|
Sanyojak
| |
| Friday, September 16, 2005 - 4:26 pm: |
| 
|
वाचकहो, उद्याचा दिवस स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे बरं का! लिहीत असाल तर लवकर पूर्ण करा आणि टाका इथे.
|
Pha
| |
| Saturday, September 17, 2005 - 9:20 pm: |
| 
|
' महाराष्ट्रातील कलावंत - आदरणीय आणि संस्मरणीय '
काही महिन्यांपूर्वी लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत एका सिद्धहस्त चित्रकारावर दुसर्या एका चित्रकाराने लिहिलेला व्यक्तिचरित्रात्मक लेख वाचण्यात आला. तो लेख ए. एक्स. त्रिंदाद या गेल्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेल्या भारतीय (खरं तर महाराष्ट्रीय) चित्रकाराबद्दल चित्रकार बाबुराव सडवेलकर यांनी त्यांच्या आगामी पुस्तकात लिहिलेल्या लेखांपैकी एक होता. लेख वाचनीय होताच, पण माझं लक्ष त्या लेखाच्या ' लीड ' मधल्या माहितीमुळे जास्त चाळवलं गेलं. गेल्या दीडेकशे वर्षात होऊन गेलेल्या महाराष्ट्रातील कलावंतांवर सडवेलकरांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ' महाराष्ट्रातील कलावंत - आदरणीय व संस्मरणीय ' नावाने पुस्तक रूपात जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रकाशित होणार होता; त्याचंच औचित्य साधून लोकसत्तेनं तो लेख छापून आणला होता. बहुसंख्य लोकांप्रमाणेच मर्हाटी मातीत घडलेल्या कलाकारांबद्दलची माझी माहिती बाबुराव पेंटर - परांजपे - मुळीक - हुसेन वगैरे नावांपर्यंतच मर्यादित होती, त्यामुळे या पुस्तकाबद्दल खूप उत्सुकता वाटत होती. सुदैवाने काही दिवसातच औत्सुक्यशांतिचा योग जुळून आला - रंगसामान घ्यायला म्हणून व्हिनस ट्रेडर्सकडे गेलो असताना तिथंच हे पुस्तक नजरेस पडलं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच या संस्मरणीय कलावंताची नामावली लक्ष वेधून घेते. आबालाल रहिमान, बाबुराव पेंटर या जुन्या दिग्गज नावांबरोबर हळदणकर, शिरगांवकर, धोपेश्वरकर हे सडवेलकरांचे गुरुजन, तिथपासून रवींद्र मेस्त्री, माधव सातवळेकर, के. के. हेब्बर या समकालीनांपर्यंतची व्यक्तिचित्रणं या पुस्तकात आहेत. सडवेलकर मूळचे कोल्हापूरचे, त्यामुळे आणि लहानपणापासून कानावर पडलेल्या आबालाल रहिमान(हेही कोल्हापूरचेच) यांच्याबद्दलच्या किस्से - कहाण्यामुळे असेल म्हणा, पण त्यांच्यावरचा लेख सडवेलकरांनी खूप आत्मीयतेनं लिहिलाय. फकीरासारखं मनस्वी, कलंदर आयुष्य जगलेल्या आबालालांबद्दलची आणि त्यांच्या चित्रकृतींची माहिती संग्रहित स्वरूपात फारशी उपलब्ध नाही. पण सडवेलकरांनी त्यांच्या वंशजांकडे असलेली कागदपत्रं, त्यांच्या डायर्या यांचा धांडोळा घेऊन, त्यांची दुर्मिळ चित्रं अभ्यासून त्यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला आहे. सडवेलकरांचा ' जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ' शी विद्यार्थी आणि प्राध्यापक या दोन्ही नात्याने संबंध आला होता; त्यामुळे, धोपेश्वरकर, हळदणकर या शिक्षकांबद्दलचे आणि प्राध्यापकी करतेवेळचे जे. जे. चे डीन चित्रकार ज. द. गोंधळेकर यांच्यावरील लेखदेखील असेच हृद्य आठवणींसह लिहिले आहेत. हे लेख लिहिताना सडवेलकर ते स्वतः विद्यार्थी असतेवेळच्या जे. जे. मधल्या कला अभ्यासक्रमांची, त्या काळातील चित्रशैलीबद्दलच्या भिन्न विचारप्रवाहांतून उद्भवलेल्या स्थित्यंतरांचीही माहिती देतात. तसेच प्राध्यापकीच्या सुरुवातीच्या काळातली ' हटके ' अशी स्वतःची पद्धत, इतर ज्येष्ठ सहकार्यांकडून शिकलेल्या गोष्टी, त्यांच्याकडून मिळालेलं प्रोत्साहन या सर्वांतून प्राध्यापक म्हणून झालेली स्वतःची घडणदेखील प्रामाणिकपणे उलगडून सांगतात. पुस्तकाचं स्वरूप वरकरणी जरी व्यक्तिचित्रणात्मक वाटत असलं तरी यात तैलरंग, जलरंग या माध्यमांची वेगवेगळी तंत्रं, त्यातले कायदेकानू, या तंत्रांचा विकास होत असतानाचा इतिहास याबद्दलही माहिती दिली आहे. एवढंच नव्हे तर रघुवीर चिमुलकरांच्या ' कांचनमृगा ' सारख्या चित्रांतील रूपकं, प्रतिमा यांचं सोपं विश्लेषण करून ' चित्र बघण्याची नजर ' कशी असावी / कशी विकसित करावी याचं जणू ट्युटोरिअलच जाता जाता ते देऊन जातात. सडवेलकरांनी ब्रशचे फटकारे मारावेत तश्या सहज, लालित्यपूर्ण भाषेत हे सर्व लेख लिहिले आहेत. या सुंदर लेखांना त्या त्या चित्रकारांच्या कलाकृतींच्या कृष्णधवल / रंगीत प्लेट्समुळे तितकीच पूरक साथ मिळाली आहे. एकंदरीतच चित्र - शिल्पकला यांच्याबद्दल अगदीच वैराग्य नसल्यास वाचनीय, विशेषकरून कला^अभ्यासकांना संग्राह्य असं हे पुस्तक आहे! महाराष्ट्रातील कलावंत - आदरणीय आणि संस्मरणीय लेखक : बाबुराव सडवेलकर संपादक : रमेशचंद्र पाटकर प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन पाने : २४० किंमत : २५० रुपये ISBN 81-7925-120-9
|
राजधानीतून
लेखक : अशोक जैन राजहंस प्रकाशन. मूल्य : २०० रुपये 'महाराष्ट्र टाईम्स' चे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी म्हणुन राजधानीत जवळ जवळ एक तप राहिलेल्या लेखकाच्या या दिल्लीविषयीच्या आठवणी आणि अनुभव... दिल्लीची बखरच म्हणा ना! आणि चटकदार होण्यासाठी कारणीभूत आहे त्यांचे ओघवते, मार्मिक लेखन आणि शैलीदार भाषा. हे पुस्तक दोन भागात विभागले आहे. पहिल्या भागात त्यांना दिसलेली, त्यांनी अनुभवलेली दिल्ली, तिथे भेटलेली माणसे यांचे चित्रण आहे, तर दुसर्या भागात 'राजधानीतून' या म. टा. मध्ये येणार्या त्यांच्या साप्ताहिक वार्तापत्रातील निवडक लेख पुनर्मुद्रीत केले आहेत. त्यामुळे त्या काळातील विविध घटनांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. दिल्ली शहराबद्दल सांगताना लेखक दिल्लीतील वाहने व बेशीस्त वाहतूक, लोकांची फोनवर संभाषण करण्याची पद्धत, दुकानांच्या व इतर ठिकाणांच्या पाट्यांवर भाषेची केलेली कत्तल, यांचं गमतीशीर वर्णन लेखक करतात. दिल्लीत एकूणच भपका, डामडौल याला फार महत्त्व. दिखाऊपणाची रेलचेल. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर, भाजी आणायला जातानाही उंची रेशमी साड्या नेसून जाणार्या महिला दिल्लीतच सापडतील. दिल्लीत नोकरशाहीत चातुर्वर्ण्य पाळला जातो. सेक्रेटरी डेप्युटी सेक्रेटरीशी, अवर कारकून कनीष्ठ कारकुनाशी बोलणार नाही. एवढंच काय, त्यांच्या बायकादेखील एकमेकींशी बोलणार नाहीत. हे सारं जैन यांच्या खुमासदार शैलीत वाचतना मोठी मौज वाटते. राजधानीत सगळी कामं संथगतीने होत असतात. पण मनावर घेतलं, की दिल्ली कशी झटपट कामं करू शकते हे सांगण्याकरता व्यंकटेश माडगुळकरांशी संबंधीत एक रंजक किस्सा जैन यांनी सांगितला आहे. दिल्लीतून महाराष्ट्र किती लहान दिसतो व दिल्लीतील एकूणच वातावरण न मानवून आपले 'ग्रेट मराठा' नेते कसे वेळोवेळी मागे पडतात याविषयी त्यांनी सविस्तरपणे लिहिले आहे. त्यांची लेखणी कुणावरही बिंधास्तपणे चाल करून जाते. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील, शरद पवार, वसंत साठे, विठ्ठलराव गाडगीळ, मधू लिमये, मधू दंडवते, या मराठी नेत्यांपासून इंदीरा गांधींपर्यंत कुणीही त्यांच्या तावडीतून सुटलेलं नाही. मात्र लिखाणातलं तारतम्य त्यांनी पुस्तकभर व्यवस्थीत सांभाळलं आहे. सिमेंट की गोणीयाॅं किंवा मेरे मानपे घाम आयेला है जल्दी वो एअर कंडीशनर शुरू करो असं हिंदी बोलणार्या वसंतदादा पाटलांचा जनसंपर्क किती अफाट होता हे जैन आवर्जून लिहीतात. इन्वेन्शन इज नेसेसिटी ऑफ मदर किंवा व्हेन चाईल्ड टेक्स बर्थ ऑन अर्थ, इट बिलॉंग्स टू एव्हरीबडी असलं धेडगुजरी इंग्रजी ऐकायला मिळतं ते राजधानीतच वसंत साठेंना धसमुसळे आणि बेधडक् म्हणून संबोधतानाच त्यांनी भारतात रंगीत टी.व्ही. आणण्याकरता किती परीश्रम घेतले याचं सविस्तर वर्णनही लेखक करतात. वसंत साठे यांनी इंदीरा गांधींचा अस्थिकलश कसा शब्दश : पळवला, व मी हा कलश घेऊन मुंबईला येणार आहे असं सर्वांना सांगितलं आहे. तेव्हा मुंबई विमानतळावर उतरताना निदान मला या अस्थिकलशाला हात तरी लावू द्या. अशी याचना सुशीलकुमार शिंदे यांना त्यांच्यापाशी करावी लागली, या चमत्कारीक किश्शाचं वर्णनही मोठं रंजक आहे. जनता पक्षाची पडझड, इंदीरा गांधींचे पुनरागमन, पंजाब करार, इंदीराजींची हत्या, राजीव गांधींचे नाट्यमय पदग्रहण - या सर्व घटनांचे साक्षीदार असलेल्या जैन यांनी त्या काळी प्रिंट मिडीया वर सर्वस्वी अवलंबून असलेल्या मराठी वाचकाला एका तटस्थ पत्रकाराच्या भूमिकेतून नि : पक्षपाती मजकूर पुरवला होता. राजीव गांधींबरोबरच्या आठवणीदेखील जैन यांनी फार सुंदर चितारल्या आहेत. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्याबरोबेर मॉरिशसला जाण्याची संधी लेखकाला मिळाली. या दौर्यात राजीवजींचं मॉरिशसला राजनैतिक दृष्ट्या आडचणीत आणणारं भाषण, थांबा, थांबा ! माझं एक पान वाचायचं राहिलंय ! असं म्हणून चुकून अर्धवट राहिलेलं भाषण पूर्ण करण्याचा बालीशपणा आणि सरतेशेवटी तुमचा या दौर्यातील परफॉर्मन्स मला 'डल' वाटला असं खुद्द रजीव गांधींना सांगण्याचं आपण केलेलं अविवेकी धाडस हे सारं लेखक खुलवून सांगतात. संसदेच्या कामकाजाचं, अनेक संसदपटूंचं, मंत्र्यांचं लेखकाने जवळून निरीक्षण केलं आहे. संसदेच्या 'सेंट्रल हॉल' मध्ये घडलेल्या अनेक गमतीजमती, किस्से त्यांनी रंगवून सांगितले आहेत. पण हे पुस्तक म्हणजे केवळ बहारदार किश्शांची पोतडी मानली जाऊ नये. त्यातून डोकावणर्या इतिहासाचा अन्वयार्थ वाचकांनी लावल्यास त्यांना आपोआपच सुसंगती लागेल असं जैन स्वत : च म्हणतात. लोकसभेतील 'मौनी खासदारा' विषयी त्यांनी केलेलं संशोधन हे तर अभूतपूर्वच आहे. संसदीय कागदपत्रांच्या ढिगार्याचा बारकाईने अभ्यास केल्यावर, महाराष्ट्रातील ४८ खासदारांपैकी १४ जणांनी पाच वर्षात संसदेत एकदाही तोंड उघडलं नव्ह्तं असा धक्कादायक निष्कर्ष निघाला! आपला खासदार राजधानीत काय दिवे लावतो, हे मतदारांना प्रथमच कळले. त्यानंतर इतर राज्यातील पत्रकारांनीदेखील आपापल्या खासदारांची अशीच 'पगतिपुस्तके' तयार केली! काही खासदार 'मौनी' म्हणुन हिणवलं जाऊ नये म्हणुन जरा सक्रियही झाले! सर्वसामान्यांना नेत्यांची दर्शनी बाजूच फक्त ठाऊक असते. पण पत्रकार त्यांना जवळून पाहात असल्याने त्यांना त्यांचे इतर पैलूही ठाऊक असतात. हे त्यांचे पैलू किती ढोंगी, वैफल्य आणणारे आणि घृणास्पद असू शकतात याची पुस्तक वाचल्यावर कल्पना येते. अशा पुढार्यांचं वर्णन लेखकाने 'सिंहासन' या कवितेत केलं आहे : सिंहासन खुणावते तेव्हा - भलेभलेही रांगत येतात अस्मितेच्या कलेवरावर लाचारीचा अभिषेक होतो 'राजकिय ऋतुचक्र' नावाच्या आणखी एका कवितेचा समावेश पुस्तकात आहे. ठसठशीत काव्यगुण नसले तरी दिल्ली किती ढिल्ली आहे हे या दोन कवितांतून व्यवसथीतपणे कळून येतं. राजकीय नेत्यांबरोबरच दिल्लीत भेटलेली इतर साहित्यिक, कलाकार मंडळी, स्नेही, यांच्यादेखील आठवणी लेखकाने सांगितल्या आहेत. यात अमिताभ बच्चन, अमोल पालेकर, विजय तेंडुलकर, गंगाधर गाडगीळ, कमलाकर व लालन सारंग वगैरे मंडळींचा समावेश आहे. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यापासून ते ना. धों. महानोरांपर्यंत विविध व्यक्तींनी राजधानीत रंगवलेल्या मैफीलींचे रसभरीत वर्णनही जैन करतात. या पुस्तकात कुठेही अनावश्यक चर्चा नाहीत वा बुद्धिमत्तेचा आव आणून केलेली विश्लेषणं नाहीत. लेखनात सर्वत्र मार्मिक विनोदाची छटा विखुरलेली असल्याने जैन यांची भाषाशैली प्रसन्न आणि रंजक वाटते. प्रत्येक बातमीच्या मागे अनेक घटना असतात. बातम्यांमागे बातम्या असतात. बातमीच्या अवतीभवती 'सांडलेला' हा तपशील रोखठोकपणे वाचकापर्यंत पोचवावा, या हेतूने लिहीलेल्या या पुस्तकामार्फत जैन वाचकांना राजधानीची एक रोमहर्षक सफर घडवून आणतात
|
Sanyojak
| |
| Friday, September 30, 2005 - 9:23 am: |
| 
|
परीक्षकांचे मनोगत : By Rar गणपती उत्सवातील ' पुस्तक परिक्षण स्पर्धेचे ' परिक्षण करण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे ही बातमी ' फ़ुटली ' असावी (तसंही आजकाल e-mail मधल्या बातम्या फ़ुटणं हे काही नवीन राहिलं नाहीये!) आणि मग पुरुषोत्तम करंडकच्या धर्तीवर ' परिक्षकांची परिक्षण करण्याच्यी पात्रता नाही ' असं म्हणून स्पर्धक संघ जसे नाटकाचा प्रयोग रद्द करतात तसेच काहीसे वाटून लोकांनी पुस्तक परिचय लिहायचेc टाळले असावे... मायबोलीवर येणार्या तुम्हा आम्हा लोकांना मुळातच पुस्तकं वाचायची आवड नाही आणि वाचली तरी त्याविषयी लिहायचं skill नाही किंवा वेळ नाही ही कारणं निदान मला तरी न पटणारी वाटतात. त्यामुळे स्पर्धेला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादाचं कारण माझ्यासारखे परिक्षक हेच असावं हा आपला माझा एक अंदाज! या स्पर्धेत केवळ २ स्पर्धकांनी भाग घेतल्यामुळे संयोजक निकाल जरी जाहीर करणार नसले तरी या दोन स्पर्धकांचं लिखाण वाचणं आणि ते मला कसं वाटलं हे सांगणं मला खूप महत्वाचं वाटतंय... फ़ आणि सखिप्रिया या दोन्ही स्पर्धाकांचे सर्वप्रथम मन : पूर्वक आभार आणि अभिनंदन! फ़ ने त्याच्या परिक्षणाच्या सुरुवातीलाच लोकसत्तातील लेखाचा उल्लेख केलाय. एका वाक्यात त्यानं ' चांगल्या परिक्षणाचं महत्त्व ' सांगीतलय.. म्ह्णूनच वेळात वेळ काढुन त्यांना असलेली किंवा त्यांनी मिळवलेली माहीती आम्हा लोकांपर्यंत पोचवल्याबद्दल दोघांचेही आभार! आणि अभिनंदन अशासाठी की दोघांनीही अतिशय प्रभावीपणे आणि अतिशय संयमित रितीने पुस्ताकांबद्दल लिहिले आहे. कोणतेही परिक्षण लिहीताना मग ते पुस्तकाचे असो, गाण्याचे असो किंवा सिमेनाचे असो, हा ' संयम ' खूप महत्वाचं असतो आणि तोच ' परिक्षण प्रभावी करतो ' असं मला वाटतं. एक तर आपण स्वत : च्या नाही तर दुसर्याच्या निर्मीतीबद्दल लिहित आहोत, याचे भान असायला हवे. दुसरे म्हणजे प्रत्यक्ष story न सांगता, केवळ लहानश्या hints देत देत, पुस्तक वाचण्यासाठी उत्सुकता निर्माण व्हायाला हवी. आणि तिसरे म्हणजे मोजक्या शब्दात विचार प्रभावीपणे मांडले जायला हवेत (कारण परिक्षणच रटाळ झाले तर पुस्तक वाचायचा निम्मा उत्साह तिथेच संपायचा!!) या सगळयाच दृष्टीने पाहायला गेले तर दोन्ही पुस्तकांची परिक्षण अतिशय उत्तम रितीने लिहीली गेली आहेत. मी प्रामाणिकपणे कबूल करते की इतकं मुद्देसूद आणि प्रभावी परिक्षण लिहायला मला जमलं नसतं आणि ते ही आवडलेल्या गोष्टीबद्दल लिहीताना जेव्हा ती गोष्ट आपल्याला का आवडलीये? हे खूप सांगावसं वाटत असतं,तेव्हा संयम ठेवणं जास्त अवघड असताना! Great job!! वास्तविक पाहता दोन्ही पुस्तकांचे विषय पुर्णपणे वेगळे आहेत. एक कलेविषयी तर एक असंख्य राजकीय घडामोडींना साक्षी असलेल्या दिल्लीविषयी! पण तरीही दोन्ही पुस्तकं वाचायची उत्सुकता निर्माण झालीये... आबालाल रहमान यांच्याबद्दल कोणती माहीती असेल? किंवा चिमुलकरांची चित्र कशी explain केली असतील? किंवा पुस्तकात लेखांबरोबर कोणती चित्र सामावलेली असतील? तसंच राजधानीतुन च्या बाबतीत दिल्लीविषयीची ती दुसरी कविता कोणती असेल? मल्लिकार्जुनाच्या मैफ़िलीचे कसे वर्णन असेल? किंवा ह्या नेत्यांचे सामान्य जनतेला न दिसणारे रूप कसे असेल? असे एक ना अनेक प्रश्न पडले.. याचाच अर्थ कुठेतरी ही पुस्तक वाचाविशी वाटायला लागली आहेत... आणि जेव्हा परिक्षण वाचून अशी पुस्तकाबाबत उस्तुकता वाटते तेव्हा वेगळं सांगायला नको की परिक्षण उत्तम रितीनं लिहीलं गेलय थोडक्यात भट्टी जमून गेलीये 1000 स्पर्धक असलेल्या स्पर्धा असतात आणि मोजकेच पण उत्तम तयारी असलेले १० - १५ स्पर्धक असलेल्या पण स्पर्धा असतात its not the quantity but the quality that matters किंबहुना त्याही पुढे जाउन ' आपण किती तयारीने आणि कोणत्या spirit ने स्पर्धेकडे पाहतो आहोत हे जास्त महत्त्वाचे! या दृष्टीने पाहिले तर ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वी झाली आहे असं मला वाटतं... त्याबद्दल स्पर्धकांचे आणि संयोजकांचे मन : पूर्वक अभिनंदन
|
पुस्तक परिक्षण स्पर्धेचे नियम... १) परिक्षणासाठी पुस्तक निवडताना शक्यतो HG वर ज्याचे आधीच परिक्षण झाले आहे, असे पुस्तक टाळावे. अर्थात ह्या नियमाला अपवाद मान्य केला जाईल. २) परिक्षण करताना पाचशे शब्दांची मर्यादा शक्यतो पाळावी. परिक्षणा मधे फापटपसारा येउन ते कंटाळवाणे होउ नये ( परिक्षक व वाचक ह्या दोघांच्याही दृष्टीने) म्हणून ही सूचना आहे. ३) लेखकावर वैयक्तिक ताशेरे मारु नयेत. ४) पुस्तक आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे ही साहित्यीक दृष्टीकोनातून दिलेली असावीत. ५) fiction आणि non fiction अशा दोन्ही कॅटेगरी मधील पुस्तकं स्पर्धकांना परिक्षणाकरता निवडता येईल. फक्त तांत्रीक विषयांची पुस्तके टाळावीत. ६) पुस्तक मराठीच असावे. अनुवादीत चालेल. ७) परिक्षकांचे निर्णय अंतिम मानले जातील.
|
|