो सेमीफ़ायनलच्या आधी बर्‍याच वेळा हरला आहे. त्यामुळे फ़्रेंच ओपनमधे नादाल हाच ऑड्स ऑन फ़ेव्हरेट आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीत फ़ेडरर कसा काय स्वत्:ला सावरतो व त्यात त्याचे ग्रेट चॅंपीअनचे गुण कसे दाखवुन देतो याची मला उत्सुकता आहे.

आपण सध्या फ़ेडरर बद्दल अपेक्षा ठेउन आहोत की तो बहुतेक ऑल टाइम ग्रेट म्हणुन ओळखला जाइल. पण वरचा लेंडलचा किस्सा लिहीत असताना माझ्या लेंडलबद्दलच्या अनेक आठवणी उजळुन निघाल्या. आपण म्हणतो सॅंप्रास, बोर्ग, मॅकेन्रो,कॉनर्स,ऍगॅसी हे सगळे ग्रेट खेळाडु होते पण तुम्हाला माहीत आहे का की सगळ्यात जास्त ग्रॅंड स्लॅम फ़ायनल्स कोण खेळले आहे?.... लेंडल! तो तब्बल १९ ग्रॅंड स्लॅम फ़ायनलमधे खेळला आहे... कोणत्याही इतर टेनीस खेळाडुंपेक्षा जास्त वेळा.. सॅंप्रास १८ मधे खेळला आहे तर बोर्ग १६ मधे. पण बिचार्‍या लेंडलवर तब्बल ११ वेळा फ़ायनलमधे हरण्याची नामुष्की आली होती. आठ वेळा तो जिंकला तरी त्याच्या ११ वेळा फ़ायनलमधे हरल्यामुळे तो सगळ्यांच्या आठ्वणीत फ़ायनलला हरणारा म्हणुनच जास्त लक्षात राहीला. पण त्याची महानता नक्कीच नाकारता येत नाही. १९८१ ते १९८९ दरम्यान तो दरवर्षी ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीचा अविभाज्य भाग होता. मला सर्वात जास्त वाइट वाटले विंबल्डनमधे... त्याला ठाउक होते की इतिहासात जर अजरामर व्हायचे असेल तर त्याला ती स्पर्धा जिंकणे आवश्यकच आहे. बिचारा दोन वेळा अंतिम फेरीत जाउन हरला... १९८६ च्या फ़ायनलमधे अवघ्या १८ वर्षाच्या बेकरने त्याला हरवले तर १९८७ मधे पॅट कॅशने... पॅट कॅश बरोबरच्या फ़ायनलमधे काही लाइन कॉल पंचांनी चुकुन लेंडलच्या विरुद्ध दिले... तेव्हा नेहमी एखाद्या साधुप्रमाणे शांत असणार्‍या लेंडलने पंचांकडे जाउन म्हटले... की मी इतकी मेहनत घेत आहे जिंकण्याची व तुम्ही तुमच्या बेजबाबदार पंचगीरीने माझ्या प्रयत्नावर पाणी फिरवत आहात.. त्याच्या चेहर्‍यावरची आर्तता मला अजुनही आठवत आहे. पण त्या वर्षी पॅट कॅश नेमका न भुतो न भविष्यती असा खेळत होता व लेंडलचा पराजय झाला. मला खुप वाटत होते की लेंडल जिंकावा म्हणुन.. पण!:-(.... जिमी कॉनर्स, इव्हान लेंडल व बोरीस बेकर हे माझे ३ खुप आवडते खेळाडु होते..

ऑगस्टमधे जेव्हा आपण यु एस ओपनबद्धल बोलु तेव्हा लेंडलच्या व जिमी कॉनर्सच्या त्या स्पर्धेवरच्या प्रभुत्वाचा आढावा घेउच...

व पुढच्या महीन्यात विंबल्डनच्या निमित्ताने बोर्ग,मॅकेन्रो,बेकर सॅंप्रास व फ़ेडररचे त्या स्पर्धेवरचे निर्विवाद वर्चस्व..ब्रेकफ़ास्ट ऍट विंबल्डन या सदरात पाहुच...:-)



Ameyadeshpande
Tuesday, May 15, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, खूपच सुंदर, माहितीपूर्ण आणि खिळवून ठेवणारं लिहीत आहात. प्रत्यक्ष ते खेळाडू कोर्टवरती खेळतायत आत्ता असं वाटतंय वाचताना.

स्टेफ़ी ग्राफ़ आणि हिंगीस च्या फ़्रेंच ओपन अंतिम सामन्याबद्दल जे लिहिलत, तसंच थोडफ़ार स्टेफ़ी आणी याना नोवोत्ना च्या विम्बल्डन अंतिम सामन्यात झालं होतं. नोवोत्ना जवळ जवळ पहिले २ सेट जिंकण्याच्या जवळपास असताना, पहिला सेट जिंकुन दुसर्‍यात ४-१ नी पुढे असताना स्टेफ़ी नी अचानकपणे पुढचे सगळे गेम्स जिंकून, तिसरा सेटही जिंकला होता.
सेलेस आणि ग्राफ़ चे सामने जेव्हा रंगायचे, तेव्हा मी पाचवीत,सहावीत असेन. पण ते खूप छान लक्षात राहिलेत. मलाही स्टेफ़ी आवडायची पण सेलेस चा खेळ स्टेफ़ीहून जास्त सरस आहे हे दिसायचं. सेलेसच्या सगळ्यांना ऐकू येईल अशा हुंदक्यातून येणार्‍या फ़टक्यांपुढे कित्येकदा स्टेफ़ी बेजार व्हायची. कडवी लढत द्यायची पण शेवटी अनेकदा ती हरायची. सेलेसवरती हल्ला झाला नसता तर कदाचित स्टेफ़ीला पुढल्या वर्षांत असं निर्विवाद वर्चस्व सेलेसनी नसतं गाजवू दिलं.


Satishm27
Tuesday, May 15, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ेडरर प्रथमच गेल्या चार वर्षात इतका वाइट खेळत आहे. गेल्या दोन महीन्यात तो सेमीफ़ायनलच्या आधी बर्‍याच वेळा हरला आहे. त्यामुळे फ़्रेंच ओपनमधे नादाल हाच ऑड्स ऑन फ़ेव्हरेट आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीत फ़ेडरर कसा काय स्वत्:ला सावरतो व त्यात त्याचे ग्रेट चॅंपीअनचे गुण कसे दाखवुन देतो याची मला उत्सुकता आहे.>>>>
मुकुंद,
खरोखर आता फ़ेडेक्सची Greatest ठरण्याची खरी परिक्षा French Open मध्ये लागेल!!!
जानेवारिमधील त्याचा खेळ अगदी समोरच्या स्पर्धकाची कीव करण्याजोगा होता! अन आता :-(.
French Open मध्य तो pete sampras च्या मार्गाने जात तर नाही ना?



Satishm27
Sunday, May 20, 2007 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Federer cracks Nadal on clay!!!!!
>>>> Federere आज सुंदरच खेळला :-).
नडालचा खेळ मात्र दुसर्‍या सेटनंतर जो ढेपाळला तो अगदी शेवटपर्यंत :-(.




Bee
Monday, May 21, 2007 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, खूप सुंदर लिहिताहात. आज मायबोलिच्या १ल्या पानावर मी ह्या आठवणींची लिंक पाहिली.

त्रिवार अभिनंदन!


Kmayuresh2002
Monday, May 21, 2007 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद,मस्तच.. मी पण टेनिसचा निस्सिम चाहता आहे.. तुमचे लेख वाचुन जुन्या पाहिलेल्या matches च्या आठवणी ताज्या झाल्या आणि मस्त वाटले..
या वर्षीच्या फ़्रेंच ओपनसाठी जरी नडालच मुख्य दावेदार असला तरी माझ्यासाठी फ़ेडररच फ़ेव्हरेट आहे आणि तो नक्की कधी ना कधी ही स्पर्धा जिंकुन आपण का इतरांपेक्षा महान आहोत हे नक्की जगाला दाखवुन देईल हा पक्का विश्वास आहे


Bhramar_vihar
Monday, May 21, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, मी प्रथमच तुमचे लिखाण वाचले. तुमची शैली खरच छान आहे.

Mukund
Tuesday, May 22, 2007 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय.. अरे त्या ग्राफ़ नव्हॉटना सामन्याबद्दल मी विंबल्डनच्या आठ्वणी लिहीताना लिहीणार होतो. काही काही सामने तुमच्या स्मृतिमधे कायमचे घर करुन जातात.त्यातलाच तो एक सामना होता.

सतिश.. मी नाही पाहीला या रवीवारी तो सामना. पण फ़ेडररने हे बॅटल जरी जिंकले असले तरी वॉर रोलॅंड गॅरसवरच लढले जाणार आहे..:-)

अभी,अमेय,भ्रमर, बी, मयुरेश.. तुम्हा सगळ्यांनी माझ्या लिखाणाबद्दल अभिप्राय द्यायची तसदी घेतलीत यातच तुमचा मोठेपणा आहे. धन्यवाद. पण तुम्हीही तुमच्या आठवणी इथे शेअर कराल अशी अपेक्षा आहे:-)

बी.. मायबोलीचे पहिले पान म्हणजे काय?


Manjud
Tuesday, May 22, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, तुम्ही खुपच सुंदर लिहीत आहात. keep writing. we are enjoying.

ग्राफ नोवोत्ना मॅच अगदी अविस्मरणीय झाली होती. स्टेफी ग्राफच्या चिवटपणाची ती अगदी सत्वपरीक्षा होती असे म्हटले तरी चालेल. परन्तु त्यानंतर ३-४ वर्षानी नोवोत्नाने विम्बल्डन जिंकुन दाखवले होते. अर्थात, ते स्टेफी साम्राज्य अस्तास गेल्यानंतरच.

हा thread चालु करताना mens singles शी फक्त चर्चा निगडीत असावी असे का म्हटले आहे?


Kmayuresh2002
Tuesday, May 22, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद,मायबोलीचे पहिले पान म्हणजे मुखपृष्ठ हो... तिथे तुमच्या या लिखाणाला मानाचे स्थान मिळाले आहे:-)

Milindaa
Tuesday, May 22, 2007 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, माझ्या मते, त्या सामन्यात ग्राफ आणि नोवोत्ना ने एक एक सेट जिंकला होता आणि नोवोत्ना तिसर्‍या सेट मध्ये ४ - १ आघाडीवर होती, त्यानंतर स्टेफी ने सामन्याचा ग्राफ बदलून टाकला,
एनीवे, आपण मुकुंद लिहीतील त्याची वाट पाहुया. :-)


Ameyadeshpande
Tuesday, May 22, 2007 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर मिलिंदा, 7-6, 1-6, 6-4 अशी झाली होती ती मॅच.

Satishm27
Saturday, June 09, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण फ़ेडररने हे बॅटल जरी जिंकले असले तरी वॉर रोलॅंड गॅरसवरच लढले जाणार आहे.. >>>>>>>>
फेडरर हे war जिंकेल?
नडालचा खेळ अन प्रचंड Energy कौतुकास पात्र आहे........



Balaram
Tuesday, June 12, 2007 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द,
तुम्ही खुप छान लिहले आहे.
पुढील लिखाणास शुभेच्या.



Giriraj
Tuesday, June 12, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा फ़ेडरर वि. नदाल असा अंतिम सामना पाहिला... फ़ेडरर पूर्ण ताकदिनिशी खेळला नाही असे वाटले... काही रॅलीज तर खूपच सुंदर झाल्या..

Asami
Tuesday, June 12, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडक्यात काय तर ह्या BB च्या title मधे शेवटी ? टाकून हा BB अजून open ठेवण्याची गरज आहे. :-)

chalaa aattaa <Wimbledon> kaDe vaLU yaa.}

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators