Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 26, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » अनुदिनी अनुतापे तापलो रामराया- जपानमधील आत्महत्येचे प्रमाण » Archive through June 26, 2006 « Previous Next »

Raina
Friday, June 23, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मागच्या आठवद्यात पुन्हा एकदा ट्रेन ला उशीर झाला होता. सकाळची लवकरची एक मिटीन्ग होती म्हणुन स्टेशनवर सकाळी लवकर (पावसात तड्फडत) पोचले तर हीSSS गर्दि… नुस्त्या छत्रया आणि निथळणा-या माणसांचा उसळलेला समुद्र ! तशी रोजच गर्दी असते- पण गाडीही उशीरा येणार आणि येवढेच नाही तर तोक्योच्या दिशेने जाणा-या सर्व गाड्यांचे वेळापत्रक बोंबलले आहे हे कळल्यावर वैताग/चिडचिड व्ह्यायच्या ऐवजी, आधी काळजात धस्स झाले. ! माझे भय कधि खोटे बोलत नाही.
लवकरच त्या सगळ्या गोंधळातुन अपेक्षित घोषणा कानावर पडली आणि खात्री पटली.
जे बर-याचदा होते इथे, तेच झाले होते ! कोणीतरी सकाळी ७:०६ वाजता गाडीसमोर उडी मारुन आत्महत्या केली होती आणि तोक्यो कडे जाणा-या सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. ह्याला जपानीत "जिनशिनजिकौ " म्हणतात ! (जपानित literal शब्दार्थ- human-body-accident)

हे -आताशा फार व्हायला लागले आहे का ? सरासरी आठवड्यातून १दा हा प्रकार होऊ लागला आहे…… इतके कसले ह्र्दयद्रावक प्रसंग घडले असतील या अभागी माणसांच्या आयुष्यात, की त्यांनी हा मरणाचा अतिशय भीषण आणि वेदनादायक प्रकार स्वीकारावा ? “स्वेच्छामरणाला” सुद्धा माझा खरंतर तात्विक विरोध नाही, पण ह्या अशा हिंसात्मक मरणाचं ऐकुन माझ्या तरी जिवाचा नुसता थरकाप होतो. जीवनात शांतता नाही, म्हणुन मरण पत्करावे, तर मरण देखील शांतपणे येऊ नये ही कसली दैवगति ? हा कुठला ऊफराटा न्याय? एक वेळ असे जरि मान्य केले, की जिवनसंघर्षाला कंटाळुन , एखाद्यानी हा आततायी निर्णय घेतला असेल- तरी मरणाची ही कसली त-हा? मरणच मागायचे तर शांत , मुक्त करणारे का नाही? मग ह्या नरकयातना देणा-च्या, देह छिन्नविछीन्नं करणा-या मरणाची मनिषा या लोकांनी का करावी?

जिने की वजह तो कोई नही, मरने का बहाना ढुंढता है !
मरने का ऐसा कौनसा जायज बहाना मिल गया ? हा प्रश्न मला नेहमी पडतो.

जपान मध्ये असा गाड्यांना उशीर झाला की स्टेशनवर (साहेबाला दाखवण्यासाठी ) एक चिठ्टी देतात ज्यावर लिहीले असते की आज गाडीला उशीर झाला वगैरे आणि जपानी कंपन्यात काम करणारे लोकं ती चिठ्ठी आवर्जुन घेतात. जे प्रवासी पैसे परत मागतील, त्यांना जपान रेल्वे तिकिटाच्या काही टक्के , ठराविक रक्कम परत करते. आणि असे ऐकले आहे की अशी आत्महत्या करणा-या म्रृत व्यक्तिच्या कुटुंबालाच जपान रेल्वेला नुकसान भरपाई द्यावी लागते. हे खरे असेल- तर मला अजुनच अचंबा वाटतो. आपल्याच कुटुंबियांना अजुनच त्रास (मानसिक आणि आर्थिक) होणार, हे निश्चित असताना ही हे असे का करत असावेत ?

माझा साहेब फिरंगी आहे, तो पुर्वाश्रमी बरीच वर्ष राणीच्या देशात पोलीस खात्यात होता, आणि त्याची बायको जपानी आहे. हे एवढ्याच साठी सांगीतले की त्याला गुन्हेगाराच्या मानसिकतेची जाण आहे आणि बायको जपानी असल्याकारणाने त्याचे जपानी लोकांबद्दलचे अनुभव जास्ती आहेत, जपानी संस्कृतीशी त्याचा घनिष्ठ परिचय आहे. तर त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण असे आहे की - “”These people have not been able to create an impact in their life, at least in death, they get noticed, and are able to create an impact (even if negative), and affect so many people. “”

ही सगळी मानसिकता वगैरे खरी असली तरी, बेरोजगारी, अठरा विश्वे दारिद्र्य, स्वेच्छेने स्वीकारलेला भयंकर अगदि चिरुन टाकणारा एकटेपणा, कामाचा डोंगर, तीव्र महागाई ( तोक्यो हे जगातील सर्वात महाग शहर आहे), भावनिक आधारसंस्थांचा अभाव आणि एकंदरीतच, भावनांचा सह्जासहजी निचरा न करु देणारी संस्कृती- ही प्रमुख कारणे आहेत. २००५ मध्ये आत्महत्या करणा-यांपैकी ७२% पुरुष होते आणि जवळजवळ अर्धे बेरोजगार!

माझ्या एका सहकार्याने तर अशा एका माणसाला प्रत्यक्ष पाहिले. तो गाडीची वाट पहात स्टेशनवर थांबला होता. गाडी जवळ आली तशी क्षणार्धात त्याच्या पासुन १० फ़ुटावर असणा-या एका माणसाने , काही कळायच्या आत गाडीसमोर उडी घेतली !
मला तर नेहमी प्रश्न पडतो की ज्या गाडीसमोर अशी घटना घडत असेल त्या बिच्चा-या चालकांना काय वाटत असेल? (रेल्वे प्रशासनाच्या पदरी अशी नोकरदार माणसे आहेत की जे ह्या छिन्नविछीन्न झालेल्या देहाची योग्य विल्हेवाट लावण्यात तरबेज असतात! )
आणि सर्वात वाईट वाटते ते अशा लोकांच्या कुटुंबियांसाठी , जाणारा तर आपल्या कर्मानी गेला, पण उरलेल्यांनी कशाच्या बळावर हा आयुष्याचा प्रपंच चालु ठेवायचा?

पु.ल.देशपांड्यांच्या पुर्वरंग मध्येही “हाराकीरी” चा उल्लेख आहे. अतामी चा टॅक्सी एक चालक, त्यांना एक कडा दाखवून सांगतो, की पुर्वी इथून खूप लोकं आत्महत्या करायचे. जपानात एकंदरीतच आत्महत्येचे प्रमाण फार! असे म्हणतात की २००५ साली जितके लोकं रस्त्यावरच्या अपघातात गेले, त्याहून जास्त लोकांनी आत्महत्या केली.

गेली आठ वर्ष सातत्याने ३०,००० हुन जास्ती लोकं दरवर्षी आत्महत्या करतात. प्रगत औद्योगिक राष्ट्रांमधील माणशी सर्वाधिक आत्महत्या करणा-यांचे प्रमाण जपान मध्ये सर्वात जास्त आहे.
Group Suicides म्हणजे २-३ जणांनी मिळुन, ठरवून केलेली आत्महत्या ! ही लोकं कुठे कुठे महाजालावर संपर्क साधून मग ठरवतात की कुठे , कशी , कधी, कोणाबरोबर आत्महत्या करायची. ह्या असल्या भलत्या गोष्टीसाठी, एकमेका साह्य करणारी माणसे, आत्महत्येचा कुठला पर्याय जास्ती चांगला ह्यावर वेळ घालवण्यापेक्षा जीवनसंघर्षात एकमेकांना मदत का करत नाहीत ?

सरकारदरबारी ह्याची नोंद आणि उपाययोजना वाढत आहेत. Group Suicides साठी उचकावणा-या संकेतस्थळांवर पोलीस गस्त घालत आहेत. NGO’s ही कारणमिमांसा करण्यात आघाडीवर काम करत आहेत. सरकार, कंपन्यांसाठी नवनवे Employee Mental Health साठीचे उपक्रम राबवायला फतवे काढते आहे. जपान मध्ये, खुप सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्या यासाठीच, की लोकांनी जरा सक्तीची विश्रांती घ्यावी- कारण काही लोक अक्षरश: अति कामामुळे ही जीव द्यायला राजी होतात.

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया म्हणत, एकदम हे जग सोडून जाणा-या ह्या लोकांबद्द्ल काय करावे, त्यांना कसा आधार द्यावा आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन, हा सरकारसमोर यक्षप्रश्न आहे.

अधिक माहीतीसाठी वाचा-

http://www.atimes.com/atimes/Japan/FG28Dh01.html
http://www.wsws.org/articles/2004/oct2004/japa-o20.shtml
http://search.japantimes.co.jp/cgi-bin/ed20060619a1.html
http://news.bbc.co.uk/2/hi/asia-pacific/5082616.stm


संपुर्ण.

Raina
Friday, June 23, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin,
हे कुठल्या सदरात टाकावे - हे कळत नव्हते. जर ह्या सदरात योग्य वाटत नसेल तर उडवलत तरी चालेल.

Dineshvs
Friday, June 23, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, जपानमधे आत्महत्येला प्रतिष्ठा आहे असेच लहानपणापासुन वाचत आलोय.
पण असे नाही वाटत का, कि तो माणुस खुपच भावनाप्रधान असतो म्हणुन. भारतात मला तामिळ लोक खुप भावनाप्रधान वाटतात. ( असा अनुभव अनेकजणानी घेतला असेल. ) मनाची खंबीरता जणु नसतेच त्यांच्याकडे.


Lalu
Friday, June 23, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm.. जावे त्याच्या वंशा....
'मनुष्यप्राणी' ही जगात समजायला सगळ्यात अवघड गोष्ट आहे!
रैना, चांगलं लिहिलं आहेस. जरा नवीन विषय. :-)


Laalbhai
Friday, June 23, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, उत्तम लेख.

मला (व्यक्तीगत मला) अशी भीती वाटते की अशी परिस्थिती भारतात यायला फार काळ लागेल असे वाटत नाही.

यांत्रिक प्रगती, पैशासाठी धावधाव यातून समाज फार मोठ्या तणावांना सामोरा जात आहे. हे तणाव व्यक्तीगत आयुष्यातून हटवण्याचे प्रयत्न केले नाहीत, तर अशे परिस्थिती लवकरच उद्भवेल.

सध्याच आपल्याला परिक्षेत नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या करणारे विद्यार्थी पहायला मिळतातच!

फिरंगी अधिकार्‍याने केलेले वक्तव्य त्याचा वंशाला अनुसरूनच आहे.

पराकोटीचे नैराश्य ही या यांत्रिक युगाची मोठीच देणगी आहे!


Sayonara
Friday, June 23, 2006 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, छान लिहिलं आहेस. कुठली लाईन घेतेस? चुओ की यामानोते? त्या लाईनला हे प्रॉब्लेम्स कायमच असतात.
दिनेश, जपानी लोकं भावनाप्रधान नसतात. स्वतच्या भावना दाबून दाबून, आणि सगळीकडे politeness चा मुखवटा चढवून त्यांच्यात stress इतका साठलेला असतो की ते कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देऊ शकत नाहीत आणि त्यातून आत्महत्येचं प्र्माण वाढतं.


Raina
Saturday, June 24, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश- सायोनारा म्हणाली तसे आहे. भावनांची अभिव्यक्ति या देशात सोपी नाही. आणि रुढी आणि Protocols मुळे, जन्मभर ते मनात धुमसत राहतात्- प्रेशर कुकर मध्ये भाताचे दाणे खदखदावे त्याप्रमाणे. पण तुम्ही तमीळ लोकांचे म्हणताय ते कळले नाही. ते नटनट्यांची जरा जास्तीच व्यक्तिपूजा करतात हे खरे आहे. शिवाय त्यांचा राष्ट्रभाषेबद्द्ल जरा जास्तीच पुर्वग्रह आहे हे ही खरं पण मी टनावारी तमीळ लोकांबरोबर काम केले आहे. मला ते आपल्यापेक्षा जास्ती भावनाप्रधान वाटत नाहीत. तुम्हाला असे का वाट्ते?
सायोनारा,
मी शोनान शिन्जुकु सेन घेते, पुर्वी खुप यामानोते, किहिन तोहोकु, तोक्काइदो वगैरे घ्यायचे.
तुमचे विवेचन अगदी पटले.
लालू- खरय, मनुष्याचा थांग लागणे अवघडच !
लालभाई, खरयं , "नैराष्य कृष्णमेघी" एकदा का आले- की माणसाला कसलाच विवेक राहात नाही.

Gajanandesai
Saturday, June 24, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, जपान्यांविषयी हे पहिल्यांदाच माहीत झाले.. दिनेश, माझा तमिळांच्या बाबतीतला अनुभव म्हणजे (मी ज्यांच्या संपर्कात आलोय त्यातल्या बहुतांश व्यक्तिंवरून:-() हे लोक हेकेखोर असतात. त्या नादात ते दुसर्‍यांचा विचार करत नाहीत.

Dineshvs
Sunday, June 25, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायोनारा, हे नव्यानेच कळतेय. जपानी माणसाची विनयशीलता, मनापासुन आलेली नसते तर. पण ईतका का रुढींचा जाच असावा ? विनयशीलता चांगला गुण असला तरी मत मांडण्याचे स्वातंत्र्य, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य त्यापेक्षा मह्त्वाचे आहे, नाही का ?
मी तामिळ लोकांबद्दल लिहिले ते त्यांच्या ईतरांबद्दल वागणुकीवरुन नव्हे. त्यांच्या कौटुंबिक संबंधात ते तसे असतात. मुलाला साधा ताप आला तरी त्याची आई रडुन गोंधळ घालते. त्यांचे रडणे आणि हसणेहि दोन्ही अनैसर्गिक वाटतात मला. पण त्यांची आताची पिढी तशी नाही बहुतेक.
असो परत जपानी माणसाकडे वळु.
त्यांची ती टी सेरेमनी वैगरे बघताना मला त्यात नजाकतीपेक्षा क्रुत्रिमताच जास्त दिअसते. अलिकडे बघितलेल्या सिनेमात ( मेमॉयार्स ऑफ़ अ गैशा ) मधे पण संवादातली, हावभावातली कृत्रिमता लपत नव्हती.


Bee
Monday, June 26, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर जीव घेणे आणि जीव देणे हे दोन्ही प्रकार अमानुष वाटतात. 'नैराष्य कृष्णमेघी' अगदी बरोबर बोललीस.

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया ही ओळ कशातून घेतली आहेस आणि ह्याचा अर्थ काय होतो? मला फ़क्त अनुदिनी म्हणजे बहुदा प्रत्येक दिवशी...

Raina
Monday, June 26, 2006 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया
परम दीनदयाळा निरसी मोहमाया
अचपळ मन माझे नावरे आवरिता
तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता



बी, ही तर रामदासस्वामींच्या "करुणाष्टकांची" ची सुरुवात.

Samit
Monday, June 26, 2006 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नैराश्य कृष्णमेघी म्हणजे काय रे बी?

Raina
Monday, June 26, 2006 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,

मी तो memoirs of a geisha पाहीला नाही अजून, जपान मध्ये त्या चित्रपटाचे नाव "सायुरी"..
पण माझ्या जपानी मैत्रिणींना तो काय फार आवडला नाही त्यातली नायिका चिनी हे या फणका-याचे प्रमुख कारण.
आणि तो tea ceremony वगैरे पाहीला की मला तर धडकी भरते-( माझ्या डोळ्यासमोर लगेच्- आमच्या घरी [जपानी नव्हे साधाच ] चहा करताना कशी अनेकदा रथसप्तमी होते ते येते.).
तो tea ceremony म्हणजे येवढं नाजुक साजुक अगदी थेंब ही न सांडता हे भले मोठठे सोपस्कार... आणि चव मात्र तशीच पातळ फुळुक (हे मत फक्त माझे आहे. नव-याला मात्र ते बेचव रसायन अतिप्रिय आहे. ज्यानी त्यानी आपापल्या जिकिरीवर प्यावा. पण त्याच्यात anti oxidents असतात म्हणे.त्या मुळे तरुण दिसतात म्हणे.)

असो. तर जपानी विनयशीलता ही खरोखर नसतेच असे माझे मत आहे. कामामुळे अनेकदा जपान्यांच्या मुलाखती घेतल्यात. बोलण्यात नेहमी genuineness कमी protocol फार्- असे जाणवते. [पण मायदेशात सुद्धा interview मध्ये genuineness कमी आणि बढाया फार्- असे जाणवतेच. असो.]
त्यांच्या त्यांच्यात [म्हणजे २ जपानी एकमेकांत बोलत असतील तेव्हा] तर इतके जास्ती protocols पाळायला लागतात त्यांना- देवा देवा.

शिवाय आणि परिपुर्णतेचा ध्यास. प्रत्येक गोष्ट कशी १००% perfect च असली पाहीजे. कामचलाउ वगैरे काही नसत. या आणि अशा अनेक अनंत सामाजिक जवाबदा-या पार पाडताना कुठेतरी ताण त्यांना असह्य होत असावेत असे वाट्ते..


सायोनारा, तुम्हाला काय वाटते ?

Bee
Monday, June 26, 2006 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, धन्यवाद! मला माहित नाही समर्थांचे 'करुणाष्टक' फ़क्त त्यांचे श्लोक पाठ आहेत तेही पूर्ण नाहीत. मात्र आता करुणाष्टक एकदा तरी वाचीन.

समित, 'स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा' मधील एका कडव्यात 'नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी' अशी एक ओळ आहे. रैनानी पण कदाचित ह्या गीतातूनच हे दोन शब्द घेतले असतील. निराशेचे काळे ढग म्हणजे नैराश्य कृष्णमेघी..


Bee
Monday, June 26, 2006 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर राग मुळीच आवरता येत नाही. आता घरच्यांवर इतका वेळ राग येतो पण मी इथे असतो. फ़ोनवर फ़ार काळ बोलू शकत नाही. मग असा राग निवळताना खूप खूप मनोयातनातून जावे लागते. माझी तर नेहमी अशी अपेक्षा असते की कुठलेही नाते इतपत असावे की राग लोभ प्रेम माया हे सर्वकाही एक तर त्या व्यक्तीला जाणता यावे किंवा आपल्याला व्यक्त करता येण्याची सोय असावी. म्हणजे इतके आपण बिनधास्त असावे. नुसते कुढत कुढत जगणे नको, कधी कधी मनात ठेवलेल्या गोष्टींचा एकदम स्फ़ोट होतो.

मागे आम्ही दासबोध वाचत असताना असाच एक किस्सा घडला. वर्तमानपत्रात खबर होती की घरात कोंडून घेऊन एका व्यक्तीने फ़क्त रागाच्या उर्जेवर स्वतला संपवून टाकले... नष्ट केले इतकी त्याच्या शरीरातील उष्णता वाढली होती. हे कितपत खरे असावे हे त्या पत्रकारालाच माहित.


Raina
Monday, June 26, 2006 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजूनी, प्रीती फुलोनी यावी
काट्याविना न हाती, केव्हा गुलाब यावे


बी,
हो. "स्वप्नातल्या कळ्यांनो" मधुनच घेतलं आहे.


Sayonara
Monday, June 26, 2006 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, अगदी बरोबर आहे. खोटी खोटी विनयशीलता शेवटी शेवटी इतकी अजिर्ण होते की काही विचारू नका. 'भीक नको पण कुत्रा आवर' म्हणतात ना त्याप्रमाणेच.


Chafa
Monday, June 26, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, छान लिहीलंय, वेगळं! आणि हे ललित मधे अगदी शोभून दिसलं असतं ना!

या जपानी अतिविनयशीलतेची पहिली झलक 'ओशीन' मधे दिसली होती. आणि memoirs वाचून त्यातला जाचही जाणवला होताच. अर्थात चित्रपट मी (अजून) पाहीलेला नाही पण चित्रपट त्या पुस्तकाला न्याय देऊ शकला नसावा असंच वाटतंय. असो.


Sayonara
Monday, June 26, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्या, बरोबर. त्या पुस्तकाबद्दल नाही तर memoirs बद्दल. पाहिला नाहीस ना पिक्चर? मग मुळीच आटापिटा करु नकोस. पुस्तकावरच समाधान मान.

Ninavi
Monday, June 26, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, चांगलं लिहीलं आहेस. मलाही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेणार्‍यांचं कायमच सखेद आश्चर्य वाटत आलेलं आहे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators